एम आणि हूमराव (Em Ani Humrao)





पुस्तक : एम आणि हूमराव  (Em Ani Humrao)

भाषा : मराठी (Marathi)
मूळ पुस्तक : एम अँड बिग हूम (Em and Big Hoom)
मूळ लेखक : जेरी पिंटो (Jerry Pinto)
मूळ पुस्तकाची भाषा : इंग्रजी  (English)
अनुवाद : शांता गोखले (Shanta Gokhale)
पाने : १८६
ISBN : 978-81-7185-515-5

ही मुंबईत राहणाऱ्या एका कुटंबाची गोष्ट आहे. आई-वडील-मुलगा-मुलगी असं चौकोनी कुटुंब आहे ते. या कुटुंबातला मुलगा गोष्टीचा निवेदक आहे. त्याची आई मनोविकारग्रस्त आहे. तिला मधून मधून या आजाराचे झटके येत असतात. कोणीतरी आपल्याला, आपल्या घरच्यांना अपाय करणार आहे अशा भीतीने ती सैरभैर होत असते. आरडाओरडा करते; स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्नही करते. थोडी निवळली की स्वतःच्या आयुष्याबद्दल बरंच लिहिते. कधी झटक्यामध्ये खूप बोलतेही आपल्या आयुष्याबद्दल. विशेष म्हणजे आपल्या मुलांशीच ती तिचे आणि नवऱ्याचे शरीरसंबंध, स्वतः केलेले गर्भपात अशा खाजगी विषयांबद्दल बोलते. तर या पुस्तकभर त्या बाईचं बोलणं आणि तिचं लिखाण यातून तिचं गत आयुष्य पुढे येतं. तर तिने केलेले आत्महत्येचे किंवा विध्वंसक कृती याबद्दल तिचा मुलगा सांगतो. 


हा या कथेचा सारांश आहे. पण कादंबरीच्या ब्लर्ब मध्ये लिहिल्याप्रमाणे, हलवून सोडणारी, दिपवून टाकणारी काही मला वाटली नाही. मुख्य पात्र असलेल्या बाईचं गत आयुष्य सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलीप्रमाणेच आहे त्यात वाचण्यासारखं विशेष नाही. आणि सध्याच्या विकारग्रस्त अवस्थेत दिसते ते तिचे वरवरचे वागणेच फक्त आप्ल्या समोर येते. तिचा तिला काय त्रास होत असेल हा परकायाप्रवेश नाही कारण निवेदक मुलगा आहे. हा मुलगा बहिणीच्या, वडीलांच्या आयुष्याबद्दल ओझरते उल्लेख करतो. त्याच्या आयुष्यावर झालेला परिणाम, "वेड्या बाईचा" मुलगा म्हणून काहीवेळा झालेली हेटाळणी किंवा या सगळ्या त्रासातून सुटका व्हावी असं वाटणं इ. थोडंसं सांगतो. पण त्यात सखोलता नाही. आजारी माणसाच्या कुटुंबाला काय त्रास काढावा लागत असेल याची कल्पना आपल्याला असतेच. त्याला आजारी माणसाची काळजी वाटते, तो बरा व्हावं असं वाटतं, त्याची सेवा करून करून जखडून गेलोय, आपलं आयुष्यच रहिलं नाही असं वाटतं, या आजारातून मरणच त्याची सुटका करेल असं वाटतं आणि असा सुटकेचा विचार करणं स्वार्थीपणाचं आहे असंही त्याला वाटतं. इ. या पुस्तकात इतपतच किंवा याहूनही कमी भावना दिसतात. दिसतात त्याही फिक्या, चोरटेपणे. त्यामुळे शिल्लक राहते ती त्या बाईचं सरधोपट जगणं आणि आजारात केलेली ओंगळवाणी बडबड. हा एक प्रसंग पहा.


(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)




त्यामुळे हे पुस्तक मला काही भावलं नाही. गंमत म्हणजे पुस्तक वाचून झाल्यावर कळालं की मूळ इंग्रजी पुस्तक "साहित्य अकदमी पुरस्कार" विजेतं आहे. पुरस्कारप्राप्त पुस्तक आणि आणि मी यांचं काही जमत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. दोन-तीन गोष्टी मला या "पुरस्कारप्राप्त" पुस्तकांच्या जाणवल्या. पहिलं, लैंगिक संबंधांबद्दल लिहिणं, त्यातल्या विकृतींबद्दल किंवा व्यभिचारांबद्दल लिहिणं म्हणजे बोल्ड लिहिणं. दुसरं म्हणजे कुठलंही कथानक सरळ सांगायचं नाही. थोडं आत्ता, थोडं भूतकाळात, थोडं कल्पनेत. तिसरं पात्रांची ओळख न करून देता तो माणूस, ती साडीतली बाई, किंवा नुसतं नावाने लिहायचं आणि मग वाचकाने - पण हा बाबा किंवा ही बाई नक्की कोण - हे शोधत राहायचं. गोष्टीचे तुकडे गोळा करायचे आणि जमेल तसे जुळवत राहायचे. हे असलं लिहिलं की मिळतो वाटतं पुरस्कार. असो !

अनुवादासाठी मात्र १००% गुण. भावनांची तीव्रता आणि शिव्या, शब्दांची निवाद यातून इतकं सहज आणि ओघवतं भाषांतर आहे की मूळ पुस्तक हेच आहे असंच वाटतं. भाषांतर असल्याचा संशयही येत नाही, इतकं अस्सल. त्यामुळे शांता गोखले यांनी अनुवादित केलेली इतर पुस्तकं वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे.






------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
------------------------------------------------------------------




---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

अहिराणी गोत (Ahirani Got)



पुस्तक : अहिराणी गोत  (Ahirani Got)
लेखक : डॉ. सुधीर रा. देवरे (Dr. Sidhir R. Deore)
भाषा : मराठी(अहिराणी बोली) (Marathi - Ahirani Dialect)
पाने : २१६
ISBN : 978-93-82161-95-0

हे अहिराणी बोलीतलं पुस्तक आहे. म्हणजे प्रस्तावना सोडली तर पूर्ण पुस्तक अहिराणी बोलीतलं आहे. अहिराणी  महाराष्ट्र-गुजराथ सीमेजवळच्या भागात बोलली जाते. त्यामुळे गुजराथीचा प्रभाव स्पष्ट जाणवतो.हे परिच्छेद वाचून बघा.

गुजराथी "छे" सारखं इथे "शे" अाहे, चा-ची-चे ऐवजी ना-नी आहे; शाळेत, घरात ऐवजी शाळामा, घरमा अाहे, उठाडं, करी दीधं, करावा, बोलावा अशी वाक्यरचना आहे. पुलंच्या या वाक्याची मला सारखी आठवण येत होती - राज्यांच्या असतात त्या सीमा रेषा, भाषांच्या असतात त्या मीलन रेषा.  जर तुमची बोली भाषा अहिराणी नसेल, तुम्हाला गुजराथी येत नसेल किंवा फार कानावर पडली नसेल (मुंबईकरांसारखी) तर अहिराणी समजायला सुरुवातीला कठीण जाईल  पण वाचत गेलात की आपोआप सवय होईल आणि गंमत वाटेल वाचायला.

लेखकाने स्वतः पुस्तक आणि त्यामागाची भूमिका अशी समजावून सांगितली आहे.


अनुक्रमणिकेवर एक नजर टाका.



काव्यात्मक कुटं म्हणजे उखाणे/कोडी आहेत. माणून मेल्यावर दु:ख करणार्‍या ओव्या पण आहेत. त्यातही गमतीजमती आहेत. उदा.

आदिवासी, भिल्ल समाजातल्या वेगवेगळ्या देवीदेवता, त्यांचे उत्सव, पूजा इ. ची बरीच माहिती आहे.  डोंगऱ्या देवाच्या उपासना विधीतला एक भाग.

उत्तर महाराष्ट्रतल्या आदिवासी, भिल्ल समजाचे साधे-सोपे पण चविष्ट आणि पौष्टिक असे पदार्थ पण दिले आहेत "अहिराणी ताटली" या लेखात. एक-दोन पदार्थ तुम्हालाही इथे वाढतो. :) 

या समाजाच्या प्रथा-परंपरा,समाजिक स्थिती यावर चिंतनात्मक काही लेख दुसर्‍या भागात आहेत. तिसर्‍या भागात काही गोष्टी, लेखकाचे अनुभव आहेत. चौथ्यात हितोपदेश पद्धतीच्या गोष्टी आहेत. या दोन्ही भागातल्या गोष्टी फार विशेष नाहीत. माणसांची वर्णनं, गावातल्या साध्या घटना इ. आहेत. अहिराणीत आहेत हेच विशेष. बाकी काही नाही.

पहिला भाग हा ज्याला लोकससंस्कृती, चालीरीती यांच्यात खूप रस आहे, त्या संबंधी संशोधन, माहिती संकलन करत असतील त्यांच्या साठी माहितीचा खजिना आहेत. बाकीच्यांना काही पानं वाचायला बरं वाटेल, मग तितका रस वाटणार नाही. दुसर्‍या भागातलं सामाजिक चिंतन, लेखकाने भिल्ल वस्तीत जाऊन केलेलं पुस्तक प्रकाशन, अहिराणीची समृद्ध परंपरा, साहित्य परंपरेचा मागोवा प्रकारचे लेख वाचण्यासारखे आहेत. अहिराणी म्हटलं की डोळ्यासमोर बहिणाबाईंचं नाव येतं पण त्यात अस्सल अहिराणी नाही असं लेखकाचं म्हणणं आहे. या पुस्कातली भाषा वाचली की आपल्यालाही बहीणाबाईंची गाणी अहिराणी पेक्षा मराठीलाच जवळची वाटेल. असो, तो भाषाशास्त्रज्ञांचा विषय आहे.

