मोडी लिपी शिका सरावातून (Modi Script Learn & Practice)





पुस्तक :  मोडी लिपी शिका सरावातून (Modi Lipi shika saravatun)  - Modi Script Learn & Practice
लेखक : नवीनकुमार माळी (Navinkumar Mali)
भाषा : मराठी आणि इंग्रजी (Marathi & English)
पाने : १७५  ( मोठ्या ए-फोर किंवा लॉंग बुक आकारातील)
ISBN :978-1-63535-518-5

इंग्रजी लिहिताना आपण रोमन लिपी वापरतो आणि मराठी लिहिताना देवनागरी लिपी. तसेच इंग्रजी लिखाण वेगाने व्हावे म्हणून कर्सिव लिपी/रनिंग लिपी आहे. त्याचप्रमाणे मराठी लेखन वेगात व्हावे यासाठी "मोडी" लिपी पूर्वी वापरली जात असे. १२व्या शतकापासून शिवकाल, पेशवेकाल, ब्रिटिशकाल यांमध्ये मोडीलिपी मोठ्याप्रमाणवर वापरली जात असे. जिथे राजभाषा मराठी होती तिथे राजकीय पत्रसंवाद, व्यावसायिक व्यवहारांच्या नोंदी, जमिनीची इनामे, खरेदीविक्री यांच्या नोंदींसाठी मोडीलिपीचा वापर होत असे. माझ्या वडिलांनी सांगितलं की ४०-५० वर्षांपूर्वी त्यांच्या नातेवाईकांकडे घरगुती पत्रं पण मोडी लिपीत लिहिलेली त्यांनी बघितली आहेत. 

पण आता ही लिपी वापरात नसल्याने ही लिपी वाचू शकणारे लोक खूप कमी राहिले आहेत. जुने-जाणते लोक, इतिहाससंशोधक किंवा जुन्या लिपी-भाषांचे अभ्यासक यांपुरतीच ती मर्यादित राहिली आहे. शिवकाल-पेशवेकाल या मराठी माणसाला अभिमानस्पद असणाऱ्या कालखंडाचा इतिहास या मोडीलिपीत कुलुपबंद होऊन पडला आहे. सर्वसामान्य वाचक थेट जुनी कागदपत्रे वाचू शकत नाही.

पण आता मनु बदलतो आहे. मोडीलिपीचं महत्त्व जाणून तिच्याकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मोडी जाणणारेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तरूण आणि मध्यमवयीन पिढी नवीन तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरातून या प्रसार-प्रचाराला गती देत आहेत. नवीनकुमार माळी हे असेच मोडीप्रेमी युवक आपल्यासाठी घेऊन आले आहेत पुस्तक "मोडी लिपी शिका सरावातून".

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती:


या पुस्तकात मोडीची मुळाक्षरे, बाराखडी, जोडाक्षरे दिलेली आहेत. मोडी शिकवणाऱ्या पुस्तकांतून तुम्हाला हा मजकूर आढळेल पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की यात सरावासाठी सगळ्या अक्षरांचा कित्ता आहे. उदा.



शाळेत "व्यवसाय" किंवा वर्कबुक भरायचो त्या आकारातलं पुस्तक आहे. कित्ता गिरवून गिरवून तुम्ही अक्षर घोटू शकता. अक्षराचा आकार लक्षात येण्यासाठी हे चांगलं आहे.  मी शाळेत असताना हस्ताक्षर सुधारण्यासाठी "सुलेखन" असा कित्ता होता. मोडीच्या या कित्त्यामुळे तुमचं मोडी लेखन सुरुवातीपासूनच सुवाच्य होईल. 

पुस्तक द्विभाषिक आहे. जी माहिती मराठीत आहे तिचं इंग्रजी भाषांतरही आहे. ज्याला मराठी येत नाही अशी व्यक्तीही थेट इंग्रजीतून मोडी शिकू शकेल. पण मोडी लिपी शिकून शेवटी वाचायचा मजकूर मराठीतलाच. तेच जर समजत नसेल तर अक्षरओळख होऊनही गाडं अडणारच. त्यामुळे या इंग्रजी भाषांतराचा फार उपयोग होईल असं वाटत नाही.

पुस्तकात मोडीलिपीच्या इतर पैलूंचाही विचार आहे. अनुक्रमणिका बघितली की लक्षात येईल.


सरावासाठी मोडी छापिल परिच्छेद आहेत. एकदोन जुनी पत्रं ही आहेत. मोडी लेखन नीट जमू लागलं की हे छापिल उतारे तुम्ही सहज वाचू शकाल. जुनी पत्र वाचताना मात्र धाड्‌कन तोंडावर पडल्यासारखं होतं. काहीच बोध होत नाही. एकदोन ओळखीची काही अक्षरं दिसतात आणि बाकी मात्र अगम्य गिचमिड वाटते. पण इतपत मोडी आलं तरी तुम्ही पहिली पायरी व्यवस्थित पार केली असं म्हणायला हरकत नाही. यातच या पुस्तकाचा उद्देश पूर्ण झाला असं मी म्हणेन. छापिल, सुवाच्य मोडी वाचता येत्ये पण जुनी पत्रं वाचता येत नाहियेत ही रुखरुख तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही आणि प्रगत अभ्यासाचा शोध तुम्ही घेऊ लागाल हे नक्की. 

नवशिक्यांसाठी पुस्तक उपयुक्त आहेच. पण पुस्तकाची पुढची आवृत्ती निघेलच तेव्हा विचार करण्यासाठी काही सुचवावेसे वाटते आहे : 
1) एकाच अक्षरांचे विविध प्रकार दिले आहेत तसेच एकसारखी दिसणारी पण वेगवेगळी अक्षरे एकत्र द्यायला हवीत म्हणजे एका नजरेत ती दिसली की त्यांच्यातला सूक्ष्म फरक चट्‌कन जाणवतो. 
2) "र चा वापर" या प्रकरणात थोडा "विषयप्रवेश" म्हणजे ’र’चे प्रकार काय आहेत; कसे वापरले जातात ही थोडी "थेअरी" समजवून सांगितली की पुढचे "प्रॅक्टिकल" अजून सोपं वाटेल.
3) सरावासाठी जे उतारे आणि पत्रं दिली आहेत त्यांचं देवनागरी लिप्यंतरण द्यायला हवं होतं. 
4) मोडी सरावासाठी स्वतःच्या किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून समजलेल्या काही "टिप्स अ‍ॅंड ट्रिक्स" दिल्या असत्या तर अजून मजा आली असती.
5) हे पुस्तक यशस्वीरित्या पूर्ण केलं की पुढची पायरी काय; याच्याकडे अंगुलीनिर्देश हवा. फेसबुक ग्रूप, यूट्यूब व्हिडिओ, शिकवण्या ज्यात लेखक स्वतःही सक्रिय आहेत त्यांची माहिती देणंही अगत्याचं होईल.

मी काही वर्षांपूर्वी ढवळे प्रकाशनाच्या पुस्तकावरून मोडी शिकलो होतो. छपिल मोडी वाचता येऊ लागली पण पुढच्या प्रगत शिक्षणाचा योग अजून जुळून आला नाही. ट्विटर वर मी नवीनकुमारांचे मोडी विषयक ट्वीट्स बघितलेले. त्यांनीही माझा ऑनलाईन मराठी भाषा शिकवणारा उपक्रम व आधीची पुस्तक परीक्षणे वाचली होती. त्यातून आमचं फोनवर बोलणंही झालं.  नवीनकुमारांनी पुस्तक मला पाठवून मला पुन्हा त्यांच्या पुस्तकाबद्दल अभिप्राय द्यायला सांगितल्यामुळे मोडीच्या माझ्या आठवणी ताज्या झाल्या. या पुस्तकाचे परीक्षण लिहून, इतरांना याबद्दल सांगून मोडीप्रचारात माझाही खारीचा वाटा देण्याची संधी मला त्यांनी दिली याचा मला आनंद आहे. 

पुस्तक अमेझॉनवरसुद्धा उपलब्ध आहे. 
https://www.amazon.in/MODI-SCRIPT-Learn-Practice-Navinkumar/dp/1635355184/
ही लिंक बघा. नाही चालली तर थेट नाव शोधा.


