शब्दरंग (shabdrang)




पुस्तक : शब्दरंग  (shabdrang)

लेखिका : सत्त्वशीला सामंत (Sattwasheela Samant)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १५३
ISBN : 978-81-8483-606-6

ज्यांना "भाषा" हा विषय आवडतो त्यांच्यासाठी भाषा हे फक्त "संवादाचं माध्यम" नसतं तर जिच्याशी संवाद साधायचाय ती व्यक्ती सुद्धा "भाषा" असते. अशा भाषाप्रेमींना भाषेतल्या शब्दांचे अर्थ आणि शुद्धलेखनाचे नियम यांच्यापलिकडे जाऊन,  शब्दांशी हितगुज करून त्यांचं कूळ-मूळ शोधायची इच्छा असते. त्यांना शब्दांच्या, अर्थांच्या, अक्षरांच्या फेरफारीमुळे होणाऱ्या बदलांचीसुद्धा गंमत वाटते. अश्याचप्रकारे मराठीतल्या शब्दांची व्युपत्ती आणि त्यातल्या गमतीजमती सत्त्वशीला सामंत यांनी या पुस्तकात समजावून सांगितल्या आहेत. लोकप्रभा सापताहिकात २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे.


सत्त्वशीला सामंत हे नाव मराठीत सुपरिचित आहेच. त्यांची पुस्तकात दिलेली ओळख :





मराठी भाषेचा प्रवास ढोबळमानाने संस्कृत - प्राकृत - ऐतिहासिक मराठी - आधुनिक मराठी असा झाला असं आपण म्हणतो. मोगली राजवटीमुळे फारसी, उर्दू भाषांचा प्रभाव मराठीवर पडला. शेजारच्या राज्यांच्या गुजराती, कानडी, हिंदी भाषांशीही मराठीचा संगम झाला. त्यांच्यातले काही शब्द, लकबी मराठी समाजानेही आत्मसात केल्या. एका काचेच्या भांड्यात पाणी ठेवले आणि त्यात रंगाचा थेंब टाकला की ते मिश्रण तयार होताना वेगवेगळे आकार आपल्याला दिसतात. त्याप्रमाणे दोन भाषा एकमेकांत मिसळताना नाना प्रकारचे आकार पाहिला मिळतात. काही वेळा शब्दामधलं अक्षर बदलतं, तर काही वेळा नवीन अक्षर घुसतं. काहीवेळा शब्द जसाच्या तसा स्वीकारला जातो तर कधी अर्थाची पूर्ण उलटापालट होते. कधी नामाचं लिंग बदलून शब्द दुसऱ्या भाषेत घुसतो. हे असं का झालं, कधी झालं हे सांगणं कठीण आहे. जे रूपांतर एका शब्दात झालं तसंच ते दुसऱ्या शब्दात होईलच असं नाही. पण तरीही या बदलाची व्याकरणाच्या परिभाषेत वर्गवारी करणं शक्य आहे. अशी वर्गवारी या पुस्तकात केली आहे आणि प्रत्येक प्रकारासाठी एकेक लेख आहे.


अनुक्रमणिका :





प्रत्येक लेखात व्याकरणातली संकल्पनेची ढोबळ व्याख्या सांगून त्याची उदाहरणे मराठीत कशी दिसतात ते स्पष्ट केलं आहे. उदा. "आवळे-जावळे वर्ण"विषयी लेखांत अक्षरांची (वर्णांची) अदलाबदल कशी होते हे "य-ज","ड-र","ड-ल","र-ल" या अक्षरांच्या जोड्या घेऊन स्पष्ट केलं आहे.



काहीवेळा संस्कृत, प्राकृत यातून मराठीत शब्द येताना अक्षरेच गाळली गेली. त्याला वर्णलोप म्हणतात. पहिले अक्षर गाळले गेले तर आदिवर्णलोप, शेवटचे अक्षर गाळले गेले तर मध्यवर्णलोप इ. सगळे प्रकार वेगवेगळ्या लेखात समजावून सांगितले आहेत. आदिवर्णलोपाचे हे पान बघा.



वर्ण गाळले जातात तसे काहीवेळा शब्दातल्या अक्षरांचे जोडाक्षर होऊन शब्दात बदल होतो. हे पहा :



मराठी, संस्कृत मध्ये तीन लिंग आहेत - पुलिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. हिंदीत दोनच आहेत. हिंदीवर फारसीचा परिणाम आहे. त्यामुळे हिंदीचे संस्कृतीकरण करण्यात आले तेव्हा नामे संस्कृतमधली पण त्यांची लिंगे फारसीप्रमाणे यामुळे कशी गडबड झाली आहे ते वाचा:



मराठीतही काही शब्द उभयलिंगी आहेत. आपण अगदी सहजपणे एकच शब्द दोन्ही पद्धतीने शब्द वापरतो. पण लेखिकेने ते असं ते आपल्यासमोर मांडलं की आपली आपल्यालाच गंमत वाटते.


साठच्या दशकात नवीन शुद्धलेखन नियमांमध्ये अनुच्चारित/अस्प्ष्टोच्चारित अनुस्वार गाळावेत असा नियम आहे. त्यामुळे लेखन सोपं झालं हे खरं, पण या अनुस्वारांअभावी कधी एकाच वाक्याचे दोन अर्थ निघू शकतात. वाचणाऱ्याचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे हा नियम चुकीचा आहे असं लेखिकेचं म्हणणं आहे. हे नियम अस्तित्वात येण्याआधीचं मराठी लिखाण तरी पूर्वीच्या पद्धतीनेच लिहिलं पाहिजे म्हणजे त्या काव्यांचा, लेखनाचा चुकीचा अर्थ नवीन पिढी घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी पुस्तकात दिलेल्या नमुन्यांपैकी एक.





शब्दांचा हा प्रवास, त्याप्रवासात त्यातल्या अक्षरांनी मारलेल्या उड्या, त्यांचे रुसवे फुगवे, परभाषेतल्या शब्दांना आपलेसे करताना त्यांच्या मराठीकरणाची प्रक्रिया हे वाचणं, ज्ञानवर्धक आणि तितकंच मनोरंजकही आहे. ज्याला आपण शुद्ध मराठी शब्द समजत होतो तो पण असा मूळ परकीयच असावा या ज्ञानातून रोजच्या वापरातल्या शब्दांकडे बघण्याची वेगळी दृष्टीकोन देणारं आहे. आपल्यालाही शब्दांशी खेळायला, त्यांच्या आत डोकावून बघायला उद्युक्त करणारं पुस्तक आहे.  व्याकरणाच्या संकल्पनांवर आधारित स्पष्टीकरण असल्यामुळे एखाद्या संदर्भ पुस्तिकेसारखा त्याचा वापर पुन्हा पुन्हा होऊ शकतो. त्यामुळे पुस्तक फक्त वाचनीयच नाही तर संग्राह्य सुद्धा आहे




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

Why I am a Hindu (व्हाय आय अ‍ॅम अ हिंदू)




पुस्तक : Why I am a Hindu (व्हाय आय अ‍ॅम अ हिंदू)
लेखक : Shashi Tharoor (शशी थरूर)
भाषा : English इंग्रजी
पाने : ३०२
ISBN : 978-93-86021-10-6

काँग्रेसचे खासदार, विद्वान आणि वादग्रस्त नेते शशी थरूर यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्व यावर या पुस्तकातून भाष्य केले आहे. 
शशी थरूर यांच्याबद्दल पुस्तकात दिलेली माहिती :


पुस्तकाचे दोन भाग आहेत पहिला भाग हिंदूधर्म किंवा हिंदू संस्कृती यांना वाहिलेला आहे; तर दुसऱ्या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपप्रणित हिंदुत्वाच्या राजकारणाचा विचार केलेला आहे.

