Half Girlfriend हाफ गर्लफ्रेंड





पुस्तक :-Half Girlfriend हाफ गर्लफ्रेंड
भाषा :- इंग्रजी (English)
लेखक :- चेतन भगत (Chetan Bhagat)


चेतन भगत यांच्या सगळ्याच कादंबऱ्या प्रचंड खपाच्या ठरल्या आहेत. भारतीय वाचकवर्गात विशेषतः तरुणांमध्ये त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आहे. २०१५ मध्ये पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांचं भाषण ऐकायला झालेली तरुणांची गर्दी आणि उदंड प्रतिसाद मी स्वतः अनुभवला होता. 
तरुणांच्या अनुभवविश्वातले विषय किंवा स्वप्नविश्वातले विषय चेतन भागत कादंबरीच्या रूपात इतक्या सहज मांडतात की तरुणाईला हा आपला लेखक आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. 
हाच अनुभव मला त्यांची "हाफ गर्लफ्रेंड" ही आणि याआधी वाचलेली "टू स्टेट्स" कादंबरी वाचल्यावर आला. दोन्ही कादंबऱ्यांत विषय अतिशय सोपा तरुणांच्या आकर्षणाचा- एक मुलगा,एक मुलगी त्यांचं प्रेम, त्यांच्या संबंधातले चढउतार, मुलीचं प्रेम/विश्वास/संमती संपादन करण्यासाठी मुलाचे प्रयत्न.

हा विषय हजारो वेळा हाताळला गेलेला असेल अनेक कथा कादंबऱ्यांतून,चित्रपटांतून. पण विषय तोच असूनही चेतनच्या कादंबऱ्या ताज्या वाटतात. कंटाळवाण्या वाटत नाहीत.
पुस्तकाची भाषा इंग्रजी असली तरी इतर भारतीय लेखकांप्रमाणे ती पंडिती/अग्रलेखी भाषा नाही. सहज सोपी बोली भाषेचा लहेजा असणारी आहे. त्यामुळे इतर भारतीय लेखकाचं भारतीय पार्श्वभूमी असलेलं लिखाण वाचताना जो बोजडपणा वाटतो तो वाटत नाही. आपण मराठी/हिंदी मधूनच वाचतोय की काय असं वाटावं इतकं स्वाभाविक वाटतं. मनातल्या मनात मी कितीतरी संवादांचं मराठीत भाषांतर करत होतो.

दुसरं म्हणजे त्यांच्या कादंबऱ्यामध्ये भेटणारी माणसं पूर्णपणे काल्पनिक नाहीत, अतार्किक नाहीत. या पुस्तकातला नायक माधव आणि नायिका रिया एकमेकांना दिल्लीतल्या एका हायफाय कॉलेजात एकमेकांना भेटतात. माधव एका चांगल्या घरातला मुलगा पण बिहार मधल्या एका खेडेगावातून दिल्लीत शिकायला आलेला. त्याला इंग्रजी समजत असलं,बोलता येत असलं तरी त्यात एक बिहारी बाज आहे, ते हायक्लास लोकांसारखं फाडफाड इंग्लिश नाही.  हा न्यूनगंड घेऊनच तो कॉलेजात वावरतो, रियाशी मैत्री करतो, तिच्या मनात आपली जागा मिळवायचा प्रयत्न करतो. 
हा विषय "आजचा" आहे. शिक्षणासाठी, नोकरीसाठी गावातून शहरात आलेल्या प्रत्येकाला आपली पहिली काही वर्षं, इंग्रजीच्या भीतीमुळे झालेली घालमेल आठवून देणारा आहे. शहरी,निमशहरी तरुण वाचकांना आपलसं करण्याची त्यात ताकद आहे.

रिया श्रीमंत घरातली असली तरी श्रीमंतीचा माज ना करणारी किंबहुना आपल्या घरच्यांचे लक्ष्मीप्रेम बघून या भापकेबाजीचा तिटकारा आलेली, अबोल, स्वतःला स्वतःच्या कोशात ठेवणारी अशी.
तिचं प्रेम मिळवायचे माधावचे प्रयत्न, मित्रांचे वेडे सल्ले यातून कादंरीत पुढे या दोघांची ओळख वाढते, मैत्री होते आणि दुरावा निर्माण होतो. आपलं प्रेम पुन्हा परत मिळवायची धडपड माधव करत असतो. त्याचा आयुष्यातले प्रसंग काही वेळा अनपेक्षित कलाटणी घेतात. वाचताना आपल्यालाही सुखद-दु:खद धक्के देतात. 
हे सगळं खूप मनोरंजक आहे, प्रत्यक्ष वाचण्यासारखंच आहे. इथे त्याचे तपशील देऊन तुमचा रसभंग करत नाही. वाचायला लागल्यावर पुढे काय होणार याची उत्सुकता सारखी तेवती राहते. आणि प्रसंग काय घडेल हे समजलं तरी तो प्रसंग कसा रंगवला असेल हे कधी एकदा वाचतो असं होतं.

कथानकात येणारे संदर्भ आजचे आहेत. त्यात मोबाईल, ईमेल, गुगल मॅप, कंपन्यांची नावं वगैरे खरी येतात.  उदा. नायक माधव हा HSBC च्या इंटरव्यू ला जातो;  त्याचा मित्र "गोल्डमन सॅक्स" मध्ये काम करत असतो, माधव चालवत असलेल्या शाळेला बिल गेट्स भेट देतो इ. त्यामुळे प्रसंग अधिक खरे वाटतात.

प्रसंगानुरूप पण तरीही जाता जाता केलेल्या "जनरल" टिप्पण्या खूप मजेशीर,खुसखुशीत आहेत.
उदा. अमेरिकेतल्या त्याच्या मित्रांचं मोठं घर बघून माधव मनात म्हणतो. 

The size of apartment told me the banks paid them well. Dark circles under his eyes told me they also made him work hard"
गर्लफ्रेंडशी भांडण झाल्यावर विमनस्क परिस्थितीत रात्री घरी परतताना तिने दिलेल्य सगळ्या वस्तू टकून देतो पण चॉकलेट आणि बिस्किटं मात्र ठेवतो. कारण ... I was in pain,I remembered the golden rule: if you live in hostel,never throw away your food.. "Even though "
माधवच्या प्रेमाला हो किंवा नाही असा कुठलाही पक्का प्रतिसाद न देणऱ्या रियाला बघून तो म्हणतो 
An army of intellectual men can not solve the riddle created by an indecisive 

एकूणच या पुस्तकाचं वाचन मनोरंजक, हलकंफुलकं, ताजं करणारं आहे. जमल्यास वाचा. लवकरच या वरचा चित्रपटही येऊ घातलाय. तोही बघूया कसाय


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Five quarters of the oranges (फाईव्ह क्वार्टर्स ऑफ ऑरेंजेस)




पुस्तक :- Five quarters of the oranges (फाईव्ह क्वार्टर्स ऑफ ऑरेंजेस)
लेखक :- Joanne Harris (जोअ‍ॅने हॅरीस )
भाषा :- इंग्रजी (English) 

फ्रान्समधल्या एका खेड्यात एक प्रौढ विधवा बाई एक जुनाट घर आणि फळबाग विकत घेऊन राहायला येते. ते घर आणि बाग तिचंच लहानपणीचं घर असतं. पण हे घर, हे गाव याचा आपला संबंध आहे हे ती कायम लपवत राहते. आपली जुनी ओळख पटू नये, आपण कुठल्या कुटुंबातले आहोत हे लोकांना समजू नये यासाठी ती सदैव सावध असते. कारण तिला लपवायचा असतो तिला एक कटू भूतकाळ.

ती बाईच आपल्यालाशी बोलते या पुस्तकातून. घरात तिला तिच्या आईची एक डायरी मिळते ज्यात काही फोटो, बऱ्याचशा पाककृती, काही घटनांची माहिती तर काही अगम्य/सांकेतिक शब्दात वर्णनं. काही संदर्भ तिलाही लागत नाहीत. पण या गावात राहिल्या आल्यावर तिच्या आयुष्यात अशा घटना घडायला लागतात की तिची खरी ओळख लोकांसमोर येण्याची शक्यता वाटू लागते. वेळोवेळी तिला जुन्या गोष्टी आठवतात, जुने संदर्भ आठवतात. आणि ती ते आपल्याला सांगते...फ्लॅशबॅक मध्ये नेत.
कादंबरी भर हा आजचा प्रसंग आणि जुन्या आठवणी यांचा खेळ चालू राहतो.

तो जुना काळ असतो दुसऱ्या महायुद्धाच्या वेळच्या फ्रान्स मधला. नाझी फौजांनी फ्रान्स व्यापला होता. अशाच जर्मनव्याप्त फ्रान्समधल्या एका खेड्यात एक बाई आपल्या तीन मुलांसह राहत्ये. नवरा युद्धात मारला गेलाय. बाई बरीच मानसिक अस्थिर, अनेकदा रागाचा-विचित्र वागण्याचा विस्फोट करणारी. मुलं वाढत्या वयात येणारी - आईचा तापट स्वभाव, युद्धजन्य दुर्भिक्ष्य आणि नैराश्य यामुळे घुसमटणारी. त्या लहान मुलांमधली एक मुलगी म्हणजे ही लेखिका.
जर्मन सैनिक आणि पोलिसांची दंडेलशाही आणि जबरदस्तीने वस्तू बळकावणे स्थानिकांना त्रासदायक ठरत असतेच पण जर्मनांशी संधान बांधून चोरवाटांनी हवं ते मिळवून घेण्याचीही युक्ती अनेकांना सापडते. याच प्रलोभनाला बळी पडतात ती मुलं आणि हे कुटुंब.
पौगंडावस्थेतली प्रलोभनं, आईच्या शिस्तीच्या अतिरेकापायी तिच्याविषयी वाटणारा विकृत संताप, जर्मन सैनिकांमधल्या एकाचं मैत्रीपूर्ण वागणं व त्यातून जुळलेले संबंध, गावकऱ्याचे छुपे उद्योग आणि त्यातून घडलेल्या अघटित गोष्टी.

पुस्तक वाचताना शेवटच्या पानापर्यंत आपल्याला ते दिवस भेटत राहतात, ते रहस्य हळूहळू उलगडत राहतं; अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत.

ही रहस्यकथा आहे. रहस्य काय असेल या उत्कंठेने मी वाचत होतो. पण बरीचशी वर्णनं प्रसंग विनाकारण घातले आहेत, याचा मूळ गोष्टीशी काही संबंध नसणार असं वाटत राहतं. "अगं बाई मुद्याचं बोल, विनाकारण लांबण लावू नको" असं मनाशी म्हणत कितीतरी तरी पानं मी भराभर उडवली. शेवटी ते रहस्यही फार भारी निघालं नाही. 
उलट ती घटना काय होती हे अगदी पहिल्या पानात सांगून ते कसं घडलं हे सरळ सांगितलं असतं तर त्यातले प्रसंग, मानवी भावभावना या कडे वाचकाने अधिक समरस होऊन वाचलं असतं असं वाटतं. मग ते तपशील कंटाळवाणे वाटले नसते.

थोडक्यात हे पुस्तक वाचून युद्धमान फ्रान्स मध्ये खेड्यात वातावरण कसं असेल आणि आईवडिलांच्या स्वभावाचा मुलांवर परिणाम होऊन विकृतीला खतपाणी मिळू शकतं, लहानलहान मुलं सुद्धा किती "उद्योगी" असू शकतात एवढं जाणवतं. बाकी फार काही हाती लागत नाही. त्यामुळे पुस्तक वाचलंच पाहिजे असं नाही.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...