The Basics of Success (द बेसिक्स ऑफ सक्सेस)




पुस्तक - The Basics of Success  (द बेसिक्स ऑफ सक्सेस)
लेखक - Tim Connor (टिम कॉनर)
भाषा - English (इंग्रजी)


"द बेसिक्स ऑफ सक्सेस" हे एक शंभर पानांचं छोटेखानी पुस्तक आहे. इतर कुठल्याही स्वमदत (Slef-help) प्रकारच्या पुस्तकाप्रमाणे यातही ध्येयनिश्चिती(Goal setting), वेळेचं नियोजन, अतिआवड(passion),अपयश पचवण्याची तयारी, दीर्घोद्योग याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकारची इतर पुस्तकं वाचली असतील तर यात तुम्हाला नवीन काही वाचायला मिळणार नाही. 

इतर पुस्तकांमध्ये मुद्दा समजवून देण्यासाठी प्रत्यक्ष आयुष्यातील उदाहरणं दिलेली असतात, प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील घटना दिलेल्या असतात. या पुस्तकात तेही नाही. थेट मुद्द्याला हात घालणारा परिच्छेद आणि त्यामागो माग एकोळी(oneliners)ची जंत्री आहे. त्यामुळे मुद्दा पटतो पण हृदयाला भिडत नाही. म्हणूनच पुस्तक वाचून एखाद्यावर सकारात्मक परीणाम होण्याची शक्यता कमी वाटते. 

पुस्तकात काही कविताही आहेत. पण त्याही यथा तथाच आहेत. त्यांचा कवी कोण -लेखकच का आणि कोणी- हे दिलेलं नाही. 

हे पुस्तक एक परिपूर्ण पुस्तक न वाटता, एखाद्याने या विषयावरची बरीच पुस्तकं वाचून त्याची काढलेली टिपणं (notes) आहेत असं वाटतं. 
लेखकाच्या दिलेल्या माहिती प्रमाणे तो १९७४ पासून यशस्वी वक्ता आणि ट्रेनर आहे. अशा अनुभवी व्यक्तीच्या पुस्तकाकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा मात्र हे पुस्तक पूर्ण करत नाही. 

तुम्ही या विषयीची पुस्तकं वाचली असतील तर नोट्‍स म्हणून, एखादं खुसखुशीत वाक्य चटकन मिळावं या उद्देशाने हे पुस्तक जवळ ठेवता येईल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar)




पुस्तक :- डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar)
लेखक :- ना.ह.पालकर (N.H.Palkar)

भाषा :- मराठी (Marathi)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे हे चरित्र. 

रा.स्व. संघ ही अतिशय प्रसिद्ध संघटना आहे. ती जितकी लोकप्रिय आहे तितकीच तितकीच टीका झेलणारी ही आहे. विशेषतः सध्या संघापरिवारातील भा.ज.प. पक्षाचे पूर्ण बहुमतातील सरकार असल्याने रा.स्व.संघ हा बऱ्याच वेळा चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळेच संघ काय आहे, त्याची सुरुवात का आणि कशी झाली, त्याचे स्वरूप कसे घडत गेले हे समजून घेणे औत्सुक्याचे ठरते. 

ना.ह.पालकरांसारख्या ज्येष्ठ स्वयंसेवक आणि समाजसेवकाने हे चरित्र लिहिले आहे तर दुसरे सरसंघचालक गोळवलकर श्रीगुरुजी यांची याला प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत गुरुजींनी या चरित्रलेखनामागचे लेखकाचे कष्ट विशद केले आहेत. डॉक्टारांची प्रसिद्धी परांगमुखता आणि क्रांतिकार्यातल्या सहभागामुळे स्वतःबद्दल पाळावी लागलेली गुप्तता ही त्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे संदर्भ कागदपत्रे आणि डॉक्टरांना भेटलेल्या व्यक्तींची भेट घेण्यासाठी लेखकाला खूप भटकंती आणि प्रचंड मेहनत करावी लागली आहे. 

