विद्रोह (Vidroh)




पुस्तक - विद्रोह (Vidroh)
लेखक - हेन्री डेन्कर (Henry Denker)
अनुवाद - लीना सोहोनी (Leena Sohoni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - Outrage (आऊटरेज)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
पाने - १८८
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. सप्टेंबर १९८९
छापील किंमत - रू. २९९ /-
ISBN -978-93-5720006

१९८२ साली प्रकाशित झालेली ही अमेरिकन सामाजिक कादंबरी लीनाजींनी १९८९ मध्येच मराठीत आणली आहे. २०२४ मध्ये पुनर्मुद्रण होऊन पुन्हा मराठी वाचकांसमोर आली आहे.



कादंबरीची सुरुवात होते.. रिऑर्डन नावाचा मध्यमवयीन माणूस बंदूक घ्यायला आलाय. अगदी मध्यमवर्गीय, नोकरदारासारखा साधा माणूस बंदूक विकत घेतो. त्या संध्याकाळी एका व्यक्तीचा माग काढून थेट गोळ्या घालून त्याला ठार करतो. शांतपणे पोलिसांकडे येऊन जबानी देतो की मी खून केलाय. मला पकडा. कायद्याने काय शिक्षा व्हायची आहे ती होऊ द्या.

तो सांगतो की हा खून त्याने केलाय कारण.. "जॉन्सनने माझ्या मुलीवर बलात्कार केला होता, तिची हत्या केली होती. सगळे साक्षी पुरावे असूनही काहीतरी तांत्रिक कारणास्तव न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं. माझी मुलगी गेलीच. तिच्या आठवणीने झुरून बायकोही केली. घर उद्ध्वस्त झालं. आणि हा मात्र मोकाट फिरतोय..म्हणून मी त्याला मारलं."

ह्याला खून म्हणायचं ? कायदा हातात घेणं म्हणायचं? व्यवस्थेने न्याय नाकारला तर स्वतः न्याय मिळवणं चूक का बरोबर? ह्या कृत्यासाठी शिक्षा व्हायला पाहिजे की खुनामागचा हेतू बघता त्याला निर्दोष मानलं पाहिजे? रिऑर्डन ला वाटतं म्हणून दुसरी व्यक्ती अपराधी मानायची का? दोषी कोण आणि निर्दोष कोण हे ठरवायचा अधिकार न्यायव्यवस्थेला दिलाय मग असं कोणी स्वतः निवडा कसा करू शकेल? सगळेच असं वागले तर...

हे सगळे प्रश्न उभे राहतात जेव्हा रिऑर्डन चा खटला सुरू होतो तेव्हा. "मला वकील नको, गुन्हा कबूल आहे" असं ते म्हणाला तरी न्यायाधीश त्याला एक वकील देतात. एक तरुण होतकरू वकील - बेन. रिऑर्डन बद्दल त्याला सहानुभूती वाटतेय. पण सगळे पुरावे उघड रिऑर्डनविरुद्ध आहेत आणि त्याला स्वतःलाच सुटायची इच्छा नाही. अशावेळी बेनने कसं वागावं ? बेन खटला कसा लढवतो. न्यायालयात युक्तीवाद कसे होतात. आणि शेवट काय होतो हे कादंबरी वाचल्यावरच तुम्हाला कळेल.

अमेरिकेत सर्वसामान्य लोकांमधून बारा पंधरा लोक "ज्युरी" म्हणून लोक निवडले जातात. त्या ज्युरींनी साक्षी पुरावे ऐकून आरोपी दोषी की निर्दोष हे ठरवायचं. भावना मध्ये न आणता फक्त तथ्यांवर आधारित निर्णय घ्यायचा. आणि त्यावर न्यायाधीशांनी निकाल सुनावायचा अशी पद्धत. त्यामुळे दोन्हीकडचे वकील कायद्याचा कीस पडतात तसंच ज्युरी लोकांना आपल्या बाजून वळवायचा कसा प्रयत्न करतात हे रंजक आहे. आधीच्या खटल्यात न्याय कसा मिळाला नाही हे दाखवताना बेन न्यायव्यवस्थेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. तर कितीही भावनिक प्रसंग असला तरी तथ्य आणि नियम ह्यांवरच निर्णय कसा घ्यावा लागतो ही दुसरी बाजूही पुढे येते.

ह्या खटल्यात जसा नैतिक-अनैतिकतेचा पेच लेखकाने उभा केला आहे तसा प्रत्येक पात्राच्या स्वभावानुसार प्रसंगांकडे बघण्याचा वेगवेगळा प्रकारही छान रंगवलाय. ज्युरीची जबाबदारी घ्यायला काही जण उत्सुक तर काहीजण नाईलाजानं. केवळ सनसनाटी बातम्या मिळवण्यासाठी आधाशी पत्रकार आणि ह्या केस मधून एक धमाकेदार पुस्तक होईल ह्यासाठी धडपडणारा एजंट. बेनला आठवणींच्या रूपातून मार्गदर्शन करणारे त्याचे काका, त्याची प्रेयसी, कडक न्यायाधीश अशी कितीतरी छोटी मोठी पात्रं ह्यात येतात. त्यामुळे विषय गंभीर असला तरी कथन रंजक होतं. न्यायालयीन नाट्य असलं तरी ते अतितांत्रिक होत नाही. ती चर्चा अशी गुंफली आहे की आधीच्या खटल्यात काय नियमकानून लागू झाले, आत्ता काय लागू होतात हे आपल्याला समजतं. त्यामुळे ती साधार गोष्ट वाटते. दोन्ही बाजूंचे म्हणणे, अडचणी, भावना नीट समजतात.

काही पाने उदाहरणादाखल.

बेनशी सहकार्य करायला नकार देणारा रिऑर्डन



बलात्काराच्या खटल्यात निकाल देणाऱ्या न्यायाधीशाला पण साक्षीला बोलवा अशी मागणी बेन करतो तेव्हा.



