The extra in ordinary (द एक्स्ट्रा इन ऑर्डीनरी)



पुस्तक - The extra in ordinary (द एक्स्ट्रा इन ऑर्डीनरी)
लेखक - Ashutosh Marathe (आशुतोष मराठे)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १३२
ISBN - 978-1-63886-618-3

लेखक आशुतोष मराठे यांनी या पुस्तकाचे परीक्षण माझ्या सारख्या “हौशी” परीक्षण लिहिणाऱ्याकडून जाणून घ्यायची इच्छा दर्शवली व त्यासाठी या पुस्तकाची प्रत माझ्यापर्यंत पोचवायची व्यवस्था केली या बद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. 

दैनंदिन आयुष्यात आपला कितीतरी लोकांशी 
संपर्क  येतो. पुन्हापुन्हा संपर्क आल्याने माणसाच्या स्वभावाची आपल्याला थोडी ओळख होते पण अचानक अशी काहीतरी घटना घडते की त्या माणसाचा वेगळाच पैलू आपल्याला दिसतो, एखादा गुण-अवगुण प्रकर्षाने जाणवतो. कधीकधी एखादी लहानांशीच घटना अनिवार समाधान देऊन जाते. तर कधी जिव्हाळा, घृणा, तृप्ती, आनंद असे भावनेचे कढ अनिवार होतात. आपल्या अवतीभोवतीच्या साध्या - "ऑर्डीनरी" माणसांमधलं असं काहीतरी जादा - "एक्स्ट्रा" दाखवणारे प्रसंग आपण बरेच वेळा अनुभवत असतो. आशुतोष मराठे यांचे असे स्वानुभव त्यांनी "द एक्स्ट्रा इन ऑर्डीनरी" पुस्तकात संग्रहित केले आहेत.

एकेक प्रसंग सांगणारे 
२-३ पानांचे छोटेखानी ३९ लेख यात आहेत. "Intense", "Funny", "Inspirational" अशी त्यांची वर्गवारी केली आहे. 




"Intense" मध्ये ज्यामुळे लेखकाच्या भावना उचंबळून आल्या असे प्रसंग आहेत. उदा. काही भिकारी आपली वाईट अवस्था अशी मांडतात की काळजाला हात घातला जातो; पाळीव कुत्र्याची सवय असणाऱ्याचा कुत्र्याचा मृत्यू होतो तेव्हा; एका निरक्षर माणसाची फसवणूक होते तेव्हा इ.
त्यांच्या बँकेतल्या एटीएम मधून बॅग गहाळ झाली तो प्रसंग 



"Funny" गटात नावाप्रमाणेच थोडे मजेशीर, हलकेफुलके प्रसंग आहेत


लहानपणी मित्रांबरोबर रेल्वे प्रवासात टॉयलेट मध्ये काढलेली रात्र, हिंदी न येणारी आजीबाईचा मराठी न येणाऱ्या भैय्या शी मुंबैय्या हिंदीतला संवाद, परदेशात भारतीय खाण्याच्या घमघमाटामुळे पाकिस्तानी माणसातला "देसी" जागा होतो इ.
घरी काम करणाऱ्या सुताराला घरधन्याचा पगार कळतो तेव्हाचा प्रसंग वाचून बघा




गटात जगण्यातल्या विपरीत परिस्थितीला धीराने तोंड देणाऱ्या लोकांचे प्रसंग आहेत. धुणीभांडी, स्वयंपाकाची कामे करून मुलांना वाढवणाऱ्या, शिकवणाऱ्या महिलांबद्दल आहे. तसेच गरीब असूनही अत्युच्च प्रामाणिकपणा दाखवणारे तर श्रीमंत असूनही त्याचा माज न करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव आहेत.
उदा. प्रामाणिक रखवालदाराचा आलेला हा अनुभव





सुधा मूर्तींसारखी निवेदनशैली आणि विषयाची निवड वाटली. तरी एखाद्या ब्लॉग सारखे स्वान्त:सुखाय लेखन आहे. प्रसंग घडले तसे थोडक्यात सांगितले आहेत. मीठमसाला लावून रंजकता, नाट्य आणण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पुस्तकाच्या नावात आहे त्याप्रमाणे "ऑर्डीनरी" मजकूर वाचतोय असं वाटतं. त्यात काही "एक्स्ट्रा" नसल्यामुळे पुस्तक आपल्यावर छाप पाडत नाही.

 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

Humorously yours - tales from the Gymkhana (ह्यूमरसली युअर्स)







पुस्तक - Humorously yours - tales from the Gymkhana (ह्यूमरसली युअर्स)
लेखक - Amitabh D Sarwate (अमिताभ सरवटे)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १३३
ISBN - 978-93-89624-49-6

हे पुस्तक वाचनालयात बघितल्यावर ह्या पुस्तकाने माझं लक्ष वेधून घेतलं. पुढचं-मागचं कार्टून, पुण्याच्या डेक्कन जिमखान्याचा उल्लेख, पी.जी. वुडहाऊस ह्यांच्या शैलीचा उल्लेख, सरवटे हे लेखकाचं आडनाव (माझ्या उत्साही वाचनप्रेमी नातेवाईकाचं आडनाव), त्यातही अमिताभ हे नाव आणि माझ्या सारख्या आय.टी.त काम करणारा लेखक ..अश्या माझ्या ओळखीच्या खुणा सापडल्या. एक धमाल विनोदी किंवा कमीतकमी हलकं फुलकं काही वाचायला मिळेल अशी खात्री वाटली.

त्याचप्रमाणे हे पुस्तक आहे. पुण्याच्या पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यात येणाऱ्या
 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांचे किस्से "बरखुरदार" नावाची व्यक्ती सांगते आहे, असं पुस्तकाचं स्वरूप आहे. प्रत्येक किस्सा, कथा वेगळी आहे. त्यामुळे एका अर्थी हा विनोदी, मनोरंजक गोष्टी असलेला कथा संग्रह आहे.

लेखकाची माहिती

ज्यांनी डेक्कन जिमखाना हे नाव ऐकलं नसेल त्यांच्यासाठी पुस्तकाच्या प्रस्तावनेत डेक्कन जिमखान्याची ओळख अशी करून दिली आहे.


अनुक्रमणिका



गोष्टी खूप मोठ्या नाहीत आणि कथाबीज लहान आहे. त्यामुळे गोष्टींबद्दल जास्त सांगणं म्हणजे गोष्ट सांगितल्यासारखंच होईल. त्यामुळे थोडक्यात, अंदाज येईल असं पण रसभंग होणार नाही अश्या पद्धतीने गोष्टींची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो.

The Elephant - पुण्यातल्या एका मोठ्या कंपनीचा परदेशी मालक पुण्यात येणार असतो. त्याचं स्वागत कसं करायचं ह्याचा विचार इथले कर्मचारी करतात आणि हत्तीकडून स्वागत करून घ्यायचं ठरतं. हा बेत पुढे कसा जातो? काय गोंधळ उडतो का? त्याची गंमत.

Federer - एका टेनिसपटू ला दुखापतीमुळे आपला खेळ सोडून द्यायची वेळ येते. पण असे काय प्रसंग घडतात की थेट रॉजर फेडरर कडून तिला प्रोत्साहन मिळतं ?

Arranged Marriage - एका वेल सेटल्ड NRI मुलाच्या वधुसंशोधनासाठीची त्याच्या घरच्यांची गडबड आणि अनपेक्षित लग्न ठरणे.

Swami's Paduka - साध्या माणसाने पायात घातली तर जी ठरते चप्पल, तीच मोठ्या माणसाने घातली तर ठरते पादुका? पण जिला पादुका म्हणून पूजायची ती दुसऱ्याच कोणाची निघाली तर ?? असा गडबडगुंडा मांडणारी गोष्ट.

Lottery - लॉटरी लागून अचानक धनलाभ व्हावा असं कोणाला नाही वाटणार? अश्या धनालाभासाठी नशिबावर न विसंबता उलटसुलट उपद्व्याप करून लॉटरी मिळवण्याचे मजेशीर प्रयत्न.

Parvati - एका गायीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा वापर तिथे उपस्थित असलेले लोक आपापल्या फायद्यासाठी कसा करतात त्याची मजा. पोलीस हवालदार, स्थानिक गावगुंड नेता, पर्यटक मार्गदर्शक अशी बरीच पात्रं आहेत.

