पुस्तक :- कथा मारुती उद्योगाची (Katha Maruti Udyogachi)
भाषा :- मराठी (Marathi)
मूळ इंग्रजी पुस्तक :- The Maruti Story
लेखक :- आर. सी. भार्गव(R.C. Bhargav) सहलेखन :- सीता(Sita)
मराठी अनुवाद :- जॉन कोलासो (John Colaco)
८० च्या दशकातल्या भारतात जेव्हा गाडी असणं हे फक्त श्रीमंतांच्य अवाक्यात होतं तेव्हा मध्यमवर्गीयांच्या स्वतःच्या गाडीचं स्वप्न जिने पूर्ण केलं ती म्हणजे "मारुती ८००" गाडी . "मारुती" हे नाव त्यामुळेच सर्वांना सुपरिचित आणि आपलेपणा वाटायला लावणारं आहे. तेव्हापासून आजपर्यंत मारुतीने भारतीय वाहन उद्योगावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळेच मारुती-सुझुकी हे आजच्या भारतीय वाहन उद्योगातलं अग्रगण्य नाव. तर अशा ऐतिहसिक आणि यशस्वी वाहन उद्योगाची कहाणी म्हणजेच "कथा मारुती उद्योगाची". आणि ही कथा संगतायत मारुतीच्या जन्मपासून यात सहभागी असलेले आणि कंपनीचे चेअरमन पद भूषवणारे आर. सी. भार्गव
माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचं स्वप्न होतं - भारतात गाडी बनवायचं, "जनतेची गाडी" बनवायचं. आणि यातूनच त्यांनी गुरगावला सुरुवात केली मारुती उद्योगाची.(पण त्यांनी याचं नाव "मारुती" का ठेवलं हे गुपितच आहे. कदचित ते काळाच्या ओघात कायमचं दडून गेलं आहे). इथपासून लेखकाने आपल्याला सांगायला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांचा मुलगा म्हणून मारुतीसाठी नियम, परवाने कसे वाकवले गेले हे त्यांनी सांगितलंय. पुढे संजय गांधींचा अपघाती मृत्यू आणि कॉंग्रेसचा पराभव यामुळे सुरुवात होता होताच कंपनी बंद पडली. इंदिरा गांधींचं सत्तेत पुनरागमन झाल्यावर मात्र मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने मारुतिच्या पाठीशी उभ्या राहिल्या. मारुतीचे राष्ट्रियीकरण करण्यात आले. पण इतर सरकारी उद्योगांप्रमाणे मारुतीला वाऱ्यावर न सोडता मारुतीच्या यशासाठी एखाद्या खाजगी कंपनी प्रमाणे तिचा कारभार चालवला जाऊ लागला. त्यामुळे सरकारी कंपनी म्हणून मिळणारं पाठबळ आणि तरीही खाजगी कंपनीतली कार्यक्षमता असा दुहेरी फायदा सुरुवातीला मारुतीला झाला.
तेव्हाची परवाना पद्धती, आयातीवर असलेले कडक निर्बंध, परकीय चलनाच्या तुटवड्या मुळे उद्योग स्थापन करण्यात आलेल्या अडचणी खूप विस्ताराने सांगितल्या आहेत. सरकारं बदलत गेली तसतसा वाढलेला लालफीतीचा कारभार, मंत्र्यांचे-अधिकाऱ्यांचे स्वार्थ, सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी म्हणून निर्णय घेताना येणाऱ्या मर्यादा हे तत्कालीन उद्योग-उदासीन धोरणाचे आणि अजूनही भारत विकसित देश का झाला नाही याचं यथार्थ दर्शन घडवतात.
मारुतीकडे वाहन निर्मितीकरिता स्वतःचं तंत्रज्ञान नसल्याने एखाद्या परकीय कंपनीशी भागिदारी करणं आवश्यक होतं. अशा भागिदाराचा शोध घेण्यासाठी लेखक आणि तत्कालीन व्यवस्थापनाने अनेक देश पालथे घातले. त्यात आलेले अनुभव, चढउतार देखील वाचण्यासारखे आहेत. "सुझुकी"ला पाठवलेला पत्रव्यवहार तिकडे चुकीच्या विभागत गेल्यामुळे सुझुकीकडून अपेक्षित प्रतिसाद आलाच नव्हता पण सुदैवाने चूक लक्षात आली आणि इतिहासाला नवी कलाटणी मिळाली. मारुती-सुझुकी भागिदारी सुरू झाली.
