मध्यरात्रीनंतरचे तास (Madhyaratrinantarache Tas)






पुस्तक - मध्यरात्रीनंतरचे तास (Madhyaratrinantarache Tas)
लेखिका - सलमा (Salma)
मराठी अनुवाद - सोनाली नवांगुळ (Sonali Navangul)
पाने - ५६१
मूळ पुस्तक - இரண்டாம் ஜாமங்களின் கதை ( इरंडाम् जामंगळीन् कदै)
मूळ पुस्तकाची भाषा - तमिळ
इंग्रजी अनुवाद - The hour past midnight (द अवर पास्ट मिडनाईट)
ISBN - 978-93-83850-92-1

तमिळ लेखिका सलमा ह्यांनी तामिळनाडूमधल्या मुस्लिम समाजातील महिलांच्या स्थितीवर ही कादंबरी लिहिली आहे. सोनाली नवांगुळ यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. ह्या अनुवादाला नुकताच मराठी अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यामुळे हे पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली.

स्त्रीचं समाजातलं कार्यक्षेत्र म्हणजे, "फक्त चूल आणि मूल"; हा एकूणच जागतिक समज. प्रबोधनाच्या, समाजसुधारणेच्या ज्या टप्प्यावर एखादा देश, एखादा धार्मिक समाज असेल त्या टप्प्यानुसार या धारणेत कमी-अधिक शिथीलता येते. त्यानुसार मुलींना शिक्षणाचं, व्यवसायाचं, जोडीदार निवडण्याचं, कुठले कपडे घालायचे याचं, काय भाषा बोलायची, कोणाशी भेटायचं याचं स्वातंत्र्य मिळतं किंवा त्यावर नियंत्रण घातलं जातं. मुस्लिम समाज या बाबतीत अजूनही बराच मागासलेला आणि बंदिस्त आहे. या बंदीस्ततेमुळे मुसलमान स्त्रियांची जी कुचंबणा होते आणि त्यातून शारीरिक, मानसिक व लैंगिक भावनांचा जो विस्फोट होतो त्याचं समाजचित्र एक मुस्लीम महिलाच आपल्या समोर उभं करत आहे.

पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती 

पुस्तकात दिलेली अनुवादिकेची माहिती 

मुलगी वयात आली की तिने घराबाहेर पाऊल ठेवायला बंदी. सगळ्या वस्त्रांमध्ये लपेटून घरच्या लोकांबरोबरच अगदी जवळपासच्या घरी किंवा नातेवाईकांकडे फक्त ये
णंजाणं. लग्न सुद्धा नात्यागोत्यातच. साटंलोटं. चुलत भावाशी, मावस भावाशी लग्न. मुलीच्या जन्मापासूनच किंवा मुलगी लहान असतानाच मोठ्या माणसांनी ठरवायचं की माझी मुलगी माझ्या बहिणीच्या मुलाला किंवा माझ्या भावाच्या मुलाला देणार. पुढे ती मुलगी किंवा तो मुलगा कसे निघतात; त्यांची एकमेकांची आवड निवड ह्याचा काही संबंध नाही. कारण लग्न आवडी-निवडी साठी नाही तर पुरुषाच्या सुखासाठी आणि मुलं पैदा करण्यासाठी आहे एवढंच ! लग्न आपल्या आपल्यातच झालं तर संपत्ती, पैसा त्याची फाटाफूट होणार नाही. ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात असंच होत राहील.
लग्न झालं रे झालं की गर्भधारणा होते का नाही याची सर्वांना घाई. त्यात जरा काही चूक झाली की दोन्ही घरचे लोक बोलायला तयार. आणि पुरुष दुसरं लग्न करायला मोकळा. कारण शरीयतनेच चार लग्नांना परवानगी दिलेली आहे. एकदा मुलं झाली; बायका (खरं म्हणजे अल्पवयीन मुलीच) संसाराच्या गाड्याला बांधल्या गेल्या; त्यांच्याकडून मिळणारी मजा पुरुषाला मिळेनाशी झाली की तो बाहेरख्यालीपणा करायलाही मोकळा. त्याचं उघड-उघड कुणी कौतुक करणार नाही पण; "पुरुषच आहे तो. तो तसाच वागणार" असं लंगडं समर्थन मात्र प्रत्येक जण करेल. कामानिमित्त माणूस परदेशी गेला असेल तर; "पुरुष तिथे एकटा कसा राहणार? स्वतःची हौस त्याला भागवायला नको का?" म्हणून तिकडे त्याने काही धंदे केले तरी ते बायकोने समजून घेतलेच पाहिजे ही अपेक्षा. पण याच शारीरिक गरजा जेव्हा एका महिलेच्या असतात तेव्हा मात्र तिच्याकडे असा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. मग विधवा, परित्यक्ता, जरठ-कुमारी विवाह झालेल्या, नवऱ्याशी न पटणाऱ्या किंवा वर्षानुवर्ष नवरा परदेशी असणाऱ्या बायका जमेल त्या पुरुषाशी संबंध ठेवून आपली शारीरिक भूक भागवून घेतात. हे जेव्हा समजतं तेव्हा बाईला सरळ विष देऊन मारणं; तिच्या कुटुंबीयांना समाजाबाहेर काढणं किंवा जबरदस्ती गर्भपात करून हे सर्व प्रकार घडतात. समाजाला विरोध करत असे प्रकार करणाऱ्या बाईला सरळ वेश्येचा दर्जा देऊन छि थू करणं घडतं.

अश्या नाना प्रसंगांनी भरलेली ही कादंबरी आहे. या कादंबरीत एकच एक असं कथासूत्र नाही. तर चार-पाच कुटुंबाच्या दोन तीन पिढ्यात घडलेल्या घटनांमधून हे सगळे प्रकार लेखिकेने मांडले आहेत. काही घटना सध्या घडतात काही घटना पात्रांच्या आठवणीतून जाग्या होतात.

बालविवाह झालेली मैमून नवऱ्याकडे नांदायला तयार नव्हती. पण पोटात गर्भधारणा झालेली. अश्या अवस्थेतून तिला बाहेर काढण्यासाठी गावठी पद्धतीने गर्भपात घडवून आणला जातो तो प्रसंग 





घरात दोन पिढ्या घडलेल्या वाईट घटनांमुळे घाबरलेली जोहरा आपल्या मुलीची -राबियाची - शाळा बंद करते तो प्रसंग








एका मर्तिकाच्या प्रसंगाच्या वेळी भेटलेल्या बायका एकमेकींशी गप्पा मारतायत. पण विषय नेहमीचाच "विषयवासनांचा". 





पुस्तक ५६१ पानी आहे. प्रसंगांमगून प्रसंग येत असतात. पण ह्यात कथासूत्र नसल्यामुळे एक विस्कळीतपणा जाणवतो. पुढे काय घडतंय हे वाचायची उत्सुकता जाणवत नाही. जरा रेटत रेटतच वाचावं लागतं. जास्तीत जास्त प्रकारच्या समस्या मांडता यावयात ह्यासाठी 3-4 कुटुंबात सगळ्या समस्या दाखवल्या आहेत. एकही सरळमार्गी कुटुंब नाही, एकही व्यक्ती शुद्ध चारित्र्याची वाटत नाही; हे जरा अतीच होतं. पुस्तक बरंच लांबलंय त्यामुळे काही तपशील गाळून पुढे वाचावं लागतं नाहीतर कंटाळा येतो.

मूळ पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचा हा मराठी अनुवाद आहे. अनुवाद छान, सरळ आणि ओघवता झाला आहे. पुस्तकाचा आशय तितक्याच ताकदीने मराठीत आणला आहे .पण इंग्रजी भाषांतरात काही तमिळ शब्द तसेच ठेवले असतील ते मराठीत आणताना मात्र भयानक चुका झाल्या आहेत. मला स्वतः ला प्राथमिक तमिळ लिहिता-वाचता-बोलता येतं (मला तमिळ बोलताना ह्या व्हिडिओत बघू शकाल https://www.youtube.com/watch?v=hNTuNy-AgMk ) त्यामुळे तमिळ शब्द आला आला की माझी उत्सुकता चाळवायची आणि बरेच घोळ दिसायचे.
सुरुवात पहिल्या पानापासून झाली आहे. ज्या पुस्तकाचं भाषांतर केलंय त्या पुस्तकाचं नाव सुद्धा बरोबर लिहिलेलं नाही. "इरंधम जामथिन कधाई" लिहिलंय. ते खरं "इरंडाम् जामंगळीन् कदै" असं आहे.

तमिळमध्ये थ, ध,ठ, ढ हे वर्ण नाहीत. त्यामुळे तमिळ शब्द इंग्रजीत लिहिताना 
त = th
ट = t 
ड dh
द = d   
वापरतात. ते समजून न घेतल्यामुळे खूप चुका आहेत. 

तमिळ शब्द -தாத்தா इंग्रजीत - Thaththa पुस्तकात - थथ्था. योग्य लेखन "तात्ता"
तमिळ शब्द -பாவாடை इंग्रजीत - pavadai पुस्तकात - पावादाई. योग्य लेखन "पावाडै"


पुस्तकात एक उल्लेख सारखा येतो. "उपास सोडण्यासाठी मशिदीतून निंबू-कांजी आणली". हा काय प्रकार आहे कळलं नाही. तमिळ मध्ये निंबू म्हणत नाहीत. मग नेट वर शोधल्यावर कळलं की तो நோன்பு கஞ்சி नोन्बु कंजी असा शब्द आहे. नोन्बु म्हणजे उपास. तर कंजी हा दाल-खिचडी सारखा पदार्थ आहे.

एखाद्या मुलीशी बोलताना आपण "काय गं", "कुठे गं" असं म्हणतो. म्हणजे शब्दाला "गं" जोडतो तर मुलासाठी आपण "रे" जोडतो. "काय रे", "कुठे रे". तसं तमिळ मध्ये मुलीसाठी "मा" जोडतात, मोठ्या पुरुषासाठी "पा" तर मुलासाठी "डा" जोडतात.

"एन्नम्मा", "एन्नडा", "एन्नप्पा" असे शब्द तयार होतात.  पण पुस्तकात मराठीत लिहिताना ते अम्मा ,अप्पा असं लिहिलंय. तमिळ मध्ये अम्मा म्हणजे आई तर अप्पा म्हणजे वडील. त्यामुळे अर्थाची वाट लागते.

तमिळ मधले नातेवाचक शब्द उदा. पेरियम्मा, चित्ती इ. शब्द तसेच ठेवलेत(तेही चुकीच्या उच्चारात). पण त्यामुळे मराठी वाचकाला दोन पत्रांमधलं नातं काय हे समजत नाही. गोंधळ होतो. तमिळ शब्द पहिल्यांदा वापरला तिथे तळटीप द्यायला हवी होती अथवा "मावशी, काकू" असे सरळ मराठी शब्द वापरायचे.

मुसलमानी धार्मिक शब्द चुकिचे लिहिलेले दिसले. "लेलाथूल कद्र ची रात्र" असा उल्लेख आहे. तो "लैलत अल- क़द्र" असा पाहिजे. 

नमाज़ -ए-फ़ज्र ला "बजरची नमाज"; 
नमाज-ए-ज़ुहर ला "लुहूर नमाज" असं लिहिलंय. 

अनुवादिका, संपादिका किंवा मुद्रितशोधकाने एखाद्या तामिळ माणसाला आणि मुस्लिम माणसाला हे शब्द दाखवून खात्री करून घ्यायला हवी होती. आता "साहित्य अकादमी" मिळाल्यावर पुढची आवृत्तीत तरी हे दोष काढून टाकले पाहिजेत.

असो ! मुसलमान स्त्रीने आपल्या समाजाला आरसा दाखवायचं धाडस दाखवलं आणि सगळ्यांना ही काळी बाजू दाखवून समाजजागृतीला हातभार लावला हे ऐतिहासिक आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचं आहे. 

सध्या "लव्ह जिहाद" ची चर्चा होत असते. मुस्लिम समाजाचं खरं चित्र दाखवणऱ्या पुस्तकांचं वाचन मुलामुलींनी करणं आवश्यक आहे. आपण केवळ एका व्यक्तीशी नाही तर कुटुंबाशी, समाजाशी संबंध जोडणार आहोत. त्यातल्या रूढीपरंपरांचं वास्तविक स्वरूप आपल्याला पटतंय का झेपतंय का, हा विचार त्यांच्या मनात नक्की येईल. मुस्लिम लोकसुद्धा स्वतःत आणि धर्मात बदल करायला पुढे आले तरच ह्या पुस्तकाचं चीज झालं असं म्हणता येईल.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

करुणाष्टक (Karunashtak)





पुस्तक - करुणाष्टक (Karunashtak)
लेखक - व्यंकटेश माडगूळकर (Vyankatesh Madgulkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १५८
ISBN - दिलेला नाही 
पहिली आवृत्ती - १९८२


करुणाष्टक ही स्वातंत्र्यपूर्व काळात घडणाऱ्या एका गरीब ब्राह्मण कुटुंबाची कहाणी आहे. ह्या कुटुंबातला एक मुलगा आठवणी सांगतो आहे. त्याच्या लहानपणापासूनच्या आठवणींपासून सुरुवात करून तो प्रौढ होऊन त्याची वृद्ध आई देवाघरी जाते तिथपर्यंतचा कालखंड आहे. ह्या आठवणी पूर्णपणे कौटुंबिक आहेत. आई, वडील, आजी आणि दोनतीन मुलांचं कुटुंब एका खेडेगावात राहत असतं. वडील कारकून. परिस्थिती बेताचीच. नव्या गावी बदली होते. मग तिथे नवीन बिऱ्हाड वसवतात. मग जे घरगुती प्रसंग घडू शकतील ते घडत राहतात. नवं घर काही सोयीचं नसतं त्यामुळे दुरून पाणी आणावं लागणं, सागळी कामं स्वतः करावी लागतात. नव्या शेजाऱ्यांशी ओळख, मुलांची आजारपणं, नव्या भावंडांचे जन्म आणि जुन्यांचे मृत्यू हे प्रसंग आहेत.

गरिबीमुळे घडू शकणारे प्रसंग येतातच - पैशाच्या ओढाताणीमुळे मोठ्या मुलाला वसतिगृहात जावं लागणं, दुसऱ्याला शिक्षण लवकर पूर्ण करून नोकरीला लागावं लागणं वगैरे होतं.

गरिबीच्या जोडीला दुर्दैव सुद्धा ह्या कुटुंबाच्या पाचवीलाच पुजलेलं. त्यामुळे चोरीचा आळ येण्याची शक्यता, मोठ्या मुलीची लग्न लवकर न जुळणं. मुलांची जुळली तर सुनांशी खटके उडणं, मुलांना धंद्यात खोत येऊन वडिलोपार्जित संपत्ती विकायला लागणं आणि अगदी शेवटी वृद्धापकाळी मुलांचे मृत्यू !!

काही पानं वाचा
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)
नवरा परगावी गेल्यावर खायचे-प्यायचे वांदे झाल्यावर एका भिक्षेकऱ्याकडून भिक्षा मागण्याची वेळ :(




कादंबरीतला एकमेव बरा प्रसंग. नोकरीचा भाग म्हणून संस्थानच्या देवस्थानच्या खजिन्याची जबाबदारी मिळते तेव्हा काही चांगले दिवस येतात. मग पुन्हा बदली आणि ये रे माझ्या मागल्या !



गांधी हत्येनंतर गांधींच्या "अहिंसक" अनुयायायांनी  महाराष्ट्रभर ब्राह्मणविरोधी दंगली केल्या. ब्राह्मणांची घरं जाळली, हत्या झाल्या. त्या आगीत हे कुटुंबसुद्धा पडलं.  काहीतरी किडूकमिडूक जमा करून उभारलेला संसार सुद्धा दंगलखोरांनी जाळून टाकला.




पुस्तकात लेखकाने काढलेली पात्रांची रेखाचित्र आहेत. वृद्ध आईचं हे चित्र


तुमच्या लक्षात आलं असेल की हे पुस्तक करुणा "अष्टक" नाही तर करुणा सहस्रनाम आहे ! हे व्यंकटेश माडगूळकरांचं खरं आयुष्य आहे का खऱ्या आयुष्यावर आधारित पण काल्पनिक कादंबरी आहे कल्पना नाही. पुस्तकात तसं काही स्पष्ट केलेलं नाही. पण कदाचित आधारित तरी असावी. कारण औंध संस्थानाप्रमाणे वातावरण, गांधीहत्येनंतर घराची जाळपोळ हे त्यांच्या खऱ्या आयुष्याशी जुळतंय. मोठ्या भावाचे उल्लेख येतात - तो कवी गीतकार होता, रामची गीते लिहिली, शेवटी कर्करोगाने त्यांचं निधन झालं - ह्यावरून हे ग.दि.मा. बद्दल लिहिलंय हे स्पष्ट होतं.
(ज्यांना कोणाला पुस्तकाबद्दल खरं माहिती असेल त्यांनी सांगावं )

जर हे खरं असेल तर फारच वाईट आयुष्य लेखकाच्या, कुटुंबाच्या आणि त्यांच्या आईच्या वाट्याला आलं. तरीही ह्या दोन बंधूंनी जे कर्तृत्व दाखवलं त्याचं नवलच वाटेल.

पण हे पुस्तक काल्पनिक असेल तर खरंच विषण्ण करणारं पुस्तक आहे. पुस्तक वाचताना कंटाळवाणं होत नाही पण एकसुरी नक्कीच होतं. म्हणजे सगळ्यांचं सगळं वाईटच होणार आहे हा "अजेंडा" कळाला की असं वाटतं की लेखक असा विचार करत असेल का - "हं आता आता यादीतील पुढचं संकट काय टाकू ? ... अरे अजून आत्महत्त्या घेतली नाही. ह्या पात्राला तसं मारतो... ह्या पात्राचं बरं चाललंय असं दाखवलं; ह्याला कर्जबाजारी करतो. ... त्याला वेडं करतो ..."

