जंगलांतील दिवस (jangalantil divas)





पुस्तक : जंगलांतील दिवस (jangalantil divas)
लेखक : व्यंकटेश माडगूळकर (Vyankatesh Madgulkar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १८३ 
ISBN : दिलेला नाही
मॅजेस्टिक प्रकाशन. पहिली आवृत्ती १९८४. तिसरी आवृत्ती २००५

लेखकाच्या शब्दातच पुस्तकाची ओळख करून घ्यायची तर प्रस्तावनेत लेखकाने म्हटलंय की "१९७४ पासून ते ८४ पर्यंतच्या दहा वर्षांत मी कुठे कुठे हिंडलो, आणि मला काय काय दिसले, काय काय जाणवले ते मी, निरनिराळ्या नियतकालिकांमधून सांगत आलो. या साऱ्या निवेदनांचा हा संग्रह आहे". काझिरंगा, भरतपूर, मेळघाट, नवेगाव बांध या आणि अजून काही अभयारण्यांना, जंगलांना त्यांनी भेट दिली त्या अनुभवांचे हे वर्णन आहे. 

साहित्यिक, चित्रकार आणि वन्यजीवन प्रेमी अशा व्यक्त्तिमत्त्वाच्या त्रिवेणी संगमातून व्यंकटेश माडगूळकरांचं हे पुस्तक आपल्यासमोर येतं. रूढ प्रवावर्णनांप्रमाणे हे त्या त्या जागेचं सविस्तर वर्णन नाही, वन्यजीवनावर खूप अभ्यास करून सादर केलेले गंभीर संशोधनही नाही तर वाचकांना या वन्यजीवनाची थोडी ओळख व्हावी या दृष्टीने लिहिलेले हे लेख आहेत. त्यामुळे जंगलात काय दिसू शकतं, जंगलात भटकण्यात काय मजा येते आणि अडचणी येतात याची झलक आपल्याला दिसते. उदा. कान्हामाधील व्याघ्रदर्शनाचा हा प्रसंग

फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा


लेखाच्या ओघात एकशिंगी गेंडे, रानडुक्करे, रानम्हशी, गवे, काळवीट यांच्या जीवनचक्राची, वागणुकीची थोडी शास्त्रीय माहिती मिळते. कितीतरी वेगवेगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची, झाडांची नावे वाचायला मिळतात. लेखकाने जी शिकाऱ्यांची, जंगलावरची पुस्तके वाचली आहेत त्यातले काही रोचक किस्सेही वाचायला मिळतात. त्यांची स्केचेसही पुस्तकात आहेत. 

इष्टस्थळी पोचण्याचा प्रवासही कसा मजल दरमजल करत करावा लागायचा हे पण वाचायला मिळतं. तीसचाळीस वर्षांपूर्वी या अभयारण्यांपर्यंत पोचण्यासाठी रेल्वे, बस, रिक्षा आणि पायी प्रवास, तोही बेभरवशाचा करायला लागत होता. अडचणीच्या, घाणेरड्या लॉजमध्ये राहण्याची सोय. सरकारी लालफितीच्या परवानग्या काढून प्रवेश. हे सगळं वाचून आता वनपर्यटनाची स्थिती, प्रवासाच्या आणि राहण्याच्या सोयी खूपच सुधारल्या आहेत हे जाणवल्यावर बरं वाटतं.

लेखांचा एकूणच बाज खूप गंभीर न ठेवल्याने माडगूळकर आपल्याशी त्यांच्या सफरींबद्दल गप्पाच मारतायत असं वाटतं. थोडी माहिती, थोडे किस्से, थोडे रंजन असं पुस्तक वाचायला मजा आली. त्यांच्यातला प्रतिभावतंत लेखक त्या त्या ठिकाणची शब्दचित्रेही छान रंगवतो. डाकबंगल्याचं हे वर्णन वाचून पुढच्या सुट्टीत तुम्हालाही डकबंगल्यात जावसं वाटलं तर नवल नाही.





