पाडस (padas)


पुस्तक :- पाडस
मूळ पुस्तक : द यर्लिंग ( The Yearling )
मूळ लेखिका : मार्जोरी किनन रॉलिंग्ज (Marjorie Kinnan Rawlings)
मूळ भाषा :- इंग्रजी (English)
अनुवाद : राम पटवर्धन (Ram Patwardhan)
प्रकाशन : मौज प्रकाशन

श्री. विशाल विजय कुलकर्णी यांनी केलेले समीक्षण त्यांच्या परवानगीने आणि सौजन्याने

बॅक्स्टर वाडीचा उमदा, दिलखुलास पेनी बॅक्स्टर, त्याची (आपली बरीच मुले गमावल्यामुळे चिडचिडी झालेली) स्थूल पत्नी ओरी आणि त्यांचा बऱ्याच मुलांनंतर जगलेला अल्लड, शैशव आणि पौगंडावस्थेच्या काठावर उभा मुलगा 'ज्योडी' आणि ज्योडीचा एकुलता एक मित्र , त्याने पाळलेलं एक हरणाचं 'पाडस' अर्थात फ्लॅग ! खरेतर हि कथा ज्योडी आणि फ्लॅगची , त्यांच्यातल्या नात्याची आहे. हि कथा सगळी संकटे झेलत, हसतमुखाने जगणाऱ्या आपल्या बायको मुलांबरोबरच आपल्या शेतांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पेनीची आहे, हि कथा नशिबाने चकवलेल्या, वरवर खाष्ट, कजाग वाटणाऱ्या ओरीची सुद्धा आहे.

मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांची ही कादंबरी ज्योडी नावाच्या या एकाकी, फारसे कुणी मित्र नसलेल्या आणि त्यामुळे मैत्रीसाठी आसुसलेल्या मुलाबद्दल आहे. या एप्रिलपासून पुढच्या एप्रिलपर्यंत असा साधारण वर्षभराचा काळ कादंबरीत आहे. या एका वर्षात ज्योडीच्या मानसिक वयात आणि स्वभावात होत गेलेले बदल, त्याचं स्वतःच्याही नकळत आपलं बालपण मागे टाकणं हा सगळा प्रवास. निसर्गाच्या कायम बदलत्या रुपांच्या पार्श्वभूमीवर, ज्योडीच्या आयुष्यात आलेल्या एका हरणाच्या पिल्लाच्या माध्यमातून, त्याच्या ज्योडीबरोबरच्या नात्यातून हि कथा फुलत जाते.

निसर्गचक्र चालूच राहतं. या वर्षाच्या कालावधीत जे घडतं. जे तपशील येतात, ते शेती, जंगल आणि ज्योडी बॅक्स्टर आणि त्याचे आईवडील राहत असतात, त्या भागाचा एकंदरीत भूगोल यांचा संदर्भ घेऊन कथानक पुढे सरकत राहते. यात मध्येच काही मैलांवर राहणाऱ्या फॉरेस्टर कुटुंबाचा आणि त्यांच्या पांगळ्या मुलाचा फॉडरविगचा संदर्भ येतो. त्याचा अकाली मृत्यूही ज्योडीचा बरेच काही शिकवून जातो. लेखिकेने अगदी बारीक बारीक तपशील तरलपणे नोंदवत ज्योडीचा हा प्रवास रेखाटला आहे.

पेनीच्या गोळीची शिकार झालेल्या एका हरणीचे सैरभैर झालेले पाडस घेऊन ज्योडी घरी येतो. त्याच्या बारकुश्या झुपकेदार शेपटीमुळे फॉडरविगने त्याला फ्लॅग हे नाव दिलय. फ्लॅग बरोबर एकाकी ज्योडीची जोडी जमते. अल्पावधीत त्या दोघांमध्ये एक बिलक्षण नाते निर्माण होते. पण फ्लॅग वाढत असतो. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेलं ते निष्पाप लेकरू मानवाच्या म्हणजे पेनीच्या वसाहतीत त्रासदायक ठरायला लागतं. त्याचं आनंदात इकडे तिकडे बागडणं पेनीच्या शेतीचं नुकसान करायला लागतं. आपल्या कुटुंबियांसाठी लागणारं अन्न वाचवायचं कि ते हरणाचं पाडस, ज्योडीचा फ्लॅग, त्याला वाचवायचं या द्विधा मनस्थितीत पेनी अडकतो. शेवटी तो हा निर्णय ज्योडीवरच सोपवतो.

ज्योडीचा निर्णय काय असेल? त्याच्या एकटेपणातला त्याचा एकमेव जोडीदार फ्लॅग कि.......
----------------------------------------------------------------------------------------------------------





His Forbidden passion (हीज फॉरबिडन पॅशन )




पुस्तक :- हीज फॉरबिडन पॅशन  (His Forbidden passion)
भाषा :- इंग्रजी (English)
लेखिका :- अ‍ॅन मॅदर (Ann Mather)


ही एक प्रणय कादंबरी आहे. लंडन मध्ये राहणऱ्या एका तरूणीला -क्लीओला- एके दिवशी एक तरूण - डॉमिनिक- घरी भेटायला येतो आणि तिला सांगतो की तिचे आईवडील हे तिचे खरे आईवडील नसून दत्तक आई वडील आहेत. तिची खरी आई तिच्या जन्माच्या वेळीच वारली. डॉमिनिकचे दत्तक वडील हे त्या तरूणीचे जैविक पिता. अनैतिक संबंध लपवण्यासाठी क्लिओची आई वारल्यावर त्यांनी क्लिओला दत्तक देऊन टाकली. हे ऐकून तिच्या भावविश्वाला प्रचंड हादरा बसतो. 

डॉमिनिकच्या उद्योगपती आजोबांना आपल्या अखेरच्या दिवसात या नातीची आठवण येत असते आणि तिला कायमचं आपल्या कुटुंबात परत आणण्याची त्यांची इच्छा असते. ही जबाबदारी ते डॉमिनिक वर सोपवतात. तो तिला घेऊन कॅरिबियन बेटांवरच्या त्यांच्या साम्राज्यात घेऊन येतो. त्यातून त्यांची ओळख वाढते आणि दृढ संबंधात ते गुंततात.

डॉमिनिक हा दत्तक मुलगा आणि क्लिओ दुसऱ्या स्त्रीपासून झालेली मुलगी म्हणजे खरं म्हटलं तर भाऊ-बहीण. पण पाश्चात्त्य संस्कृती प्रमाणे ते एकमेकांना तसं मानत नाहीत. आधी शरीरसंबध जुळतात आणि मग प्रेमसंबंध !

एकूण कादंबरी काही खास नाही. प्रणयकथा, एकदोन शृंगार प्रसंग असं वाचायला आवडत असेल त्यांना प्रवासात वगैरे टईमपास म्हणून ठीक आहे. 


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

माणसे आरभाट आणि चिल्लर (Manase arabhat ani chillar)




पुस्तक :- माणसे आरभाट आणि चिल्लर (Manase arabhat ani chillar)
भाषा :- मराठी (Marathi)
लेखक :- जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni) 


जी.ए. कुलकर्णी हे मराठी साहित्यविश्वातील मान्यवर नाव. जी.एंच्या निधनापश्चात प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे. यात जी.एंनी त्यांच्या लहानपणी त्यांचा ज्यांच्याशी संबंध आला अशा व्यक्तींचं व्यक्तिचित्रण रेखाटलं आहे. 
(पण या त्यांच्या खऱ्या आठवणी आहेत का लेखक एका काल्पनिक निवेदकाच्या भूमिकेत आहे हे कळत नाही.)
पुस्तकात त्यांचे शाळा मास्तर, शाळू सोबती, आजोबा, आजोबांचे मित्र, स्थानिक जहागिरदार, गावातल्या काही व्यक्ती इ. आपल्याला भेटतात. काही चिल्लर काही आरभाट. 

पुस्तकात लेखकानेच लिहिले आहे की - "आरभाट हा एक गुणी कानडी शब्द आहे. आरभाट म्हणजे खानदानी, भव्य, थाटामाटाचा. जेवण कसे होते? आरभाट, मन्सूरांचे गाणे कसे झाले? आरभाट, हृशिकेशला गंगा कशी आहे, तर आरभाट"

पुस्तकात प्रत्येक व्यक्तीवर स्वतंत्र कथा/लघुनिबंध नाहीत तर पूर्ण पुस्तक हेच एक सलग वर्णन आहे. एखाद्या वृद्ध व्यक्तीने आपल्या लहानपणच्या आठवणी गप्पा मारताना सांगाव्यात तसा एकूण निवेदनाचा बाज आहे. बोलण्याच्या/लिहिण्याच्या ओघात जशी माणसं आठवतात, जे प्रसंग येतात तसे ते आपल्याला सांगत जातात. कधी एखाद्या व्यक्तीवर काही ओळीच येतात तर काही व्यक्तींची भेट प्रसंगोपात पुन्हा पुन्हा होते आणि त्यांचं व्यक्तीचित्र जास्त स्पष्ट होतं. 