अनुक्रमणिका:

लेखक पुस्तकाची सुरुवात "मी हिंदू का आहे" या प्रश्नापासून करतो. त्याचे उत्तर "तो हिंदू कुटुंबात जन्माला आला म्हणून तो हिंदू आहे" असे आहे. त्याला लहानपणी  धर्माची ओळख कशी झाली;  त्यांच्या घरात खुलं वातावरण कसं होतं; तीर्थयात्रा-देवपुजा हे सगळं चालू असतानाही प्रथापरंपरांबद्दल खुलेपणा कसा होता; त्यामुळे धर्माकडे बघण्याची मोकळी दृष्‍टी, चिकित्सक वृत्ती त्याच्यात आली हे त्याने सांगितलं आहे. 

मग तो हिंदू आहे म्हणजे नक्की काय? किंवा इतर कुठलीही व्यक्ती स्वतःला हिंदू म्हणते म्हणजे काय? या प्रश्नावर प्रदीर्घ चिंतन सुरू होतं. हिंदू धर्माचा एकच एक प्रेषित नाही, संस्थापक नाही. हिंदू धर्माचा एकच एक सर्वमान्य ग्रंथ नाही की एकच एक देवता नाही. एकच एक उपासनापद्धती नाही. त्यामुळे हिंदू असणाची व्याख्या करणे कसं कठीण आहे हे लेखकाने सुस्पष्ट केलेलं आहे. हिंदु धर्माच्या प्रत्येक अंगाचा सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे. हिंदूंमध्ये वेगवेगळ्या देवता आहेत पण तरीही हिंदू धर्मीय एकाच एक परमेश्वराला असे मानतात आणि त्या अर्थी ते एकेश्वरवादी कसे आहेत हे तथ्य विशद केलं आहे.



हिंदूंचा उपासना पद्धती किती वेगवेगळ्या आहेत, किती परस्परविरोधी आहेत आणि त्यामुळे ते सर्वसमावेशक आहेत हे मांडले. हिंदू धर्माचा विस्तार होताना स्थानिक आदिवासी प्रथांचाही त्यात सहज समावेश झाला. त्याभोवती आवश्यक ती कथा-संकल्पना यांची मांडणी करून हिंदू संस्कृतीशी समरस झाल्या. वेद, उपनिषदे, रामायण-महाभारत, भगवद्गीता या ग्रंथांमध्ये श्रुती-स्मृती-पुराण-इतिहास हे चार प्रकार कसे केले जातात; धार्मिक निवाडा करताना त्यांचे प्रमाण कसे मानले जाते; काही स्मृती परस्परविरोधी कशा आहेत आणि स्मृती मधल्या नियमांमध्ये वेळोवेळी कसे बदल केले गेले हा इतिहास सुद्धा सांगितला आहे. हिंदू धर्माच्या रूढी-परंपरांवर प्रश्न विचारणारे त्यात बदल घडवू पाहणारे बौद्ध, जैन तत्वज्ञान आणि त्याचा झालेला परिणाम याचा गोषवारा आहे.

उदा. धर्मग्रंथांकडे बघण्याचा हिंदूंचा दृष्टिकोन या बद्दल


जेव्हा मुसलमानी आक्रमणाच्या वेळी देवळांचा विध्वंसक काही प्रमाणात झाला, खुलेपणाने धर्माचरण करणं कठीण झालं अशावेळी भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून कर्मकांड विरहित धर्मपद्धती कशी मांडली गेली आणि त्यातून हिंदू धर्म कसा टिकला याचे सुंदर विश्लेषण केलेला आहे.



लेखकाने हिंदू धर्मातल्या जातिव्यवस्थेवर काही विचार मांडले आहेत. त्याचं असं म्हणणं आहे की ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी या समाजाला प्प्यांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यातून जातीव्यवस्था आज दिसते तशी रूढ झाली. त्याआधी ती तशी नव्हती. लेखकाच्या दुसर्‍या एका पुस्तकात त्यावर त्यांनी सविस्तर लिहिले आहे.

जन्म-मृत्यू पुनर्जन्म, मागच्या जन्मातल्या पापपुण्यामुळे या जन्मात मिळणारी सुखदुःखे याच्यामागे काय तर्क असेल? ते खरंच ऋषींनी मांडलेलं तत्त्वज्ञान असेल का उच्चवर्णीयांनी मांडलेलं तत्त्वज्ञान असेल याबद्दल थोडी चर्चा आहे.

