सांजसावल्या (sanjasavalya)



पुस्तक :- सांजसावल्या (sanjasavalya)
लेखक :- वि.स. खांडेकर (V.S. Khandekar)
भाषा :- मराठी

"सांजसावल्या" हा ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकरांचा शेवटचा लघुनिबंधसंग्रह. यातील काही लेख "मौज","श्री",स्वराज्य","रविवार सकाळ" इ. नियतकालिकांमध्ये तेव्हा प्रसिद्ध झालेले तर काही अप्रकाशित आहेत.

सन १९७४ ते १९७६ या कालखंडातील हे निबंध आहेत. १९७६ च्या सप्टेंबरमध्ये खांडेकरांचं निधन झालं होतं. त्यामुळे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर - शारिरिक जराजर्जरता, आलेलं अंधत्व, कौटुंबिक त्रास अशा - शारिरिक आणि मानसिक अवस्थेत लिहिले गेलेले आहेत. त्यामुळे बरेचसे लेख हे सिंहावलोकन करणारे आहेत. दैव, नियती, मानवी जीवनातील आशावाद, प्रयत्नवाद आणि दैववाद यांमधला झगडा इ. विषयांवरचे आहेत.
उदा. "देवघर" या निबंधात तारुण्यातल्या बुद्धीवादाकडे निखळ दृष्टीने पाहत खांडेकर त्याची चिकित्सा करतात. "आंधळी-कोशिंबीर" मध्ये माणसे नियतीला कशी नावे ठेवतात पण कर्तृत्वाचं श्रेय मात्र नियतीला न देता स्वतःकडे ठेवायचा दांभिकपणा करतात हे दाखवलं आहे. "दीर्घायुष्य" लेखात माणसाला खरंच दीर्घायुष्य का हवं असतं आणि ते शाप किंवा वरदान कसं ठरू शकतं याचा ऊहापोह  आहे.

काही लेख गंमतीदारही आहेत. "शब्द बापुडे केवळ वारा!" मध्ये एका तरूणी आणि वृद्धाचा स्त्री-पुरुष समानतेवरचा मजेशीर संवाद; "अजि म्या ब्रह्म पाहिले" हा अ‍ॅलर्जी वरचा लेख इ.

प्रत्येक लेखात वि.स. काही विचार मांडून शेवट करतात. ती वाक्ये अवतरणे म्हणून संग्राह्य आहेत. उदा. अ‍ॅलर्जी बद्दलच्या लेखाचा शेवट ते असा करतात. "जिथे शरीराची अ‍ॅलर्जी शोधून काढणं कठीण तिथं मानवी शरीर आणि मन यांना एका साच्यात बसवणं विज्ञानाला अशक्य आहे. प्रत्येक मनुष्य हे एक वेगळं विश्व आहे. अशी कोट्यवधी विश्वं जी परमशक्ती लीलेने निर्माण करते तिच्यापुढे माणसाच्या बुद्धीलाहि नकळत नतमस्तक व्हावं लागतं. कारण मनुष्य स्वतःला कितीही स्वतंत्र मानत असला तरी तो निसर्गाचाच एक भाग आहे."

एक वृद्ध गांधीवादी आणि एक तरूण प्राध्यापक यांच्यातला हृदयपरीवर्तनावरचा वितंडवाद ऐकून ते म्हणतात "वैचित्र्यपूर्ण दृश्यविश्वापेक्षा माणसाच्या मनातील अदृश्य गुंतागुंत फार गहन आहे. प्रत्येक मनुष्य दुसऱ्याहून अंतर्बह्य वेगळा असतो. अशा स्थितीत एकाला जाणवणारे सत्य दुसऱ्याला पूर्णपणे कसे पटावे?..सत्यशोधनाच्या नावाखाली आपण सर्व सत्याभासाची किंवा अर्धवट सत्याची बाजू घेत असतो. साहजिकच दोन अहंकारंची टक्कर सुरू होते".

"पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना" मध्ये इतिहास आणि त्याचा पुढच्या पिढीवर परीणाम याबद्दल ते लिहितात. "स्मृती, अनुभव आणि स्वप्न हे त्रिकुट मानवी मनावर अधिराज्य करीत असतं. पावलोपावली या तिन्हींचा समतोल साधणं हे सफल जिवनाचं मुख्य सूत्र आहे. भूतकाळ घरातल्या वृद्धासारखा, वर्तमानकाळ तरूणासारखा, आणि भविष्यकाळ बालकासारखा असतो.."

या निबंधांतली खांडेकरंची शैली सहज, ओघवती आणि गप्पा मारल्यासारखी आहे. खूप विनोदी नाही पण नर्मविनोदी-खुसखुशीत आहे. हे लेख वाचताना मला पु.लंच्या लेखांची आठवण झाली. पण पुलंचे लेख जास्त विनोदी आणि त्यातला गंभीर भाग खूप सखोल तत्वचिंतन करणारा आहे असं मला वाटतं.

खांडेकरांनी ज्या विषयांना हात घातला आहे, जे रोजच्या जगण्यातले अनुभव मांडले आहेत आणि जी मल्लिनाथी केली आहे तितपत लिखाण सध्या साध्या-साध्या माणसांनी केलेल्या ब्लॉगलेखनातही आढळेल. खांडेकरांच्या काळात ब्लॉग असते तर त्यांनीही "मला सुचलं ते","मनोगत","स्वान्तःसुखाय" अशा टिपिकल नावाने ब्लॉगच लिहिला असता.
सध्या फेसबुक, व्हॉट्सपच्या जमान्यात फिलॉसोफी झाडणारे, कौटुंबिक, सामाजिक संदेश देणारे इतके मेसेज येतात की हे पुस्तक वाचताना असाच कुठलातरी मेसेज किंवा जरा चंगला मराठी ब्लॉग वाचतोय असंच वाटलं आणि पुलंच्या "असा मी असामी" मधलं एक वाक्य आठवलं - "थोर माणसं देखील काही फारसं निराळं म्हणतात असं नाही पण ती थोर असतात हे महत्वाचं." :)


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------



द सीक्रेट - रहस्य (The Secret - Rahasya)




पुस्तक :- "द सीक्रेट - रहस्य"  
भाषा :- मराठी
मूळ भाषा :- इंग्रजी 
मूल पुस्तक :- The Secret
लेखक :- रॉंडा बर्न (Rhonda Byrne)
अनुवादक :- डॉ रमा मराठे  (Dr. Rama Marathe) 



"द सीक्रेट - रहस्य" हे एक स्व-मदत(सेल्फ-हेल्प) प्रकारातलं पुस्तक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी, आपल्या सर्व इच्छा पूर्तीसाठी कसं वागावं; कसा विचार करावा हे शिकवणारं पुस्तक आहे. 
"सकारात्मक विचार","तुम्हीच तुमचे नशीब घडवा","मन करा रे प्रसन्न.." अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. दृढ इच्छाशक्तीमुळे कठीण प्रसंगावर मात करून आपल्या क्षेत्रात यश मिळवलेल्या उद्योगपतींच्या, खेळाडूंच्या, समाजसेवकांच्या प्रेरक गोष्टीही आपण ऐकलेल्या असतात. पण हे पुस्तक या विचारांच्या शक्तीला अजून एक पायरी वर नेऊन ठेवते. विचार हे एक प्रकारची ऊर्जा आहे. आपण जसे विचार करतो तशी ऊर्जा/लहरी आपण प्रेरित करतो. आणि या वैश्विक ऊर्जेतून आपण त्या गोष्टी आकर्षित करत असतो. आणि जितका तीव्र विचार तितक्या वेगाने त्या गोष्टी आकर्षित होऊन आपली स्वप्नं सत्यात उतरतात. म्हणून आपण आपले विचार काय नको या पेक्षा काय हवं या वर केंद्रित करायला पाहिजेत. सश्रद्ध रितीने त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. साधारण असं या पुस्तकाचं म्हणणं आहे. त्याला आकर्षणाचा नियम - लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन (Law of attraction) अशी संज्ञा आहे.

