थेंबे थेंबे(thembe thembe)



पुस्तक - थेंबे थेंबे (Thembe thembe)
लेखिका - मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १६६
ISBN - 978-93-91469-07-8

ह्या आधीच्या २१२व्या पुस्तक परीक्षणात म्हटलं होतं त्याप्रमाणे लोकप्रिय लेखिका मंगला गोडबोले यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग आला होता. त्यांची नुकतीच प्रकशित झालेली दोन पुस्तकं त्यांच्या स्वाक्षरीसह मिळाली. २१२ वं परीक्षण त्यातल्या एका पुस्तकाचं होतं. हे दुसरं. "
महिला बचत गट" ह्या विषयावरचं.



महिला बचत गट ह्या बद्दल प्रत्येकाला थोडीतरी माहिती असेलच. महिला एकत्र येऊन स्वतःची अल्पबचत एकत्र करून काही पुंजी तयार करतात आणि गटातल्याच कोणाला कर्जाऊ रक्कम देतात. त्यातून कोणी आपली घरगुती नड भागवते तर कोणी छोटामोठा व्यवसाय सुरु करते. ठराविक मुदतीत घेतलेली रक्कम सव्याज परत करते. समजायला अतिशय सोपी संकल्पना. पण ह्या छोट्या संकल्पनेने फार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आणि शहरी अल्पउत्पन्न वर्गातल्या महिलांना आधार दिला आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु करायला मदत केली आहे; गरिबीवर मात करायला मदत केली आहे. महिला बचत गट (पुस्तकातलं लघुरूप - मबगट ) दाखवत असलेला हा दृश्य परिणाम झाला. त्याचे अदृश्य असे सामाजिक परिणाम कितीतरी मोठे आहेत. मबगट स्थापन होणे, चालवणे, वाढणे इतर गटांशी सहकार्य करून महागट होणे ह्या प्रत्येक पातळीवर सहभागी स्त्रियांचा आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक विकास होतो. एक अबोल आणि रक्तविहीन सामाजिक क्रांतीच !
"थेंबे थेंबे" हे पुस्तक ह्या परिणामांचा मागोवा घेते. मबगटांचे महत्त्व अधोरेखित करते.

ह्या संकल्पनेची सुरुवात कशी झाली. भारतात आणि भारताबाहेर ह्या बचतीचे स्वरूप कसे होते हा थोडा इतिहास पुस्तकात मांडला आहे. 
मग मबगट कसा स्थापन होतो, चालवला जातो, लिखापढी कशी ठेवली जाते हा तांत्रिक भाग आहे. ह्यासंबंधी सरकारी योजना पूर्वी कुठल्या होत्या, सध्या कुठल्या आहेत आहेत; बँका व नाबार्ड सारख्या संस्था मबगटांना कर्ज कश्या देतात इ. माहिती आहे. त्यानंतर बऱ्याच यशस्वी मबगटांची, त्यांनी सुरु केलेल्या उद्योगांची माहिती आहे.
मबगट चळवळीत मोठं योगदान देणाऱ्या; अनुकरणीय पायंडे पडणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांची ओळख आहे.
ही सगळी माहिती देताना त्या त्या योजनेमुळे फक्त बायकांवरच नाही तर त्यांच्या कुटुंबियांवर आणि पूर्ण गावावर कसा सकारात्मक परिणाम झाला हे मुद्देसूदपणे मांडलं आहे.

अनुक्रमणिका


काही पाने उदाहरणादाखल
मबगटांचे स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वरूप; बडोदानरेश सयाजीराव गायकवाडांनी राबवलेली कल्पना आणि ब्रिटिश काळातले कायदे.


मबगटात कर्ज कसं दिलं जातं, कसं वसूल केलं जातं ह्याबद्दलची ही पाने




गटांमुळे सहभागी महिलांच्या व्यक्तिमत्त्वात व त्यांच्याकडे बघण्याच्या कुटुंबाच्या दृष्टेकोनात कसा फरक पडतो ह्याचं हे एक विश्लेषण.




महत्कार्य करण्याऱ्या व्यक्तींपैकी एक संजूताई केळकर
शेवटी कोरोनाकाळात पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी च्या नेतृत्त्वात मबगटांच्या मार्फत गावोगावी योग्य माहिती पोचवणे, गावातून शेतीउत्पन्न गोळा करून शहरांतल्या ग्राहकांपर्यंत पोचवणे असं मोठं काम केलं गेलं. त्याबद्दल सांगितलं आहे. संगठनाच्या सकारात्मक आणि रचनात्मक वापरातून मबगट ही किती सुप्त ताकद आहे हे पटल्याशिवाय राहणार नाही. 

