कांचनगंगा (Kanchanganga)




पुस्तक : कांचनगंगा (Kanchanganga)
लेखिका : माधवी देसाई (Madhavi Desai)
भाषा : मराठी (Marati)
पाने : २१६
ISBN :8177661337 (For printed)ISBN :9788184987386 (for e-book)

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती :


अंजनीबाई मालपेकर या जुन्या जमान्यातल्या प्रसिद्ध गायिका; हिराबाई पेडणेकर या महाराष्ट्रातील पहिल्या नाट्यलेखिका आणि राजा रविवर्मा या महान चित्रकाराची प्रेरणा असणारी सुरंगा मुळगावकर; या तिघींवर आधारलेली ही कादंबरी आहे असं लेखिकेने प्रस्तावनेत सांगितलं आहे. मात्र या तिघींपैकी अंजनीबाई हेच या कथेचं मुख्य पात्र आहे आणि त्यांच्या जन्मापासून वृद्धापकाळपर्यंतचा प्रवास त्यात आहे. या तिघी बालमैत्रिणी. एकाच शाळेत शिकलेल्या, मुंबईत स्थायिक असलेल्या गोवेकर समजातल्या. त्यामुळे शाळेत आणि अंजनीबाईंच्या नंतरच्या आयुष्यात जेव्हा त्यांची भेट झाली असेल त्या त्या वेळच्या प्रसंगात त्या येतात. हिराबाईंनी लेखनात खूप नाव कमवले. पण त्यांच्या गुणांपेक्षा त्यांच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन सलगी करणरेच त्यांना जास्त भेटले. शेवटी योग्य जोडिदार मिळाल्यावर त्या सगळ्यांपासून दूर रहायला गेल्या. या पेक्षा जास्त माहिती कादंबरीतून कळत नाही. तसंच तरूण सुरंगाला पाहून राजा रविवर्मा मोहित झाले. त्यांनी आपल्या चित्रांत देवी, अप्सरा या रूपात सुरंगाचीच प्रतिमा चितारली. सनातनी मंडळींना ही चित्र आवडली नाहीत. या लोकापवादातून सुरंगाने आत्महत्या केली इतकीच माहिती पुस्तकातून मिळते. 

आता मुख्य पात्र सुरंगाकडे वळूया. लेखिकेने प्रस्तावनेत म्हटलंय की "..चारित्र्यसंपन्न अशी अंजनी,गोमंतक मराठा समाज, त्या समाजाची, त्या काळची अवस्था या साऱ्या चौकटीतूनंजनीचं मोठेपण जाणवून द्यायचं होतं.  गायिका म्हणून अंजनीबाईंना मी पूर्णपणे व्यक्त करू शकले नसेनही...पण व्यक्ती म्हणून त्यांचं मोठेपण व्यक्त व्हावं हा माझा प्रयत्न आहे". कादंबरी वाचताना हे तिन्ही प्रयत्न फसलेले दिसतात. तो काळ, म्हणजे नक्की कुठला ? ते कळत नाही. ब्रिटिशराजवटीतला काळ आहे हे कळतं पण नक्की कुठले साल कळत नाही. खऱ्या व्यक्तिवर कादंबरी असताना काळ, तारखा यांचा उल्लेख असला की संदर्भ नीट लागतो. ते या पुस्तकात होत नाही. तसंच अंजनी बाईंचा समाज/जात नक्की कोणता याचाही उल्लेख नाही. मी गोव्यावरच्या कादंबऱ्या आधी वाचल्या होत्या ( प्रार्थनातांडव, होमकुंड) त्यामुळे कलावंतिणी, भाविणी, यजमान, त्यांची कुटुंबव्यवस्था या बद्दल जुजबी माहिती होती. म्हणून मला पुस्तकातल्या गोष्टींचा संदर्भ लागला. पण ज्याला याची काहीच माहिती नाही त्याला पुस्तकातले प्रसंग नीट कळणार नाही किंवा तीव्रता जाणवणार नाही. त्या समाजावरचे संदर्भ ग्रंथ काही मी वाचलेले नाहीत तरी आधीचा कादंबऱ्या वाचून जे जाणवलं, समजलं तसं काही या कादंबरीने होत नाही. 

अंजनीबाई कलावंत समाजात जन्मल्या. गाणं-वाजवणं-नृत्य करणं हे या समाजाच्या उपजीविकेचं साधन आहे. त्यामुळे त्या गाणं शिकल्या, कुठल्याही महान कलाकाराप्रमाणे भरपूर रियाज केला, आवाज खूप चांगला होता म्हणून भरपूर प्रसिद्धी, पैसे, मानसन्मान मिळाले. शेवटी पतीच्या आर्थिक अडचणींमुळे आणि शारिरिक व्याधींमुळे बहुतेक संपत्ती गमवावी लागली हा सरधोपट प्रवास दिसतो (हा प्रवास कथा म्हणून बघताना. प्रत्यक्ष व्यक्तीचं आयुष्य सरधोपट असं म्हणयचं नाहिये). यात "वेगळेपणा" ,"व्यक्ती म्हणून मोठेपणा" असलं काहीच कादंबरीतून जाणवत नाही. 

लेखिकेने प्रस्तावनेत म्हटलं आहे की त्यांनी अंजनीबाईंवरचा एक लेख वाचला आणि त्यातून हे कथाबीज निर्माण झालं. ही कादंबरी पूर्ण वाचल्यावर असं वाटलं की तो लेख आणि लेखिकेच्या संशोधनातून मिळलेली माहिती उदा. - त्यांचे गुरु,त्यांचे घराणे, गाण्याची वैशिष्ट्ये, सन्मान, शिष्य, सहकलाकार इ. जरी कादंबरीच्या सुरुवातीला दिला असता तरी पूर्ण कादंबरी वाचायची गरज पडली नसती. या कादंबरीपेक्षा पण एखाद्या लेखातून अंजनीबाईंची ओळख अजून छान आणि लक्षात राहील झाली असती.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...