Tagore's thief - काही वर्षांपूर्वी रवींद्रनाथ टागोर यांचे नोबेल पारितोषिक चोरीला गेले होते. त्यावर बेतलेली ही गोष्ट आहे. चोर निवेदकाला भेटतो आणि आपली चोरी कबूल करतो आणि पोलिसांनाही जमलं नसतं तो शोध अनपेक्षितपणे लागतो.

Operation Ulta - राजकारण सुधारायला गेला आणि स्वतःच बिघडला या मध्यवर्ती कल्पनेवरची गोष्ट

The Butka - तरणातलावावर भेटणाऱ्या दोन मित्रांची पाण्यात "मुटका" पद्धतीने पाण्यात उडी मारण्यावरून पैज लागते. हळूहळू या पैजेची स्पर्धाच होते. शेवटी बक्षिसाचे पैसे कोणाला मिळतात ? जो जिंकेल असं वाटलेलं त्याला; का आणि कोणालाच. प्रसंगातून उलगडत जाणारी ही मजेशीर गोष्ट आहे.

The False Kings एक नेहमीचा उद्योगपती. पण त्याच्या डोक्यात वेगळेच उद्योग येतात. मी राजवंशातला आहे, अशी कंडी 
तो पिकवून देतो. त्याला "चोरावर मोर" भेटतो. आणि तोतयाची उडते तारांबळ.

Goofball - "देव तारी त्याला कोण मारी" ही उक्ती अगदी महत्त्वाच्या प्रसंगी घडली तर काय धमाल. लग्न, जॉब ह्या आयुष्यातल्या अपेक्षित अनपेक्षित सुखद धक्के बसले तर... त्याची ही गोष्ट


एकदोन पानं 
उदाहरणार्थ देतो म्हणजे लेखकाच्या शैलीची कल्पना येईल 

"Arranged Marriage" गोष्टीतील वधूवर मेळाव्याचा प्रसंग







"
Goofball" गोष्टीतील नायकाला अचानक मुलगी पटते तो प्रसंग 






पुस्तकाच्या नावात पुण्याचा जिमखाना असला तरी गोष्टींमध्ये जिमखाना किंवा पुणेरीपण नाही. म्हणजे गोष्टींची सुरुवात जिमखान्यातल्या दोस्तांच्या गप्पांनी होत असली तरी मुख्य प्रसंग जिमखान्याबाहेरच घडतात. गोष्टी कुठल्यातरी शहरात घडणार म्हणून त्या इथे पुण्यात घडतात. पण त्यात "पुणेरी पुणेपण" असं नाहीये. त्या भारतातल्या कुठल्याही शहरात घडलेल्या दाखवल्या तरी फरक पडणार नाही. वाचताना हा थोडासा भ्रमनिरास झाला माझा.

लोकांच्या संवादात मध्येच हिंदी शब्द घातलेत आणि त्यांचा इंग्रजी अर्थसुद्धा लगेच दिला आहे. हिंदीऐवजी मराठी शब्द घातले असते तर थोडं पुणेरीपण आलं असतं. गोष्टी भारतीय मातीतल्या आहेत तरी इंग्रजी मध्ये अगदी सहज आल्या आहेत. लेखका
ची ही भाषाशैली भावली. तरी ह्याच गोष्टी मराठीत अजून खुलवून लिहिता आल्या असत्या का असा विचार मनात आला.

गोष्टी छोट्या आहेत, विनाकारण पाल्हाळ लावलेला नाही. कधी कधी शाब्दिक कोट्या करायचा प्रयत्न केला आहे. पण एकूण भर प्रसंगातून विनोदनिर्मितीवर आहे. खूप खळखळून हसायला आलं असे मोजकेच वेळा झालं. बाकीच्या वेळी हसू नाही पण कंटाळाही नाही. प्रचंड उत्सुकता वाटत नाही आणि तरी पुढे वाचत राहावंसं वाटतं. त्यामुळे हलक्या फुलक्या, मनोरंजक गोष्टी असं मी म्हणेन.

लेखकाकडून असं अजून छान वाचायला मिळेल अशी अपेक्षा वाटते. विशेषतः त्यांनी आय.टी. मधल्या लोकांच्या अनुभवांवर असं काहीतरी लिहिलं तर मजा येईल वाचायला.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

महाराष्ट्राचा चिंतामणी लोकसत्ता विशेषांक (Maharashtracha Chintamani Loksatta Special edition)


पुस्तक -महाराष्ट्राचा चिंतामणी लोकसत्ता विशेषांक (Maharashtracha Chintamani Loksatta Special edition)
भाषा - मराठी (Marathi)
संपादक - गिरीष कुबेर (Girish Kuber)
पाने - १३०
ISBN - दिलेला नाही 

चिंतामण द्वारकानाथ देशमुख अर्थात सी.डी. देशमुख हे भारताचे थोर सुपुत्र. आज साठ-सत्तरीत असलेल्या मराठी व्यक्तींना हे नाव आणि त्यांचं कर्तृत्व थोडं बहुत माहिती असेल पण त्यांनंतरच्या पिढीला हे नाव माहीत असण्याची शक्यता फार कमी. त्यामुळे आधी ते कोण होते हे थोडक्यात सांगतो म्हणजे वाचकांना पुढे दिलेल्या परीक्षणाचा योग्य संदर्भ कळेल.

सी.डी. देशमुख म्हणजे...
मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावे यामागणीला
 पाठिंबा म्हणून आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन जवाहरलाल नेहरूंचा जाहीर निषेध करणारे बाणेदार व्यक्तिमत्व
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर 
प्रजासत्ताक भारताचे (एकोणीसशे पन्नास नंतरचे) पहिले अर्थमंत्री (१९५०-५६)
नियोजन आयोगाचे संस्थापक सदस्य
वर्ल्ड बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थावरचे भारतीय प्रतिनिधी
विद्यापीठ अनुदान आयोगाचे(UGC) माजी अध्यक्ष
नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया इंटरनॅशनल सेंटर सारख्या प्रथितयश संस्थांचे संस्थापक अध्यक्ष
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू
संस्कृत भाषा प्रेमी भाषांतरकार

.... 
अगदी जुजबी ओळख करून द्यायची म्हटले तरी इतकं लिहिल्याशिवाय पर्याय नाही. हे फक्त हिमनगाचं टोक आहे. अशा सीडी देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त लोकसत्ताने हा विशेषांक प्रकाशित केला आहे. सीडींची बहु अंगाने ओळख करून देण्याचा हा लोकसत्ताचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहेच आणि तो झालाही आहे तसाच अर्थपूर्ण व सुंदर. त्याबद्दल संपादक गिरीश कुबेर आणि सर्व लोकसत्ता चमूचे एक वाचक म्हणून सर्वप्रथम आभार मानतो.

आता या विशेषांका बद्दल सांगतो 
सीडींवर च्या लेखांचा हा संग्रह आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया


यातल्या काही महत्वाच्या लेखांबद्दल सांगतो.
सीडींच्या आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती देणारे लेख
- "द्रष्टे अर्थशास्त्री" प्राध्यापक नीळकंठ रथ
- " समन्यायी प्रशासक" राहुल बजोरिया
- "उत्क्रांतीवादी अर्थ प्रशासक" एस एल एन सिम्हा
- "भारताचे अस्सल प्रबोधन पुरुष" अजित रानडे
- " धोरण संशोधनाचे मेरूमणी" डॉ विजय केळकर

रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून बँकेच्या कामाला आकार देणे, त्यात संशोधनात्मक कामाला प्रोत्साहन देणे, वर्ल्ड बँक आणि आयएमएफच्या कामातील योगदान, रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण, एलआयसी चे राष्ट्रीयीकरण, बँकिंग कंपनी ची निर्मिती, IFCI, ICICI ची स्थापनेतील सहभाग इत्यादी अनेक तपशील या लेखात आहेत इत्यादींची माहिती आहे

"द्रष्टे अर्थशास्त्री" लेखातील एक पान

" समन्यायी प्रशासक" लेखातील एक पान


अर्थमंत्री असताना आणिअर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर ते सक्रीय राजकारणातून दूर गेले असले तरी आयुष्यात त्यांनी कितीतरी संस्था उभारल्या नावारूपाला आणल्या. त्यांच्या या रचनात्मक कामाबद्दल माहिती देणारे लेख
"संस्थात्मक स्वातंत्र्याचे सर्जनशील संवर्धक" निरंजन राजाध्यक्ष
"विद्वान सर्वत्र पूज्यते" डॉ. रूपा रेगे नित्सुरे

