सांजसावल्या (sanjasavalya)



पुस्तक :- सांजसावल्या (sanjasavalya)
लेखक :- वि.स. खांडेकर (V.S. Khandekar)
भाषा :- मराठी

"सांजसावल्या" हा ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकरांचा शेवटचा लघुनिबंधसंग्रह. यातील काही लेख "मौज","श्री",स्वराज्य","रविवार सकाळ" इ. नियतकालिकांमध्ये तेव्हा प्रसिद्ध झालेले तर काही अप्रकाशित आहेत.

सन १९७४ ते १९७६ या कालखंडातील हे निबंध आहेत. १९७६ च्या सप्टेंबरमध्ये खांडेकरांचं निधन झालं होतं. त्यामुळे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर - शारिरिक जराजर्जरता, आलेलं अंधत्व, कौटुंबिक त्रास अशा - शारिरिक आणि मानसिक अवस्थेत लिहिले गेलेले आहेत. त्यामुळे बरेचसे लेख हे सिंहावलोकन करणारे आहेत. दैव, नियती, मानवी जीवनातील आशावाद, प्रयत्नवाद आणि दैववाद यांमधला झगडा इ. विषयांवरचे आहेत.
उदा. "देवघर" या निबंधात तारुण्यातल्या बुद्धीवादाकडे निखळ दृष्टीने पाहत खांडेकर त्याची चिकित्सा करतात. "आंधळी-कोशिंबीर" मध्ये माणसे नियतीला कशी नावे ठेवतात पण कर्तृत्वाचं श्रेय मात्र नियतीला न देता स्वतःकडे ठेवायचा दांभिकपणा करतात हे दाखवलं आहे. "दीर्घायुष्य" लेखात माणसाला खरंच दीर्घायुष्य का हवं असतं आणि ते शाप किंवा वरदान कसं ठरू शकतं याचा ऊहापोह  आहे.

काही लेख गंमतीदारही आहेत. "शब्द बापुडे केवळ वारा!" मध्ये एका तरूणी आणि वृद्धाचा स्त्री-पुरुष समानतेवरचा मजेशीर संवाद; "अजि म्या ब्रह्म पाहिले" हा अ‍ॅलर्जी वरचा लेख इ.

प्रत्येक लेखात वि.स. काही विचार मांडून शेवट करतात. ती वाक्ये अवतरणे म्हणून संग्राह्य आहेत. उदा. अ‍ॅलर्जी बद्दलच्या लेखाचा शेवट ते असा करतात. "जिथे शरीराची अ‍ॅलर्जी शोधून काढणं कठीण तिथं मानवी शरीर आणि मन यांना एका साच्यात बसवणं विज्ञानाला अशक्य आहे. प्रत्येक मनुष्य हे एक वेगळं विश्व आहे. अशी कोट्यवधी विश्वं जी परमशक्ती लीलेने निर्माण करते तिच्यापुढे माणसाच्या बुद्धीलाहि नकळत नतमस्तक व्हावं लागतं. कारण मनुष्य स्वतःला कितीही स्वतंत्र मानत असला तरी तो निसर्गाचाच एक भाग आहे."

एक वृद्ध गांधीवादी आणि एक तरूण प्राध्यापक यांच्यातला हृदयपरीवर्तनावरचा वितंडवाद ऐकून ते म्हणतात "वैचित्र्यपूर्ण दृश्यविश्वापेक्षा माणसाच्या मनातील अदृश्य गुंतागुंत फार गहन आहे. प्रत्येक मनुष्य दुसऱ्याहून अंतर्बह्य वेगळा असतो. अशा स्थितीत एकाला जाणवणारे सत्य दुसऱ्याला पूर्णपणे कसे पटावे?..सत्यशोधनाच्या नावाखाली आपण सर्व सत्याभासाची किंवा अर्धवट सत्याची बाजू घेत असतो. साहजिकच दोन अहंकारंची टक्कर सुरू होते".

"पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना" मध्ये इतिहास आणि त्याचा पुढच्या पिढीवर परीणाम याबद्दल ते लिहितात. "स्मृती, अनुभव आणि स्वप्न हे त्रिकुट मानवी मनावर अधिराज्य करीत असतं. पावलोपावली या तिन्हींचा समतोल साधणं हे सफल जिवनाचं मुख्य सूत्र आहे. भूतकाळ घरातल्या वृद्धासारखा, वर्तमानकाळ तरूणासारखा, आणि भविष्यकाळ बालकासारखा असतो.."

या निबंधांतली खांडेकरंची शैली सहज, ओघवती आणि गप्पा मारल्यासारखी आहे. खूप विनोदी नाही पण नर्मविनोदी-खुसखुशीत आहे. हे लेख वाचताना मला पु.लंच्या लेखांची आठवण झाली. पण पुलंचे लेख जास्त विनोदी आणि त्यातला गंभीर भाग खूप सखोल तत्वचिंतन करणारा आहे असं मला वाटतं.

खांडेकरांनी ज्या विषयांना हात घातला आहे, जे रोजच्या जगण्यातले अनुभव मांडले आहेत आणि जी मल्लिनाथी केली आहे तितपत लिखाण सध्या साध्या-साध्या माणसांनी केलेल्या ब्लॉगलेखनातही आढळेल. खांडेकरांच्या काळात ब्लॉग असते तर त्यांनीही "मला सुचलं ते","मनोगत","स्वान्तःसुखाय" अशा टिपिकल नावाने ब्लॉगच लिहिला असता.
सध्या फेसबुक, व्हॉट्सपच्या जमान्यात फिलॉसोफी झाडणारे, कौटुंबिक, सामाजिक संदेश देणारे इतके मेसेज येतात की हे पुस्तक वाचताना असाच कुठलातरी मेसेज किंवा जरा चंगला मराठी ब्लॉग वाचतोय असंच वाटलं आणि पुलंच्या "असा मी असामी" मधलं एक वाक्य आठवलं - "थोर माणसं देखील काही फारसं निराळं म्हणतात असं नाही पण ती थोर असतात हे महत्वाचं." :)


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment

माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti)

पुस्तक - माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti) लेखिका - छाया महाजन (Chhaya Mahajan) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४३ प्रकाशन - रोहन प्रका...