गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)




पुस्तक - गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)
लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - रु. १६० /-
प्रकाशन - पार्थ प्रकाशन नोव्हेंबर २०२४
ISBN - दिलेला नाही


लेखक सुरेश देशपांडे यांनी हे पुस्तक मला भेट दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो.


पुस्तकाच्या नावाप्रमाणेच ही एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची गोष्ट आहे. कथेचा नायक हाच निवेदक आहे. बँकेत नोकरी लागण्याच्या वयापासून निवृत्त होईपर्यंतच्या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना तो सांगतो आहे. तरुणपणी एका मुलीशी निखळ मैत्री, त्याचं पहिलं प्रेम, त्याच्या जिवलग मित्राशी मनमोकळा संवाद, एका सामाजिक संस्थेबरोबर काम, मैत्रिणीच्या कौटुंबिक समस्या, मित्राच्या कौटुंबिक समस्या असे बरेच प्रसंग त्यात येतात.

पुस्तक विनोदी नाही किंवा रडकंही नाही. थोडं सामाजिक आहे. पण लेखकाला काही ठळक सामाजिक समस्या, मुद्दे महत्वाचे वाटतात इतकंच त्यातून कळतं. निवेदनाच्या ओघात पुस्तक अचानक माहितीपर होतं. निवेदक किंवा एखादं पात्र आपल्याला चक्क एखाद्या लेखाप्रमाणे माहिती सांगतं. उदा. नायकाची पत्नी एका मूकबधिर शाळेत शिकवायला जायचा निर्णय घेते तेव्हा मूकबधिर म्हणजे काय, मतिमंद म्हणजे काय, अशी मुलं का जन्माला येतात, त्यांना काय वेगळा गरज असतात हे नायकाची पत्नी नायकाला समजावून सांगते. दुसऱ्या एका प्रसंग आहे ज्यात एका भूखंडावर अतिक्रमण होतं. त्यातही एक पात्र समजावून सांगतं की राजकारणी आणि गुंड ह्यांचे हे साटेलोटे आहे. तर एकदा नायक मी हे पुस्तक वाचलं असं म्हणत "युद्ध विरहित जग" पुस्तकाचा परिचय देतो.

टिव्ही वरच्या मालिकांमध्ये कसं सतत काही ना काही घडत असतं. प्रसंगांचा एक "ट्रॅक" संपतो, मग दुसरा सुरू होतो. तसंच पुस्तक वाचताना वाटलं की ही न संपणारी मालिका तर नाहीना. पण मालिकांमध्ये एखादा लहान प्रसंग सुद्धा बरेच भाग चालतो. कारण प्रत्येक पात्राच्या भावभावना, चेहऱ्यावरचे हावभाव, संवाद असं दाखवत दाखवत प्रसंग फुलवतात. नको इतका ताणतात किंवा भडक करतात. ह्याउलट हे पुस्तक आहे. किती तरी गंभीर, कौटुंबिक आणि वैचारिक वादळे निर्माण करणारे प्रसंग करणारे यात घडतात उदा. नवराबायको मूल न होऊ देता दत्तक घेण्याचा विचार करतात, एक घटस्फोटीता एका मतिमंद मुलीला दत्तक घेते, दोन पात्रांचा आंतरधर्मीय विवाह होतो इ . पण सगळं अगदी चुटकीसरशी घडतं. ही पात्रं दुसऱ्या पात्रांना आपला विचार सांगतात. मग इतर 
पात्रं थोडासा विचार करतात आणि लगेच सगळे होकार देतात सगळं छान छान होतं. त्यामुळे प्रसंग खुलत नाहीत मनावर ठसत नाहीत.

पुस्तकातली दोन प्रसंगांची पाने उदाहरणादाखल देतो 

नायक ज्या सामाजिक संस्थेची निगडित असतो त्या संस्थेच्या जागेवर गावगुंड अतिक्रमण करत असतात आणि त्याला विरोध करणाऱ्या संस्था चालकांना अपघात होतो तो प्रसंग



नायक आणि त्याची पत्नी मूल जन्माला न घालता दत्तक घेण्याचा विचार घरच्यांना सांगतात तेव्हा



साधारण पुस्तकाचे स्वरूप लक्षात आलं असेल. वाचताना कंटाळा येत नाही पण पुढे वाचत राहायची उत्सुकताही वाटत नाही. इतके नाट्यमय प्रसंग असूनही ते अजून खुलवले असते अजून चांगल्या पद्धतीने गुंफले असते तर कादंबरीची रंजकता वाढली असती असं मला वाटलं.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

सोंग (Song)




पुस्तक - सोंग (Song)
लेखक - नितीन अरुण थोरात (Nitin Arun Thorat)
भाषा - मराठी (Marathi)
पाने २२२
छापील किंमत रू. ३००/-
प्रकाशन - रायटर पब्लिकेशन जाने २०२०
ISBN - 9789-3342-01413

