द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (The Power of your subconscious mind)




पुस्तक : द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (The Power of your subconscious mind)
लेखक : डॉ. जोसेफ मर्फी (Dr. Joseph Murphy)
भाषा : मराठी (Marathi)
मूळ पुस्तक भाषा : इंग्रजी (English)
अनुवाद : प्रा. पुष्पा ठक्कर (Pro. Pushpa Thakkar)
ISBN : 978-81-7786-596-7



मन चिंती ते वैरी न चिंती असं आपण मराठीत म्हणतो. म्हणजे, आपलं मन अश्या शक्यता पडताळून पाहत असतं, अश्या विचित्र, प्रतिकूल परिस्थिती निर्माण करू पाहतं की ज्याची कल्पना आपल्या शत्रूनेही केली नसेल. समजा असं व्हायला लागलं की आपलं मन जे विचार करतं तेच प्रत्यक्षात यायला लागला तर? तर अगदीच अनावस्था प्रसंग ओढवायचा. आपल्याला वाटतं तसं प्रत्यक्षात होत नाही हेच बरं आहे. पण खरंच असं होत नाही का ? आपल्या मनातल्या विचारांना काहीच ताकत नाही का ?

तर तसंही नाहीये. आपल्या मनाला त्याच्या विचारांना खरंच खूप ताकद आहे. या पुस्तकाचे लेखक डॉक्टर मर्फी म्हणतात विचारांना गोष्टी प्रत्यक्ष घडवून आणण्याची ताकद आहे. आपल्या मनाचे चेतन मन आणि अचेतन मन असे दोन भाग आहेत. आणि हे अचेतन मन प्रचंड शक्तिशाली आहे. तुमच्या मनात जे विचार करता, जे स्वप्नचित्र रंगवता ते प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद तुमच्या मनात आहे. म्हणूनच तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवर तुमचे नियंत्रण असणे आवश्यक आहे.
मर्फी काय म्हणतात पहा.



विचार बदला तर तुमचं नशीब बदलेल; विचार बदला तर तुमचा आयुष्य बदलेल. हे वाक्य आपण ऐकतो त्यामागचं तत्त्वज्ञान आणि कदाचित विज्ञान या पुस्तकात असं सांगितलं आहे. हे पुस्तक जरी पावणेतीनशे पानी असलं तरी लेखकाला आपल्याला जे सांगायचं आहे ते एक-दोन पानात पूर्ण सांगण्यासारखं आहे. पूर्ण पुस्तकभर याच तत्त्वाची पुन्हा पुन्हा उजळणी केली आहे. वेगवेगळ्या प्रकारे वेगळे उदाहरण देऊन हा मुद्दा आपल्या मनावर ठसवण्याचा; त्याची सत्यता पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
काही महत्त्वाचे मुद्दे :


या पुस्तकात लेखकाने स्वतः घेतलेले अनुभव, इतरांनी त्यांना सांगितलेले अनुभव दिलेले आहेत. अशाप्रकारे मनात चांगले विचार आणून, मन शांत करून मनाला योग्य त्या प्रार्थनेची सवय लावून आयुष्यात कसे बदल घडवले याची उदाहरणे आहेत. हे एक उदाहरण वाचा.

मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, चांगले विचार मनात कसे आणायचे यासाठी सर्वसाधारणपणे आपण प्राणायाम, योग ध्यानधारणा इत्यादी मार्ग अवलंबतो; एकाग्रता वाढवण्यासाठी मानसिक व्यायाम करतो तशी काही तंत्र, मंत्र, युक्त्या व्यायाम आहार इत्यादी सविस्तर दिलेले नाही. त्यामुळे पुस्तक पूर्ण वाचायचा कंटाळा येतो. मी एखाद दोन प्रकरणं वाचली आणि पुढची प्रकरण फक्त चाळून पुस्तक बाजूला ठेवलं.


पुस्तकात दिलेली उदाहरणं सुद्धा खूप अतिशयोक्त वाटतात. मनाची शक्ती खरच इतकी असेल का, यावर लगेच विश्वास बसणे कठीण आहे. बायबल आणि ख्रिश्चन धर्मग्रंथातील या रचनांचा पुस्तकात जागोजागी उल्लेख आहे. हिप्नॉटिझम करून लोकांना फसवणारे, नाचायला लावणारे, वेडेवाकडे चाळे करायला लावणारे भोंदू ख्रिश्चन पादरी आपण टीव्हीवर किंवा प्रत्यक्षात बघितले असतील. त्यांच्याकडे आलेले लोक थोड्या प्रार्थना केल्यानंतर लगेच, "आता माझ्या सगळ्या वेदना बऱ्या झाल्या, सगळे त्रास गेले", असा आरडाओरडा करतात. या सगळ्या प्रकाराचं आपण त्याचं पुस्तक स्वरूप वाचतोय की काय असं वाटतं. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या विषयावर जास्त वैज्ञानिक पुस्तक लिहायला हवं होतं असं असा मला वाटलं. कदाचित लेखकाचा असा अनुभव असेल की लोकांना विज्ञानबिज्ञान काही नको, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा सोपा मार्ग पाहिजे. आणि त्यावर विश्वास बसायला पाहिजे. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच पद्धतीचं "द सीक्रेट" पुस्तक वाचलं होतं. (त्याचं परीक्षण द सीक्रेट - रहस्य (The Secret) - रॉंडा बर्न (Rhonda Byrne) - अनुवाद - डॉ रमा मराठे)


तरीही नकारात्मक विचारांमुळे शरीराला होणारा त्रास आणि त्या मनोवृत्तीने घेतलेले चुकीचे निर्णय टाळून जितकं होता होईल तितकं आनंदी राहणं, स्वतःवर विश्वास ठेवणं, प्रसंगी स्वतःलाही माफ करणं महत्त्वाचे आहे हे मात्र आपल्याला नक्की पटेल आणि त्या दृष्टीने आपल्या आयुष्यात आपण बदल केला तरच हे पुस्तक वाचण्याचा आपल्याला फायदा झाला असं म्हणता येईल. 

आणि लेखक म्हणतो त्याप्रमाणे मनाच्या शक्तीद्वारे तुम्ही जर काही चमत्कार घडवू शकलात तर नक्की सांगा.


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

Japanese Orchid (जॅपनीज ऑर्किड)




पुस्तक : Japanese Orchid (जॅपनीज ऑर्किड)
लेखिका : Rei Kumura (रेई किमुरा)
भाषा : Englsih (इंग्रजी)
पाने : २४४
ISBN : 978-81-8498-139-1 


ही एक रहस्यशोध कादंबरी आहे. एका जपानी उद्योगपतीला त्याच्या जन्माबद्दलचे रहस्य माहित असते की तो एक जपानी सैनिक आणि सिंगापुरी महिलेचा अनौरस पुत्र आहे. त्याच्या वडिलांनीच त्याला हे सांगितलेलं असतं. पण त्या महिलेबद्दल - त्याच्या खऱ्या आईबद्दल - त्याला याहून जास्त माहीत नसतं. बाकी कोणालाही हे गुपित माहीत असण्याची शक्यता नसते. पण त्याला ब्लॅकमेल करणारा मेल येतो आणि त्यात हे गुपित फोडायची भीती दाखवून खंडणी मागितलेली असते. ही खंडणी मागणारे कोण, त्यांना हे गुपित कसं कळलं, आणि खंडणीखोरांपर्यंत ते कसे पोचतात असे कथानक आहे. 

कथानक खूपच सरधोपट आहे. त्यात घडणारे मुख्य प्रसंग सुद्धा मर्यादित आहेत. त्यामुळे पुढे काय होतंय याचा साधारण अंदाज येतो. प्रसंगांच्या वर्णनात कथानकाला पुढे नेण्यापेक्षा फापटपसाराच जास्त आहे. रहस्यमय कादंबरी असूनही खूप उत्कंठावर्धक नाही. 

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती :



----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

कुतूहलापोटी (kutuhalapoti)



पुस्तक : कुतूहलापोटी (kutuhalapoti)
लेखक : अनिल अवचट (Anil Avachat)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २००
ISBN : दिलेला नाही 

डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, लेखक असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या अनिल अवचट यांनी  "कुतूहलापोटी" या पुस्तकातून निसर्गातील चमत्कारांचे जग आपल्यासमोर खुले केले आहे. पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की एखाद्या गोष्टीचं कुतूहल वाटलं की त्याबद्दलची पुस्तकं वाचणं, त्यातल्या तज्ञांना भेटून त्याचं सखोल ज्ञान मिळवणं हा त्यांचा खाक्या रहिला आहे. ज्या गोष्टी त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात होत्या त्या कॉलेजजीवनात जबरदस्ती म्हणून शिकल्या गेल्या होत्या. त्यात आनंदाचा भाग कमी होता. पण तीच गोष्ट आज शिकताना आनंद, कुतूहल, जिज्ञासा यापोटी खूप खोलात जाऊन समजावून घेतली जाऊ लागली. 
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)


निसर्गात पदोपदी दिसणाऱ्या चमत्कारांनी मन हरखून जातं. असेच आश्चर्याचे आणि ज्ञानाचे तुषार या पुस्तकातून त्यांनी वाचकांवर उडवले आहेत. त्याचे विषयही खूप वेगवेगळे आहेत. अनुक्रमणिका पहा.




फंगस म्हणजे बुरशीचं जीवनचक्र कसं चालतं, समुद्रापासून जंगलापर्यंत आणि उंच शिखरापासून माणसाच्या शरीराच्या आत बुरशी वाढते. जिथे वाढते तिथल्या वनसपतींकडून अन्न मिळवते आणि जमिनीतल्या घटकांचे विघटन करून वनस्पतीला पोषक द्रव्य पुरवते. असा परस्परसहकार्याचा मामला असतो. बॅक्टेरिया हे सूक्ष्मजीव पण असेच कुठे कुठे आधणारे. कधी उपकारी, कधी त्रासदायक. अशी बुरशीची, बॅक्टेरियाची माहिती आहे.
शरीरात हे सूक्षमजीव कुठे वास करतात ते वाचा :


मधमाश्यांच्या पोळ्याची रचना कशी असते, कामकरी माश्या मध शोधतात आणि नाच करून इतर माश्यांना योग्य दिशा कशी दाखवतात, मधमाश्यापालनातून शेतकऱ्यांना फायदा करून देण्याचा व्यवसाय परदेशात कसा चालतो याची माहिती आहे. मधमाश्यांच्या स्वच्छतेबद्दल वाचा :


अशीच रोचक, रंजक माहिती कीटक, साप, पक्षी यांची आहे.

शेवटच्या पाच लेखांत शरीराचे वेगवेगळे भाग आणि त्यांची रचना निसर्गाने कशी कमालीची केली आहे, शरीराच्या आत कितीतरी रासायनिक प्रक्रिया कशा घडतात, जखम झाली की रक्त बाहेर येते आणि रक्त साकळते या नित्य अनुभवामागे सुद्धा किती गुंतागुंतीची प्रक्रिया घडते इ. माहिती सविस्तर आहे.
रक्त तपमान नियंत्रण कसं करतं ते बघा.



पेशींची अनिर्बंध अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर. काही कारणांमुळे पेशीमध्ये बिघाड होतो आणि ती अनियंत्रित वागू लागते. पण अश्या बिघडलेल्या पेशी आपल्या शरीरात नेहमी उत्पन्न होत असतात. तरी प्रत्येकाला सतत कॅन्सर होत नाही. कारण अश्या बिघडलेल्या पेशी शोधण्याची, त्या नष्ट करण्याची यंत्रणा सुद्धा शरीरात आहे. हे सगळं पेशींचं जीवनचक्र सुद्धा त्यांनी सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे. बाळाच्या हृदयाची वाढ कशी होते 



पुस्तकाचा विषय गंभीर आणि किचकट आहे. पण पुस्तक तांत्रिक नाही. सर्व सामान्यांना सोप्या भाषेत थोडी तोंडओळख व्हावी, प्रत्येक गोष्टीमागे किती सखो विज्ञान आहे, किती बारकावे आहेत या कडे अंगुलीनिर्देश व्हावा हा आहे. आणि हे सांगताना लेखकाची भाषा अशी आहे की जणू तो आपल्याशी गप्पा मारतोय, "काल काय किस्सा घडला" असं मित्राने सांगावे अशा थाटात, "तुला एक गंमत सांगतो, इतका लहान अजगर इतके मोठे प्राणी कसे गिळू शकतो माहिती आहे ? ... आणि पोटातल्या बाळाला ऑक्सिजन कसा जातो हे ऐकलंस तर चक्रावूनच जाशील.." असं आपला मित्र सांगतोय असं वाटतं. दाखले पण रोजच्या जगण्यातले. ज्यांनी अनिल अवचटांची व्याख्यानं किंवा त्यांच्याशी संवादाचे कार्यक्रम ऐकले असतील त्यांना या गप्पांचंच लेखन केलंय असं वाटेल. 

त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वाचायला आवडेल, उपयुक्त ठरेल, कुतूहल चाळवेल आणि अजून खोलात जायची इच्छा निर्माण करेल असे हे पुस्तक आहे. प्रस्तावनेत डॉ. आभय बंग यांनी योग्यच म्हटलं आहे - "लहान मुलाचं न संपणारं कुतूहल, वैज्ञानिकाची जिज्ञासा आणि श्रेष्ठ दर्जाची सहज लेखनशैली अशा तीन व्यक्तिमत्त्वांनी एकत्र येऊन हे पुस्तक लिहिलं असावं. त्यातून हा दोनशे पानांचा आनंदोत्सव निर्माण झाला आहे."


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------




----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...