पुस्तकात दिलेला लेखक परिचयाचा काही भाग:



एकूण पुस्तकाची कल्पना आली असेलच. चोखंदळ वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. सगळ्या भागातले थोडे थोडे लेख वाचून का होईना अहिराणीशी, खान्देश परिसरातील भिल्ल-आदिवासींच्या जीवनाशी तोंडोळख करून घ्यावी.  आपल्या जाणीवांचं क्षितीज विस्तारावं. भाषेचं, बोलींचं आकर्षण असणऱ्यांना हे पुस्तक खूप भावेल. संस्कृती अभ्यासकांना खूप माहितीपूर्ण वाटेल. 


------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- 
भाषा-लोकसंस्कृतीप्रेमींनी  आवा ( आवर्जून वाचा )
इतरांनी जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

The Idiot brain (द इडियट ब्रेन)




पुस्तक : The Idiot Brain (द इडियट ब्रेन)
लेखक : Dean Burnet (डीन बर्नेट)
भाषा: English (इंग्रजी)
पाने : 350
ISBN : 978-1-78335-082-7


आपण जसे वागतो तसे का वागतो? आपल्याला भीती का वाटते? काही जणांना बस का लागते? आपल्याला "१२च्या वेळी"भूक का लागते? गडबड गोंधळ चालू असताना आपल्याला एकाग्र का होता येत नाही? हे आणि असे अनेक प्रश्न व त्यांची वैज्ञानिक उत्तरे देणारे हे पुस्तक आहे. उदा.ज्यांना गाडी लागते त्यांचा मेंदू कसा विचार करतो पहा : जेव्हा आपण हलचाल करतो तेव्हा आपल्या कानाच्या आतल्या पोकळीतील द्रव हलते. तसेच डोळ्यांना आजूबाजूचे दृश्य पण हलताना दिसते. जेव्हा आपण वेगवान वाहनातून, धक्क्यांशिवाय प्रवास करत असतो तेव्हा आपली स्वतःची हालचाल होत नाही त्यामुळे कानाच्या पोकळीतील द्रव हलत नाही. पण आजूबाजूची दृश्ये वेगाने बदलत असतात. दृश्य बदलतायत पण द्रव हलत नाहीये असा मिश्र संदेश मेंदूकडे जातो तेव्हा मेंदूला असं वाटतं की नक्कीच काहितरी गडबड आहे, पोटात अन्नाद्वारे चुकीचा पदार्थ गेल्यामुळे असं होत असणार. त्यावर प्रतिक्रिया म्हणून मेंदू पोटतील पदार्थ बाहेर टाकून द्यायची आज्ञा देतो. माणूस उलटी करतो. थोडक्यात प्रवासातील उलट्यांचा पोटाशी संबंध नाही तर मेंदूशी आहे. 

अनुक्रमणिका :





आपण जेव्हा विचार करतो, निर्णय घेतो, घाबरतो तेव्हा मेंदूच्या कुठल्या भागात काय "केमिकल लोचा" होतो हे समजावून सांगितलं आहे. मेंदूचं मुख्य काम शरीर जगवणं, धोक्यांपसून दूर राहणं आहे. त्यातून आपण जे बघतो, ऐकतो, अनुभवतो त्यातून आपण शिकतो. अर्थात मेंदू त्यातून पॅटर्न तयार करतो. पुढच्यावेळी तशीच परिस्थिती आली की मेंदू ठरवतो हे घाबरण्या सारखे आहे का आनंददायक का आणि काही. हे पॅटर्न चुकीचे बनले गेले की विनाकारण भीती वाटणे "फोबिया"/भयगंड तयार होतो. काही वेळा मजा घडतात उदा. दृष्टीभ्रम इल्युजन.

उदा. भीतीबद्दलचं पुस्तकातलं प्रकरण.
(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)




तर मेंदूच्या वागण्याची शास्त्रीय माहिती सोप्या आणि खेळकर पद्धतीने देणारं हे पुस्तक आहे. मजेशीर आणि माहितीपूर्ण आहे. मेंदू पॅटर्न कसे तयार करतो हे कळलं की बर्‍याच वर्तणुकीचे मूळ कारण सांगताना पुन्हा पुन्हा तेच मुद्दे येतात तेव्हा थोडं कंटाळवाणं होऊ शकतं. पण तो भाग वरवर संपवून पुढच्या लेखाकडे वळता येतं.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

---------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...