चिनीमाती (Chinimati)




पुस्तक : चिनीमाती (Chinimati)
लेखिका : मीना प्रभु (Meena Prabhu)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३६२
ISBN : दिलेला नाही

मीना प्रभु यांचं नाव मराठी साहित्यात प्रवासवर्णनांसाठी खूप प्रसिद्ध आहे. यावेळी त्यांचं पुस्तक वाचायचा योग आला. २००० साली त्यांनी चीनला भेट दिली. सर्वसाधारण पर्यटकांसारखे ७-८ दिवसात एक देश न बघता चांगलं दीडेक महिने त्या चीनमध्ये राहिल्या होत्या. एखाद्या पर्यटन कंपनी बरोबर न जाता स्वतः प्रवासाची आखणी करून आपल्या आवडीनं, चवीचवीनं देश बघण्याची त्यांची शैली त्यांनी इथेही सोडली नाही. त्यामुळे बीजिंग, शांघाय, हॉंगकॉंग सारख्या सर्वपरिचित शहरांना भेट दिलीच पण आडवाटेनं जाऊन इतर शहरांना, गावांना भेट दिली. भाषेच्या अडचणींमुळे स्थानिक मार्गदर्शक घेणं क्रमप्राप्त होतंच. त्यांच्या सल्ल्याने त्या त्या ठिकाणचे स्थलदर्शन त्यांनी केलं.

अनुक्रमणिका: 


पुस्तक वाचताना चीनमधले कितीतरी पुरातन राजवाडे, बागा, संग्रहालये, स्तूप, लेणी, मोठमोठाल्या बुद्ध मूर्ती, अशा चीनच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची भेट होते. यांगत्से नदी चीनमधली खूप मोठी नदी. तिच्या काठची पर्यन स्थळं बघत पाच दिवसाच्या जलप्रवास त्यांनी केला. नदी जेव्हा पर्वतांच्या दरीमधून जाते ते "थ्री गॉर्जेस" ठिकाणही त्यांनी बघितलं. निसर्गाने तयार केलेले दगडांचे रान "कुनमिंग" त्यांनी बघितलं. चीन म्हटल्यावर चीनची भिंत, "तिआनामेन स्केवर" हे तर आलेच. थोडक्यात पर्टनासाठी कमी-अधिक प्रसिद्ध असणारी स्थळं त्यांनी बघितली, अनुभवली आणि आपल्या लेखणीतून ती आपल्या समोर उभी केली आहेत. लोकांच्या वागण्याच्या पद्धती, हॉटेलात, रेल्वेत काम करणाऱ्यांच्या तऱ्हाही सांगितल्या आहेत.

रोमँटिक हॉंगझौ चं वर्णन:
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)

ज्याच्याकडे वेळ पैसा आहे अशा पर्यटनप्रेमीने देखील हे बघितलं असतं. पण लेखिकेचं वेगळेपण हे अनवट जागी भेट देण्यात आहे. उदा. स्थानिक वाटाड्यांच्या मदतीने त्यांनी तिथल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांना भेट दिली. तिथल्या सोयी, वातावरण समजून घेतलं. सायकल वरून प्रवास केला. गर्दीचे बाजार, गरीब वस्त्या, मुस्लीम मोहल्ले यांच्यातही हिंडल्या. भाषेची अडचण असूनही रस्त्यावरचे नाना खाद्यपदार्थ खाऊन बघितले. चायनीज मसाज करून घेतला. चायनीज व्यक्तींच्या घरी जाऊन तिथलं वातावरण बघितलं. गर्दीने भरलेल्या बसने प्रवास केला. रेल्वेत जनता क्लासने प्रवास केला. हे सगळं करणं खूप धाडसाचं होतं. तरी त्यांनी हे धाडस केल्यामुळे आपल्याला हे रोमांचक अनुभव वाचायला मिळतायत.