तरीही जंगलाची भव्यता, गांभीर्य शब्दांत आणि स्केच मध्ये पकडणं कठीणच. त्यात शहरात वाढलेल्या मी इतके प्राणी, पक्षी, झाडं स्वतः बघितलेली नाहीत. त्यामुळे सगळी वर्णनं डोळ्यासमोर उभी राहत नाही. पुस्तकात खरे रंगीत फोटो असायला हवे होते असं वाटतं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता डिस्कव्हरी किंवा नॅशनल जियोग्राफिकवर आणि इंटरनेटवर घरबसल्या आपण जंगलं, प्राण्यांचा जीवनक्रम, शिकारीचा थरार सगळं बघू शकतो. नेटवर प्रत्येक प्राण्याचे फोटो आणि माहितीही सविस्तरपणे मिळते. त्यामुळे सध्या हे पुस्तक वाचताना तितकं जिवंत वाटत नाही. पण माडगूळकरांच्या शब्दात जंगलाबद्दलचा हो लडिवाळपणा आढळतो त्यामुळे आपणही असं जंगल प्रत्यक्ष (टिव्हीवर नाही) बाघावं असं नक्की वाटतं. पुस्तकामागचा त्यांचा उद्देशही हाच आहे. प्रस्तावनेच्या शेवटी ते म्हणतात .. "जंगलांती दिवसाच्या कहाण्या वाचून वाचकांपैकी कुणा चा जणांना बुद्धी झाली आणि आपल्या कृत्रिम जगातून बाहेर पडून निसर्गाची भव्यता, श्रीमंती आणि सौंदर्य याचा त्यांनी आनंद घेतला, तर बरेच आहे".


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

The True Story of Sunburn ( द ट्रू स्टोरी ऑफ सनबर्न )






पुस्तक : The True Story of Sunburn ( द ट्रू स्टोरी ऑफ सनबर्न )
लेखक : Shailendra Singh ( शैलेंद्र सिंघ )
भाषा : English (इंग्रजी)
पाने : ३१३
ISBN : 978-93-83359-73-8


"सनबर्न" हा भारतात होणारा आशियातील सगळ्यात मोठा संगीत-नृत्य महोत्सव आहे. पण संगीत महोत्सव म्हटल्यावर "सवाई गंधर्व" सारखा सात्त्विक सोज्वळ कार्यक्रम असेल असं वाटत असेल तर तसं नाही. हा पाश्चात्य धांगडधिंगा नच-गाण्याचा महोतस्व आहे. गणपतीच्या मिरवणुकीत रात्री उशीरा किंवा रेंगाळलेल्या मिरवणुकीत पहाटे जो "डीजे" नाच चालतो त्याचं अति व्यापक रूप. मोठे पटांगण. लाखोंची गर्दी. कानठळ्या बसवणारे संगीत. प्रकाशझोत. परदेशातून आलेले डीजे. "हँड्स इन द एअर.. आर यु फ*** एन्जॉयिंग इट?" चे चित्कार. दारू च्या नद्या. चित्रविचित्र कपडे, वेशभूशा आणि व्यक्तींची सलगी असा एकूण माहोल म्हणजे "सनबर्न".  त्याला EDM (Electronic Dance Music) म्हणतात इंटरनेट वर शोधलंत तर बरीच माहिती आणि चित्रफिती बघायला मिळतील.

जी कंपनी सनबर्न आयोजित करते तिच्या प्रमुखाने सनबर्नची जन्मकथा सांगितली आहे. कल्पना कशी सुचली, हेच नाव कसं घेत्लं, काय अडचणी आल्या इ. त्या नंतर गेल्या सात-आठ वर्षांतल्या महोत्सवांचा आढावा घेतला आहे. कोण कोण डीजे आले होते, काय विशेष घडलं इ. ही कंपनी आणि वायकोम यांच्या झालेला व्यावसायिक वाद याबद्दल लिहिलं आहे. 