पण हे सगळं नीट समजून घेण्यासाठी पुस्तक वाचलं पाहिजे म्हणजे त्यातले बारकावे कळतील. उद्योजक, गुंतवणून तज्ञ, तत्वज्ञ, या विषयावरचे लेखक अशा अनेकांचं म्हणणं यात उद्धृत केलं आहे. त्यांनी दिलेली उदाहरणे, खऱ्या माणासांचे प्रसंग, क्वांटम फिस्जिक्स चा संदर्भ ई. वाचनीय आहे. 

पुस्तक वाचताना आपण थोडावेळ भारावून जाऊन सगळ्या गोष्टी आपल्याला पटतीलही. पण नंतर विचार केल्यावर खरंच नुसता विचार करून गोष्टी आकर्षित होत असतील का, यावर मनात प्रश्न उभा राहतोच. जगभरातले इतके गरीब लोक पैसा मिळण्याची प्रार्थना करत असतील, आजारी माणसं बरं होण्याची इच्छा बाळगत असतील, अनेक वृद्ध आईवडील आपली मुलं आपल्याशी बोलायला लागावी यासाठी झुरत असतील. पण असंख्य लोकांच्या पदरात शेवटी निराशाच येते. विचारंनी गोष्टी आकर्षित होत असत्या तर आज पर्यंत प्रत्येकाचीच इच्छा पूर्ण झाली असती, नाही का? 

नेट वर शोधल्यास हे "सिक्रेट" कसं थोतांड आहे, क्वांटम फिजिक्स मधे असं काही तत्वज्ञान नाही इ. ही सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे. 

असं असलं तरी हे पुस्तक अवश्य वाचनीय आहे. आपल्या विचारांबद्दल विचार करायला लावणारं आहे. आपल्यापाशी आहे त्या बद्दल कृतज्ञता बाळगायला शिकवणरं आणि त्याचे फायदे दाखवणारं आहे. 
आपल्या बाबतीत वाईटच घडेल असं सतत मनात आणून स्वतःची भीती, चिंता, चिडचिड आणि स्वतःच्या समस्यांत वाढ करण्यापेक्षा स्वप्नपूर्तीचं स्वप्नरंजन अधिक आनंददायी, उत्साहवर्धक ठरेल असा अशावाद यातून मिळतो.
मनात केवळ इच्छा बाळगून कदाचित स्वप्न सत्यात येणार नाहीत पण ध्येयाच्या दिशेने प्रयत्न चालू असताना मनातही तसेच इच्छापूर्तीचे विचार असतील तर अधिक आनंद, सहजता निर्माण होईल हे तरी या वाचनातून जाणवतं.

म्हणून पुस्तक नक्की वाचा, विचार करा, स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याचा, आपल्याकडे काय आहे याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन नक्की मिळेल. 

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Chowringhi चौरिंघी




पुस्तक(Title):-Chowringhi चौरिंघी 
मूळ भाषा (Original language)  - बंगाली (Bengali)
भाषा(Language) :- इंग्रजी (English)
लेखक(Author)  :-  Sankar (शंकर)
Translator :- Arunava Sinha (अरुणव सिन्हा)


चौरींघी हा कलकत्त्यातला मध्यवर्ती विभाग आहे. ज्याच्या जवळ कर्झन पार्क ही मोठी बाग असून असून आसपास मोठमोठ्या व्यक्तींचे पुतळे आहेत. पण हे पुस्तक चौरींघी बद्दल नसून "शहाजहान" नावाच्या हॉटेलबद्दल आहे.  तिथे आलेले पाहुणे त्यांच्या तऱ्हा, त्यांचे चाल-चलन-चारित्र्य या बद्दल आहे. त्यामुळे खरं तर पुस्तकाचं नाव  "शहाजहान" असायला हवं होतं . 

या हॉटेल मध्ये रिस्पेशनिस्ट, हॉटेल मॅनेजरचा असिस्टंट म्हणून काम करणारी व्यक्ती या पुस्तकात निवेदक आहे. त्याच्या आठवणी तो आपल्याला सांगतो आहे अशा स्वरूपात ही कादंबरी आहे. कलकत्त्यातल्या खऱ्या ठिकाणांचा उल्लेख आला असला तरी हॉटेल किंवा घटना मात्र काल्पनिक आहेत. 

कादंबरीत सात आठ वेगवेगळी कथानकं येतात.  कथानकांमध्ये वैविध्य आहे आणि कथानकं मोठी आहेत त्यामुळे तपशीलवार सांगणं कठीण आहे. तसंच ते आवश्यकही नाही म्हणून साधारण कल्पना यावी इतपत सांगतो. 

हॉटेलचा मालक मार्कोपोलोचं पूर्वायुष्य, त्याचं एका साध्या बार गायिकेशी जमलेलं प्रेम, यश मिळाल्यावर स्वार्थी गायिकेने तोडलेले संबंध,मार्कोपोलोने आयुष्यभर तिचा घेतलेला शोध इ.  

सौ. प्रकाशी ही एका उद्योगपतीएका ची बायको. नवऱ्याबरोबर हॉटेलात पार्ट्यांमध्ये मिरवणारी, समाजसेवेच्या कार्यक्रमात पुढेपुढे करणारी. पण लोकांच्या दृष्टीआड हॉटेलमध्ये अनैतिक संबंध ठेवणारी.

हॉटेल मध्ये कॅबरे बघायला येणारे लोक सुसंस्कृत समाजातले, बाहेर उजळ माथ्याने वावरणारे होते. पण कॅबरे मध्ये मात्र त्यांचं वासनांध रूप कसं दिसतं हे आपल्या समोर येतं.

पूर्वी कॅबरे नर्तिकांचं आयुष्य कसं होतं, नवी मुलगी हॉटेलला दाखल होणार याची जाहिरात नवीन माल बाजारात आल्यासारखी कशी व्ह्यायची; हॉटेलातच कुलुपबंद खोलीत कसं राहावं लागायचं याचंही वर्णन वाचायला मिळतं. कॅबरे नर्तिका आणि त्यांच्याबरोबर काम करणारे बुटके विदूषक यांचं भावविश्व आपल्याला हेलावून सोडते.

एका मोठ्या उद्योगपतीने हॉटेलातला मोठा सूट कायमचा रिझर्व केलेला असतो. तिथे त्याचे पाहुणे - परकीय उद्योजक, सरकारी अधिकारी, कामगार नेते इ. राहायला येत असतात. या सगळ्यांची "काळजी"घेणारी एक "होस्टेस" असते - कराबी गुहा. तिचं खरंच सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व पाहून दुसऱ्या एका उद्योगपतीचा - सौ. प्रकाशीचा- तरूण मुलगा तिच्या प्रेमात पडतो. प्रकाशींच्या अनैतिक संबंधांची माहिती कराबीला असते आणि कराबी सारख्या बाईने आपल्या मुलाशी संबंध ठेवावेत याचा प्रकाशींना आलेला राग याचं नाट्य देखील आपल्यासमोर उलगडते.

आपल्या नवऱ्याशी भांडून वरचेवर हॉटेलात राहायला येणऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची मजेशीर ओळख आपल्याला होते.

हॉटेलात वेगवेगळी कामे करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि वल्ली - चादरी,पाडदे इ. सांभाळणारा नित्याहरी, बारमध्ये काम करणारा बटलर, बारमध्ये वाजवणारा पण संगीतात खूप जास्त जाण असणरा गोवेकर  व्ह्यायोलिन वादक इ.

एकुणात हे पुस्तक वाचायला घेतल्यापासून मनोरंजक आहे. पुढे काय होणर याची खूप उत्सुकता लागून राहते असं नाही पण तासन्‌ तास वाचत राहिलं तरी कंटाळवाणं होत नाही. वेगवेगळ्या स्वभावाची, व्यक्तिमत्त्वाची माणसं आपल्या भेटत राहतात, गप्पा मारतात. छान वेळ जातो.

या कादंबरीवर बंगाली मध्ये चित्रपटही बरेच वर्षांपूर्वी येऊन गेला आहे.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...