मोडीवरचं पुस्तक वाचताना मलाही पुन्हा मोडी लिहावसं वाटू लागलं. म्हणून या परिक्षणाचे पहिले दोन परिच्छेद मोडीत लिहिले आहेत. एकूणच हातने लिहिण्याची सवय गेल्याने सध्या अक्षर तितकं चांगलं राहिलं नाही, त्यात हे मोडी. त्यामुळे पुढचे उतारे दुर्बोध वाटले तर सगळा दोष माझ्याकडेच बरं



------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा ) आशि (आवर्जून शिका)
------------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

LOSER-Life of software engineer (लूजर - लाईफ ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर)





पुस्तक : LOSER-Life of software engineer (लूजर - लाईफ ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर)
लेखक : Dipen Ambalia (दिपेन अंबालिया
भाषा : English(इंग्रजी )
पाने : २१०
ISBN : 978-81-7234-397-2


माहिती तंत्रज्ञान अर्थात "आयटी" क्षेत्र भारतातलं रोजगाराचं महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. आयटी म्हटलं की - चांगला पगार मिळतो, परदेशवारीची संधी मिळते; परदेशी कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा अलभ्यलाभ मिळतो, आरामदायी एसीत बसून काम करायचं असतं अशी वेगवेगळी वैशिष्ट्य आपल्याला कुणीही सांगेल. त्यात काही चुकीचंही नाही. पण समर्थांनी म्हटलंच आहे "जगी सर्व सुखी असा कोण आहे?". एखाद्या आयटीवाल्याशी तुम्ही बोललात तर तो तुम्हाला त्याच्या समस्यांचा पाढा वाचून दाखवेल. आत्महत्याग्रस्त शेतकरी, शोषित कामगार किंवा वंचित आदिवासी यांच्या समस्यांइतक्या या समस्या तीव्र, जीवघेण्या नक्कीच नाहीत. पण तरीही त्याला काहितरी सलतंय खरं; हे तुम्हाला समजेल ! तो आयटिवाला  जर "दिपेन अंबालिया" असेल तर तो नुसतं तुमच्याशी बोलणार नाही थेट पुस्तकंच लिहील "लूजर - लाईफ ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर" नावाचं. आणि त्याच्या समस्या ऐकताना तुमच्या डोळ्यातून खरंच पाणी येईल... हसून हसून.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती आणि अनुक्रमणिका



दिपेन अंबालिया या एका सॉफ्टवेअर इंजिनियरने विनोदी खुसखुशीत शैलीत आयटी क्षेत्रातल्या वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य केलं आहे. आयटीची-आउटसोर्सिंगची सुरुवात काही दशकांपूर्वी नाही तर कोलंबसाच्या काळातच झाली असं सांगत तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यांची गमतीदार तुलना त्याने केलीये. व्यवसाय कुठल्यही असो, "मी मरमरून काम करतोय पण मला त्याचं काही फळ नाही; त्या कमचुकाराला मात्र बढती" ही रड सगळीकडचीच. आयटीही त्याला अपवाद नाही. म्हणून जास्त मेहनत "करू नका" तर जास्त मेहनत करतोय असं "दाखवा" असा सल्ला दिपेन देतो आणि असं दिसायचं कसं याचं मार्गर्शनही करतो. मॅनेजर जवळ आला की कसा विचार करतोय असं दाखवायचं, आकृत्या काढून नवीन कल्पना डोक्यात शिजत्ये असं दाखवायचं नाहितर कहितरी कारण काढून बोलणं कसं टाळायचं इ.

मीटींग, प्रेझेंटेशन्स हा आयटीतला अविभाज्य भाग. लांबलचक चालणाऱ्या मीटींग्स, कंटाळवाणी प्रेझेंटेशन्स यातून तरून जाण्यासाठी कंटाळा घालवायचे आणि आपण लक्ष देतो आहोत असं दाखवायचे विनोदी उपायही सांगितलेत. नमुन्यादाखल हे वाचून बघा :


सॉफ्टवेअर इन्जिनिअरच्या (लेखकाच्या शब्दात : सॉफ्टीच्या) जॉबच्या पहिल्या दिवशी काय होतं तिथपासून शेवटच्या दिवशी काय होतं इथपर्यंतत नेहमी घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी लेखकाने सांगितल्या आहेत. अप्रेझल अर्थात पर्फॉर्मन्स इवॅल्युएशनच्यावेळी मॅनेजर बरोबर बातचित होताना "तू इतरांपेक्षा वेगळं काय केलं??" असा असणारा सूर १८० अंशात बदलतो जेव्हा तोच सॉफ्टी राजिनामा देतो. आणि मग याच चर्चा कशा होतात हेही लिहिलंय.