ज्यांनी हिंदू धर्मावरती मोठा प्रभाव टाकला; हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे काम केलं असे आदिशंकराचार्य, संत रामानुज, आधुनिक सुधारक राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची चांगली ओळख करून दिली आहे. महात्मा गांधींचा धर्मविचार, गोहत्येला विरोध असूनही गोहत्याबंदी लादण्याला विरोध हे समजावून सांगितले आहे. 

एकूणच पुस्तकाच्या पहिल्या भागात हिंदू तत्वज्ञान हिंदू संस्कृती यांचं मोठेपण सर्वसमावेशकता यांचा गौरव सप्रमाण आणि सोदाहरण केलेला आहे.

पुस्तकाचा दुसरा भाग हिंदुत्व आणि त्यावर आधारित रा. स्व. संघ, जनसंघ आणि भाजप यांचे राजकारण राजकारण यांचे विश्लेषण करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाची काय संकल्पना मांडली; त्या कल्पनेत अंतर्विरोध कसे आहेत याबद्दल लेखकाने मतप्रदर्शन केले आहे. पुढे गोळवलकर गुरुजींच्या भाषणातून पुस्तकातून त्यांनी - हिंदू या देशाचे प्रथम नागरिक आणि बाकीचे दुय्यम नागरिक - ही भूमिका कशी मांडली हे समजावून दाखवून दिलं आहे. कुठलीही उपासनापद्धती गौण न मानणारा, सर्वांना सामावून घेणारा हिंदूधर्म आणि हिंदुत्व किती वेगळं आहे हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या उदाहरणातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. 

भारतीय जनता पक्ष ज्यांना अतिशय आदराचे स्थान देतो असे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जो "एकात्म मानववादाचा" सिद्धांत मांडला. त्यात ते खूप आदर्शवादी भूमिका घेतात कारण त्यावेळी जनसंघाला राजकीय स्थान नसल्यामुळे या कल्पना सत्यात उतरवण्याची जबाबदारी त्यांची नव्हती असं लेखकाचं मत पडतं. असा सिद्धांत मांडणारे उपाध्यायसुद्धा हिंद्वेतर लोकांनी हिंदू संस्कृतीशी, हिंदू जीवनपद्धतीशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे, मिसळून घेतले पाहिजे, त्याप्रमाणे वागले पाहिजे असाच आग्रह करतात असे त्याचे निरीक्षण आहे.

उपाध्यायांवरचे एक पान :



गोहत्या केल्याच्या संशयावरून व्यक्तींना झालेल्या मारहाणीच्या घटनांतून आक्रमक हिंदुत्व कसं पसरत आहे हे दाखवलं आहे. कुठलाही नवीन वैज्ञानिक शोध पुढे आला की हे ज्ञान आमच्या वेदांमध्ये आधीच आहे, आमच्या जुन्या ग्रंथांमध्ये आधीच आहे, असं सांगण्याचा काही लोक पाळतात ते कसं मूर्खपणाचं आहे. पूर्वी आपल्याकडे भरपूर ज्ञान होतं याबद्दल लेखकाचे ही दुमत नाही. त्याने स्वतःच तशी उदाहरणे दिली आहेत. पण आपल्या ज्ञानावर अधिक मेहनत न घेता केवळ वरवरचे पूर्वजांचे गोडवे गाण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली आहे.

