टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न (Telecom Kranticha Mahaswapn)




पुस्तक : टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न  (Telecom Kranticha Mahaswapn)
लेखक : सॅम पित्रोदा (Sam Pitroda)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ पुस्तक : Dreaming Big (ड्रीमिंग बिग)
मूळ भाषा : इंग्रजी
अनुवाद : शारदा साठे (Sharda Sathe)
पाने : ४०८
ISBN : 978-81-932936-8-3

भारतात टेलिकॉम क्षेत्राच्या आधुनिकीकरणाचा पाया ज्यांनी रचला त्या सॅम पित्रोदांचे हे चरित्र आहे. त्यांचा जन्म ओरिसात राहणाऱ्या गरीब गुजराती घरात १९४२ साली झाला. तिथपासून त्यांचे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठीचे कष्ट, अमेरिकेत उच्च शिकण घेतानाचा संघर्ष, सत्यनारायण चा सॅम होणे, आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे अमेरिकेत नवीन संशोधन करत नाव व समृद्धी मिळवण्याचा प्रवास आहे. त्याकाळी स्वप्नभूमी अमेरिकेत जाऊन स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या असंख्य भारतीयांप्रमाणे ही "कष्टातून प्रगतीची" कहाणी आहे. 

या गोष्टीला वेगळं वळण मिळालं कारण ज्या टेलिकॉन क्षेत्रात ते काम करत होते त्यातल्या सुधारणा भारतातही पोचाव्यात हे स्वप्न त्यांनी बघितलं. त्यांच्या मोठ्या लोकांशी असणाऱ्या ओळखीतून इंदिरा गांधींशी भेट घेता आली. भारतात काय टेलिकॉम क्रांती घडवता येईल, त्यासाठी देशी उत्पादने कशी बनवता येतील, खेडोपाडी फोन कसे पोचवता येतील ही योजना त्यांनी इंदिराजींसमोर मांडली. राजीव गांधी तेव्हा कॉंग्रेसचे किंवा सरकारमध्ये कोणीही नसताना कॉंग्रेसच्या घराणेशाही नुसार राजीवजींच्याकडे ती सगळी माहिती पोचली. त्यांनाही त्यात रस वाटला. आणि पित्रोदांना उदार राजाश्रय मिळाला. केवळ एक रुपया वेतनावर काम करत त्यांनी टेलिकॉम क्रांती साठी आवश्यक संस्थांचं प्रमुखपद, आयोगांचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि संशोधनांचं नेतृत्त्व केलं. गावोगावी "एसटीडी" दिसू लागले. त्याचबरोबर राजीवचे खास असल्याने निवडणूक प्रचारांपासून सामाजिक कामांच्या असंख्य योजना, प्रकल्प यांचे अध्यक्ष/प्रमुख पदावर त्यांची वर्णी लागली. उत्तम तंत्रज्ञान आणि अमेरिकेतली प्रगल्भ कार्यसंस्कृती त्यांनी आपल्या सहकाऱ्यांत रुजवली. हे स्थित्यंतर वाचण्यासारखं आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पित्रोदांची प्रतिमा मलीन करण्याचा, भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून त्यांना दूर करण्यात आलं. ते पुन्हा अमेरिकेला गेले. नव्या संकल्पना, "मोबईल पाकिट" संकल्पना इ. वर काम केले. १३ वर्षांनंतर जेव्हा सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस निवडणूक लढवणार असताना त्यांच्यातला कॉंग्रेसचा सेवक पुन्हा जागा झाला. वाजपेयी  सरकारच्या विरुद्ध प्रचार केला. युपीएच्या १० वर्षांच्या काळात त्यांना पुन्हा उदार राजाश्रय लाभला. आणि कितीतरी योजना, आयोग यांच्या माध्यमातून "वैचारिक नेतृत्त्व" देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कॉंग्रेस राज्य गेल्यावर मात्र लगेच त्यांनी इथला कारभार आवरून अमेरिकेत परत गेले. 