चिनी जेवणाचा हा एक अनुभव:


लेखिकेने फक्त चिनी स्थळांना भेट दिली नाही तर चिनी मनांनाही भेट दिली. त्यांना जे जे चिनी भेटले त्यांच्याशी - त्यांचे वाटाड्ये, रेल्वेतले सहप्रवासी, विद्यापीठातले विद्यार्थी, शाळांतले शिक्षक - अशा सर्वांशी त्यांनी संवाद साधला. बदलता चीन, एकपक्षीय कम्युनिस्ट राजवट, माओच्या काळात झालेली उलथापालथ आणि हिंसा, एक मूल धोरण, परकियांशी संबंध ठेवण्यावरचे निर्बंध अशा ज्वलंत व हळव्या प्रश्नांवर त्यांची मतमतांतरं जाणून घेतली. ही गोष्ट त्यांच्या प्रवासाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. हे सगळे संवाद वाचकाला नीट समजावेत म्हणून ते ते संदर्भ नीट समजावून सांगितले आहेत. त्यामुळे प्रवास वर्णन वाचताना आपल्यालाही चिंग घराणं, मिंग घराणं, ब्रिटिश-चीनचं अफू युद्ध, रेशीम मार्गाचा विकास, चहाचा इतिहास, माओ ने केलेली क्रांती, सामाजिक क्रांतीच्या नावाखाली पांढरपेशा लोकांचं हत्याकांड, अर्थव्यवस्थेतले उलटसुलट प्रयोग ही सगळी माहिती आपल्याला मिळते. त्यांची दाहकता, परिणामकारकता आणि आजच्या चीनवरचा त्यांचा प्रभाव जाणवतो.

एका वाटाड्याबरोबर झालेली ही गरमागरम चर्चा पहा:



लेखिकेचा प्रवास आणि चीनचा इतिहास दोन्ही जितके रंजक आहेत तितकीच लेखिकेची लेखनशैली सुद्धा. आपणच त्यांच्याबरोबर फिरतोय असं वाटत राहतं अशी दृष्यमय शैली आहे. प्रवासात कधी फसगत होते, सामान हरवतं, वेळ-उशीर होतो, ठरवलेल्या प्लॅनची वाट लागते, भाषेमुळे गोंधळ उडतात या सगळ्या गमतीजमती, फटफिजिती सुद्धा त्या मोकळेपणे लिहितात. उदा. एकदा बोटीवर शांत डेकवर त्या उभ्या असतात. डेकवर बाकी जर्मन प्रवाशंचा गटसुद्धा असतो. अचानक बोटीचा भोंगा जोरात वाजतो आणि त्या दचकतात. त्यांचं दचकणं बघून जर्मन गट हसायला लागतो. तेव्हा त्या म्हणतात, "मला त्यांचा अस्सा राग आला, बरं झालं महायुद्धात हरले ते". लिखाणाच्या या संवादी शैलीमुळे आपण लिहिलेलं वाचतोय असं न वाटता त्यांच्याशीया प्रवासाबद्दल त्यांच्या घरी मोकळेपणे गप्पा मारतोय असंच वाटत राहतं. 

ही एक गंमत वाचा, चिनी मसाजची.

पुस्तकात प्रत्येक प्रकरणाच्या आधी एक कृष्णधवल फोटो आहे. आणि दोन-तीन रंगीत फोटो आहेत. पण प्रत्येक प्रकरणात त्या त्या स्थळाचा फोटो नावासकट दिला असता तर दृष्य डोळ्यासमोर आणायला अजून मदत झाली असती. पुस्तक वाचताना काहीवेळा या ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ नेटवर बघून वाचताना अजून मजा आली.

आपला शेजारी, महासत्ता, पोलादी पडद्याच्या आड असणाऱ्या देशात डोकावण्याची ही संधी सोडू नका.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

Listen to me (लिसन टू मी)




पुस्तक : Listen to me (लिसन टू मी)
लेखिका : Shashi Deshpande (शशी देशपांडे )
भाषा : English (इंग्रजी)
पाने : ३७०
ISBN: 978-938-757-8920

इंग्रजी भाषेत लेखन करणार्‍याज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त लेखिका शशी देशपांडे यांचे हे आत्मचरित्र आहे.


लेखिकेबद्दल :






















अनुक्रमणिका





शशी देशपांडे यांचं साहित्य अजून मी काही वाचलं नाही आहे. त्यांचं नावही ऐकलं नव्हतं. पण नवीन पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक दिसलं. मोठ्या लेखिका आहेत म्हणून हे पुस्तक हाती घेतलं. पण "साहित्य अकादमी"शी वावडं इथेही सुरू राहिलं. हेही पुस्तक आवडलं नाही. 

बाई असतील मोठ्या पण पुस्तक काही विशेष नाही. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग खूप रोमांचक, संघर्षाचे, अद्वितीय कर्तृत्वाचे,काही शिकवून जाणारे असे काही वाटले नाहीत. सरधोपट मध्यमवर्गीय जीवन शैली होती, लिहू लागल्या, लिखाणात उमेदवारी केली, प्रसिद्धी मिळत गेली. असा सरळ सोपा मामला वाटला.

