I came upon a lighthouse (आय केम अपॉन या लाईटहाऊस)


पुस्तक - I came upon a lighthouse (आय केम अपॉन या लाईटहाऊस)
लेखक - Shnatanu Naidu (शंतनू नायडू)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - २१६
ISBN - 978-93-9032-752-2

काही दिवसांपूर्वी एक छोटी चित्रफित बघितली होती त्यात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा वाढदिवस साजरा करतानाचे दृश्य होते.

https://youtu.be/n87nYuuZiDo

अतिशय साधेपणाने सगळं चाललं होतं. एक छोटासा कपकेक त्यावरील छोटी मेणबत्ती. एखाददुसरी व्यक्तीच तिथे उपस्थित आहे. तिथे आपल्याला एक तरुण मुलगा दिसतो पंचवीशीतला. ह्या वाढदिवसाचा एक फोटो सुद्धा पसरला होता. त्यात असं म्हटलं होतं की होतं की हा रतन टाटा यांचा स्वीय सहाय्यक आहे त्याचं नाव शंतनु नायडू. त्याची आणि रतन टाटा यांची ओळख कशी झाली ह्याचा किस्सा असा दिला होता की; शंतनू नायडू हा तरुण प्राणीप्रेमी. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या अंगावरून वाहने गेल्यामुळे त्यांचे होणारे मृत्यू बघून त्याला वाईट वाटलं. ह्यावर काहीतरी उत्तर शोधावं म्हणून त्याला एक कल्पना सुचली. कुत्र्यांच्या गळ्यात "रिफ्लेक्टर बँड" -प्रकाशपरावर्तन करणारे पट्टे - बांधण्याची. ह्या पट्टयांमुळे वाहनचालकाला लांबूनच समोर काहीतरी आहे ह्याचा अंदाज येऊन तो वेग कमी करेल व अपघात टळेल. पट्टे लावण्याच्या कामाची माहिती त्याने रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचवली. प्राणीप्रेमी रतन टाटा यांना हे काम आवडलं आणि त्यांनी त्यांच्या व्हेंचर कॅपिटल फंडातून शंतनूला प्रायोजकत्व दिलं. अशा पद्धतीने टाटा पुरस्कृत स्टार्टअप सुरू झाली. पुढे ह्या ओळखीचं रूपांतर घनिष्ठ मैत्री झालं. शंतनू परदेशातून शिक्षण घेऊन परत आल्यावर टाटांनी त्याला नोकरी दिली तेही स्वतःच्या ऑफिसमध्ये, स्वतःचा स्वीय सहाय्यक/ मॅनेजर म्हणून.

इंटरनेटवर सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही त्यामुळे हे खरं आहे का हे पडताळून बघितले. कळलं की हे खरं आहे. इतकंच नाही तर शंतनुने स्वतःच्या आयुष्यातल्या ह्या टाटा पर्वावर एक पुस्तक देखील लिहिलं आहे. योगायोगाने माझ्या वाचनालयात (डोंबिवलीची पै'ज फ्रेंड्स लायब्ररीमध्ये) मला हे पुस्तक सुद्धा काही दिवसात नजरेस पडलं. तेच हे पुस्तक " आय केम अपॉन अ लाईटहाऊस".

शंतनूने पुस्तकाची सुरुवात भटक्या कुत्रांच्या अपघाती मृत्यूची समस्या त्याला कशी जाणवली ह्या प्रसंगापासून केली आहे. चमकणाऱ्या पट्ट्यांचा उपाय कसा सुचला, त्याच्या मित्रांबरोबर पुण्यात असे पट्टे बांधण्याची मोहीम त्यांनी राबवली हे सांगितलं आहे. ही बातमी टाटांना कळवावी असे त्यांच्या घरच्यांच्या मनात आलं. कारण चार पिढ्यांपासून त्या कुटुंबातले गृहस्थ टाटांच्या वेगवेगळ्या कंपन्यात काम करत होते. टाटा समूहाच्या योगदानाबद्दल, औदार्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. श्रद्धा होती. पण रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीला रोज हजारो पत्रे येणार. त्यात आपलं पत्र त्यांच्या पर्यंत पोहोचेल का नाही. पोचले तरी त्यांना ते बघता येईल; त्याला उत्तर देतील अशी खात्री अजिबात वाटत नव्हती. ह्या सगळ्या वेळातली हुरहूर शंतनूने छान शब्दबद्ध केली आहे. पण टाटांचे उत्तर आले. प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यांनी कामातही गुंतवणूक केली आणि शंतनुच्या आयुष्यातल्या टाटा पर्वाची सुरुवात झाली. ती भेट कशी झाली असेल टाटा काय बोलले असतील ह्याची उत्सुकता आपल्या मनातही जागी होते. ह्या भेटीचं आणि टाटांचा साधेपणाचं नेमकं वर्णन पुस्तकात आहे,.