प्रत्येक गट यशस्वी होतोच असं नाही. बरेच बंदसुद्धा पडतात, इतर गटांत विलीन होतात. सतत फिरतीवर असणाऱ्या कुटुंबाना ह्यात सहभागी होणं कठीण जातं. अशी मबगटांसमोरची आव्हाने, समस्यासुद्धा सविस्तरपणे सांगितल्या आहेत. 

सामाजिक प्रभाव मांडताना पुस्तकात मुद्द्यांची पुनरुक्ती झाली आहे. तो भाग कदाचित थोडा कमी करता आला असता. बँकांच्या, इतर पतसंस्थांच्या योजना हा तांत्रिक भाग समजतो पण लक्षात राहणं कठीण आहे.

महिला बचत गट ह्या उपक्रमाची ज्यांना ओळख नाही किंवा केवळ तोंडओळख आहे अश्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचून ह्या सुप्त क्रांतीची सविस्तर ओळख करून घेतलीच पाहिजे. आपल्या आजूबाजूला असे गट आहेत का हे पाहावं, जमल्यास त्यांना आपण काही सहकार्य करावं; आपल्या ओळखीच्या गरजू स्त्रियांना त्याची ओळख करून द्यावी; सामाजिक प्रश्नांवर नुसती चर्चा करण्यापेक्षा त्याची आवाक्यातली उत्तरं शोधणाऱ्या ह्या प्रवासात सहभागी व्हावं असं आपल्याला वाटल्याशिवाय राहणार नाही.  


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

काळेकरडे स्ट्रोक्स (Kalekarde strokes) / औदूंबर (ऑडिओ बुक) (Audumbar)





पुस्तक - काळेकरडे स्ट्रोक्स (Kalekarde strokes) / औदूंबर (ऑडिओ बुक) (Audumbar) 
लेखक - प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २१९
ISBN - 978-93-86493-49-1

प्रणव सख
देव लिखित "काळेकरडे स्ट्रोक्स" कादंबरीचे फोटो बऱ्याच वेळा बघितले होते. पण वाचायचा योग आला नव्हता. या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला ही बातमी वाचल्यामुळे उत्सुकतेने पुस्तक वाचायचा विचार केला. तेव्हा कळलं की स्टोरीटेलवरती ही कादंबरी "औदुंबर" या नावाने प्रकाशित झाली आहे. त्यामुळे स्टोरीटेल वरच ऐकायला सुरुवात केली.

ही गोष्ट एका तरुण मुलाची आहे. डोंबिवलीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला हा तरुण मुलगा रुईया कॉलेजला जायला लागला आहे. मास कम्युनिकेशन प्रशिक्षण घेतो आहे. त्याला असं वाटतंय की आपलं घर, आपल्या घरचं वातावरण अगदीच साधं, बुरसटलेल्या विचारांचं आहे. आपल्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय. पण ते वेगळे म्हणजे काय हे नक्की माहिती नाही. सरधोपट मार्गावर जायला सांगणारे आपले आई-वडील हे जणू अडथळा आहेत. त्यामुळे आई-वडिलांशी फटकून वागून; जेवढ्यास तेवढं बोलून जास्तीत जास्त वेळ घराबाहेर कॉलेजच्या कट्ट्यावर, मित्रांमध्ये काढणारा हा मुलगा.

सहाजिकच पुढे नवनव्या मुलांशी ओळखी होतात, मित्रांच्या नादाने सिग्रेट, दारूचं व्यसन सुद्धा लागतं. संपर्कात आलेल्या काही मुलींशी जवळीक वाढते. पण तिचा फक्त सहवास आवडतोय का प्रेम वाटतंय का शारीरिक आकर्षण वाटतंय हे त्याला कळत नाही. घरी आई-वडिलांची काळजी न करणारा मुलगा गर्लफ्रेंड्सचं दुःख, गर्लफ्रेंडला काय वाटतंय याची मात्र चौकशी करु लागतो आणि फार काळजी करू लागतो.

प्रेम प्रकरणातून शारीरिक संबंध पर्यंत मजल जाणं आणि त्यातून अपराधी वाटणं, मुलीने सोडून जाणं तिच्या विरहात व्याकूळ होणे मग अजून दारू आणि वाईट संगतीत जाणं, घर सोडून अवांतर हिंडणं, पुन्हा प्रेमात पडणं हे सगळं "बैजवार" होतं.