पुस्तकाची सुरुवातच आत्मचरित्र का लिहू नये, लिहिण्यातल्या अडचणी, त्रास, का लिहायचं नव्हतं अशा सगळ्या नकारात्मक  गोष्टींनी भरलेलं आहे. पुढे लिखाणातही मला हे आठवत नाही, बहुतेक तसं झालं असेल, नक्की काळवेळ आठवत नाही, लिहायचं नाहीये तरी लिहित्ये अशा वाक्य रचना येतात त्यामुळे अधिकच विरस होतो. त्यांची सांगण्याची पद्धतही कंटाळवाणी वाटली. त्यामुळे हे का वाचतोय असं होऊन शेवटी फक्त फक्त चाळलं.

त्यामुळे तुम्ही शशी देशपांडे यांचे निस्सीम चाहते असाल, किंवा अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या साध्या साध्या गोष्टी/घटनांतही तुम्हाला कुतूहल वाटत असेल तरच वाचा.

पुस्तकातील पाने :

कादंबरी लिखाणाच्या सुरुवातीबद्दल
(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)





पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याबद्दल






----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा (Narmada Parikrama Ek Anandayatra)




पुस्तक : नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा (Narmada Parikrama Ek Anandayatra)
लेखक : उदयन्‌ आचार्य (Udayan Acharya)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३२४
ISBN : 978-81-937187-4-2

नर्मदा नदी भारताच्या मध्यभागातून वाहणारी महत्त्वाची नदी आहे. मध्यप्रदेशातल्या अमरकंटक जवळ उगम पावून पश्चिम दिशेला वाहत गुजराथ मध्ये भरूच जवळ समुद्राला मिळते. म.प्र. आणि गुजराथेतून मुख्यत्वे वाहताना थोडासा भाग महाराष्ट्रातूनही जातो. खूप मोठ्या भूभागावरच्या मानवी संस्कृतीचा आणि निसर्गाचा आधार ही नदी आहे. सर्वांभूती देव मानणाऱ्या, निसर्गाशी सानुकूल जीवनशैली आणि निसर्गतत्वांबद्दल कृतज्ञता शिकवणाऱ्या भारतीय संस्कृतीत नद्यांना लोकमाता, देवतास्वरूप मानून त्या वंदनीय, पूजनीय आहेत. त्यातही सात महत्त्वाच्या नद्या विशेष पवित्र मानल्या आहेत. 

नर्मदा ही अशी देवतास्वरूप नदी. एखादी देवता म्हटली की तिचे रूप, किती हातांची मूर्ती, वाहन, त्या अनुषंगाने कथा, पुराणे, चमत्कार, आवडते रंग, पदार्थ, उत्सव, उपासना, व्रतवैकल्यं ही सगळी परिसंस्था आपली लोकसंस्कृती निर्माण करते. नर्मदेच्याबाबतीतही हे सगळं आहे. मगर हे तिचं वाहन आहे. ती कुमारिका आहे. नर्मदेची परिक्रमा करणं हा तिच्या उपासनेचा भाग आहे. नर्मदेच्या काठावरून चालायला सुरुवात करायची आणि नदी उजवीकडे ठेवून चालत राहायचं. कुठे नदी ओलांडायची नाही. जिथे समुद्राला मिळते तिथे बोटीतून समुद्रातून जाऊन दुसऱ्या काठावर जायचं आणि चालणं सुरू ठेवायचं. आणि चालायला जिथून सुरुवात केली तिथे पुन्हा पोचून प्रदक्षिणा पूर्ण करायची असं परिक्रमेचं स्वरूप आहे. नर्मदेच्या काठावर अनेक तीर्थस्थळं आहेत, अनेक महान ऋषिमुनींनी, साधूसंतांनी तिच्या काठावर तपश्चर्या केली असल्याने अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना या नदीकाठाचं आणि परिक्रमेचं विशेष महत्त्व आहे. इतकं चालणं हेही मोठंच काम आहेच आणि त्यातही अध्यात्ममार्गावर प्रगतीसाठी, एखाद्या तपश्चर्येप्रमाणे ही परिक्रमा करतात. नेहमीच्या तीर्थयात्रेप्रमाणे स्वतःच्या पैशातून, सुखसोयींनी युक्त अशी यात्रा न करता संन्याशाप्रमाणे रहायचे, जिथे मिळेल तिथे राहायचे, जे लोक देतील ते खायाचे आणि सर्व वेळ नामस्मरण, पूजाअर्चा यात घालवायचा असे हे खडतर व्रत आहे. हजारो वर्षांपासून भारतातले साधक हे व्रत करत आले आहेत. या पुस्तकाचे लेखक उदयन आचार्य यांनी अशी परिक्रमा केली आणि तिचे अनुभव आपल्याला सांगितले आहेत.

