चिनीमाती (Chinimati)




पुस्तक : चिनीमाती (Chinimati)
लेखिका : मीना प्रभु (Meena Prabhu)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ३६२
ISBN : दिलेला नाही

मीना प्रभु यांचं नाव मराठी साहित्यात प्रवासवर्णनांसाठी खूप प्रसिद्ध आहे. यावेळी त्यांचं पुस्तक वाचायचा योग आला. २००० साली त्यांनी चीनला भेट दिली. सर्वसाधारण पर्यटकांसारखे ७-८ दिवसात एक देश न बघता चांगलं दीडेक महिने त्या चीनमध्ये राहिल्या होत्या. एखाद्या पर्यटन कंपनी बरोबर न जाता स्वतः प्रवासाची आखणी करून आपल्या आवडीनं, चवीचवीनं देश बघण्याची त्यांची शैली त्यांनी इथेही सोडली नाही. त्यामुळे बीजिंग, शांघाय, हॉंगकॉंग सारख्या सर्वपरिचित शहरांना भेट दिलीच पण आडवाटेनं जाऊन इतर शहरांना, गावांना भेट दिली. भाषेच्या अडचणींमुळे स्थानिक मार्गदर्शक घेणं क्रमप्राप्त होतंच. त्यांच्या सल्ल्याने त्या त्या ठिकाणचे स्थलदर्शन त्यांनी केलं.

अनुक्रमणिका: 


पुस्तक वाचताना चीनमधले कितीतरी पुरातन राजवाडे, बागा, संग्रहालये, स्तूप, लेणी, मोठमोठाल्या बुद्ध मूर्ती, अशा चीनच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची भेट होते. यांगत्से नदी चीनमधली खूप मोठी नदी. तिच्या काठची पर्यन स्थळं बघत पाच दिवसाच्या जलप्रवास त्यांनी केला. नदी जेव्हा पर्वतांच्या दरीमधून जाते ते "थ्री गॉर्जेस" ठिकाणही त्यांनी बघितलं. निसर्गाने तयार केलेले दगडांचे रान "कुनमिंग" त्यांनी बघितलं. चीन म्हटल्यावर चीनची भिंत, "तिआनामेन स्केवर" हे तर आलेच. थोडक्यात पर्टनासाठी कमी-अधिक प्रसिद्ध असणारी स्थळं त्यांनी बघितली, अनुभवली आणि आपल्या लेखणीतून ती आपल्या समोर उभी केली आहेत. लोकांच्या वागण्याच्या पद्धती, हॉटेलात, रेल्वेत काम करणाऱ्यांच्या तऱ्हाही सांगितल्या आहेत.

रोमँटिक हॉंगझौ चं वर्णन:
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)

ज्याच्याकडे वेळ पैसा आहे अशा पर्यटनप्रेमीने देखील हे बघितलं असतं. पण लेखिकेचं वेगळेपण हे अनवट जागी भेट देण्यात आहे. उदा. स्थानिक वाटाड्यांच्या मदतीने त्यांनी तिथल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांना भेट दिली. तिथल्या सोयी, वातावरण समजून घेतलं. सायकल वरून प्रवास केला. गर्दीचे बाजार, गरीब वस्त्या, मुस्लीम मोहल्ले यांच्यातही हिंडल्या. भाषेची अडचण असूनही रस्त्यावरचे नाना खाद्यपदार्थ खाऊन बघितले. चायनीज मसाज करून घेतला. चायनीज व्यक्तींच्या घरी जाऊन तिथलं वातावरण बघितलं. गर्दीने भरलेल्या बसने प्रवास केला. रेल्वेत जनता क्लासने प्रवास केला. हे सगळं करणं खूप धाडसाचं होतं. तरी त्यांनी हे धाडस केल्यामुळे आपल्याला हे रोमांचक अनुभव वाचायला मिळतायत.

चिनी जेवणाचा हा एक अनुभव:


लेखिकेने फक्त चिनी स्थळांना भेट दिली नाही तर चिनी मनांनाही भेट दिली. त्यांना जे जे चिनी भेटले त्यांच्याशी - त्यांचे वाटाड्ये, रेल्वेतले सहप्रवासी, विद्यापीठातले विद्यार्थी, शाळांतले शिक्षक - अशा सर्वांशी त्यांनी संवाद साधला. बदलता चीन, एकपक्षीय कम्युनिस्ट राजवट, माओच्या काळात झालेली उलथापालथ आणि हिंसा, एक मूल धोरण, परकियांशी संबंध ठेवण्यावरचे निर्बंध अशा ज्वलंत व हळव्या प्रश्नांवर त्यांची मतमतांतरं जाणून घेतली. ही गोष्ट त्यांच्या प्रवासाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. हे सगळे संवाद वाचकाला नीट समजावेत म्हणून ते ते संदर्भ नीट समजावून सांगितले आहेत. त्यामुळे प्रवास वर्णन वाचताना आपल्यालाही चिंग घराणं, मिंग घराणं, ब्रिटिश-चीनचं अफू युद्ध, रेशीम मार्गाचा विकास, चहाचा इतिहास, माओ ने केलेली क्रांती, सामाजिक क्रांतीच्या नावाखाली पांढरपेशा लोकांचं हत्याकांड, अर्थव्यवस्थेतले उलटसुलट प्रयोग ही सगळी माहिती आपल्याला मिळते. त्यांची दाहकता, परिणामकारकता आणि आजच्या चीनवरचा त्यांचा प्रभाव जाणवतो.

एका वाटाड्याबरोबर झालेली ही गरमागरम चर्चा पहा:



लेखिकेचा प्रवास आणि चीनचा इतिहास दोन्ही जितके रंजक आहेत तितकीच लेखिकेची लेखनशैली सुद्धा. आपणच त्यांच्याबरोबर फिरतोय असं वाटत राहतं अशी दृष्यमय शैली आहे. प्रवासात कधी फसगत होते, सामान हरवतं, वेळ-उशीर होतो, ठरवलेल्या प्लॅनची वाट लागते, भाषेमुळे गोंधळ उडतात या सगळ्या गमतीजमती, फटफिजिती सुद्धा त्या मोकळेपणे लिहितात. उदा. एकदा बोटीवर शांत डेकवर त्या उभ्या असतात. डेकवर बाकी जर्मन प्रवाशंचा गटसुद्धा असतो. अचानक बोटीचा भोंगा जोरात वाजतो आणि त्या दचकतात. त्यांचं दचकणं बघून जर्मन गट हसायला लागतो. तेव्हा त्या म्हणतात, "मला त्यांचा अस्सा राग आला, बरं झालं महायुद्धात हरले ते". लिखाणाच्या या संवादी शैलीमुळे आपण लिहिलेलं वाचतोय असं न वाटता त्यांच्याशीया प्रवासाबद्दल त्यांच्या घरी मोकळेपणे गप्पा मारतोय असंच वाटत राहतं. 

ही एक गंमत वाचा, चिनी मसाजची.

पुस्तकात प्रत्येक प्रकरणाच्या आधी एक कृष्णधवल फोटो आहे. आणि दोन-तीन रंगीत फोटो आहेत. पण प्रत्येक प्रकरणात त्या त्या स्थळाचा फोटो नावासकट दिला असता तर दृष्य डोळ्यासमोर आणायला अजून मदत झाली असती. पुस्तक वाचताना काहीवेळा या ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ नेटवर बघून वाचताना अजून मजा आली.

आपला शेजारी, महासत्ता, पोलादी पडद्याच्या आड असणाऱ्या देशात डोकावण्याची ही संधी सोडू नका.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...