राजाध्यक्ष यांच्या लेखातील काही भाग


चिंतामणरावांशी भेट झालेल्या, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळालेल्या लोकांनी जागवलेल्या 
त्यांच्या आठवणी
"बुद्धिमान अर्थमंत्री" - आय जी पटेल
"जीवनाला दिशा देणारी भेट" - एन. एन. व्होरा
"सी.डीं. ची विलोभनीय रूपे" - डॉ. न. गो. राजूरकर
"आमचे सहजीवन" - दुर्गाबाई देशमुख (देशमुखांच्या पत्नी)
" अर्थमंत्री यांबरोबर याची दोन वर्षे" - पी.डी. कसबेकर
"चिंतामणी देशाचा कंठमणी" - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे 

ह्यात त्यांची चिकित्सक वृत्ती, निसर्गप्रेम, भाषाप्रेम, समर्पित वृत्तीने काम करणे, खोलात जाऊन संशोधन करणे असे अनेक गुण दिसतात.

"चिंतामणी देशाचा कंठमणी" आचार्य प्रल्हाद केशव अत्रे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी देशमुख यांनी दिलेला राजीनामा यामुळे चळवळीला वेगळेच बळ आणि नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले सीडींची मुक्तकंठाने स्तुती करणारा आचार्य अत्रे यांचा हा लेख तसेच त्या वेळी दिल्लीत मोठा सत्याग्रह करण्यात आला त्याचे वर्णन या लेखात आहे.

देशमुखांच्या पत्नी दुर्गाबाई स्वतः विद्वान, सामाजिक कार्यकर्त्या, संसद सदस्या, नियोजन आयोगाच्या सदस्या होत्या. कामानिमत्ताने त्यांची ओळख झाली आणि देशमुखांनी त्यांना मागणी घातली. दुर्गाबाईंच्या दीर्घ लेखात अनेक आठवणींना उजाळा दिलेला आहे. दोघांच्या सामाजिक, राजकिय कामाबाबद्दल आहेच आणि घरगुती सुद्धा. उदाहरणादाखल ही दोन पाने.



चिंतामणरावांच्या भाषा प्रेम साहित्य प्रेम निसर्गप्रेम याबद्दलचे लेख
"विदग्ध संस्कृत प्रेमी" प्रा डॉ मंजुषा गोखले
"बालपणात हरवलेले चिंतामणराव" डॉक्टर श्रीनिवास वेदक
"चिंतामणी रावांची ग्रंथसंपदा" दुर्गाबाई देशमुख
चिंतामणराव संस्कृत फ्रेंच जर्मन जाणत होते त्यांनी स्वतः संस्कृत मध्ये काव्यरचना केली आहे. संस्कृत काव्यांचे मराठी व इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. मेघदूताचे मराठी भाषांतर गांधीजींच्या विचारांवर शंभर संस्कृत सुभाषितांची रचना इत्यादी कितीतरी साहित्य आहे आपल्या भाषणांमध्ये हि संस्कृत वचनांचा खुबीने वापर करत आपल्या पत्नीला मागणीसुद्धा त्यांनी संस्कृत मध्ये घातली होती. मंजूषा गोखले यांनी त्यांच्या लेखात देशमुख यांच्या संस्कृत साहित्याचा आढावा घेतला आहे आणि त्याच्या उणीवा आणि बलस्थाने यांचा ऊहापोह केला आहे त्यातली
 ही पाने






चिंतामणराव यांचे स्वतःचे लेखन किंवा वक्तृत्व
"पाकिस्तानचा न्याय्य वाटा मुंबईचे अलगीकरण वगैरे वगैरे" 
"आर्थिक धोरणातील नियंत्रणाची भूमिका"
"विद्यापीठे व राज्यसंस्था"

"पाकिस्तानचा न्याय्य वाटा मुंबईचे अलगीकरण वगैरे वगैरे" लेखात देशमुखांच्या मुलाखतीतील काही भाग आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर रिझर्व बँकेचे विभाजन झाले. काही काळ पाकिस्तान रिझर्व बँक आणि भारताचे रिझर्व बँक दोन्हीचे ते प्रमुख होते. त्या कर्तव्यानुसार पाकिस्तानला पंचावन्न कोटी देणे होते, ते दिले गेले पाहिजे असा देशमुखांचा आग्रह होता. त्याबद्दल आणि राजीनामा प्रसंगाबद्दल त्यांची बाजू लेखात आले आहे.