अशी एकूण दिशाहीन तरुणाची ही गोष्ट आहे. म्हटलं तर या गोष्टीत काही नावीन्य नाही. हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं कॉलेज म्हणजे फक्त प्रेम आणि चाळे. ह्या कथा नायकांना कॉलेज मधल्या परीक्षा, असाइनमेंट्स ह्यांचं काही टेन्शन नाही. शेजारपाजारचे लोक, नातेवाईक काय म्हणतात हे जणू आयुष्यात नसतंच. आणि खाणं-पिणं-राहणं-जाणंयेणं-कपडे-इंटरनेट ह्या खर्चाला पैसे "आपोपाप" येतात. असं वास्तवाशी फटकून मांडलेलं "वास्तववादी" कथानक. 

बरं कथानक म्हणावं तर गोष्टीला सुरुवात, मध्य, शेवट असं काही नाही. प्रसंगात मागून प्रसंग येत राहतात. त्यांच्यात सुसूत्रता वाटत नाही. वाचता वाचता मला पुरस्कारप्राप्त कादंबऱ्यांची वैशिष्ट्य यातही जाणवायला लागली. ती पुढे देतो आहे. पुस्तक ऐकलंय; वाचलं नाही. त्यामुळे पुस्तकातले उताऱ्यांचे फोटो देता येत नाहीत. पुढे दिलेली वाक्यं साधारणपणे पुस्तकातल्या वाक्यांप्रमाणे आहेत. जशीच्या तशी उतरवलेली नाहीत.

१) प्रसंगांमध्ये महत्त्वाचं फार थोडं घडतं पण लेखक त्या प्रसंगाचं नेपथ्य वर्णन करण्यात वाक्यंच्या वाक्य फुकट घालवतो. 
वर्णनबंबाळ आणि शब्दबंबाळ !! म्हणजे एखाद्या प्रसंगात काय घडलं यापेक्षा प्रसंग घडला त्या खोलीचं वर्णन, तेव्हा माणसाने कुठले कपडे घातले होते, त्याने केशभूषा केली होती, त्याच्या चपलेचा आवाज कसा येत होता असलं काहीतरी फालतू. म्हणजे, समजा असा प्रसंग असेल की मित्र घरी आला आणि आम्ही चहापाणी करून गप्पा मारल्या आणि गप्पांमधे रहस्य कळलं. तर पुस्तकांत काय असेल... मी मित्राला मॅगी केली. आधी पाकीट फोडलं. निळ्या ज्वालांवर पातेले ठेवलं, आम्ही दोघांनी थोडं थोडं खाल्लं ताटलीत थोडं राहिलं ... असलं फालतू वर्णन. विषय काय होता; कथानक पुढे कसं गेलं हे नाही.

२) पुरस्कारप्राप्त पुस्तकांचं दुसरं लक्षण म्हणजे ह्या निरर्थक वर्णनातून आपण खूप मोठा अर्थ, काहीतरी तत्त्वज्ञान सांगतोय मानवी जीवनाचा वेध घेतोय असा आव आणायचा. काहीतरी अमूर्त चित्र विचित्र कल्पना मांडायच्या. उदा. त्या क्षणी मला असं वाटलं की माझ्यादेहाची नळी झाली आहे आणि लख्ख प्रकाश त्यातून आरपार गेला आहे...

मला वाटलं की तिच्या दुःखात न खूप मोठा अवकाश सामावलेला आहे आणि आपल्याला त्याचा वेध घेता येत नाही

तिचं गाणं एक आदिम निराशा मांडत होतं ... सगळीकडे पसरत जाणारी , चराचराला गुरफटून टाकणारी निराशा..
.
असं ह्या पुस्तकात जागोजागी आहे.

३) लैंगिक संबंधाची वर्णने, लैंगिक अवयवांबद्दल उघडउघड टिप्पणी करणारी पात्रे. कादंबरी "बोल्ड" पाहिजेच. या कादंबरीतही नायक आणि त्याचा टपोरी मित्र ह्यांचे पोरी पटवून मजा मारायचे उद्योग चालतात. त्याचे प्रसंग आहेत. त्यांच्यातल्या गप्पांमध्ये ते बढाई मारत असले किस्से सांगतात. "कसं केलं", "बाई कशी होती" वगैरे. हे सांगताना वर  ही पात्रं "फिलॉसॉफी" झाडणार - देहाच्या गरजा, शेवटी स्त्री-आणि पुरुष हेच दोन प्रकार खरे असली भंकस. 

पुस्तकाचं अभिवाचन शिवराज वायचळ ह्याने छान केलंय. स्पष्टता, आवाजातला चढ-उतार, वेगळ्या पात्रांचे थोडे वेगळे आवाज ह्यामुळे "ऐकणं" हा भाग तरी कंटाळवाणा झाला नाही.

