मना सर्जना (Mana Sarjana)




पुस्तक : मना सर्जना (Mana Sarjana)
लेखक : डॉ. अनिल गांधी (Dr. Anil Gandhi)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २२०
ISBN : 978-81-8498-128-5

ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अनिल गांधी यांचं हे आत्मचरित्र आहे. त्यांच्याबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

अनुक्रमणिका

सोलापुरात बेताच्या परिस्थितीत वाढलेल्या अनिल यांना लहानपणापासून डॉक्टर व्ह्यायची इच्छा होती. परिस्थितीशी झगडत, नातेवाईक आणि सामाजिक संस्थांची मदत घेत त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. स्वतःचा भार कुटुंबावर पाडणं सोडाच उलट कुटुंबालाच हातभार लावायची गरज असल्यामुळे शाळा-कॉलेजात असताना कधी अर्धपोटी राहून, कधी शिकवण्या घेऊन, कधी अर्धवेळ नोकरी करून, पैसे वाचवून घरी पाठवावे लागत होते.
त्यातला एक प्रसंग :




पुढे त्यांनी छोट्या जागेत प्रॅक्टिस सुरू केली. त्यांच्या हाताला येणारं यश, सचोटीची वागणूक, रुग्णांप्रती सहृदयता यातून नाव, पैसा, प्रसिद्धी आणि समाधान मिळत गेलं. व्यवसायसुद्धा वाढला. हा प्रवास पुस्तकात सांगितला आहे. काही लक्षात राहिलेल्या केसेस सांगितल्या आहेत. उदा.


कौटुंबिक बाबतीतले प्रसंगसुद्धा सविस्तर लिहिले आहेत उदा. त्यांचं लग्न, भावाबहिणीची लग्नं, मुलांची शिक्षणं, खेळात आणि व्यवसायात प्रगती, नवीन घरांचं बांधकाम, गुंतवणूक इ.

अनिल गांधींसारखा सहृदय माणूस व्यावसायिक स्थैर्य आल्यावर सक्रिय समजकार्यात न उतरता तरच नवल. त्यांनी लोणावळ्याजवळ एका आदिवासी पाड्यात तिथल्या आदीवासींना मोफत उपचार द्यायला सुरूवात केली, पुढे त्यांच्यासाठी शाळा काढली. ह्या उपक्रमाची सुरुवात कशी झाली, साथीदार कसे मिळाले, लक्ष्मीनिवास मित्तल यांच्यासारख्या प्रसिद्ध उद्योगपतीची साथ मिळाली इ. सांगितलं आहे. 
आदीवासींना मदत करताना सुरुवातीच्या दिवसातली ही गंमत वाचा.




पुण्यात धोंडूमामा साठे होमीओपाथी कॉलेज आहे. त्या कॉलेजशी आणि ती चालवणाऱ्या संस्थेत त्यांनी काम केलं. त्याचे कडू-गोड अनुभव पुस्तकात आहेत.


पुस्तकाच्या शेवटी वेगळंच वळण घेत गुंतवणूक कशी करावी, जीवसृष्टीची उत्क्रांती याबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत. शेवटी खालावत चाललेल्या वैद्यकीय व्यवसायाबद्दल चिंतन आहे.

असं एकूण पुस्तकाचं स्वरूप आहे. पुस्तक वाचायला कंटाळा आला नाही तरी पुस्तक परिणामकारक होत नाही. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या खूप घटना, त्यांच्या संपर्कात आलेल्या कितीतरी लहान मोठी माणसांची नावं पुस्तकात येतात. पण बरेच वेळा; हे असं झालं, मला असं वाटलं, मग पुढे हे झालं, असं वाटलं ... अश्या पद्धतीच्या वर्णनामुळे त्यांच्या चरित्रापेक्षा त्यांच्या आयुष्याचा सरकारी अहवाल वाचतोय असं वाटतं. 

पुस्तकात जुने नवे फोट हवे होते. पण एकही नाही.

वैयक्तिक घटनांचा तपशीलही खूप येतो. एखाद्याचा घरगुती अल्बम बघितल्यासारखं वाटतं. सर्वांच्या कृतज्ञतेपोटी त्यांनी हे लिहिलं असेल हे मान्य, पण त्रयस्थ वाचक त्याच्याशी समरस होऊ शकत नाही.
पुस्तकाच्या शेवटीतर गुंतवणूक कशी करावी, विज्ञानाचे शोध कसे लागले असे याबद्दल त्यांना काय समजलंय हे लिहिलं आहे. हे तर लेखन भरकटल्यासारखं वाटतं.

कष्ट करून नावारूपाला आलेले प्रथितयश डॉक्टर, गरीबीतून श्रीमंत झाल्यावरही पैशाच्या लोभात न अडकता व्यावसायिक शुचिता आणि समाजिक बांधिलकी जपणारं असं अनिल गांधी यांचं व्यक्तिमत्त्व आहे. ते प्रेरणादायी आणि आशादायी असूनही पुस्तक मात्र "तरीही उरे काही उणे" भावना निर्माण करतं.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

भारतीय उद्योगातले ऑनलाईन आयडॉल्स (Bharatiya Udyogatale Online Idols)



पुस्तक : भारतीय उद्योगातले ऑनलाईन आयडॉल्स (Bharatiya Udyogatale Online Idols)
लेखिका : अनुराधा गोयल (Anuradha Goyal)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ पुस्तक : The Mouse Charmer (द माउस चार्मर)
मूळ पुस्तकाची भाषा : इंग्रजी (English) 
अनुवादिका :शुभदा पटवर्धन (Shubhada Patwardhan)
पाने : 211
ISBN : 978-93-86493-16-3

भारतात इंटरनेटचा प्रसार वाढत आहे. त्यामुळेच इंटरनेटवर आधारित आधारित उद्योगांची नवोद्यमिंची (Startups)संख्यादेखील वाढत आहे. ग्रामीण भागाचं माहित नाही; पण शहरी-निमशहरी भागात काही सेवा घेण्यासाठी आता पावलं दुकानांकडे न वळता इंटरनेट कडेच वळतात. भारतीयांना ही सवय लावणाऱ्या, भारतातल्या उद्योजकांनी सुरू केलेल्या अशा काही आंतरजाल आधारित उद्योगांचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. 