मला हे वाचताना "पथेर पांचाली" ची आठवण झाली त्याचं परीक्षण लिहिताना सुद्धा मी हेच लिहिलेलं "दुर्दैवाच्या दशावतारांची जंत्री असं कादंबरीचे स्वरूप वाटतं". जी.एंच्या काजळमाया पुस्तकाबद्दल सुद्धा असंच वाटलेलं.
( "
काजळमाया" चे परीक्षण http://learnmarathiwithkaushik.com/courses/kajalmaya
"पथेर पांचाली" चे परीक्षण http://learnmarathiwithkaushik.com/courses/pather-panchali )

ही पुस्तकं वाचून तत्कालीन मध्यमवर्गीय समाजाचं रूप डोळ्यासमोर असंच उभं राहतं की दारिद्र्यात जगणं; तरी पोरांचं लेंढार तयार करणं आणि ते सांभाळता सांभाळता पिचून जाणं; मग मोठ्या मुलाने आपल्या वडिलांचं लेंढार सांभाळत स्वतःच लेंढार तयार करून समस्या दहापट वाढवणं. र.धो. कर्व्यांसारख्या संततीनियमनाचा प्रसार करणाऱ्या विभूतीची त्याकाळी आणि आजही गरीब समाजाला किती आवश्यकता आहे हेच ह्यातून अधोरेखित होतं.

दुसरं एक म्हणजे सध्याच्या जातीयवादी राजकारणाच्या जमान्यात ब्राह्मण समाज, सवर्ण समाज म्हणजे शोषक; सत्ता-श्रीमंती उपभोगणारा असं वर्णन केलं जातं. पण हा वर्गसुद्धा गरीबच होता आणि परिस्थितीशी झुंजत होता हे वास्तव लख्ख दिसतं. त्यामुळे हे "दलित साहित्य" नसलं तरी दाहकच आहे.

तर असं पुस्तक आहे. तुम्ही ह्या पद्धतीचं लेखन आधी नसेल वाचलं तर वाचा. जर असं लेखन वाचलं असेल तर वाचनातून खूप काही हाती लागलं असं वाटणार नाही.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ब्राह्मोस Brahmos

 




पुस्तक - ब्राह्मोस (Brahmos)
लेखक - ए. शिवतनू पिल्लई (A. Sivathanu Pillai)
भाषा - मराठी (Marathi)
अनुवादक - अभय सदावर्ते (Abhay Sadavarte)
पाने - ३२३
मूळ पुस्तक - Brahmos
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी
ISBN - 978-93-90324-29-3


"ब्राह्मोस" हे भारतात तयार झालेलं अतिशय आधुनिक क्षेपणास्त्र आहे. आपल्या लक्ष्यावर अचूक आघात करणारे, ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे, जगातले सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र ! ह्या क्षेपणास्त्रापेक्षा चांगलं क्षेपणास्त्र कुठल्याही देशात नाही. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पातून हे विकसित झालं. ह्या प्रकल्पाचे प्रमुख ए. शिवतनू पिल्लई यांनी ह्या "ब्राह्मोस" च्या जन्माची आणि त्याच्या विकासाची अतिशय सविस्तर माहिती देणारं हे पुस्तक लिहिलं आहे. इंग्रजीमध्ये म्हणतात तसं "फ्रॉम हॉर्स'स माऊथ" ही थरारक तंत्रकहाणी आपल्याला वाचायला मिळते. लेखक आपल्या मनोगतात म्हणतात की, भारताला हजारो वर्षांपासून विज्ञान-तंत्रज्ञान मोठी परंपरा आहे. पण दस्तऐवजीकरण न करण्याची प्रवृत्ती, त्यात झालेली हयगय आणि परकीय आक्रमणांमुळे झालेला विध्वंस, लूट यामुळे आपल्या हातात त्या सुवर्णकाळाचे तपशीलवार ज्ञान नाही. यापुढे तरी भारतीयांनी अशी हयगय करू नये. ह्यादिशेने एक पाऊल म्हणून "ब्राह्मोस" सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाबद्दल त्यांनी स्वतः सविस्तर लिहिले आहे. श्री. अभय सदावर्ते आणि राजहंस प्रकाशन यांनी हे ज्ञान मराठीत आणून लेखकाच्या प्रामाणिक प्रयत्नांना बळ दिलं आहे.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


अनुक्रमणिका




मिसाईल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील अंश. ब्राह्मोसचं सामरिक आणि भावनिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे.


पुस्तकात सुरवातीला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांत आपल्याला सामोरे जावे लागलेल्या युद्धांचा गोषवारा घेतलाय. एकूणच जगात चालणारी युद्ध, त्यात होणारा क्षेपणास्त्रांचा वापर, भारताची पिछाडी आणि आयातीवर अवलंबित्त्व, काही फसलेले संशोधन प्रकल्प ह्याचा आढावा घेतलाय. त्यातून एका अद्ययावत क्षेपणास्त्राची गरज अधोरेखित केली आहे.

