भारताची अणुगाथा (Bharatachi Anugatha)




पुस्तक : भारताची अणुगाथा  (Bharatachi Anugatha)
लेखक : आल्हाद आपटे (Alhad Apte)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३६०
ISBN : 978-93-86118-46-2

"भारताची अणुगाथा" हे पुस्तक १९४० च्या दशकापासून २०१४-१५ पर्यंत अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारतने केलेली प्रगती आणि प्रवास आपल्यासमोर मांडते. डॉ. होमी भाभा यांनी आपलं विदेशातलं वास्तव्य सोडून भारतात परत यायचा निर्णय घेतला. स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या, विकासाची नवी स्वप्ने पाहणाऱ्या राष्ट्राला स्वयंपूर्ण होण्यासाठी अणुऊर्जा कशी आवश्यक ठरेल या दीर्घदृष्टीतून भारतात संशोधन सुरू केले. त्याला संस्थात्मक स्वरूप दिले. टाटा उद्योगाची मोलाची आर्थिक मदत त्याला मिळाली. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही भाभांच्या या उपक्रमाला राजकीय आणि शासकीय पाठबळ दिलं. आणि मुहूर्तमेढ रोवली गेली भारताच्या अणुगाथेची.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती:


अणुऊर्जा आपल्या कोणाला नवीन नाही. तुर्भे येथलं बीएआरसी, तारापूर येथील अणुविद्युत केंद्र, पोखरण येथे दोनदा झालेल्या अणुचाचण्या, महायुद्धातला अणुबँबचा वापर, चेर्नोबिल दुर्घटना याबद्दल आपल्याला थोडीथोडी तरी माहिती असते. या सगळ्याविषयी सविस्तर माहिती आणि ज्ञान देणारं हे पुस्तक आहे. या प्रगतीच्या आणि प्रवासाच्या वेगवेगळ्या पैलूंची माहिती व इतिहास यात आहे.

पहिला पैलू संस्थात्मक इतिहासाचा. भारतात भाभांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कशी सुरू झाली, तिने कुठलं संशोधन हाती घेतलं, त्याचे परिणाम कसे दिसले, भाभांनंतरच्या विक्रम साराभाई, राजा रामण्णा, चिदंबरम्‌ या तितक्याच महान प्रमुखांनी या संस्थांचां जाळं कसं विस्तारलं, सरकारी संस्था असूनही लालफीतशाही टाळत संशोधन कसं केलं गेलं इ. सविस्तर इतिहास यात आहे.



दुसरा पैलू राजकीय. अणुऊर्जेचा शोध लागल्यापासून त्याचा चांगल्यासाठी वापर होण्याआधी त्याचा विध्वंसक वापर अणुबॉंबच्या रूपात झाला. अणुऊर्जेचं हे सामरिक महत्त्व लक्षात घेऊन या विषयीचं संषोधन, आणि लागणारा कच्चा माल (युरेनियम इ.) आपल्याच ताब्यात कसे राहतील याचा प्रयत्न अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया सारखे मोठे देश करत आले आहेत. त्यातून "युनो"मधले करारमदार, आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण झाल्या. चीन ने आणुचाचण्याकरून भारतावर कसा दबाव आणला, इंदिराजींच्या काळात आपल्याला अणुचाचण्या का कराव्या लागल्या, त्यांनंतर भारतावर घातलेले निर्बंध, त्याचा भारतीय संशोधनावर झालेला बरा-वाईट परिणाम, भारताने घेतलेल्या भूमिका हा सगळा भू-राजकीय पटही लेखकाने सविस्तर मांडला आहे. त्यातून या विषयाचं गांभीर्य आणि पडद्यामागे घडणाऱ्या हालचाली आपल्याला समजतात.

तिसरा पैलू प्रत्यक्ष विज्ञानाचा. एखाद्या विज्ञानाच्या पुस्तकात शोभेल अशा प्रकारे आकृत्या, तक्ते यांच्यांसह लेखकाने अणुऊर्जेचं विज्ञान समजावून सांगितलं आहे. अणू, रेणू, प्रोटॉन, समस्थानिकं, अणूविखंडन, अणूसंमीलन अशा तांत्रिक संज्ञाही मराठीत बऱ्याच सोप्या पद्धतीने समजावून दिल्या आहेत. त्यामुळेच भाभांची तीन टप्प्यांची योजना, भारतात मिळणाऱ्या थोरियमला अनुकूल संशोधन हा पुढचा भाग नीट समजायला मदत होते.


