टारफुला (Tarphula)





पुस्तक - टारफुला (Tarphula)
लेखक - शंकर पाटील (Shankar Patil)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २८९
ISBN - 978-81-7766-829-2

टारफुला ही जुनी, प्रसिद्ध आणि लोकप्रिय कादंबरी आहे. खेडेगावातल्या सत्ताकारणावर आधारित आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातलं, कोल्हापूर संस्थानातलं हे खेड. पाटील, तलाठी, कुलकर्णी, चावडी, त्यावरचे सनदी , तराळ वगैरे पारंपरिक गावगाड्याची रचना तिथे आहे, गावचा पाटलाची सत्तेवर बळकट पकड. त्यामुळे गावातले लोक आणि आजूबाजूच्या डोंगरदर्यांत राहणारे गुन्हेगार लोक हे सुद्धा त्याला वचकून असत. पण अश्या पाटलाच्या आकस्मिक निधनामुळे पाटीलकीची खुर्ची रिकामी होते. सत्तेची ही पोकळी भरून काढण्यासाठी गावातले बलाढ्य लोक सरसावतात आणि त्यातून पुढे काय घडतं; हा ह्या कादंबरीचा मुख्य विषय.

पाटील गेल्यावर "कुलकर्णी" पद सांभाळणारे पंत कारभार हाकायचा प्रयत्न करतात. पण सत्ता राबवायची तर जे सामर्थ्य असलं पाहिजे ते नसल्यामुळे ते दुबळे ठरतात. पुढे गावात एक बदली पाटील येतो. तो आधीच्या पाटलासारखा कर्तबगार, शूर त्यामुळे गावाच्या दुफळीवर, टग्यालोकांवर जरब बसावी म्हणून तो आपलं बळ दाखवतो. त्यातून काही सुखावतात तर काही दुखावतात. मग दुखावलेली मंडळी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून तो स्वतःची तागे मंडळी जमवतो. सत्ता डोक्यात जाऊन नको ते धंदेकरतो. गावातली परंपरागत हाडवैरं उफाळून येतात. त्यात ह्या गटाला त्या गटाशी झुंजवून आपलं स्थान टिकवण्याची त्याची धडपड चालू राहते. त्यामुळे कधी दोन गट एकत्र येऊन तिसऱ्या गटातल्या व्यक्तीचा खून करतात तर नंतर हेच विरोधी दोघांचं जमून पहिल्या विरुद्ध कारस्थान करतात.

सामर्थ्य नाही म्हणून सत्ता गेलेले कुलकर्णी गावाने पहिले तसे अतिसामर्थ्याच्या नादात सत्ता कशासाठी हेच विसरलेला पाटील गावाला बघावा लागतो. सत्तेसाठी बेभरवशी आणि हिंसक खेळ रंगतो.

"टारफुला" वाचताना नेमकं महाराष्ट्रातलं सत्ता नाट्य घडतं आहे. आज २६ जून २०२२ आहे. शिवसेनेचे आमदार बंड करून गुवाहाटीला गेले आहेत. आणि कुठला गट कोणाबरोबर. कोणाची सत्ता जाणार कोणाची येणार. हा निर्णय अधांतरी आहे  कालचे विरोधी आजचे मित्र. आणि कालचे मित्र आज हाडवैरी. संघर्ष आणि बाचाबाची. त्यामुळे आज राज्यात जे घडतं आहे तेच गावपातळीवर कसं घडतं हेच "टारफुला" ने दाखवलं आहे. 

पहिल्या पाटलांच्या वचकाचं वर्णन


आबा कुलकर्णीची भीती दाखवणारा प्रसंग


बदली पाटील कशी जबरदस्ती करतो तो प्रसंग . एक परीट त्याची बायको विहिरीत पाय घसरून पडली म्हणून सांगायला येतो. तर तूच तिला मारलीस असा बनाव करून पाटील त्याला लुबाडायला बघतो. 

गावातलं हाडवैर दाखवणारा पाटील आणि गावकऱ्यातला एक संवाद 


खेडं म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं; टुमदार घरांचं; परस्पर जिव्हाळा असणाऱ्या माणसांचं असा माझ्यासारख्या शहरी लोकांचा समज असतो. पण खेड्यातही राजकारण आहेच. तेही जहरी आणि हिंसक. आजच नाही तर ७० वर्षांपूर्वी सुद्धा (आणि त्या आधी सुद्धा असेलच). सत्ता-सामर्थ्य ह्यांचा सनातन खेळ मराठी खेड्याच्या नेपथ्यावर दाखवणारी ही कादंबरी आहे.

कादंबरीत पटापट प्रसंग घडतात. कुठेही पाल्हाळ लावलेला नाही. विनाकारण स्थलवर्णन, पात्रवर्णन केलेलं नाही. त्यामुळे एकही पान रटाळ नाही. पाहिल्या पानापासून कादंबरी जी पकड घेते ते शेवटच्या पानापर्यंत. प्रसंगांचं वर्णन परिणामकारक आहे. आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत. पात्रांच्या संवादात साहजिकच तिथली ग्रामीण बोली येते. तिची मजा घेत खटकेबाज संवाद वाचताना आणि धमाल येते. त्यामुळेच कादंबरी एकीकडे रंजक आणि दुसरीकडे विचार करायला लावणारी आहे.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

द्विदल (Dwidal)


 

पुस्तक - द्विदल (Dwidal)
लेखक - डॉ. बाळ फोंडके (Dr. Bal Phondake)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३८
ISBN -978-93-861-175519 / 
978-93-861-175526(E book)
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. प्रथमावृत्ती ऑक्टो २०१६
छापील किंमत - १७०/- रु. 

प्रसिद्ध वैज्ञानिक आणि विज्ञानकथालेखक 
बाळ फोंडके ह्यांचे हे पुस्तक आहे. पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती. 


ह्या पुस्तकात दोन दीर्घ कथा आहेत. "नार्सिसस" आणि "कोव्हॅलंट बॉंड"ह्या नावाच्या. पोलीस तपासाच्या उंत्कंठावर्धक कथा आहेत. पोलीस तपासात आधुनिक विज्ञानाची जोड घेऊन गुन्ह्याचा शोध घेतला जातो त्यामुळे विज्ञानकथा देखील आहेत.


"नार्सिसस" ही कथा प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिन्स ह्यांच्या सारख्या व्यक्तिमत्त्वावर बेतलेली आहे.
 

डॉ.बोस हे एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ. दुर्धर आजारामुळे शरीर विकलांग झालं आहे. चालण्याफिरण्यासाठीच नव्हे तर बोलण्यासाठीसुद्धा यंत्राची मदत घ्यावी लागते आहे अशी अवस्था. पण मेंदू, बुद्धी, समरणशक्ती अगदी तेजतर्रार ! बोस एक सिद्धांत मांडत असतात की माणूस म्हणजे त्याचा मेंदू. इतर शरीर हे केवळ साहाय्य्यभूत; मुख्य नव्हे. ह्याच सिद्धांतावर व्याख्यान देण्यासाठी बोस अमेरिकेतून भारतात येतात. त्यांच्या पत्नीसह. एके रात्री त्यांच्यावर हॉटेल मध्ये हल्ला झाल्याची तक्रार त्यांची पत्नी नोंदवते. आणि पोलीस तपास सुरु होतो.
एका वृद्ध विकलांग शास्त्रज्ञावर हल्ला का बरं केला गेला असेल; ह्याचा तपास असिस्टंट कमिशनर अमृतराव आणि गुन्हेशोधतज्ञ कौशिक करतात. नेहमीच्या तपासाला विज्ञानाची जोड देखील मिळते. संशयाची सुई ह्याच्याकडून त्याच्याकडे असं करत करत योग्य हल्लेखोरापर्यंत कशी पोचते हे वाचण्यासारखं आहे.
त्या कथेतील पाने 


"कोव्हॅलंट बॉंड" ह्या कथेत दोन बायका एकाच मुलीबद्दल "मी तिची आई" असा दावा करतात. नेहमीच्या कागदपत्रांच्या छाननीतून कधी मुलगी आहे हे जाणवतं तर कधी दुसरीची. मग विचार येतो डीएनए टेस्ट करायचा. त्या चाचणीच्या निकालातून घोळ वाढतो पण चित्र काहीतरी वेगळंच आहे हे कळतं. आणि जेव्हा सगळा उलगडा होतो तेव्हा येतं की आधुनिक विज्ञानामुळे जीवन सुखकर झालं आहे, पोलीस तपास सोपा आहे तसेच दुसरीकडे ह्या विज्ञानातून नवे नैतिक प्रश्न सुद्धा आपल्यासमोर उभे केले आहेत. पूर्ण तपासामध्ये दोन्ही महिलांची पारडी वरखाली होत राहतात; तपासात सतत नवे पैलू; वैज्ञानिक अंगे येतात हे अतिशय रंजक आहे.


ह्या शोधकथांचा शेवट पूर्णपणे सयुक्तिक आहे. वाचकाला काहीतरी धक्का द्यायचा म्हणून तपासात किंवा शेवटी काहीही "ट्विस्ट" दाखवायचा प्रकार केलेला नाही. विज्ञान सुद्धा अतिरंजित किंवा अद्भुत नाही तर आज जे शोध उपलब्ध आहेत किंवा शक्य वाटतायत त्यांचाच आधार घेतला आहे. त्यामुळे त्यातूनही गोष्टींचा खरेपणा मनाला भिडतो. वैज्ञानिक परिभाषा बेतानेच वापरल्यामुळे लेखन बोजड झालेले नाही उलट भाषा, वाक्यरचना, संवाद अगदी चपखल आहेत. त्यामुळे वाचायला घेतलं की आपण रंगून जातो.


साहित्यप्रेमी,विज्ञानप्रेमी, लहान मोठे सर्वांना आवडेल असे हे पुस्तक आहे.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
——————————————————————————— 

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...