पहिली गाडी तिरुपती बालाजी देवस्थानला अर्पण करण्यात आली. तर नंतर त्याकाळी अनोख्या ठरलेल्या संगणीकृत यादीद्वारे प्रतिक्षा यादीतील लोकांना गाड्या वाटण्यात आल्या. गाडीला प्रचंड मागणी असल्याने त्यात गैरव्यवहार होण्याची शक्यता खूप होती. पण व्यवस्थापनाने हे गैरव्यवहार कसे रोखले हेही सविस्तर मांडलं आहे.
"सुझुकी" ही जपानी कंपनी असल्याने भारतीय व्यवस्थापनाला, कामगारांना जपानी कार्यपद्धतीची ओळख झाली आणि या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांनाही तिची ओळख होते. जपानी लोकांची स्वच्छता, वक्तशीरपणा, कामाचं काटेकोर नियोजन, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतल्या बारकाव्यांना महत्व, कामगारांना सतत प्रेरित ठेवण्याची पद्धत, कामगारांकडून सूचना घेणे ई. गोष्टी आणि त्यांचा मारुतीला झालेला फायदा नक्कीच प्रेरणादायी आहे. यातून फक्त मारुतीच नव्हे तर पूर्ण भारतीय वाहन उद्योगाला नवीन दिशा मिळाली.
मारुती मध्ये सुरुवातीला सरकार मुख्य भागिदार तर सुझुकी दुय्यम भागिदार होती. २६ वर्षांच्या कालावधीत सरकारी भाग घटत शेवटी सुझुकी कंपनी मुख्य भागिदार झाली. पण सरकार, मारुती व्यवस्थापन आणि सुझुकी यांचे परस्पर संबंध नेहमीच चांगले राहिले असे नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीचे त्यांच्यावर बरे वाईट परिणाम झाले. एकमेकांविरुद्ध कोर्ट-कचेऱ्या झाल्या, लेखका विरुद्ध त्यावेळी सीबीआय चौकशी झाली. एका क्षणी सुझुकी कंपनी बाहेर पडून "देवू" कंपनी त्याजागी येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण पुढे ती टळली.
कायदे क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेषतः कंपनी कायदे क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही केसस्टडी वाचणं आवडेल.
मारुतीने फक्त आपल्या उत्पादनांतच गुणवत्ता राखली नाही तर विक्री, वितरण आणि विक्री पश्चात सेवा यांमध्येही ती राखली. यासाठी कंपनीने विक्रेते, वितरक नेमण्याची काय पद्धत अवलंबिली, त्यांना प्रशिक्षित कसे केले, त्यांनाही नफा कसा होईल हे बघत गाड्यांच्या व सुट्ट्या भागांच्या किंमती कशा ठरवल्या, विमा आणि जुनी वाहने खरेदीचे पूरक उद्योग कसे सुरू करून दिले, ग्रहकाभिमुख व ग्रहकस्नेही व्यवस्था कशा बनवल्या हे सगळं लेखकाने विस्ताराने समजावून सांगितलं आहे.
व्यवस्थापनाने कामगारांशी पहिल्यापासूनच संबंध कसे चांगले ठेवले होते, कमगार संघटना विधायक पद्धतीने कशा चालवल्या, तरीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी संप कसे झाले, ते कसे हाताळले गेले या विषयीही विस्तृत विवरण यात आहे.
हे पुस्तक जेमतेम २०० पानी आहे. पण वरचे इतके परिच्छेद वाचल्यावरच लक्षात आलं असेल की त्यात दिलेली माहिती खूप आहे. वाहन विषयक तांत्रिक बाबी त्यात आहेत, कायदेशीर बाबी आहेत, सरकारी कामकाजाबद्दलची महिती आहे, व्यवस्थापन कौशल्या विषयी आहे. त्यामुळे नेहमीच्या कथा-कादंबरी-चरित्र वाचणऱ्यांना हे पुस्तक कंटाळवाणं वाटू शकतं. पण तरूण उद्योजक, व्यवस्थापक, कायदे अभ्यासक आणि वर्तमान घडामोडींबद्दल वाचणाऱ्यांना हे पुस्तक आवडेल. पुस्तकात वाचलेलं सगळं लक्षात राहणं कठीण आहे- त्याची खरी गरजही नाही - पण या पुस्तकाच्या त्यानिमित्ताने उद्योग विश्वाचा होणारा परिचय आणि नकळत शिकल्या जाणाऱ्या काही संकल्पना यामुळे या पुस्तकाचं वाचन सत्कारणी लागेल हे निश्चित.
------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------
Thanks Kaushik... Mast aahe
ReplyDeleteHow can I get this book?
I had borrowed it from library. Online circulation library called as "Librarywala.com".
DeleteSo this book should be available in other libraries or online shopping.
refer these links
http://www.amazon.com/x915-x925-Katha-Maruti-Udyogachi/dp/9380361424
http://www.majesticonthenet.com/product.php?id_product=2808