गोदान (Godan)




पुस्तक : गोदान  (Godan)
मूळ भाषा : हिंदी  (HindI)
पुस्तकाची भाषा : मराठी (Marathi)
मूळ लेखक : मुन्शी प्रेमचंद (Munshi Premchand)
पाने : ३२४
भाषांतरकार : दिलेले नाही
ISBN : दिलेला नाही


"गोदान" ही हिंदीतील थोर साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. इंग्रजांच्या काळातल्या लखनऊ जवळच्या खेड्यात घडणारी ही कादंबरी आहे. त्यावेळच्या शेककऱ्यांचे साधारण स्वरूप असं की जी काही थोडीशी जमीन आहे ती कसायची, तुटपुंज्या उत्पन्नात घर चालवायचे, ते चालत रहावे यासाठी कर्जे घ्यायची आणि आयुष्यभरासाठी व्याजाच्या ओझ्याखाली स्वतःला गाडून घ्यायचं. कधी उत्पन्न चांगले आले नाही म्हणून परतफेड थकायची तर कधी गावातल्या सावकार-पटवारी-महाजन-कारकून मंडळींकडून फसवणूक झाल्यामुळे पैसे देऊनही कर्ज शिल्लकच. त्यामुळे एकदा का कर्जाचा फास मानेला बसला की बसलाच. असाच शेतकरी होरी आणि त्याची बायको धनिया ही या कथेची मुख्य पात्रे. त्यांचा परिस्थितीशी करूण संघर्ष हा या कादंबरीचा गाभा आहे. 

ही कादंबरी आपल्या डोळ्यासमोर त्यावेळची गावव्यवस्था उभी करते. गावात जातीभेद आहे, उच्च-नीच मानणे आहे. पण जातीय विद्वेश नाहिये कारण प्रत्येक जण आपल्या जातीच्या धर्माशी(कर्तव्याशी) प्रामाणिक रहायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी धडपडतो आहे. धर्म, नैतिकता आणि व्यवहार याचा सोयीस्कर अर्थ लावून, रायसाहेब जमीनदार हे जमीनदारी सांभाळणं आपला धर्म समजतात - ज्यात कास्तकारांकडून जबरदस्ती करांची वसूली करणंही आलं आणि अगदीच कोणी शेती करू शकत नाही अशी अवस्था आली तर त्याला अजून कर्ज देऊन पुन्हा उभा करणंही आलं. गावातल्या एका ब्राह्मण व्यक्तीने चांभार समाजातली बाई ठेवली आहे. सगळ्यांना ते माहिती आहे. पण तो तिच्या हातचं पाणी पीत नाही, अन्न खात नाही, त्याचा धर्म पाळतोय म्हणून अजून तो बाटलेला धरत नाहीत. ती बाईही आपल्या जातबिरादरीचा विरोध झुगारून, तो पुरुष लग्न करणार नाही हे माहीत असूनही त्याला पतिस्वरूप मानते, अपमानित जिणं जगते, हा तिचा धर्म आहे. गावातला पटवारी लाव्यालाव्या करणं हा स्वतःचा धर्म समजतो आहे. कितीही गरिबी असली तरी माणुसकीचा धर्म पाळणं, गावातल्या महाजनांवर विश्वास ठेवून पैसे परत करणं आणि जातबांधव किंवा सख्खे बांधव कसेही वागले तरी सगळ्यांचे अपराध पोटात घालून शेवटी आपल्याला एकत्र रहायचं आहे, भांडलोतंडलो तरी शेवटी जातबांधवच उपयोगी पडतील या भावनेने अडलेल्या आधार देणं हा होरीचा धर्म आहे. त्याची बाय्को धनिया ही नवऱ्याचा भोळेपणा माहीत असल्याने लबाडांना अरे ला का रे करून वठणीवर आणते, प्रसंगी नवऱ्याचे चारचौघंसमोर वाभाडे काढते पण शेवटी राग गिळून नवऱ्याच्या निःस्वार्थ करूणेत साथ देत राहते; कारण तो तिचा पत्नीधर्म आणि तिचाही मानवधर्म आहे. गावातल्या मुली, बायका यांना चुचकारून, पैशाचं आमिश दाखवून आपली वासना तृप्ती करणं हा काही तरूणांचा स्वभाव आहे तर अशा तरूणांना नादी लावून स्वतःच स्वार्थ साधून घेणं हा काही बायकांचा स्वभाव आहे. अशा चित्रविचित्र उभ्याआडव्या ताण्याबाण्यांनी या गावाची वीण घट्ट रचली आहे. आणि या पार्श्वभूमीवर होरीच्या आयुष्याची भयाणगाथा सांगितली आहे.

आपल्या मुलाने बाहेर काहितरी भानगड केलीये, ती मुलगी दाराशी आली आहे आणि मुलगा पळून गेला हे समजल्यावर चिडलेले होरी-धनिया आधी त्या मुलीला हाकलवून  देण्याची भाषा करतात. पण मग त्यांच्यातला माणूस जागा होतो तो प्रसंग वाचा.

(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)



या कथानकाला समांतर कथा शहरात घडते आहे. ज्यात जमीनदार, डॉक्टर, वकील, साखर कारखाना मालक अशा त्यावेळच्या नवशिक्षित, नवश्रीमंत, सुखवस्तू लोकांचा समावेश आहेत. ब्रिटिश राजवट, इंग्रजी शिक्षणपद्धत, समाजसुधारणांचे वारे यामुळे त्यांचे "धर्म"ही डळमळीत आहेत. त्यांच्यामध्ये घडणारे प्रसंग फार खास नाहीत. पण त्या प्रसंगांत त्यांची मैत्री, हेवे-दावे, समाजात रुजणारी नवी मूल्ये - समाजवाद, स्वातंत्र्य, शेतकऱ्यांचे हक्क, स्वार्थ-त्याग, प्रे-वासना, महिलांचे स्थान याबद्दल उलटसुलट मतप्रवाहांची आपसूक चर्चा घडते. 
जमीनदाराविरुद्ध तक्रार एका लोकपक्ष मांडणऱ्या वृत्तपत्राकडे येते. पण त्याचा संपादक हा त्या जमीनदाराचा मित्र असतो. त्यामुळे मैत्रीधर्म का पत्रकारधर्म या तिढ्यात आदकलेल्या संपादकाला जमीनदार स्वतःचे तत्वज्ञान ऐकवतो तो प्रसंग.




होरीचा मुलगा हट्टाने शहरात जातो. मोलमजूरी, करतो. थोडे पैसे गाठीशी बंधतो. शहरातल्या सुधारणेच्या हवेमुळे हक्कांची जाणीव होते, आपल्याला लुबाडलं जातंय याचं भान त्याला येतं. त्यातून तो गावात येऊन वडिलांचे डोळे उघडण्याचा, महाजनांना इंगा दाखवायचा प्रयत्न करतो. पण बापाच्या व गावाच्या स्थितीशीलतेमुळे त्याचे काही चालत नाही.

खेडे अजूनही जुन्याच जमान्यात आहे शहरात मात्र ताज्या विचारांचे वारे कसे घुसू लागले होते याचे प्रतिबिंबच यातून दिसते. त्यामुळे ही फक्त होरीची, शेतकऱ्यांची, गावाची, शहराची कादंबरी न होता; त्या काळाची होते. कादंबरीत प्रसंगांमागून प्रसंग घडत राहतात आणि कथा आपल्याला खिळवून ठेवते. खूप नाट्यमयता, रहस्य, विनोद नसूनही आपण त्या पात्रांच्या त्या विश्वात रंगून जातो. दुर्दैवाने शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही बदललेली नाही ही जाणीव सतत मनाला होत राहते. सध्याचा दुसरा प्रश्न म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेचा. महिलांवरच्या अत्याचारांच्या कहाण्या हल्ली जास्त ऐकू येतात त्याचं कारण शहरातलं मोकळं वातावरण , स्त्रीयांचे कपडे, अश्लीलतेचा प्रसार इ. सांगितलं जातं. पण त्यावेळीही, खेड्यातही अगदी पारंपारिक वातावरणातही हे प्रकार सर्रास होत होते हे विदारक सत्य अंगावर येतं. निसर्गसंपन्न, स्वयंपूर्ण पुवीचं खेडं आशी रोमँटिक कल्पना माझ्यासारख्या शहरी मनात असते. त्या प्रतिमेवरचं धुकं थोडं हटवण्याचं कामही ही कादंबरी करते. गरीबांची दैन्यावस्था दाखवते तशीच जमीनदार रायसाहेबांची ’बडा घर पोकळ वासा’ अवस्थाही दाखवते. म्हणुनच ही कादंबरी फक्त एक गोष्ट नाही तर प्रत्यक्ष जगण्याचा शोभादर्शक(कॅलिडोस्कोप).

कादंबरी सुंदरच आहे पण मी वाचलेलं भाषांतर अतिशय गचाळ होतं. भाषांतरकाराचं नाव दिलेलं नाही. पण ज्याला बरेच वर्ष महाराष्ट्रात राहून नीट मराठी बोलता येत्ये अशा एखाद्या हिंदी भाषिकाने हे केलेलं असावं. कारण व्याकरणच्या चुका, हिंदी शब्द जसेच्या तसे वापरणे, शब्दशः भाषांतर करणे असे सगळे दोष यात दिसतात. मुद्रितशोधनाचेही कष्ट घेतलेले नाहीत. इतक्या छपाईच्या चुका पानापानावर आहेत. त्यदृष्टीने दुसरे कुठले मराठी भाषांतर मिळते आहे का पहा किंवा मूळ हिंदीच वाचा. 



