Revolution 2020 (रिव्हॉल्यूशन २०२० )





पुस्तक : Revolution 2020 ( रिव्हॉल्यूशन २०२० )
लेखक : Chetan Bhagat (चेतन भगत)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : २९०
ISBN : 978-81-291-1880-6


लोकप्रिय आणि विक्रमी खपांची इंग्रजी पुस्तकं लिहिणारे तरूण भारतीय लेखक चेतन भगत यांचे हे मी वाचलेलं तिसरं पुस्तक. 

भारतातल्या शिक्षणव्यवस्थेचा बाजार आपल्या सर्वांनाच माहितीचा आहे. विद्यार्थी, पालक किंवा शिक्षक अशा एखाद्या भूमिकेतून आपण ते जहाल वास्तव अनुभवलंही असेल. हेच बाजारूकरण या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. एका गरीब घरातला एक तरूण गोपाल बारावी नंतर जेईई-आयट्रिपलई (JEE/IEEE) प्रवेश परीक्षा द्यायचा प्र्यत्न करतो आणि त्यात नापास होतो. मग तो परीक्षांची तयारी करायला राजस्थानातल्या कोटाला जातो. तिथे तर प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी करणाऱ्या क्लासमधे अ‍ॅडमिशन्साठीही पुन्हा मारामारी आणि प्रवेश परीक्षा! तिथूनही अयशस्वी होऊन पुन्हा घरी परत येतो. आणि त्याच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळते. एका राजकारण्याची-आमदाराची नजर त्याच्यावर पडते आणि त्याच्या नावावर जमीन आहे हे बघून त्याला आपल्या जाळ्यात ओढतो. आणि कॉलेजात जाऊ न शकलेला हा तरूण कॉलेज काढतो ! शेतजमीनीची-एन ए करणे, हव्या तश्या बांधकामाला परवानगी मिळवणे, सोयी असो नसो पण विद्यापिठाची परवानगी मिळवणे अश्या बारा भानगडी आमदार, त्याचे पित्ते आणि गोपाल करतात. हळूहळू गोपाल मोठा शिक्षणसम्राट होतो. 

या "प्रगती" च्या जोडीजोडीने चालते त्याची प्रेमकहाणी - प्रेमाचा त्रिकोण. त्याची मैत्रिण -आरती - कधी गोपालशी जवळीक तर कधी त्याचा मित्र राघवशी जवळीक अशा द्वंद्वात असते. राघव इंजिनिअर होऊन स्वतःची आवड म्हणून पत्रकार झालेला असतो. एक प्रामाणिक, सत्याचा पाठपुरावा करणारा तरूण रक्ताचा पत्रकार. आपण अयशस्वी म्हणून म्हणून आरती आपल्याशी लग्नाला तयार होत नाही असं गोपालला वाटत असतं. आरतीही नेहमी "कन्फ्यूज्ड".  गोपाल मनाने प्रामणिक आहे पण आपण श्रीमंत नव्हतो म्हणून आरती आपल्याला मिळत नाही असं एकीकडे वाटत असतं म्हणुन श्रीमंत होण्याची त्याची धडपडह आहे तर दुसरीकडे गैरमार्गाने पैसा मिळवतोय याची टोचणीही आहे. 

गोपाल श्रीमांत कसा होतो; श्रीमंत झाल्यावर तरी आरती त्याला हो म्हणते का; "शिक्षणसम्राट" गोपाल आणि "प्रामाणिक पत्रकार" राघव यांच्या मैत्रीत काय उतार-चढाव येतात हे मी सांगून रहस्यभेद करत नाही.