उदा.  अमेरिकेने तंत्रज्ञान द्यायला नकार दिल्याने भारताला स्वतःला एक महासंगणक बनवावा लागला तो प्रसंग 




पिल्लई ह्यांच्या रशियन शास्त्रज्ञांशी संवादात, आपल्याला ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे त्याचा काहीभाग रशियाकडून घेता येऊ शकतो अशी शक्यता दिसली. तिथून ह्या प्रकल्पाचे बीजारोपण झाले. मग दोन्हीकडचे शास्त्रज्ञ, राजकारणी, नोकरशहा आणि कायदेकानू ह्यांच्या चर्चांच्या अनेक फैरी झाडल्या. एक नवीन कंपनी रजिस्टर झाली ब्राह्मोस नावाने. भारतीय सरकारी गुंतवणुकीतून तरीही ५०.५०% ठेवून ही "खासगी" कंपनी वर्गात मोडली जाते. ज्यातून "सरकारी कंपनी"मधला बोजडपणा टाळता आला. ही प्रक्रिया, त्यावेळच्या राजकारण्यांचा सकारात्मक प्रतिसाद, ब्राह्मोस हे नाव कसं आलं, गोपनीयता कशी पाळली गेली हा रोचक इतिहास ह्यात आहे.

आत्ता पर्यंत आपण पुस्तकाच्या विषयवस्तूच्या इतिहास, भूगोलात होतो. पुढच्या प्रकरणांत आपण खऱ्या अर्थाने ब्राह्मोसच्या अंतरंगात प्रवेश करतो. ब्राह्मोस मध्ये काय तंत्रज्ञान वापरलं आहे, कुठल्या वैज्ञानिक तत्वांवर ते चालतं, त्यातलं इंजिन कसं चालतं, सेन्सर वापरून क्षेपणास्त्राचा मार्ग कसा निश्चित केला जातो, अत्युच्च तापमान सहन करण्यासाठी कुठले पदार्थ वापरले आहेत इ. बरंच ह्या पुस्तकात आहे.

उदा. ब्राह्मोसच्या अंतर्गत रचनेबद्दल 




ब्राह्मोसच्या वैशिष्ट्यांबद्दल 





पुढे ब्राह्मोसच्या चाचण्या घेतल्या गेल्या त्यात आलेलं यशापयश, झालेली टीका त्यातून ह्या टीमचं सावरणं, चाचण्या घेताना निसर्गसुद्धा कशी परीक्षा घेत होता ह्याचे थरारक अनुभव आहेत.





ब्राह्मोस मुळे अत्याधुनिक क्षेपणास्त्र तर मिळालंच पण दोन देशांमधल्या सहकार्याचे नवे प्रारूप जगासमोर आले. भारताला नवे तंत्रज्ञान मिळाले. एकमेकांची कार्यपद्धती शिकता आली. 
सरकारी कंपनी नसल्यामुळे इतर खासगी उद्योजकांकडून आवश्यक ते सुटे भाग आणि पदार्थ घेणं सोपं झालं ज्यामुळे उद्योगांची मोठी परिसंस्था तयार झाली. प्रकल्पाचे हे अप्रत्यक्ष फायदे सुद्धा समजावून सांगितले आहेत.

सहकार्य दोन देशांमधलं म्हणजे शेवटी दोन माणसांमधलं. भाषा, संस्कृती, खानपान आणि हवामान भिन्न असणाऱ्या लोकांमधलं. त्यामुळे काही अडचणी निर्माण होणारच, त्याच्या दोनतीन गमतीजमती दिल्या आहेत. उदा. 
       



इतकं सगळं वाचल्यावर जिज्ञासू वाचकाच्या मनात, आता पुढे काय? हा प्रश्न नक्कीच येईल हे ताडून ब्राह्मोस मध्ये काय तंत्रसुधारण होणं अपेक्षित किंवा कल्पित आहे हे शेवटच्या प्रकरणात आहे.

अश्याप्रकारे ब्राह्मोसपूर्वी, ब्राह्मोस तयार होताना आणि इथून पुढे असा भूत-वर्तमान-भविष्य काळांत आपण सफर करतो. 

एखादी गोष्ट खूप कठीण नाही असं सांगायचं असेल तर आपण म्हणतो, "It is not that difficult. It is not a rocket science !" थोडक्यात "रॉकेट सायन्स" म्हणजे क्लिष्टतेची परमावधी. आता पुस्तकाचा विषयच तो आहे म्हटल्यावर त्यातले तपशील क्लिष्ट असणारच. लेखकाने तो सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे. पण कुठल्याही आकृत्या, तक्ते नसल्यामुळे ते समजणं कठीणच जातं. पुस्तकात खूप तांत्रिक संज्ञा, लघुरूपे, आराखडे येतात. त्याच्या भडिमारामुळे तपशील लक्षात राहत नाही. केवळ गोषवारा लक्षात राहतो. हा भाग थोडा कमी आणि आकृत्यांच्या आधारे थोडा सोपा करायला हवा होता. 