लेखिका आणि अनुवादिका यांची पुस्तकात दिलेली महिती:


लेखिकेने बऱ्याच कंपन्यांचा अभ्यास केला आणि त्यातून पुस्तकासाठी काही ठराविक कंपन्या का निवडल्या निवडल्या हे लेखिकेने मनोगतात स्पष्ट केलं आहे.


या पुस्तकात कुठल्या कंपन्यांचा समावेश केला आहे ते अनुक्रमाणिकेवरून कळेल.




साधारणपणे पुस्तकात दिलेली महिती अशी आहे -  व्यवसायाचे साधारण स्वरूप काय आहे; कोणकोणत्या सेवा पुरवल्या जातात; व्यवसायाची सुरुवात कशी झाली, उतपन्न कुठून येतं, त्यांना असणारी भविष्यातली आव्हानं, या क्षेत्रात विस्तारण्यासाठी अजून उपलब्ध असलेल्या संधी अशी मांडणी आहे. इ.

या पुस्तकात कंपन्यांची माहिती कशा पद्धतीने दिली आहे यावर एक नजर टाकूया. फ्लिपकार्ट च्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल 



या कंपन्यांचं बिजनेस मॉडेल कसं असतं; कंपन्या, ग्राहक आणि अंतर्गत व बाह्य सेवा पुरवठादार यांचे परस्पर संबंध कसे असतात हे दाखवणारे काही तक्ते पुस्तकात आहेत उदाहरणार्थ बिग बास्केट चा बिजनेस फ्लो



प्रत्येक कंपनीला आपला बिझनेस वाढवण्यासाठी जशी स्पर्धकांची आव्हान आहेत तशीच ती त्यांच्या क्षेत्रात अंगभूत जोखमींची सुद्धा आहेत. उदाहरणार्थ गेम्स टू विन या कंपनीच्या आव्हानांबदल



या कंपन्या नफा मिळवण्यासाठी जागरूक आहेत तशाच समाजोपयोगी उपक्रमांबद्दलसुद्धा जागरूक आहेत. काहीवेळा समाजसेवा म्हणून अशा उपक्रमांना आर्थिक पाठबळ देतात तर काही वेळा सामाजिक प्रश्न हाताळणं आणि स्वतःच्या उद्योगा इकडे लोकांना वाळवणं हे दोन्ही एकत्रित साधलं जातं. उदाहरणार्थ "शादी डॉट कॉम" चा हा हुंडाविरोधी उपक्रम.


या पुस्तकात ज्या उद्योगांची माहिती आहे त्यातले बहुतेक उद्योग आता शहरी लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झालेले आहेत. त्यामुळे वेबसाईटवर काय सुविधा मिळतात, त्या सुविधांसाठी पेमेंटचे कुठले पर्याय आहेत, लोकांना आपली मतं फीडबॅक च्या स्वरूपात मांडण्याचे पर्याय उपलब्ध आहेत इ. सगळी माहिती आधीपासूनच असेल. त्यामुळे तीच माहिती पुन्हा पुस्तकात वाचताना काही मजा येत नाही. कॉम्प्युटरच्या पडद्यावर जे दिसतं ते सगळ्यांनाच माहिती आहे पण पडद्यामागे काय घडतं ते या पुस्तकात समजावून सांगितलं असेल अशी माझी अपेक्षा होती. पण पडद्यामागचा भाग फार खोलात जाऊन सांगितलेला नाही. माहिती फारच जुजबी, वरवरची आणि कोणालाही साधारण अंदाज लावता येईल अशीच आहे. उदाहरणार्थ, वेबसाईटवर जाहिराती दाखवून पैसे मिळतात. लोकांना काय हवंय याबाबत सतत सुधारणा केल्यामुळे लोक त्या वेबसाईट कडे पुन्हा पुन्हा येत राहतात. इत्यादी. त्यामुळे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे ह्या "नावीन्यपूर्ण बिजनेस मॉडेल्स" मधून "स्टार्टअपना शिकण्यासारखं बरंच काही" असलं तरी या पुस्तकातून तरी ते काही खास शिकता नाही हे मात्र खरं. पुस्तक वाचून फार माहिती हाताशी लागली, ज्ञानात भर पडली असं होत नाहीये.


अनुवाद चांगला झाला आहे. तांत्रिक गोष्टी मराठीतून मांडताना किती मराठीकरण करायचं ते ठरवणं जरा कठीण जात असेल. कारण "कच्चा माल पुरवठादार मंच" असं वाचल्यावर "क्काय?? म्हणजे रॉ मटेरियल सप्लायर प्लॅटफॉर्म का? मग असं मराठीत सांगा नं !" अशी प्रतिक्रिया उमटू शकते. ही अवस्था लक्षात घेता पुस्तकात योग्य ते मराठीकरण केलं आहे. इंग्रजी शब्दसुद्धा बरेच ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यामुळे " इंग्रजीपेक्षा मराठीत समजायला सोपं पण काही शब्द मराठीपेक्षा इंग्रजीत सोपे" अशी अवस्था असणाऱ्या वाचकांनाही पुस्तक "जड" वाटणार नही.




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...