परिक्रमेच्या वेळी नर्मदेची आणि निसर्गाची दिसणारी निरनिराळी रूपं, लेखकाला अध्यात्मिक येणारे अनुभव आणि आजूबाजूच्या लोकसंस्कृतीचं दर्शन अशा तीन पातळींवर ही अनुभव गाथा पुढे जाते.

सुरुवातीला लोकसंस्कृतीबद्दल बोलूया. वाचताना आपल्याला दिसते की परिक्रमेच्या मार्गावरच्या सर्व गाव व शहरांत परिक्रमावासींचे आदरातिथ्य करायची संस्कृती रुजलेली आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी या परिक्रमावासींचे छान आदरातिथ्य होते. "महाराज आसन लगाओ" म्हणत स्वागत होते. आणि यजमानाच्या सोयीनुसार खिचडी, डाळ, टिक्कड, गोड पदार्थ असा प्रसाद दिला जातो. उपास असेल तर खिचडी, बटाटे, चिवडा यांची सोय होते. वाटेतले दुकानदार प्रेमाने चहा पाजतात, खाण्यापिण्याचे पदार्थ देतात. वेगवेगळ्या मठांमधून राहण्या-जेवण्याची सोय होते. विशेष म्हणजे जेव्हा वाट अगदी खेड्यापाड्यातून जाते तेव्हा गरीब लोकही आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून जमेल तशी सेवा करतात. प्रसंगी स्वतः उपाशी राहून परिक्रमावासींना खायला घालतात. तेही इतक्या आनंदाने, सहजतेने की आपण दिङ्‍मूढ होऊन जातो. असे कितितरी रोमांचक अनुभव यात आहेत.

नर्मदेची नाना तीर्थस्थळे, विशाल पात्रं, हजार छोट्या प्रवाहातून वाहणारे रूप, कुठे निर्मळ पाणी, तर कुठे खडकाळ किनारा अशी रूपे जाता जाता दिसतात. पण यांचं वर्णन खूप सविस्तर नाही. उदयन आचार्य हे काही व्यावसायिक लेखक नसल्यामुळे तसा साहित्यिक ढंग किंवा चित्रमय शैली असा प्रकार नाही. ओझरते उल्लेख होतात इतकेच.
उदा. अस्वलं वाटेत आडवी येतात तो क्षण
(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)


ही सगळी परिक्रमा हे पर्यटन नसल्यामुळे पहिले दोन मुद्दे तसे गौण आहेत तर अध्यात्मिक अनुभव हा मुख्य गाभा आहे. त्या अनुभवांची इथे रेलचेल आहे. दृष्टांत होणे, स्वप्नात दर्शन घडणे, मनात एखादी इच्छा आली की ती लगेच पूर्ण होणे, एखादी व्यक्ती काहितरी सांगून जाते आणि नंतर तिची प्रचिती येणे असे अनुभव पानोपानी भरलेले आहेत. परिक्रमेच्या आधी एकाने त्यांच्याकडे येताना शिवलिंग आणायला सांगितलेलं असतं आणि एका मठात एक साधू महाराज आपणहून त्यांना शिवलिंग देतात, कुणीही न सांगता. एकदा एक साधू महाराज त्यांच्या स्वप्नात येतात. आधी कधीही न पाहिलेले साधू महाराज. ते कोण, काय, काही कळत नाही. आणि दुसऱ्या दिवशी लेखक अनायसे एका मंदिरात पोचतात तर तिथल्या साधूंची मुर्ती अगदी तशीच. जणू काही या साधूंनीच लेखकाला खेचून आणलं. प्रवासात त्यांची स्लीपिंग बॅग खराब होते. बरेच दिवसांनी एका मठात एक आंधळे साधूबाबा जणूकाही अंतर्ज्ञानाने ते ओळखून आपल्या शिष्याकरवी नवीन बॅग पाठवतात. हे सगळे बाह्यानुभव वाचणं कोड्यात टाकणारं आहे. एखाददुसरा अनुभव असता तर फक्त योगायोग म्हणून सोडून देता आलं असतं पण पुन्हा पुन्हा आलेले अनुभव पाहून हे काहितरी वेगळंच आहे हे जाणवतं.
उदा. एका मनकवाड्या साधूचा आलेला अनुभव



