पुस्तक - Humorously yours - tales from the Gymkhana (ह्यूमरसली युअर्स)
लेखक - Amitabh D Sarwate (अमिताभ सरवटे)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १३३
ISBN - 978-93-89624-49-6
लेखक - Amitabh D Sarwate (अमिताभ सरवटे)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १३३
ISBN - 978-93-89624-49-6
हे पुस्तक वाचनालयात बघितल्यावर ह्या पुस्तकाने माझं लक्ष वेधून घेतलं. पुढचं-मागचं कार्टून, पुण्याच्या डेक्कन जिमखान्याचा उल्लेख, पी.जी. वुडहाऊस ह्यांच्या शैलीचा उल्लेख, सरवटे हे लेखकाचं आडनाव (माझ्या उत्साही वाचनप्रेमी नातेवाईकाचं आडनाव), त्यातही अमिताभ हे नाव आणि माझ्या सारख्या आय.टी.त काम करणारा लेखक ..अश्या माझ्या ओळखीच्या खुणा सापडल्या. एक धमाल विनोदी किंवा कमीतकमी हलकं फुलकं काही वाचायला मिळेल अशी खात्री वाटली.
त्याचप्रमाणे हे पुस्तक आहे. पुण्याच्या पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यात येणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांचे किस्से "बरखुरदार" नावाची व्यक्ती सांगते आहे, असं पुस्तकाचं स्वरूप आहे. प्रत्येक किस्सा, कथा वेगळी आहे. त्यामुळे एका अर्थी हा विनोदी, मनोरंजक गोष्टी असलेला कथा संग्रह आहे.
लेखकाची माहिती
ज्यांनी डेक्कन जिमखाना हे नाव ऐकलं नसेल त्यांच्यासाठी पुस्तकाच्या प्रस्तावनेत डेक्कन जिमखान्याची ओळख अशी करून दिली आहे.
अनुक्रमणिका
गोष्टी खूप मोठ्या नाहीत आणि कथाबीज लहान आहे. त्यामुळे गोष्टींबद्दल जास्त सांगणं म्हणजे गोष्ट सांगितल्यासारखंच होईल. त्यामुळे थोडक्यात, अंदाज येईल असं पण रसभंग होणार नाही अश्या पद्धतीने गोष्टींची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो.
The Elephant - पुण्यातल्या एका मोठ्या कंपनीचा परदेशी मालक पुण्यात येणार असतो. त्याचं स्वागत कसं करायचं ह्याचा विचार इथले कर्मचारी करतात आणि हत्तीकडून स्वागत करून घ्यायचं ठरतं. हा बेत पुढे कसा जातो? काय गोंधळ उडतो का? त्याची गंमत.
Federer - एका टेनिसपटू ला दुखापतीमुळे आपला खेळ सोडून द्यायची वेळ येते. पण असे काय प्रसंग घडतात की थेट रॉजर फेडरर कडून तिला प्रोत्साहन मिळतं ?
Arranged Marriage - एका वेल सेटल्ड NRI मुलाच्या वधुसंशोधनासाठीची त्याच्या घरच्यांची गडबड आणि अनपेक्षित लग्न ठरणे.
Swami's Paduka - साध्या माणसाने पायात घातली तर जी ठरते चप्पल, तीच मोठ्या माणसाने घातली तर ठरते पादुका? पण जिला पादुका म्हणून पूजायची ती दुसऱ्याच कोणाची निघाली तर ?? असा गडबडगुंडा मांडणारी गोष्ट.
Lottery - लॉटरी लागून अचानक धनलाभ व्हावा असं कोणाला नाही वाटणार? अश्या धनालाभासाठी नशिबावर न विसंबता उलटसुलट उपद्व्याप करून लॉटरी मिळवण्याचे मजेशीर प्रयत्न.
Parvati - एका गायीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा वापर तिथे उपस्थित असलेले लोक आपापल्या फायद्यासाठी कसा करतात त्याची मजा. पोलीस हवालदार, स्थानिक गावगुंड नेता, पर्यटक मार्गदर्शक अशी बरीच पात्रं आहेत.