सी.डी. गौरव पर लेख
"सी डी विरळा तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व" - उद्धव ठाकरे
" निसर्ग आणि पुस्तकप्रेमी" - देवेंद्र फडवणीस
"चिंतामणराव चुकलेच" गिरीश कुबेर 
" विस्मरण महाराष्ट्राचे" माधव गोडबोले
यांचेही आहेत

चिंतामणराव चुकलेच" लेखात  गिरीश कुबेर चिंतामणरावांचे बहुअंगी कर्तृत्व महाराष्ट्र विसरला ही खंत मांडतात.

हा गौरव ग्रंथ स्वतंत्र लेखांचा संग्रह आहे. प्रत्येक लेखकाने थोडक्यात का होईना देशमुखांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अर्थमंत्री पदावरची मुख्य कामे, राजीनामा प्रकरण, संस्था उभारणी यांची माहिती पुन्हा पुन्हा आली आहे. ते टाळून त्याऐवजी अजुन लेख, जास्तीची माहिती मिळाली असती का असा
 वाचक म्हणून माझ्या मनात विचार आला.

दुसरे म्हणजे अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांनी संसदेत सडेतोड भाषण केलं आणि नेहरू हे एकाधिकारशाही पद्धतीने वागत आहेत असा जाहीर आरोप केला. आपली भूमिका महाराष्ट्र किंवा गुजरात यातल्या एकाच्या बाजूने नाही तर मुंबई केंद्रशासित करण्याच्या नेहरूंच्या एकतर्फी निर्णयाच्या विरुद्ध आहे हे त्यांनी मांडले. या भाषणाचा आणि त्याच्या प्रभावाचा उल्लेख बऱ्याच वेळा लेखांमध्ये आला आहे. त्यामुळे ते भाषण संक्षिप्त स्वरूपात का होईना या अंकात यायला हवे होते.

सीडींच्या जीवनाचे महत्त्वाचे टप्पे मांडणारी कालसूची/कालानुक्रम द्यायला हवा होता. म्हणजे पूर्ण कार्य एका नजरेत बघता आलं असतं त्यांनी किती वर्ष देशसेवा केली आणि एका वेळी किती वेगवेगळी कामं ते करत होते ते अजून परिणामकारकरित्या मांडलं गेलं असतं.

त्यांच्या नावाने अस्तित्वात असलेल्या संस्था, सार्वजनिक ठिकाणे, पुरस्कार किंवा व्याख्यानमालादी उपक्रम हे थोडक्यात देता आले असते तर त्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचे आपण सध्या किती छोट्या स्वरूपात स्मरण करतो आहे अजून प्रकर्षाने जाणवले असते.

असो. लोकसत्ताने या महत्त्वाच्या तरीही विस्मृतीत गेलेल्या विषयाला हात घातला हेच महत्वाचं आणि इतका सुंदर विशेषांक तयार केला हेच कौतुकास्पद. अंकात बरेच जुने फोटो सुद्धा आहेत त्यामुळे तो प्रेक्षणीय देखील आहे. उदा. रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून देशमुखांची सही असलेली जुनी नोट


या विशेष अंकाची कल्पना आपल्याला आली असेलच अतिशय वाचनीय आणि संग्राह्य असा हा विशेषांक आहे लोकसत्ता परिवाराने हा आगळावेगळा उपक्रम राबवून वाचकांना मोठी भेट दिली आहे अनेक वाचक हा विशेषांक वाचून चिंतामणरावाबद्दल अजून वाचायला उद्युक्त होतील आणि प्रेरणा घेतील हीच सदिच्छा.