ज्युरी लोकांनी भावनिक का होऊ नये हे सरकारी वकिलाचं सुस्पष्ट म्हणणं


पुस्तक वाचताना वाचकही आपोआपच ज्युरी होतो. आणि आपल्या मनातला निकाल लागतोय का नाही ह्याची उत्सुकता वाटत राहते.

मूळ पुस्तकाचा अनुवाद प्रथितयश अनुवादिका लीना सोहनी ह्यांनी केला आहे. तो त्यांच्या नावाला साजेसा ओघवता झाला आहे. कायदेशीर संज्ञांमध्ये मराठी आणि इंग्रजी शब्दांचा मेळ साधत भाषांतर केलं आहे. त्यामुळे हे मराठी पुस्तकच वाटतं.

पुस्तकाचा विषय आणि आशय लक्षात आला असेलच. तर पुस्तक वाचा आणि... "युवर ऑनर, रिऑर्डनचा खटला तुमच्यासमोरही चालावा... साक्षी, पुरावे, नियम, समाजाला त्यातून मिळणारी दिशा तुम्हीही ठरवा".

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

डोंगराएवढा (Dongaraevadha)



पुस्तक - डोंगराएवढा (Dongaraevadha)
लेखक - शिवराम कारंत (Shivram Karant)
अनुवादक - उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - बेट्टद जीव (Bettada Jeeva) (ಬೆಟ್ಟದ ಜೀವ)
मूळ पुस्तकाची भाषा - कन्नड (Kannada)
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस , १९८५
पाने - १४८
छापील किंमत - रु. १८०/-
ISBN - 9788171617661

उत्तर कर्नाटकातल्या डोंगरदऱ्यांत वसलेल्या एका छोट्या खेड्यातली ही गोष्ट आहे. कादंबरीचा निवेदक - शिवराम नावाचा तरुण - एका गावाहून दुसऱ्या गावी आडवाटेने चालत चालला होता. चालता चालता उशीर झाला, अंधार पडला आणि तो रस्ता चुकला. योगायोगाने तिथले दोन गावकरी त्याला भेटले. त्याला म्हणाले, "आता इतक्या उशीरा, अंधारातून तुमच्या गावी पोचणं कठीण आहे. आजचा दिवस इथे राहा. सकाळी पुन्हा जा". हाच बरा पर्याय वाटून तो त्यांच्याबरोबर थांबायचं ठरवतो. पण गावकऱ्यांचं अगत्य इतकं की एका रात्रीपुरता करायचा मुक्काम आठवाडाभर लांबतो. गावकऱ्यांशी गप्पागोष्टी होतात, गावात आणि आजूबाजूला फिरणं होतं. त्या गप्पांचं, फिरण्याचं हे वर्णन म्हणजे ही रसाळ कादंबरी आहे.

शिवराम ब्राह्मण असल्यामुळे गावकरी त्याला गावातल्या ब्राह्मणाच्या घरी घेऊन जातात. गोपालय्या आणि शंकरम्मा असं हे वृद्ध दांपत्य आहे. ते त्याची प्रेमाने राहायची व्यवस्था करतात. हे दांपत्य, त्यांचा मानलेला मुलगा-सून, शेजारी "देरण्णा", कामगार "बट्ट्या" ह्या सगळ्यांशी भेटणं, बोलणं होतं. गोपालय्यांच्या घरी, त्यांच्या मानलेल्या मुलाच्या घरी आग्रहाने खाऊपिऊ घालणं होतं.

गावाभोवती हिरवेगार डोंगर, गर्द झाडी आहे. धबधबे, झरे, नदी अशी पाण्याची मुबलकता आहे. स्वच्छ हवेमुळे प्रसन्न वातावरण. पण शहरापासून, गाडीरस्त्यापासून फार दूर. दुर्गम ठिकाण. त्यामुळे फारच थोडे लोक तिथे राहतायत, तांदूळ, ऊस ह्यांची शेती करतायत. नारळ , सुपारीच्या बागा राखतायत. निसर्ग अनंत हस्ताने द्यायला तयार आहे पण तितक्याच हातांनी परत घ्यायला ही तयार आहे. पाऊस, वादळ, माकडांचा उच्छाद आहे. रानातल्या हत्तींची झुंड शिरून ऊस आणि पोफळीच्या बागांची नासधूस करतात. रात्री अपरात्री वाघाची डरकाळी तर जवळून ऐकू येते. असं असूनही लोक इथे राहतायत. त्यात आपल्या मायभूमीचं प्रेम आहे. थोडा सवयीचा भाग आहे. त्याहून अधिक म्हणजे गोपालय्यांची जिद्द आहे. डोंगराशी सलगी करत पण रान मोकळं करून शेत-मळे-बागा उभारायची दुर्दम्य इच्छा आहे. तरुणपणात त्यांनी कष्ट करून हा भाग कसा रंगरूपाला आणला हे त्याला समजतं आणि अजूनही योग्य साथ मिळाली तर नव्याने काही आणायची जिद्द जाणवते.

दुर्गम भागामुळे माणसांची वस्ती कमी. बाहेरून येणाऱ्याजाणाऱ्यांची वर्दळही नगण्यच. त्यामुळे माणसाला माणूस भेटणे हे ही अप्रूपच. त्यामुळे पाहुण्यांना काय काय दाखवू आणि काय नको असं त्यांना होत असतं. त्यामुळे थंडगार नदीत अंघोळ, वाघाची शिकार, दाट अरण्यातून भटकंती असे बरेच प्रसंग घडतात. फिरून आल्यावर पाहुणे दमले असतील म्हणून अंगाला तेल लावून गरम काढत पाण्याने अंघोळीची सोय करतातच. आणि वर पाहुणा संकोचतोय हे बघून स्वतः अंगाला तेल लावून देतात. असा लोभाचा धबधबाच जणू ! तरी शहरी 
शिवरामला लक्षात येतं की कितीही सुंदर वाटलं तरी आपण काही अशा एकलकोंड्या ठिकाणी राहू शकणार नाही बुवा ! म्हणूनच गोपालय्या, शंकरी, गावकरी ह्यांचा पाहुणचार, कष्ट हास्यविनोद करत स्वतःचं जीवन सुसह्य करण्याचा प्रत्यन ह्याचं कौतुक त्याला वाटतं.