कुठल्याही इतर चरीत्रानुरूप चरित्रानायकाचा अर्थात डॉक्टरांचा पूर्ण जीवनक्रम -बालपण, जडणघडण, कार्य, विशेष घडामोडी , समस्या आणि जीवनाखेर - यात मांडला आहे. संदर्भासाठी डॉक्टरांचा पत्रव्यवहार, तत्कालीन वृत्तपत्रांतले लेख, भाषणाची प्रतिवृत्ते, लोकांनी सांगितलेल्या आठवणी या सगळ्याचा समावेश आणि उल्लेख यात असल्याने हे चरित्र एक महत्त्वाचा दस्तैवज ठरतो. 
लेखकाची शैली साधी, सरळ, पल्लेदार वाक्य टाळणारी आहे. तसंच नुसते प्रसंगामागून प्रसंग न सांगता लेखकाने वेगवेगळ्या घटनांमध्ये दिसणारी डॉक्टरांची स्वभाववैशिष्ट्ये आणखीन उलगडून दाखवली आहेत. त्यामुळे लेखक आपल्यालाशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे असा भास होतो. चरित्र वाचन त्यामुळे नीरस होत नाही. 

संघावरचा एक आक्षेप असतो की संघाने स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला नाही. संघ कॉंग्रेसविरोधी आहे. पण प्रत्यक्ष डॉक्टर तेव्हाच्या कॉंग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते होते, तत्कालीन मध्यप्रांतातले एक लोकप्रिय पदाधिकारी होते. इतकंच काय त्यांनी स्वतः क्रांतिकार्यातही भाग घेतला होता ही बाब अनेकांना माहीत नसेल. जी या चरित्रातून नीट समजते. 
डॉक्टरांनी कॉंग्रेस अंतर्गतच एक स्वयंसेवक दल उभारायचा व त्याला लष्करी पद्धतीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. पण तत्कालीन अहिंसेच्या बाजूला असणाऱ्यांना ही बाब फारच हिंसक वाटल्यामुळे ते शक्य झाले नाही. 
संघ स्थापनेनंतरही त्यांनी कायदेभंग चळवळीशी संबंधित जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला होता. तुरुंगवास भोगला होता.

तेव्हा मध्यप्रांतात आणि देशभर वारंवार मुस्लीम-हिंदू दंगली होत असत. मुस्लीम समाजातील समाजकंटक प्रवृत्ती वाद उकरून हिंदू समाजाला त्रास देण्याचा, खिजवण्याचा प्रयत्न करत असत. ब्रिटिश सरकारचे त्याला छुपे अनुमोदनच असे. असंघटीत आणि अंतर्गत भेदाभेदांनी ग्रस्त हिंदू समाज या दंडेलशाही ला प्रत्युत्तर द्यायला कमी पडत असे. बहुसंख्य असूनही भीतीच्या सावटात वावरण्याची वेळ हिंदू समाजावर येत होती. याची अनेक उदाहरणं या चरीत्रात आढळतील. यावेळी डॉक्टरांनी हिंदू समाजाला कसा धीर दिला, एकत्र केले, तात्पुरत्या संरक्षणाची व्यवस्था निर्माण केली आणि प्रसंगी स्वतः वरच्या जीवघेण्या हल्ल्याची पर्वा न करता पुढे होऊन नेतृत्त्व केले.
संघ स्थापनेमागची कारणे समजण्यासाठी ही तत्कालीक परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे ठरते. 

संघाचे बीजारोपण झाल्यावर डॉक्टरांच्या अविश्रांत परीश्रमाला सीमाच राहिली नाही. डॉक्टरांची गुणग्राहकता, व्यक्तीची पारख, लोकसंग्रह हे गुण उजळून दिसतात. डॉक्टरांनी केवळ संघटनेसाठी लोकांची मनं जिंकण्यासाठी आणि मनं राखण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या तब्येतीची काळजीही केली नाही. आणि मदतीला, प्रत्यक्ष सहभागाला कधी कांकू केली नाही. चरीत्रात हे प्रसंग वारंवार आढळतील. 

त्यावेळी संघ प्रचारासाठी सिंध, लाहोर, मुलतान पर्यंत त्यांचे दौरे होत असत. आणि आत्ता पाकिस्तानात गेलेल्या भागातही संघ शाखांची सुरुवात झाली होती. संघाची प्रार्थना आणि आज्ञा आधी मराठी व संस्कृत अशा मिश्र होत्या. पण संघ मराठी मुलुखाबाहेर पसरू लागल्यावर त्या सगळ्यांना सन्मान्य होतील अशा पद्धतीने संस्कृत मध्ये करण्यात आल्या.