ऑनसाईट - परदेशवारी किंवा दीर्घ मुदतीचा परदेशवास - हा आयटीचा मुख्य आकर्षणबिंदू. पण हे ऑनसाईट मिळणं सोपं नाही  महाराजा. त्यामुळे असं ऑनसाईटला जाऊन आल्याने कॉलर टाईट करून वागणारे आणि ऑनसाईट कधी न गेलेले यांच्या वागण्यात कसा बदल दिसेल तेही वाचणं खूप मजेशीर आहे. उदाहरणादखल थोडं :


आयटीत छान छान सुंदर मुली असतात पण आपल्या वाट्याला त्यातली नेमकी कुणीच येत नाही या प्रकारचं गुलाबी दुःखही बऱ्याच जणांचं असतं. आणि आपल्या टीम मध्ये सुंदर मुलगी आहे पण केवळ ती सुंदर आहे; फटाकडी आहे म्हणून सगळ्या चांगल्या गोष्टी तिलाच मिळतात असलंही गुलाबी दुःख कुणाचं आहे. आकर्षक, देखणे (मुलगा किंवा मुलगी) आणि तसे नसणारे अश्या प्रकारात सॉफ्टींचं वर्गीकरण केलं तर त्यांच्या वागण्या-बोलण्या-विचार करण्यात कसा फरक दिसेल यांचं विश्लेषणही "संशोधनाअंती" लेखकाने मांडलं आहे.

"Grass is always greener on other side" या म्हणीला आयटीच्या दृष्टिकोनातून बघितलं की काय जाणवेल ? दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये शिकायची जास्त संधी आहे, दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये लोक जास्त एन्जॉय करतात, दुसऱ्या टेक्नोलॉजीला जास्त मागणी आहे इ. याच निरीक्षणातून लेखकाने सांगितले आहेत आयटीचे मनोरंजक "वैश्विक नियम".

एकूणच काय जर तुम्ही ज्युनिअर लेव्हलचे सॉफ्टवेअर इंजिनिअर असाल किंवा सिनियर लेव्हलचे; यातले बरेच अनुभव तुम्हाला स्वतःला किंवा सहकाऱ्यांना आले असतील, आजुबाजुला दिसत असतील आणि नसतील आले तरी असं होऊ शकतं याची कल्पना तर नक्कीच करता येईल. त्यामुळे पुस्तक वाचताना ते अनुभव आठवून किंवा त्या प्रसंगाची कल्पना करून तुम्ही हसाल हे नक्की. पुस्तक विनोदी आहे, विडंबन स्वरूपातलं आहे; त्याच्याकडे तितक्याच हलक्याफुलक्या शैलीतनं बघूनच वाचलं पाहिजे. मी असं करत नाही, आमच्याकडे कोणी असं वागत नाही, आयटी क्षेत्राला बदनाम करणारं पुस्तक आहे अशी "असहिष्णुता" दाखवू नका. सर्कशीत, जत्रेत "हसरे आरसे" असतात - अंतर्गोल, बहिर्गोल आरसे. त्यात आपण कधी ढेरपोटे दिसतो, कधी चवळीच्या  शेंगेसारखे, कधी वेड्यावाकड्या तोंडचे. हे पुस्तक तसं अहे. काही गोष्टी नेहमीपेक्षा मोठ्या दिसतील काही काही नेहमीपेक्षा खूप लहान. आयटितल्या नेहमीच्या अनुभवांचा मसावि आणि वाईट अनुभवांचा लसावि.

हे पुस्तक वाचतनाच फेसबुकवर लेखक दिपेनशी फेसबुकवर संपर्क केला होता. मग फोनवर थेट बोलणंही झालं. त्यामुळे मी परीक्षण लिहिलेलं हे लागोपाठ दुसरं पुस्तक आहे जे माझ्याच वयाच्या, आयटीतल्याच तरूण लेखकांनी लिहिलं आहे आणि पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्याशी थेट बोलणं ही झालं.