ह्या वर्णनाला एक समांतर धागा सगळ्यांच्या बोलण्यातून येत असतो की गोपालय्या आणि शंकरम्मा ह्यांचा मुलगा तरुणपणी शिकायला म्हणून शहरात गेला. मधून मधून तो गावी येत असे. मग नोकरी लागल्यावर गावाला त्याचं येणंजाणं कमी होत गेलं. आणि आता ते बंदच झालं. मुलाची भेट व्हावी म्हणून म्हातारा म्हातारी तळमळतायत. बोलताना पुन्हा पुन्हा तो विषय निघतोय, आणि पुन्हा पुन्हा काहीतरी हास्यविनोद करून ते अश्रू लपवत विषय मागे टाकतायत. मानलेल्या मुलाला त्याच्या मुलांना आता आपलं समजून वागतायत. आपला पाहुणा शहरातून आलेला आहे. कदाचित त्याला आपला मुलगा कधी दिसला, भेटला तर त्याने मुलाला आपली अवस्था सांगावी; आईवडिलांना भेटायला जायला सांगावं; अशी वेडी आशासुद्धा बाळगतायत. तो मुलगा कोण असेल का नसेल परत आला ? ह्याचा उलगडा कादंबरी वाचल्यावरच होईल.

काही पाने उदाहरणादाखल
गावापासून थोडा लांब असलेला गोपालय्यांचा "काटेमुलू" मळा बघायला सगळे जातात तो चालण्याचा प्रसंग.



कन्नड ब्रह्माणांमधल्या जाती पोटजातींमधल्या स्वभाववैविध्यावर मिश्किल टिप्पणी



म्हाताऱ्या नवराबायकोच्या समंजस वागण्याचं, लटक्या रागाचं आणि पुन्हा एकमेकांची चेष्टा करण्याचं अप्रूप 
शिवरामला वाटतं. तेव्हाचा संवाद.



पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती


पुस्तकात दिलेली अनुवादिकेची माहिती


सुरुवातीपासून जाणवणारे एक लहानसे रहस्य आणि त्याचा उलगडा हे नाट्य असले तरी तो पुस्तकाचा मूळ गाभा नाही असं मला वाटलं. त्या परिस्थितीचं, माणसांचं वर्णन हेच कादंबरीचे कथाबीज आहे. बाहेर निसर्ग-डोंगर-वन्यप्राणी  ह्यांच्याशी जुळवून घेत आणि मनात ह्या विरहाशी जुळवून घेत, कटुता न बाळगता, जमेल तितक्या आनंदाने, परोपकाराने, परिपक्वतेने जगणाऱ्या "डोंगराएवढे" व्यक्तिमत्त्व असणाऱ्या गोपालय्यांची ही कहाणी आहे. शहरी जीवन आणि गावाकडचं जीवन ह्यातला फरक हलकेच सुचवणारी, निसर्गाचं मोहक वर्णन करणारी, निसर्गाच्या आव्हानाची जाणीव करून देणारी, गावाकडच्या लोकांच्या प्रेमळ आतिथ्याची ही कहाणी आहे. लेखकाची लेखणी समर्थ आहेच. शब्द-वाक्प्रचार ह्यांची गंमत, चित्रमय वर्णन, तो निसर्ग, तिथल्या माणसांचा भोळेपणा-चतुरपणा ही वातावरणनिर्मिती गुंतवून ठेवणारी आहे. मूळ कन्नड पुस्तकाचा उमा ताईंनी केलेला मराठी अनुवाद तितकाच ताकतीचा ... "डोंगराएवढा" ! त्यामुळे कादंबरी संपली, रहस्य कळले तरी आता गोपालय्या, शंकरम्मा, नारायण वगैरे मंडळींच्या आयुष्यात पुढे काय होईल हे लेखकाने सांगत राहावे आणि आपण वाचत राहावे असे वाटते.

नेटवर शोधताना कळले की ह्या कादंबरीवर कन्नड चित्रपटही आहे. तोही कादंबरीप्रमाणेच लोकप्रिय आहे. 
https://www.youtube.com/watch?v=iZbV9gxBAKM


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

बांधावरची बाभळ (Bandhavarachi babhal)





पुस्तक - बांधावरची बाभळ (Bandhavarachi babhal)
लेखक - प्रकाश नावलकर (Prakash Navalkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १७२
प्रकाशन - न्यू इरा पब्लिशिंग हाउस. डिसेंबर २०२४
छापील किंमत - रू. २८०/-
ISBN -978-93-94266-96-4

लेखक प्रकाश नावलकर यांनी मला हे पुस्तक वाचायला भेट म्हणून दिलं याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. प्रकाश नावलकर लिखित हा दुसरा कथासंग्रह आहे.
लेखकाचा पुस्तकात दिलेल्या परिचय.

महाराष्ट्रातील खेड्यात घडणाऱ्या प्रसंगांवर आधारित या कथा आहेत. अशा प्रकारच्या कथा कादंबऱ्यांमध्ये आढळून येणारे नेहमीचे प्रसंग त्यात आहेत. म्हणजे शेतीवर आधारित जगणं त्यामुळे ऋतू बदलला की शेतकऱ्यांच्या कामाची लगबग होते. निसर्गाच्या कोपालाही तोंड द्यावा लागतं. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक गमावून बसण्याची पाळी येते. शेतीच्या कामांचं स्वरूपही खूप मेहनतीचं एकट्यादुकट्याचं काम नव्हे. सहाजिकच त्यातून गावकऱ्यांचे व्यवसाय, अलुतेदार- बलुतेदार एकमेकांवर अवलंबून असतात. शेतात एकमेकांच्या कामात त्यांना मदतीला जातात. पिढ्यानपिढ्या एकाच गावात नांदल्यामुळे घरोघरी ओळखी असतात, आपुलकी असते आणि प्रसंगी पिढीजात वैरही असतं. सरपंच, पाटील असे गावातल्या सत्तेचे अधिकारी असतात तसेच तर मोलमजुरी करून पोट भरणारे गावकरीही असतात. प्रत्येकाचं समाजातलं स्थान आणि मान ठरलेला असतो. त्यामुळे लग्नासारख्या कौटुंबिक गोष्टीतही सरपंच, पाटील, शिक्षक अशा प्रतिष्ठितांचं मत विचारात घेतलं जातं. त्यांच्या संमतीने व्यवहार होतात. अडीअडचणीला गावकरी एकमेकांच्या मदतीला येतात. एखाद्या घरी कर्ता पुरुषमाणूस नसेल तर भावकीतले मोठे लोक पुढाकार घेऊन लग्नकार्य पार पाडतात तर कधी भांडणांमध्ये मध्यस्थी करतात. अशा कितीतरी प्रसंगांनी भरलेलं हे पुस्तक आहे.

काही गोष्टी मात्र खास आवडल्या
"बांधावरची बाभळ" मध्ये धनगरांचं जगणं आणि त्यांच्यावर झालेल्या चोरांच्या हल्ल्याची गोष्ट आहे. "भागू अक्का" ही रानमेवा विकणाऱ्या गरीब भागूचं व्यक्तिचित्र आणि गावातल्या माणुसकीचं चित्र आहे. "रामुतात्या" मध्ये घराकडे दुर्लक्ष करून राजकारण्यांच्या सतरंज्या उचलणाऱ्याचं उदाहरण दाखवलं आहे. "सुमीचं प्रेम" मध्ये नुकतीच वयात आलेली सुमी पैलवान संजय कडे आकर्षित होते आणि कशी लाईन मारते याचं मजेशीर वर्णन आहे. "पेसाटी" मध्ये गावच्या मस्तवालांना तोंड देणाऱ्या बाईची गोष्ट आहे. ह्यांमध्ये नाट्य आहे, उत्कंठा आहे आणि सुरुवात ते शेवट असा कथानकाचा प्रवास चांगला होतो.

पण बाकी बऱ्याच कथांमध्ये सुरुवात छान रंगवली आहे. त्यातून आपण मुख्य प्रसंगापर्यंत येतो. काहीतरी नाट्य घडणार असं आपल्याला वाटत असतानाच ते मुख्य नाट्य मात्र अगदीच दोन परिच्छेदात फार फार तर एका पानात उरकून टाकलं आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विरस झाला.
अगदी सुरुवातीची शर्यती कथा बैलगाड्या शर्यतीवर आहे. त्यात बैलगाडा शर्यतीसाठी मालक आणि बैल जोडी कशी तयार होते याचं खूप छान वर्णन केलं आहे आता शर्यत कशी रंगणार म्हणून आपण पुढे वाचायला जातो तर ते पण अगदीच फुस्स होऊन संपून जातं.
"विश्वास" या गोष्टीमध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं नवरीच्या माहेरी येतं. तेव्हा तिच्या घरी तिचा जुना मित्र येतो. त्याच्याबद्दल नवऱ्याला सांगते. नंतर हाच मित्र तिच्या सासरी येऊन, "मी तिचा बॉयफ्रेंड आहे" असं सांगतो. आता इथून पुढे खरं नाट्य सुरू होणार असतं. पण...घरात थोडा वाद होतो. नवरा मात्र बायकोची बाजू घेतो आणि सगळं संपतं.

तर पुस्तकातल्या काही गोष्टी या "गोष्टी" नसून तर खेड्यात नियमितपणे करणारे प्रसंग आहेत. उदाहरणार्थ "हरवलेली म्हैस" मध्ये एक म्हैस हरवते. तिचे मालक सगळे चिंतेत असतात. आणि संध्याकाळी ती म्हैस परत येते. "आणि सुपारी फुटली" मध्ये एका मुलीचा बघण्याचा कार्यक्रम, पसंती आणि देण्याघेण्याची बोलणी होतात इतकंच आहे. तर जणू याचा पुढचा भाग असावा असं "गावाकडचे लगीन" या कथेत मुलीला लहानपणापासून चांगलं वळण लावलं, घरच्या कामाची सवय लावली, मग स्थळ बघून लग्न ठरतं, लग्नाचे विधी होतात आणि मुलगी सासरी जाते असं सगळं वर्णन आहे. या सगळ्या गोष्टींमधलं वर्णन तो तो प्रसंग डोळ्यासमोर उभा करणारं आहे त्यामुळे वाचायला छान वाटतं. फक्त त्या गोष्टी न वाटता एखाद्याचा कौटुंबिक फोटो अल्बम आपण बघतो आहोत असं वाटतं.


या गोष्टींमधलं निवेदन प्रमाण भाषेऐवजी ग्रामीण भाषेतच केलेलं आहे त्यामुळे ते सगळे एकजनसी चांगलं वाटतं. बहुतेक कथांमध्ये प्रसंगांचा वेग चांगला आहे. थोडक्यात पण प्रसंग समजेल अशी शैली आहे. त्यामुळे आपण कुठेही रेंगाळत कंटाळत नाही.
काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका

"बांधावरची बाभळ" गोष्टीतला धनगरांचा एका गावातून दुसऱ्या गावात गेल्यावर मुक्काम करण्याचा प्रसंग.


"म्हवू" मधला मधाचे पोळे काढण्याचा प्रसंग.

"पाणी" कथेतील नळावरचे भांडण

अशा एकूण वेगवेगळ्या ढंगाच्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टींमध्ये खरंतर चांगलं कथाबीज आहे. पण वर म्हटलं तसं जितक्या ताकदीने पहिला भाग रंगवला आहे तितक्या ताकदीने पुढचा भाग रंगवला असता तर एक छान ग्रामीण कथासंग्रह मराठी वाचकांना मिळाला असता यात शंका नाही.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

दिशा आणि वाटा काही प्रवास नोंदी (Disha ani vata : Kahi pravasanondi)





पुस्तक - दिशा आणि वाटा : काही प्रवास नोंदी (Disha ani vata : Kahi pravasanondi)
लेखक डॉक्टर आशुतोष जावडेकर (Dr. Ashutosh Javdekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९१
प्रकाशन - पद्मगंधा प्रकाशन डिसेंबर २०२४
छापील किंमत - रू. ३५०/-
ISBN 978-81-946458-4-9

आपल्यापैकी बहुतेकांना फिरायला जायला आवडतं. नवनवीन ठिकाणं बघायला आवडतं. तिथे वैविध्यपूर्ण पदार्थ खाणं, खरेदी करणं आवडतं. तितकंच आवडतं घरी परत आल्यावर तो सगळा अनुभव आपल्या घरच्या मंडळींना, मित्र-मैत्रिणींना सांगणं. अशीच आवड लेखकालाही आहे आणि त्यातून या प्रवास नोंदी पुस्तक रूपाने आपल्यासमोर आल्या आहेत. लेखक आशुतोष जावडेकर हे एकटे किंवा आपल्या पत्नी, आई, मुलीसोबत परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून आले आहेत. त्या प्रवासात त्यांना जाणवलेले महत्त्वाचे, रंजक, माहितीपर, काहीतरी वेगळे असे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.

त्यात गमतीजमती आहेत, कधी गंभीर प्रसंग किंवा ओढवलेलं संकट आहे. झालेली फजिती आहे तशीच नव्याने कळलेली माहिती आहे. थोडं स्थलवर्णन, थोडं प्रवासाचं वर्णन, थोडं खाण्यापिण्याचं वर्णन आणि थोडं तिथल्या लोकांचं वर्णन असा प्रकार आहे. त्यातूनच वाचकाच्या मनात सुद्धा त्या त्या ठिकाणाबद्दल उत्सुकता चाळवली जाते. प्रवास करण्याची, तिकडे जाऊन तो अनुभव घेण्याची इच्छा निर्माण होते. नकारार्थी अभिप्राय वाचून एखाद्याची योजना बारगळूही शकेल. भेट दिलेल्या ठिकाणच्या इतिहास, भूगोल, संस्कृती, वर्तमान याचा सविस्तर अभ्यास आहे असा दावा न करता त्या मर्यादित काळात आपल्याला काय दिसलं, काय जाणवलं हे सांगायची निखळ उर्मी घेऊन लिहिलेलं पुस्तक आहे. प्रवासाचं वर्णन म्हणून ते इंटरेस्टिंग आहेच वर त्यात लेखकाची शैली सुद्धा अगदी समोर बसून गप्पा मारतोय अशी आहे. त्यामुळे पुस्तक वाचायला मजा येते.
अनुक्रमाणिकेवर नजर टाकली की तुम्हाला लक्षात येईल त्यांनी कुठल्या कुठल्या ठिकाणांचे वर्णन केलं आहे.

परदेशात जाताना बहुतेक मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन लोक हे एखाद्या टुरिस्ट कंपनीच्या पॅकेज टूर मधून जातात. सहाजिकच मुख्य पर्यटनस्थळं बघून होतात. प्रवासाची आखणी, तिकिटाचे बुकिंग हा सगळा व्याप आपल्याला करावा लागत नाही. तर त्याच्या उलट काही जण बॅक पॅकर्स म्हणजे छोटेसे सामान घेऊन परदेशात जातात. मनाला येईल तसा प्रवास करतात. कुठेही राहतात. कोणालाही लिफ्ट मागून प्रवास करतात. मिळेल ते खातात वगैरे वगैरे. या दोन्ही टोकांचा मध्य म्हणजे लेखकाची प्रवासाची पद्धत. टूर कंपनी बरोबर न जाता इंटरनेटवरनं पूर्ण माहिती काढून, परिचितांचा सल्ला घेऊन त्यांनी स्वतः आखणी केली आहे. काय बघायचं, कुठे राहायचं, कसा प्रवास करायचा हे सगळं ठरवलं. फक्त पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांना भेटी न देता त्यापेक्षा थोड्या हटके पण तितकंच निसर्ग सौंदर्य किंवा ऐतिहासिक-भौगोलिक महत्त्व असणारी अशी ठिकाणे निवडली. रेल्वे, ट्राम, बस अशा सार्वजनिक वाहनांनी प्रवास केला. हॉटेल्स, गेस्ट हाऊस किंवा सर्विस अपार्टमेंट अशा ठिकाणी राहिले. त्यामुळे स्थानिक लोकांशी, स्थानिक भाषेशी त्यांचा जास्त जवळून परिचय झाला. म्हणूनच त्यांचा अनुभव सर्वसामान्य पर्यटकांपेक्षा थोडा वेगळा आहे. त्यांनी अनुभवलेली ठिकाण सुद्धा वेगळी आहेत.
वर्णनाचं दुसरा वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त स्थलवर्णन करत नाहीत तर स्वतःच्या मनात तेव्हा आलेले विचार, आलेल्या भावना यांचे उत्कट चित्रण सुद्धा करतात. त्यामुळे बाहेर चालणारा प्रवास आणि अंतर्मनात होणारा विचारांचा प्रवास सुद्धा आपल्याला दिसतो.
पुस्तक वाचताना जाणवतं की एकूणच त्यांचा प्रवासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. नवनवीन अनुभव वेचण्याकडे कल आहे. सगळं काही अगदी आपल्या घरातल्यासारखं, आपल्या गावातल्या सारखं मिळणार नाही; काही गैरसोयी होतील याची मानसिक तयारी ठेवून, भरपूर चालायची तयारी ठेवून त्यांनी प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांचा सूर फार क्वचितच तक्रारदाराचा होतो. युरोपमध्ये फिरताना स्वित्झर्लंड मध्ये त्यांना काही वेळा भारतीय गौरेतर वंशाचे असल्यामुळे वंशभेदाचा अनुभव आला ते सुद्धा त्यांनी लिहिले आहे.
काही पानं उदाहरणादाखल
स्वित्झर्लंड मधला रेल्वे प्रवास आणि तिथल्या लोकांचं अगत्य


बाली मधल्या उबूड गावाचं प्रसन्न वर्णन.