सुरुवातीला या पुस्तकाचे भाग मी त्याच्या नेहमीच्या स्पीडने ऐकले. मग जसं पुस्तक आपण भराभर वाचतो तसं स्पीड १.५ करून ऐकलं आणि शेवटी वेग दुप्पट करून ऐकलं. आता तरी काहीतरी होईल काहीतरी कथानक घडेल अशा आशेने पुढे पुढे जात राहिलो. या पात्रांच्या भूमिकेशी समरस होऊन लेखक त्यांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करेल असं वाटलं पण तसं झालं नाही. टीव्हीहीवरच्या दैनंदिन मालिकांसारखं पाणी घालून गोष्ट वाढत राहिली. एक दिवस लेखकाला लिहून लिहून कंटाळा आला आणि कादंबरी संपली. मी सुटलो !
तुम्ही त्यात अडकू नका एवढंच सांगावसं वाटतंय.

 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika)



पुस्तक - बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika)
लेखक - नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ४०८
ISBN - 978-81-938239-8-7

सर्वप्रथम, हे पुस्तक मला वाचनासाठी स्वतःहून उपलब्ध करून दिल्याबद्दल "ग्रंथप्रेमी.कॉम" च्या द्वितीया सोनावणे यांचे आभार मानतो.

पाकिस्तानातच्या बलुचिस्तानात "बुग्ती मराठा" नावाचा समाज राहतो हे तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही म्हणाल, "मराठा" आणि तेही पाकिस्तानात ! पण हो. हे लोक पूर्वीचे महाराष्ट्रातले आहेत. साधारण अडीचशे वर्षांपासून ते पाकिस्तानात राहत आहेत. पण "राहत आहेत" हा सौम्य शब्द झाला. अडीचशे वर्षांपासून ते नरकयातना भोगत काळ कंठत आहेत असंच म्हणावं लागेल.

कोण आहेत हे लोक ? विपन्नावस्थेत का आहेत ? ह्याची उत्तरं आणि त्यांची हृदयद्रावक कहाणी मांडणारी ही कादंबरी - "बलुचिस्तानचे मराठे - एक शोकांतिका"

१७६१ साली झालेले पानिपतचे युद्ध हा मराठी इतिहासातला अविस्मरणीय प्रसंग. महाराष्ट्रातून लक्षावधी सैनिकांनी पानिपतपर्यंत जाऊन अहमदशहा अब्दालीला रोखलं होतं. ह्या युद्धात मराठयांना अपेक्षित विजय मिळाला नाही. धुमश्चक्री झाली. युद्ध अंतिम टप्प्यात असताना, पराभव समोर दिसू लागल्यावर रणांगणातून पळून जाण्यातच शहाणपणा होता. अब्दालीच्या सैन्याने चालवलेल्या शिरकणातून बरेच लोक वाचले पण चाळीस-पन्नास हजार मराठे मात्र अब्दालीच्या तावडीत सापडले. त्यात सरदार होते, पेशव्यांच्या फडावरचे लोक होते. त्याबरोबर शिपाई, सैन्यासाठी काम करणारे कारागीर, सुतार, लोहार, चांभार असे व्यवसायिक होते. पानिपतच्या लढ्याचं वेगळेपण म्हणजे सैन्याबरोबर कुटुंबकबिला देखील आला होता; उत्तर भारतातली तीर्थे बघण्यासाठी. त्यामुळे सापडलेल्या लोकांत बायका-पोरे सुद्धा होती. सगळे काही दिवसांत युद्धकैदी झाले. अब्दाली त्यांना आपल्या बरोबर घेऊन गेला. अफगाणिस्तानात परत जाताना बलुचिस्तानच्या सरदाराला त्याने ही माणसे दिली; 
युद्धात केलेल्या मदतीची भरपाई पैशांऐवजी, गुलाम देऊन! सर्वांचे जबरदस्ती इस्लाम मध्ये धर्मांतरण तर झालेच. पण जनावरांपेक्षाही हीन अशी गुलामी नशिबी आली. बलोच टोळ्यांमध्ये त्यांचं वाटप झालं. बलुचिस्तानात ते पोचले तो प्रदेश "डेरा बुग्ती" नावाने ओळखला जातो. म्हणून हे लोक "बुग्ती मराठा".