Tagore's thief - काही वर्षांपूर्वी रवींद्रनाथ टागोर यांचे नोबेल पारितोषिक चोरीला गेले होते. त्यावर बेतलेली ही गोष्ट आहे. चोर निवेदकाला भेटतो आणि आपली चोरी कबूल करतो आणि पोलिसांनाही जमलं नसतं तो शोध अनपेक्षितपणे लागतो.
Operation Ulta - राजकारण सुधारायला गेला आणि स्वतःच बिघडला या मध्यवर्ती कल्पनेवरची गोष्ट
The Butka - तरणातलावावर भेटणाऱ्या दोन मित्रांची पाण्यात "मुटका" पद्धतीने पाण्यात उडी मारण्यावरून पैज लागते. हळूहळू या पैजेची स्पर्धाच होते. शेवटी बक्षिसाचे पैसे कोणाला मिळतात ? जो जिंकेल असं वाटलेलं त्याला; का आणि कोणालाच. प्रसंगातून उलगडत जाणारी ही मजेशीर गोष्ट आहे.
The False Kings एक नेहमीचा उद्योगपती. पण त्याच्या डोक्यात वेगळेच उद्योग येतात. मी राजवंशातला आहे, अशी कंडी तो पिकवून देतो. त्याला "चोरावर मोर" भेटतो. आणि तोतयाची उडते तारांबळ.
Goofball - "देव तारी त्याला कोण मारी" ही उक्ती अगदी महत्त्वाच्या प्रसंगी घडली तर काय धमाल. लग्न, जॉब ह्या आयुष्यातल्या अपेक्षित अनपेक्षित सुखद धक्के बसले तर... त्याची ही गोष्ट
एकदोन पानं उदाहरणार्थ देतो म्हणजे लेखकाच्या शैलीची कल्पना येईल
"Arranged Marriage" गोष्टीतील वधूवर मेळाव्याचा प्रसंग


"Goofball" गोष्टीतील नायकाला अचानक मुलगी पटते तो प्रसंग


पुस्तकाच्या नावात पुण्याचा जिमखाना असला तरी गोष्टींमध्ये जिमखाना किंवा पुणेरीपण नाही. म्हणजे गोष्टींची सुरुवात जिमखान्यातल्या दोस्तांच्या गप्पांनी होत असली तरी मुख्य प्रसंग जिमखान्याबाहेरच घडतात. गोष्टी कुठल्यातरी शहरात घडणार म्हणून त्या इथे पुण्यात घडतात. पण त्यात "पुणेरी पुणेपण" असं नाहीये. त्या भारतातल्या कुठल्याही शहरात घडलेल्या दाखवल्या तरी फरक पडणार नाही. वाचताना हा थोडासा भ्रमनिरास झाला माझा.
लोकांच्या संवादात मध्येच हिंदी शब्द घातलेत आणि त्यांचा इंग्रजी अर्थसुद्धा लगेच दिला आहे. हिंदीऐवजी मराठी शब्द घातले असते तर थोडं पुणेरीपण आलं असतं. गोष्टी भारतीय मातीतल्या आहेत तरी इंग्रजी मध्ये अगदी सहज आल्या आहेत. लेखकाची ही भाषाशैली भावली. तरी ह्याच गोष्टी मराठीत अजून खुलवून लिहिता आल्या असत्या का असा विचार मनात आला.
गोष्टी छोट्या आहेत, विनाकारण पाल्हाळ लावलेला नाही. कधी कधी शाब्दिक कोट्या करायचा प्रयत्न केला आहे. पण एकूण भर प्रसंगातून विनोदनिर्मितीवर आहे. खूप खळखळून हसायला आलं असे मोजकेच वेळा झालं. बाकीच्या वेळी हसू नाही पण कंटाळाही नाही. प्रचंड उत्सुकता वाटत नाही आणि तरी पुढे वाचत राहावंसं वाटतं. त्यामुळे हलक्या फुलक्या, मनोरंजक गोष्टी असं मी म्हणेन.
लेखकाकडून असं अजून छान वाचायला मिळेल अशी अपेक्षा वाटते. विशेषतः त्यांनी आय.टी. मधल्या लोकांच्या अनुभवांवर असं काहीतरी लिहिलं तर मजा येईल वाचायला.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment