पुस्तक : लॉरी बेकर (Laurie Baker)
लेखक : अतुल देऊळगावकर (Atul Deulagonkar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १५४
ISBN : दिलेला नाही
लॉरी बेकर या वास्तुविशारदाचं हे अत्मचरित्र आहे. लॉरी बेकर यांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी पर्यावरणपूरक आणि अल्पखर्चातली घरं यांच्या प्रचार-प्रसारासाठी आपलं आयुष्य वेचलं. मूळ ब्रिटिश असणारे बेकर तरूण वयात ख्रिश्चन मिशनरींच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी भारतात आले. इथेच रमले. आणि कायमस्वरूपी भारतात राहिले. १९४० च्या दशकात भारतात आलेल्या बेकर यांची गंधिजींशीही भेट झाली. आणि परिचय झाला. घरं ही पंचक्रोशीत उपलब्ध असलेल्या सामानातून बांधली गेली पाहिजेत हा गांधींचा विचार त्यांच्या विचारांशी जुळाणारा होता. भारतात ठिकठिकाणी वास्तव्य करताना गावातले लोक घरं कशी बांधतात, पारंपारिक घरांची रचना आणि त्यात लागणारं सामान काय असतं याचं निरीक्षण आणि अभ्यास बेकर करत रहिले. कुठल्याही क्षेत्रातली पारंपारिक वास्तूकला ही तिथल्या निसर्गाशी जुळवून घेणारी, कमी खर्चातली आणि कमी ऊर्जा(वीज, कोळसा इ.) लागणारी असते हे सुस्पष्ट त्यांना होत गेलं. या पारंपारिक पद्धती टाकून देऊन सिमेंट, कँक्रिट चे ठोकळे आणि काचेच्या पेट्यांसारख्या इमारती बनवणं घातक आहे हा त्यांचा विचार पक्का झाला. त्यातूनच पुढे आयुष्य भर निरनिराळ्या समाजसेवी संस्था, सरकारी इमारती, शाळा, चर्च इ. वास्तू आणि सर्वसामान्यांची घरे यांचे पर्यावरणस्नेही अभिकल्प (डिझाईन) ते करत राहिले.
लॉरी बेकर यांचा हा प्रवास लेखकाने पुस्तकातून मांडला आहे. त्यांना वेगवेगळी कामे कशी मिळत गेली आणि त्या त्या ठिकाणच्या जमिनीच्या रचनेला अनुकूल अभिकल्प त्यांनी कसे दिले हे ओघात समजावून सांगितलं आहे. किल्लारीच्या भूकंपानंतर मदतीसाठी त्यांना एका स्वयंसेवी संस्थेने पाचारण केलं होतं. तिथे दगडी घरं पडल्यामुळे लोकांनी बांधकामात दगड वापरण्याचा धसका घेतला होता. पण बेकर यांनी "दगड" ही समस्या नसून त्याची चुकीची रचना ही समस्या आहे हे स्थानिकांना पटवून दिलं. लोकांच्या गरजा जाणून घेऊन पूर्ण गाव कसं वसवावं याचा आराखडा काढून दिला. पण शेवटी त्या संस्थेचा स्वार्थ आणि राजकारण आडवं आलं आणि त्यांना काम पूर्ण करता आलं नाही. हा अनुभवही पुस्तकात आहे.
बेकर यांना केरळ सरकारने काही सरकारी बांधकामांचीही कामं दिली होती. काम गुणवत्तापूर्ण पण किमान खर्चात ते करू लागल्यावर नोकरशाही अस्वस्थ झाली. कामाचा खर्च कमी झाला की मधली दलाली, मलई पण कमी. यामुळे नियमांच्या फराट्याने त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन मुखयमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली म्हणून ते काम पुढे रेटू शकले. भारतीय नोकरशाहीची ही सर्वज्ञात मानसिकता मोठ्या, निस्वार्थ माणासालाही त्रासदायक ठरते !
बेकर यांनी सांगितलेले काही नियम आणि काही टिप्स पण या पुस्तकात दिल्या आहेत. सचित्र माहिती दिली आहे. त्यामुळे मझ्यासारख्या वास्तुविशारद कलेशी निगडित नसणाऱ्यालाही त्यांच्या विचाराची कल्पना येते. जे या क्षेत्रात काम करतात त्यांना नक्कीच अधिक खोलात जाऊन याचा अभ्यास करावासा वाटेल.
घर बांधतानच आवश्यक ते फर्निचर - बेड, सोफा - दगडविटांतच बांधून घ्या इ. हे खरंच मला खूप आवडलं
पुस्तकात त्यांनी बांधलेल्या बांधकामाचीही चित्रं आहेत. काही रेखाचित्र(स्केचेस आहेत). बेकर यांनी स्वतः काढलेली रेखाचिरे आणि व्यंगचित्रे आहेत. तरीही अजून चित्रे असावीत असं वाटत राहतं. "वास्तून त्यांनी विटांची अशी रचना केली होती की प्रकाश मंदपणे आत झिरपेल" असं वाक्य असेल तर त्या वास्तूची कल्पना करणं आणि प्रत्यक्ष बघणं यात फरक आहेच. त्यामुळे कितीही फोटो दिले तरी ते कमीच वाटले असते. यूट्यूब वर मला काही व्हिडिओ मिळाले. ते बघताना पुस्तकातली वर्णने अजून मनाला भिडली.
लेखकाने बेकर यांच्यामधला कलाकार या छान शब्दांत मांडला आहे.
पुस्तकात उपस्थित केलेला एक प्रश्न मात्र अस्वस्थ करतो की - पर्यावरणस्नेही, अल्पखर्चातली घरं असूनही सर्वसामन्यांचा ओढा त्याकडे नाही. श्रीमंतांना "अल्प"खर्चाचं आकर्षण नाही. म्हणून ते कँक्रिटची, काचंची चमकदार घरं बांधतात. गरीबांना कसंही करून मोठ्यांच्या सारखं दिसायचंय. अल्पखर्चातली घरं तशी दिसत नाहीत म्हणून तेसुद्धा पदरमोड करून महगातली घरं बांधयचा अट्टाहास करतायत. यात पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीचा, पुढच्या पिढ्यांचा कोणीच विचार करत नाही. हे पुस्तक पुणे-मुंबई रेल्वे प्रवासात वाचताना बाहेर नजर गेली की हेच भयाण वास्तव सारखं समोर दिसत होतं. कॉंक्रिटची घरं. काचेच्या मोठ्या खिडक्या. "ब्लॉक" पद्धतीत वायूविजनाला समोरासमोर खिडक्या नाहीत. त्यामुळे दिवसाही दिवे लावा आणि वारा येत नाही म्हणून एसी लावा. आपण प्रगती करतो आहोत का अधोगती !
पुस्तक वाचून बेकरांचं सगळं शास्त्र समजणार नाही कारण हे काही त्या विषयावरचं तांत्रिक पुस्तक नाही. पण वास्तूकडे बघण्याचा पर्यावरणपूरक दृष्टिकोन जरी आपल्याला लाभला तरी तरी या पुस्तकाने आपल्याला चांगले प्रगल्भ केले असे म्हणायला हरकत नाही.
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
हे पुस्तक कोठे उपलब्ध आहे
ReplyDeleteमी वाचनालयातून घेतलेले. उपलब्धतेची कल्पना नाही.
Delete