पुस्तक सचित्र आहे. पुस्तकात या महोत्सवाची खूप छायाचित्रे आहेत. ग्राफिकल डिझाइन्स आहेत. पुस्तक इतकं सचित्र आहे की आपण एखादी डॉक्युमेंटरीच पाहत आहोत असं वाटतं. पुस्तकाचं हे रुपडं खूप आवडलं. म्हणून खूप फोटो मी पण काढलेत तुम्हाला लक्षात यावं म्हणून. 













मी स्वतः असला दणदणाट काही मिनिटांच्या वर सहन शकत नाही. त्यामुळे मला या प्रकारच्या इव्हेंचं काही अनुभव आणि आकर्षण नाही. पण वाचनाचा एक फायदा असतो की आपण दुसऱ्यांचे अनुभव - जाणून घेऊ शकतो. त्या उत्सुकतेपोटी हे पुस्तक मी घेतलं. पण एकूण धांगडधिंगा संगीताप्रमाणे हे पुस्तकही फार वेळ वाचू शकलो नाही. फार रस वाटला नाही. थोडं वाचलं बरचसं चाळलं. 



मी सनबर्न चा चाहता असतो तरी इंटरनेट वर साधारणपणे जी माहिती मिळली असती त्यापेक्षा खूप वेगळं किंवा महत्त्वाचं माझ्या हाती लगलं आहे असं मला वाटलं नसतं. एखाद्या कार्यक्रमाची खूपखर्च करून काढलेली स्मरणिका जशी असते - वाचनीय कमी आणि संग्राह्य जास्त; स्मृतिमूल्य जास्त - तसं वाटलं.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) 
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

Animal Farm (अ‍ॅनिमल फार्म)





पुस्तक : Animal Farm (अ‍ॅनिमल फार्म)
लेखक : George Orwell (जॉर्ज ऑरवेल)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : १२८

ISBN : 978-93-82088-29-5 

हे अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय पुस्तक आहे. त्या बद्दल जगभरातले वाचक, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, रजकारणी यांनी इतकं लिहून आणि म्हणून ठेवलं असेल की मी त्यात काही भर घालणं शक्य नाही. फक्त मी पण हे पुस्तक वाचलं आणि जर चुकून माकून कोणी पुस्तक वाचलं नसेल तर या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून द्यावी हाच साधा उद्देश.

हे पुस्तक म्हटलं तर एक कल्पना रंजन आणि म्हटलं तर डोळ्यात अंजन !!

कथानक घडतं बऱ्याच वर्षंपूर्वी च्या एका इंग्लंडमधल्या खेड्यात. एका इंग्लिश व्यक्तीचं शेतकरी-पशुपालन करणाऱ्याएका इंग्लिश व्यक्तीचं शेतकरी-पशुपालन करण्याचा व्यवसाय आहे. गायी, घोडे, गाढवं, कोंबड्या, कुत्रे, मांजरी असा त्याचा बाडबिस्तारा आहे. या प्राण्यांना वाटतं की आपण कष्ट करतो आणि त्याचा सगळा फायदा या मालकाला होतो. अन्न इतकं पिकतं पण आपल्याला जेमतेम खायला मिळतं. मांसासाठी आपल्या प्राण्यांची कत्तल केली जाते. हे सगळे प्राणी एकदा बंड करून उठतात आणि मालकाला पळवून लावतात. "आपलं - प्राण्यांचं राज्य" आता आलं म्हटल्यावर सगळे प्राणी समान, कोणी कोणाला त्रास देणार नाही, सगळे मिळून काम करतील, सगळ्यांना पोटभर मिळेल असं ठरवतात. आता माणसांना आणि माणसांच्या स्वार्थी-क्षुद्र वृत्तीला आपल्यात स्थान नाही.

