

पुस्तक - चीन वेगळ्या झरोक्यातून (Chin vegalya zarokyatun)
लेखिका - डॉ. अंजली सोमण (Dr. Anjali Soman)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५०
ISBN - 978-81-938293-5-6
सर्वप्रथम, हे पुस्तक मला वाचनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल granthpremi.com च्या द्वितीया सोनावणे ह्यांचे आभार मानतो.
लेखिका - डॉ. अंजली सोमण (Dr. Anjali Soman)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५०
ISBN - 978-81-938293-5-6
सर्वप्रथम, हे पुस्तक मला वाचनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल granthpremi.com च्या द्वितीया सोनावणे ह्यांचे आभार मानतो.
चीनवरच्या ह्या पुस्तकात लेखिका अंजली सोमण ह्यांनी चीनचा इतिहास, भूगोल, सामाजिक क्रांती, महत्त्वाचे बदल आणि समाजाची आजची स्थिती अश्या विविधांगांनी चीन आपल्यासमोर उभा केला आहे. ह्यात महत्त्वाच्या आणि इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना आहेत तसेच समाजात झालेले बदल आहेत. चीनमध्ये राज्यकर्ते आणि राजकीय विचारसरणी बदलल्या तसे त्याचे बरे-वाईट परिणाम - काहीवेळा टोक गाठणारे - समाजाला भोगावे लागले त्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे जे चांगलं घडलं ते मांडलं आहे तसंच काय भयंकर घडलं तेही मांडलं आहे. कुठलीही एक बाजू घेऊन ती पुढे रेटायचा लेखिकेचा प्रयत्न दिसत नाही. काही वाक्यांचा अपवाद वगळता स्वतःची शेरेबाजी केलेली नाही. त्यामुळे "चीन मला असा दिसला किंवा अभ्यासांतून असा सापडला" असं प्रांजळ देशवर्णन पुस्तकात वाचायला मिळतं.
पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती

अनुक्रमणिका

१५० पानांत मोठा आवाका साधल्यामुळे प्रत्येक पान, प्रत्येक परिच्छेद महत्त्वाचा आहे. त्यामुळे उदाहरणादाखल कुठली पाने घ्यावी हा प्रश्न मला पडला. तरी, वेगळ्या वेगळ्या पैलूंबद्दलची ही काही पाने झलक म्हणून
गुंफांमध्ये सापडणाऱ्या प्राचीन अवशेषांतून उलगडणारा इतिहास


माओ त्से तुंग ह्याच्या क्रांती लढ्याबद्दल


चीन मध्ये कम्युनिस्ट राजवटीला धर्म मान्य नाही. तरीही बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम धर्म पाळणारे लोक तिकडे आहेत. त्याबद्दल एक प्रकरण आहे. त्यातली ही दोन पाने...


कम्युनिस्ट राजवटीत सगळं सरकारच्या मालकीचं. सरकार ठरवेल तसं वागायचं; त्याच वस्तूंची निर्मिती करायची अशी परिस्थिती होती. पण ९० च्या दशकात चीन ने आर्थिक उदारीकरण स्वीकारलं. मोठा बदल देशात झाला. परदेशी ज्ञान, संकल्पना, वस्तू सगळं बाजारात मिळू लागलं. त्यामुळे आधीची पिढी आणि आजची पिढी ह्यात खूप फरक आहे. त्याबद्दलच्या लेखातली ही पाने.



चीनने आज जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. मोठ्याप्रमावर उयोगधंदे आहेत. तरीही बेकारी आणि दारिद्र्य संपलेलं नाही. शहरं आणि गावं ह्यांच्यातली दरी वाढतेच आहे. प्रदूषणाची मोठी समस्या आहे. झगमगणाऱ्या शहरांच्या बाहेर डोकावलं की हे चिनी वास्तव नजरेस पडतं. त्याबद्दलही काही लेख आहेत. त्यातली ही पाने