हा अंक कुठे मिळेल ? 
मला तर आमच्या नेहमीच्या पेपरवाल्यांच्या स्टोलवर मिळाला. तुम्ही सुद्धा तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे चौकशी करा. अन्यथा लोकसतात दिलेल्या पुढील क्रमांकांवर संपर्क साधून बघा 



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-



















The guardian angels (द गार्डियन अँजल्स)








पुस्तक - The guardian angels (द गार्डियन अँजल्स)
लेखक - Rohit Gore (रोहित गोरे)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - ३२८
ISBN - 978-93-81-841280

आदी आणि राधा या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आदी आणि एका मध्यमवर्गीय, कर्मचारी युनियन नेत्याची मुलगी राधा यांची शाळेत भेट होते. मैत्री होते. आणि पुढे ते भेटत राहतात. "आदी"च्या वडिलांचा व्यवसाय म्हणजे भांडवलशाही लोकांकडून कामगारांचं शोषण आहे असा राधाचा नेहमीचा विचार आदीला कधी मान्य नसतो. तरी त्यांची मैत्री टिकून राहते. करियरच्या सर्वस्वी दोन वेगळ्या वाटा निवडल्यामुळे ते एकमेकांपासून कधी दूर राहतात तर कधी एकाच शहरात. आदी व्यवसायात उतरतो तर राधा समाजकार्यात. पुढे असे काही जीवावर उठणारे प्रसंग घडतात की त्यात ते एकेमकांना साथ देतात. दोघांच्या आयुष्यात प्रेमाचे त्रिकोण येतात. अश्याप्रकारे परिस्थितीच्या वर-खाली होण्याबरोबरच त्यांचे संबंध वर-खाली होतात. लहानग्या मुलांच्या मैत्री पासून प्रौढांचा परस्परांचा आहे तसा स्वीकार कारण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. 

ह्याहून जास्त काही सांगणं म्हणजे भावी वाचकांचा रसभंग होईल. पण साधारण बॉलिवूड पिक्चर मधल्या मसाल्यासारखे नेहमीचे प्रसंग यात आहेत. आदी बद्दल निवेदक सांगतो तर राधा तिच्या डायरीत आपलं मन मोकळं करतेय असं दाखवलं आहे. पण यामुळे कादंबरीच्या प्रवाहात काही फरक पडत नाही. पात्र आणि त्यांचं वागणं मनाची पकड घेत नाहीत. "लव्ह at फर्स्ट साईट" झाल्यामुळे पुढे काही झालं तरी ते एकत्र येत राहतायत असंच वाटत राहतं. आदी शिकायला परदेशात जातो; परत आल्यावर " कल से मैं पापा का ऑफिस जॉइन करूँगा" असं म्हणत बिझनेस मध्ये उतरतो. पण सगळं लक्ष प्रेमावर. बाकी सगळंच अगदी सहज चित्रपटांसारखं.

राधा आणि आदी ह्या दोन मुख्य पात्रांशिवाय बाकी कोणाची मनोभूमिका मांडलेली नाही.

पुस्तकात नाट्यमय प्रसंग आहेत पण काहीतरी नाट्य आणायचं म्हणून आल्यासारखे वाटतात. पुस्तक वाचताना मजा आली नाही. सुरुवातीला सविस्तर पानं वाचली आणि फक्त पुढे काय झालं ह्यावर नजर टाकत पुस्तक संपवलं. 

आदीची तरुण बहीण एकदा घरातून निघून जाते. आदी आणि राधा तिला शोधायला जातात तो प्रसंग 



आता आपलं नातं तुटलं असं दोघांना वाटायला लागतं तेव्हाचा प्रसंग 


पुस्तकातलं इंग्रजी चांगलं सोपं आहे. ओढूनताणून क्लिष्ट भारतीय-इंग्रजी नाही. मराठी लेखक असल्यामुळे पात्रांची मराठी नावं आहेत. इंग्रजी वाक्यांमध्ये "aai", "baba" असे शब्द घालून मराठीपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे सुद्धा टिपकल हिंदी चित्रपटांसारखं. उद्योगपती अंबानी, लवासा प्रकरण यांच्याशी साधर्म्य साधणारी वर्णनं आहेत. पण ते तेवढंच. खऱ्या घटनांवर आधारित नाही.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-


खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...