सुरुवातीला हे बरं चालतं. मग मात्र प्राण्यांमधल्या दुष्प्रवृती डोकं वर काढू लागतात. प्राण्यांचं नेतृत्त्व करणाऱ्या डुकरांमध्ये दुफळी माजते आणि एक गट दुसऱ्या गटाला दगाबाज, स्वार्थी ठरवून पळवून लावतो. आणि नेतृत्त्व आपल्या ताब्यात घेतो. प्राण्यांच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. त्यासाठी सगळे प्राणी राब राब राबतात; फक्त डुकरं सोडून. ते स्वतःला विचार करणारे, नियोजन करणारे समजायला लागतात. सगळे समान आणि तत्सम "कायदे’ कळत नकळत बदलत जातात. इतर प्राण्यांची मतं विचारात घेण्याचं फक्त नाटक होतं. डुकरांची हुकुमशाही सुरू होते. 

प्राणी आधीही कष्ट करत होते, आत्ताही करतात. पूर्वीपेक्षा परिस्थिती फार बदलेली नाही. पण आपण स्वतंत्र आहोत, हे सगळं आपल्या भल्यासाठीच चाललं आहे असा "प्रपोगांडा" डुकरं राबवतात. काही मूर्ख प्राणी त्याला भुलतात. काही आळशी प्राण्यांना काहीच फरक पडत नाही. तर विचार करू शकणाऱ्या प्राण्यांना कुत्र्यांच्या हल्ल्याला तोंड द्यावं लागतं. माणसाची गुलामी जाऊन डुकरांची गुलामी नशिबी येते !

हे सगळं कुठेतरी अनुभवल्या सारखं वाटतंय ना ? हो भारतातच. "गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले" हे आपलं वाक्य हेच सांगते की ही कादंबरी भारतीय लोक प्रत्यक्ष जगले आहेत. पण ही कादंबरी १९४५ ची आहे. कारण त्या आधीही जगात याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडल्या आहेत. ही कादंबरी रशियन क्रांती आणि नंतरची दमनकारी कम्युनिस्ट राजवट यांच्याशी जुळते. या सनातन प्रवृत्तीमुळे हे पुस्तकची चिरंजीव झालं आहे. राजकीय, सामाजिक चर्चा आणि लेखांमध्ये या पुस्तकाचा, यातील प्रसंगांचा, वाक्यांचा उल्लेख अनेकदा वाचायला मिळतो.
उदा. लोकशाहीत समानता हे धोरण असतं पण तरीही रजकीय मंडळी आणि त्यांच्या मर्जीतले लोक "खाशी मंडळी" म्हणून वावरतात. त्याबद्दल नेहमी वापर्लं जाणारं वाक्य :
“All animals are equal, but some animals are more equal than others.”

आपल्या देशात, जगात सध्या आणि यापूर्वी घडलेल्या घटनांसारख्या घटना पुस्तकात घडतात. उदा. 
सत्ताधारी नेहमी परक्या देशाची, समाजाची भीती दाखवून समाजमन ताब्यात ठेवतात. कष्ट करणऱ्या , उपयोगी पडणाऱ्या व्यक्तींची कष्ट करण्याची ताकद संपली की त्यांना पद्धतशीरपणे संपवण्यात येतं. इ.

(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)



सगळं लिहिण्यात मजा नाही वाचण्यातच मजा आहे. मात्र, फक्त वाचून सोडून दिलं तर भविष्यात सजा आहे.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

रारंग ढांग (rarang dhang)




पुस्तक : रारंग ढांग  (rarang dhang)
लेखक : प्रभाकर पेंढारकर (Prabhakar Pendharkar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १७५
ISBN : 81-7486-269-2


प्रस्तावनेच्या सुरुवातीच्या परिच्छेदात पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली आहे.

(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)



विश्वनाथ हा इंजिनीअर आपली मुंबईतली नोकरी सोडून बाॅर्डर रोड आॅर्गनायझेशन मध्ये मुलकी इंजिनियर म्हणून रूजू होतो. हिमालयातल्या उंचच उंच कड्यातून -ढांगातून - रस्ता काढायच्या कामावर त्याची नेमणूक होते. त्याच बदलणारे हवामान, दरडी कोसळणे, अपघात यांच्याशी त्याची ओळख होते. तशीच ओळख होते सैन्यातल्या करड्या शिस्तीशी. शिस्त पाळणं त्याला आवडत नाही असं नाही पण केवळ अांधळेपणे आज्ञा पाळणेही. त्याला जमत नही. आणि एक छुपा संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष चांगला विरूध्द वाईट असा नाही. दोन्ही बाजू चांगल्याच. आपापल्या परीने निस्वार्थी प्रामाणिकच. हा संघर्ष, हे या कादंबरीचं मूळ कथानक. 

सैन्य किंवा सैनिक म्हटलं की आपल्याला देशभक्ती, धैर्य किंवा त्यांचा घरच्यांशी होणारा विरह याबद्दल आपल्याला अनेकदा वाचायला मिळतं. पण त्या पलिकडे जाऊन लष्कर म्हणून काम करताना किती वेगवेगळी मानसिक अव्हानं पेलावी लागतात याची जाणीव होते. दिलेली आज्ञा तंतोतंत पाळणे पटो अथवा न पटो, हाताखालच्या लोकांवर योग्य वचक ठेवणे, प्रसंगी त्यांच्याशी कठोर वागणे इ. शिस्त, धाडस, आज्ञाधारकपणा या सगळ्या बाबतीत "सिव्हिलियन"पेक्षा लष्करी माणूस वरचढ हा आत्मगौरवही जागोजागी दिसतो. उदा. हा प्रसंग वाचा


विश्वनाथ आणि त्याच्या वडिलांच्या पत्रव्यवहारातून, ज्या घटना घडतात त्यावर सुंदर तत्वचितंनही आहे.
तसं म्हटलं तर "रारंग ढांग" ही एका रस्तेबांधणीची गोष्ट आहे. पण ती साधी नाही. एखाद्या ठिकाणी रस्ता बांधला जाणं म्हणजे त्या भागात पोचणं आता सोपं करणं. निर्मितीचा आनंद त्यात आहे. हे काम दुर्गम पर्वतीय भागात होत आहे म्हणून त्याला निसर्गागशी घेतलेल्या झुंजीची, माणसाच्या महत्वाकांक्षेची जोड आहे. हा पर्वत  हिमालय असल्याने त्या कामाला भव्यतेची पार्श्वभूमी आहे. आणि हे काम लष्कर करतंय म्हणून त्याला सैनिकी शिस्तीचा आयाम आहे. लष्करातला अधिकारी ध्येयवादाने प्रेरित होऊन हे काम करत असल्याने या भौतिक कामाला एका तत्वचितंनाची जोड मिळाली आहे. हे सर्व स्वयंसिद्ध पैलू लेखनशैलीच्या कोंदणात सुरेख बसले आहेत. व्यक्ती, प्रसंग डोळ्यासमोर उभी करणारी वर्णन शैली, परिणामकारक संवाद, न रेंगाळणारे प्रसंग, कुठल्याही पात्रावर अन्याय न करणारं समतोल चित्रण याची सुरेख मेजवानी असं हे पुस्तक आहे. 

प्रसंगांची वर्णनं वाचून असं वाटत होतं की हातात कला पाहिजे होती. किती सुंदर स्केचेस काढता आली असती यांची. खरंच पुढच्या आवृत्त्यांमध्ये, प्रकाशकांनी कुणाकडून तरी पेन्सिल स्केचेस काढून सचित्र आवृत्ती काढली पाहिजे.

उदा. कामाच्या ठिकाणी दरड कोसळते तेव्हा तिथे मदत करायला पोचलेल्या विश्वनाथला हे दृश्य कसं दिसतं



पुस्तक ८१ साली पहिल्यांदा प्रकाशित झालं असलं तरी हिमालय, सैन्य, शिस्त, ध्येयवाद, स्वभावांचा टोकदारपाणा या कधीही जुन्या न होणाऱ्या गोष्टी. त्यामुळे पुस्तकही अजून जुने झालेले नाही. पुन्हा पुन्हा प्रकाशित झालेले आहे. मी वाचली ती प्रत २००३ सालची नववी आवृत्ती होती. लोकप्रिय पुस्तकांपैकी ते एक आहे यात नवल नाही. तुम्हालाही नक्कीच आवडेल.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