शिक्षणाच्या बाजारूपणबद्दल, राजकारणी-बिल्डर-प्रशासन-शिक्षणसम्राट यांच्या साट्यालोट्याबद्दल आपण नेहमीच बातम्यांत ऐकतो. साधारण तेच प्रसंग ढोबळमानाने आपल्याला कादंबरीत दिसतात. सध्या बातम्याच इतक्या नाट्यमय असतात की त्यामुळे कादंबरीत काही नाट्यमय वेगळं वाटत नाही. प्रेमकथाही फार गोंधळलेली वाटते. हे "गोपालचं" स्वगत आहे त्यामुळे इतर कुठल्या पात्राच्या डोक्यात काय चालू आहे, काय भावभावना आहेत हे दिसत नाहीत. 

चेतन भगतच्या "टू स्टेट्स" आणि "हाफ गर्लफ्रेंड" खूपच मनोरंजक, चटपटीत संवाद असणऱ्या होत्या. खिळवून ठेवायच्या. ही कादंबरी वाचताना कंटाळा येत नाही पण खूप मजाही येत नाही. शेवट थोडा अनपेक्षित आहे इतकंच.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

रुसी मोदी - द मॅन हू ऑल्सो मेड स्टील (Rusi Modi : The man who also made steel)




पुस्तक : रुसी मोदी - द मॅन हू ऑल्सो मेड स्टील (Rusi Modi : The man who also made steel) 
लेखक : पार्थ मुखर्जी, ज्योती सबरवाल (Partha Mukherjee & Jyoti Sabharwal )
भाषा : मराठी (मूळ पुस्तकाची भाषा : इंग्रजी) 
अनुवादक : अंजनी नरवणे (Anjani Naravne)
पाने : २१०

टाटा आयर्न अँड स्टील (टिस्को) अर्थात सध्याची टाटा स्टीलचे माजी चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर रुसी मोदी यांच्या विषयीचे हे पुस्तक आहे. 

रुसी यांचा जन्म सधन आणि प्रतिष्ठित पारशी घरात झाला. १९१८ साली. त्यांचे वडील सर होमी मोदी हे त्यावेळच्या मुंबई इलख्याचे गव्हर्नर होते. त्यांचे शिक्षण इंगलंडमधल्या शाळा-कॉलेजात झाले. शिकून परत आल्यावर त्यांनी टिस्को मध्ये नोकरी सीकारली. टाटा कुटुंब आणि मोदी कुटुंब यांचे अगदी जवळचे संबंध होते तरी त्यांनी एक साधा "खलासी" अशी कामगारवर्गातली नोकरी स्वीकारली. पुढची त्रेपन्न वर्षं ते सलग टिस्को मध्येच होते. आणि स्वकर्तृत्वाने एकेक पायऱ्या वर चढत शेवटी चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर झाले. नऊ वर्षं ते या पदावर होते. 

या पुस्तकात त्यांचं बालपण, आई वडिलांनी केलेले संस्कार, इंग्लंड मधल्या शिक्षणाच्या वेळीही मौजमजेचं आयुष्य याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. टिस्कोत लागल्यावर ते सर्वांशी सहज मैत्री करत; आपुलकीने वागत; कामगारांचे प्रश्न समजून सहृदयतेने निर्णय घेत. कामगारांकडे एक "संसाधन"(अ‍ॅसेट) म्हणून बघणे जे त्याकाळात दुर्मीळ होते- ते त्यांनी केल्यामुळेच कामगारवर्गाशी त्यांचे सूर जुळले. कंपनीतील वातावरण चांगले आणि उत्पादक राहिले आणि त्यातून आपोआप कंपनीची भरभराट झाली. या विषयीचे अनेक प्रसंग पुस्तकात वाचायला मिळतात.

कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर टाटा व्यवस्थापनाशी झालेल्या वादामुळे त्यांना कंपनी सोडावी लागली. त्या प्रकरणाच्या अतिशय विस्तृत चित्रणातून इतक्या मोठ्या उद्योगातील इतक्या मोठ्या हुद्द्यावरही राजकारण कसं चालतं, अहंकारंचा संघर्ष कसा होतो, कायदेशीर डावपेच आणि माध्यमांना हाताशी धरून बातम्या पेरून वातावरण निर्मिती कशी होते हे आपल्या लक्षात येतं. 

