मुळारंभ (mularambh)






पुस्तक :- मुळारंभ  (mularambh)
लेखक :- डॉ. आशुतोष जावडेकर  (Dr. Ashutosh Javadekar) 
भाषा :- मराठी (Marathi)

"कॉलेजचे दिवस" म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ? कुणाच्या डोळ्यासमोर खूप अभ्यास, कंटाळवाणी सबमिशन्स येतील; कुणा गरीब विद्यार्थ्याला परिस्थितीशी झगडत-नोकरी करत पूर्ण केलेलं शिक्षण आठवेल; कुणाला मित्र मंडळींबरोबर केलेली धमाल आठवेल, कुणाला पहिलं वहिलं प्रेम आठवेल; कुणाला व्यसनाची पहिली ओळख आठवेल. बहुतांश बॉलीवूड चित्रपटांमध्ये कॉलेज म्हणजे "रोमिओ-ज्युलियेट"चा अभ्यास आणि स्वतः "रोमिओ-ज्युलियेट" बनणं. साधारण याच पठडीतलं कॉलेजलईफ चितारणारं हे पुस्तक आहे. 

ओम जोशी हा सुखवस्तू, सुसंस्कृत, मध्यमवर्गीय घरातला मुलगा. अभ्यासू, समंजस, विचारी आणि विचारांत रमणारा. तो डेंटल कॉलेजला जातो आणि "कॉलेज लाईफ"शी त्याची ओळख होते. रॅगिंगचा अनुभव त्याला येतो आणि त्यापासून दूर पळायचा तो प्रयत्न करतो. त्यामुळे सुरुवातीला एकटा एकटा राहणरा ओम हळूहळू इतरांच्यात मिसळायला लागतो. तो अणि दुसऱ्या राज्यातून आलेले सहाध्यायी असा पाच सहा जणांचा ग्रूप जमतो. मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. पहिल्यावहिल्या चुंबनाची हुरहूर अनुभवण्या पर्यंत जवळीक होते.

मित्रांमित्रांमध्ये पण गप्पा-गोष्टी, थट्टामस्करी तर कधी गैरसमजातून दुरावा निर्माण होतो आणि हा ग्रूप तुटतोय की काय असं वाटू लागतं. पण सगळे एकमेकांना समजून घेतात, पुन्हा एकत्र येतात. कॉलेज फंक्शनच्या स्पर्धा, चॉकलेट डे सारखे दिवस ही एन्जॉय करतात.

या सगळ्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीला सबमिशनचं टेन्शन, प्रॅक्टिकल्सची धावपळ, परीक्षेच्या तयारीचं ओझं,शिक्षकांचे वेगवेगळे नमुने हे सुद्धा सगळं त्यात आहे.

थोडक्या कॉलेज म्हाटल्यावर जे आपण अनुभवलं आहे किंवा इतरांचे अनुभव ऐकले असतील ते बरचसं या पुस्तकात येतं. आणि फक्त प्रसंगच नाहीत तर त्या पात्रांच्या मनातले विचार पण आपल्या समोर येतात. कधी प्रगल्भ विचार करणारे तर कधी भावनातिरेक. हाडामासाच्या माणसांमध्ये दिसणारे सगळे गुण. आपण प्रेमात आहोत की नाही आपलं खरं नातं काय याची ओम आणि त्याच्या मैत्रिणीच्या मनातली चलबिचल, त्यांच्या हे घरच्यांना जाणवल्यावर त्यांची संयत, काळजीवाहू प्रतिक्रिया .

त्यामुळेच ही कादंबरी हिन्दी चित्रपटापेक्षा जास्त वास्तवाच्या जवळ जाणारी आहे; तरीही रुक्ष किंवा उदासवाणी नाही. ताजीतवानी आणि वाचकाला ताजीतवानी करणारी छान विरंगुळा कादंबरी आहे. हलकंफुलकं वाचायचं असेल तेव्हा वाचायला छान आहे.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

બહેરો હસે બે વાર (बहेरो हसे बे वार/ bahero hase be var)



पुस्तक :- બહેરો હસે બે વાર (बहेरो हसे बे वार)
लेखक :- તારક મહેતા (तारक मेहता)
भाषा :- ગુજરાતી (गुजराती)


"तारक मेहता का उल्टा चश्मा" ही लोकप्रिय हिंदी मालिका ज्यांच्या लेखनावर आधारित आहेत ते लेखक म्हणजे तारक मेहता. "दुनियाने उंधा चश्मा" या नावने एक गुजराती विनोदी लेखमालिका ते "चित्रलेखा" मासिकात लिहितात. 

या तारक मेहतांच्या विनोदी लेखांचा संग्रह "बहेरो हसे बे वार". हे लेख साधारण नव्वदीच्या दशकातले असावेत. कारण यतले बरेचसे लेख राजकारणावर आधारलेले अहेत आणि त्यात रजीव गांधी, आघाडी सरकारं, तत्कालीन निवडणुका, वाढता भ्रष्टाचार, महागाई इ. चा संदर्भ येतो. 