देव-देश-धर्माच्या रक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या लोकांना देव-देश-धर्म या तिन्हीलाही मुकावं लागलं. स्त्रियांची बेअब्रू झाली. शेतमजूर म्हणून ते लोक काम करू लागले. हे मूळचे शेतकरी लोक म्हणून त्यांनी चांगली शेती करून दाखवली. मालकाच्या मर्जीनुसार स्वतःचे पिढीजात व्यवसाय करून त्यांनी पोट भरायला सुरवात केली. त्यातले जे शिपाई आणि सरदार होते त्यांची फौज बलुची लोकांनी बनवली. आणि स्वतःच्या लढायांसाठी वापरली. आपल्या निढळाच्या घामाने आणि रक्ताने गुलामीतूनही स्वतःचं जीवन सावरायचा प्रयत्न हे लोक करत राहिले. पण बलुच्यांकडून अन्याय होणं, बळजबरीने पैसा आणि अब्रू लुटली जाणं हे पुन्हा पुन्हा घडत होतं.

हिंदू धर्म पाळायला परवानगी नाही; सगळे मुसलमान झाले तरी "बुग्ती मराठ्या"ला हिणवताना तुम्ही "काफीर" म्हणून मशिदीतही प्रवेश नाही. गुलामी म्हणून पुरेसा पैसा नाही. आपल्या मातृभूमीत परत जायची शक्यता शून्य. हे स्वीकारलेली ही मंडळी गरिबीतही जमेल तितके आपले संस्कार, खाद्यपदार्थ, गाणी जपण्याचा प्रयत्न करतात. आपण "मराठा" आहोत हा इतिहासाचा एक नाजूकसा धागाच जणू ह्या वावटळीत त्यांना आधार देत होता. त्यांच्या संघर्षाची, सुख-दुःखाची कहाणी अतिशय परिणामकारकपणे मांडली आहे लेखक नंदकुमार येवले ह्यांनी.

१७६१ पासून सुरुवात करून साधारण २००० सालापर्यंत हा समाज कुठल्या कुठल्या प्रसंगांना तोंड देत गेला असेल ह्याचं मनोज्ञ वर्णन त्यांनी केलं आहे. त्या वर्णनाशी आपण समरस होतो. डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.

उदा. अगदी सुरुवातीला अब्दालीच्या हातात लोक सापडले तेव्हा. 




मराठयांनी स्वतःच्या कष्टाने बलुचिस्तानात शेती पिकवली. 




जुन्या परंपरा जपण्याचा प्रयत्न. 




बलुचिस्तान हा खरं तर स्वतंत्र भाग. पाकिस्ताननिर्मितीच्या वेळी त्याच्या स्वायत्ततेचं आश्वासन देऊन जिन्हानी त्याला पाकिस्तानात समाविष्ट केलं. पण पुढे बलोच लोकांना दुय्यम लेखून पंजाबी आणि सिंधी मुसलमान त्यांच्यावर वर्चस्व गाजवू लागले. त्यातून बलोच लोकांनी लढे उभारले तर कधी सशस्त्र लढाया केल्या. "बुग्ती मराठा" लढवय्ये म्हणून आपल्या मालकांच्या बाजूने लढणं त्यांना भाग होतं. एकीकडे अन्याय होतोय तरी त्याचीच बाजूने घेऊन लढायचं आणि त्याचं फळ म्हणून पुन्हा पाक सैन्याकडून अत्याचार. अशा दुहेरी कात्रीत सापडलेला "मराठा". 
कादंबरीतलं एक "मराठा" पात्र - गाझीन - कष्टांतून उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरीत मोठ्या हुद्दयावर जाते. वरच्या जातीतली एक मुलगी - आलिजा- त्याच्या प्रेमात पडते. तिच्या घरच्यांचा विरोध आणि जातीवरून त्याला अपमानास्पद वागणूकच मिळते तो प्रसंग. 

कादंबरीचं स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल. आता थोडं लेखनशैलीबद्दल ... 
कादंबरीचा पहिला भाग ज्यात पानिपत नंतर घडलेले प्रसंग आहेत तो भाग गुंतवून ठेवणारा आहे. पण कादंबरीत जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी कादंबरी एकसुरी व्हायला लागते. सर्वसाधारणपणे गरीबाला जे त्रास आयुष्यभर भोगावे लागतात किंवा जातीय उतरंडीत खालच्या वर्गाला जी मानहानी अनुभवायला लागते तेच प्रसंग लेखकाने "मराठा" समाजातल्या व्यक्तींबद्दल दाखवले आहेत. त्यामुळे त्यातला वेगळेपणा वाटत नाही. कादंबरी ताणल्यासारखी वाटते. 

बलुचिस्तानात वेगवेळ्या जाती आहेत. त्यांचे सरदार आणि जातपंचायती (जिर्गा आहेत). मराठा लोक पण त्यात वाटले गेले होते. आणि त्यानुसार त्यांचे सुद्धा प्रकार आहेत. हे आपल्याला सुरुवातीच्या भागातच कळतं पण. हाच मजकूर पुस्तकात पुन्हा पुन्हा दिला आहे. हे टाळायला हवं होत. 