आयटी क्षेत्राच्या सुरुवातीच्या दिवसांची एक आठवण


कुठल्याही एका क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुम्हला खूप कष्टांची गरज असतेच तशीच त्यागाची पण. त्यातला मह्त्त्वाचा त्याग म्हणजे कुटुंबाला न देऊ शकता आलेला वेळ. एखाद्या दुर्दैवाच्या वेळी आपण यश मिळवलं पण त्यासाठी काय गमावलं हे जाणवून मन कातर करणारे क्षण पित्रोदांच्या आयुष्यातही आले. राजीव यांच्या हत्येनंतर विषण्ण मनःस्थितीत केलेलं चिंतन. 







पुस्तकाच्या शेवटच्या भागात त्यांचं वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर मुक्त चिंतन आहे. नातीच्या आगमनाने आयुष्याला नवा अर्थ कसा मिळाला त्याचं भावपूर्ण वर्णन आहे.

पित्रोदांचा हा प्रवास नक्कीच वाचण्यासारखा आहे. एका हुशार तंत्रज्ञाला जर राजकीय पाठबळ मिळालं तर तो काय करू शकतो हे याचं उदाहरण आहे. पण त्यांनीच दिलेल्या माहितीवरून त्यांच्या कार्यात राजाश्रयाचाच वाटा जास्त आहे असं वाटतं. त्यांच्या गांधी घराण्याशी एकनिष्ठतेचे दर्शनही सतत घडतं. "मी आधी भरपूर कमवलं आहे म्हणून देशासाठी एक रुपया वेतनात काम करतो" असं म्हणणारे पित्रोदा राजीवची हत्या झाल्या झाल्या "माझ्या कडे तर काहीच नाही, मी कफल्ल्क आहे, मुलांचं शिक्षण कसं होणार, माझं कसं होणार ?" अशी चिंता व्यक्त करतात तेव्हा, याचा अर्थ अत्तापर्यंत तुमचा सगळा खर्च राजी -म्हणजेच कॉंग्रेस -म्हणजेच देश उचलत होता असं म्हणावं की काय असं वाटतं. मग "एक रुपया वेतनात" काम हा कागदोपत्री मानभावीपणा वातो. राजीवनंतरची दहा वर्षे गांधी लोक सत्तेत नसताना पित्रोदा सोयीस्कर लांब रहिले. त्यांना खरंच देशाची कळकळ असती तर असेल त्या सरकारला सहाय्य करून प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांनी का केला नाही?  कॉंग्रेसच्या प्रेमापोटी कॉंग्रेसेतर सरकारला विरोध करण्यासाठीही ते कॉंग्रेसची साथ देताना दिसत नाही. असं का? सोनिया गांधी पुढे आल्यावर लगेच ते भारतात आले. आपलं प्रचार तंत्र, बुद्धी वाजपेयींच्या विरुद्ध वापरायला तयार झाले. यूपीएच्या १० वर्षांच्या कामा  त्यांनी काय छान छान कल्पना मांडल्या हे सांगाणारे पित्रोदा, यूपीएच्या भ्रष्टाचार, अनागोंदी वर सोयीस्कर मौन बाळगतात. मोदी सरकार आल्यावर लगेच इथला गाशा गुंडाळून ते अमेरिकेत परत गेले. त्यामुळे एकूणच एक बुद्धिमान; वरून तंत्रज्ञ पण आतून राजकारणी अशा धूर्त उद्योगपतीचे हे चरित्र आहे. सरकार कोणीही असो आपले आपले काम करून देशाची प्रगती साधणारे स्वामिनाथन, कुरियन, टाटा यांच्यापुढे पित्रोदांचं व्यक्तिमत्त्व खूपच खुजं वाटतं.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

Songs of Kabir (सॉंग्स ऑफ कबीर)





पुस्तक : Songs of Kabir (सॉंग्स ऑफ कबीर)
भाषांतर : Rabindranath Tagore (रविंद्रनाथ ठाकुर (टागोर))
भाषा : English इंग्रजी 
पाने : ६७
ISBN : 978-1-61640-448-2

कबीरांच्या गाण्यांचे/दोह्यांचे रविंद्रनाथ ठाकुरांनी केलेली इंग्रजी भाषांतरांचं हे पुस्तक आहे. १०० दोह्यांचं भाषांतर आहे. उदा.



सुरुवातील कबीरांचे संक्षिप्त चरित्र आणि त्यांचे तत्वज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा आणि त्यांच्या तत्व्ज्ञाना प्रमाणेच युरोपियन/ख्रिश्चन समाजात कोण संत, व्यक्ती आणि विचारपरंपरा होऊन गेला यांच्या तौलनिक विचार केला आहे. उदा.



कबीर आणि रविंद्रनाथ ही दोन मोठी नावं जोडलेली असल्याने मी पुस्तक घेतलं. पण कबीरांचा संदेश साधा सोपा आहे - आपल्या आतच परमेश्वर आहे; कुठल्याही धर्माची कर्मकांडं करण्याची काही आवश्यकता नाही, नित्यकाम करत रहा, हे जग नश्वर आहे, सगळी मोहमाया आहे, प्रेम आणि भूतदयेने वागा इ. त्यामुळे एक पाठोपाठ एक वाचत गेलो की एकसुरी वाचन कंटाळवाणे होते. त्यात त्यांचे मूळ दोहेही दिलेले  नसल्याने भाषेचे, शब्दाचे वैशिष्ट्य पण लक्षात येत नाही. त्यामुळे अर्थ कळतो पण भाव भिडत नही. 

अभ्यासूंना वाचायला आवडेल. किंवा परदेशी व्यक्तींना ज्यांना हे भारतीय तत्त्वज्ञान नवीन आहे त्यांना वाचायला चांगलं आहे.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

----------------------------------------------------------------------------------

कोंदण (Kondan)




पुस्तक : कोंदण (Kondan)
लेखन : श्रीकांत लागू (Shrikant Lagu)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १६८
ISBN : 978-93-80361-25-0

"लागू बंधू हिरे-मोती" या पेढीचे संचालक असणऱ्या श्रीकांत लागूंच्या हरहुन्नरी, प्रचंड कुतूहल आणि साहसी व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याला या पुस्तकातून होते. त्यांची ओळख आधी करून घेऊया.





त्यांच्या पंचाहत्तरी निमित्त त्यांच्या निवडक लेखांचा हा संग्रह केला आहे. त्यातून त्यांनी केलेली भटकंती, वेगवेगख्या ठिकाणांहून बघितलेली ग्रहणं, कलाक्षेत्रातल्या मुशाफिरी, त्यातून जमलेल्या स्नेहसंबंधांचे अनुभव आपल्याला वाचायला मिळतात. कैलास-मनससरोवर चा प्रवास (८० च्या दशकातला), ९२ सालाआधी अयोध्येला दिलेली भेट- आणि एका चिकित्सकाच्या नजरेतून तिचं वर्णन, सूर्यग्रहण बघण्याचा अनुभव, जगातल्या मोठमोठ्या धबधब्यांना दिलेल्या भेटी, पहिले एव्हरेस्टवीर एडमंड-नॉरगे नसून दुसरे आहेत याबद्दल होणऱ्या चर्चेची ओळख, इशान्य भारतातल्या प्रवासाचा एक अनुभव असे लेख  आहेत. विविध रत्नांची तोंडओळख करून देणारा एक लेख आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया. लेखांच्या शीर्षकावरून विषयांची कल्पना येईल.




ग्रहणाबद्दलच्या लेखातला एक भाग 





कुसुमाग्रजांच्या नावे आकाशात एक तारा आहे असं आपण ऐकलं असेल. पण त्याच्या मागची गंमत या पुस्तकात आहे. अमेरिकेतली एक संस्था पैसे घेऊन ताऱ्यांना आपल्याला हव्या त्या माणसाचे नाव देते. त्यात वैज्ञानिक किंवा खगोलशास्त्रीय असं फार नाही. लागूंच्या भाषेत "हपापाचा माल गपापा" असा हा प्रकार आहे. तरीही एक अनोखी भेट म्हणून त्यांचे स्नेही असणऱ्या कुसुमाग्रजांच्या नावे एक ताऱ्याची नोंदणी त्यांनी केली. आणि ते प्रमाणपत्र कुसुमाग्रजांना वाढदिवसाला भेट म्हणून पाठवले. तिथे उपस्थित लोकांच्या बोलण्यातून आणि गैरसमजातून एक वृत्तपत्राने त्याची मोठी बातमी केली. ही बातमी दुसऱ्या वृत्तपत्रात आधी आली या रागातून दुसऱ्या वृत्तपत्राने हा कसा खोटा प्रकार आहे, १०० डॉलर देऊन कोणाचंही नाव कसं देता येतं हे प्रसिद्ध केलं. एका साध्या गमतीच्या भेटीचा हा असा वेगळाच अर्थ घेण्यात आला. कुसुमाग्रजांनी मात्र या भेटीबद्दल खास कविता लिहून आभार मानले. ती ही कविता. भाग्यवानच लागू,



