The RSS: A view to the inside (द आरएसएस:अ व्ह्यू टू द इनसाईड)





पुस्तक : The RSS: A view to the inside (द आरएसएस:अ व्ह्यू टू द इनसाईड)
लेखक : Walter K. Andersen (वॉल्टर के. अ‍ॅंडरसन) & Shridhar Damle (श्रीधर दामले)
भाषा : English (इंग्रजी)
पाने : ४०५
ISBN :978-0-670-08914-7
किंमत : ६९९ रु.
प्रकाशन : २०१८

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सध्या जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. संघ परिवारातल्या भाजप कडे सध्या केंद्र सरकार आणि बरीच राज्य सरकारे असल्याने संघाची राजकीय ताकदही खूप मोठी आहे. मूलतः स्वयंसेवी संस्था असल्यामुळे संघाचे आणि संघाशी संबंधित संस्थांच्या सेवाकार्याचे जाळे देशभर पसरलेले आहे. या संस्थांच्या किंवा संघटनांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे संघ जोडला गेलेला आहे. या कामांमध्ये जशी विविधता आहे तशीच विविधता संघाबद्दलच्या भावनांमध्येही आहे. स्वयंसेवकांमध्ये संघाप्रती निष्ठा, संलग्न संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना संघाप्रती आदर, सर्वसामान्यांना संघाच्या कामाबद्दल कौतुक; विरोधकांना राग, मत्सर, द्वेष; अल्पसंख्यांक समजामध्ये संघाबद्दल संभ्रम, भीती इ. भावना पहायला मिळतात. अशा या बलाढ्य संस्थेच्या इतिहासात, वाढीत व त्यामागच्या विचारांमध्ये डोकावण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक.

लेखकांबद्दल:


३० वर्षांपूर्वी लेखकांनी संघाबद्दल एक पुस्तक लिहिलं होतं. गेल्या तीस वर्षांत भारत बदलला तसाच संघही बदलला. फोफावला. त्यावेळी कमी असणारं सामाजिक आणि राजकीय महत्त्व आता संघाला आहे. या नव्या प्रवासाकडे म्हणून पुढच्या चार  मुद्द्यांच्या आधारे बघत हे पुस्तक लिहिलं गेलं आहे असं लेखक सांगतात:
१) संघविचारांचा प्रसार करण्यासाठी संघ त्याच्या संलग्न संस्थांवर अधिकाधिक का अवलंबून राहतो आहे ?
२) संघ आणि संघ परिवारांतल्या संस्था यांचे संबंध कसे आहेत ?
३) संघ परिवारातल्या संस्थांचे हितसंबंध / विचारप्रणाली परस्परांना छेद देणारी असली तरी या संस्था एकत्र कशा नांदत आहेत ?
४) संघाचा वाढता खुलेपणाचा संघाच्य लोकशाही, धर्मनिरपेक्षता, हिंदुत्व याबद्दलच्या दृष्टीकोनावर काय परिणाम झाला ?

वरील प्रश्नांच्या आधारे संघाच्या वेगवेगळ्या पैलूंकडे बघितलं आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.



प्रकरण १) संघाच्या सुरुवातीच्या काळात संघ राजकारणापसून दूर होता. काही वर्षांनी जनसंघाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत रजकीय प्रभाव कसा वाढत गेला याचा धावता आढावा यात आहे. संघबंदीचा धोका टाळण्यासाठी राजकीय वर्तुळात आपलं प्रतिनिधित्व पाहिजे या भावनेतून जनसंघाची स्थापना झाली असा लेखकाचा निष्कर्ष आहे.

