

पुस्तक - अपूर्णांकांच्या खुनांची कथा (Apurnankanchya khunachi katha)
लेखक- इनोउए हिसाशी (Hisashi Inoue)
अनुवादक - मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - 四捨五入殺人事件 (Shishagonyū satsujin jiken / शिशागोन्यू सात्सुजिन् जिकेन)
मूळ पुस्तकाची भाषा - जपानी
ह्या पुस्तकाची पाने - १९५
प्रकाशन - वॉल्डन पब्लिकेशन, सप्टेंबर २०२६
छापील किंमत - रु. ४५०/-
ISBN - 978-81-998467-3-9
अनुवादक मयुरेश कुलकर्णी ह्याने "त्सुबाकी स्टेशनर्स" ही कादंबरी थेट जपानीतून मराठीत आणली. ती लोकप्रिय ठरली. पुरस्कारप्राप्तही झाली. त्याचे अजून एक पुस्तक प्रकाशित होते आहे हे कळल्यावर पुस्तकाची प्रकाशन पूर्व नोंदणी केली. पुस्तक वाचल्यावर मी म्हणू शकतो की, पदार्पणातच दमदार कामगिरी करणाऱ्या मयुरेशने आपली फलंदाजी चालू ठेवत आता पुढचा षटकार मारला आहे तो म्हणजे "अपूर्णांकांच्या खुनांची कथा" ही अनुवादित कादंबरी. मूळ जपानी पुस्तकाचा हा पहिलाच अनुवाद, अगदी इंग्रजीतही अनुवाद झालेला नाही. मयुरेशमुळे मराठी भाषकांना सर्वप्रथम ती संधी मिळते आहे. त्यासाठी वॉल्डन पब्लिकेशनच्या अभिषेक धनगर यांनाही धन्यवाद.
कादंबरीची गोष्ट साधारण अशी आहे की दोन लेखक एका साहित्यिक कार्यक्रमासाठी निघालेले आहेत. संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी ते सकाळी गावात पोचले. त्यांची सोय एका छोटेखानी खाजगी विश्रामगृहात केली गेली. पण अचानक झालेल्या मोठ्या पावसामुळे गावाच्या दोन भागांना जोडणारा पूलच वाहून गेला. तिन्हीकडून डोंगर आणि एका बाजूने नदी अशा कात्रीत सापडलेल्या ठिकाणी , एका बेटावरच जणू, ते अडकून पडले. कार्यक्रमाला जाणं तर शक्य होतच नाहीये पण पाऊस कमी होऊन, पाणी ओसरून काहीतरी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत म्हणजे किमान एक दिवसभर तरी या छोट्याशा खेड्यात राहणं आता भाग आहे. त्या कल्पनेनेच ते कंटाळले आहेत, वैतागले आहेत. पण लेखकांचे चाहते गावात असतात. त्यामुळे विश्रामगृहाच्या मालकीणबाई, आजूबाजूचे गावकरी लेखकांच्या सोयीची, मनोरंजनाची लगबग सुरू करतात.
आणि त्या रात्री अचानक रात्री अशा घडामोडी घडतात की लेखक जिथे उतरले आहेत त्या विश्रामगृहातच एक खून झालाय असं लक्षात येतं. सगळ्या मंडळींना धक्का बसतो. प्रत्येक जण आपापल्या परीने काय झालं असेल याचा विचार करू लागतात. स्थानिक पोलीस अधिकारी पुरावे गोळा करायला लागतो. ते करता करता संशयाची सुई एका लेखक महाशयांकडेदेखील वळते. लेखक हतबुद्ध होऊन जातात.
त्यातले दुसरे लेखक महाशय मात्र स्वतः डोकं लढवून हे कसं खोटं आहे हे सिद्ध करायच्या तयारीला लागतात. स्वतः लोकांच्या भेटीगाठी घेतात, बोलतात. एखाद्या लेखकाने रहस्यकादंबरी लिहिण्यासाठी संशोधन करावं, जणू तसंच. या शोधाशोधीच्या नादात त्यांना या गावातले आर्थिक आणि सामाजिक ताणतणाव लक्षात येतात. त्याच्या आधारे ते खुनी कोण असेल ह्याचा तर्क मांडतात.