पुस्तकात एकही फोटो नाही. ना लेखकाचा ना ब्राह्मोसचा. प्रकल्पाचा इतिहास मांडताना तेव्हाचे फोटो असणं आवश्यक होतं. ही मोठी उणीव आहे. 

पुस्तकात रशिया-भारत ह्यांच्यातील सहकार्य, ब्राह्मोसची वैशिष्टये आणि काही तांत्रिक तपशील इ. मुद्द्यांची पुनरुक्ती फार वेळा आहे. तो भाग जरा छाटायला हवा होता. 

पुस्तक खूप महत्त्वाचं आहे पण त्याची सोपी, सचित्र पण संक्षिप्त आवृत्ती यायला हवी असं वाटतं. जेणेकरून तंत्रज्ञानाशी फार संबंध नसलेल्या वाचकांना पचायला सोपं तरी महत्त्व अधोरेखित करणारं पुस्तक ठरेल. 

सध्यातरी जिज्ञासू वाचकांनी हे पुस्तक नक्की वाचावं. 

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

हिज डे (His day)





पुस्तक - हिज डे (His Day)
लेखिका - स्वाती चांदोरकर (Swati Chandorkar)
भाषा - मराठी  (Marathi)
पाने - २४१
ISBN - 9789386888594



"हिज डे". पुस्तकाच्या नावातल्या दोन शब्दांतली जागा काढली की झाला शब्द "हिजडे". हो, हे पुस्तक "हिजडे" अर्थात तृतीयपंथीयांवरचं आहे. रस्त्यावर, रेल्वे गाड्यांमध्ये भीक मागताना, टाळ्या वाजवताना किंवा शुभकार्याच्या प्रसंगी हक्काने पैसे मागणारे हे लोक आपण पाहिलेले असतात. त्यांच्या बद्दल भीती, किळस, कुतूहल, अनुकंपा अश्या कितीतरी वेगवेगळ्या भावना प्रत्येकाच्या मनात असतात. अश्या सगळ्या अनुभवांना सोबत घेत, कशालाही चूक ना ठरवता आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जाणारं; त्यांच्या भावना दाखवणारं हे पुस्तक आहे.

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती 




हेलिना नावाच्या एका कॉलेजयुवतीला बऱ्याच वर्षांनी आपली लहानपणीची मैत्रीण -चमेली - भेटते. तिला समजतं की ती इतके वर्ष संपर्कात नव्हती कारण तिचे वडील "ते" आहेत. आजपर्यंत तिने ह्या लोकांना लांबूनच बघितलेलं असतं पण मैत्रिणीमुळे तिला खरी खुरी माहिती कळू लागते. पुस्तकात कधी हेलिना निवेदक होते तर कधी चमेली. आपण सुद्धा चमेलीचं बोट धरून त्या वस्तीत जातो. त्यांची भाषा आपल्या कानावर पडते. अंगावर शहारे आणणारे हे प्रसंग दिसतात.

शरीर पुरुषाचं तरी मानाने स्वतःला स्त्री समजणारे हे लोक. वयात येताना जेव्हा एखाद्या मुलाला असं वाटू लागतं तेव्हा त्याच्या घरच्या लोकांना हे सत्य स्वीकारणं कठीणच. असे लोक मनाचा कोंडमारा सहन करत जगतात. पण कोणीतरी हिजड्यांच्या संपर्कात आले की स्त्री म्हणून जगण्याचा हा मार्ग कळतो. साडी नेसून, मेकअप करून बाई म्हणून वावरता येतं. ज्यांचं तेवढ्यावर भागत नाही ते करतात सरळ गावठी पद्धतीने लिंगच्छेद !! हिजड्यांच्या भाषेत "कत्लेआम". ४० दिवसांचा भयानक त्रासदायक काळ. मरणाच्या दारापर्यंत नेऊन आणणारा. पुस्तकात असे भयानक प्रसंग आपल्यासमोर लेखिकेने सांगितले आहेत. एकीकडे स्त्री म्हणून स्वतःच्या शरीरात होणारे बदल हेलिनाला जाणवत असतात; लग्न, मूल ह्या आयुष्य चांगल्याअर्थी बदलवून टाकणाऱ्या घटना तिच्या आयुष्यात घडतात पण ज्यांच्या नशीबात हे सुख नाही यांच्यातला तिचा वावर ह्याचे ताणेबाणे मांडत लेखिकेने दोन्ही बाजूंचा तोल साधला आहे 