टिस्कोतून बाहेर पडल्यावर - वयाच्या ७५ व्या वर्षीही- ते नवनवी आव्हाने स्वीकारत राहिले. नवीन कंपनी सुरू केली. एअर इंडीया व इंडियन एअरलाईन्सचे प्रमुख म्हणून त्यांना सरकारने नेमलं. आपला दांडगा अनुभव व कौशल्य पणाला लावून आपल्या पद्धतीने निर्णय घेत या कंपन्या सुधारण्याचा प्रयत्न केला. पण एकूणच सरकारी हस्तक्षेत, खासदारांचे राजकारण, नोकरशाही चा अडेलतट्टू पणा यामुळे त्यांचे हात बांधले गेले. नाईलाजाने त्यांनी राजिनामा दिला. पुस्तकातले एक प्रकरण या "प्रकरणावर" आहे.

पुस्तकात रुसींची जगण्याचा बऱ्याच पैलूंविषयीची मतं आपल्याला कळतात - आनंदी कसं जगावं, दुसऱ्याशी संवाद साधण्याचे फायदे, भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या दुरवस्थेची कारणं,  एक कल्याणकारी हुकुमशाही भारताला कशी आवश्यक आहे इ.

असा एकूण या पुस्तकाचा अवाका आहे. २०० पानी हे पुस्तक मात्र अपूर्णच वाटतं. रुसींच्या त्रेपन्न वर्षांच्या टिस्कोतल्या वाटचालीत त्यांचे कामगारांशी संबंध कसे होते याचेच अनेक प्रसंग आहेत. पण एक अधिकारी-प्रमुख म्हणून त्यांच्या इतर पैलूंवर फार भाष्य नाही. कंपनी पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानविषयक काय निर्णय घेतले; सरकारशी, प्रतिस्पर्ध्यांशी, ग्राहकांशी कसे संबंध होते याबद्दल काहीच नाही. ज्या दोन वादग्रस्त प्रकरणांचा उल्लेख वर केला आहे त्यातही रुसींची बाजू फक्त नीट मांडलेली आहे आणि विरुद्ध बाजूने काय लिहिले-बोलले गेले आहे हे लिहिलंय. पण ते तसं का झालं याचा कानोसा घ्यायचाही प्रयत्न नाही. त्यामुळे चित्रण एकांगी वाटतं.

रुसींचा स्वभाव मनस्वी, मनःपूत वागणाऱ्या श्रीमंती राजकुमाराला शोभेल असाच आहे. त्यांचं वागणं अनैतिक नसेलही पण स्वतःचं म्हणणं रेटण्याच्या वृत्तीचे वाईट परीणामही झाले असतील. या नकारात्मक, चुकीच्या किंवा दोषस्वरूप बाजूची फार चर्चा नाही. जे उल्लेख आहेत तेही, ती बाजूही उजळ करून दाखवायच्या भाषेत लिहिलेली. त्यांच्या वैयक्तीक आयुष्याचे उल्लेखही ओझरतेच. त्यांचा घटस्फोट झाला तरीही त्यांची पत्नी आणि ते मैत्रीच्या नात्याने वागत होते असे उलेख आहेत. कामगारांच्या संदर्भात रुसींच्यातलामाणूस दाखवाणरा लेखक खाजगी आयुश्यातला माणूस दाखवायचं मात्र सरळ टाळतो. 

म्हणून मी पहिल्या परिच्छेदात लिहिलं तसं हे रुसी मोदी यांच्या विषयीचे हे पुस्तक आहे; चरित्र वाटत नाही - स्तुतिगाथा वाटते.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

ययाति (Yayati)





पुस्तक : ययाति (Yayati)
लेखक : वि.स. खांडेकर (V.S. Khandekar) 
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ४१९

मराठीतील श्रेष्ठ लेखक वि.स. खांडेकर यांच्या "ययाती" या कादंबरीला "साहित्य अकादमी" चा पुरस्कार मिळलेला आहे. ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. पुस्तकातील माहितीनुसार प्रथमावृत्ती १९५९ सालची आहे. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत कितीतरी वाचकांनी, मान्यवर लेखकांनी, समीक्षकांनी याबद्दल खूप काही लिहून ठेवलं असेल. आता त्यात नव्याने मी काही सांगावं अशी शक्यता नाही आणि तितका माझा अधिकारही नाही. तरी, मी पुस्तक वाचले, मला आवडले हे सांगायचा मोह आवरत नाही म्हणून हे परीक्षण. थोडक्यातच लिहिलेले. 

सुखलोलूप ययाती, अहंकारी देवयानी, प्रेमळ शर्मिष्ठा, कोपिष्ट शुक्राचार्य, शूर-धीर-त्यागी पुरू, संन्यासाश्रमाच्या अतिरेकातून विकृत झालेला यती, संन्यस्त तरीही जीवनातील द्वैत-संघर्ष-सौंदर्य यांचा समंजस स्वीकार करणारा कच या या कादंबरीच्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. 

संसारात पैसा, कामवासना सुखं या सगळ्यांपासून असमंजसपणे पळून जाणारा, प्रत्येक सुख म्हणजे पाप आहे असं समजणारा यती विकृतीचं एक टोक आहे तर फक्त सर्वसुखोपभोग म्हणजेच आयुष्य असं मानणारा ययाती हे विकृतीचं दुसरं टोक. आयुष्यभर कामवासनांचा भोग घेत ययाती जगतो आहे. एका शापामुळे त्याला वार्धक्क्य येतं तेव्हाही स्वतःच्या मुलाचं तारुण्य उसनं मागून कामसुख मिळवत राहण्याइतका तो विषयांच्या आहारी गेलेला होता. इतकं होऊनंही जाणवणारी अतृप्ती, सगळ्या सुखसोयी हाताशी असूनही आपण सुखी नाही ही जाणीव आणि वार्धक्क्याची-मरणाची भीती ययातीला कुरतडते आहे.
स्वतःचे सौंदर्य आणि वडील शुक्राचार्य यांच्या तपःसामर्थ्याबद्दलचा अतिगर्व, अहंकार यामुळे स्वतः आणि दुसऱ्यालाही मानसिक त्रास, अपूर्णता वाटण्यात आयुष्य घालवणारी अशी देवयानी आहे. 
प्रेम हे फक्त शारिरिक नाही तर मनाने, बुद्धीनेही एकमेकांचा स्वीकार करणं आवश्यक आहे, प्रेमात दुसऱ्याकडून फक्त सुखं मिळवणं अपेक्षित नाही तर दुसऱ्यासाठी त्यागही करावा लागतो हे शर्मिष्ठेला कळतं म्हणून ययातीवरील प्रेमापोटी ती विरह-विजनवासही सहन करते. 

एका पौराणिक उपकथानकाचा आधार घेऊन लेखकाने स्वतः ही कादंबरी रचली आहेत. स्वप्रतिभेने असंख्य पात्रं रचली आहेत. कादंबरीच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत उत्सुकता कायम राहते. कादंबरीतील पात्रं स्वगत सांगताना परस्परविरोधी भूमिका मांडतात. त्यांच्या या वाद-संवादातून लेखक आपल्यासमोर एक तत्त्विक चर्चाच उभी करतो. जीवनातलं सुख-दुःख, प्रेम-वासना, आयुष्याचा आनंद घेणं- त्यामध्ये वाहून जाणं याबद्दल ही उद्बोधक चर्चा आहे. लेखकाचं वैशिष्ट्य असं की ही चर्चा कथेच्या ओघात येते, पात्रांच्या सहज संवादात येते, चर्चा नीरस होत नाहीच उलट कथानक पुढे घेऊन जायला, प्रसंगाची परिणामकारकता वाढवायलाच मदत करते.

पुस्तकाच्या शेवटी खांडेकरांनी या कादंबरीची कल्पना त्यांना कशी मिळली, अनेक वर्षं त्यावर विचार, अभ्यास करून शेवटी प्रत्यक्ष लेखनाकडे ते कसे वळले, कथा पौराणिक असली तरी ति आजच्या जगातली प्रासंगिकता याबद्दल भाष्य केलं आहे. 

पुस्तकातील कितीतरी वाक्य सुभाषितांसारखी किंवा नित्यसत्यवचनं असावीत अशी आहेत. अगदी टिपून ठेवावीत अशीच. 
मी काही वाक्य इथे देणार होतो. पण संदर्भाला सोडून वाक्य देण्यात स्वतःचा "गटणे" व्हायचा; म्हणून तो मोह टाळला आहे. ती वाक्ये, चर्चा आणि नाट्य प्रत्यक्ष कादंबरी वाचूनच अनुभवण्यात, समजण्यात मजा आहे. ती तुम्ही नक्की घ्या.


"ययाती" बद्दल हिंदी विकिपिडिया वर छान श्लोक मिळाला
विषय वासना से तृप्ति न मिलने पर उन्हें (ययाती)उनसे घृणा हो गई और उन्हों ने पुरु की युवावस्था वापस लौटा कर वैराग्य धारण कर लिया। ययाति को वास्तविकता का ज्ञान प्राप्त हुआ और उन्होने कहा-

भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः
तपो न तप्तं वयमेव तप्ताः।
कालो न यातो वयमेव याताः
तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः ॥
अर्थात, हमने भोग नहीं भुगते, बल्कि भोगों ने ही हमें भुगता है; हमने तप नहीं किया, बल्कि हम स्वयं ही तप्त हो गये हैं; काल समाप्त नहीं हुआ हम ही समाप्त हो गये; तृष्णा जीर्ण नहीं हुई, पर हम ही जीर्ण हुए हैं !


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)






पुस्तक :- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbUl-kaMdAhArakaDIl kathA)
लेखक :- प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
भाषा :- मराठी (Marathi)
पाने :- २००

"प्रतिभा रानडे" हे नाव पाकिस्तान, काश्मीर या संदर्भातल्या लेखांमध्ये वाचले होते. पण त्यांचे पुस्तक पहिल्यांदाच वाचले. लेखिकेने स्वतः अफगाणिस्तानात वास्तव्य केले होते. त्याकाळात त्यांना अफगाणिस्तान आणि अफगाणी समाजजीवन जवळून पहायला मिळाले. त्याच्याच कथा या पुस्तकात आहेत. पुस्तकाच्या छोटेखानी प्रस्तावा वाचली तरी लेखिकेची भूमिका आणि या पुस्तकात काय आहे हे लगेच कळेल.


या पुस्तकात पुढील कथा आहेत.


७० च्या दशकात कम्युनिझमचा आणि रशियाचा प्रभाव अफगाणात वाढत होता. रशियाला हवा तसा अफगाणिस्तान घडावा म्हणून रशियन तंत्रज्ञ आणि पैसा अफगाणात ओतला जात होता. रस्ते, रेल्वेमार्ग रशियाला सोयीचं सोयीचे बनवले होते. त्याला काटशह म्हणून अमेरिका आणि इतर युरोपियन देशही अफगाणला तशीच मदत करत होते. पण त्यातून विकास होतच नव्हता. अफगाणला खेळणं म्हणून वापरलं जात होतं. त्यातूनच राजसत्ता उलथवून टाकण्यात आली. आणि सुरू झाले अस्थैर्याचे राजकारण. एका नेत्याला हटवून-मारून दुसऱ्याने सत्ता काबीज करायची. जुन्या सत्ताधीशाला भांडवलशाही, भ्रष्ट, देशद्रोही ठरवून त्याच्या समर्थकांना तुरुंगात टाकायचं, ठार करायचं हा नेमच झाला. परकीय शक्तींचं राजकारण आणि अस्थीर वातावरणात आपल्याच देशात निर्वासितासारखे जीवन अफगाणांना जगायला लागत होते. बदलणाऱ्या निष्ठांमुळे माणसे दिग्मूढ झाली होती. 
या कालखंडाचं वर्णन आहे - "अन्वर सलीम", "खुणा दिसू देऊ नका" या कथांत. तर या घटनांचा परीणाम तिथल्या स्त्रियांवर कसा होत होता हे "नूर ब्यूटिपार्लर", "सरहद्द", "इन्साफ" या कथांत आहे. सत्ता येतात-जातात, स्वकीयांच्या-परकीयांच्या पण प्रत्येक बदलात सर्वात भराडली जाते ती स्त्री, कुळाचा मान म्हणून स्त्रीकडे बघितलं जातं. म्हणूनच दुसऱ्याचा सर्वात मोठा अपमान म्हणजे शत्रूस्त्रियांची विटंबना. या मान-अपमान, सामाजिक व कौटुंबिय ससेहोलपटीच्या या कथा आहेत. 