पाचवा पैलू हा या तंत्रज्ञानाच्या इतर वापरांचा आहे. अणुविखंडन, किरणोत्सार यांचा वापर वैद्यकीय सामुग्री निर्जंतुक करणे, खत निर्मिती, पाण्याच्या साठ्यांचा शोध, अन्नप्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार अशा नानाविध प्रकारे होतो. यांची थोडक्यात माहिती आणि त्यासाठी कशाकशा सरकारी व औद्योगिक संस्था उभ्या राहत गेल्या याचीही माहिती आहे. 

सहावा पैलू - पूरक पैलू -म्हणजे छायाचित्रे, सूची. व्यक्तींची, इमारतींची, प्रसंगांची जुनी कृष्ण्धवल आणि रंगीत छायचित्रेही बरीच आहेत. लेखक स्वतः तंत्रज्ञान क्षेत्रातला असल्याने, मराठी पुस्तकांत सहसा न आढळणरी पुस्तकाच्या शेवती विषयसूची, नामसूची, स्थळसूची आहे. अर्थात ते नाव, विषय किंवा स्थळ याचा उल्लेख पुस्तकात कुठल्या पानावर झाला आहे याची यादी. जेणेकरून हवा असलेला संदर्भ पुस्तकातून चटकन शोधता येतो.



अनुक्रमणिका :





नुसता गोषवारा देताना सुद्धा मी इतकं लिहिलं आहे त्यावरून या साडे तीनशे पानी पुस्तकातलं प्रत्येक पान कसं माहिती व ज्ञानाने ओतप्रोत भरलेलं आहे याची कल्पना आली असेलच. त्यामुळे पुस्तक एका बैठकीत संपवून टाकण्यासारखं नाही तर थोडं थोडं वाचत, ज्ञान पचवत पुढे पुढे जायला लावणारं आहे. लेखक स्वतः या क्षेत्रात ४० वर्षं काम करत होते त्यामुळे यातल्या ज्ञानाला सत्यतेबरोबरच आपुलकीची ही जोड आहे.

प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचून आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीची आणि तिला मिळणाऱ्या फळांची माहिती घेत त्यांना कृतज्ञतेचा प्रणाम केलाच पाहिजे.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री (Vyayamashi maitri, Arogyachi khatri)




पुस्तक : व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री (Vyayamashi maitri, Arogyachi khatri)
भाषा : मराठी (Marathi)
लेखिका : ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar)
अनुवाद : प्रा. रेखा दिवेकर (Rekha Diwekar)
पाने : २६०
मूळ पुस्तल : Don't loose out, work out (डोण्ट लूज आऊट, वर्क आऊट )
भाषा : English (इंग्रजी)

आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि काळजी करणाऱ्यांना ऋजुता दिवेकर हे नाव अपरिचित नसेलच. ऋजुता दिवेकर या प्रसिद्ध आहारसल्लागार (डाएटिशियन) आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तींना प्रशिक्षण दिलं आहे. अधिक माहिती वरच्या फोटोत आहे.

त्यांच्या आधीच्या- "लूज युवर वेट"- पुस्तकात त्यांनी आहाराबद्दल माहिती दिली होती. दिवसातून ४ वेळा थोडे थोडे खा. तूप खा. भात खा. कुठलाही पदार्थ पूर्णपणे टाळू नका. इ. महत्त्वाचे आणि प्रचलित समजांना धक्के देणारे सल्ले त्यांनी त्यात दिले होते. त्यात व्यायामाचेही महत्त्व अधोरेखित केले होते. हे पुस्तक व्यायामवर केंद्रित आहे.

अनुक्रमणिका :



या पुस्तकात त्यांनी व्यायाम करत असताना आणि झाल्यावर आपल्या शरिरावर त्याचा काय परिणाम होतो त्याची शरीरशास्त्रानुसार माहिती दिली आहे.हि माहिती वैज्ञानिक असली तरी सर्वसामान्य वाचकालाही ती सोप्या पद्धतीने समजेल अशी दिली आहे. उदा. आपले शरीर ऊर्जा कशी वापरते त्याबद्दलच्या महितीची सुरुवात :


ही सविस्तर माहिती य पुस्तकाचं वेगळेपण आहे. त्यामुळे पुढच्या प्रकरणांची पायाभरणी होते. पुढच्या तीन प्रकरणांत कार्डिओ, स्नायूंचे(वजन उचलणे)इ. आणि योग यांचा सविस्तर ऊहापोह केला हे.