"..उल्ट चश्मा" जितकी खळखळून हसायला लावते किंवा मेहतांच्या आधी वाचलेल्या विनोदी कादंबऱ्या जितक्या खुसखुशीत वाटल्या तितके हे लेख नाहीत. तेव्हाचे संदर्भ मला माहित नसतील हे एक कारण असेल. आणि संदर्भ माहीत असला तरी एखाद्या ताज्या घटनेवर लिहिलं जाणारं लेखन ती गोष्ट जुनी झाल्यावर तितकंच अपील होईल असं नाही. हे देखील एक कारण असावं. 


त्यामुळे तारक मेहता या नावाच्या वलयापोटी खूप हसायच्या तयारीने हे लेख वाचायला घेतले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त.


 ------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Churchill (चर्चिल)





पुस्तक :- चर्चिल (Churchill)
भाषा :- इंग्रजी (English)
लेखक :- रॉय जेन्किन्स (Roy Jenkins )

ब्रिटनचे सर्वात प्रसिद्ध पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचं हे चरित्र आहे. हे पुस्तक नसून एकहजार पानांचा मोठा ग्रंथच आहे. हजार पानंही अगदी बारीक टायपात छापलेली आहेत.

चर्चिल घराण्याच्या इतिहासापसून सुरुवात करून चिर्चिल यांच्या मृत्युपर्यंत पूर्ण इतिहास यात आहे. प्रत्येक प्रसंगाचं अतिशय बारकाईने वर्णन केलेलं.

चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धात केलेलं ब्रिटनचं नेतृत्त्व फार प्रसिद्ध आहे. त्यामुळे आणि "युद्धस्य कथा रम्या" या अनुभवाप्रमाणे मी पण थेट युद्धाचा भागच वाचायला घेतला. पण खरं सांगू? वर्णन इतकं तपशीलवार आहे की वाचायचा कंटाळाच आला. चुर्चिल कुठल्या दिवशी किती वाजता बाहेर पडले, कधी झोपले, कधी उठले, कोणाबरोबर जेवले, काय खाल्लं, कुठे राहिले, काय बोलले हे इतकं तपशीलवार आहे की मोठं चित्र (broader view) मिळालाच नाही.

चर्चिल यांच्या पंतप्रधानपदाची शर्यत, पाय उतार झाल्यावरचे दिवस यांच्या बद्दलची काही पानंही वाचली. पण ब्रिटनच्या राजकारणची, त्यातल्या व्यक्तींची फार माहिती नसल्याने पुन्हा एकदा सविस्तर-ससंदर्भ वाचन जड गेलं.

तत्कालीन भारतीय स्वातंत्र्यचळवळ आणि भारतीय नेते यांबद्दल काय संदर्भ आलाय हे शोधलं पण फार काही मिळलं नाही. गांधी, नेहरू यांबद्दल एकदोन ठिकाणी एकदोन ओळींचा उल्लेख आहे; फार नाही.

शेवटी शंभरेक पानं वाचून मी हा ग्रंथ वाचायचा नाद सोडून दिला. चर्चिल यांचं व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व समजून घेण्यासाठी एखादं दोनतीनशे पानी चरित्र मिळालं तर वाचलं पाहिजे. हा ग्रंथ ज्यांना इतिहासाची प्रचंड आवड आहे किंवा ब्रिटनच्या राजकारणावर संशोधन करत असतील तर नक्कीच वाचनीय आणि संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी आहे.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

मन में है विश्वास (Man Main Hai Vishvas)




पुस्तक :- मन में है विश्वास (Man Main Hai Vishvas) 
लेखक :- विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre Patil )
भाषा :- मराठी

विश्वास नांगरे-पाटील हे एक तरूण, तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. मुंबईवरच्या २६/११ च्या हल्ल्यात त्यांनी दाखवलेल्या धैर्यशाली नेतृत्वासाठी आणि प्रत्यक्ष पोलीस कारवाईतील सहभागासाठी त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं आहे. समाजाला बरोबर घेऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत सदैव भर पडत आहे. आपल्या या कर्तृत्त्वाने ते तरूणांचा आदर्श बनले नसते तरच नवल. आणि म्हणूनच विश्वासजी आपल्या या आत्मकथनातून तरूणांशी संवाद साधतायत. तरूणांना -विशेषतः यूपीएससी-एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण तरूणांना - स्वानुभवातून मार्गदर्शन करायच्या तळमळीपोटी त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