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------


સંબંધ... તો આકાશ !(Sambandh ...to aakash!)





पुस्तक : સંબંધ... તો આકાશ (संबंध... तो आकाश / Sambandh...to aakash!)

लेखिका : કાજલ ઓઝા વૈદ્ય (काजल ओझा वैद्य / Kaajal Oza Vaidya)
भाषा : गुजराथी
पाने : १२८
ISBN : 978-81-8440-361-9


काजल ओझा यांचा हा कथा संग्रह आहे. प्रस्तावनेत त्या म्हणतात त्याप्रमाणे या कथा स्त्री-पुरूष संबंधावर आधारित आहेत. पण या संबंधातल्या नवरा-बायकोचं संबंध हाच सगळ्या कथांचा मुख्य गाभा आहे. या संबंधात शारिरिक गरजा, मानसिक गरजा, करियरच्या गरजा अशा वेगवेगळ्या गरजा सांभाळताना त्यांचा गेलेला तोल आणि त्यातून फसलेले लग्न संबंध असे एकूण स्वरूप आहे. काही कथा लग्नाधीचे फसलेले प्रेमप्रकरण लग्नानंतर पुन्हा आयुष्यात येते या प्रकारच्या आहेत.



उदा. काही कथांची मध्यवर्ती कल्पना :

नवर्‍याच्या मित्राबरोबर संबंध जे मुलाला कळतात...
लग्नानंतरही जुन्या प्रेयसीबरोबर चालू ठेवलेला समांतर संसार मुलीला कळतो...
स्वतः करियारच्या आणि स्व च्या शोधात घर सोडून बाहेर पडलेली स्त्री अनेक वर्षांनी मुलाला भेटते.
घर-संसाराला कंटाळून, नवर्‍याच्या नातेवाईकाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून पुन्हा संसारात अडकतेे..
एक श्रीमंत युवक गृहिणी हवी म्हणून साध्या मुलीशी लग्न करतो आणि बाहेर धंदे करतो ते त्या सतीसावित्रीला कळते ..
प्रेमाच्या त्रिकोणात प्रेमभंग आणि त्यातून बदला...
मैत्रिणीच्या नवर्‍याच्या प्रेमात पडून त्याला पुन्हा आपल्या बायकोकडे पाठवणारी मैत्रीण..
कुमारी माता, मूल नाकारणारा पुरुष आणि काही वर्षांनी त्यांची होणारी पुनर्भेट..
इ.

यातल्या स्त्री-पुरुषांना स्वतःच्या शारिरिक भूकेवर नियंत्रण ठेवता येत नाही म्हणून विवाहबाह्य संबंध किंवा विवाहपूर्व संबंध ते ठेवतात. मानसिक आधार, स्वत:ची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दुसर्‍या स्त्री-पुरूषाची मदत घेत वहावत जाऊन, शरिरसंबंधांपर्यंत पोचून, जुना संसार सोडून-तोडून नव्या संसारात शिरतात. पण तिथेही जुनाच खेळ पुन्हा खेळल्याची निराशा येते. त्या दृष्टीने या कथा अादर्शवादी नाहीत तर वास्तववादी आहेत. बहुतेक कथा उच्चमध्यमवर्गात घडणार्‍या आहेत. यातल्य बायका हुषार आणि पुरूष, देखणे, स्मार्ट, श्रीमंत आहेत तरीही त्यांचं हे असं. "जे जे हवे जे जीवनक्रम ते सर्व आहे लाभले, तरीही उरे काही उणे" असं वाटून दुसर्‍या स्त्री-पुरूषांत सुख शोधणारे.

कथा वाचायला चांगल्या आहेत. एकेक कथा वाचायला कंटाळा येत नाहीत. पण एकामागोमाग एक कथा वाचल्या तर एकसुरी वाटतात. गोष्टींमध्ये लेखिका फक्त निवेदकाची भूमिका घेते त्यावर स्वतः काही बोलत नाही. कथेतली पात्रंपण स्वतःशी फार काही बोलत नाहीत. धडाधड घटना घडतात, घरं सोडतात, घटस्फोट घेतात, आत्महत्या करतात. पण लेखिका त्यांच्या मनात शिरून डोकावून बघायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे परकायाप्रवेश न घडता फक्त परकायादर्शन होतं.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

जमात ए पुरोगामी (Jamat E Purogami)





पुस्तक : जमात ए पुरोगामी (Jamat E Purogami)
लेखक : डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित शेवडे (Dr. Satchidanand Shevde & Dr. Pareexit Shevde)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ११४
ISBN : 978-93-86059-54-3

आपल्या देशात सतत काही ना काही घडत असतं आणि त्यावर दूरदर्शन वाहिन्या, वृत्तपत्रे, नियतकालिके आणि समाजमाध्यमे यांवर चर्चा होत असते. या चर्चेतली एक बाजू स्वतःला पुरोगामी, सेक्युलर, संविधानवादी, डाव्या विचारांचे, विवेकवादी वगैरे म्हणत असते. वरवर बघता ही बाजू पुरोगामी - पुढारलेली अशी वाटते. पण अजून जवळून आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या बोलाण्या-वागण्याचा जरा विचार केला की लक्षात येतं "दाल में कुछ काला है". हे काळबेरं आपल्या समोर स्पष्ट करण्याचं काम हे पुस्तक करतं.

हिंदूंच्या अंधश्रद्धांवर तावातावाने बोलणारे बाकी धर्मियांच्या अंधश्रद्धांवर काही बोलत नाहीत. "संविधान बचाव" म्हणून ओरडणारे दुसरीकडे "भारत तेरे तुकडे होगे, इन्शा अल्लाह" म्हणणाऱ्यांची तळी उचलतात. विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवतो म्हणणारे भारतीय शास्र आयुर्वेद यांची वैज्ञानिक चिकित्सेच्याही भानगडीत न पडता हे सगळं थोतांड आहे असं स्वतःच जाहीर करतात.  अशा अनेक दुटप्पीपणाची, ढोंगींपणाची उदाहरणं देऊन लेखकांनी अपला मुद्दा स्पष्टपणे पुढे मांडला आहे.

उदा. त्रिपुराचे मुख्यमंत्री यांच्या साध्या रहाणीचा खूप गवगवा मध्यंतरी झाला पण प्रत्यक्ष चित्र मात्र वेगळेच होते. त्याबद्दलच्या एका लेख



अलिगढ विद्यापीठात जीनांच्या फोटोवरून वाद झाला आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने गळे काढले गेले पण एका प्राध्यापकाची समलैंगिक म्हणून हकालपट्टी केली तेव्हा मात्र कुणाला हे स्वातंत्र्य आठवले नाही.


हिंदू धर्मातले, भारतीय परंपरांतले सगळे वाईट अवैज्ञानिक म्हणून बदनाम करणारे मात्र वैज्ञानिक आधार द्यायला काचकूच करतात. एखादी गोष्ट विज्ञानाने सिद्ध केली तर आपण त्या गावचेच नाही असे अनुल्लेखाने मारतात.


तर अशा खोट्या पुरोगाम्यांना या पुस्तकाने जमाते-पुरोगामी ही संज्ञा दिली आहे. जमातवाद म्हणजे टोळीवाद अर्थात माझी टोळी हीच चांगली, श्रेष्ठ; तिलाच जगण्याचा अधिकार बाकी सगळ्यांना शस्त्र, शास्त्र, शब्द यांनी तुटून पडायचं, विध्वंस करायचा. म्हणून हे जमात ए पुरोगामी. या विषयावर दोन्ही लेखकांनी तरूण भारत मध्ये लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. अनुक्रमणिकेवरून लेखांच्या विषयांची साधारण कल्पना येईल.

डॉ. सच्चिदानंद शेवडे हे व्याख्याते, प्रवचनकार आणि साहित्यिक आहेत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, क्रांतिकारकांची चरित्रे, धार्मिक आणि समाज प्रभोधनार्थ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. परीक्षित हे त्यांचे पुत्र व्यवसायाने वैद्य असून तेही ऐतिहासिक आणि समज प्रबोधनपर व्याख्याने देतात. 




जमात ए पुरोगामींचा दुटप्पीपणा आणि देश विघातक कारवाया हा काही या पुस्तकानेच जाणवून दिलेला मुद्दा आहे अशातला भाग नाही. दूरदर्शन वरील चर्चेत भाग घेणारे हा दुटप्पीपणा लगेच दाखवून देतात. समाजमाध्यमांत तर अशांची रेवडी उडवली जाते. व्यंगचित्र, विनोद केले जातात. या त‍थाकथित विचारवंतांची मुक्ताफळे आणि बदललेली सोयिस्कर भमिका अगदी स्क्रीनशाॅट सकट दाखवून लगेच दात घशात घातले जातात. पुस्तकातल्या लेखांचं स्वरूप साधारण असेच आहे. 

समाजमाध्यमांतले लेख हे कित्येकदा अननुभवी किंवा कमी अनुभवी लोकांनी लिहिलेले असतात. बर्‍याचदा याचा एकूण रंग whataboutism - आम्ही चुकलो काय म्हणता; तुम्ही किती चुका केल्या आहेत ते पहा - असा असतो. खोलात जाऊन, वैचारिक पातळीवर मूलगामी चूक दाखवणे घडत नाही. नियतकालिकांत जागा आणि शब्द संख्या यांच्या मर्यादेमुळे साक्षीपुरावे, आकडेवारी यांच्या आधारे गोळीबंद बाजू मांडली जात नाही. सोशल मिडियात एका पोस्टवर लोक फार टिकत नाहीत म्हणून मोठ्या पोस्ट टाळल्या जातात. 
त्यामुळे या विषयावर पुस्तक रूपाने काही प्रकाशित होतंय म्हटल्यावर माझ्या काही जास्त अपेक्षा होत्या (हे पुस्तक विकत घेताना हा लेखांचा संग्रह आहे हे मला माहीत नव्हतं)पण मोठे, ससंदर्भ लेख पुस्तकात शक्य आहेत. असं पुस्तक जास्त प्रभावी आणि जास्त काळ टिकणारं असतं. ती अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करत नाही. संदर्भसूची तरी नक्कीच हवी होती. लेखकाशी सहमत वाचकाला जर एखाद्या मुद्याच्या खोलात जायचं असेल तर त्याला ते उपयोगी पडलं असतं. लेखकाच्या विरूद्ध मताच्या (पण संतुलित) वाचकाला हे अधिक विश्वासर्ह वाटलं असतं.

उघडपणे दिसणारा दुटप्पीपणा दाखवला आहे पण छुपेपणे कसा बुद्धीभेद करतात - माध्यमांत चर्चा कशा रंगवल्या जातात, मथळे कसे दिले जातात, विरोधी मतांची गळचेपी कशी होते याबाबतचा लेखकांचा अनुभव शेअर करायला हवा होता.

पुस्तकात जमात ए पुरोगामी हे दुखणं मांडलं आहे पण त्यावारच्या उपायांची विशेष दखल नाही. छद्मपुरोगाम्यांना रोखण्यासाठी कोण प्रयत्न करतंय, काय केलं जात आहे, काय केलं गेलं पाहिजे, वाचकांकडून काय अपेक्षा आहेत यावर काही लेख हवे होते.

त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या राजकीय-सामाजिक चर्चां बघत-वाचत असाल तर यातले बहुतेक मुद्दे कुठेना कुठे वाचलेले असतील. एखाददोन घटना, आकडेवारी नव्याने कळेल. जर तसं वाचन कमी असेल किंवा तुम्ही अगदीच "पुरोगामीभक्त" असाल तर या पुस्तकातून तुमच्या विचारांना चालना मिळू शकेल. ज्यांना खूपच आदर्श मानत होतो त्यांची उलटतपासणी करणं गरजेचं आहे एवढं तरी पटेल.

लेखकद्वयी डोंबीवलीची आहे आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम डोंबीवलीतच होता. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते झाले. त्यांचेही मनोगत ऐकायला मिळाले.



पहिल्यांदाच असे प्रकाशनात जाऊन पुस्तक घेतले आणि लेखकांच्या सह्या घेतल्या.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
---------------------------------------------------------------------------------

पुस्तकांचे गाव- भिलार. भारतातील पहिले" (First Book town in India - Bhilar in Maharashtra)

"पुस्तकांचे गाव" याबद्दल बऱ्याच वेळा ऐकलं होतं पण म्हणजे नक्की काय ते कळत नव्हतं. रमा खटावकर यांनी फेसबुकवर "पुस्तकांचे गाव - भिलार" अशी पोस्ट टाकली होती. त्यांनी दिलेल्या फोटोंमुळे कल्पना आली आता. अजून माहिती मिळाली. आगळावेगळा प्रयोग आहे हा. या उपक्रमाची अजून लोकांना माहिती व्हावी म्हणून हि माहिती आणि फोटो माझ्या ब्लॉगवर टाकायची परवानगी त्यांना मागितली असता त्यांनी अगदी आनंदाने परवानगी दिली.


रमा खटावकर यांच्या शब्दांत आणि फोटोद्वारे आपण पण या गावाची सैर करूया.



पुस्तकांचे गाव- भिलार याबद्दल खूप ऐकले होते. मागच्या आठवड्यात प्रत्यक्ष भेट द्यायचा योग आला. याबद्दल आवर्जून सर्वांना माहिती द्यावी, असे वाटले, म्हणून फोटोही काढले. 
पूर्वी स्ट्रॉबेरीसाठी आणि सध्या त्याचबरोबर पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हे भिलार गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणापासून आठ कि.मि. आंतरावर आहे. अवघ्या दोन कि.मि. विस्तार असलेल्या या छोट्याशा पण टुमदार गावाने भारतातील पहिले "पुस्तकांचे गाव" होण्याचा मान पटकावला आहे. पुस्तके आणि साहित्यासंदर्भातील ओळख असल्यामुळे याबरोबरच येणारा सुसंस्कृतपणा गावात फिरताना पदोपदी जाणवतो. 

गावातील काही घरांनी (प्रथम २५ घरे होती, आता ३० झाली आहेत.) आपल्या घरातीलच एका खोलीचे ग्रंथालय बनवले आहे. अतिशय नेटकेपणे ठेवलेली एकेका विषयावरील पुस्तके, तिथेच बसून वाचनाची उत्तम सोय, वाचनासाठी आवश्यक असे वातावरण, घरातील व्यक्तींचे प्रसन्न, अगत्यपूर्ण सहकार्य या गोष्टी अनुभवून रसिक वाचकाचे मन प्रसन्न होते. आपण स्वतः पुस्तकांच्या कपाटांमधून, रॕक्सवरून पुस्तके घेऊन हाताळू शकतो.  हे सर्व संपूर्णपणे निःशुल्क आहे.

प्रत्येक पुस्तकालयात सुबक अशी पुस्तकसूची, अभिप्राय वही, वर्तमानपत्रातील भिलारसंबंधित बातम्यांची कात्रणे असलेली चिकटवही असे सर्व ठेवलेले असते. कादंबर्या, विनोद, ऐतिहासिक , नियतकालिके, दिवाळीअंक, बोलकी पुस्तके, अशा ३० पद्धतींनी वर्गीकरण केले आहे. 

प्रकल्प सुरू झाला, त्यावेळी सुमारे १५,००० पुस्के होती, आता ही संख्या २५,००० झाली आहे. सर्व पुस्तके फक्त मराठीतलीच आहेत. पुस्तकविक्रीचे दुकान मात्र एकच आढळले. एक प्रकल्प कार्यालयही आहे. साहित्यविषयक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी एक नाट्यगृहही आहे. 

या गावातून फिरताना गावातील भिंतींवर, घरांवर, पुस्तकांच्या संदर्भातलीच सुंदर सुंदर चित्रे, कार्टून्स दिसतात. आपल्या पु. लं.चं एक कार्टून तर सेल्फी पॉइंट म्हणून प्रसिद्ध झालं आहे. गावात कुठल्या घरात, कुठल्या विषयाची पुस्तके आहेत, त्याच्या locationचा एक नकाशाही लावला आहे. त्यामुळे आपले शोधणे सोपे होते. 

गावाबद्दल आणखी कुतूहल वाढले, आणि खालील माहिती मिळाली. 
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने हा आगळावेगळा उपक्रम राबविला गेला आहे. 
४ मे २०१७ रोजी मा. मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. 
याआधी तीन दिवस एक बस करून चित्रकार इथे आले होते. त्यांनी सगळं गाव छानछान चित्रांनी भरून टाकलं.

ब्रिटनमध्ये "Hay on Wye" या नावाचे एक गाव आहे. पुस्तकांची दुकाने, व साहित्यसंदर्भातील उत्सव- उपक्रमांसाठी ते प्रसिद्ध आहे. या गावावरून भिलार- पुस्तकांचे गाव बनविण्याची प्रेरणा मिळाली, असा उल्लेख मिळतो. 
हवामान आल्हाददायक असल्याने, गावात फिरण्याचे श्रम आजिबात जाणवत नाहीत.
तरीही श्रमपरिहारासाठी प्रत्येकाच्या रुचीनुसार अल्पोपहार, तसेच भोजनगृहेही आहेत. अर्थातच तिथेही पुस्तकांची सोबत सुटत नाहीच. हंगाम असेल तर मधुर अशा स्ट्रॉबेरींचा पण आस्वाद घेता येईल. गावात फिरताना अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड केलेलीही पहायला मिळाली.

"भारतातील पहिले" असा या गावाचा उल्लेख पाहिल्यावर गूगल सर्च केले, तेव्हा वरील ब्रिटनमधल्या गावाखेरीज library tourism म्हणून ओळखली जाणारी फ्रान्समधली आठ गावे अशाच वर्णनाची (book towns) आढळली. बाकी कुठेही असा उल्लेख नाही. 

तर मग याला अशियातील अशाप्रकारचे पहिले गाव म्हणण्यास हरकत नसावी.