टाटांनी गुंतवणूक केल्यामुळे "मोटोपॉव" ह्या स्टार्टअपच्या कामाचा अहवाल देण्यामुळे दोघांचा संबंध पुन्हापुन्हा येऊ लागला. ऐंशीच्या पुढे टाटा आणि तिशीच्या आतला शंतनू ! पण वयाचा, मानाचा, पदाचा अजिबात गर्व नसलेले टाटा ह्यांनी शंतनुचा एक मित्र म्हणून, मुलासारखा किंवा नातवंडासारखा त्याचा स्वीकार केला. शंतनूला उच्चशिक्षणासाठी कॉलेजला जायचं होतं त्यासाठी त्याची तयारी चालू होती. अपेक्षित होता तसा हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून तो निराश झाला. पण नंतर कॉर्नेल कॉलेजमध्ये मिळाला. या सगळ्या उतार-चढावांत तो टाटांच्या संपर्कात होता. टाटांनी त्याला प्रेरित ठेवलं. तेव्हा त्याने ठरवलं की उच्च शिक्षण घेऊन परत आल्यावर जर टाटांनी परवानगी दिली तर टाटा ट्रस्ट मध्येच काहीतरी सामाजिक काम करायचं. अमेरिकेत असतानाही टाटा त्याला प्रोत्साहित करायचे. न्यूयॉर्कला गेल्यावर तिकडे भेट घ्यायचे. दोघे बाहेर फिरायला, शॉपिंग ला जायचे. एकमेकांची थट्टा मस्करी करायचे. दोघांमधला हा खेळकर जिव्हाळा मोहित करतो.

अमेरिकेतून परतल्यावर टाटांनी त्याला आपल्या ऑफिस मध्ये स्वतःचा स्वीय सहाय्यक मॅनेजर म्हणून नोकरी दिली. आत्तापर्यंत मैत्री, दिलदार व्यक्तिमत्व असणारे टाटा आता त्याचे साहेब सुद्धा झाले! पूर्वी कधी केलं नाही अश्या कामाच्या जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावर पडल्या. टाटांच्या कामाच्या जबाबदाऱ्या, कामातले ताण-तणाव याच्यातून आणि कामातली शिस्त याच्यामधून कधीकधी टाटा आपल्याशी कठोरपणे वागत आहेत; आता पूर्वीचा मित्र राहिला नाही का असंही त्याला वाटायचं. पण काम झालं की पुन्हा थोड्या वेळाने दोघांच्या गप्पा गोष्टी सुरु व्हायच्या. त्याला लक्षात आलं की टाटा त्याला नोकरीसाठी तयार करत आहेत; आयुष्यासाठी तयार करत आहे. ह्या प्रसंगांत स्वतःच्या भावभावनांचं प्रामाणिक चित्रण त्याने केलंय. त्यामुळे योग्य तिथे टाटा कसे शिस्तशीरपणे वागत होते; मैत्रीत वाहवत गेले नव्हते हे आपल्याला देखील बघायला मिळतं.

शंतनूला स्वीय सहाय्यक म्हणून त्याला वेगवेगळ्या मीटिंगमध्ये उपस्थित राहायला जायचं. टाटा गोष्टी कश्या पारखतात, त्यांना कुठली माहिती लागते; माहिती अचूक आणि वेळेवर कशी लागते याचे त्याला धडे मिळाले. नवा असल्यामुळे कधीकधी कामाचा ताण वाटायचा हे सुद्धा त्याने प्रांजळपणे कबूल केलं आहे. असे ताणाचे बरेच प्रसंग पुस्तकात आहेत. त्यामुळे पुस्तक म्हणजे "टाटा टाटा गोड गोड" असं होत नाही. मोठ्या व्यक्तीबरोबरचा सहवास, त्याच्याबरोबर काम हे त्रासदायकसुद्धा असतं हे कळतं.

"जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण" म्हणतात त्याप्रमाणे सतत कामात गर्क असणारे टाटा त्याला बघायला मिळाले. सतत कामाचे दौरे आणि गाडीतही काम करत टाटांबरोबर प्रवास करायला मिळाला. फार क्वचितच ते सुट्टी घेत. पण त्यांच्याबरोबर सुट्टी घालवण्यासाठी ही मजा त्याला अनुभवता आली. काम बंद ठेवून पूर्ण मजा कशी घ्यायची हेही त्याला दिसलं. वेगवेगळ्या विषयात रस असणारे टाटा त्याला बघायला मिळाले. इतक्या उच्च पदावर राहूनही टाटा साधेपणा वागतात. बॉडीगार्ड ठेवणं, लोकांना टाळणं त्यांना आवडत नाही. टाटांनी हाताला धरून "असं वाग" हे कधी शिकवलं नाही पण त्यांच्या 
त्यांच्या वागण्याबोलण्यातून ते खूप काही शिकवत होते. सगळ्या अनुभवांचे, किश्श्यांचे सुंदर वर्णन शंतनू नायडू यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. 


अनुक्रमणिका

पहिल्या भेटीतच टाटा शंतनू आणि त्याच्या मित्राला आपल्या बंगल्यावर घेऊन जातात. त्यांच्या दोन कुत्र्यांशी ओळख करून देतात तो प्रसंग

अमेरिकेत शंतनू कुत्रा पाळतो आणि जगण्याला नवी उमेद मिळवतो. त्या कुत्र्याबद्दलचा हा प्रसंग

कामात झालेल्या चुकांबद्दल टाटांकडून कानउघडणी


टाटाच नव्हे तर ऑफिसमधल्या इतर महिला सहकारी सुद्धा त्याला अगदी मायेने वागवत, शिकवत होत्या त्यांचा विशेष उल्लेख पुस्तकात आहे. त्यातली ही दोन पाने

विशेष म्हणजे रतन टाटा ही मध्यवर्ती कल्पना असली तरी शंतनूचे स्वतःचं व्यक्तिमत्व पुस्तकात निश्चितपणे अधोरेखित होतं. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर त्याला एकटेपणा वाटायला लागला तेव्हा त्याने फोटोग्राफीचा आधार घेतला; तिथे कुत्रा पाळला आणि कुत्रा पाळल्यावर त्या कुत्र्याच्या निमित्ताने त्याला मित्र मिळाले असे इतर प्रसंगही ह्यात आहेत. त्याचं हे व्यक्तिमत्व कळत गेल्यामुळेच त्यामुळेच तिशीतला शंतनू आणि ऐंशी पार टाटा यांचं समीकरण कसं जुळतंय हे बघायला मजा येते. एक खोडकर मुलगा आणि तर एक मोठे गंभीर उद्योगपती. कधी कधी उदास, निराश होणारा होणारा मुलगा तर आयुष्यातले चढ-उतार बघितलेले पोक्त आजोबा. मोठ्या व्यक्तिमत्त्वाची सादर भीती बाळगणारा मुलगा तर मोठेपणाची झूल ना बाळगता थट्टा मस्करी करून त्याला आश्वस्त करणारं मिश्किल व्यक्तिमत्त्व !

शंतनू हा तुमच्या आमच्या सारख्या साध्या घरातला एक मुलगा. पण वेगळ्या कल्पनेमुळे त्याच्या आयुष्याला सुंदर कलाटणी मिळू शकली हे वाचणं सुखदायक आहे. प्रोत्साहित करणारं आहे. कदाचित आपल्या हातूनही असं काहीतरी काम घडू शकतं. एखाद्या मोठ्या व्यक्तीला ते आवडेल आणि त्यातून आपले स्नेहबंध जुळतील असा आशावाद जागवणारं पुस्तक आहे. दुसरीकडे रतन टाटा यांच्यासारख्या व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हे कळतं. जर आपण आत्ता आपल्या क्षेत्रात यशस्वीतेच्या पायऱ्या चढत असू, सेलिब्रिटी होण्याच्या मार्गावर असू तर मोठं झाल्यावर कसं वागलं पाहिजे हे जाणवतं. "अत्युच्चपदी थोरही बिघडतो" ह्या उक्तीला छेद देणं शक्य आहे हे सुद्धा आपल्याला कळतं.

शंत
नू ची भाषा खिळवून ठेवणारी, खेळकर, मिश्किल आणि अतिशय प्रामाणिक आहे. त्यात कुठेही अभिनिवेश नाही. एखादी गोष्ट मुद्दामून मोठी करून सांगितली आहे असं अजिबात वाटत नाही. त्यामुळे आपण सहज पुढे पुढे वाचत राहतो. रमत राहतो.

पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात पानोपानी प्रसंगांची रंगीत चित्रे आहेत. छायाचित्रे नव्हेत अर्कचित्रे. त्यामुळे तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर छान उभा राहतो. एखाद्या लहान मुलांच्या पुस्तकासारखं रंगीबेरंगी आणि सचित्र पुस्तक आहे. विषय आणि मांडणी गंभीर असली तरी या पुस्तकामुळे या चित्रांमुळे पुस्तकाला एक वेगळा हलकेपणा आला आहे. वाचनीयता वाढली आहे. संजना देसाई ह्यांनी ही चित्रे काढली आहेत. सर्वसाधारणपणे मोठ्यांच्या पुस्तकात छायाचित्रं असतात किंवा एखाद दुसरं स्केच असतं. पण कादंबरी मध्ये खरंच अशी चित्रं असतील तर वाचकाला अजून समरसून वाचता येईल. हा प्रयोग जास्तीत जास्त लेखकांनी, प्रकाशकांनी करून बघावा असं मला वाटलं.


चांगली लेखनशैली असणारा नवीन लेखक, वेगळा विषय, पुस्तकाची मांडणी सजावट सर्वच उत्कृष्ट आहे. त्यामुळे हे उत्कृष्ट पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेलच.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...