२०० पानी पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणांत त्यांनी आपलं बालपण, शाळा, कॉलेजच्या वयातल्या आठवणी सांगितल्या आहेत. यशस्वी व्यक्ती म्हणजे ती लहानपणी खूप हुशार, सज्जन, एकपाठी, सर्वगुणसंपन्न असणार असाच आपला समज असतो. पण ते लहानपणीचा खोडकर, मस्ती करणार, चुका करणारा विश्वास आपल्यासमोर ठेवतात. तरूणपणातला टर्रेबाज, टुकाऱ्या करत फिरणारा, काही वेळा चुकीच्या मार्गाने जाऊ लागलेला तरूणही आपल्या दिसतो. आणि हीच बाब आपल्याला अधिक भावते. शेकडा ९०% मुलं अशीच असतात पण म्हणून ती सगळी वाया गेलेली नसतात. ज्याप्रमाणे विश्वासजींना सावरणारं, रागावणारं, ओरडणारं कुणीतरी  - घरचे असतील, शिक्षक असतील किंवा कधी मित्र - भेटत गेलं तसं जर त्यांनाही भेटलं तर तेही सावरू शकतील. आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव देऊ शकतील हा विचार आपल्या मनात रुजतो.

पुढची जवळपास दीडशे पानं त्यांच्या स्पर्धापरीक्षेच्या अनुभवाबद्दल आहेत. आत्ताचे यशस्वी पोलीस अधिकारी आहेत म्हणजे त्यांनी परीक्षा अगदी सहज-डाव्या हातचा मळ असल्यासारखी पास केली असेल असा आपला ग्रह होऊ शकतो. पण त्यांनाही यश-अपयश बघावं लागलं, आशा-निराशेच्या झोकांड्या खाव्या लागल्या होत्या. पुन्हा-पुन्हा स्वतःला प्रोत्साहित करावं लागलं. वाईट सवयींपासून, संगती पासून, प्रलोभनांपासून स्वतःला जाणीवपूर्वक बाजूला काढावं लागलं. गावाकडनं आलेला मुलगा, इंग्रजी कच्चं असणारा, इंग्रजी संभाषण सफाईदारपणे न जमणारा मुलगा हा न्यूनगंड त्यांनाही वाटला. पण न्यूनगंडामुळे ते थांबले नाहीत तर त्यावर मात करायचे उपाय शोधले आणि प्रगती करत राहिले. हे सगळं तरूणांना कळावं हाच तर त्यांचा पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे.

बहुतांश ग्रामीण विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनाही तयारीसाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे अशी भ्रमंती करावी लागली. गैरसोयीच्या अवस्थेत राहणं, खाण्यापिण्याची आबाळ सोसावी लागली. स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासाचा अवाका मोठा त्यामुळे तयारी करता करता कंटाळा यायचा तर कधी अपयशाच्या विचारांनी आत्मविश्वास जायचा. विश्वासरावांनी स्वतःला कसं अभ्यासाला लावलं हे खरंच प्रेरणादायी आहे. फक्त स्पर्धापरीक्षा देणऱ्यांसाठीच नाही तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या, कष्ट करायला तयार असणऱ्या प्रत्येकासाठी आहे.

पुस्तकात शेवटची काही पाने २६/११ च्या हल्ल्याच्या वेळाच्या कारवाई बद्दल आणि राष्ट्रपती पारितोषिकाबद्दल आहे. या प्रसंगाविषयी अजून खुलासेवार लिहिता आलं असतं. पण हा प्रसंग एका स्वतंत्र पुस्तक लिहिण्यासारखा आहे; तसंच प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश वेगळा असल्यामुळे त्यांनी फार लिहिणं टाळलं असेल. पुस्तकात त्यांच्या रेव्ह पार्टीवरची कारवाई,दरोड्यातल्या गुन्हेगारांचा पाठलाग, सामजिक सलोखा निर्माण करून गुन्हेगारी रोखण्याचे उपक्रम इ.ची ओळख प्रसंगोपात होते. 

विश्वासरावांचं काम आणि त्यांची मेहनत हे वाचनीय आहेच पण त्यांची लेखनशैलीही तितचीच प्रवाही आणि प्रभावी आहे. प्रसंगाला अनुसरून त्यांनी बोधकथा, मान्यवरांचे उद्गारही दिले आहेत. तरूणपणातल्या खोड्यांचे प्रसंग आणि त्यांच्या मित्रांचे, गावाकडच्या व्यक्तींचं वर्णन पण मजेशीर आहे. विश्वासरावांनी मराठी साहित्य, इतिहास हे विषय घेऊन उच्च शिक्षण घेतल्यामुळे हे पुस्तक वाचताना आपण एका पोलिसाने लिहिलेलं पुस्तक वाचतोय असं न वाटता एखाद्या सराईत लेखकाने लिहिलेलं आहे असंच वाटत राहतं. 

त्यांनी अजून लिहावं - त्यांच्या पोलीस सेवेच्या अनुभवाबद्दल, उपक्रमांबद्दल, सामाजिक मुक्त चिंतनाबद्दल. वाचकांच्या उड्या पडल्याशिवाय राहणार नाही.




------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...