कादंबरीत काळ पुढे जातो पण नक्की काळ किती पुढे सरकला आहे ह्याचा अंदाज येत नाही. अचानक एखाद्या प्रसिद्ध घटनेचा संदर्भ येतो आणि कळतं की आता ५० वर्षानंतरचं चित्र आपण बघतोय. पण पात्रांची नावं तीच तीच येतात. आधीच्या प्रसंगातला तिशीतलं पात्र आता ८०व्या वर्षी सुद्धा असं कसं असेल; असा वाचताना गोंधळ उडतो. मध्येच प्रसंग सोडून एखाद्या निबंधासारखी माहिती देणं सुरु होतं किंवा आजचे संदर्भ येतात. कादंबरीचा ओघ बिघडतो.  

मराठा जेमतेम २२हजार होते. पण त्यांनी कष्ट करून मालकांच्या शेतीत, उद्योग-व्यवसायात खूप मोठी प्रगती केली; मरहट्टे लढाऊ म्हंणून प्रसिद्ध होते असं चित्र एकीकडे दाखवलं आहे. तर दुसरीकडे हे लोक कोण? हे सुद्धा लोकांना माहिती नाही असं चित्र रंगवायचा प्रयत्न आहे. पानिपत नंतर २०० वर्षं शेतमजुरी करणारा हा समाज; पण जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा "गनिमी काव्यात पारंगत" समाज असं वर्णन पुस्तकात येतं. युद्ध न करता नवीन पिढी जन्मजात पारंगत कशी होईल ? त्यामुळे वर्णनात खूप विरोधाभास आहे. 

मूळ पात्रांच्या तोंडी भाषा पुश्तू, बलुची, फारसी असणार. पण वाचकांना कळणार नाही म्हणून मराठी पुस्तकात संवाद मराठीत असायला हरकत नव्हती.मात्र ह्या पुस्तकात वेगळेपणा दाखवण्यासाठी हिंदी वापरली आहे. पण ती ना धड उर्दू ना धड हिंदी(संस्कृतप्रचुर) अशी आहे. ते थोडं हास्यस्पद होतं. 

पुस्तकाच्या मलपृष्ठावर "ज्यूंप्रमाणे ह्या समाजाला सुद्धा भारतात परत आणलं पाहिजे" अशी लेखकाची इच्छा आहे. ती रास्तच आहे. पण तशी इच्छा आता ह्या समाजाला उरली आहे का; हे कळायला मार्ग नाही. पुस्तकात तरी; कोणी भारतात पळून जायचा प्रयत्न केल्याचा प्रसंग नाही.

पुस्तकाच्या शेवटी संदर्भग्रंथांची यादी दिली आहे पण ती बहुतांश भारतात घडलेल्या इतिहासाबद्दल किंवा नेहमीच्या विषयांबद्दलची (फाळणी, पेशवाई) वाटतात. खुद्द "बुग्ती मराठा"बद्दलची माहिती त्यांनी कशी मिळवली; कादंबरीत लिहिलेल्या प्रसंग सत्यघटनाप्रेरित किती हे पुस्तकात कळत नाही. त्याचा ऊहापोह मनोगतात केला असता तर मजकुराला अजून वजन आलं असतं. 

चारशे पानांमधला मुख्य मजकूर घेऊन पुस्तकाची संक्षिप्त आणि सुधारित आवृत्ती काढली तर लोकांमध्ये ती जास्त वाचली जाईल असं मला वाटतं. मात्र तोपर्यंत वाचकांनी थांबायची गरज नाही. एका महत्त्त्वाच्या विषयाला हात घालणारी; आपल्याच भाऊबंदांशी आपली ओळख करून देणारी; त्यांच्या हाका ऐकण्यासाठी आपले कान उघडण्याचे आवाहन करणारी ही कादंबरी वाचलीच पाहिजे. 

हे पुस्तक पुढील लिंकवर ऑनलाईन विकत घेता येईल 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

The Baba Ramdev Phenomenon (द बाबा रामदेव फेनॉमेनन)





पुस्तक - The Baba Ramdev Phenomenon (द बाबा रामदेव फेनॉमेनन)
लेखक - Kaushik Deka (कौशिक डेका)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १८४
ISBN - 978-81-291-4597-0