पुस्तकाच्या पहिल्या अर्ध्या भागात परदेशी प्रवास वर्णन आहेत तर दुसऱ्या अर्ध्या भागात भारतीय प्रवास वर्णन आहेत. पण भारतीय प्रवासवर्णनांमध्ये स्थलवर्णनाचा भाग कमी आणि आत्मनिवेदनाचा भाग जास्त आहे असं मला वाटलं. लेखक एखाद्या ठिकाणी गेला आहे किंवा त्याने एखादे दृश्य बघितले मग त्याच्या मनात काय भावभावनांचे तरंग उमटले हा सगळा भाग जास्त येतो.
विमान प्रवास करताना हवेत उडण्याची मजा आपण घेतो त्याचवेळी आपण अधांतरी लटकतो आहोत हे जाणून धाकधूक वाढते. त्याउलट रेल्वे प्रवास जमिनीवरून होतो पण खूप वेळ बसावं लागतं. गाडीत नाना प्रवासी भेटतात. गाडीच्या धडक धडक शी आपली लय जुळली तर विचाराची तंद्री लागते. या प्रत्येक प्रवासाबद्दल आपापली काही मतं, आवडीनिवडी, आठवणी आणि विचारविश्व नक्की असणार. असं लेखकाचं अनुभवविश्व आपल्याला इथे बघायला मिळतं. लेखक फारच संवेदनशील तरल मनाचा आहे असं आपल्याला जाणवतं. त्यामुळे लहान लहान अनुभवातून लेखक विचारप्रवृत्त होतो. त्याला जुन्या कविता, कथा कादंबऱ्यातली उधृतं आठवतात. लेखकाला जाणवलेल्या भावनांशी आपण काही वेळा स्वतःला जोडून घेऊ शकतो. तर काही वेळा घडलेली घटना व त्यातून लेखकाने गाठलेलं भावनांचं टोक हे फारच ताणलेलं आहे असंही वाटू शकतं. लागोपाठ दोन-तीन लेख वाचल्यावर साधारण पुढच्या लेखांचा अंदाज आपल्याला येतो. त्या दृष्टीने परदेशप्रवास मधल्या लेखांपेक्षा दुसऱ्या भागातल्या लेखांमध्ये मला तोचतोचपणा जाणवला. ते कमी रंजक वाटले.
भाषणांचे प्रवास मधील दोन पाने.


असे हे पुस्तकाचे स्वरूप आहे. परदेशी प्रवासाचच्या वर्णनात गोष्टींची रंजकता आहे. तर दुसऱ्या भागात जणू आपलेच विचार शब्दांकित झाल्याने पुनःपरिचयाची चव आहे. चला फिरायला जावूया, वेगळं काहीतरी अनुभवूया, नेहमीच्या प्रवासाचे जरा वेगळेपणाने बघूया असं नक्कीच वाटेल.


लेखक आशुतोष जावडेकर ह्यांच्याबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमात भेटी आणि गप्पा झाल्या होत्या. विश्व मराठी संमेलनात हे पुस्तक मी विकत घेतलं. त्या संमेलनात झालेल्या भेटीचा फोटो.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)




पुस्तक - गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)
लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - रु. १६० /-
प्रकाशन - पार्थ प्रकाशन नोव्हेंबर २०२४
ISBN - दिलेला नाही


लेखक सुरेश देशपांडे यांनी हे पुस्तक मला भेट दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो.


पुस्तकाच्या नावाप्रमाणेच ही एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची गोष्ट आहे. कथेचा नायक हाच निवेदक आहे. बँकेत नोकरी लागण्याच्या वयापासून निवृत्त होईपर्यंतच्या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना तो सांगतो आहे. तरुणपणी एका मुलीशी निखळ मैत्री, त्याचं पहिलं प्रेम, त्याच्या जिवलग मित्राशी मनमोकळा संवाद, एका सामाजिक संस्थेबरोबर काम, मैत्रिणीच्या कौटुंबिक समस्या, मित्राच्या कौटुंबिक समस्या असे बरेच प्रसंग त्यात येतात.

पुस्तक विनोदी नाही किंवा रडकंही नाही. थोडं सामाजिक आहे. पण लेखकाला काही ठळक सामाजिक समस्या, मुद्दे महत्वाचे वाटतात इतकंच त्यातून कळतं. निवेदनाच्या ओघात पुस्तक अचानक माहितीपर होतं. निवेदक किंवा एखादं पात्र आपल्याला चक्क एखाद्या लेखाप्रमाणे माहिती सांगतं. उदा. नायकाची पत्नी एका मूकबधिर शाळेत शिकवायला जायचा निर्णय घेते तेव्हा मूकबधिर म्हणजे काय, मतिमंद म्हणजे काय, अशी मुलं का जन्माला येतात, त्यांना काय वेगळा गरज असतात हे नायकाची पत्नी नायकाला समजावून सांगते. दुसऱ्या एका प्रसंग आहे ज्यात एका भूखंडावर अतिक्रमण होतं. त्यातही एक पात्र समजावून सांगतं की राजकारणी आणि गुंड ह्यांचे हे साटेलोटे आहे. तर एकदा नायक मी हे पुस्तक वाचलं असं म्हणत "युद्ध विरहित जग" पुस्तकाचा परिचय देतो.