भारतावर मुसलमानी राजवट होती, ब्रिटिश राजवट होती हे खरे आणि त्यांनी अन्याय अत्याचार केले हे देखील खरे. बाबर बाहेरून भारतात आला पण पुढच्या सगळ्या पिढ्या इथेच जन्माला आल्या आणि मेल्या. इथल्याच झाल्या. त्यांनी लुटलूट केली असेल तरी इथेच खर्च केली. आधिच्या आक्रमकांप्रमाणे आणि ब्रिटिशांप्रमाणे ती मायदेशी नेली नाही. त्यामुळे मुघल राजवटीला भारतीय राजवटच समजलं पाहिजे. असा थरूर यांचा तर्क आहे. औरंगजेबाने "काही" देवळे पाडली असतील तर ती राजकारणासाठी. बाकी अनेक देवळांना त्याने मदत केली आणि अनेक देवळे शाबूत राहिली. सामुहिक धर्मांतर फार मोठ्या प्रमाणावर झालं नाही. बहुतांश देश हिंदूच राहिला असे त्याचे निरीक्षण आहे. हिंदुत्ववादी राजकारणी त्याचे खूप आक्रस्ताळेपणाने, अतिरंजित चित्र रंगवतात असं त्याचं म्हणणं आहे. 

औरंगजेबाबद्दलचे तर्कशास्त्र :



भारतीय देवतांची नग्न चित्र काढल्याबद्दल हिंदूंच्या दबावामुळे M.F. हुसेन भारताबाहेर पळून गेला. पण अशी चित्र काढण्यात याचं काही चूक नव्हतं. भारतातच परंपरेने हिंदू देव-देवतांची वर्णनं, शिल्प यांमध्ये नग्नता, लैंगिकता अगदी खुलेपणाने आहे. धर्मभावना दुखावल्या म्हणून मुस्लिम समाज आक्रमक होतो कारण त्यांच्या धर्मात ते निषिद्ध आहे. आपल्या धर्मात असं निषिद्ध, पाखंड काही सांगितलेलं नाही. भारतीय समाज पहिल्यापासून खुला आहे. उलट त्याला हे हिंदुत्ववादी मुसलमानी शक्तीप्रमाणे बंदिस्त स्वरूप आणायचा प्रयत्न करतायेत. मुसलमानी राजवटीमुळे भारतात पडदा पद्धती आली, ब्रिटिश राजवटीमुळे स्त्री-पुरुष संबंधातल्या शुचितेच्या अनावश्यक "व्हिक्टोरियन" कल्पना भारतात घुसल्या आहेत. हा मूळ हिंदू धर्म नाही इतपत जाणीवही हिंदुत्ववाद्यांना नाही असं त्याचं ठाम मत आहे.

त्यामुळे पुस्तक वाचल्यावर पहिल्या भागात हिंदुधर्माच्या सर्व चांगल्या सकारात्मक बाजू आणि दुसर्‍या भागात हिंदुत्ववादाच्या फक्त नकारात्मक बाजू लेखकाने मांडले आहेत असं वाटतं. या दोन गोष्टींमधली महत्त्वाची कडी, महत्त्वाचा दुवा पुस्तकात राहून गेला असं वाटतं. जर हिंदू धर्म धर्मातल्या जाती व्यवस्था हा प्रकार सोडला तर त्यातल्या कमतरता वा कच्चे दुवे लेखकाने फार लक्षात घेतलेले नाहीत. स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूकीबद्दल फार चर्चा नाही. हिंदू धर्मानुयायी इतके परिपक्व होते तर शतकानुशतके परकीय आक्रमण आणि गुलामी आपल्याला का झेलावी लागली यावर चर्चा नाही. हिंदू धर्म महान आहे हे तो पुन्हा पुन्हा सांगतो. तर मग इतर मंडळी धर्मप्रसार करतात त्याप्रमाणे हिंदू धर्माचा प्रसार करायला कोणी का जाऊ नयेत्याला लेखकाचा विरोध का? असा प्रश्न आपल्याला पडतो.

तसेच दुसऱ्या भागात हिंदुत्ववाद्यांच्या फक्त नकारात्मक बाजू वर चर्चा आहे. संघ परिवारातले असंख्य स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि कितीतरी संस्था वर्षानुवर्षे शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, दारिद्र्य निर्मूलन अशा नाना क्षेत्रात काम करत आहेत. त्याची पुसटशी दखल लेखकाने घेतलेली नाही. हिंदुत्ववाद्यांना तो आक्रमक म्हणतो. पण असा आक्रमकपणा आणला पाहिजे असं सावरकर, गोळवलकर, हेडगेवार इत्यादींना का वाटलं असेल हे तो मांडत नाही. ज्या ज्या वेळी हिंदू धर्मावर दुसऱ्या तत्त्वज्ञानाचं किंवा परकीय आक्रमणाचं वादळ आलं तेव्हा हिंदू धर्माने स्वतः योग्य बदल घडवत स्वतःचं अस्तित्व टिकलं अशी संगती त्याने लावली आहे. मग त्याच न्यायाने धर्माच्या आधारावर देशाची फाळणी, स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेसच्या राजकारणाचा परिणामस्वरूप हिंदू समाजाने हे आक्रमक स्वरूप धारण केलं असेल का? हा प्रश्न तो स्वतःला, स्वतःच्या पक्षाला विचारत नाही. काही दंगलींचा पुस्तकात उल्लेख आहे त्यात तो भाजप नेत्यांची नावे अवश्य घेतो पण शिखांच्या दंगलीच्या वेळी मात्र "काँग्रेसशी संबंधित काही लोक" असा मोघम उल्लेख का?

शशी थरूर यांची राजकीय आणि वैयक्तिक मत बाजूला ठेवली तरी त्यांचा या विषयातला अभ्यास आणि व्यासंग नाकारण्यासारखा नाही. त्यांनी दिलेली माहिती, भारताच्या इतिहासात-तत्वज्ञानात झालेले बदल याची माहिती  बहुतांश हिंदू धर्मियांनाही नसते. "हिंदू म्हणजे काय" याचं उत्तर देणं सर्वसामान्यांसाठी कठीण आहेच. इतकंच काय हे उत्तर का कठीण आहे हेसुद्धा अनेकांना सांगता येणार नाही. त्यामुळे पुस्तकातून प्रत्येकाला काहीना काहीतरी नवीन माहिती मिळेल.

हिंदुत्ववाद्यांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे कारण त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचा सकारात्मक विचार करून स्वतः योग्य बदल घडवणे हेच त्या विचारधारेसाठी आणि भारतासाठी ही आवश्यक आहे.
हिंदुत्ववादाचा आंधळा विरोध करणाऱ्यांनी सुद्धा आधी हिंदू धर्म समजून घेतला पाहिजे. त्यासाठी हे पुस्तक चांगली सुरुवात ठरेल.
इतर धर्मीय लोक हिंदूंना आपल्या धर्मात घेण्यासाठी येनकेनप्रकारेण प्रयास करतात त्यांनीही हे पुस्तक वाचलं तर आपणच काय चूक करत आहोत हे त्यांना लक्षात येईल.

जाता जाता पुस्तकाच्या भाषेवर एक टिप्पणी. शशी थरूर हे खूप उच्च दर्जाचं इंग्रजी बोलण्याबद्दल, लिहिण्याबद्दल  खूप कठीण, अपरिचित शब्द वापरण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. एखादं साधं वाक्यसुद्धा ते किती क्लिष्ट पद्धतीने लिहू शकतात याचे विनोद नेहमी फिरत असतात. पण पुस्तक वाचताना फार कमीवेळा अशी विनाकारण क्लिष्टता दिसली. बरेच नवीन इंग्रजी शब्द कळले. पण कुठलंही इंग्रजी पुस्तक वाचताना ते होतंच. त्यामुळे थरूरांच्या भाषेला घाबरून कोणी हे पुस्तक न वाचायचं ठरवलं असेल तर निर्णय बदला. 

म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे आपले ज्ञान वाढवावे. हे पुस्तक वाचन हा एक चांगला बौद्धिक व्यायाम आहे.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

सती ते सरोगसी (Satee te sarogasee)



पुस्तक : सती ते सरोगसी (Satee te sarogasee)
लेखिका : मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १७६
ISBN : 978-93-86628-38-1

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे भारतातल्या महिला कायद्यात होत गेलेले बदल, सुधारणा यांचा मागोवा घेणारे हे पुस्तक आहे. ब्रिटिश राजवटीत सतीबंदीचा कायदा करण्यात आला तिथपासून २०१७ सालच्या अखेरीपर्यंतचा कालखंड यात समाविष्ट आहे. सतीबंदी, विधवापुनर्विवाहाला मान्यता, संमतीवयाचा कायदा, हिंदू विवाह कायदा, घटस्फोट आणि पोटगी, महिला आरक्षण, महिला अत्याचार प्रतिबंध अशा बऱ्याच कायद्यांचा आणि घडामोडींचा समावेश यात आहे. 