बाबा रामदेव हे भारताच्या घरोघरी पोचलेलं नाव आहे. टिव्हीवर त्यांचे कार्यक्रम बघून योगासने, प्राणायाम करणारे बरेच लोक आहेत. त्यांनी सांगितलेल्या घरगुती उपायांद्वारे स्वतःच्या विकारांवर नियंत्रण मिळवणारे लोकही बरेच आहेत. योग आणि प्राणायाम याचा इतका प्रचार-प्रसार करत ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या दैनंदिन जीवनाचा तो भाग होईल अशा सोप्या पद्धतीने सादर करणे ह्यासाठी रामदेवबाबांना नक्कीच श्रेय दिले पाहिजे. रामदेव बाबांची कंपनी "पतंजली"ची उत्पादने - टूथपेस्ट, मध, तेल, नूडल्स, शाम्पू - अशी कितीतरी आहेत . आणि तीही लोकप्रिय आहेत. इतकी लोकप्रिय की गेल्या काही वर्षात बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालाऐवजी लोक पतंजलीची उत्पादन घेऊ लागले आहेत. त्यामुळेच एक साध्या संन्यासी ते योगगुरू ते पासून लाखो करोडोची उलाढाल असणाऱ्या कंपनीचे संस्थापक म्हणून झालेला त्यांचा प्रवास कुतूहलाचा विषय ठरतो. योग आणि स्वदेशी उत्पादनाबरोबरच भारतीय संस्कृतीअनुरूप शिक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, राजकीय व्यवस्था परिवर्तन अशा क्षेत्रातही त्यांचा वावर असतो. एकांतात रमणारा किंवा अध्ययन-अध्यापन यातच समाधान मानणारा हा संन्यासी नाही. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व हा देखील कुतूहलाचा विषय ठरतो. आपलं हे कुतूहल थोड्याफार प्रमाणात शमवण्याचे होण्याचे काम कौशिक डेका यांच्या या पुस्तकाने केले आहे.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती


अनुक्रमणिका 


पुस्तकाच्या सुरुवातीला भाग बाबा रामदेव त्यांच्या प्राथमिक जडणघडणीवर आहे. बालपण, अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे अर्धवट सोडावे लागलेलं शिक्षण, योगाभ्यास करून आपल्या अपंगत्वावर केलेली मात, औपचारिक शालेय शिक्षण पुरेसे न वाटल्यामुळे पारंपारिक शिक्षण घेण्यासाठी घर सोडून गुरुकुलात जाणं, आचार्य बालकृष्ण यांची ओळख, योग, जडीबुटी, वेद उपनिषद आजचा भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास इ. भाग आहे.

एक संन्यासी म्हणून ते ध्यानधारणेत आणि अध्ययन-अध्यापनात रमले असते. पण संन्यासी माणसाचं ज्ञान हे समाजकल्याणासाठी उपयोगात आले पाहिजे; त्याने समाजाभिमुख असलं पाहिजे या त्यांच्या भूमिकेमुळे मग योग, शिक्षण आणि औषधनिर्मिती याची सुरुवात झाली. पुढे पतंजली उद्योगाची पायाभरणी झाली. त्यांची योगा क्लासेस घेण्याची सुरुवात त्यानंतर आयुर्वेदिक उत्पादने जडीबुटी लहान प्रमाणात तयार करायची सुरुवात आणि त्यातून कंपनीची सुरुवात याबद्दल आहे.

पतंजलीची आर्थिक उलाढाल गेल्या काही वर्षात कशी वाढली; बहुराष्ट्रीय कंपन्यांना पतंजली चा वेगळा विचार का करावा लागला पतंजलि मॉडेल नक्की काय आहे हा "बाबा रामदेव फेनॉमेनन" चा महत्त्वाचा भाग पुढे आहे.

पुस्तकात इथून पुढे सुरुवात होते ती रामदेव बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या कार्याचा चहुबाजूने वेध घेण्याची. शिक्षण विषयक प्रकरणात रामदेव बाबांनी सुरू केलेल्या शाळा व विद्यापीठांची माहिती आहे. त्यात भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय शिक्षण पद्धतीवर असणारा भर दिला जातो. सरकारने सुद्धा ही शिक्षणपद्धती मान्य करावी यासाठी त्यांचा आग्रह आहे. पण केंद्र सरकारकडून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये असं निरीक्षण लेखकाने नोंदवले आहे.

उदाहरणार्थ

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात झाली त्यातही रामदेवबाबा सक्रिय होते. त्यांनी वेळोवेळी राजकीय भूमिका घेतल्या. त्या कालखंडात घडलेल्या घटना, रामदेव बाबांनी केलेली विधाने, त्यांच्यावर झालेली टीका ह्यावर एक प्रकरण आहे.