प्रकरण २) संलग्न संस्थांचे प्रकरण विशेष वाचण्यासारखे आहे. विविध संस्था - भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच, विद्याभारती, क्रीडाभारती, सेवाभारती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल - इ. संस्थांची सुरुवात का झाली, सर्व संस्था स्वायत्त आहेत तरी संघाचा प्रतिनिधी त्यावर "संगठन मंत्री" म्हणून काम कसे करतो, दरवर्षी सर्व संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येऊन आढावा कसा घेतला जातो हे बरंच सविस्तर लिहिलं आहे. बऱ्याच वेळा दोन संस्थांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. उदा. स्वदेशी जागरण मंच "परदेशी काही नको" म्हणणार तर राजकीय भाजपा परकीय गुंतवणूक, निर्गुंतवणूक हवी म्हणणार. अशा वादाच्या प्रसंगांची उदाहरणं आणि त्यातून वाट कशी काढली गेली याची उदाहरणं आहेत. संघ बहुमुखी बोलतो असा आरोप केला जातो त्याचं कारण हे आहे. स्वयंसेवक नसणारे पण संघाच्या शिस्तबद्ध कार्यक्रमांबद्दल कौतुक असणाऱ्यांना हे वाचायला नक्कीच आवडेल.

प्रकरण ३) परदेशात संघ "हिंदू स्वयंसेवक संघ" आणि संलग्न संस्था म्हणून काम करतो. तिथे संघाची कार्यपद्धती साधारण इथल्यासारखीच असली तरी तिकडच्या परिस्थितीनुरूप संघाने अनुकूलन कसं करून घेतलं अहे. तिथे स्त्री-पुरुष सर्व सहभागी होतात. प्रार्थना आणि घोषणांत भारतमाते ऐवजी धरणीमाता आणि हिंदू धर्माऐवजी विश्वधर्म असे बदल आहेत. भारतातल्या सेवाकर्याला या संस्थांकडून खूप मदत मिळते. हिंदूंबद्दल चुकीची समजूत पसरवण्यांन विरोध करण्याचं कामही या संस्था करतात.

प्रकरण ४) गोळवलकर गुरुजी सरसंघचालक असताना संघाचं काम चारित्र्य घडवणं असंच असलं पहिजे, संघाने इतर कामांत लक्ष देण्याची गरज नाही असाच मतप्रवाह होता. शिक्षण हे देशभक्ती आणि स्वाभिमान शिकवणारं असलं पाहिजे या भावनेतून १९४६ साली नानाजी देशमुखांनी गुरुजींच्या उपस्थितीत शाळा सुरु केली. आणि संघाच्या शैक्षणिक कामला सुरुवात झाली. पुढे ते कसं वाढत गेलं, आज घडीला विद्याभारती ही भारतातील सर्वाधिक शाळा चालवणारी संस्था आहे इ. प्रगतीची माहिती अहे. भाजप सत्तेत आल्यावर पाठ्यक्रमांचं भारतियीकरण - विरोधकांच्या भाषेत भगवीकरण - केलं गेलं त्याबद्दल थोडी माहिती अहे.

प्रकरण ५) हिंदुत्व, हिंदू या संकल्पना, हे शब्द संघाचा गाभा असले तरी, व्याख्या करायला कठीण किंवा एकच एक निश्चित व्याख्या नसलेले हे शब्द आहेत. हेडगेवार, सावरकरांपासून आत्ताच्य मोहन भगवतांपर्यंत कोणी काय काय भूमिका घेतली यबद्दल्ची माहिती या प्रकरणात आहे.

प्रकरण ६) "मुस्लिम राष्ट्रीय मंच" हि संघ परिवारातली संगठना अहे. हिंदुत्ववादी संघाची मुसलमानांसाठीची संगठना म्हणून खास प्रकरण हिच्यासाठी आहे. मुस्लिम समाजात संघाचा संस्कृतिक एकात्मतेचा संदेश रुजावा यासाठी ही संस्था कसे काम करते, संघाच संगठन मंत्री तिथेही कम करतो पण संघ परिवारातली असूनही अधिकृतरित्या संलग्न संस्था म्हणून तिचा समावेश केला जात नाही. जवळीज जास्त दाखवली तर पारंपारिक समर्थक नाराज होतील आणि या मंचाला किती यश येईल याबद्दल साशंकता यातून ही जपून पावले टाकली जातायत. संघाने मुस्लिम धर्मगुरूंशी संवाद साधायचा प्रयत्न वेळोवेळी कसा केला आहे, या मंचाचा भाजपला अनुकूल मतप्रवाह निर्माण करण्यात हातभार लागतो; इ. लक्षणीय माहिती यात आहे.