भागानगर (हैद्राबाद) मध्ये तेव्हा सुरू असलेल्या मुस्लिम अतिरेकाविरुद्धच्या लढ्यात संघाने भाग घेतला नव्हता. पण असंख्य स्वयंसेवकांनी त्यात भाग घेतला होता. संघाच्या हिन्दुत्त्ववादी विचारांनी संस्कारीत होऊनच ते सहभागी झाले होते. पण तरीही संघ त्यात उतरला नाही. संघ प्रत्यक्ष आंदोलनात न उतरल्याची अशी अजूनही काही उदाहरणं आहेत. प्रत्येकवेळी संघाला जबरदस्त टीकेला तोंड द्यावं लागलं. यावेळी डॉक्टरांच्या "संघशः सहभाग" आणि "व्यक्तिशः सहभाग" या कल्पनांची ओळखही आपल्याला होते. संघाचे काम हे दीर्घकाळ चालणारे, अनेक पिढ्या घडवण्याचे आहे. हे "नित्य" काम आहे तर अशी आंदोलने ही "नैमित्तिक" कामं आहेत. नैमित्तिक कामांमध्ये सुसंस्कारीत स्व्ययंसेवक सहभाग घेतल्याशिवाय राहणारच नाहीत. पण "नैमित्तिक" कामाच्या गोंधळात "नित्य" कामावर परीणाम होऊ नये या साठी "संघशः सहभाग" आणि "व्यक्तिशः सहभाग" हा भेद ठेवण्याची डॉक्टरांची दीर्घकालीन दृष्टी होती. संघ विरोधकांनाही वादात हरवून त्यांना दुरावण्यपेक्षा त्यांची टीका सहन करून, प्रत्यक्ष वाढलेल्या कामातूनच त्यांना उत्तर द्यायचे असा त्यांचा स्वभाव होता. 

या चरित्रात आपल्या डोळ्यासमोर हेडगेवार-गांधीजी, हेडगेवार-सुभाषबाबू, हेडगेवार-सावरकर बंधू (तात्याराव, बाबाराव),हेडगेवार-लोकनायक अणे, हेडगेवार-श्यामाप्रसाद मुखर्जी ई. अनेक महानायकांच्या भेटी, पत्रव्यवहार, विचारविनिमय असे ऐतिहासिक प्रसंग आपल्यासमोर उभे राहतात. 

पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात लेखकाने डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचा ऊहापोह केला आहे. डॉक्टरांची कौटुंबिक गरीबी असूनही इतरांसाठी सतत देता हात, मित्र जोडण्याची हातोटी, राजकीय विरोधकांशीही सौहार्दाचे संबंध, समोरच्याला न दुखावता त्याची चूक त्याला समजवून देण्याचे कसब, थट्टामस्करी करत वातावरण हलकेफुलके ठेवण्याचा कसब, हिन्दुत्त्वावरील अविचल निष्ठा, कमालीचा स्वार्थत्याग असे असंख्य पैलू ! 
या पाचशे पानी पुस्तकात हेडगेवारांची दुर्मिळ छायाचित्रेही आहेत.

म्हणूनच संघाच्या स्वयंसेवकांनी, संघाशी जवळीक असणाऱ्यांनी आणि संघाच्या कट्टर विरोधकांनीही हे चरित्र अवश्य वाचलेच पाहिजे. संघाविशयी असलेले काही गैरसमज दूर व्ह्यायला मदत होईल तर काही समज अधिक द्रुढ होतील. या महत्त्वाच्या संघटनेचे आणि तिच्या जनकाचे केवळ अज्ञाना पोटी लंगडे समर्थन किंवा विरोध दोन्ही टाळण्यासाठी हे चरित्र वाचाच.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

कथा मारुती उद्योगाची Katha Maruti Udyogachi




पुस्तक :- कथा मारुती उद्योगाची (Katha Maruti Udyogachi)
भाषा :-  मराठी (Marathi)
मूळ इंग्रजी पुस्तक :- The Maruti Story
लेखक :- आर. सी. भार्गव(R.C. Bhargav)  सहलेखन :- सीता(Sita)

मराठी अनुवाद :- जॉन कोलासो (John Colaco)

८० च्या दशकातल्या भारतात जेव्हा गाडी असणं हे फक्त श्रीमंतांच्य अवाक्यात होतं तेव्हा मध्यमवर्गीयांच्या स्वतःच्या गाडीचं स्वप्न जिने पूर्ण केलं ती म्हणजे "मारुती ८००" गाडी . "मारुती" हे नाव त्यामुळेच सर्वांना सुपरिचित आणि आपलेपणा वाटायला लावणारं आहे. तेव्हापासून आजपर्यंत मारुतीने भारतीय वाहन उद्योगावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळेच मारुती-सुझुकी हे आजच्या भारतीय वाहन उद्योगातलं अग्रगण्य नाव. तर अशा ऐतिहसिक आणि यशस्वी वाहन उद्योगाची कहाणी म्हणजेच "कथा मारुती उद्योगाची". आणि ही कथा संगतायत मारुतीच्या जन्मपासून यात सहभागी असलेले आणि कंपनीचे चेअरमन पद भूषवणारे आर. सी. भार्गव

माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचं स्वप्न होतं - भारतात गाडी बनवायचं, "जनतेची गाडी" बनवायचं. आणि यातूनच त्यांनी गुरगावला सुरुवात केली मारुती उद्योगाची.(पण त्यांनी याचं नाव "मारुती" का ठेवलं हे गुपितच आहे. कदचित ते काळाच्या ओघात कायमचं दडून गेलं आहे). इथपासून लेखकाने आपल्याला सांगायला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांचा मुलगा म्हणून मारुतीसाठी नियम, परवाने कसे वाकवले गेले हे त्यांनी सांगितलंय. पुढे संजय गांधींचा अपघाती मृत्यू आणि कॉंग्रेसचा पराभव यामुळे सुरुवात होता होताच कंपनी बंद पडली. इंदिरा गांधींचं सत्तेत पुनरागमन झाल्यावर मात्र मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने मारुतिच्या पाठीशी उभ्या राहिल्या. मारुतीचे राष्ट्रियीकरण करण्यात आले. पण इतर सरकारी उद्योगांप्रमाणे मारुतीला वाऱ्यावर न सोडता मारुतीच्या यशासाठी एखाद्या खाजगी कंपनी प्रमाणे तिचा कारभार चालवला जाऊ लागला. त्यामुळे सरकारी कंपनी म्हणून मिळणारं पाठबळ आणि तरीही खाजगी कंपनीतली कार्यक्षमता असा दुहेरी फायदा सुरुवातीला मारुतीला झाला.

तेव्हाची परवाना पद्धती, आयातीवर असलेले कडक निर्बंध, परकीय चलनाच्या तुटवड्या मुळे उद्योग स्थापन करण्यात आलेल्या अडचणी खूप विस्ताराने सांगितल्या आहेत. सरकारं बदलत गेली तसतसा वाढलेला लालफीतीचा कारभार, मंत्र्यांचे-अधिकाऱ्यांचे स्वार्थ, सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी म्हणून निर्णय घेताना येणाऱ्या मर्यादा हे तत्कालीन उद्योग-उदासीन धोरणाचे आणि अजूनही भारत विकसित देश का झाला नाही याचं यथार्थ दर्शन घडवतात. 

मारुतीकडे वाहन निर्मितीकरिता स्वतःचं तंत्रज्ञान नसल्याने एखाद्या परकीय कंपनीशी भागिदारी करणं आवश्यक होतं. अशा भागिदाराचा शोध घेण्यासाठी लेखक आणि तत्कालीन व्यवस्थापनाने अनेक देश पालथे घातले. त्यात आलेले अनुभव, चढउतार देखील वाचण्यासारखे आहेत. "सुझुकी"ला पाठवलेला पत्रव्यवहार तिकडे चुकीच्या विभागत गेल्यामुळे सुझुकीकडून अपेक्षित प्रतिसाद आलाच नव्हता पण सुदैवाने चूक लक्षात आली आणि इतिहासाला नवी कलाटणी मिळाली. मारुती-सुझुकी भागिदारी सुरू झाली.

पहिली गाडी तिरुपती बालाजी देवस्थानला अर्पण करण्यात आली. तर नंतर त्याकाळी अनोख्या ठरलेल्या संगणीकृत यादीद्वारे प्रतिक्षा यादीतील लोकांना गाड्या वाटण्यात आल्या. गाडीला प्रचंड मागणी असल्याने त्यात गैरव्यवहार होण्याची शक्यता खूप होती. पण व्यवस्थापनाने हे गैरव्यवहार कसे रोखले हेही सविस्तर मांडलं आहे. 

