मध्यरात्रीनंतरचे तास (Madhyaratrinantarache Tas)






पुस्तक - मध्यरात्रीनंतरचे तास (Madhyaratrinantarache Tas)
लेखिका - सलमा (Salma)
मराठी अनुवाद - सोनाली नवांगुळ (Sonali Navangul)
पाने - ५६१
मूळ पुस्तक - இரண்டாம் ஜாமங்களின் கதை ( इरंडाम् जामंगळीन् कदै)
मूळ पुस्तकाची भाषा - तमिळ
इंग्रजी अनुवाद - The hour past midnight (द अवर पास्ट मिडनाईट)
ISBN - 978-93-83850-92-1

तमिळ लेखिका सलमा ह्यांनी तामिळनाडूमधल्या मुस्लिम समाजातील महिलांच्या स्थितीवर ही कादंबरी लिहिली आहे. सोनाली नवांगुळ यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. ह्या अनुवादाला नुकताच मराठी अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यामुळे हे पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली.

स्त्रीचं समाजातलं कार्यक्षेत्र म्हणजे, "फक्त चूल आणि मूल"; हा एकूणच जागतिक समज. प्रबोधनाच्या, समाजसुधारणेच्या ज्या टप्प्यावर एखादा देश, एखादा धार्मिक समाज असेल त्या टप्प्यानुसार या धारणेत कमी-अधिक शिथीलता येते. त्यानुसार मुलींना शिक्षणाचं, व्यवसायाचं, जोडीदार निवडण्याचं, कुठले कपडे घालायचे याचं, काय भाषा बोलायची, कोणाशी भेटायचं याचं स्वातंत्र्य मिळतं किंवा त्यावर नियंत्रण घातलं जातं. मुस्लिम समाज या बाबतीत अजूनही बराच मागासलेला आणि बंदिस्त आहे. या बंदीस्ततेमुळे मुसलमान स्त्रियांची जी कुचंबणा होते आणि त्यातून शारीरिक, मानसिक व लैंगिक भावनांचा जो विस्फोट होतो त्याचं समाजचित्र एक मुस्लीम महिलाच आपल्या समोर उभं करत आहे.

पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती 

पुस्तकात दिलेली अनुवादिकेची माहिती 

मुलगी वयात आली की तिने घराबाहेर पाऊल ठेवायला बंदी. सगळ्या वस्त्रांमध्ये लपेटून घरच्या लोकांबरोबरच अगदी जवळपासच्या घरी किंवा नातेवाईकांकडे फक्त ये
णंजाणं. लग्न सुद्धा नात्यागोत्यातच. साटंलोटं. चुलत भावाशी, मावस भावाशी लग्न. मुलीच्या जन्मापासूनच किंवा मुलगी लहान असतानाच मोठ्या माणसांनी ठरवायचं की माझी मुलगी माझ्या बहिणीच्या मुलाला किंवा माझ्या भावाच्या मुलाला देणार. पुढे ती मुलगी किंवा तो मुलगा कसे निघतात; त्यांची एकमेकांची आवड निवड ह्याचा काही संबंध नाही. कारण लग्न आवडी-निवडी साठी नाही तर पुरुषाच्या सुखासाठी आणि मुलं पैदा करण्यासाठी आहे एवढंच ! लग्न आपल्या आपल्यातच झालं तर संपत्ती, पैसा त्याची फाटाफूट होणार नाही. ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात असंच होत राहील.
लग्न झालं रे झालं की गर्भधारणा होते का नाही याची सर्वांना घाई. त्यात जरा काही चूक झाली की दोन्ही घरचे लोक बोलायला तयार. आणि पुरुष दुसरं लग्न करायला मोकळा. कारण शरीयतनेच चार लग्नांना परवानगी दिलेली आहे. एकदा मुलं झाली; बायका (खरं म्हणजे अल्पवयीन मुलीच) संसाराच्या गाड्याला बांधल्या गेल्या; त्यांच्याकडून मिळणारी मजा पुरुषाला मिळेनाशी झाली की तो बाहेरख्यालीपणा करायलाही मोकळा. त्याचं उघड-उघड कुणी कौतुक करणार नाही पण; "पुरुषच आहे तो. तो तसाच वागणार" असं लंगडं समर्थन मात्र प्रत्येक जण करेल. कामानिमित्त माणूस परदेशी गेला असेल तर; "पुरुष तिथे एकटा कसा राहणार? स्वतःची हौस त्याला भागवायला नको का?" म्हणून तिकडे त्याने काही धंदे केले तरी ते बायकोने समजून घेतलेच पाहिजे ही अपेक्षा. पण याच शारीरिक गरजा जेव्हा एका महिलेच्या असतात तेव्हा मात्र तिच्याकडे असा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. मग विधवा, परित्यक्ता, जरठ-कुमारी विवाह झालेल्या, नवऱ्याशी न पटणाऱ्या किंवा वर्षानुवर्ष नवरा परदेशी असणाऱ्या बायका जमेल त्या पुरुषाशी संबंध ठेवून आपली शारीरिक भूक भागवून घेतात. हे जेव्हा समजतं तेव्हा बाईला सरळ विष देऊन मारणं; तिच्या कुटुंबीयांना समाजाबाहेर काढणं किंवा जबरदस्ती गर्भपात करून हे सर्व प्रकार घडतात. समाजाला विरोध करत असे प्रकार करणाऱ्या बाईला सरळ वेश्येचा दर्जा देऊन छि थू करणं घडतं.

अश्या नाना प्रसंगांनी भरलेली ही कादंबरी आहे. या कादंबरीत एकच एक असं कथासूत्र नाही. तर चार-पाच कुटुंबाच्या दोन तीन पिढ्यात घडलेल्या घटनांमधून हे सगळे प्रकार लेखिकेने मांडले आहेत. काही घटना सध्या घडतात काही घटना पात्रांच्या आठवणीतून जाग्या होतात.

बालविवाह झालेली मैमून नवऱ्याकडे नांदायला तयार नव्हती. पण पोटात गर्भधारणा झालेली. अश्या अवस्थेतून तिला बाहेर काढण्यासाठी गावठी पद्धतीने गर्भपात घडवून आणला जातो तो प्रसंग 





घरात दोन पिढ्या घडलेल्या वाईट घटनांमुळे घाबरलेली जोहरा आपल्या मुलीची -राबियाची - शाळा बंद करते तो प्रसंग








एका मर्तिकाच्या प्रसंगाच्या वेळी भेटलेल्या बायका एकमेकींशी गप्पा मारतायत. पण विषय नेहमीचाच "विषयवासनांचा". 





पुस्तक ५६१ पानी आहे. प्रसंगांमगून प्रसंग येत असतात. पण ह्यात कथासूत्र नसल्यामुळे एक विस्कळीतपणा जाणवतो. पुढे काय घडतंय हे वाचायची उत्सुकता जाणवत नाही. जरा रेटत रेटतच वाचावं लागतं. जास्तीत जास्त प्रकारच्या समस्या मांडता यावयात ह्यासाठी 3-4 कुटुंबात सगळ्या समस्या दाखवल्या आहेत. एकही सरळमार्गी कुटुंब नाही, एकही व्यक्ती शुद्ध चारित्र्याची वाटत नाही; हे जरा अतीच होतं. पुस्तक बरंच लांबलंय त्यामुळे काही तपशील गाळून पुढे वाचावं लागतं नाहीतर कंटाळा येतो.

मूळ पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचा हा मराठी अनुवाद आहे. अनुवाद छान, सरळ आणि ओघवता झाला आहे. पुस्तकाचा आशय तितक्याच ताकदीने मराठीत आणला आहे .पण इंग्रजी भाषांतरात काही तमिळ शब्द तसेच ठेवले असतील ते मराठीत आणताना मात्र भयानक चुका झाल्या आहेत. मला स्वतः ला प्राथमिक तमिळ लिहिता-वाचता-बोलता येतं (मला तमिळ बोलताना ह्या व्हिडिओत बघू शकाल https://www.youtube.com/watch?v=hNTuNy-AgMk ) त्यामुळे तमिळ शब्द आला आला की माझी उत्सुकता चाळवायची आणि बरेच घोळ दिसायचे.
सुरुवात पहिल्या पानापासून झाली आहे. ज्या पुस्तकाचं भाषांतर केलंय त्या पुस्तकाचं नाव सुद्धा बरोबर लिहिलेलं नाही. "इरंधम जामथिन कधाई" लिहिलंय. ते खरं "इरंडाम् जामंगळीन् कदै" असं आहे.

तमिळमध्ये थ, ध,ठ, ढ हे वर्ण नाहीत. त्यामुळे तमिळ शब्द इंग्रजीत लिहिताना 
त = th
ट = t 
ड dh
द = d   
वापरतात. ते समजून न घेतल्यामुळे खूप चुका आहेत. 

तमिळ शब्द -தாத்தா इंग्रजीत - Thaththa पुस्तकात - थथ्था. योग्य लेखन "तात्ता"
तमिळ शब्द -பாவாடை इंग्रजीत - pavadai पुस्तकात - पावादाई. योग्य लेखन "पावाडै"


पुस्तकात एक उल्लेख सारखा येतो. "उपास सोडण्यासाठी मशिदीतून निंबू-कांजी आणली". हा काय प्रकार आहे कळलं नाही. तमिळ मध्ये निंबू म्हणत नाहीत. मग नेट वर शोधल्यावर कळलं की तो நோன்பு கஞ்சி नोन्बु कंजी असा शब्द आहे. नोन्बु म्हणजे उपास. तर कंजी हा दाल-खिचडी सारखा पदार्थ आहे.

एखाद्या मुलीशी बोलताना आपण "काय गं", "कुठे गं" असं म्हणतो. म्हणजे शब्दाला "गं" जोडतो तर मुलासाठी आपण "रे" जोडतो. "काय रे", "कुठे रे". तसं तमिळ मध्ये मुलीसाठी "मा" जोडतात, मोठ्या पुरुषासाठी "पा" तर मुलासाठी "डा" जोडतात.

"एन्नम्मा", "एन्नडा", "एन्नप्पा" असे शब्द तयार होतात.  पण पुस्तकात मराठीत लिहिताना ते अम्मा ,अप्पा असं लिहिलंय. तमिळ मध्ये अम्मा म्हणजे आई तर अप्पा म्हणजे वडील. त्यामुळे अर्थाची वाट लागते.

तमिळ मधले नातेवाचक शब्द उदा. पेरियम्मा, चित्ती इ. शब्द तसेच ठेवलेत(तेही चुकीच्या उच्चारात). पण त्यामुळे मराठी वाचकाला दोन पत्रांमधलं नातं काय हे समजत नाही. गोंधळ होतो. तमिळ शब्द पहिल्यांदा वापरला तिथे तळटीप द्यायला हवी होती अथवा "मावशी, काकू" असे सरळ मराठी शब्द वापरायचे.

मुसलमानी धार्मिक शब्द चुकिचे लिहिलेले दिसले. "लेलाथूल कद्र ची रात्र" असा उल्लेख आहे. तो "लैलत अल- क़द्र" असा पाहिजे. 

नमाज़ -ए-फ़ज्र ला "बजरची नमाज"; 
नमाज-ए-ज़ुहर ला "लुहूर नमाज" असं लिहिलंय. 

अनुवादिका, संपादिका किंवा मुद्रितशोधकाने एखाद्या तामिळ माणसाला आणि मुस्लिम माणसाला हे शब्द दाखवून खात्री करून घ्यायला हवी होती. आता "साहित्य अकादमी" मिळाल्यावर पुढची आवृत्तीत तरी हे दोष काढून टाकले पाहिजेत.

असो ! मुसलमान स्त्रीने आपल्या समाजाला आरसा दाखवायचं धाडस दाखवलं आणि सगळ्यांना ही काळी बाजू दाखवून समाजजागृतीला हातभार लावला हे ऐतिहासिक आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचं आहे. 

सध्या "लव्ह जिहाद" ची चर्चा होत असते. मुस्लिम समाजाचं खरं चित्र दाखवणऱ्या पुस्तकांचं वाचन मुलामुलींनी करणं आवश्यक आहे. आपण केवळ एका व्यक्तीशी नाही तर कुटुंबाशी, समाजाशी संबंध जोडणार आहोत. त्यातल्या रूढीपरंपरांचं वास्तविक स्वरूप आपल्याला पटतंय का झेपतंय का, हा विचार त्यांच्या मनात नक्की येईल. मुस्लिम लोकसुद्धा स्वतःत आणि धर्मात बदल करायला पुढे आले तरच ह्या पुस्तकाचं चीज झालं असं म्हणता येईल.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)

पुस्तक - गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi) लेखक - सुरेश देशपांडे (Suresh Deshpande) भाषा - मर...