रामदेव बाबांची विचारसरणी सहाजिकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप व हिंदुत्ववाद यांच्याशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे ह्या पक्ष संघटनांची त्यांचे चांगले संबंध आहेत. भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्यात पतंजलीचे उद्योग किंवा संस्था स्थापन यासाठी कमी दराने जमिनी दिल्या गेल्या आहेत किंवा सवलती दिल्या गेल्या आहेत आणि त्याबद्दल दोन्ही बाजूंनी त्यावर टीका आणि समर्थन हे देखील केला गेला आहे त्याबद्दलचे "डेटा" आहे.

एकीकडे भाजपा बद्दल आपुलकी आणि चांगले संबंध दिसतात तरी मतभिन्नता देखील आहे. त्यामुळेच 2014 च्या निवडणुकीत रामदेव बाबांनी मोदींना उघड पाठिंबा दिला होता तरी त्यानंतर मोदींच्या कामा बद्दल काही वेळा नाराजी उघड केली आहे. ही मतभिन्नता; भाजपाशी सुधारणारे किंवा ताणले जाणारे संबंध याचा ऊहापोह आहे.

उद्योग धंदा करायचा म्हटलं की सरकारी यंत्रणांशी सुसंवाद आणि त्यांच्याशी गोडीगुलाबीने वागावं लागतं. प्रत्येक वेळी भाजपाचं सरकार असेलच असं नाही. त्यामुळे रामदेवबाबांनीही भाजपाचे कट्टर विरोध असणाऱ्या पक्षांचीही आपले चांगले संबंध ठेवले आहेत. इतर पक्षांनीही वेळोवेळी त्यांच्या उद्योगांना मदत केली आहे त्याबद्दल एका प्रकरणात आहे.

उदा. योगाचा स्वअभ्यास आणि घर सोडून जाण्याचा प्रसंग 




पतंजली ची व्यूहरचना आणि कार्यशैलीतील वेगळेपण सांगणारी ही पाने 

  

पतंजली समोरची आव्हाने 

पतंजलीच्या जाहिरातींत रामदेव बाबाच "मॉडेल". त्यामुळे मॉडेल वर कोट्यवधींचा खर्च नाही. पण भरपूर खर्च केला जातो. "स्वदेशी" उत्पादने घ्या हा आग्रह त्यांचा जाहिरातींचा गाभा. त्याबद्दलची ही काही पाने




शिक्षणाकडे भारतीय पद्धतीने बघण्याचा दृष्टीकोन आणि त्यासाठी बाबांचे कार्य ह्याची एक झलक 

हे पुस्तक रामदेव बाबांचा चहूअंगांनी वेध घ्यायचा प्रयत्न करते. लेखनाने त्यांची मुलाखत घेतली आहे. पण पुस्तकाचा इतर सर्व भाग हा वृत्तपत्रांतल्या बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह वाटतो. अबक विषयावर रामदेवांनी असं विधान केलं होतं. त्यावर क्ष व्यक्तीने तसं विधान केलं होतं. अमुक वृत्तपत्राच्या लेखात लेखकाचं असं म्हणणं आहे. तमुक रिपोर्ट नुसार पतंजलीचे आकडे असे आहेत इ. असं एकूण स्वरूप आहे. ह्या सगळ्या ताज्या घडलेल्या घटना आहेत. त्यामुळे आपल्याला त्या साधारण माहिती असतात. बातम्या वाचलेल्या असतात. पण पडद्यामागे काय घडलं होतं हे समजण्यात आपल्याला जास्त रस असतो. किंवा त्या घटनेचं पृथक्करण अपेक्षित असतं. पुस्तकाकडून ही अपेक्षा पूर्ण होत नाही. पुस्तकात रामदेव बाबांच्या संस्थाची नाव, त्याची अर्थी उलाढाल, त्यांना मिळालेल्या जागा ही आकडेवारी येते. पण ते सगळं लक्षात राहणं कठीण आहे. तसंच पुस्तक प्रकाशित झालं तेव्हापासून (२०१७ पासून) आजपर्यंत त्यात कितीतरी बदल झाला असेल. पुस्तकाच्या मजकुराचा जो अर्क आहे - "फेनॉमेनन" मागची रामदेव बाबांची भूमिका; आलेल्या अडचणींवर मात कशी केली, एक माणूस म्हणून ते कसे आहेत - तो फार कमी हाती लागतो. त्यामुळे अभ्यासपूर्ण पुस्तकाऐवजी रामदेव ह्यांच्यावरचा अहवाल वाचतोय असं वाटतं. 

पुस्तक छोट्या आकारातलं कमी पानांचं आहे. मजकूर कठीण नाही. त्यामुळे लवकर वाचून होईल. बाबा रामदेव ह्यांच्याबद्दल थोडीफार नवी माहिती कळेल. काही छायाचित्र पहायला मिळतील. 


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————







खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...