हे पुस्तक मराठीत अनुवादित झालं तर ज्यांची मुलं, नातवंडं, शेजारी-पाजारी आयटीत आहेत अश्या मोठ्या वयाच्या वाचकांना देखील तरुणांच्या जगात डोकवायची संधी मिळेल असं मला वाटतं. तो पर्यंत ज्यांना इंग्रजी वाचन आवडतं त्यांनी जरूर वाचा.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

ही आगळी कहाणी (hi aagali kahani)





पुस्तक : ही आगळी कहाणी (hi aagali kahani)
लेखक : निलेश नामदेव मालवणकर (Nilesh Namdev Malavanakar) 
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १३६
ISBN : दिलेला नाही


बरेच दिवसांत मराठी कथासंग्रह वाचला नव्हता. मराठी कथासंग्रह खूप लवकर वाचून होतात आणि लगेच पुस्तक बदलायला वाचनालयात जावं लागतं. लगेच जाणं झालं नाही की चांगल्या पुस्तकाशिवाय आठवडाभर रहावं लागतं. म्हणून इतक्यात वाचनालयातून कथासंग्रह आणला नव्हता. पण "ही आगळी कहाणी" कथासंग्रह मला शोधत घरी आला. या पुस्तकाचे लेखक निलेश मालवणकर याने माझी आधीची पुस्तक परीक्षणे वाचली होती आणि फेसबुकवर स्वतःहून मला संपर्क करत त्याचं पुस्तक वाचून अभिप्राय द्यायला सांगितलं होतं. त्याचा काही गैरसमज झाला असावा असंच मला प्रथम वाटलं. मी त्याला सांगितलं की मी काही "साहित्य समीक्षक" वगैरे नाही. साधा वाचक आहे. पुस्तक वाचून मला काय वाटलं, आवडलं ते लिहितो इतकंच. पण त्याने "वाचकांच्या नजरेतून परीक्षण आवडेलच" असं म्हणत पुस्तक घरपोच करण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारे कोणी स्वतः येऊन पुस्तक वाचायला सांगितलं,अभिप्राय द्यायला सांगितला याची मला गंमत वाटली. आता पुस्तक वाचून झाल्यावर एक चांगलं पुस्तक वाचल्याचा, त्याचं परीक्षण लिहीत असल्याचा आनंदही आहे

निलेश मालवणकर हा तरूण लेखक व्यवसायाने आयटी क्षेत्रात आहे. पण गेल्या चारपाच वर्षांपासून जोमाने कथा लेखन करत आहे. पुस्तकात दिलेली त्याची माहिती.

निलेशचं पेसबुक प्रोफाईल  : https://www.facebook.com/nilesh.malvankar.3

या पुस्तकातल्या कथा विनोदी, रोमॅंटिक, कल्पनाभरारी(फॅंटसी) अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. या लघुकथा असल्यामुळे कथांबद्दल जास्त सांगितलं तर गोष्टच सांगून टाकल्यासारखं होईल. म्हणून दोन-तीन गोष्टींबद्दल थोडंच लिहितो . 

"सोळावं वरीस धोक्याचं" ही महासंगणकांच्या कृत्रिम बुद्धीमत्ता आणि भावभावना यांच्या बद्दलची गोष्ट आहे. "कळविण्यास आनंद होतो की" मध्ये आदर्श विचार बोलणं किती सोपं आहे पण आदर्श कृती करणं किती कठीण हे एका साध्या प्रसंगातून दाखवलं आहे. 
"डायनोसॉरची बेंबी" ही खूपच मजेशीर आणि शेवटी अजून विनोदी झटका देणारी गोष्ट आहे. 
एक दोन गोष्टींत तर खऱ्या व्यक्तीरेखांच्या नावांत थोडा बदल करून त्या व्यक्ती भेटल्या तर काय होईल असा कल्पनाविलास आहे उदा. गोपी नय्यर आणि मन्नू मलिक; बिंदा करंदिकर आणि वसंत नारळीकर इ.  "परिकथेतील राजकुमारा" मला आवडली. परीकथेतले राजपुत्र, राक्षस, गरीब मुलगी ही रूपकं वास्तव जगात  बघितली तर वास्तव जगही तितकच नाट्यपूर्ण प्रसंगांनी भरलेलं आहे हे आपल्याला लेखकाने दाखवलं आहे. 

सगळ्या कथा पुरेशा लंबीच्या आहेत. उगीच पाल्हाळ नाही किंवा एकपानी कथा असंही नाही. एखाददोन गोष्टी वगळता या कथा रडकथा नाहीत. गोष्टीला काहितरी कलाटणी द्यायची म्हणून अपघात, दुर्धर आजार असलं काहितरी असलं की माझा विरस होतो. माझं रावसाहेबांसारखं आहे "ते बायकांच्या ऑडियन्सला रडवायला पोर मारूनबिरून टाकू नका.  पोरं मारून, लोक रडवून पैसे मिळवायचं म्हणजे पाप हो...थू!" :) :)  म्हणून ताज्यातवान्या भाषेतल्या या गोष्टी मला भावल्या. 

कंटाळला असाल तर किंवा प्रवासात विरंगुळा म्हणून वाचायला हे पुस्तक छान आहे. दोनतीन तास छान जातील; एका बैठकीतही पूर्ण होईल वाचून.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

99 : Unforgettable Fiction, Non-Fiction, Poetry & Humour (९९:अनफर्गेटेबल फिक्शन, नॉन-फिक्शन, पोएट्री अ‍ॅंड ह्यूमर)





पुस्तक : 99 : Unforgettable Fiction, Non-Fiction, Poetry & Humour (९९:अनफर्गेटेबल फिक्शन, नॉन-फिक्शन, पोएट्री अ‍ॅंड ह्यूमर)
लेखक : Khushwant Singh (खुशवंत सिंग)
भाषा : English (इंग्रजी )
पाने : ४२२
ISBN : 978-93-83064-75-5


खुशवंतसिंग या प्रथितयश इंग्रजी लेखकांच्या 99 निवडक साहित्यकृतींचा हा संपादित संग्रह आहे.अनुक्रमणिकेवरून पुस्तकाच्या मजकुराची तुम्हाला कल्पना येईल.







हे पुस्तक मी पूर्ण वाचलं नाही म्हणून खरं म्हणजे मी याचं परीक्षण लिहायला नको. पण हे पुस्तक पूर्ण वाचलं नाही याचं कारण वेळ नव्हता हे नाही. हे पुस्तक माझ्याकडे 2-3 आठवडे होतं. म्हणजे दोनतीन विकेंड, चार पुणे-मुंबई प्रवास इतका वेळ पुस्तक वाचनासाठी मिळाला. पण प्रत्येक वेळी काही पानं वाचली आणि कंटाळून पुस्तक बाजूला ठेवलं. ऐतिहासिक, व्यक्तिचित्र, काल्पनिक, स्वमदत अशा सगळ्या प्रकारातले लेख वाचले पण काही मजा नाही आली. 

या पुस्तकाबरोबर घेतलेलं पुलंचं एक पुस्तक संपलं; मागून आलेलं एका नव्या लेखकाचा कथासंग्रहही वाचून पूर्ण होत आला. पण हे पुस्तक काही पुढे जात नाही. इतक्या मोठ्या लेखकाचं निवडक पुस्तक म्हणजे वाचनाची मजा असणार अश्या अपेक्षेने पुस्तक घेतलं आणि फारच अपेक्षाभंग झाला.

आता खुशवंतसिंगांची एखादी कादंबरीच वाचून बघितली पाहिजे मग कळेल की त्यांच्याबरोबर बरोबर सूत जुळतंय का नाही. सध्यातरी हे पुस्तक वाचन इथेच थांबवतोय.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

पुन्हा मी ... पुन्हा मी (punha mi... punha mi)



पुस्तक : पुन्हा मी ... पुन्हा मी (punha mi... punha mi)
लेखक : पु.ल. देशपांडे (P. L. Deshapnade)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १९६
ISBN : 978-81-8086-075-1


पूर्वी वेगवेगळ्या मासिकांत, व्रुत्तपत्रांत, पुस्तकांत प्रसिद्ध झालेल्या पुलंच्या कथा, कविता, भाषणे, लेख, मुलाखती यांचा समावेश या पुस्तकात आहेत. पुढीलप्रमाणे.



यातल्या कविता आणि पहिल्या "हिरॉइन" पर्यंतच्या कथा मला आवडल्या नाहीत. भाषा खूपच ठोकळेबाज जणू एखादा सरकारी रिपोर्ट वाचतोय अशी आहे. या कथा पुलंच्यां नसाव्यात असं वाटावं इतपत रुक्ष आहेत. पण "तुका वाण्याचे दुकान" या कथे पासून पुढचं सर्व पुस्तक म्हणजे १०० नंबरी सोनं आहे.

"तुका वाण्याचे दुकान" आणि "साक्ष" या कथा गावाकडच्या मराठी ढंगात आहेत. भक्तीरसात डुंबलेले तुकाराम महाराज दुकान कसं चालवत असतील आणि त्यांच्या अव्यवहारी वागण्याने आवलीला कसा त्रास होत असेल याचं सुरेख चित्र गोष्टीत आहे. तर दुसऱ्या गोष्टीत एका इरसाल गावकऱ्याची कोर्टात साक्ष आहे.

वसंत सबनिसांनी पुलंची घेतलेली एक मजेशीर मुलाखत आहे. या सबनीस आणि पुलांची शाब्दिक कोट्या आणी शब्दांचे खेळ करणारी प्रश्नोत्तरे आहेत उदा.


पुढील व्यक्तींबद्दल लेख आहेत : आकाशवाणीतील अधिकारी आणि शास्त्रीय संगित रसिक के. डी. दिक्षीत, नाट्यनिकेतन या नाट्यनिर्मिती संस्थेचे प्रमुख मो. ग. रांगणेकर, गोव्यात "कलवंतीण"च्या पोटी जन्माला येऊन आपल्या समाजाच्या सन्मानासाठी काम करणारे राजारामबापू, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. व्यक्तीचित्रातून त्या व्यक्तीमत्त्वांचा परिचयच नाही तर त्यांच्या कार्याची वेगळेपण आणि महत्त्वही पुलंनी अधोरेखित केले आहे. उदा. पुरंदऱ्यांबद्दल ते लिहितात :


पुढे सामजिक विषयांवरचे लेख आहेत. आणिबाणी, भारत-चीन युद्धाच्या वेळी सर्वसामान्य नागरीकांमध्ये काय गुणदोष दिसले; एक समर्थ राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल तर आपल्यला आचार विचारांतील शिस्त कशी हवी हे स्पष्टपणे सांगणारे लेख आहेत. साने गुरुजींवरचा एक लेख आहे.
१९७४ साली मुंबई महानगरपालिकेला संगीत शिक्षणाबद्दल बद्दल केलेल्या सूचनांचा गोषवारा आहे. दुरदिवाने अजूनही त्या सूचना अभ्यासक्रमात आणलेल्या दिसत नाहीत. आता तर संगीत विषयच असून नसल्यासारखा आहे.

१९८२ सालच्या "मराठी मुलखात मराठीचा दर्जा" या लेखात मराठीच्या अवहेलनेबद्दल लिहिले आहे. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली मराठीला संस्कृतप्रचूर रूप देण्याचा प्रयत्न होतोय ज्यामुळे राज्यकारभाराची भाषा मराठी असली तरी "ही" मराठी लोकांची मराठी नव्हे. त्याबद्दल पुलंनी त्यांह्या खास शैलीत काय लिहिलंय त्याचं उदाहरण.


ज्यांनी पुलंचं फक्त विनोदी लिखाण वाचलं आहे त्यांना हे वैचारिक लिखाण पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू दाखवेल. मलाही पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं की या लिखाणामगे एक संवेदनशील, सर्वसमावेशक, निखळ गुणग्राही व्यक्ती आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीने आनंद घेत आनंद देत जगलं पाहिजे. धर्म-जात-भाषा-देश-वय-लिंग यांच्या बेड्या घालून घेऊन कुरूप, खुरटं, किरकिरं  न जगता "जे जे उत्तम उन्नत महन्मधुर ते ते" शिकण्याचा, बघण्याचा, ऐकणयाचा, खाण्याचा आनंद घेतला पाहिजे, आनंद दिला पाहिजे !

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...