भारतासारखाच चीन देखील खंडप्राय देश आणि त्याला हजारो वर्षांचा इतिहास. विविधता आणि सामाजिक अंतःप्रवाह भरपूर. त्यामुळे सांगण्यासारखं खूप आहे. विस्ताराने सांगत गेलं तर प्रत्येक प्रकरणासाठी स्वतंत्र पुस्तक होईल. तरीही लेखिकेने प्रत्येक पैलूचा झपाटयाने मागोवा घेतला आहे. आपल्या डोळ्यासमोर एक रूपरेषा उभी केली आहे. ज्याने चीनबद्दल आधी काहीच वाचलेलं नाही त्याला सुरवात करायला हे पुस्तक खूप उपयोगी पडेल. साम्राज्यशाही, कम्युनिझम आणि आता भांडवलशाहीशी हातमिळवणी करून कम्युनिझम; राजेशाही-माओची हुकुमशाही - एक पक्षीय व्यवस्था - पुन्हा एकव्यक्तीकेंद्रित सत्ता असे नाना प्रयोग चीनच्या इतिहासात घडलेले दिसतात. व्यवस्था कुठलीही असो त्यात दोष दिसतातच. त्यातून बदलाची धडपड सुरू होते. संघर्ष होऊन नवी व्यवस्था स्थिरावते. आणि नव्या व्यवस्थेत माणसांचे दोष/षड्रिपू ह्यामुळे नव्या रचनेचे नवे त्रास सुरू होतात. पुन्हा बदलाची आवाहने ! हे न संपणारं चक्र आहे. चीनच्या ह्या आकलनातून मला असंच जाणवलं.
ह्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेवरून असं वाटतंय की अंजली सोमण ह्यांनी चीन प्रवास केला आहे. पण तो त्यांनी कधी, किती दिवस केला; कुठे कुठे भेटी दिल्या; कोणाला भेटल्या हे पुस्तकात कुठेच आलेलं नाही. त्यामुळे लेखिकेचा स्वानुभव किती हे कळत नाही. पुढच्या आवृत्तीत हा बदल नक्की केलं पाहिजे जेणेकरून लेखिकेच्या निवेदनाची पार्श्वभूमी वाचकाच्या मनात तयार होईल. संदिग्धता राहणार नाही. पुस्तकात बऱ्याचवेळा आकडेवारी येते; किंवा काही निष्कर्ष मांडले आहेत. त्याचा आधार असणारे संदर्भ ग्रंथ किंवा वेबसाईट ह्यांची माहिती शेवटी दिली असती तर विचक्षण वाचकाला त्याचा फायदा झाला असता.
जगाचं उत्पादन केंद्र बनण्यासाठी काय नाविन्यपूर्ण उपाययोजना केल्या; आधुनिक तंत्रज्ञानात चीन कशी प्रगती करतोय; आपल्या भाषेत सगळं ज्ञान कसं आणतोय; "engineering marvel" म्हणवल्या जाणाऱ्या वास्तू कुठे कुठे आहेत इ. आधुनिक मुद्दे पुस्तकात आलेले नाहीत.
पुस्तकाच्या शीर्षकातल्या "वेगळ्या" झरोक्यातून ह्या उल्लेखामुळे मला असं वाटलं होतं की नेहमीच्या सामाजिक-राजकीय माहितीपेक्षा काहीतरी वेगळं सहसा न चर्चिलं जाणारं असं काहीतरी पुस्तकात असेल. पण तसं झालेलं नाही. त्यामुळे पुस्तकाचं शीर्षक "चीन - वेगवेगळ्या झरोक्यातून" असं ठेवायला हवं होतं.
चीनवरचं हे माहितीपूर्ण पुस्तक ज्ञानप्रेमी आणि वाचनप्रेमी वाचकांना आवडेल ह्यात शंका नाही.
हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक
https://granthpremi.com/product/chin-vegalya-zarokyatun/
चीनवरचं हे माहितीपूर्ण पुस्तक ज्ञानप्रेमी आणि वाचनप्रेमी वाचकांना आवडेल ह्यात शंका नाही.
हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक
https://granthpremi.com/product/chin-vegalya-zarokyatun/
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————