प्रत्येक पुस्तकप्रेमीने एकदा तरी भेट द्यावी आणि पुस्तकांमधे हरवून जावे, असे हे गाव नक्कीच आहे.



फोटोवर क्लिक करून झूम करून नीट पाहता येईल 






























Shivaji - the Grand Rebel (शिवाजी - द ग्रॅंड रेबेल)





पुस्तक : Shivaji - the Grand Rebel (शिवाजी - द ग्रॅंड रेबेल)
लेखक : Dennis Kincaid (डेनिस किंकेड)
भाषा : इंग्रजी
पाने : ३२७ (छोटी डायजेस्ट आकाराची)
ISBN : 978-81-291-3720-3


छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चरित्र डेनिस किंकेड या भारतात नोकरी करणाऱ्या ब्रिटिश व्यक्तीने लिहिले आहे. हे पुस्तक १९३७ साली प्रकाशित झाले. डेनिस किंकेडचे वडीलही भारतात सरकारी नोकरीत होते. त्यांचाही भारतीय इतिहासाबद्दल दांडगा अभ्यास होता व त्यावर अनेक पुस्तके लिहिली होती.

या पुस्तकाची ओळख करून देताना टी.एन. चतुर्वेदींंनी म्हटले आहे की "१९ व्या शतकात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे संशोधन आणि लेखन सुरू झाले. सुरुवातीला भारतीय लेखकांनी आणि मग इंग्रज लेखकांनी लिहायला सुरुवात केली. ग्रॅंड डफच्या मराठ्यांचा इतिहासात शिवाजी महाराजांना लुटारू, खंडणीखोर ठरवण्यात आलं. पुढे टिळक आणि होमरूल चळवळीमुळे शिवाजी महाराजांची स्थापना राष्ट्रीय नायक स्वरूपात झाली. यदुनाथ सरकार यांंनी सविस्तर इतिहास लिहिला. परंतु शिवाजी महाराजांची विकृत ओळख इंग्रजांच्या मनातून पुसून एक नायक म्हणून प्रतिमा उभी करण्यात महात्त्वाचा वाटा बजावला तो या पुस्तकाने".  हे या शिवचरित्राचे वैशिष्ट्य आहे. 

प्रस्तावनेत लेखक म्हणतो की ,"बहुतेक इंग्रजांना, मुघलांची ओळख ही ब्रिटिशांच्या आधीचे राज्यकर्ते म्हणून असते. पण जेव्हा ते भारतातल्या ब्रिटिश राजवटीच्या वाढीचा इतिहास बघतात तेव्हा त्यांना ब्रिटिशांना विरोध करणारे कुणी मुघल दिसत नाहीत. त्यांचा  संघर्ष सतत मराठ्यांशी होताना दिसतो. दुर्दैवाने व्हिक्टोरियन इतिहासकार मात्र  मराठ्यांची बोळवण बंडखोर म्हणून करतात". मुघलांनंतर शंभर वर्षे मराठा साम्राज्य देशात सर्वात बलशाली होते त्याची यथार्थ ओळख करून देण्यासाठी हे पुस्तक त्याने लिहिले आहे. 

जिजाऊ-शहाजी राजे यांच्या लग्नापासून शिवाजी महाराजांच्या मृत्युपर्यंतचा इतिहास यात आहे. शिवचरित्रातले सर्व महत्त्वाचे प्रसंग यात येतात. पण हे प्रसंग नुसते दिले असते तर एक साम्राज्य जाऊन दुसरा राजा तयार झाला इतपतच बोध परकीय वाचकाला झाला असता. शिवाजी महाराज, फक्त एक राजे नव्हते, त्यांनी फक्त स्वतःच्या घराण्याचे राज्य सुरू केले असे नाही तर शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत पिचलेल्या समाजाचा स्वाभिमान आणि स्वत्व जागे केले, त्यांनी राष्ट्र घडवले. हे इंग्रजी वाचकाला नीट समजावे म्हणून युरोपियन, रोमन इतिहासातले प्रसंगांचे संदर्भ दिले आहेत. तिथल्या व्यक्ती आणि घटनांच्या उपमा दिल्या आहेत.
उदा. शिवाजी महारजांच्या सुरुवातीच्या कारवायांकडे विजापूर दरबाराने पूर्ण लक्ष का दिलं नसेल या बद्दल लिहिताना दिलेला युरोपिय संदर्भ

(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)

याचा परिणाम नक्कीच युरोपियन वाचकांवर झाला. प्रत्यक्ष ब्रिटिश वॉईसरॉयने या पुस्तकाचे कौतुक केले. १९३७, ३९,४६,५१, ६७ साली पुन्हापुन्हा आवृत्त्या निघाल्या. 