उदा. दातार मास्तर - नेमस्त स्वभाव, गडकऱ्यांच्या साहित्यावर मनापासून प्रेम करणारे, क्रिकेटमधल्या सी.के. नायडूंचे भक्त, गरीबीतही तत्त्वांशी तडजोड न करणारे - असे पैलू आपल्याला दिसतात. 

तर दुसरं व्यक्तिचित्र म्हणजे विट्ठल याचं. हा विठ्ठल लेखकाच्या आजोबांच्या मित्राकडे आश्रित म्हणून राहणारा मुलगा. मित्राचं निधन झाल्यावर पुन्हा एकदा निराश्रित होतो. आश्रयदात्याने ठेवालेली पुंजी घेऊन जगण्यासाठी शहरात येतो, पडेल ती कामं करतो, डॉक्टर होतो पण परिस्थितीशी झगडा संपत नाही. अनेक वर्षांनी तो लेखकाला पुन्हा भेटतो आणि लेखकाने गाव सोडल्यानंतर गावात कायकाय घाडलं, दातार मास्तरांच्या आणि विठ्ठलच्या आयुष्यात कायकाय घाडलं ते समजतं.

दातार मास्तर, विठ्ठल या दोन व्यक्ती सोडल्या तर बाकी व्यक्ती खास लक्षात राहत नाहीत. बहुतेक जीएंनाही बाकी व्यक्ती "चिल्लर" वर्गवारीत टाकलं असावं. वेगवेगळ्या मास्तरांच्या लकबी, शिकवण्याच्या-मारण्याच्या-ओरडण्याच्या पद्धती; शाळूसोबत्यांच्या खोड्यांचे किस्से मजेदार आहेत. मनोरंजक आहेत. 
पुस्तकातील वर्णनाप्रमाणे लेखकाचे लहानपण चांगलं, सुखासमाधानात गेल्यासारखं वाटतं पण लेखक मात्र मोठेपणच्या आठवणी सांगताना गावापासून दूर जायचा, तिथल्या व्यक्तींपासून संबंध विसरायच्या प्रयत्नात दिसतो. जणू काही त्याला आयुष्यातला एखादा कटू/अपमानास्पद कालखंड विसरायचा आहे. ते का? हे समजत नाही. विचित्र वाटतं.

शेवटची साताठ पाने लेखकाने परमेश्वर, नियती, माणसाचे अपूर्णत्त्व इ. वर मुक्त चिंतन आहे. त्यातली काहीकाही वाक्ये फार छान आहेत.
"सत्याचा नेहमी विजय होतो- आज ना उद्या ! हे सूत्र कधीच खोटे ठरवता येत नाही, कारण त्यातील मेख अशी आहे ती आज ना उद्या या शब्दांत ! माणसाचे आयुष्य टिचभर आणि काळ अनंत आहे. शतकानुशतके गेली तरी पुन्हा कोडगेपणाने हसत ’आज ना उद्या’ असे म्हणत स्वतःचा आब राखता येतो. पण तेवढ्यात सत्याच्या विजयाची आशाळभूतपणे वाट पाहणऱ्या माणासाची माती देखील नष्ठ होऊन जाते आणि तो सत्याचा विजय पराभवापलीकडे गेलेला आसतो. हे म्हाणजे एखाद्या दरिद्री माणसाच्या हातावर कागदाचा तुकडा ठेवून त्यावर यावर लिहिलेली प्रचंड रक्कम दोनशे लक्ष वर्षे आठ महिने एकोणतीस दिवसांनंतर मिळून तुझे दारिद्र्य नष्ट होईल" असे सांगण्यासारखे आहे"

"उपरवाले के घर में देर है, लेकिन अंधेर नही" वा, काय सुरेख अनुप्रास जोडले आहेत! पण देर तरी का असावा? ते घर म्हणजे आम्ही रोज पाहतो तसली एखादी कचेरी आहे की काय ? अंधार नाही , प्रकाश आहे का? चंगली गोष्ट आहे. पण केवळ दिवे जळत आहेत म्हणून काम चालू आहे असा अर्थ होत नाही."

विचारंचं प्रचंड वादळ त्याच्या डोक्यात उठलं आहे आहे आणि त्या वादळात, कल्लोळात लेखक भराभर शब्द उतरवत गेला आहे असं वाटतं असे तुटक तुटक परिच्छेद आहेत.

एकूण जी.एंचं पुस्तक म्हणून ज्या अपेक्षेने मी पुस्तक वाचायला घेतलं तितकं ते "अरभाट" वाटलं नाही पण वाचनातून "चिल्लर" विरंगुळा-टाईमपासच झाला.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)

पुस्तक - गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi) लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande) भाषा - मर...