या बाह्य अनुभवाप्रमाणेच लेखकाने आपल्या मनात येणाऱ्या भावभावना आणि विकल्प यांचे अगदी प्रामाणिक वर्णन केले आहे. मी खूप मोठा कोणी आहे असा बिलकुल अभिनिवेश ते बाळगत नाहीत. उलट आपण अध्यात्माक्षेत्रात अगदी पहिल्या पायरीवर आहोत, आपले सद्गुरू आणि नर्मदामैया यांच्या कृपेने आपण हे शिवधनुष्य पेलत आहोत हा नम्रभाव पूर्ण पुस्तकभर आहे. जर त्या दिवशी काही चांगलं घडलं, मनात एखादी इच्छा आली आणि ती लगेच पूर्ण झाली की माई तू किती प्रेमळ आहेस, भक्तांचे कसे लाड पुरवते आहेस असा प्रेमळ भाव आहे. कधी खायला नाही मिळाले, राहायची गैरव्यवस्था झाली, अपवादात्मकच पण अपमान झाला तर, माई तू माझी परीक्षा बघते आहेस असा भाव आहे. काहीवेळा खाण्याची, राहण्याची उत्तम व्यवस्था उत्तम झाली की जरा अजून खावं, तिथेच अजून रेंगाळावं असे भाव मनात आले की उदयनजी कातर होतात. मन या सुखासीनतेपासून अजून दूर जात नाहीत, वैराग्यभाव अजूनही पूर्ण जागृत होत नाही म्हणून व्याकूळ होतात. देवीची प्रार्थना करतात. कधी कुणावर चकून रागावले, वेडावाकडा शब्द गेला की अजूनही "अचपळ मन माझे नावरे आवरीता" ही भावना त्यांना उदास करते. त्यांच्या आईची आठवणही त्यांना व्याकूळ करते. साधकाला समस्थिती, स्थितप्रज्ञत्वतेकडे नेण्यासाठी ही परिक्रमा फलदायी कशी ठरत असेल हे आपल्याला यातून कळतं.
उदा. आइस्क्रिम खायला मिळालं तो प्रसंग

पुस्तकात ८ पाने रंगीत फोटो ही आहेत तीर्थस्थळांचे.

तीनशे पानी पुस्तकातून आपणही उदयनजींबरोबर परिक्रमा करतो. पुस्तकाची भाषाही सहज संवादी आहे. पुस्तकाचे स्वरूप रोजनिशीप्रमाणे आहे. त्यामुळे कुठे जेवलो, काय जेवलो, कुठे आंघोळ केली, काय नामस्मरण केलं, कोणाकडे  जेवलो, जेवणात काय काय होतं, वाटेत काय खाल्लं इ. सगळे तपशील दिलेले आहे. यातला काही भाग कापून, द्विरुक्ती टाळून किंवा पुन्हापुन्हा येणारे जेवण्या-राहण्याचे संदर्भ टाळता आले असते तर जास्त रोचक झालं असतं. हे प्रवासवर्णन नाही तरी परिसरवर्णन थोडं वाढवलं असतं तर पुस्तक अजून माहितीपूर्ण झालं असतं.

लेखक, प्रकाशक - मोरया प्रकाशन आणि ज्यांच्या हस्ते प्रकाशन झाले ते सच्चिदानंद शेवडे सगळे डोंबिवलीचे - माझे गाववाले आहेत याचं मला आणि कौतुक (गाड्यासोबत नळ्याची यात्रा :) ). या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यालाही मी गेलो होतो.

परिक्रमेवरचे गो.नि.दांचे कुणा "एकाची भ्रमणगाथा", जगन्नाथ कुंटे यांचं "नर्मदे हर हर", आणि ध्रुव भट्ट यांचं गुजराथी "તત્ત્વમસિ" ही पुस्तके आधी वाचली होती. तरी प्रत्येकाचे अनुभव वेगळे, सांगायचे कथाभाग वेगळे, शैली वेगळी. त्यानुसार हे चौथे पुस्तक असले तरी वेगळेच आहे.