प्रकरण ७, ८, ९) हि प्रकरणे जम्मू काश्मिर, चीन आणि भारताचं आर्थिक धोरण कसं असावं या मुद्द्यावर संघाचे विचार कोणी, कधी, कसे, काय मांडले या बद्दल आहेत. संघाचा प्रभाव कसा वाढत गेलाय ते दाखवलंय. संघाची एक भूमिका असली तरी राजकारणाचा भाग म्हणून त्याला मुरड घालावी लागली तेव्हा थेट सरसंघचालक आणि भाजप यात संबंध ताणले गेलेल होते ते आहे. संघपरिवारंतल्य दोन संस्थांचे मतभेद कसे मिटवले गेले ते आहे. उदा. भूमिअधिग्रहण कायद्यात मोदी सरकारने टाकलेल्या अटींना भारतीय मजदूर संघाने कडाडून विरोध केला. तेव्हा सामोपचाराने काही तरतूदी रद्द करून, काही शिथिल करून वाद सोडवला गेला तो घटनाक्रम सांगितला आहे.

प्रकरण १० ते १४) ही प्रकरणं नुकत्याच घडलेल्या घटनांवर आहेत. यातला बराचसा भाग हा तात्त्विक चर्चेपेक्षा घटना काय आणि कशा घडत गेल्या, याबद्दल आहेत. जो सामाजिक, राजकीय बातम्या वाचतो, चर्चा बघतो त्याला हा घटनाक्रम महितीच असणार. संघाची वाढती ताकद, राजकीय अस्तित्त्व कयम ठेवण्यासाठी संघाचा भाजप प्रचारात सक्रिय सहभाग, संघ परिवारातले परस्पर संबंध इ. आधीच्या प्रकरणात आलेले मुद्देच पुन्हा पुन्हा आहेत.
उदा. प्रकरण १३त, गोव्यातल्या संघ अधिकाऱ्याने संघाविरुद्ध बंड करून स्वतंत्र सामजिक संस्था आणि राजकीय पक्ष काढला; पण त्याला काही यश आलं नाही. तो घटनाक्रम दिला आहे. त्या निमित्ताने संघात अगदी अपवादात्मक परिस्थितीत झालेल्या क्षीण बंडांची माहिती आहे. सक्रीय राजकारणापासून, समाजकारणापासून संघाला अलिप्त ठेवण्याच्या धोरणामुळे खुद्द बाळासाहेब देवरस - जे नंतर सरसंघचालक झाले - यांनी सक्रिय सहभाग कमी केला होता अशी माहिती दिली आहे.

पूर्ण पुस्तकभर संघांचे पदाधिकारी उदा. मा गो. वैद्य, राम माधव, होसाबळे इ. शी थेट संवाद साधून, जुन्या घटनांचा संघातल्या लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे ऊहापोह केलेला आहे. म्हणूनच "व्ह्यू टू द इनसाईड" हे योग्य शीर्षक अहे.

संघावरचं एखादं छोटेखानी पुस्तक होईल इतके - दीडशे पानी संदर्भ (नोट्स) शेवटी आहेत. संघाच्या वाढीचा आलेख, सरसंघचालकांची माहिती, संघाची घटना त्यात आहे. अभ्यासकांन ते मार्गदर्शक ठरतील.

तुमच्या लक्षात आलं असेलंच की संघाचा इतिहास सांगणारं, संघाची स्तुती किंवा निंदा करणारं हे पुस्तक नाही. तर संघाचा अभासपूर्ण, वस्तुनिष्ठ आढावा घेणारं पुस्तक आहे. संघाची कार्यपद्धती, विचारपद्धती उलगडून दखवणारं पुस्तक आहे. त्यामुळे संघाबद्दल तुमच्या भावना कुठल्याही असतील तरी हे पुस्तक तुम्हाला बरीच नवीन माहिती देईल आणि संघाशी जवळून ओळख करून देईल.



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...