चौऱ्याऐंशी पावलं (Chauryaainshi Pavala)






पुस्तक - चौऱ्याऐंशी पावलं (Chauryaainshi Pavala)

लेखक - उपेंद्र पुरूषोत्तम साठे (Upendra Purushottam Sathe)

भाषा मराठी (Marathi)

पाने 319

ISBN - दिलेला नाही 

मुंबईचे उपनगर असलेल्या पार्ल्यामध्ये "विजय स्टोअर्स" नावाचं प्रसिद्ध दुकान आहे. किराणा भुसार मालाचे दुकान असलं तरी त्याचबरोबर दिवाळीच्या फराळाचे पदार्थ, श्रीखंड,पुरणपोळी असे नाना खाद्यपदार्थ, अळूवडी सारखे मराठमोळे पदार्थ सुद्धा विकायला  असतात. अतिशय उच्च दर्जाचा माल ही दुकानाची खासियत. त्यामुळे इतर दुकानांपेक्षा भाव थोडा जास्त असला तरी चोखंदळ ग्राहकांची "विजय स्टोअर्स"ला पसंती राहिली आहे. 1933 साली सुरू झालेलं हे दुकान पारल्यातलं नामवंत ठिकाण, ओळखीची खूण झालेलं आहे. भाऊ साठे हे या दुकानाचे संस्थापक. त्यांचे धाकटे बंधू अण्णा साठे. अण्णा साठे यांचा सांभाळ लहानपणापासून भाऊंनी केला. भाऊंबरोबर अण्णा दुकानात काम करू लागले आणि पुढे दुकानाची धुरा त्यांनी सांभाळली. त्या अण्णा साठे अर्थात उपेंद्र पुरुषोत्तम साठे यांचे हे आत्मचरित्र आहे.

कोकणातल्या दरिद्री ब्राह्मण कुटुंबातुन मुंबईला येऊन स्वतःच्या परिस्थितीला हातभार लावणाऱ्या असंख्यांपैकी एक हे साठे बंधू. पण सर्वसामान्य मराठी-ब्राह्मणी वृत्तीशी फारकत घेत हे व्यवसायात उतरले; पण प्रामाणिकपणा, भरपूर कष्ट करण्याची तयारी, शिस्त हे मराठी-ब्राह्मणी सद्गुण न विसरता. यातून यांचा व्यवसाय सुरु झाला, वाढला आणि स्वतःची वेगळी छाप उमटवून गेला. त्यांचा हा प्रवास वाचणं खूप रोचक आहे. बरंच काही शिकवून जाणारं आहे.

विजय स्टोअर्स मध्ये मालाची गुणवत्ता राखली जायची. तरीही कोणाची तक्रार आली तर दुर्लक्ष न करता त्यात लक्ष घालून कुठे चूक तर होत नाहीये ना ना तर होत नाहीये ना याची तपासणी केली जायची. त्याचा हा प्रसंग वाचा

धंदा म्हटला की चढणं उतरणं आलंच. किराणामालासारख्या हजारो वस्तूंची खरेदी-विक्री करायचा धंद्यात एखाद्या व्यापाऱ्याकडून, पुरवठादारांकडून फसवणूक व्हायचे प्रसंग सुद्धा आले. तर काही वेळा "नामदार" दुकानदार म्हणून बाजारात मानही मिळत गेला. तसे बरेच किस्से पुस्तकात आहेत वाचायला खूप मजा येते. चहा बाजारातला हा एक किस्सा.

दुकानाची विक्री वाढती रहावी, गिऱ्हाईक सतत जोडलं जात राहावं यासाठी आगळे वेगळे उपक्रम सुद्धा साठे राबवत राहिल. दुकानाची दिनदर्शिका हा त्यावेळी नवीनच असलेला नवीनच नवीनच असलेला एक साधा पण परिणामकारक उपक्रम त्याची गंमत गंमत त्याची गंमत वाचा.


इतकं सगळं चांगलं चालत असूनही कामगारांच्या डोक्यात कली शिरला. युनियन करून साठ्यांना नाडायचा प्रयत्न  केला. त्यामुळे दुकान बंद करावे लागले. दुकान बंद झालं. काही कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या. जवळच्या नातेवाईकांची निधने झाली. असा वाईट काळ सुद्धा त्यांनी अनुभवला त्यांच्या मुलाने काही वर्षांनी दुकान पुन्हा सुरू सुरू दुकान पुन्हा सुरू केलं. ही सगळी रोलर कोस्टर राइड वाचताना आपणही समरस होतो.

लहानपणापासून घडलेले घरगुती कौटुंबिक प्रसंग हा आत्मचरित्राचा अविभाज्य भागच. पुस्तकात असे भाग पुष्कळ आहे. तो वैयक्तिक असला तरी त्यावेळची कुटुंब पद्धती लोकांची विचार करण्याची पद्धत आणि आणि व्यवसाय चालवणाऱ्या कुटुंबात मागे काय घडतं हे सांगणारे आहेत लेखकाची शैली सुद्धा अतिशय लालित्यपूर्ण आहे त्यामुळे वाचताना "मला काय करायचं यांच्या घरच्या गोष्टींचं" असं अजिबात वाटायला लावत नाहीत. साठे कुटुंबावरची कादंबरी वाचतो आहोत असं वाटतं.

आपल्या भावावर व्यवहार ज्ञानाचे आणि खऱ्या श्रीमंतीचे संस्कार करण्याची हा भाऊं साठ्यांची ही वेगळी पद्धत.




कोंड्याचा मांडा करून खातानाही आपल्याकडे जे आहे त्यातलंच, जमेल तितकं इतरांना देण्याची सवय या भावंडांनी जपली. परिस्थिती सुधारल्यावर, हाती पैसा खेळू लागल्यावर साठ्यांनी इतर विस्तारित कुटुंबीयांना, दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरघोस मदत केली. सर्व समाजाचं देणं मानलं. गरजूंना, संस्थांना मदत केली. संस्थात्मक व रचनात्मक कार्याला स्वतःच्या अनुभवाचा फायदा करून दिला. हे सगळे प्रसंग सुद्धा, गाजावाजा न करता, अहंकार न बाळगता निवेदनाच्या ओघात सांगितले आहेत. त्यातून या भावंडांना आणि निवेदनाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. लोकमान्य सेवा संघाच्या एका उपक्रमाला मदत करण्याबद्दल चा हा किस्सा आणि पु.लंकडून झालेलं कौतुक

साठ्यांच्या मदतीचं प्रत्येकवेळी कौतुकच झालं असं नाही. पदरमोड करून वर अपमान पदरी पडला असे सुद्धा प्रसंग घडले. साठे आपल्या मूळ गावाच्या -सुसेरी -च्या भल्यासाठी पुढाकार घेऊन, स्वतःच्या पैशातून शाळा बांधत होते. पण त्याची परतफेड मात्र वेगळीच झाली. कूळ कायद्याचा गैरवापर करून, ब्राह्मण म्हणून उलट बदनामी करायचा प्रयत्न झाला. 

महाराष्ट्रातल्या जातीयतेचा नंतर सुद्धा एकदा फटका बसला. गांधीहत्येनंतर ब्राह्मणविरोधी दंगली महाराष्ट्रभर पेटल्या होत्या. अनेक हत्या झाल्या, ब्राह्मणांची घरं जाळली गेली, कुटुंब देशोधडीला लागली. हा इतिहास नव्या पिढीपासून लपवलेला आहे. याच दंगलीत विजय स्टोअर्स लुटायला जमाव आला होता. अण्णांनी धीराने त्याला तोंड दिले. तो प्रसंग वाचण्यासारखा आहे.

असे सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक ताणेबाणे आपल्यासमोर उलगडणारं हे पुस्तक आहे. वरची पानं  वाचताना तुमच्या लक्षात आले असेलच की लेखकाची शैली सुद्धा आधी रसाळ आहे. शब्दांचे खेळ करणारी आहे. त्यामुळे वाचण्यात वेगळीच गंमत येते.

यशस्वी मराठी व्यापाऱ्याचं, कुटुंबवत्सल सद्गृहस्थाचं, सामाजिक भान सांभाळणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं आत्मकथन तुम्हाला नक्की आवडेल.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------




पारखा (Parkha)

 



पुस्तक : पारखा (Parkha)
लेखक : डॉ. एस.एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाची भाषा : कन्नड (Kannad) 
अनुवाद : उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
पाने : २७६
ISBN : 978-818-498-9014


कर्नाटकातल्या एका लहान खेड्यात, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपासच्या काळात घडणारी ही कथा आहे. शेती आणि पशुपालनावर आधारलेली अर्थव्यवस्था असणारं, आधुनिकतेचा स्पर्श न झालेलं हे खेडं आहे. इथे लोक गायी फक्त पाळत नाहीत तर भारतीय संस्कृतीला अपेक्षित असा गोमाता म्हणून तिचा आदर करतात. गोपूजेचं महत्त्व आणि भक्ती हा गावाचा स्वभाव आहे. अश्या या गावात काळींगा गौडा हा गावचा पाटील, मोठा गोठा असणारा आणि गायींचा प्रेमाने सांभाळ करणारा आहे. हे प्रेम कसं आहे हे या प्रसंगातून कळेल.
गावातल्या काही वादवादीमुळे गावात चरणाऱ्या गुरांसाठी कोंडवाडा तयार करावा लागला होता. त्यात आलेल्या गायीची कशी काळजी घेतो पहा.






या काळींगाचा नातू - त्याचं नाव पण काळींगाच - तो अमेरिकेत शिकून येतो. आपलं गाव, समाज सोडून दुसरीकडे गेलं की नव्या जाणिवा तयार होतात. नवे विचार समजतात. आपले आचारविचार जुनाट वाटू शकतात. काळींगाचं तसंच होतं. अश्यावेळी गावकरीच पुढे येऊन त्यांच्या घरचं श्राद्धपक्ष करतात. खेडोपाडी दिसणारी परस्पर सहकार्याची भावना आणि काळींगाबरोबर संस्कृती संघर्षाची ठिणगी इथे आपल्याला दिसते.








पुढे काळींगाची अमेरिकन बायको भारतात आल्यावर हा संघर्ष धारधार होतो. "गाय ही देवता" आणि "गाय हा उपयुक्त पशू" हा तात्त्विक वाद घडू लागतो. काळींगाबरोबर वाढलेला गावच्या पुरोहितांचा मुलगा - वेंकट -त्याचा मित्र. वेंकट शाळा शिकलेला आणि पौरोहित्य शिकलेला असल्यामुळे तो या दोघांशी बोलतो, समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक संवाद हा वादातच परिवर्तित होत राहतो. हे वाद-संवाद या कादंबरी चा आत्मा आहे. त्याचं हे एक उदाहरण. 




प्रसंगी वेंकट शास्त्रार्थ सांगतो आणि आपल्या मंत्रांमध्ये गायींबद्दल काय म्हटलं आहे हे सांगतो. गोपूजेची जाणीव आपल्या संस्कृतीत किती पुरातन काळापासून रुजली आहे त्याचंच हे द्योतक आहे.






पुढे काळींगाच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की ज्यामुळे; गाय म्हणजे फक्त उपयुक्त पशू का त्याहून अधिक काही; पाश्चात्त्य विचार का भारतीय विचार याची घुसळण आता त्याच्या मनात शिरू लागते.

वाचताना मला असं वाटलं; की गाय आपल्याला दूध देते म्हणून आपण गायीला देव मानतो. पण मग म्हशीला का नाही ? मांसाहार सुद्धा पूर्ण भारतात वर्ज्य नाही. वेदांमध्ये सुद्धा पशुबळीचे उल्लेख आहेत. केवळ "कमी दर्जाची उपासना पद्धती" म्हणून तिची बोळवण करता येईल का ?  पुस्तकातला काळींगा आजोबा म्हणतो, "वासरांनी पिऊन जेवढं दूध राहील तेवढंच आपण घ्यायचं. आपण गाईंना भरपूर खायला घातल्यामुळे जेवढं जास्तीचं दूध मिळेल तेवढंच आपलं." हा विचार खूप भूतदयावादी वाटतो. पण खायला प्यायला घालून गायींन जास्त दूध द्यायला लावणं हा सुद्ध्य त्यांच्यावर अत्याचारच नाही का? माणसाला हवं त्याच वाळूबरोबर गायीचा संग घडवून आणणं हे सुद्धा परंपरेतच आहे. यात कुठे आहे गायीच्या भावनांचा विचार ? इथे भारतीय समाज सुद्धा गाईला उपयुक्त पशूच समजतो आहे ना ? दुसरीकडे असं दिसतं की पाश्चात्त्य देशांमध्ये दूध, मांसासाठी जनावरांची पैदास करणे, शेतीच्या रसायनीकरणातून उत्पादन वाढवणे आणि बेसुमार जंगलतोड यातून झालेला फायदा हळूहळू या पृथीलाच नाशाच्या उंबरठ्यावर नेट आहे. मग असं वाटतं की कोणे एकेकाळी आपल्या समाजाची अवस्था सुद्धा आजच्या पाश्च्यात्त्य समाजासारखीच असेल. निसर्गाचा उपभोग घेता घेता हळूहळू आपल्या पूर्वजांच्या लक्षात आलं असेल की निसर्गाकडून कितपत "घेतलं" आणि कितपत "परत दिलं" की आपला स्वार्थ आणि निसर्ग याचा समतोल राहतो. आणि त्यातून आपल्या संस्कृतीतल्या प्रथा परंपरा  यमनियम बनले असतील. आता त्यातलं विज्ञान. अर्थशास्त्र, दूरदृष्टी आपण विसरलोय आणि राहिलेत फक्त पोथ्यांमधले नियम. त्यामुळे ऐहिक जगण्याच्या प्रश्नांना या भावनिक नियमांची उत्तरे थिटी पडतायत. 
पुन्हा एकदा निसर्गाचा जास्तीत जास्त वापर, त्याचे दुष्परिणाम, त्यातून आलेली समज आणि मग एक समंजस संस्कृती या प्रवासावर पाश्च्यात्य देशांच्या साथिने आपण निघालो आहोत  !!

दोन संस्कृती मधला हा सनातन वाद अश्या भावनिक पातळीवरून सुरेख पद्धतीने मांडला आहे. त्यामुळे वैचारिक वाद कंटाळवाणा होत नाही. कुठल्याही एका बाजूने न लिहिता समतोल लिहिलं आहे त्यामुळे पुस्तक प्रचारकी थाटाचं होत नाही. आपण सुद्धा वाचताना प्रत्येक पात्राशी समरस होऊन त्याचा त्याचा विचार समजून घेत पुढे जातो. पुढे काय होतंय याची उत्सुकता वाढवत राहते. आपणसुद्धा साधकबाधक विचार करू लागतो.

अनुवादाबद्दल प्रश्नच नाही. भैरप्पांची पुस्तके आणि उमा कुलकर्णी यांच्या अनुवाद हे समीकरणच आहे. ते तितकंच सार्थ आहे. हा अनुवादसुद्धा त्या यशस्वी मालिकेतलं एक सुंदर पुष्प आहे.

लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती 



अनुवादिकेची पुस्तकात दिलेली माहिती 



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...