हिजडे आपल्याआपल्यातच आई, बहीण, भाऊ अशी मानलेली नाती निर्माण करतात. त्यांची त्यांची गुरु परंपरा असते. गुरूला पैसे द्यावे लागतात. नवीन देवी देवता आणि त्यांचे उत्सव साजरे करणं होतं. पूर्वीचे हिंदू, पण हिजडे झाल्यावर मुसलमान गुरूमुळे मुसलमानी रिवाज पाळणारे असेही लोक असतात. हेलिना ह्या लोकांच्यात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करते. हेलिना आणि चमेलीला त्या वस्तीत भेटतात असेच नाना प्रकारचे लोक - एक हिजडा असून अनाथ मुलाचा सांभाळ करणारा रामसखा, शरीराने मुलगी पण मानाने स्वतःला मुलगा समजणारा सुक्की, जगात पुरुष पण फक्त "बधाई" मगण्यापुरतं आपल्यातलं स्त्रीत्व उघड करणारी हाला, हिजड्यांना लैंगिक रोगांपासून वाचवण्यासाठी निरोधाबाबत जागृती करणारी एक मोठी गुरू, प्रसंगी पोलिसांकडून सुद्धा लैंगिक अत्याचार सोसावे लागणारे गरीब हिजडे, तर श्रीमंत "क्लायंट" असणारे सुंदर हिजडे असे कितीतरी. 

हिजड्यांची दुर्दशा आणि त्यातही अंतरीचा जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामासखाबद्द्लचा एक प्रसंग
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)





एका पाठोपाठ एक प्रसंग विलक्षण प्रभावी पद्धतीने गुंफले आहेत. हिजड्यांच्या तोंडी त्यांचीच रांगडी भाषा संवादात वापरली आहे. सभ्य समाजासाठी जे अश्लील तेच ह्यांच्या अश्या जगण्याचं कारण आणि पोट भरण्याचं साधन. त्यामुळे नागवे सत्य मांडणारी नागवी भाषा.

हेलिनाला ह्या लोकांची , त्यांच्या भाषेची नव्यानेच ओळख होऊ लागते तेव्हाचा एक प्रसंग




चमेलीचा तिच्या वडिलांचा/आईचा हा संवाद आणि भिन्नलैंगिकतेबद्दल विचार करायला लावणारे हे स्वगत



एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून हेलिनाच्या मनाचा प्रवास माहिती, ओळख, सलगी अश्या टप्प्यांनी जातो. आपणही तो प्रवास करत असतो. पुस्तकाचा शेवट देखील तितकाच परिणामकारक आणि अंतर्मुख करणारा आहे.

सध्या एकूणच भिन्न लैंगिकतेचा स्वीकार करण्याच्या चळवळी सुरू आहेत. पूर्वी भारतीय समाजात तृतीयपंथीयांना योग्य स्थान होतं. ते भिकारी नव्हते. पण ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी पद्धतशीरपणे हा समाज तोडला असं पुस्तकाच्या ओघात आलं आहे. हिजडे हा शब्द सुद्धा "हिज डे " ह्या इंग्लिश वाक्यातून ब्रिटिश काळात तयार झालेला आहे असा एका हिजड्याच्या तोंडाचा संवाद आहे. पुस्तकातून आपली माहिती वाढते, जाण वाढते. आपण लगेच त्यांच्याशी अगदी खेळीमेळीने वागायला लागू असं नाही पण त्यांच्याकडे एक दुर्दैवी व्यक्ती म्हणून, जिच्याशी निसर्गाने वेगळाच खेळ खेळला आहे म्हणून थोड्या सहृदयतेने बघू शकतो.

पुस्तकाचे भाषा ओघवती आहे. पुस्तक फार झटाझट निवेदक बदलते. तिथे वाचताना क्षणभर अडखळल्यासारखं होत. पण नंतर नंतर लेखिकेच्या ह्या शैलीची सवय होते.

हिजड्यांबरोबरच समलैंगिकतेच्या प्रश्नालाही स्पर्श करायचा प्रयत्न केला आहे पण ते प्रसंग थोडे ओढून ताणून आल्यासारखे वाटतात. अन्यथा प्रसंगांची सुंदर गुंफण आहे. हे पुस्तक अनुवादित नाही तर मूळ मराठी आहे. मराठीत ह्या दर्जाचं मूळ लेखन करणाऱ्या स्वातीजींना आणि प्रकाशकांना प्रणाम.

आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत त्यांच्याकडे बघा म्हणजे आपल्याला काय काय नशिबाने मिळालं आहे ह्याची जाणीव होईल. अगदी देह-आणि-मन एकसारखं वागतंय ही सुद्धा किती मोठी देणगी आहे; असं वाटायला लावणारं हे पुस्तक आहे. 
थोडा धीर करा आणि आवर्जून वाचा.






———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...