"सुझुकी" ही जपानी कंपनी असल्याने भारतीय व्यवस्थापनाला, कामगारांना जपानी कार्यपद्धतीची ओळख झाली आणि या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांनाही तिची ओळख होते. जपानी लोकांची स्वच्छता, वक्तशीरपणा, कामाचं काटेकोर नियोजन, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतल्या बारकाव्यांना महत्व, कामगारांना सतत प्रेरित ठेवण्याची पद्धत, कामगारांकडून सूचना घेणे ई. गोष्टी आणि त्यांचा मारुतीला झालेला फायदा नक्कीच प्रेरणादायी आहे. यातून फक्त मारुतीच नव्हे तर पूर्ण भारतीय वाहन उद्योगाला नवीन दिशा मिळाली.

मारुती मध्ये सुरुवातीला सरकार मुख्य भागिदार तर सुझुकी दुय्यम भागिदार होती. २६ वर्षांच्या कालावधीत सरकारी भाग घटत शेवटी सुझुकी कंपनी मुख्य भागिदार झाली. पण सरकार, मारुती व्यवस्थापन आणि सुझुकी यांचे परस्पर संबंध नेहमीच चांगले राहिले असे नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीचे त्यांच्यावर बरे वाईट परिणाम झाले. एकमेकांविरुद्ध कोर्ट-कचेऱ्या झाल्या, लेखका विरुद्ध त्यावेळी सीबीआय चौकशी झाली. एका क्षणी सुझुकी कंपनी बाहेर पडून "देवू" कंपनी त्याजागी येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण पुढे ती टळली. 
कायदे क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेषतः कंपनी कायदे क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही केसस्टडी वाचणं आवडेल.

मारुतीने फक्त आपल्या उत्पादनांतच गुणवत्ता राखली नाही तर विक्री, वितरण आणि विक्री पश्चात सेवा यांमध्येही ती राखली. यासाठी कंपनीने विक्रेते, वितरक नेमण्याची काय पद्धत अवलंबिली, त्यांना प्रशिक्षित कसे केले, त्यांनाही नफा कसा होईल हे बघत गाड्यांच्या व सुट्ट्या भागांच्या किंमती कशा ठरवल्या, विमा आणि जुनी वाहने खरेदीचे पूरक उद्योग कसे सुरू करून दिले, ग्रहकाभिमुख व ग्रहकस्नेही व्यवस्था कशा बनवल्या हे सगळं लेखकाने विस्ताराने समजावून सांगितलं आहे.

व्यवस्थापनाने कामगारांशी पहिल्यापासूनच संबंध कसे चांगले ठेवले होते, कमगार संघटना विधायक पद्धतीने कशा चालवल्या, तरीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी संप कसे झाले, ते कसे हाताळले गेले या विषयीही विस्तृत विवरण यात आहे.  

हे पुस्तक जेमतेम २०० पानी आहे. पण वरचे इतके परिच्छेद वाचल्यावरच लक्षात आलं असेल की त्यात दिलेली माहिती खूप आहे. वाहन विषयक तांत्रिक बाबी त्यात आहेत, कायदेशीर बाबी आहेत, सरकारी कामकाजाबद्दलची महिती आहे, व्यवस्थापन कौशल्या विषयी आहे. त्यामुळे नेहमीच्या कथा-कादंबरी-चरित्र वाचणऱ्यांना हे पुस्तक कंटाळवाणं वाटू शकतं. पण तरूण उद्योजक, व्यवस्थापक, कायदे अभ्यासक आणि वर्तमान घडामोडींबद्दल वाचणाऱ्यांना हे पुस्तक आवडेल. पुस्तकात वाचलेलं सगळं लक्षात राहणं कठीण आहे- त्याची खरी गरजही नाही - पण या पुस्तकाच्या त्यानिमित्ताने उद्योग विश्वाचा होणारा परिचय आणि नकळत शिकल्या जाणाऱ्या काही संकल्पना यामुळे या पुस्तकाचं वाचन सत्कारणी लागेल हे निश्चित.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)


----------------------------------------------------------------------------------

संपूर्ण बाळकराम (Sampurna Balakram )




पुस्तक :- संपूर्ण बाळकराम (Sampurna Balakram )
लेखक :- राम गणेश गडकरी (Ram Ganesh Gadakari)
भाषा :-  
मराठी (Marathi)

मराठीतील प्रसिद्ध कवी, नाटककार, विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांच्या विनोदी लेखांचा हा संग्रह आहे. गडकऱ्यांचं नाव सहित्यकारांत मानाचे आहेच तसेच "बाळकराम"ही प्रसिद्ध आहे, किमान सध्याची तरूण पिढी सोडल्यास मागील पिढ्यांमध्ये.  

"बाळकराम" य टोपण नावाने एका सवर्ण समाजातील मध्यमवर्गीय प्रौढाच्या भूमिकेतून हे लेख लिहिले आहेत. वेगवेगळ्या विषयांवर अतिशयोक्ती, विडंबन, उपमा यांचा आधार घेत छान विनोद साधले आहेत. 
लेखांचे विषय वेगवेगळे आहेत - मुलीचे लग्न जमवण्याची खटपट, खाण्याचे पदार्थ आणि खऱ्या आयुष्यातील प्रसंग, ओढूनताणून कविता करणाऱ्या कवींच्या तऱ्हा, नाटकाची फुकट तिकिटे मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग, पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यात घडणारे प्रकार ई.

सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा (१९०० च्या आसपासचा)समाज आपल्याला यात दिसतो. तेव्हाच्या हुंडा पद्धतीने वरपिता कसा गांजला जाई आणि वरपिता कसा आढ्यतापूर्वक वागे याची जाणीव आपल्याला होते. 
स्वातंत्र्यचळवळीतले वेगवेगळे प्रवाह आणि त्यातल्या हौश्या-नवश्यांचे प्रयत्न हे पण गडकऱ्यांच्या विनोदी शैलीतून आपल्याला दिसतात.

उदा. लग्नासाठी आपल्या मुलीचे स्थळ घेऊन गेलेल्या वधूपित्याबरोबर मुलाकडच्या मंडळींचे वर्णन करताना गडकरी लिहितात
या सुमारास प्रत्येक 'नवरबापा'चे मन म्हणजे थोरथोर ऐतिहासिक पुरुषांच्या गुणविशेषांचे प्रदर्शनच बनून जाते, असे म्हणण्यास हरकत नाही. महंमद गिजनीच्या धनलोभाने तो स्वार्थपरायण होतो, नेपोलियनच्या महत्त्वाकांक्षेने तो आपल्या मुलाकडे पाहतो, नाना फडणिसाच्या व्यवहारकौशल्याने तो मुलाची किंमत ठरवितो, शिवछत्रपतींच्या धाडसाने वाटेल त्या विजापुरकरावर तो त्या रकमेचा मारा करतो, आणि नादिरशहाच्या क्रूरपणाने ही रक्कम वसूल करून घेतो. त्या एकाच हृदयात रजपुतांचा शिपाईबाणा आणि मराठयांचा गनिमी कावा हे एकाच वेळी उचंबळत असतात. अष्टवसूंच्या अंशांपासून उत्पन्न झालेल्या भीष्माचार्याप्रमाणे, अनेक ऐतिहासिक पुरुषांचा हा मानसपुत्रही, मुलाचा अव्वाच्या सव्वा हुंडा घेण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो, आणि तितक्याच नेटाने ती तडीसही नेतो. स्वत: नवरामुलगा तर हरभर्‍याच्या झाडावर रात्रंदिवस मुक्काम करून 'बापसे बेटा सवाई' ही म्हण वाजवीपेक्षा फाजील खरी करून दाखवीत असतो. आपल्या अंगच्या लोकोत्तर गुणांनी अनेक म्हणींची नायिका होऊन बसलेली वरमाई तर- परंतु 'अनिर्वर्णनीयं नाम परकलत्रम्!'

तर नाटकाची फुकट तिकिटे मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग विनोदी शैलीने सांगताना तत्कालीन कॉंग्रेसच्या मवाळंच्या बोटचेप्या धोरणावर शालजोडीतील प्रहार करतात

स्वराज्याचा हक्क देणारे सरकार आणि नाटक पाहण्याची परवानगी देणारी नाटक मंडळी यांचे कितीतरी साधर्म्य आहे. स्वराज्याचा हक्क मागणाऱ्या लोकांचे त्यांच्या शक्तीप्रमाणे निरनिराळे भेद पाडता येतात. कमीपणापासून सुरुवात केली तर राष्ट्रसभेसारख्या लौकिक सभांच्याद्वारे मिठ्ठास भाषेचे अर्ज व विनंती करणारे राजकीय भिकारी पहिल्याने पुढे येतात. .. नाटकी मवाळांना स्वराज्याचा हक्क अर्थातच फार जपून मागावा लागतो. नाटकगृहात फारशी गर्दी नाही, मॅनेजरसाहेबांची मर्जी सुप्रसन्न आहे, वगैरे वगैरे गोष्टींची तरतूद लक्षात घेऊन हे नाटकी मवाळ आपल्या मागणीचा अर्ज अत्यंत नम्र भाषेने, परिणत अंगाने, हसतमुद्रेने मॅनेजरपुढे टाकतात. राजकीय मवाळांना सरकार एखादे वेळी स्थानिक स्वराज्य, कौन्सिलात मुकाटयाने बसण्याचा हक्क वगैरे फोलपटे देण्याची मेहेरबानी करते, त्याप्रमाणे नाटक सरकारसुध्दा आपल्या मवाळांना कधी 'पिट'मध्ये बसण्याचा, कधी पडदे ओढण्याच्या माडीत बसण्याचा, तर कधी दरवाजातच बसून खेळ पाहण्याचा हक्क देत असते. दरवाज्यावरील व्यवस्थापकांना माळयाकडून येणारे फुलांचे गजरे, चहावाल्याकडून मिळणारा चहा, विडीवाल्याने दिलेल्या पानाच्या पट्टया, या गोष्टी हिशेबात घेतल्या म्हणजे मवाळ लोकांकडून अधिकारी साहेबांना होणाऱ्या 'टी' पाटर्या, पानसुपाऱ्या यांची उणीव भरून येणार आहे. या नाटकी मवाळांची नम्र भाषा, कितीही वेळा हाकून दिले तरी पुन: पुन्हा येण्याचा लोचटपणा, कठीण शब्दांच्या मारालाही दाद न देणारा मोंडपणा, नाटक 'खलास' होण्याची वेळ झाली तरी चिकाटी धरून बसलेला आशावादीपणा या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे राष्ट्रीय सभेत बसल्याचा भास झाल्यावाचून राहात नाही. .."


हे पुस्तक विनोदी लेखांचे आहे ..पण.. १०० वर्षांपूर्वी हे पुस्तक जितके विनोदी वाटले असेल तितके आज वाटेलच असे नाही.
तेव्हा ज्या गोष्टी नवलाईच्या वाटायच्या त्या गोष्टींचं आता काही विशेष वाटत नाही तर त्या काळच्या काही रूढी आता अजिबात दिसत नाहीत.
तसंच सध्या आपली अभिरुची खूप बदलली आहे. कंबरेखालचे विनोद आणि आचरट अंगविक्षेप अशा विनोदांची सध्या चलती आहे. त्या तुलनेत हे विनोद खूपच सपक वाटतील. "या हसण्यासारखं काय आहे?" असंही बरेच वेळा वाटेल.
दुसरी गोष्ट म्हणजे भाषा. शंभर वर्षांत भाषा इतकी बदलली आहे की, गडकऱ्यांची भाषा ओघवती न वाटता फार बोजड, विनाकारण पल्लेदार वाटते. मराठी मातृभाषा, मराठी माध्यमातून शिक्षण आणि प्रमाण मराठीचं चांगलं ज्ञान असेल तरच हे पुस्तक पचनी पडेल. अन्यथा "इट्स ऑल ग्रीक टू मी" असं वाटल्यास नवल नाही. 
तिसरं म्हणजे अतिशयोक्ती ची अतिशयोक्ती बऱ्याच ठिकाणी झाली आहे. 

म्हणून हे पुस्तक वाचताना "चाला काहितरी खळखळून हसवणारे विनोदी वाचू",या भावनेने वाचायला न घेता त्यावेळचे साधे विनोद, त्यावेळचा समाज आणि आज झालेले बरेवाईट बदल हे समजण्यासाठी वाचले पाहिजे.

हे परीक्षण लिहित असतानाच मला समजले की गडकऱ्यांचे समग्र साहित्य ऑनलाईन उपलब्ध आहे. "संपूर्ण बाळकराम" आपण या दुव्यावर वाचू शकता
http://ramganeshgadkari.com/egadlari/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=103&Itemid=268

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- 
जवा ( जमल्यास वाचा )

------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

विद्रोह (Vidroh)

पुस्तक - विद्रोह (Vidroh) लेखक - हेन्री डेन्कर (Henry Denker) अनुवाद - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी (Marathi) मूळ पुस्तक - Outrag...