सुरतेची लूट, छापेमारी युद्ध तंत्र किंवा प्रसंगी माघार घेण्याची याबद्दलही त्याने मराठ्यांची बाजू समजूतदारपणे विषद केली आहे. पुस्तकाचे स्वरूप कधी कादंबरी तर कधी ऐतिहासिक निबंध असे आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या लहानपणचे प्रसंग वगैरेत एखाद्या कादंबरीकाराप्रमाणे लालमहालाचं, तिथे त्यांचे आणि दादोजींचे, बालशिवाजी आणि जिजाऊंचे संवाद इ.ची कल्पना करून प्रसंग रंगवले आहेत. बाकी वेळा ऐतिहासिक निबंधाप्रमाणे घटनाक्रम दिला आहे. तो भागही "ललित" नसला तरी तितकाच सहज प्रवाही आहे. प्रत्येक प्रकरणात वेगवेगळे संदर्भही दिले आहेत. संदर्भ ग्रंथांबरोबरच पोवाडे आणि लोककथा काय म्हणतात याचाही उल्लेख करून कथा पुढे नेली आहे.

शिवचरित्राच्या आसपासच्या राज्यांचे, व्यक्तींबद्दलही जास्तीची माहिती मिळते. उदा. आदिलशाही स्थापन करणारी व्यक्ती ऑटोमन साम्राज्यातून जीव वाचवून कशी पळून आली, त्यांच्या आणि मुघलांमध्ये काय फरक होता, विजापूरचे ऐश्वर्य आणि मुसलमान राजवट असूनही शिल्पांनी सजवलेले शहर इ.; गोवळकोंड्याच्या राज्यात दारू, वेश्यावस्तीम आणि हिऱ्यांच्या खाणी यामुळे आलेली समृद्धी आणि सुखासीन निष्क्रिय राज्यकर्ते इ.; सुरतेच्या लुटीच्या वेळी मोगली अधिकारी व्यापाऱ्यांना मराठ्यांपासून वाचवू शकले नाहीत. इंग्रजांनी मात्र आपल्या वखारींचे रक्षण केलेच पण आजूबाजूचा भागही रखला. यामुळे व्यापारी समाजात मोगलांबद्दल अविश्वास आणि इंग्रजांबद्दल विश्वास निर्माण झाला. सुरक्षिततेची हमी देणाऱ्या इंग्रजांच्या मुंबईकडे व्यापाऱ्यांची पाउले वळली आणि आर्थिक राजधानी मुंबईचा प्रवास सुरू झाला. असे कितीतरी बारिक बारिक ज्ञानकण पुस्तकात हाती लागतात. त्यावेळच्या प्रवाशांम्ध्ये, दरबारी पत्रव्यवहारात, विशेषतः तेव्हाचे इंग्रज लोक चालू घटनांबद्दल काय म्हणत होते याचीही उदाहरणे वेळोवेळी दिली आहेत. ते वाचणेही मनोरंजक ठरते.

उदा. सुरतेच्या लुटीच्या वेळच्या पत्रव्यवहाराबद्दल


महाराजांचे निधन झाले तरी इंग्रजांना याची खात्री वाटत नव्हती. शत्रूला चकवा देऊन अवचित गाठायच्या शिवनितीने पोळलेले गोरे ताक देखील फुंकून पीत होते. वाचा हे




साडे तीनशे वर्षांपूर्वीच्या काळावरचे ० वर्षांपूर्वीचे पुस्तक असले तरी पुस्तकाची भाषा सोपी, सुगम आहे. अनेक नवनवीन शब्द येतात. तरीही संदर्भावरून अर्थ कळतो. अर्थ नाही कळला आणि शब्दकोश बघायला लागला तर, "हं इथे हाच शब्द पाहिजे होता, एक नवीन अर्थछटा कळली", असा आनंदाचा, शिकण्याचा भाग होता. "Hurr Hurr Mahadev", "Pilawas & Birianis & kawftas" काहीवेळा अशी देशी शब्दांच्या फिरंगी स्पेलिंग्सची मजा येते.

शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकतच आपण लहानाचे मोठे होतो. त्यामुळे एखाददुसरा तपशील वगळता मुख्य  शिवचरित्रात आपल्याला काही नवीन कळण्याची शक्यता कमी आहे. पण मराठी नसलेल्यांनी किंवा मराठी असूनही शिवचरित्राचे संस्कार ज्याच्यावर झाले नाहीत अशांना हे पुस्तक नक्कीच माहितीपूर्ण ठरेल. मराठी वाचकांना वर म्हटलेल्या थोड्या अवांतर पैलूंत रस असेल तर पुस्तक वाचण्याचा फायदा होईल.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

---------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...