आणि दुसऱ्या दिवशी खुन्याचा शोध लागतो... आता खून कुणाचा झाला? कोणी केला? लेखक महाशयांचा त्यात हातभार किती आणि कसा? सामाजिक परिस्थितीचा त्यात काय भाग ? आणि शेवटचा अनपेक्षित तरीही धमाल धक्का अनुभवण्यासाठी मूळ पुस्तकच वाचायला पाहिजे.
ही एक छोटी पण वाचनीय आणि खिळवून ठेवणारी कादंबरी आहे. खून आणि त्या खुनाची उकल हे ढोबळमानाने कादंबरीचं स्वरूप असलं तरी इतर गुन्हेकादंबऱ्यांपेक्षा ही खूप वेगळी कादंबरी आहे. कारण हिच्यात एक सामाजिक प्रश्न - "शेतकऱ्यांना शेती परवडत नाही " हा - इथे प्रकर्षाने मांडला आहे. शेतीचं यांत्रिकीकरण, सरकारचं आयात निर्यात धोरण, अपूर्ण उत्पन्न, शेतमालाला रास्त भाव न मिळणे; या समस्या ज्या आपण रोज वृत्तपत्रात वाचत असतो; त्या समस्या जपानमध्येही आहेत हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं.
स्वतःला मोठा लेखक म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीला सामाजिक प्रश्नांची, खेडोपाड्यातल्या वास्तविकतेची जाणीव असली पाहिजे असाही संदेश या पुस्तकातून दिला जातो.
साहित्यिकांमध्ये एकमेकांबद्दलची इर्षा आणि सुप्त चढाओढ, दुसरा काही फार मोठा नाही हे दाखवण्याची हौस याचीही झलक आपल्याला मध्येमध्ये संवादातून मिळते. ते वाचून आपणही खुदकन हसतो.
कादंबरीचा सुरुवातीचा भाग थोडा संथ वाटतो. पटकन खून होईल आणि खून उकलाकडे कथानक वळेल अशा अपेक्षेने आपण सुरुवात करतो. मात्र लगेच तसं होत नाही. या पहिल्या भागात पुढच्या भागाची बीजं दडलेली आहेत. जपानचा सरंजामशाही इतिहास, जमीनदारांनी त्यांच्या शेतकऱ्यांवर केलेले अन्याय याची पार्श्वभूमी इथे तयार होते. तर दुसरीकडे जपानी समाजातले सामाजिक संकेत आणि शिष्टाचार हे आपल्यापेक्षा किती वेगळे आहेत हे बघून फारच गडबडून जायला होतं. लेखक ज्या विश्रामगृहात उतरलेत तिथली मालकीण बाई त्यांच्या स्वागतासाठी फक्त खाणंपिणंच नाही तर अगदी शय्यासोबतही करू शकेल अशा प्रकारचं वर्णन त्या प्रसंगांमध्ये आहे. विशेष म्हणजे अशी मागणी करण्यात आणि ती पुरवण्यात पार काही भयंकर गोष्ट नाही असेच संवाद आहेत. तिथे नग्ननृत्याचाही कार्यक्रम होतो. गरम पाण्याच्या झऱ्याखाली स्त्री-पुरुष एकत्रच नागव्याने डुंबतात. भारतीय समाजात असं काही झालं असतं तर खुनापेक्षा ह्या वागण्याच्याच बातम्या बनल्या असत्या. पण जपानी समाजात ते फार स्वभाविक दिसतंय. त्यामुळे पहिला भाग वाचताना मी मुख्य कथानकापेक्षा "लेखकाच्या नजरेतून जपान" बघत होतो. म्हणून तो भाग संथ वाटला तरी कंटाळवाणा झाला नाही. आणि शेवट होताना त्या प्रत्येक तपशीलाचे धागेदोरे आणि संदर्भ लेखकाने किती खुबीने गुंफले आहेत हे लक्षात आल्यावर; "अरे हो रे, हे असंच म्हटलं होतं की... असं बोलले होते त्याचा हा अर्थ होता तर..." असं म्हणत एक वेगळीच वाचनानुभूती जाणवली. पुस्तक वाचताना आपल्याला थोडी माहिती मिळते, आपण थोडं हसतो, थोडा तपास करतो, जरा आश्चर्यचकित होतो आणि काय काय झालं असेल याचा चित्रपटही मनात बघत राहतो.
आता काही पाने उदाहरणादाखल वाचा.
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