खेकसत म्हणणे, आय लव्ह यू (khekasat mhanane, I love you)





पुस्तक : खेकसत म्हणणे, आय लव्ह यू  (khekasat mhanane, I love you)
लेखक : श्याम मनोहर (shyAm manohar)
पाने : २०३
ISBN : 978-81-7185-998-6


कादंबरीचं नाव आणि मलपृष्ठावरचा मजकूर बघून काहितरी वेगळं असेल म्हणून पुस्तक वाचायला घेतलं. त्याप्रमाणे वेगळेपणा कादंबरीत आहे. पण तो वेगळेपणा मला अजिबात आवडला नाही. एखाद्या कादंबरीलेखकाने आपल्याला त्याची कादंबरी वाचायला देण्याऐवजी आपल्याशी तो काय विचार करतोय हे सांगत राहिलं तर कसं वाटेल तसं हे पुस्तक आहे. लेखकाने कादंबरीत पाच पात्र ठरवली आहेत. साचेबद्ध. एक संघाचा, एक समाजवादी, एक दलित नेता, एक तरूण मुलगी, एक तरूण. त्यांची ओळख करून दिली आहे. आणि ही पात्र घेऊन गोष्ट घडवायची आहे. मग त्यांना काय पार्श्वभूमी द्यायची त्याचे पर्याय आणि त्यातला निवडलेला पर्याय दिले आहेत. मग त्याच्या कथेची गरज म्हणून त्यांना एकांतवासात पाठवायचंय तर त्यांसाठी त्यांच्या आयुष्यात काय काय घडावता येईल त्याची चर्चा आणि त्यातला एक पर्याय निवडणे. मध्येच मुख्य पात्रांच्या आजुबाजूला घडणऱ्या काही घटना, मध्येच त्यांची स्वगतं, मध्ये नुसतेच विचार अशा भरताड पद्ध्तीने पुस्तक पुढे जात राहतं.
काही उदाहरणं

पात्र परिचय:

एका पात्राला दुसऱ्या माणसाची आठवण येते. तर पुस्तकात चक्क क्रमांकासहित आठवणींची यादी दिली आहे :




पात्राच्या आयुष्यात पुढे काय घडवायचे याची वाचकाशी चर्चा :





पात्रंपण  "कृष्ण-धवल" रंगवली आहेत. संघाचा माणूस म्हणजे तो अशाच साच्यात विचार करणार, असंच बोलणार; दलित नेता म्हणजे अशाच साच्यात विचार करणार, असंच बोलणार. हे साधारण टीव्हीवरच्या चर्चांमध्ये माणसं जशी अभिनिवेशाने, मुखवटा घालून वागतात तशीच ही पात्रं आहेत. त्यात काही कंगोरे वाटले नाहीत. त्यामुळे सुरुवातीची पानं तीसेक पानं नीट वाचली. मग पन्नासेक पानं गोषवारा पद्धतीने वाचली. तरीही पुस्तकाने काही पकड घेतली नाही. पुढची पाने चाळत चाळत वाचली. काही पाने सोडून अगदी शेवट वाचला. तरी मध्ये काय घडलं असेल याची काहीच उत्सुकता वाटली नाही. 

लेखकाला राजकीय, सामजिक चिंतन करायचंय आणि या पात्रांच्या मार्फत ते मांडायचंय एवढंच जाणवलं. पण अशीच पात्रं घेऊन,त्यांच्या तरल चित्रणातून, एक कथासूत्र ठेवून एल. भैरप्पांच्या कादंबऱ्या किती उच्च पातळी गाठू शकतात हे अनुभवलेलं असल्याने ही कादंबरी खूपच ठोकळेबाज, वरवरची वाटली. आणि कादंबरीच्या "फॉर्म" चा प्रयोगही मला भावला नाही.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) 
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...