सश्रद्ध लोकांना हे पुस्तक आवडेलच; इतरांनाही हे अनुभवविश्व जाणून घ्यायला आवडेल.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा (जमल्यास वाचा)
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

Squaring the blockchain (स्क्वेअरिंग द ब्लॉकचेन )




पुस्तक : Squaring the blockchain (स्क्वेअरिंग द ब्लॉकचेन )
लेखक : Kunal Nadwani (कुणाल नंदवानी )
भाषा : English (इंग्रजी )
पाने : १५१
ISBN : 978-93-88150-01-9


Short review in English :

This books given introduction of how blockchain works, how crypto-currencies emerged, their history, how the valuation and exchange of these currencies happen, the frauds and technology handled it.

Then the book analyses the the blockchain technology from different perspectives. How and how much is blockchain decentralised ? blockchain has been thought as very secure one, but what were attacks and security breaches in cryptocurrencies that caused loss of millions. What are the challenges in scalability of blockchain based solution. It also talks as why is it a hype. It talks about failed endevours to force-fit in banking, record keeping, government where major organizations had to call off their projects after spending millions in RnD.

Author does not deny the might of blockchain but asks us to carefully observe all characteristics, trade-offs. He thinks that current hype of blockchain will burst soon and then more mature industry will use it for appropriate use cases.

If you have clear understanding of basic working of blockchain then this book will help you mature your thought process about its applicability. A nice to read small book.

See some photos of the book below after review in Marathi.

मराठीत पुस्तक परीक्षण
"बिटकॉईन" या अभासी चलनाबद्दल तुम्ही कदाचित वाचलं असेल. हे चलन कुठलीही बॅंक, संस्था किंवा सरकार नियंत्रित करत नाही. या चलनाची देवाणघेवाण जगात कुठेही ऑनलाईन होऊ शकते. व्यवहार करणाऱ्या व्यक्तींची प्रत्यक्ष ओळख जाहीर न करता यात व्यवहार होऊ शकत असल्याने अवैध धंद्यांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो आणि केला जातो. त्यामुळेच हे चलन वादग्रस्त ठरले आहे. भारतात त्याला अधिकृत मान्यता नाही. हे चलन ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे त्याचं नाव "ब्लॉकचेन". 

कुठलही तंत्रज्ञान स्वतः नैतिक किंवा अनैतिक नसतं. तर त्याचा वापर कसा केला जातो ते महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे ब्लॉकचेनचे देखील अनेक चांगले उपयोग केले जात आहेत - बँकेमध्ये रेकॉर्ड जतन करण्यासाठी, स्मार्ट-कॉंट्रॅक्ट नोंदणीसाठी, स्थावर मालमत्ता नोंदणी इ. साठी.

"ब्लॉकचेन" कसे चालते, त्याची सुरुवात कशी झाली हा इतिहास सांगितला आहे. मग "ब्लॉकचेन" च्या गुण्धर्मांची सविस्तर चर्चा आहे. ही संकल्पना सर्वांगाने समजून घेण्यासाठीची चर्चा आहे. त्याचे बलस्थानं-व्ययस्थानं काय हे मांडायचा प्रयत्न आहे. 

हे अगदी नवे तंत्रज्ञान असल्याने आयटी क्षेत्रात याबद्दल खूप उत्सुकता आहे, ते वापरून बघण्याची चढाओढ आहे. केवळ नवं तंत्रज्ञान आहे म्हणून ते प्रत्येक ठिकाणी वापरायचा अट्टाहास लोक करतात. त्यातून फायदा होतच नाही त्यामुळे असे प्रकल्प बारगळतात, बंद पडतात. हे विविध क्षेत्रांची उदाहरणं घेऊन लेखकाने स्पष्ट केलं आहे. ब्लॉकचेन कुठे वापरता येईल हे थोडं स्पष्ट केलं आहे.

ब्लॉकचेन शिकण्यासाठी हे पुस्तक नाही. तर ज्यांना ब्लॉकचेन कसं काम करतं हे नीट कळलं आहे त्यांच्यासाठी हे पुढच्या पायरीवर नेणारं पुस्तक आहे.

अनुक्रमणिका / Index


लेखकाबद्दल / About author

Analysing the charactersistics of blockchain. How decentralised is it ?







An example of forced use of blockchain






----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा (जमल्यास वाचा)
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...