लेखक फुजिकावा ह्यांची व्यवस्था नीट झाली आहे ना. ह्याची चौकशी करताना.



शेतीचा प्रश्न


मूळ लेखनात काही कच्चे दुवेही आढळतात. पण ते सगळ्यात शेवटी जाणवेल, पण तो पर्यंत आपण पुस्तक पूर्ण केलेलं असेल. त्यामुळे त्यातून रसभंग होत नाही. उलट पूर्ण पुस्तक पुन्हा एकदा उलटसुलट चाळलं जाईल. लेखकाला कदाचित तेच अपेक्षित असावं. ह्या अनुवादासाठी मयुरेशला १००% गुण. ह्या पुस्तकालाही पुरस्कार मिळावेत अशा शुभेच्छा.
पुस्तक वाचून झाल्यावर अनुवादक मयुरेशशी गप्पा झाल्या. पुस्तकातले प्रसंग आठवून, ते कसे गुंफले आहेत याची उजळणी करण्यात आम्हाला दोघांनाही खूप मजा आली.
शीर्षकावरसुद्धा बोललो. "अपूर्णांकांचे खून" ऐवजी "लहान अंकांचे खून" असं शीर्षक असायला हवं होतं हे माझं मत त्याला सांगितलं. हिशेबामध्ये ३.३, ३.४ ला ढोबळमानाने तीनच धरलं जातं आणि ३.८, ३.९ ढोबळमानाने चार धरलं जात. म्हणजे २,३,४ ला महत्व न देता जणू त्यांचा खूनच केला जातो. लाक्षणिक अर्थाने, समाजातल्या दुबळ्या लोकांवरही अत्याचारच केला जातो. अशा अर्थाचा संवाद पुस्तकात आहे आणि त्यावरूनच मूळ जपानी पुस्तकाचे शीर्षक आहे. म्हणून मला शीर्षक "लहान अंकांच्या खुनाची कथा" असायला हवं असं वाटलं.
मयुरेशने पाठवलेले मूळ जपानी पुस्तकाचे मुखपृष्ठ

जपानी पुस्तकांच्या स्टाईल प्रमाणे या पुस्तकाचा आकार(लांबी रुंदी) नेहमीच्या पुस्तकांपेक्षा लहान आहे. हातात घेतल्यावर फॉन्टचा आकार बारीक वाटला. पण वाचायला सुरुवात केल्यावर त्रास झाला नाही. मुखपृष्ठावर राक्षसांच्या मुखवट्याची चित्र आहेत ज्याचा संदर्भ पुस्तकात शेतकऱ्यांनी सादर केलेल्या दैत्य नृत्याच्या कार्यक्रमाची आहे. जपानी लिपीतील चार आणि पाच या आकड्यांची चिन्ह आहेत. अक्षरांच्या वर शिरोरेखा न देता अक्षरं रेषेवर लिहिली आहेत. क्षणभर आपण ते उलटसुलट करून बघतो. पुस्तकात आपल्याला काय उलट सुलट वाचायला मिळणार आहे याची जणू झलकच.
आता अजून फार सांगत नाही. तुम्हीच पुस्तक वाचा. जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हालाही हे पुस्तका विषयी दुसऱ्या कोणालातरी सांगावसं वाटेल. ज्यांनी वाचलंय त्यांच्याशी बोलून वाचनानुभूती पुन्हा अनुभवायला आवडेल.
पुस्तक विकत घेण्यासाठी वॉल्डन पब्लिकेशनच्या अभिषेक धनगर यांच्याशी 9766975165 वर संपर्क साधा.
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-











