एकच एक व्यायाम सगळ्यात चांगला (चालणे, पळणे, पोहणे इ.) किंवा एकच एक व्यायाम सर्वोत्तम (सूर्यनमस्कार) हा गैरसमज आहे हे या सगळ्या विवेचनातून त्या स्पष्ट करतात. आहार जसा चौरस असावा तसाच व्यायामही चौरस असायला हव अशी त्यांचि मांडणी आहे. वेट ट्रेनिंग अर्थात जिमला जाऊन वजनांचे व्यायाम करणे हे फक्त पैलवान/बॉडीबिल्डर लोकांसाठी नाही तर प्रत्येकाला ते करणं आवश्यक आहे. पायाचे स्नायू मजबूत नसतील तर धावताना दुखापत होऊ शकते. आपने हृदयसुद्धा स्नायूंचेच बनले आहे. त्यामुळे स्नायू मजबूत झाले तर हृदय मजबूत होईल, आणि दमसास(स्टॅमिना) वाढेल. असे वेगवेगळे परस्पर संबंध त्यांनी उलगडून दखवले आहेत. 


हे सगळं वाचून जे व्यायाम करत नाहीत त्यांना व्यायाम करावासा वाटेल. पण जे व्यायाम करतात ते सुद्धा व्यायाम नीट करतात का, योग्य क्रमाने करतात का, योग्य प्रमाणात करतात का याचंही आत्मपरीक्षण करायला भाग पाडेल. वर्षानुवर्षे तोच व्यायाम करून फरक दिसत नाही असं म्हणणाऱ्यांना "तोच" व्यायाम करत राहिल्यामुळेच परिणाम दिसत नाही हे समजेल. व्यायामाचं प्रमाण वाढतं कसं असलं पाहिजे हे समजेल.


पुच्या प्रकरणात योगाबद्दलचे गैरसमज दूर केले आहेत. योगासनांकडे बघण्याचा सध्याचा बाजारू दृष्टिकोन टाळून त्याच्याकडे पारंपारिक साधना या स्वरूपात बघत प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे असं लेखिकेचं म्हणणं आहे. काही संस्थांची नावंही सुचवली आहेत.

चौरस व्यायामाच्या आखणीसाठी तयार वेळापत्रकं दिली आहेत. पण या पुस्तकाचा एकूणच उद्देश "मी सांगते असं करा" असा नाही तर तर त्यामागचा कार्यकारणभाव व  विज्ञान समजावून सांगणं आहे. जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यायामाकडे डोळसपणे बघू लागेल. स्वतःच्या दिनक्रमाची आणि व्यायामाची फेरमांडणी करू शकेल. व्यायामाच्या नावाखाली अनुत्पादक गोष्टी टाळेल. अतिव्यायाम टाळेल. व्यायामपूरक आहार घेईल. आणि जिमसाठी, प्रशिक्षकासाठी चार पैसे भरावे लागले तरी त्याचं महत्त्व काय हे समजून घेईल.

लेखिकेची शैली गप्पा मारल्यासारकही, हलकेफुलके विनोद करत मुद्दा सांगणारी आहे. त्यामुळे तांत्रिक प्रकारचं पुस्तक असलं तरी कंटाळावाणं होतं नाही. पुस्तकाचे भाषांतर लेखिकेच्या आईने- रेखा दिवेकर यांनी- केलं आहे. तेही सहज सोपं, योग्त तिथे इंग्रजी शब्द ठेवून केलेलं आहे. तेही छान झालंय.

त्यामुळे हे पुस्तक सगळ्यांनीच वाचयला पाहिजे. या विषयांतले तज्ञ कदाचित पुस्तकातल्या चुका किंवा त्रुटी सांगू शकतील. पण पुस्तकाच्या वाचनाने आपली आरोग्यबद्दलची समज वाढेल, जिज्ञासा वाढेल; व न-व्यायामाकडून व्यायामाकडे आणि पुढे योग्य व्यायामाकडे जाण्यास हे पुस्तक आपल्यल नक्कीच उद्युक्त करेल.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...