अनुक्रमणिका :


कायदा करावा लागला तेव्हा सामाजिक परिस्थिती काय होती, कायद्याच्या मागण्या कशा पुढे येत होत्या, एखादी विशिष्ट घटनेमुळे कायदा करणं कसं भाग पडलं, साधारण कायद्याचे स्वरूप काय आहे अशी माहिती पुस्तकात आहे. उदा. सतीबंदी कायदा करावा लागला तेव्हा सतीची प्रथा का पुढे आली आणि कश्या पद्धतीने अंमलात येत होती त्याबद्दल.
(फोटोंवर क्लिककरून झूम करून वाचा)




कायदे बनले तेव्हा एका झटक्यात परिपूर्ण कायदा बनला असं नाही तर वेळोवेळी कायद्यात सुधारणा करण्यात आला. त्यातल्या स्वातंत्र्यानंतर दत्तक कायदा झाला त्याच्या प्रक्रियेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती.


या पुस्तकात कायद्यांची चर्चा करताना त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचीही सविस्तर माहिती दिली आहे. उदा. विशाखा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी



शेवटच्या प्रकरणात सध्याचे कायदे, त्यांच्यातल्या कमतरता, कायद्याचा आदर्श पद्धतीने न होणारा वापर, कायद्याबद्दलची निरक्षरता यांच्यावरही प्रकाश टाकला आहे.

पुस्तकाच्या शेवटी ११ परिशिष्टे आहेत. "..तर काय करावं" हे सांगणारी ही परिशिष्टे आहेत म्हणजे अटीततीच्या प्रसंगात कायदा काय सांगतो; कायद्याची मदत घेताना काय प्राथमिक तयारी केली पाहिजे यावरची टिपणे यात आहेत.
त्यात उल्लेख झालेल्या घटना
पोलिसांची मदत घ्यायची असल्यास ...
वकील नेमण्याची वेळ आली तर ...
कोर्टात खेचण्याची धमकी कोणी देत असल्यास ...
बलात्काराचा प्रसं ओढवल्यास ... इ.
एक उदाहरण


अश्याप्रकारे माहितीने भरलेलं असे हे पुस्तक आहे. कायद्याची साक्षरता वाढवण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने हे वाचलेच पाहिजे.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

आरोग्य ज्ञानेश्वरी दिवाळी अंक २०१९ (Arogya Dnyaneshvari Diwali Edition 2019)



दिवाळी अंक : आरोग्य ज्ञानेश्वरी दिवाळी अंक २०१९
भाषा : मराठी
पाने : ८४
ISBN : दिलेला नाही
किंमत : १५० /-
मोफत पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

दिवाळी अंकाच्या नावावरूनच लक्षात आलं असेल की हा आरोग्य, योग्य आहार, व्यायाम, जीवनशैली यांच्याशी निगडित दिवाळी अंक आहे. 
अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.
फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा.


मुखपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे हा कथा विशेषांक आहे म्हणजे यातल्या लेखांना गोष्टी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा प्रयत्न खूप यशस्वी झाला आहे असं म्हणता येत नाही. लेखांची सुरुवात एखाद्या गोष्टीने झाली आहे आणि त्यातल्या पात्रांच्या संवादाच्या रूपात किंवा पुढे पुढे गोष्टीचे रुपांतर माहितीपर लेखातच झाले आहे. पण ते असो. दिलेली माहिती महत्त्वाची आहे, वाचनीय आहे हे महत्त्वाचं. तसंच ती सोप्या शब्दात दिलेली असल्यामुळे समजायला सोपी आणि आचरणात आणता येईल अशी आहे.