टिव्ही वरच्या मालिकांमध्ये कसं सतत काही ना काही घडत असतं. प्रसंगांचा एक "ट्रॅक" संपतो, मग दुसरा सुरू होतो. तसंच पुस्तक वाचताना वाटलं की ही न संपणारी मालिका तर नाहीना. पण मालिकांमध्ये एखादा लहान प्रसंग सुद्धा बरेच भाग चालतो. कारण प्रत्येक पात्राच्या भावभावना, चेहऱ्यावरचे हावभाव, संवाद असं दाखवत दाखवत प्रसंग फुलवतात. नको इतका ताणतात किंवा भडक करतात. ह्याउलट हे पुस्तक आहे. किती तरी गंभीर, कौटुंबिक आणि वैचारिक वादळे निर्माण करणारे प्रसंग करणारे यात घडतात उदा. नवराबायको मूल न होऊ देता दत्तक घेण्याचा विचार करतात, एक घटस्फोटीता एका मतिमंद मुलीला दत्तक घेते, दोन पात्रांचा आंतरधर्मीय विवाह होतो इ . पण सगळं अगदी चुटकीसरशी घडतं. ही पात्रं दुसऱ्या पात्रांना आपला विचार सांगतात. मग इतर 
पात्रं थोडासा विचार करतात आणि लगेच सगळे होकार देतात सगळं छान छान होतं. त्यामुळे प्रसंग खुलत नाहीत मनावर ठसत नाहीत.

पुस्तकातली दोन प्रसंगांची पाने उदाहरणादाखल देतो 

नायक ज्या सामाजिक संस्थेची निगडित असतो त्या संस्थेच्या जागेवर गावगुंड अतिक्रमण करत असतात आणि त्याला विरोध करणाऱ्या संस्था चालकांना अपघात होतो तो प्रसंग



नायक आणि त्याची पत्नी मूल जन्माला न घालता दत्तक घेण्याचा विचार घरच्यांना सांगतात तेव्हा



साधारण पुस्तकाचे स्वरूप लक्षात आलं असेल. वाचताना कंटाळा येत नाही पण पुढे वाचत राहायची उत्सुकताही वाटत नाही. इतके नाट्यमय प्रसंग असूनही ते अजून खुलवले असते अजून चांगल्या पद्धतीने गुंफले असते तर कादंबरीची रंजकता वाढली असती असं मला वाटलं.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

सोंग (Song)




पुस्तक - सोंग (Song)
लेखक - नितीन अरुण थोरात (Nitin Arun Thorat)
भाषा - मराठी (Marathi)
पाने २२२
छापील किंमत रू. ३००/-
प्रकाशन - रायटर पब्लिकेशन जाने २०२०
ISBN - 9789-3342-01413

पुण्यात झालेल्या विश्व मराठी संमेलनामध्ये तरुण लेखकांचा एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यात सध्याचा गाजणारा लेखक नितीन थोरात याचाही समावेश होता. परिसंवादानंतर तिथे आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्रीच्या दालनात त्याच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. थोड्या गप्पा झाल्या. त्याच्या प्रकाशनाच्या दालनात त्याची गाजणारी ऐतिहासिक आणि पौराणिक विषय असणारी पुस्तकं मला दिसली. पण मला आत्ता त्या प्रकारचं वाचायची इच्छा होत नव्हती. तेवढ्यात हे पुस्तक दिसलं "सोंग - मुखवट्यामागे दडलेली कोवळी प्रेम कथा". हे वेगळं आहे म्हणून विकत घेतलं. पण प्रेमकथा आणि तीही एका तरुण लेखकाने लिहिलेली म्हटल्यावर कॉलेजमधले प्रेम, गावातलं प्रेम प्रेमाच्या आणा-भाका, रुसवे फुगवे, घरच्यांचा विरोध अशा पठडीच्या वाटेने ती जाईल की काय अशी मला शंका होती. पण पुस्तकाचं पहिलं वाक्यच वाचलं आणि आपल्याला कोणीतरी जोरदार धपाटा घालून भानावर आणतंय असंच वाटलं. पहिलं पान वाचल्यावर लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. त्यातले खटकेदार संवाद, ग्रामीण भाषा आणि त्या भाषेत आढळणारा शिव्यांचा मुक्त संचार याने पहिल्या पानातच मला खेचून घेतलं आणि मी उत्सुकतेने पुढे वाचू लागलो. तासभर वाचन कसं झालं हे कळलंच नाही. त्यादिवशी रात्री उशीर झाला होता म्हणून पुस्तक बाजूला ठेवलं पण दुसऱ्या दिवशी कधी एकदा काम संपून पुस्तक वाचायला घेतोय असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी तासभर मिळाला त्यामुळे पुढे वाचलं. तिसऱ्या दिवशीही तासभर वाचल्यावर थोडीच पानं राहिली होती. आता पुस्तक खाली ठेववेना. मग उशीर झाला तरी कादंबरी वाचून ती पूर्ण केली. हे पुस्तक पूर्ण कथेचा पहिला भाग आहे. दुसरा भाग "पुढचं सोंग" सुद्धा लवकरच वाचलं पाहिजे हे मनाशी पक्क झालं. सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा नितीनला मेसेज करून कादंबरी आवडली हे कळवलं. तेव्हापासून सविस्तर लिहिण्यासाठीचा वेळ शोधत होतो आणि आज तो मिळाला.
कथा-कादंबरी या ललित प्रकारात बरेच दिवसांनी असं खिळवून ठेवणारं कथानक वाचायला मिळालं. पुस्तकाचं कथाबीज छोटं असलं तरी निवेदनशैली, संवादप्रधानता, साधे सोपे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिलेले संवाद या सगळ्याची मजा खूप आली.


महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात घडणारी ही कथा आहे. मराठा समाजाचे बाहुल्य असणारे हे गाव. सुतार, चांभार, लोहार अशी इतर बलुतेदारांची घरे सुद्धा आहेत. गावगाड्यानुसार प्रत्येक समाजाचे लोक आपापला पारंपरिक व्यवसाय करत आहेत. स्थानिक राजकारण आणि समाजकारण यावर मराठा कुटुंबांची पकड. आणि त्या पकडीतून होणारी राजकीय स्पर्धा आलीच.
या गावाची परंपरा अशी आहे की जत्रेत पौराणिक प्रसंग सादर केले जातात. दशावतारी नाटकाप्रमाणे त्यात मुखवटे घालून कलाकार नाचतात. प्रत्येक जातीकडे प्रत्येक घराण्याकडे एक ठरलेला प्रसंग नाट्यप्रवेश दिलेला आहे. त्या त्या कुटुंबाने परंपरागत ते सादर करायचं. लोहार कुटुंबाकडे नाट्यप्रवेश आहे "सीता बाळंतीण" नावाचा. गर्भवती सीतेला लवकुश ही मुलं होतात हे त्यात दाखवायचं आहे. पण गावासमोर घरातली बाई नाही नाचणार हं. लोहार घरातील पुरुष मंडळी साडी नेसून, केशभूषा वेशभूषा करून हे सोंग सादर करतात. इतके वर्ष हे सोंग वठवलेले लोहार बाबा आता आपल्या मुलाकडे ही रीत सोपवतायत. पण बारावीतल्या तरुण संजयला साडी नेसून असं गावकऱ्यांसमोर येणे काही पटत नाही, रुचत नाही. पण त्याचे वडील काही ऐकत नाहीत. शिव्या घालत मुस्काडात मारत त्याला नाटकाला उभं करतात. आणि तरुण संज्याच्या अंगावर साडी चढते!!
संजय त्याच्याच वर्गातल्या एका मराठा कुटुंबातल्या मुलीवर प्रेम करत असतो. उघड उघड बोलणं शक्य नाही म्हणून फक्त खाणाखुणांनीच भावना व्यक्त होत असतात. आता गावच्या जत्रेत साडी नेसून उभं राहायचं आणि प्रेक्षकांत ती असणार म्हणून त्याला जास्तच लाज वाटत असते. पण त्याचा मित्र त्याला पटवतो की आज उलट तुला तिच्याकडे थेट बघता येईल, ते सुद्धा कोणाच्याही लक्षात न येता. हेच एक दुःखात सुख. एका तृतीयपंथीयाच्या मदतीने तो साडी नेसून तयार होतो. हो नाही करता करता सोंग पूर्ण होतं. आणि विशेष म्हणजे त्या मुलीलासुद्धा संज्याचं साडी नेसणं आणि त्याचा अभिनय आवडला असं त्याला कळतं.

सोंग पूर्ण होतं. जत्रा पूर्ण होते पण साडी नेसलेल्या संज्या हा टवाळ गावकऱ्यांच्या चेष्टेचा थट्टेचा विषय झाला नसता तरच नवल. हे साडी नेसणं संज्याला किती महागात पडणार आहे ? आपल्या प्रेयसीला आवडतं म्हणून तो असा साडी नेसत राहील? गावकऱ्यांची टवाळकी कुठली पातळी गाठेल? संज्याचं आणि कविताच प्रेम पुढे जाईल का? दोन समाजातली उच्चनीचता त्यांच्या प्रेमाच्या आड येईल का?

अशी ही वेगळीच प्रेम कथा आहे जी प्रियकर आणि प्रेयसी मध्ये थेट शब्दांनी व्यक्त होत नाहीये. या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीला सामाजिकतेचे ताणेबाणे, स्त्री- पुरुष-तृतीयपंथीय या लिंगव्यवस्थेचे पदर जोडले गेले आहेत. याहून जास्त काही सांगितलं तर कादंबरीची कथा पूर्ण उघड होईल. लेखकाने संवादातून व प्रसंगांतून संजय हे मुख्य पात्र, त्याचा मित्र असिफ, संजय चे वडील, गावातील इतर समाजातली माणसं, तृतीयपंथी, खलनायक प्रतिनायक, ज्या पद्धतीने उभे केले आहेत ते लेखकाचं मोठं यश आहे असं मला वाटतं.


चार पानं उदाहरणादाखल वाचा म्हणजे तुम्हाला अजून कल्पना येईल.
कादंबरीची सुरुवात


गावाबाहेर राहणारा पण गावगाड्याचा भाग असणारा चांगल्या स्वभावाचा तृतीयपंथी "बलम", संजय आणि त्याचा मित्र अशप्या ह्यांची काही प्रसंगामुळे चांगली मैत्री होते. त्यांच्या गप्पांचा एक भाग.


या पुस्तकातली पात्र बोलताना शिव्या देतात आणि पुस्तकात त्या तशाच्या तशा लिहिल्या आहेत. वाचकांना ते खटकण्याची शक्यता आहे. पण त्या कुठेही अश्लीलतेसाठी मुद्दामून दिलेल्या नाहीत. तर गावातले दोन मित्र किंवा भांडाभांडीच्या वेळी दोन माणसं जशा सहज शिव्या देतात तशाच त्या आलेल्या आहेत. संवादांमध्ये होणारा जातीचा उल्लेख मला थोडा जास्त वाटला स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष होऊन, विशेषतः ॲट्रॉसिटी कायद्याच्या वरवंट्याखाली लोक असताना आजही इतक्या उघड उघडपणे जातीपातींचा उल्लेख होत असेल का; असा मला प्रश्न पडला. मी काही खेडेगावात राहत नाही त्यामुळे मला प्रत्यक्ष अनुभव नाही. लेखकाचा तो प्रत्यक्ष अनुभव किंवा अभ्यासपूर्ण निष्कर्ष असावा. हे खरं असेल तर फारच वाईट अवस्था आहे आपली.
पण याबद्दल सुरुवातीलाच लेखकाने इशारा दिलेला आहे.


कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावर त्यावर विचार करताना कादंबरीतले काही कच्चे दुवे सापडू शकतील. हे असं कसं होऊ शकतं; किंवा या ऐवजी काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे होतं असे विचार मनात येतील. पण प्रसंगांचा वेग, संवादाची पकड यातून ते वाचताना हे सगळं आपण चटकन बाजूला टाकून पुढे उत्सुकतेने वाचत राहतो हे मला जास्त भावलं.


तुम्ही नक्की वाचून बघा ही कादंबरी आणि तुमचा अभिप्राय मला आणि लेखकाला नक्की कळवा.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

विद्रोह (Vidroh)

पुस्तक - विद्रोह (Vidroh) लेखक - हेन्री डेन्कर (Henry Denker) अनुवाद - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी (Marathi) मूळ पुस्तक - Outrag...