जपानी लघुकथा (Japani laghukatha)





पुस्तक - जपानी लघुकथा भाग एक, दोन  (Japani laghukatha Part 1& 2)
लेखिका -सुजाता गोखले (Sujata Gokhale)
भाषा -मराठी (Marathi)
पाने - प्रत्येक भागात ९४
प्रकाशन - आदिती अकॅडमी ऑफ जपानी लँग्वेज (भाग एक जानेवारी २०२४, भाग दोन मार्च २०२५)
छापील किंमत - रु. ४००/- प्रत्येकी
ISBN - भाग एक 979-889233677-2 
           भाग दोन 979-889744249-2

काही दिवसांपूर्वी "ऋणानुबंध पूर्वेचा" ह्या पुस्तकाचं परीक्षण लिहिलं होतं. त्याच्या लेखिका सुजाता गोखले ह्या जपानी भाषेच्या शिक्षिका आहेत. त्यांनी बऱ्याच वेळा शैक्षणिक कामाच्या निमित्ताने जपानला भेटी दिल्या आहेत त्या अनुभवांवरचं ते खूप सुंदर पुस्तक आहे. (त्याच्या परिक्षणाची लिंक https://learnmarathiwithkaushik.com/courses/runanubandh-purvecha/ ). त्या पुस्तकाचं परीक्षण लिहिल्यानंतर मला सुजाताजींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. आणि त्यांनी पुस्तकाचे पुढचे भाग आणि अजून काही पुस्तकं मला भेट दिली. त्यातलीच ही दोन पुस्तकं "जपानी लघुकथा- भाग एक आणि दोन"


पुस्तकाचं नाव वाचून असा समज होऊ शकतो की हे एक भाषांतरित पुस्तक असेल. जपानी भाषेतल्या लघुकथा किंवा पारंपारिक जपानी लोककथांचे भाषांतर या पुस्तकात असेल. पण हे पुस्तक तसं नाही. या सुजाताजींनी स्वतः स्वतंत्रपणे लिहिलेल्या गोष्टी आहेत. जपान, जपानी भाषा आणि जपानी संस्कृती यांच्यावर त्यांचे प्रेम आहे. त्या सर्वांची त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि इतर सर्वसाधारण वाचकांनाही ओळख व्हावी यासाठी त्यांनी या कथा लिहिलेल्या आहेत. या गोष्टींमधली पार्श्वभूमी जपानची आहे. पहिल्या काही गोष्टींमध्ये एखाद दुसरे भारतीय पात्र आणि बाकी जपानी पात्रं अशी रचना आहे. नंतर बहुतेक गोष्टी मधली सगळी पात्रं जपानीच आहेत. ह्या गोष्टींतून जपान मधले एखादे ठिकाण, एखादी परंपरा किंवा त्या लोकांची विचार करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत असं आपल्याला आपसूक जाणवतं. गोष्टीत जेव्हा जपानी शब्द येतात तेव्हा कंसात त्याचा अर्थ सांगितला आहे. जपानी संस्कृतीची ओळख करून देणे हा विचार असला तरी या गोष्टी कुठेही डॉक्युमेंटरी पद्धतीच्या अशा झालेल्या नाहीत. बहुतेक गोष्टी या फॅन्टसी(कल्पनारंजन) या प्रकारातल्या आहेत. तर एकदोन रहस्य कथांसारख्या. त्यामुळे त्या रंजक आहेत. खरंच असं घडलं तर काय होईल, कसं वाटेल असा मजेशीर विचार मनात सोडणाऱ्या आहेत.

दोन्ही भाग मिळून 22 कथा आहेत. सगळ्या गोष्टींबद्दल सांगत नाही पण मला इंटरेस्टिंग वाटलेल्या गोष्टींपैकी सात-आठ गोष्टींबद्दल सांगतो.

तो - पुण्यात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी अचानक एक जपानी तरुण मुलगा येतो. अस्खलित मराठी बोलत असतो. येताना त्याने त्या बाईंसाठी जपानमधून छान छान भेटवस्तू आणलेल्या असतात असतात. हा तरुण कोण असेल हे गोष्टीच्या शेवटी कळतं एका फॅन्टसीच्या स्वरूपात. एक फॅन्टसी लघुकथा म्हणून आहे ती वाचायला इंटरेस्टिंग आहे. तो जपानी मुलगा ज्या वस्तू घेऊन येतो त्या वस्तूंचा जपानी संस्कृतीतला अर्थ काय हे गोष्टीच्या ओघात येतं, त्यातून जपानची ओळख होते.

तो मी नव्हे - ही जपानमध्ये घडणारी एक रहस्य कथा आहे. ती घडते एका जपानी पुस्तकांच्या दुकानात जिथे पुस्तक विकतही घेता येतात, बसून वाचता येतात. एक वाचक तिकडे नेहमी येत असतो. अचानक त्याचं येणं थांबतं. काय झालं असेल? काय रहस्य असेल ?

"बंदिस्त" आणि "निंजा" - या दोन गोष्टीत पर्यटक एका विशिष्ट ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायला जातात. कथेच्या ओघात "हिमेजी किल्ला" आणि त्याचा इतिहास, निंजा योद्ध्यांची घरे ह्यांची माहिती कळते आणि शेवट पुन्हा एकदा अद्भुत चमत्कारिक होतो.

"लाट"- या गोष्टीमध्ये एक लेखक एक गोष्ट लिहितो आहे. अगदी काल्पनिक. पण जेव्हा तो प्रकाशकाला भेटायला जातो तेव्हा कळतं की ते सगळे प्रसंग खरेखुरे घडलेले आहेत. पण मग गोष्टीचा शेवट जसा लेखकाने केला आहे तसंच पुढे घडणार का ?

"घड्याळ" - एक जुनंपुराणं घड्याळ दुरुस्तीचं दुकान आहे. त्या दुकानात खूप घड्याळं दिसत आहेत. इतक्या लोकांनी घड्याळात दुरुस्तीला टाकली, ती दुरुस्त झालेली आहेत तरी लोकांनी परत का नेली नसतील?

निवा - जपानी भाषेत निवा म्हणजे घराभोवतालची बाग. अशी बाग बनवण्याचं कंत्राट घेणाऱ्या माणसाला घरमालकाची मुलगी भेटते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. पण पुढे काही चमत्कारिक गोष्टी घडतात आणि या गोष्टीतली फॅन्टसी आपल्यासमोर येते.

शिबा इनु - "शिबा इनु" ही जपान मधली कुत्र्यांची एक जात आहे. कोल्ह्यासारखी दिसणारी तगडी जात. या गोष्टीतला नायक एका लॉजवरती राहायला उतरतो तेव्हा त्याच्याकडे एक शिबा इनु कुत्रा येतो. 
कुत्रा चक्क माणसाच्या आवाजात बोलू लागतो. कुत्रा माणसाच्या आवाजात कसा बोलेल? काय असेल ही जादू? त्या कुत्र्याचं याच्याकडे काय काम?

पाचिंको - मशीन द्वारे खेळाच्या जुगारातल्या एका दुकानातली ही गोष्ट. चीनमधनं जपानमध्ये पळून आलेली तरुणी या दुकानात काम करायला लागते लोकांनी जुगारात हरलेले पैसे हीच या दुकानाची कमाई. तिला स्वतःला पैशाची गरज आहे आणि लोक जुगारात हरून निराश होतायत हेही दिसतंय. या दोन्हीचा मेळ कसा बरं साधला जाईल?

आता काही पाने उदाहरणादाखल.
लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती


अचानक आलेल्या जपानी तरुणाने काय काय भेटवस्तू आणल्या होत्या बघा.


निंजाच्या घराला भेट


प्रियकराने केला प्रेयसीचा खून... पुढच्या अद्भुत अनुभवाची नांदी



फुग्यासारखा फुगणारा फुगू मासा विषारी असतो. पण तरी जपानी लोक खातात. एका हॉटेलात हा फुगू मासा शेफशी बोलू लागतो तेव्हा.



शीर्षकातच म्हटलं आहे तसं त्या लघुकथा आहेत. पुस्तकातल्या अक्षरांचा आकार(फॉन्ट साईज) जरा नेहमीपेक्षा मोठा आणि मांडणी सुटसुटीत आहे म्हणून त्या सात आठ पानांच्या दिसतात. नेहमीच्या पुस्तकाच्या टाईप मध्ये तर त्या अजून लहान होतील. त्यामुळे त्या लघुकथाच आहेत. वाचायला मजा येते. गोष्टी सलग वाचल्या की त्यांचा साचा/पॅटर्न लक्षात येतो की... गोष्टींमधल्या व्यक्ती एकमेकांशी भेटतात बोलतात पण गोष्टीच्या शेवटी अचानक त्यातल्या एखाद्या पात्राचं अस्तित्व हा भास असतो, ती व्यक्ती आधीपासूनच मेलेली असते. त्या दृष्टीने कथबीजाची पुनरुक्ती फार झाली आहे. त्यात काही वेगळेपणा आणता आला तर या कथांची रंजकता वाढेल असं मला वाटतं. तरी प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत घडते आहे आणि त्यातून नवीन जपानी शब्द, संकल्पना कळतात. प्रत्येक गोष्ट आपण उत्सुकतेने वाचतो.

मराठी भाषेत इतर भाषेतून भाषांतरित झालेली पुस्तकं बरीच आहेत. परदेशाची प्रवासवर्णनं खूप आहेत. अभ्यासपूर्ण लेखसंग्रह आहेत. पण त्यापेक्षा वेगळं, स्वतःच्या प्रतिभेतून काहीतरी निर्माण करून, ललित अंगाने परदेशी संस्कृतीची ओळख करून देण्याचा हा प्रकार मला आगळावेगळा वाटला. याआधी असे प्रयोग मराठीत झाले आहेत का हे अभ्यासक सांगू शकतील. हा प्रयोग अगदी पहिलाच नसेल तरीही फार कमी लोकांनी केलेला हा प्रयोग आहे. तो सुजाताजींनी चांगलाच पेलला आहे.

पुस्तकाचं नाव काहीतरी वेगळं असावं असं मला सारखं वाटतंय. "जपानी लघुकथा" या नावाने जो "भाषांतरित गोष्टी" असा भाव मनात येतोय, तो टाळण्यासाठी जपानशी संबंधित एक दोन शब्दांचं शीर्षक चांगलं वाटेल.

मराठीत एक वेगळी वाट मराठी वाचकांना दाखवल्याबद्दल सुजाताजींचे एक वाचक म्हणून आणि एक मराठी भाषाप्रेमी म्हणून मनापासून आभार मानतो. त्यांनी असंच लिहित राहावं, प्रयोग करत राहावेत व त्यात त्यांना यश मिळावं अशा खूप शुभेच्छा. सुजाण वाचकही ही पुस्तकं वाचून त्यांच्या प्रयत्नांना दाद देतील, अभिप्राय कळवतील आणि त्यातून मराठी कथाविश्व अजून समृद्ध होईल अशी मी आशा करतो.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मोगरा फुलला (Mogara Phulala)




पुस्तक - मोगरा फुलला (Mogara Phulala)
लेखक - गोपाळ नीलकंठ दांडेकर (Gopal Neelkanth Dandekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ३४५
प्रकाशन - प्रथम आवृत्ती - मॅजेस्टिक प्रकाशन १९७५. सध्या मृण्मयी प्रकाशन.
छापील किंमत - रु. ४००/-
ISBN - दिलेला नाही

"मोगरा फुलला" ही ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आधारित नितांतसुंदर कादंबरी आहे. महाराजांच्या आईवडिलांच्या तरुणपणापासून त्यांच्या समाधीपर्यंतचे प्रसंग यात घेतले आहेत. त्याकाळातल्या दोन व्यक्ती आपल्याला ही गोष्ट सांगतायत असं निवेदन आहे. त्यांच्यासमोर घडणाऱ्या घटना ते आपल्याला सांगतात. तेही त्यावेळच्या भाषेत. त्यांचा हात धरून आपण थेट बाराव्या शतकात पोचतो. बाराव्या शतकातले एक छोटे खेडे आळंदी. तिथे दोन शेजारी शेजारी राहणाऱ्या ब्राह्मण घरातील दोन बालमैत्रिणी - कावेरी आणि रुक्मिणी. ही कावेरी आपल्याला गोष्ट सांगते आहे रुक्मिणीची- भविष्यातल्या ज्ञानोबांच्या आईची. त्याच वेळी भट्टदेव नावाचा एक यात्रेकरू महाराष्ट्रात पायी तीर्थयात्रा करतो आहे. त्यांना भेटतात दुसरे एक तरुण यात्रेकरू. विट्ठल. भट्टदेव आपल्याला सांगतोय गोष्ट विट्ठलपंतांची - भविष्यातल्या ज्ञानोबांच्या वडिलांची.

कावेरी आणि भट्टदेवाच्या वर्णनातून त्यावेळची यादवकाळातली परिस्थिती कशी आहे ते कळतं आणि दोन्ही नायकांचे स्वभाव कळतात. रुक्मिणी लहानपणापासून आदर्श मुलगी, गृहकृत्यदक्ष, समंजस. तर विठ्ठलपंत प्रथमपासून ज्ञानमार्गी, विरक्त स्वभावाचे. ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. कथा पुढे सरकते. यात्रेकरू फिरत फिरत आळंदीला येतात. योगायोगाने विट्ठलपंत आणि रुक्मिणीच्या वडिलांची भेट होते. इतका ज्ञानी, सद्गुणी मुलगा रुक्मिणीच्या वडिलांना आवडतो. आपल्या मुलीसाठी हाच योग्य वर आहे असा ते निश्चय करतात. पण स्वभावाने संसारात ना रमणाऱ्या विठ्ठलाला हे रुचत नाही. मग ह्या विठ्ठलाची मनधरणी ते कशी करतात, काही दैवी संकेत कसे मिळतात, कावेरीचे वडील कसा आक्षेप घेतात, तरी शेवटी लग्न लागते; हे सगळे प्रसंग छान रंगले आहेत. कावेरीच्या वडिलांना रुक्मिणीचे लग्न आपल्या मुलाशी व्हावे असे वाटत असते. ते न झाल्याने त्यांचा अहंकार दुखावतो. ते लग्नाला विरोध करतात. कावेरीचे वडीलच, आपल्या शेजारच्या मुलीसाठी कसे खलनायक ठरतायत हे बघून पुढच्या घटनांचे सूतोवाच होते.

पुढे कावेरीचे सुद्धा लग्न होते. ती संसारात रमते. पण रुक्मिणी मात्र संसाराची गोडी नसणारा जोडीदार लाभल्यामुळे संसारसुखाला पारखी होत राहते. तरी समजूतदारपणे, पतिव्रतेच्या सहनशीलतेने, नवऱ्याच्या वृतीचा स्वीकार करून राहते. रुक्मिणी आणि कावेरीच्या संवादातून त्यांचे मनोभाव समोर येतात. पुढे विठ्ठलपंतांचा गृहत्याग, अनेक वर्षे बाहेर राहणे, काशीला वास्तव्य, भट्टदेवांची अनपेक्षित गाठ पडणे हे प्रसंग येतात. योगायोगाने विठ्ठलपंतांच्या गुरूंना ते पूर्वी विवाहित आहे हे कळते. ते रागावून विठ्ठलपंतांना पुन्हा संसारी होण्यास सांगतात. प्रायश्चित्त म्हणून व्रतवैकल्ये सांगतात. ती करून ते आळंदीला परत येतात. कावेरीचे वडील जुना सूड पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांच्या मनात विठ्ठल-रुक्मिणीबद्दल विखार भरवतात. संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्याबद्दल दोघांना वाळीत टाकायला लावतात. संन्यास सोडून पुन्हा संसारात येण्याची ही घटना ना पूर्वी कोणी पहिली, ना ऐकली. त्यातून गावात खळबळ माजते. समजून घेणारे आणि न घेणारे असे दोन्ही लोक गावात असतात. विठ्ठलपंतांना शासन केलं नाही तर चुकीचा संदेश समाजात जाईल, स्वैरवर्तन समाजात वाढेल, हा एक विचार; तर गुरूच्या आज्ञेने, प्रायश्चित्त घेऊन घेतलेला निर्णय योग्य आहे हा विरोधी विचार. तेव्हाची ही सामाजिक घुसळण डोळ्यासमोर उभी राहते.

विठ्ठल रुक्मिणी गावाबाहेर राहतात. भिक्षेवर, अतिशय गरिबीत उदरनिर्वाह करतात. अशा शोचनीय स्थितीतही समाधानी राहणे, लोकांचा दुस्वास न करणे, शास्त्रांचा अभ्यास सुरु ठेवणे ह्यातून जोडप्याची स्तिथप्रज्ञ वृत्ती दिसते. कादंबरीच्या अर्ध्यापर्यंत हा सगळा भाग येतो. पुढे चारी भावंडांचा जन्म आणि लहानपणापासूनच ते सगळे कसे समंजस, ज्ञानी, पोक्त आणि परिपक्व होते, अवतारी व्यक्तीच होते हे कावेरी आणि भट्टदेवांच्या अनुभवातून कळते. ह्या पुढच्या भागात ज्ञानदेवांच्या चरित्रातले प्रसंग आहेत उदा. पैठणला जाणे, रेड्यामुखी वेद वदवणे, ज्ञानेश्वरीची रचना, चांगदेवांना भेटायला जण्यासाठी भिंत चालवणे, ग्रंथ रचना, आणि शेवटी समाधी. आपल्याला हे सगळे प्रसंग माहित असलेतरी एका बहिष्कृत मानल्या मुलाचे हळूहळू समाजापुढे येणे, त्यांचे महत्त्व आणि ज्ञानाचा अधिकार लोकांना लक्षात येणे हे प्रसंग टप्प्याटप्प्याने उलगडत जातात. जेव्हा कीर्ती पसरून ते आळंदीला परत येतात तेव्हा त्यांचे झालेले स्वागत, विरोधकांना झालेली उपरती बघून आपणही सुखावतो. शेवटी जेव्हा समाधीचा प्रसंग येतो तेव्हा आपणही तितकेच भावनिक होतो, डोळ्यात पाणी येतं. कावेरी आणि भट्टादेवांप्रमाणे आपणही दोन पिढ्यांचे भोग बघितलेले असतात. आता त्याचा पश्चात्ताप समाजाला झालेला असताना ज्ञानदेवांनी आपल्याला सोडून जावू नये ही आपलीही भावना होते. ओल्या डोळ्यांनी कादंबरी पूर्ण करतो.

आता काही पाने उदाहरणादाखल वाचा.

लग्नानंतर कावेरी रुक्मिणीला तिच्या संसाराबद्दल बोलते करते तेव्हा



गावाने वाळीत टाकले तरी ते प्रसन्नचित्ताने स्वीकारून ईश्वरोपासना करत जगण्याची वृत्ती दाखवणारा प्रसंग



आळंदी ते प्रतिष्ठान पायी प्रवासातील एक प्रसंग. तेव्हाच्या समाजाचे वर्णन आणि हरिपाठाची रचना इथे दिसते.



ज्ञानेश्वरीच्या एका अध्यायाच्या निरूपणाचा भाग


पाहिल्यापानापासून शेवटच्या पानापर्यंत मोहून ठेवणारे हे पुस्तक आहे. कथानक माहिती असले तरी ते कसे कसे घडले असेल हे नव्याने बघितल्यासारखे वाटते. जुन्या भाषेची गोडी आणि वेगळेपणा मनात असा मुरतो की खूप वेळ पुस्तक वाचल्यावर आपण सुद्धा त्याच भाषेत बोलू की काय असे वाटते. चरित्रात चमत्कार हे चमत्कार म्हणूनच दाखवले आहेत. त्याचे तार्किक स्पष्टीकरण किंवा खरं काय वेगळं घडलं असेल वगैरे प्रयोग केलेला नाही.

ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचे चिरस्थायी महत्त्व, त्यांच्या कुटुंबाला कराव्या केलेल्या संघर्षाची सामाजिक मांडणी आणि गोनीदांची लेखणी असा त्रिवेणी संगम आहे. मराठी साहित्यातले हे अढळ स्थान मिळालेले पुस्तक आहे. सुजाण वाचक वाचतच राहतील.

ता.क. पुस्तकाच्या प्रतीचंही आपलं आपलं भाग्य... ह्या पुस्तकाचं वाचन चालू असतानाच आळंदीला जायचा योग आला. थेट समाधीवर हे पुस्तक ठेवण्याची संधी मिळाली... विषय, आशय आणि लेखक ह्या दृष्टीने प्रसिद्ध असणारे हे पुस्तक. हजारो प्रति निघाल्या असतील. पण असा योगायोग फार कमी प्रतींच्या बाबतीत घडला असेल.




——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-








त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)

पुस्तक - त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers) लेखक - इतो ओगावा (Ito Ogawa) अनुवाद - मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni) भाषा - मराठी (Mar...