एकूणच सगळे लेख माहितीपुर्ण आहेत. अनुवादित कथा पण फॅंटसी प्रकारच्या आहे. वाचायला छान आहे.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

The RSS: A view to the inside (द आरएसएस:अ व्ह्यू टू द इनसाईड)





पुस्तक : The RSS: A view to the inside (द आरएसएस:अ व्ह्यू टू द इनसाईड)
लेखक : Walter K. Andersen (वॉल्टर के. अ‍ॅंडरसन) & Shridhar Damle (श्रीधर दामले)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : ४०५
ISBN :978-0-670-08914-7
किंमत : ६९९ रु.
प्रकाशन : २०१८

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सध्या जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. संघ परिवारातल्या भाजप कडे सध्या केंद्र सरकार आणि बरीच राज्य सरकारे असल्याने संघाची राजकीय ताकदही खूप मोठी आहे. मूलतः स्वयंसेवी संस्था असल्यामुळे संघाचे आणि संघाशी संबंधित संस्थांच्या सेवाकार्याचे जाळे देशभर पसरलेले आहे. या संस्थांच्या किंवा संघटनांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे संघ जोडला गेलेला आहे. या कामांमध्ये जशी विविधता आहे तशीच विविधता संघाबद्दलच्या भावनांमध्येही आहे. स्वयंसेवकांमध्ये संघाप्रती निष्ठा, संलग्न संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना संघाप्रती आदर, सर्वसामान्यांना संघाच्या कामाबद्दल कौतुक; विरोधकांना राग, मत्सर, द्वेष; अल्पसंख्यांक समजामध्ये संघाबद्दल संभ्रम, भीती इ. भावना पहायला मिळतात. अशा या बलाढ्य संस्थेच्या इतिहासात, वाढीत व त्यामागच्या विचारांमध्ये डोकावण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक.

लेखकांबद्दल:


३० वर्षांपूर्वी लेखकांनी संघाबद्दल एक पुस्तक लिहिलं होतं. गेल्या तीस वर्षांत भारत बदलला तसाच संघही बदलला. फोफावला. त्यावेळी कमी असणारं सामाजिक आणि राजकीय महत्त्व आता संघाला आहे. या नव्या प्रवासाकडे म्हणून पुढच्या चार  मुद्द्यांच्या आधारे बघत हे पुस्तक लिहिलं गेलं आहे असं लेखक सांगतात:
१) संघविचारांचा प्रसार करण्यासाठी संघ त्याच्या संलग्न संस्थांवर अधिकाधिक का अवलंबून राहतो आहे ?
२) संघ आणि संघ परिवारांतल्या संस्था यांचे संबंध कसे आहेत ?
३) संघ परिवारातल्या संस्थांचे हितसंबंध / विचारप्रणाली परस्परांना छेद देणारी असली तरी या संस्था एकत्र कशा नांदत आहेत ?
४) संघाचा वाढता खुलेपणाचा संघाच्य लोकशाही, धर्मनिरपेक्षता, हिंदुत्व याबद्दलच्या दृष्टीकोनावर काय परिणाम झाला ?

वरील प्रश्नांच्या आधारे संघाच्या वेगवेगळ्या पैलूंकडे बघितलं आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.



प्रकरण १) संघाच्या सुरुवातीच्या काळात संघ राजकारणापसून दूर होता. काही वर्षांनी जनसंघाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत रजकीय प्रभाव कसा वाढत गेला याचा धावता आढावा यात आहे. संघबंदीचा धोका टाळण्यासाठी राजकीय वर्तुळात आपलं प्रतिनिधित्व पाहिजे या भावनेतून जनसंघाची स्थापना झाली असा लेखकाचा निष्कर्ष आहे.

प्रकरण २) संलग्न संस्थांचे प्रकरण विशेष वाचण्यासारखे आहे. विविध संस्था - भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच, विद्याभारती, क्रीडाभारती, सेवाभारती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल - इ. संस्थांची सुरुवात का झाली, सर्व संस्था स्वायत्त आहेत तरी संघाचा प्रतिनिधी त्यावर "संगठन मंत्री" म्हणून काम कसे करतो, दरवर्षी सर्व संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येऊन आढावा कसा घेतला जातो हे बरंच सविस्तर लिहिलं आहे. बऱ्याच वेळा दोन संस्थांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. उदा. स्वदेशी जागरण मंच "परदेशी काही नको" म्हणणार तर राजकीय भाजपा परकीय गुंतवणूक, निर्गुंतवणूक हवी म्हणणार. अशा वादाच्या प्रसंगांची उदाहरणं आणि त्यातून वाट कशी काढली गेली याची उदाहरणं आहेत. संघ बहुमुखी बोलतो असा आरोप केला जातो त्याचं कारण हे आहे. स्वयंसेवक नसणारे पण संघाच्या शिस्तबद्ध कार्यक्रमांबद्दल कौतुक असणाऱ्यांना हे वाचायला नक्कीच आवडेल.

प्रकरण ३) परदेशात संघ "हिंदू स्वयंसेवक संघ" आणि संलग्न संस्था म्हणून काम करतो. तिथे संघाची कार्यपद्धती साधारण इथल्यासारखीच असली तरी तिकडच्या परिस्थितीनुरूप संघाने अनुकूलन कसं करून घेतलं अहे. तिथे स्त्री-पुरुष सर्व सहभागी होतात. प्रार्थना आणि घोषणांत भारतमाते ऐवजी धरणीमाता आणि हिंदू धर्माऐवजी विश्वधर्म असे बदल आहेत. भारतातल्या सेवाकर्याला या संस्थांकडून खूप मदत मिळते. हिंदूंबद्दल चुकीची समजूत पसरवण्यांन विरोध करण्याचं कामही या संस्था करतात.

प्रकरण ४) गोळवलकर गुरुजी सरसंघचालक असताना संघाचं काम चारित्र्य घडवणं असंच असलं पहिजे, संघाने इतर कामांत लक्ष देण्याची गरज नाही असाच मतप्रवाह होता. शिक्षण हे देशभक्ती आणि स्वाभिमान शिकवणारं असलं पाहिजे या भावनेतून १९४६ साली नानाजी देशमुखांनी गुरुजींच्या उपस्थितीत शाळा सुरु केली. आणि संघाच्या शैक्षणिक कामला सुरुवात झाली. पुढे ते कसं वाढत गेलं, आज घडीला विद्याभारती ही भारतातील सर्वाधिक शाळा चालवणारी संस्था आहे इ. प्रगतीची माहिती अहे. भाजप सत्तेत आल्यावर पाठ्यक्रमांचं भारतियीकरण - विरोधकांच्या भाषेत भगवीकरण - केलं गेलं त्याबद्दल थोडी माहिती अहे.

प्रकरण ५) हिंदुत्व, हिंदू या संकल्पना, हे शब्द संघाचा गाभा असले तरी, व्याख्या करायला कठीण किंवा एकच एक निश्चित व्याख्या नसलेले हे शब्द आहेत. हेडगेवार, सावरकरांपासून आत्ताच्य मोहन भगवतांपर्यंत कोणी काय काय भूमिका घेतली यबद्दल्ची माहिती या प्रकरणात आहे.

प्रकरण ६) "मुस्लिम राष्ट्रीय मंच" हि संघ परिवारातली संगठना अहे. हिंदुत्ववादी संघाची मुसलमानांसाठीची संगठना म्हणून खास प्रकरण हिच्यासाठी आहे. मुस्लिम समाजात संघाचा संस्कृतिक एकात्मतेचा संदेश रुजावा यासाठी ही संस्था कसे काम करते, संघाच संगठन मंत्री तिथेही कम करतो पण संघ परिवारातली असूनही अधिकृतरित्या संलग्न संस्था म्हणून तिचा समावेश केला जात नाही. जवळीज जास्त दाखवली तर पारंपारिक समर्थक नाराज होतील आणि या मंचाला किती यश येईल याबद्दल साशंकता यातून ही जपून पावले टाकली जातायत. संघाने मुस्लिम धर्मगुरूंशी संवाद साधायचा प्रयत्न वेळोवेळी कसा केला आहे, या मंचाचा भाजपला अनुकूल मतप्रवाह निर्माण करण्यात हातभार लागतो; इ. लक्षणीय माहिती यात आहे.

प्रकरण ७, ८, ९) हि प्रकरणे जम्मू काश्मिर, चीन आणि भारताचं आर्थिक धोरण कसं असावं या मुद्द्यावर संघाचे विचार कोणी, कधी, कसे, काय मांडले या बद्दल आहेत. संघाचा प्रभाव कसा वाढत गेलाय ते दाखवलंय. संघाची एक भूमिका असली तरी राजकारणाचा भाग म्हणून त्याला मुरड घालावी लागली तेव्हा थेट सरसंघचालक आणि भाजप यात संबंध ताणले गेलेल होते ते आहे. संघपरिवारंतल्य दोन संस्थांचे मतभेद कसे मिटवले गेले ते आहे. उदा. भूमिअधिग्रहण कायद्यात मोदी सरकारने टाकलेल्या अटींना भारतीय मजदूर संघाने कडाडून विरोध केला. तेव्हा सामोपचाराने काही तरतूदी रद्द करून, काही शिथिल करून वाद सोडवला गेला तो घटनाक्रम सांगितला आहे.

प्रकरण १० ते १४) ही प्रकरणं नुकत्याच घडलेल्या घटनांवर आहेत. यातला बराचसा भाग हा तात्त्विक चर्चेपेक्षा घटना काय आणि कशा घडत गेल्या, याबद्दल आहेत. जो सामाजिक, राजकीय बातम्या वाचतो, चर्चा बघतो त्याला हा घटनाक्रम महितीच असणार. संघाची वाढती ताकद, राजकीय अस्तित्त्व कयम ठेवण्यासाठी संघाचा भाजप प्रचारात सक्रिय सहभाग, संघ परिवारातले परस्पर संबंध इ. आधीच्या प्रकरणात आलेले मुद्देच पुन्हा पुन्हा आहेत.
उदा. प्रकरण १३त, गोव्यातल्या संघ अधिकाऱ्याने संघाविरुद्ध बंड करून स्वतंत्र सामजिक संस्था आणि राजकीय पक्ष काढला; पण त्याला काही यश आलं नाही. तो घटनाक्रम दिला आहे. त्या निमित्ताने संघात अगदी अपवादात्मक परिस्थितीत झालेल्या क्षीण बंडांची माहिती आहे. सक्रीय राजकारणापासून, समाजकारणापासून संघाला अलिप्त ठेवण्याच्या धोरणामुळे खुद्द बाळासाहेब देवरस - जे नंतर सरसंघचालक झाले - यांनी सक्रिय सहभाग कमी केला होता अशी माहिती दिली आहे.

पूर्ण पुस्तकभर संघांचे पदाधिकारी उदा. मा गो. वैद्य, राम माधव, होसाबळे इ. शी थेट संवाद साधून, जुन्या घटनांचा संघातल्या लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे ऊहापोह केलेला आहे. म्हणूनच "व्ह्यू टू द इनसाईड" हे योग्य शीर्षक अहे.

संघावरचं एखादं छोटेखानी पुस्तक होईल इतके - दीडशे पानी संदर्भ (नोट्स) शेवटी आहेत. संघाच्या वाढीचा आलेख, सरसंघचालकांची माहिती, संघाची घटना त्यात आहे. अभ्यासकांन ते मार्गदर्शक ठरतील.

तुमच्या लक्षात आलं असेलंच की संघाचा इतिहास सांगणारं, संघाची स्तुती किंवा निंदा करणारं हे पुस्तक नाही. तर संघाचा अभासपूर्ण, वस्तुनिष्ठ आढावा घेणारं पुस्तक आहे. संघाची कार्यपद्धती, विचारपद्धती उलगडून दखवणारं पुस्तक आहे. त्यामुळे संघाबद्दल तुमच्या भावना कुठल्याही असतील तरी हे पुस्तक तुम्हाला बरीच नवीन माहिती देईल आणि संघाशी जवळून ओळख करून देईल.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...