पुण्यात झालेल्या विश्व मराठी संमेलनामध्ये तरुण लेखकांचा एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यात सध्याचा गाजणारा लेखक नितीन थोरात याचाही समावेश होता. परिसंवादानंतर तिथे आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्रीच्या दालनात त्याच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. थोड्या गप्पा झाल्या. त्याच्या प्रकाशनाच्या दालनात त्याची गाजणारी ऐतिहासिक आणि पौराणिक विषय असणारी पुस्तकं मला दिसली. पण मला आत्ता त्या प्रकारचं वाचायची इच्छा होत नव्हती. तेवढ्यात हे पुस्तक दिसलं "सोंग - मुखवट्यामागे दडलेली कोवळी प्रेम कथा". हे वेगळं आहे म्हणून विकत घेतलं. पण प्रेमकथा आणि तीही एका तरुण लेखकाने लिहिलेली म्हटल्यावर कॉलेजमधले प्रेम, गावातलं प्रेम प्रेमाच्या आणा-भाका, रुसवे फुगवे, घरच्यांचा विरोध अशा पठडीच्या वाटेने ती जाईल की काय अशी मला शंका होती. पण पुस्तकाचं पहिलं वाक्यच वाचलं आणि आपल्याला कोणीतरी जोरदार धपाटा घालून भानावर आणतंय असंच वाटलं. पहिलं पान वाचल्यावर लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. त्यातले खटकेदार संवाद, ग्रामीण भाषा आणि त्या भाषेत आढळणारा शिव्यांचा मुक्त संचार याने पहिल्या पानातच मला खेचून घेतलं आणि मी उत्सुकतेने पुढे वाचू लागलो. तासभर वाचन कसं झालं हे कळलंच नाही. त्यादिवशी रात्री उशीर झाला होता म्हणून पुस्तक बाजूला ठेवलं पण दुसऱ्या दिवशी कधी एकदा काम संपून पुस्तक वाचायला घेतोय असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी तासभर मिळाला त्यामुळे पुढे वाचलं. तिसऱ्या दिवशीही तासभर वाचल्यावर थोडीच पानं राहिली होती. आता पुस्तक खाली ठेववेना. मग उशीर झाला तरी कादंबरी वाचून ती पूर्ण केली. हे पुस्तक पूर्ण कथेचा पहिला भाग आहे. दुसरा भाग "पुढचं सोंग" सुद्धा लवकरच वाचलं पाहिजे हे मनाशी पक्क झालं. सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा नितीनला मेसेज करून कादंबरी आवडली हे कळवलं. तेव्हापासून सविस्तर लिहिण्यासाठीचा वेळ शोधत होतो आणि आज तो मिळाला.
कथा-कादंबरी या ललित प्रकारात बरेच दिवसांनी असं खिळवून ठेवणारं कथानक वाचायला मिळालं. पुस्तकाचं कथाबीज छोटं असलं तरी निवेदनशैली, संवादप्रधानता, साधे सोपे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिलेले संवाद या सगळ्याची मजा खूप आली.


महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात घडणारी ही कथा आहे. मराठा समाजाचे बाहुल्य असणारे हे गाव. सुतार, चांभार, लोहार अशी इतर बलुतेदारांची घरे सुद्धा आहेत. गावगाड्यानुसार प्रत्येक समाजाचे लोक आपापला पारंपरिक व्यवसाय करत आहेत. स्थानिक राजकारण आणि समाजकारण यावर मराठा कुटुंबांची पकड. आणि त्या पकडीतून होणारी राजकीय स्पर्धा आलीच.
या गावाची परंपरा अशी आहे की जत्रेत पौराणिक प्रसंग सादर केले जातात. दशावतारी नाटकाप्रमाणे त्यात मुखवटे घालून कलाकार नाचतात. प्रत्येक जातीकडे प्रत्येक घराण्याकडे एक ठरलेला प्रसंग नाट्यप्रवेश दिलेला आहे. त्या त्या कुटुंबाने परंपरागत ते सादर करायचं. लोहार कुटुंबाकडे नाट्यप्रवेश आहे "सीता बाळंतीण" नावाचा. गर्भवती सीतेला लवकुश ही मुलं होतात हे त्यात दाखवायचं आहे. पण गावासमोर घरातली बाई नाही नाचणार हं. लोहार घरातील पुरुष मंडळी साडी नेसून, केशभूषा वेशभूषा करून हे सोंग सादर करतात. इतके वर्ष हे सोंग वठवलेले लोहार बाबा आता आपल्या मुलाकडे ही रीत सोपवतायत. पण बारावीतल्या तरुण संजयला साडी नेसून असं गावकऱ्यांसमोर येणे काही पटत नाही, रुचत नाही. पण त्याचे वडील काही ऐकत नाहीत. शिव्या घालत मुस्काडात मारत त्याला नाटकाला उभं करतात. आणि तरुण संज्याच्या अंगावर साडी चढते!!
संजय त्याच्याच वर्गातल्या एका मराठा कुटुंबातल्या मुलीवर प्रेम करत असतो. उघड उघड बोलणं शक्य नाही म्हणून फक्त खाणाखुणांनीच भावना व्यक्त होत असतात. आता गावच्या जत्रेत साडी नेसून उभं राहायचं आणि प्रेक्षकांत ती असणार म्हणून त्याला जास्तच लाज वाटत असते. पण त्याचा मित्र त्याला पटवतो की आज उलट तुला तिच्याकडे थेट बघता येईल, ते सुद्धा कोणाच्याही लक्षात न येता. हेच एक दुःखात सुख. एका तृतीयपंथीयाच्या मदतीने तो साडी नेसून तयार होतो. हो नाही करता करता सोंग पूर्ण होतं. आणि विशेष म्हणजे त्या मुलीलासुद्धा संज्याचं साडी नेसणं आणि त्याचा अभिनय आवडला असं त्याला कळतं.

सोंग पूर्ण होतं. जत्रा पूर्ण होते पण साडी नेसलेल्या संज्या हा टवाळ गावकऱ्यांच्या चेष्टेचा थट्टेचा विषय झाला नसता तरच नवल. हे साडी नेसणं संज्याला किती महागात पडणार आहे ? आपल्या प्रेयसीला आवडतं म्हणून तो असा साडी नेसत राहील? गावकऱ्यांची टवाळकी कुठली पातळी गाठेल? संज्याचं आणि कविताच प्रेम पुढे जाईल का? दोन समाजातली उच्चनीचता त्यांच्या प्रेमाच्या आड येईल का?

अशी ही वेगळीच प्रेम कथा आहे जी प्रियकर आणि प्रेयसी मध्ये थेट शब्दांनी व्यक्त होत नाहीये. या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीला सामाजिकतेचे ताणेबाणे, स्त्री- पुरुष-तृतीयपंथीय या लिंगव्यवस्थेचे पदर जोडले गेले आहेत. याहून जास्त काही सांगितलं तर कादंबरीची कथा पूर्ण उघड होईल. लेखकाने संवादातून व प्रसंगांतून संजय हे मुख्य पात्र, त्याचा मित्र असिफ, संजय चे वडील, गावातील इतर समाजातली माणसं, तृतीयपंथी, खलनायक प्रतिनायक, ज्या पद्धतीने उभे केले आहेत ते लेखकाचं मोठं यश आहे असं मला वाटतं.


चार पानं उदाहरणादाखल वाचा म्हणजे तुम्हाला अजून कल्पना येईल.
कादंबरीची सुरुवात


गावाबाहेर राहणारा पण गावगाड्याचा भाग असणारा चांगल्या स्वभावाचा तृतीयपंथी "बलम", संजय आणि त्याचा मित्र अशप्या ह्यांची काही प्रसंगामुळे चांगली मैत्री होते. त्यांच्या गप्पांचा एक भाग.


या पुस्तकातली पात्र बोलताना शिव्या देतात आणि पुस्तकात त्या तशाच्या तशा लिहिल्या आहेत. वाचकांना ते खटकण्याची शक्यता आहे. पण त्या कुठेही अश्लीलतेसाठी मुद्दामून दिलेल्या नाहीत. तर गावातले दोन मित्र किंवा भांडाभांडीच्या वेळी दोन माणसं जशा सहज शिव्या देतात तशाच त्या आलेल्या आहेत. संवादांमध्ये होणारा जातीचा उल्लेख मला थोडा जास्त वाटला स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष होऊन, विशेषतः ॲट्रॉसिटी कायद्याच्या वरवंट्याखाली लोक असताना आजही इतक्या उघड उघडपणे जातीपातींचा उल्लेख होत असेल का; असा मला प्रश्न पडला. मी काही खेडेगावात राहत नाही त्यामुळे मला प्रत्यक्ष अनुभव नाही. लेखकाचा तो प्रत्यक्ष अनुभव किंवा अभ्यासपूर्ण निष्कर्ष असावा. हे खरं असेल तर फारच वाईट अवस्था आहे आपली.
पण याबद्दल सुरुवातीलाच लेखकाने इशारा दिलेला आहे.


कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावर त्यावर विचार करताना कादंबरीतले काही कच्चे दुवे सापडू शकतील. हे असं कसं होऊ शकतं; किंवा या ऐवजी काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे होतं असे विचार मनात येतील. पण प्रसंगांचा वेग, संवादाची पकड यातून ते वाचताना हे सगळं आपण चटकन बाजूला टाकून पुढे उत्सुकतेने वाचत राहतो हे मला जास्त भावलं.


तुम्ही नक्की वाचून बघा ही कादंबरी आणि तुमचा अभिप्राय मला आणि लेखकाला नक्की कळवा.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

हिटलर आणि भारत (Hitler Ani Bharat)




पुस्तक - हिटलर आणि भारत (Hitler Ani Bharat)
लेखक - वैभव पुरंदरे (Vaibhav Purandare)
अनुवाद - जी बी देशमुख (G.B. Deshmukh)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - हिटलर अँड इंडिया (Hitler and India)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
पाने - १५८
छापील किंमत - रु. २७५/- 
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस ऑगस्ट२०२४
ISBN - 9789357202909

हिटलर हे माणसाच्या इतिहासातलं एक भयानक वास्तव. त्याने लाखो ज्यू लोकांची नृशंस हत्या घडवली. स्वतःच्या विस्तारवादाने संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं. पण याच हिटलरच्या काळात जर्मनीने मोठी प्रगतीही केली. नेताजी सुभाषचंद्र बोस भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी हिटलरची मदत मागायला गेले होते. बर्लिन मध्ये आझाद हिंद रेडिओ केंद्र स्थापन झाले. नेताजींना जपान प्रवासासाठी पाणबुडी उपलब्ध करून झाली. त्यामुळे तो भारताच्या बाजूने होता असा आपला समज होतो. हिटलर स्वतःला, जर्मन लोकांना शुद्ध नॉर्डिक आर्य वंशाचे असे उच्चवर्णीय म्हणत होता. भारतीय लोक पण स्वतःला आर्य म्हणवतात. त्यामुळे हिटलर सुद्धा आपल्यापैकीच एक होता व त्या प्रेमापोटीच त्याने नेताजींना मदत केली असेल असाही आपला समज होतो. पण शाळेत शिकलेल्या किंवा थोडंफार वाचनात आलेल्या जुजबी माहितीच्या पलीकडे जाऊन हिटलर आणि भारत संबंधांचा धांडोळा घेतला तर सत्य वेगळं  दिसतं हे सांगणारं हे पुस्तक आहे. लेखक वैभव पुरंदरे यांनी अनेक वर्षे संशोधन करून, जर्मनीतली कागदपत्रं, पुस्तकं आणि बरेच संदर्भ यांचा अभ्यास करून हिटलरला भारताविषयी नक्की काय वाटत होतं हे या पुस्तकातून मांडलं आहे.
लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती


अनुक्रमणिका


आपल्याला पचायला थोडं कठीण वाटेल, पण पुस्तक वाचल्यावर समजतं की हिटलर भारतीयांना आर्य वगैरे काही समजत नव्हता. तर भारतीय एक मागास जमात आहे असंच त्याचं म्हणणं होतं. ब्रिटिश भारतावर राज्य करतायेत कारण ब्रिटिश गोरे आहेत, उच्चवर्णीय आहेत, युरोपियन आहेत, सामर्थ्यवान आहेत. त्यामुळे त्यांना भारतावर राज्य करण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे आणि तो त्यांनी वापरलाच पाहिजे. भारतीयांशी उलट ते फारच सीधेपणाने वागतायत.

ब्रिटिशांनी जसे स्वतःचे साम्राज्य पसरवले तसेच जर्मनीने करावे अशी त्याची मनीषा होती. त्यामुळे सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्याची मागणी करणारे कार्यकर्ते, भारतीय विद्यार्थी, क्रांतिकारक यांना हिटलरने अजिबात जवळ केले नाही. उलट त्याचं पुस्तक माईन कांफ आणि जर्मनीतली वृत्तपत्रे यातून भारतीयांची यथेच्छ टिंगलटवाळी करण्यात येत होती. पण दुसऱ्या महायुद्धाच्या घडामोडीत ब्रिटन जर्मनीच्या विरुद्ध उभा राहिला तेव्हा केवळ ब्रिटन विरोधी प्रचाराचा भाग म्हणून त्याने भारतीयांना थोडंसं जवळ केलं. तोंडदेखली मदत केली. बरीच टाळाटाळ करून मगच काही वर्षानंतर त्यांनी नेताजींना भेट दिली. रेडिओ केंद्र उभारण्यासाठी मदत किंवा त्यांना जपानला पाठवण्यासाठी पाणबुडी इतपतच मदत केली. त्याहून जास्त काही करण्याची तयारी त्याने दाखवली नाही. उलट नेताजी आणि जपान यांची आघाडी होऊन ते भारतावर हल्ला करू लागले तेव्हा भारत ब्रिटनच्या ताब्यातून जातो की काय अशी शक्यता निर्माण झाल्यावर तो अस्वस्थ झाला.

प्रसंगाने पुस्तकाची सुरुवात होते एका अपरिचित प्रसंगाने. हिटलरच्या काळामध्ये भारतीय विद्यार्थी बर्लिन मध्ये शिकत होते. काही क्रांतिकारक गट काम करत होते. त्यांची धरपकड झाली. त्यांना तुरुंगात डांबून मारहाण झाली. इथून निवेदन सुरु होते. पुढे माईनकांफ मधले भारतीयांवरचे उतारे, हिटलरने वेळोवेळी भाषणात लेखात भारतीय कसे कमी दर्जाचे आहेत, अडाणी आहेत, गलिच्छ आहेत ही मांडलेली मते. यांची उदाहरणे येतात. रवींद्रनाथ टागोर यांनी जर्मनीला दिलेल्या भेटीनंतर त्यांचीही निंदानालस्ती कशी झाली याची उदाहरणे आहेत. अजून बऱ्याच भारतीयांचे जर्मन भेटीचे तिथल्या नकारात्मक वातावरणाचे अनुभव पुस्तकात आहेत.

ज्यूंच्या कत्तली होत असताना गांधीबाबा ज्यूंना अहिंसा पाळा असा मूर्खपणाचा सल्ला देत होते. त्याचा राग ज्यूंना येणे स्वाभाविक होतेच. पण अशा माणसाबद्दल हिटलरलासुद्धा सहानुभूती नव्हती याची उदाहरणे आहेत.
नेताजींनी हिटलरची भेट घेण्याचे प्रयत्न कसे केले, ते कसे टाळले गेले, हिटलरचे काही अधिकारीच सुरुवातीला त्यांना भेटत राहिले आणि जुजबी मदत करत राहिले हे सगळे सविस्तर लिहिले आहे. नेताजींचा पत्रव्यवहार ह्यात दिला आहे. प्रत्यक्ष भेट झाल्यावर सुद्धा हिटलरच बडबड करत राहिला आणि स्वातंत्र्य युद्धाला ठोस मदत देण्याचं त्याने नाकारलं तो प्रसंग पुस्तकात आहे.


काही पाने उदाहरणादाखल वाचूया
भारतीय पत्रकार आणि कार्यकर्ते श्री नंबियार आणि श्री नायडू यांच्या अटकेची कहाणी



भारतीयांवर ब्रिटनचं राज्य योग्य की अयोग्य, भारताच्या लढ्याला पाठिंबा द्यायचा का नाही याबद्दलच्या त्याच्या विचारांची एक झलक



बोस हिटलर भेटीतील गोलमगोल उत्तरे



काही वर्षांपूर्वी मी म्यानमारच्या आंग सान सू ची(Aung San Suu Kyi) यांचं चरित्र वाचलं होतं. त्यात म्हटलं होतं की त्यांचे वडील आंग सान हे म्यानमारचे राष्ट्रपिता मानले जातात. त्यांनी सुद्धा नेताजींप्रमाणे ब्रिटन विरोधात जपानची सैनिकी मदत घेऊन ब्रिटिशांना हाकलून लावलं होतं. पण म्यानमार जपानच्या ताब्यात सत्ता आल्यावर त्यांनी म्यानमारवर इतके अत्याचार केले की ब्रिटिश परवडले अशी अवस्था झाली. मग आंग सानने पुन्हा ब्रिटनची मदत घेऊन जपान्यांना हुसकावून लावलं. हे पुस्तक वाचताना माझ्या मनात आलं की नेताजींची योजना सफल झाली असती; हिटलरने भारताला जास्त मदत दिली असती आणि जपानचं किंवा जर्मनीचं राज्य भारतावर आलं असतं तर कदाचित भारताची अवस्थाही आगीतून फुफाट्यात अशी झाली असती का? "कमअस्सल हिंदूं"ना हिटलरने ज्यूंप्रमाणे छळछावण्यात पाठवलं असतं का? त्या कल्पनेने अंगावर काटा येतो. भारतीयांना हिटलर बद्दल प्रेम वाटण्यात काही अर्थ नाही हे या पुस्तकातून अधोरेखित होतं.

पुस्तकाच्या सुरुवातीच्या काही पानातच पुस्तकाच्या मजकुराचा किंवा मूळ गाभ्याचा आपल्याला अंदाज येतो. हिटलरची भारतीयांबद्दलची हिनेतेची भावना लक्षात येते. पण ती त्याने कशा कशा पद्धतीने ह्याची व्यक्त केली ह्याची बरीच उदाहरणे पुस्तकात दिसतात. हे बघून अचंबित व्हायला होतं. 
असंख्य व्यक्तींची नावे, प्रसंग, उधृते ह्या माहितीने भरलेलं हे पुस्तक आहे. निवेदन शैली जरा किचकट आहे. या पुस्तकाचा अनुवाद जी बी देशमुख यांनी केला आहे तो फारच बोजड झाला आहे. इंग्रजी वाक्यरचना जशीच्या तशी ठेवून शब्दशः भाषांतर केले आहे. त्यामुळे वाचताना अडखळायला होतं. बऱ्याच वेळा वाक्य गोंधळात टाकतं आणि ते पुन्हा वाचलं की मग नीट समजतं याहून. त्यामुळे पुस्तक वाचन नीरस होतं. अधिक सहज अनुवाद व्हायला हवा होता. म्हणजे पुस्तक अधिक वाचनीय झालं असतं.

लेखक वैभव पुरंदर यांनी संशोधन करून एक भीषण सत्य आपल्यासमोर ठेवलं आहे. त्यांनी घेतलेल्या परिश्रमासाठी त्यांचे खूप आभार. आणि हे पुस्तक मराठीत आणल्याबद्दल प्रकाशकांचे आभार.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

Deep state (डीप स्टेट)






पुस्तक - Deep state (डीप स्टेट)
लेखक - मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar)
भाषा - 
इंग्रजी (English)
पाने - १६०
प्रकाशन - बुकगंगा पब्लिकेशन, डिसेंबर २०२४
ISBN 978-93-92803-87-1
छापील किंमत रू. ३००/-

माझ्या पुस्तक परीक्षणाच्या उपक्रमामुळे बुकगंगाचे संस्थापक मंदार जोगळेकर यांची ऑनलाइन ओळख झाली होती. पुणे बुक फेस्टिवलच्या निमित्ताने बुकगंगाच्या स्टॉलवर त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. तेव्हा त्यांनी स्वलिखित पुस्तक मला भेट दिलं याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो.


लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती


लोकशाहीमध्ये लोक निवडणुकांमार्फत आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधींमधून सरकारची निवड होते. लोकांनी निवडून दिलेले असल्यामुळे सहाजिकच लोकांच्या लोकांच्या इच्छेनुसार सरकार काम करेल असं मानलं जातं. परंतु प्रत्येकवेळी तसं होतच असं नाही. लोकांच्या अपेक्षांच्या विपरीत ही सरकारं काम करतात. असे निर्णय घेतात ज्यामुळे लोक नाराज होतात मात्र विशिष्ट एका उद्योगाला किंवा विशिष्ट उद्योगक्षेत्राला त्याचा फायदा होतो. तसंच काही वेळ विशिष्ट उद्योग क्षेत्र दाबलं जाईल असे निर्णय घेतले जातात. अशा घटना घडल्या की, हे सरकार लोकांसाठी नाही तर त्या त्या उद्योग समूहासाठी किंवा विशिष्ट व्यक्तींसाठी काम करत आहे हा आरोप केला जातो. भ्रष्टाचार व लागेबांधे यातून काही प्रभावशाली व्यक्ती जणू कठपुतळीसारखं सरकार आपल्या तालावर नाचवतात असं म्हटलं जातं. आणि तेव्हा शब्द येतो "डीप स्टेट". समोर दिसतंय ते खरं सरकार नाही तर डीप स्टेट देश चालवत आहे अशी भावना पसरते. त्यात वावगही काही नाही. उलट त्यात तथ्य आहेच. हे तथ्य मांडण्याचं काम लेखकाने पुस्तकात केलं आहे.

लोकनियुक्त सरकार असले तरी लोकप्रतिनिधी हे काही प्रत्येक बाबतीतले तज्ञ नसतात. अशावेळी त्यांना वेगवेगळ्या सर्वेक्षण समित्याने नेमाव्या लागतात. तज्ञांचे सल्ले घ्यावे लागतात. संस्था निर्माण कराव्या लागतात. संशोधन करून घ्यावे लागते. समाजाची गरज म्हणून काही उद्योगांना सवलत देण्याचे धोरण ठरवावे लागतं तर काही उद्योगांना उत्पादनांवर बंदी घालावी लागते. प्रशासन म्हणून अधिकारी नेमावे लागतात. वरवर बघता हे सगळं योग्यच दिसतं . पण मराठीतल्या दोन म्हणीमधल्या - "तळे राखी तो पाणी चाखी" आणि "कुंपणानेच शेत खाणे" - मधल्या विकृती जेव्हा या व्यवस्थेमध्ये येतात तेव्हा लोकांच्या भल्यासाठी निर्णय न होता स्वतःच्या भल्यासाठी निर्णय घेतले जातात . लोकशाही संस्थांच्या, लोकशाही व्यवस्थेच्या आड अशी स्वार्थाची समांतर व्यवस्था उभी राहते त्यालाच आपण ढोबळमानाने डीप स्टेट म्हणू शकतो. हे डीप स्टेट कुठल्या कुठल्या प्रकाराने आपल्या समाजात अस्तित्वात येतं आणि सध्या अस्तित्वात आहे त्याचा उहापोह या पुस्तकात केला आहे. पुस्तकाच्या प्रकरणांच्या यादीवर नजर टाकली की तुम्हाला कोणकोणते पैलू लेखकाने लक्षात घेतले आहेत हे समजेल



अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर बँकांचे नियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँक बाजार, नियंत्रक संस्था इत्यादी प्रत्येक देशात तयार केल्या जातात. पण या नियंत्रकांच्यामध्येच डीप स्टेट आपले लोक घुसवतात आणि स्वतःला फायदेशीर असे निर्णय घेतात. वरवर पाहताना, सरकारने नेमलेले तज्ञ किंवा नियंत्रक निर्णय घेतायत पण निर्णय मात्र देशाऐवजी दुसऱ्या कोणाला तरी फायदेशीर असे होतात. बँकिंग प्रमाणेच संरक्षण क्षेत्रही. देशाच्या संरक्षणासाठी योग्य असे निर्णय घेतले जातीलच याची शाश्वती नाही. संरक्षणासाठी नेमलेल्या समित्या , त्यावर संशोधन करणारे लोक यांच्यामध्ये डीप स्टेट ची माणसं घुसवली जातात. मग संरक्षण खर्चात वाढ केली पाहिजे, विशिष्ट प्रकारची शस्त्रसामुग्री सरकारने घेतली पाहिजे असा अहवाल दिला जातो . मग त्याची अंमलबजावणी करण्यात येते. लोकांचा पैसा डीप स्टेट कडे जातो.
प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे हे लागेबांधे युती आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा मागवा पुस्तकात घेतला आहे. डीप स्टेट आपली माणसं सरकारमध्ये किंवा संबंधित व्यवस्थेत कशी घुसवतं ह्याची जाणीव आपल्याला होते. उदाहरणादाखल काही पानं वाचूया.

गुप्तहेर संघटना गुप्तपणेच काम करणार. पण त्यामुळेच त्यांच्याकडून सरकारवर कसं नियंत्रण ठेवलं, लोकांवर कसं नियंत्रण ठेवलं जातं जातं हे सुद्धा गुप्त राहतं. वाढत्या तंत्रज्ञानामुळे लोकांची माहिती मिळवणं त्यावर नियंत्रण ठेवणे हे अजूनच सोपे होत आहे त्याबद्दल ही दोन पानं.


न्यायव्यवस्थेतील डीप स्टेट बद्दल


अशाप्रकारे डीप स्टेट या महत्त्वाच्या सामाजिक संकल्पनेबद्दल लेखकाने चांगला विषयप्रवेश केलेला आहे त्यामुळे जागरूक वाचकांना हे पुस्तक वाचायला आवडेल.

पण या पुस्तकात दिलेली उदाहरणं ही अमेरिकेतली आहेत. अमेरिकेतले कायदे, तिथल्या प्रशासकीय संस्था, तिथल्या घटना यांची उदाहरण आहेत. सर्वसामान्य भारतीयाला त्या गोष्टी माहिती असण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी किंवा त्याबरोबरीनेच लेखकाने भारतीय उदाहरण घेतली असती तर पुस्तक अजून रिलेट करता आलं असतं.
दुसरी गोष्ट अशी की पुस्तकात दिलेली उदाहरणं ही एक दोन ओळीत संपवलेली आहेत. कुठलंही उदाहरण किंवा प्रसंग खोलात जाऊन सविस्तरपणे सांगितलेला नाही.त्यामुळे "लागेबांधे निर्माण होतात" हा मुद्दा पोचतो; पण ते खरंच कसं होतं, कसं झालं, त्याचे मोठे परिणाम काय झाले हे, याची ठोस उदाहरण कळत नाहीत. ते तपशील असते तर विवेचनाचं गांभीर्य अधोरेखित झालं असतं आणि पुस्तकही जास्त रंजक झालं असतं. आता ते फारच वरून वरून जातय असं सारखं वाटत राहतं.

उद्योग-सरकार, बिल्डर-सरकार, वाळूमाफिया-सरकार, कंत्राटदार-सरकार अशा अभद्र युतीपेक्षाही "डीप स्टेट" ही मोठी घडामोड आहे. वेगवेगळ्या देशातले लोक पडद्यामागे एकत्र येऊन दुसऱ्या देशातसुद्धा सामाजिक राजकीय उलथापालत करू शकतात हा मुद्दा मात्र पुस्तकातून ठळकपणे येत नाही. भारताच्या शेजारी देशांमध्ये- बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान येथे झालेल्या आंदोलनांमधून सरकार उलथून टाकण्यात आलं या घटनांमुळे खरंतर भारतात डीप स्टेट हा मुद्दा जास्त चर्चेला आला आहे. भारतातले राजकीय पक्ष, काही शैक्षणिक संस्था, मीडिया हाऊसेस हे सगळे मिळून असं समांतर सरकार चालवण्याचा किंवा सध्याचे सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा अनेकांचा दावा असतो. ते लोकांमध्ये जाणून-बुजून असंतोष पसरवत आहेत अराजकाला निमंत्रण देत आहे असा दावा असतो. हा मोठा पैलू पुस्तकातून निसटला आहे पुस्तक हातात घेताना खरंतर मी ह्या अपेक्षेने पुस्तकात कडे बघत होतो.
त्यामुळेच डीप स्टेट बद्दल विषयप्रवेश म्हणून वाचायला चांगलं पुस्तक आहे. पुढच्या आवृत्तीत वरच्या मुद्द्यानुसार जर निवेदनात वाढ करण्यात आली तर पुस्तक अजून उपयुक्त होईल असं मला वाटतं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

खुलूस (Khuloos)



पुस्तक - खुलूस (Khuloos)
लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९६
प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने २०२३
छापील किंमत - रु. ३००/-
ISBN - 978-93-92374-67-8

"वेश्या" हा शब्द किंवा त्याअर्थाचे शब्द सुसंकृत कुटुंबात जाहीरपणे उच्चारले जात नाहीत. चारचौघांमध्ये बोलताना असे शब्द उच्चारले गेले तरी ते बहुतेकवेळा दुसऱ्याला शिवी देतानाच. ते शब्द, तो शरीरविक्रयाचा व्यवसाय आणि तो चालणाऱ्या जागा म्हणजे सभ्य समाजासाठी निषिद्ध बाब. पण गावोगावी अशी बदनाम वस्ती असते हे प्रत्येकालाच ठावूक असतं. सभ्य लोक तिकडे जात नाहीत, सभ्यतेचा बुरखा पांघरलेले लोक तिथे गेल्याचं उघडपणे सांगत नाहीत तर असभ्यांना तिथे गेल्याशिवाय करमत नाही. पण लेखक समीर गायकवाड तिथे गेले आहेत ते वेश्यांचं माणूसपण मान्य करून; ते माणूसपण समजून घेण्यासाठी. त्यातून त्यांना ज्या असंख्य स्त्रिया भेटल्या त्यांचे अनुभव ह्या पुस्तकात शद्बबद्ध केलेले आहेत. पुस्तकात वेगवेगळ्या वेश्यांच्या आयुष्याबद्दल, त्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगांचे वर्णन आहे. लेखकाच्या मनोगतात लिहिलेला हा परिच्छेद पुस्तकात काय वाचायला मिळेल हे सांगतो

"या गोष्टी ज्या स्त्रियांच्या आहेत त्या आता हयात आहेत की नाहीत हे देखील छाती ठोकपणे सांगता येणार नाही या बायका खोट्या नाहीत की यांची दुःख बेगडी नाहीत. त्यांनी स्वीकारलेलं हे आयुष्यही त्यांचं स्वतःचं नाही. जगाने लादलेलं हे बाईपणाचं ओझं त्यांनी अगदी इमानाने असोशीने आयुष्यभर जतन केलंय. त्याची तक्रारही कधी कुठे केली नाही. जरी त्याची कुठे कैफियत केली असती तरी त्याचा काही उपयोग झाला नसता हे कदाचित त्यांना ठाऊक असावं. या गोष्टींमधल्या नायिका जीवनाच्या विविध टप्प्यावर भेटत गेल्या. काही प्रत्यक्ष भेटल्या तर काहींच्या निव्वळ स्मृतींची अनुभूती. तर काहींची चित्तरकथा ऐकीव असली तरी ती काही सांगोवांगीची बात नाही. त्याला आगापिछा आहे, शेंडी-बुडखा आहे. या कथांमध्ये भौगोलिक संदर्भ मात्र नाव बदलून लिहिले आहेत."

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


अनुक्रमणिका



ह्या सगळ्या बायका काय तिथे आनंदाने येतात ? स्वखुशीने येतात ? आर्थिक परिस्थितीमुळे पैसे मिळवण्यासाठी मोलमजुरी करताना शरीर झिजवणे किंवा शरीर विकून - झिजवणे ह्यात समाज नैतिक - अनैतिक असा भेद करतो ना ! मग ह्या बायका तिथे आनंदाने कशा येत असतील ? "शरीरविक्रय" करणाऱ्या ह्या बायकांना "बाजारबसव्या" हा हेटाळणीपूर्वक शब्द वापरला जातो. पण त्यांना बाजारात बसायला भाग पडणारा समाजच आहे. ह्या जहाल वास्तवाची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. बहुतेकींना लहानपणीच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनीच विकलं होतं. गरीबीपोटी उत्पन्नाचं साधन म्हणून ह्या मुलींना धंद्याला लावण्यात आलं. काहीवेळा जवळच्या पुरुष नातेवाईकांनीच शारीरिक अत्याचार केले आणि वर मुलीलाच कुलटा ठरवून घराबाहेर घालवलं आणि ह्या धंद्याकडे ढकललं. "डोक्यात जट आली" ही अंधश्रद्धा सुद्धा पुरेशी होते. काही जणींना मित्राने तर कधी प्रत्यक्ष नवऱ्यानेच फसवून परगावी आणलं आणि जबरदस्ती विकून टाकलं. अशा कितीतरी करुण कहाण्या पुस्तकात आहेत.

बाजारात बसायला लागणे हाच खरा तर दुर्दैवाचा परमोच्च बिंदू असायला हवा. पण ही तर दुर्दैवाची सुरुवात ठरते. शारीरिक अत्याचार, पैशांची फसवणूक, घरादारापासून कायमचं तुटलेपण, व्यसनाधीनता आणि अनाम मरण अशा पुढच्या पायऱ्याही ठरलेल्या. ह्या करुण वास्तवाची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. कामातून मिळणारे पैसे पै पै करत साठवायचे. पण तिथेही चोऱ्यामाऱ्या होऊन लुबाडणूक होते. पैसे साठवून तरी करणार काय ? मग ते पैसे व्यसनात उडवले जातात. देणी, उधारी ह्यांचं दुष्टचक्र सुरु होतं. कधी एखादं गिऱ्हाइक प्रेमाच्या गोष्टी बोलतं, जीव लावतं आणि गोडबोलून पैसे घेऊन पळून जातं. ह्या नादात दिवस गेले आणि बाळाला जन्म द्यायचं ठरवलं तर हाल दुप्पटच. बाळ सांभाळून धंदा करायचाच. नवरा असेल तर तोही मारहाण करून पैसे उकळणार. पोलीस, राजकारणी बडी धेंडं ह्यांची अरेरावी विकृती सुद्धा झेलावी लागते. असे अंगावर शहारे आणणारे प्रसंग पुस्तकात आहेत.

"कुंटणखाना" हेच घर आणि तिथल्या इतर बायका, मालकीण, दल्ले , गिऱ्हाईक हेच आता आपले नातेवाईक, आपले सर्वस्व हे नाईलाजाने मान्य केले जाते. मग इथेच कोणी कोणाची मानलेली बहीण होतं, कुणी आई. एकमेकींना भावनिक आधार देतात. एखाद्या गिऱ्हाइकाच्या प्रेमात पडून दिवस जाऊन कोणी होतं खरं आई. अशा दुसरीच्या मुलांना जीव लावून कोणी पुरवून घेतं आपलं आईपणाचं स्वप्न. ज्या मनाने अजून खमक्या आहेत त्या बनतात इतरांचा आधार. गिऱ्हाईक - दलाल ह्यांच्याकडून होणाऱ्या फसवणुकीत एकमेकांसाठी खंबीर पणे उभं राहून , कधी जीवाची बाजी लावून संकट टाळतात. कधी त्यांच्यातही चालते सुप्त स्पर्धा तर कधी "मालकीण" होण्यासाठीची लढाई. असे बरेच किस्से पुस्तकात आहेत. बाहेरच्या समाजातून वेगळ्या काढून छोट्या समाजात कोंडल्या गेलेल्या ह्या वेश्यांमध्येही दिसतात तेच गुण-दोष-भावना-राग-लोभ. म्हणून त्यांच्यातलं माणूसपण अधोरेखित करणारं हे पुस्तक आहे.

कोरोना काळात सगळं जग बंदी झालं. "स्पर्श टाळा", "एकमेकांपासून दूर रहा" हे सांगणं म्हणजे वेश्याव्यवसायाला विपरीतच. त्यामुळे ह्याकाळात वेश्यांच्या हलाखीत भरच पडली. काही जणी उपासमारीने मेल्या अशीही काही उदाहरणं पुस्तकात आहेत. गणपती, नवरात्र, ईद, ख्रिसमस ह्या उत्सवांच्या काळात सगळीकडे धामधूम असते. बाजारपेठा सजतात. तशीच चलती असते "चमडीबाजारात" सुद्धा. त्याबद्दलसुद्धा एकदोन लेख आहेत. वेश्यांच्या मुली साहजिक ह्याच धंद्याकडे वळवल्या जातात तर मुलं दलाल, गुंड, व्यसनाशी संबंधित कामात गुरफटली जातात. ह्यावर एक लेख आहे.

एकूण वास्तवच भयाण असल्याने पुस्तकाचं वाचन आपल्यालाही अस्वस्थ करतं. पण त्या अंध:कारात प्रकाशाची तिरीप असावी असे दोन लेख आहेत. काही स्वयंसेवी संस्था ह्या वेश्यांना मदत मिळावी, त्यांच्या मुलांनी ह्या बाजारातून बाहेर पडावं, फसवणूक झाली असेल तर न्याय मिळावा, थोडंफार शिक्षण मिळावं ह्यासाठी प्रयत्न करत आहेत. एनजीओ च्या कामाचं एक यशस्वी उदाहरण "एक कळी वाचली" लेखात आहे. तर गुजराथ मधील प्रसिद्ध संत व प्रवचनकार "मुरारीबापू" ह्यांनी वेश्यांना सनामनापूर्वक वागणूक कशी दिली ह्यावरही एक लेख आहे.

पुस्तकाची काही पाने उदाहरणादाखल

कोठीची मालकीण पन्नीबाई आणि तिथे धंदा करणाऱ्या सुरखी चं हे वर्णन. एकदा धंद्यात पडलं की त्याचे छक्केपंजे समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही.



नलिनी गरीब घरी जन्माला आली. लहानपणी आई वारली. सावत्र आईने छळ केला. वडिलांनी तिला काकाकडे - सिद्धू - कडे पाठवलं. पण अवस्था आगीतून फुफाट्यात. दारिद्र्य आणि नीतिहीन कुटुंब ह्यामुळे मुली ह्या धंद्यात कशा ढकलल्या जातात ह्याचं प्रातिनिधिक उदाहरण



शकीला आणि नसीम ह्या आईमुली. दोघीही धंदा करणाऱ्या. नसीम ला शंका आली की आईला पैसे मिळतात पण तिच्याकडे तेवढी शिल्लक नाही. ती कोणाला देते ? मुलीने आईचा पाठलाग केला आणि तिला दिसलं वेगळंच सत्य. तिला दिसलं आपल्या आईमधलं मातृप्रेम



लेखकाच्या शैलीने पुस्तकातलं गांभीर्य, दैन्य यथार्थ टिपलं आहे. तरी पुस्तक रुक्ष सरकारी अहवाल होत नाही. ह्याचं कारण लेखकाची शैली खेळकर, कधी विनोदी तर कधी नागवं सत्य मांडायला आवश्यक अशी रोखठोकच. अश्लील वर्णन कुठे नसलं तरी नक्की काय होतं आहे ह्याचा थेट भाव पोचतो. लेखांचा शेवट बहुतेक वेळा एका साहित्यिक-ललित अंगाने त्या प्रसंगाचे अमूर्त वर्णन करत केलेला आहे.

आपल्या समाजाचा एक भाग कसा आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने हे वाचलंच पाहिजे. ह्या वाचनातून वेश्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन माणुसकीचा तरी होईल. ज्याच्या त्याच्या वकुबानुसार मदतीचा हातही पुढे करावासा वाटेल. तितकं झालं तरी हे पुस्तकाचे लेखक - प्रकाशक ह्यांच्या कामाचं चीज झालं असं म्हणता येईल.

शेवटी पुस्तकाबद्दल लेखकाचे शब्दच उसने घ्यायचे तर ..

"खुलूस" म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था, निष्ठा ... किटाळ ठरवून समाज ज्यांचा तिरस्कार करतो, त्यांच्यातील निर्मळ सच्चेपणाचा धांडोळा घेणाऱ्या या रेड लाईट डायरीज ..."

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)

पुस्तक - गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi) लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande) भाषा - मर...