"शेवटचा माणूस" या कथेत आपण अफगाणच्या या आधिच्या इतिहासात जातो. इस्लामी आक्रमणपूर्वी अफगाणिस्थानात बौद्ध धर्म प्रचलित होता. बामियान - जेथील प्रचंड बुद्ध मूर्ती तालिबानने फोडलेली- ही याचीच साक्ष आहे. "नंदग्रहार" येथील बौद्ध मठात देखील एक नांदते तीर्थक्षेत्र होते. या तीर्थक्षेत्रावर इस्लामी वरवंटा फिरला. महंमद घोरीने आक्रमण करून मठ लुटून नेला. त्यावेळी त्या मठवासींची, मठाधिपतींची अवस्था कशी झाली असेल ? अहिंसेचे तत्वज्ञान आणि आक्रमकांची क्रूर धर्मांधता याची गाठ पडल्यावर काय झाले असेल? याचे मनोज्ञ चित्रण या कथेत आहे. 

पानिपतच्या युद्धानंतर परत जाताना अहमदशहा अब्दाली मराठी माणसे-स्त्रियांना गुलाम म्हणून घेऊन गेला होता. त्यातली एक सरदारस्त्री त्याने गुलाम म्हणून न विकता तिथल्या हिंदू सरदाराला भेट दिली होती. त्याने तिच्याशी लग्न केले. या इतिहासाची कहाणी तिचा वंशज संगतो आहे "पानिपतचे शेवटचे प्रकरण"मध्ये.

"लिहायची राहून गेलेली एक कादंबरी", "बलबीरसिंगची न लिहिलेली गोष्ट" हे दोन लेख आहेत. 
अफगाणातील गझनीच्या मुहंमदाने सोमनाथ मंदीर सतरा वेळा लुटले आणि अगणित संपत्ती घेऊन परत गेला. त्याबद्दल एक कथाबीज लेखिकेला सुचते; की वाटेतल्या लुटारू टोळ्यांपसून ही संपत्ती वाचवत, जपत नेताना कदाचित ती संपत्ती वाटेत त्याने लपवूनही ठेवली असेल. ती संपत्ती खूप वर्षांनी सध्याच्या काळात मिळते. या कथाबीजावर काम करताना इतिहासचे अनवट पैलू हाती लागतात. वेगळ्या वेगळ्या अंगांनी विचार होतो. त्याबद्दलचा "लिहायची राहून गेलेली एक कादंबरी" लेख आहे. 

बलबीरसिंग नावाचे भारतीय हॉकी प्रशिक्षक अफगाणी खेळाडूंना तयार करण्यासाठी भारतातर्फे गेले होते. ते व त्यांच्या टीमवर मुजाहिदीन लोकांनी हल्ला करून सर्वांना ठार मारले. घटनेची फार वाच्यता होऊ नये म्हणून अफगाण आणि भारत सरकारही ही घटना नाकारत राहिले. बलबीरसिंग बेपत्ता आहेत असे सांगत राहिले. हे सगळं बघून बलबीरसिंगांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा विचार लेखिका करू लागते. बलबीरसिंगाचे कल्पनाचित्र मनात येताना या भावना फक्त त्यांच्याच नाहीत तर नोकरीधंद्यासाठी अफगाणिस्तानात; परक्या जमिनीवर राहणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्याच आहेत हा अस्वस्थ करणारा विचार लेखिकेच्या मनात चमकून जातो.

या सगळ्या गोष्टी रसाळ आहेत. पूर्णपणे काल्पनिक नसल्यामुळे या गोष्टी इतिहासातल्या, समाजातल्या, आंतरराष्ट्रीय संबंधांमधल्या, मुसलमानी रिवाजांच्या वेगवेगळ्या कंगोरेही दाखवतात. उदा. अफगाणात रेल्वेसाठी विविध देश मदत करत असतात पण प्रत्यक्षात या ना त्या कारणमुळे काम पुढे जातच नसतं. तेव्हा एक परदेशी व्यक्ती म्हणते "तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची इच्छा असलेल्या तुमच्या मित्रांना-इराणला, पाकिस्तानला आणि रशियालाही ही रेल्वे नकोय. तुमच्या सरकारलाही नकोय. त्यांना वाटतं या दुष्ट रेल्वेमुळे तुमचा हा निरागस भोळाभाबडा देश बाहेरच्या जगाच्या सान्निध्यात येईल आणि बिघडेल. नकोच ती रेल्वे".
रमजानच्या महिन्यात रोजे पाळतात म्हणून ऑफिसेस लवकर सुटतात. पण दिवसभरही कोणी फार काम करत नाही असा अनुभव एका परदेशी तंत्रज्ञाला येतो. तेव्हा तो एका माणसाला वैतागून विचारतो की "सकाळी ऑफिस सुरु  झाल्या झाल्या आलो तरी सगळी माणसे मरगळलेलीच. इतक्या सकाळी तर तुमचा उपाशीपणा सुरूही झालेला नसतो न". तेव्हा तो अफगाणी म्हणतो, "खरं सांगू का, प्रत्यक्ष उपासमारीपेक्षाही आमच्या मनावर त्या उपासाचं मानसिक दडपण फार येतं.."

आज अफगाण म्हणजे एक उद्ध्वस्त देश आहे पण त्याकाळी काबुल युनिव्हर्सिटी होती, तरुण मुले शिकायला परदेशात जात होती, काबुलचा बाजार अमेरिकन, रशियन, फ्रेंच मालाने भरलेला होता; अफगाण स्त्रियाही सध्याच्या तुलनेत फारच मॉडर्न आणि मोकळ्या राहत होत्या, उंची कपडे, सौंदर्यप्रसाधने वापरत होत्या. देश इस्लामिकच होता पण आजच्या सारखा मूलतत्त्ववादी नव्हता. हे वाचून राजकारणाने एका देशाची कशी वाट लावली आहे हे तथ्य अस्वस्थ करते.

मराठे ज्याच्याशी पानिपतचे युद्ध लढले तो अहमदशहा हा अफगणचा राष्ट्रपुरुष आहे. त्याचा उल्लेख आदराने "अहमदशहाबाबा" असा केला जातो.

महंमद धोरी, गझनीचा मुहंमद यांच्या स्वाऱ्या आणि त्यांनी केलेला विध्वंस याबद्दल वाचताना आजच्या "आयसिस"ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. इस्लामी धर्मांधता, दुसऱ्या धर्मियांचा नाश करण्याची शिकवण पालणारे मूलतत्ववादी आजही सक्रिय आहेत, तितकीच शक्तिशाली आहेत आणि त्याचा धोका आजही सहिष्णू-शंतताप्रेमी-अहिंसावादी भारतावर आहे हे भीषण वास्तव अधोरेखित होते.