वानगीदाखल काही उदाहरणे.

लहान मुलांच्या लठ्ठपणाबद्दल अनावश्यक काळजी सोडणे, योग्य आहार देणे आणि पारंपारिक "करदोड्या"चे उपयुक्तता संगणरी कथा


चॉकलेटच्या दुष्परिणामाबदलची गोष्ट


दासबोधातील आरोग्यविचार
 

नाचा व दीर्घायुषी व्हा


पंचतंत्र-इसापनीतीमधल्या गोष्टींचा एक विभाग आहे.

हा उपक्रम चालवनाऱ्या जोशी दांपत्याची अंकात दिलेली माहिती


बहुतेक लेख लठ्ठपणा, मधुमेह, चुकीची जीवनशैली यावरचे आहेत त्यामुळे माहितीची फार पुनरावृत्ती झाली आहे असं वाटतं. अजून वेगळ्या विषयांवरचे लेखन घेता आले असते तर अंकाची उपयुक्तता वाढली असती. पण बहुतांश आजारांचे मूळ कारण याच गोष्टी असल्यामुळे त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करावे असा विचार संपादकांचा असावा.
मोफत पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

साप्ताहिक साधना बालकुमार दिवाळी अंक २०१९ (Sadhana Balkumar Diwali Special Edition 2019)



दिवाळी अंक : साप्ताहिक साधना बालकुमार दिवाळी अंक २०१९ (Sadhana Balkumar Diwali Special Edition 2019)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ४४
ISBN :दिलेला नाही
किंमत: ४० रुपये
पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


ऑगस्ट १९४८ रोजी साने गुरुजी यांनी सुरू केलेल्या साधना या साप्ताहिकाचा हा लहान मुलांसाठीचा दिवाळी अंक आहे. भारतातील सहा राज्यांतील सहा मुला-मुलींची कर्तबगारी सांगणारा हा अंक आहे. ते लेख पुढीलप्रमाणे :



"अर्धाच ग्लास प्लीज" - गर्विता गुल्हाटी (कर्नाटक) या पंधरा वर्षाच्या मुलीने पाणी वाचवण्यासाठी संस्था सुरी केली , हॉटेल मध्ये होणारी पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी कृती सुरू केली. 




भारताचा जॅक्सन पोलॉक - शौर्य महानोत (मध्य प्रदेश). बारा वर्षांचा मुलगा ज्याची स्वतःची पेंटिंग स्टाईल आहे.


तांड्यातून एव्हरेस्टवर - पूर्णा मलावत (तेलंगणा) एका आदीवासी पाड्यातली मुलगी जेमतेम १४ वर्षांची असताना एव्हरेस्ट चढली 



तबलावादनाच्या महाद्वाराकडून कौतुक - तृप्तराज पंड्या (महाराष्ट्र). गेली सहा वर्षे सर्वांत लहान वयाच्या तबलावादकाचे गिनीज बुक रेकॉर्ड तृप्तराजच्या नावावर आहे. 


१५व्या वर्षी M.Sc. - सुषमा वर्मा (उत्तर प्रदेश) - असामान्य बुद्धी असणरी सुषमा.


’सत्य’धर्माचा पुजारी - वली रेहमानी (प.बंगाल) - विशीत असणरा रेहमान फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम सारख्या समाज माध्यमांतून राजकीय सामाजिक विषयांवर बोलणारा आणि अल्पावधीत "सोशल इन्फ्लुएन्सर" झाला. त्याची कहाणी.

साधनाच्या नव्या उपक्रमाची ओळख करून देणारी एक जाहिरात


मुलं लहान असली तरी त्यांच्या वयाच्या मानाने काम मोठं करतायत, वेगळं करतायत. त्यांची माहिती वाचणं फक्त लहानांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी वाचनीय आणि प्रेरक ठरेल.

पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

अधर्मकांड (adharmakand)

पुस्तक - अधर्मकांड (adharmakand) लेखक - उदय भेंब्रे (Uday Bhembre) अनुवादिका - अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai) भाषा - मराठी (Marat...