थोरली पाती (Thorali Pati)





पुस्तक :- थोरली पाती (Thorali Pati)
लेखक :- गजानन दिगंबर माडगूळकर - ग.दि.मा.  (Gajanan Digambar MadaguLakar - Ga.Di.Ma. )
भाषा:- मराठी (Marathi)

मराठी साहित्य सृष्टितील तेजस्वी व्यक्तिमत्त्व ग.दि. माडगूळकर यांच्या लघुकथा "थोरली पाती" या नावाने कथासंग्रह रूपात प्रसिद्ध झाल्या आहेत. गदिमांची सिद्धहस्त लेखणी म्हणजे बोलायलाच नको. आणि त्यातही विशेष म्हणजे पु.भा.भावे यांच्या सारख्या भाषाप्रभूने गदिमांच्या अनेक कथांपैकी २५ उत्तम कथा या संग्रहासाठी निवडल्या आहेत. म्हणजे सोन्याहून पिवळं.

त्यामुळे याहून अधिक परीक्षण लिहिण्याची आवश्यकताच नाही आणि या सारस्वतांपुढे काही लिहावं अशी माझी योग्यता नाही. त्यामुळे हे “परीक्षण” नाही तर पुस्तकाची ओळख आहे. 

गदिमांचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगूळकर हे देखील लोकप्रिय कथालेखक आहेत. या भावंडांचा उल्लेख एका व्यक्तीने एकदा "धाकटी पाती-थोरली पाती" असा केला. त्यावरून गदिमांनी आपल्या कथा संग्रहाला हे नाव दिलं आहे.

पुस्तकातल्या बहुतेक कथा या गावात किंवा ग्रामीण पार्श्वभूमीवर घडतात. माझ्या सारख्या शहरी मुलाला गाव/खेडीपाडी ही सिनेमा, नाटकं किंवा अशा कथा-कादंबऱ्यांतून भेटतात. पण गाव म्हणजे फक्त "खेड्यामधले घर कौलारू" सारखं प्रेमळ, गोड, सुंदर नव्हे तर. तिथेही निसर्गाचे चटके आहेत, निसर्गाशी झगडा आणि माणसामाणसांत आढळणारे गुणावगुण सर्व आहे. 

गदिमा आपल्यासमोर ही अशी गावचित्रे, व्यक्तिचित्रे उभी करतात. या २५ कथांमधून कितितरी व्यक्ती आपल्या समोर येतात -  "औंधाचा राजा" मध्ये औधांचे राजे पंतप्रतिनिधी, किस्से रचणारा "रामा बालिष्टर", कट्टर मुस्लिम असूनही हिंदू रीतिरिवाजांबद्दल प्रेम असणरा नकवी, वय उलटून गेल्यावर आपल्या तरूणपणातल्या पैलवानकीच्या-रंगाढंगाच्या आठवणी जागवणारा नामा, नव्याने मुंबईत आलेली-नव्याने वयात आलेली शारिरिकआकर्षण अनुभवणारी तरुणी, "गावरान शेंग" मधली लहान मुलींना माया लावणारी पण या मायेमागचा विकृत चेहरा उघडा करून धक्का देणरी भिमा, गावाकडून "वसुली" करणारा बेरकी सावकार, एका वडारी मजूर पोरीच्या प्रेमात पडलेला गोरा साहेब ... अशी हाडामासाची अनेक पात्रे आणि माणसांना "अतर्क्य" फटकारे देऊन खेळवणारी अदृश्य नियती हे तर महा-पात्र.

गावाची, निसर्गाचीही रुपं वाचकांना दाखवताना गदिमा शब्दांना कसे खेळवतात, झुलवतात ते पहा - 
“दुपार नुसती जळत होती. खंडोबाच्या माळावरच्या चिमखड्यांच्या फुलून लाह्या होतील इतके ऊन तावत होते. नेप्ती बोराड्यांच्या फांद्या चित्रासारख्या स्तब्ध होत्या. बघताच डोळ्याला अंधारी येऊन उन्हात चित्रविचित्र रंगाच्या उलट्या-पालट्या रेघोट्या सरपटत होत्या. सारा माळ निर्मनुष्य भकास होता. खंडोबाच्या देवळाच्या पडक्या भिंतीला टिचभर सावलीत देवाचा रेडा अंग दाटून बसला होता - बाकी सारा शुकशुकाट.”

तर पावसाळी चित्र रंगवताना ते लिहितात -
“ऋतुचक्राने वळसा पुरता घेतला होता. पुन्हा श्रावण महिना आला. गावाबाहेरहे विटके माळ पुन्हा हिरवळून आले. गावदरीची राने पुन्हा वाढीला पडली. गावातल्या घाणेरड्या रस्त्यांच्या कडा दुर्वांनी खचून गेल्या; माळवदावर हराळी मातली. लिंबाबाभळीचा पानपसारा अधिक तजेलदार झाला. चिंचांच्या झाडांवर नखाएवढी फळे लटकू लागली. बारा महिने रखरखीत भासणारा माणदेश इथून तिथून ओलावला.”
सकाळचे वर्णन करताना एका कथेत लिहितात - "सकाळचे फळ पिकून लाल झाले होते" तर दुसऱ्या कथेत संध्याकाळचं वर्णन करताना ते लिहितात "दिवसाचे फळ आभाळाच्या देठापासून तुटले".

माणूस इतक्या प्रकारचा असू शकतो हे गदिमा आपल्याला दाखवतात - सभ्य माणसाच्या अंगात इतका बिलंदरपणा आणि ज्याला दुर्जन समजयाचं त्याच्यात अनपेक्षित समंजसपणा, ज्याला पुरुषी वासना म्हणायची ती एखाद्या स्त्रीत भरलेली तर कुठे संन्यासी होऊनही ढळणारा बुवा. स्त्री-पुरूष संबंधांचेही - वेगवेगळे कंगोरे प्रत्ययाला येतात - मुग्ध प्रेम, शारिरिक आकर्षण, तत्कालिक वासना आणि चुकीची जाणीव झाल्यावर झाल्यावरही प्रत्येकावर होणारा परीणाम वेगळा. 

कुठलीही कथा वाचायला घ्या; अर्धवट टाकून उठावं वाटणार नाही. पु.भा.भावे यांची प्रस्तावना अर्थात त्यांनी केलेलं या कथांचं परीक्षण ही तितकच सकस वाचनीय.

इतकं सगळं लिहिल्यावर "नक्की वाचा" हे वेगळं लिहिण्याची आवश्यकताच नाही. तुमच्यापैकी काहीजण लगेच पुस्तक शोधायलाही निघाले असतील.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- 
आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti)

पुस्तक - माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti) लेखिका - छाया महाजन (Chhaya Mahajan) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४३ प्रकाशन - रोहन प्रका...