------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------


If God Was A Banker (इफ गॉड वॉज अ बँकर)




पुस्तक :  If God Was A Banker (इफ गॉड वॉज अ बँकर)
लेखक : Ravi Subramanian ( रवी सुब्रमण्यन )
भाषा : English (इंग्रजी)
पाने : २६०

"इफ गॉड वॉज अ बँकर" ही बँकिंग क्षेत्राविषयीची कादंबरी आहे. ऐंशीच्या दशकात न्यूयॉर्क इंटरनॅशनल बँकेने(एन.वाय.बी) नुकतेच भारतात पदार्पण केलेले असते. त्या काळात जुन्याच पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या सरकारी बँकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करून एन.वाय.बीला पुढे जायचे असते. अशावेळी "ट्रेनी" म्हणून संदीप आणि स्वामी हे दोन आय.आय.एम पदवीधर तरूण बँकेत कामाला लागतात. बँकेचे तेव्हाचे प्रमुख आदित्य यांना या दोघांमधली बुद्धिमत्तेची चुणुक दिसते. ते या दोघांना घेऊन नवीन संकल्पना राबवून बँकेचा व्यवसाय वाढवू लागतात. अशाप्रकारे सुरुवातीपासूनच दोघांच्या यशस्वी वाटचलीला सुरुवात होते. हाच यशाचा प्रवास पुढे कसा होतो, कशी अनपेक्षित आणि धोक्याची वळणं घेत जातो हे उलगडून दाखवणारी ही कादंबरी आहे.

संदीप आणि स्वामी दोघेही हुशार, कष्टाळू पण यश मिळवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याचा सारासार विचार स्वामीकडे आहे तो संदीपकडे नाही. स्वामी स्वतःच्या कार्यक्षमतेच्या बळावर १०-१२ वर्षांत मोठ्या पदावर जातो. संदीपही तेथे पोचतो. पण अधिक वेगाने. "वेगळ्याच" वाटेने. आपणच नेहमी जिंकलं पाहिजे ह्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपुढे योग्य काय अयोग्य काय हे हळूहळू तो विसरायला लागतो. त्याच सुमारास बँकेबाहेरचा पण बँकेतल्या अनेकांशी हितसंबंध जोडलेला नरेश त्याच्या आयुष्यात येतो. संदीपच्या व्यावसायिक यशाच्या चढणीला आणि नैतिक घसरणीला सुरुवात होते. स्वतःला मिळणाऱ्या मलिद्याच्या बदल्यात नरेश संदीपला अनेक डील्स मिळवून देतो; मॅनेजमेंटकडून हव्या त्या बढत्या मिळवून देतो, आणि अनैतिक शरीरसुखाचे चोचलेही पुरवतो. स्वतःच्या अधिकाराने आंधळा झालेल संदीप अपल्या महिला सहकाऱ्यांशीही अनैतिक वागयाला पुढेमागे पहत नाही. आदित्य त्याला सुधारण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना यश येत नाही. 

याहून अधिक लिहणं म्हणजे पुस्तकातले प्रसंग लिहून लेखकावर अन्याय केल्यासारखं होईल आणि तुमचाही रसभंग होईल.

संदीपचा हा प्रवास; हळूहळू निगरगट्ट होत जाणं, त्याला बँकेतल्या समप्रवृत्तीच्या लोकांकडून मिळणारी साथ, हे सगळे गैरव्यवहार उघडकीस येतात का आणि कसे; मग त्याचं काय होतं; हे जाणून घ्यायचं तर ही कादंबरी वाचायला हवी. कादंबरीची भाषा साधी सरळ, नवी आणि फ्लॅशबॅक तंत्र परिणामकारक आहे. पुढे काय होतंय याची उत्कंठा वाचताना सारखी राहते. कॉर्पोरेट जगतातल्या चांगल्यावाईट जागांमधून लेखक आपल्याला फिरवून आणतो. लेखकबरोबरची ही भटकंती मला खूप आवडली. तुम्हालाही नक्की आवडेल. 

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...