पुस्तक :- कैफा हालक ओमान (kaiphaa hAlak omaan )
लेखक :- सुप्रिया विनोद (supriyA vinod)
भाषा :- मराठी (Marathi)
पाने :- ३३६
कैफा हालक ओमान - ही ओमान मध्ये राहणाऱ्या भारतीयांवरची कादंबरी आहे. १९९१ सालच्या आसपासचा काळ आणि तेव्हा नोकरी निमित्त भारतातून गेलेले वेगेवेगळ्या वयाचे भारतीय हे या कादंबरीचे नायक आहेत. या कादंबरीचा फॉर्म थोडा वेगळा आहे. या कादंबरीचे नायक-नायिका अर्थात अश्विनी, विक्रम, श्रीकांत, बानी, वसंत, कुमार, शमिका - प्रत्येक जण आत्मनिवेदन करतो आहे असे स्वरूप आहे. या स्वनिवेदनातून कथानक पुढे सरकते.
ही सगळी पात्रं मध्यमवयीन; नुकतीच लग्न झालेली किंवा थोडाफार संसार झालेली अशी आहेत. चांगली नोकरी, चांगला पैसा मिळावा म्हणून ते इकडे आले आहेत. ओमानात त्यांना लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आहेत पण परक्या देशात, ओमानी माणसांच्या हाताखाली त्यांची मर्जी सांभाळत जगावं लागतंय याची टोचणीही आहे. ओमानातली शिस्त, स्वच्छता, सुरक्षितता बघता आपण भारतातील गर्दी, घाण, भोंगळ कारभार यातून स्वतःची तरी सुटका करून घेऊ शकलो याचा त्यांन आनंद आहे. आलिशन घरं, महागड्या गाड्या असं सुखवस्तू आयुष्य जगायला मिळतंय याचं समाधान आहेच पण आपली जिवाभवाची माणसं दूर सोडून आल्याचं दुःखही आहे. नवऱ्यामागे इकडे आलेल्या स्त्रियांना आपलं करीयर सोडून यावं लागल्याची नाराजी आहे; पण नवऱ्याचा विरह सहन करावा लागत नाहिये याचा आनंद आहे. साधं सोपं आयुष्य मिळालंय पण भारतात असते तशी मोकळीक महिलांना नाही याची घुसमटही आहे.
अशा द्विधा अवस्थेत हि मंडळी आपल्यासारख्याच समसुखी-समदुःखी-समविचारी भारतीयांच्या जवळ नाही आली तरच नवल. ती तशी एकत्र येतात, एकेमेकांना आधार देतात, आपले सणवार साजरे करतात, दुःखद प्रसंगी-संकटकाळी आधार देतात; आणि ओमानचं वास्तव्य संपलं की जड अंतःकरणाने परत जातात याची ही कहाणी आहे.
९१ साल असो की आजचं २०१७ साल; ओमान असो की अमेरिका नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक असणाऱ्या भरतीयांची द्विधा अवस्था आजही बहुतांश अशीच असेल. म्हणूनच भौगोलिक पार्श्वभूमी किंवा साल बदलूनही ही कादंबरी तशीच्या तशी वाचली तरी फरक पडणार नाही. पण हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे का कच्चा दुवा हे प्रत्येक वाचकाने ठरवायचं. या कादंबरीत मला "ओमान" दिसेल या अपेक्षेने मी ही कादंबरी वाचायला घेतली. पण यात ओमान दिसतो तो भावनिक प्रसंगांची पार्श्वभूमी म्हणुन, मागे तोंडी लावण्यापुरता. नवरा-बायकोमधले, जुन्या प्रियकर-प्रेमिकांमधले रुसवेफुगवे आणि वर म्हटलं तसे द्विधा मनःस्थितीतले प्रसंग हेच पुस्तकात ठळक आहेत. कदाचित माझ्या पूर्वग्रहामुळे/अपेक्षेमुळे मला वाचताना तितकी मजा आली नाही. कदंबरीतली "अनपेक्षित" वळणे तितकी अनपेक्षित किंवा नाट्यमय वाटली नाहीत. मी भराभर पुढे वाचत राहिलो.
तुम्ही अनिवासी भारतीयांबद्दलची अशी काही कादंबरी किंवा आखाती-मुस्लिम जागातल्या वास्त्यव्यबद्दल काहीच वाचलं नसेल तर ही कादंबरी वाचायला हरकत नाही.
------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment