मंदिर कसे पहावे (Mandir kase pahave)



पुस्तक - मंदिर कसे पहावे (Mandir kase pahave)
लेखक - गो बं देगलूरकर (G. B. Deglurkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ९४
प्रकाशन - स्नेहल प्रकाशन ऑक्टोबर २०१९
ISBN - दिलेला नाही
छापील किंमत - रु. १८०/-


देवदर्शनासाठी आपण सर्वच देवळामध्ये जातो. ते मंदिर पुरातन ऐतिहासिक असेल तर त्याची भव्यता पाहून आपण दिपून जातो. त्याच्यावरचं कोरीव काम पाहून आपण मंत्रमुग्ध होतो. इतके वर्ष होऊन; पाऊस-वारा यांचा मार झेलत ते अजूनही कसे टिकून आहे हे बघून आपण अचंबितही होतो. पण बऱ्याच वेळा अशा मंदिरांमध्ये रांगेत उभे राहण्यातच वेळ जातो. प्रत्यक्ष मूर्ती समोरून तर आपण स्कॅन झाल्यासारखे "पुढे चला, पुढे चला" च्या गजरात ढकलले जातो. त्यामुळे इतक्या सुंदर वास्तूकडे डोळे भरून बघण्याची बराच वेळा आपल्याला सवडच नसते. त्याहून खरं म्हणजे मंदिराकडे डोळे भरून बघण्याची आपल्याला सवयच नसते. देवदर्शनाला गेल्यावर देवळाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा ही सवय सर्वसामान्य लोकांत कधी बघितली नाही. जे स्थापत्यशास्त्र धर्मशास्त्र इत्यादीत रस घेतात असेच लोक कुतूहलपूर्वक मंदिर पाहतात; इतर लोक क्वचितच. ही आपली एक सामाजिक चूकच आहे. मंदिर हा जसा आपल्या धार्मिक परंपरेचा एक मोठा भाग आहे त्याचप्रमाणे मंदिरांची वास्तुकला, स्थापत्यकला, सौंदर्यशास्त्र हे आपल्या परंपरेचेच भाग आहेत आणि त्याचा आस्वाद घेणं; ते समजून घेणे हे आपल्या परंपरेचं ज्ञान वाढवण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यादृष्टीने आपल्याला सजग करण्याचं काम हे पुस्तक करतं. गो. बं. देगलूरकर हे या क्षेत्रातले जाणकार आणि अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांच्या लेखणीतून आपल्याला मार्गदर्शन होतंय हे आपलं भाग्यच.




लेखाकाबद्दल इंटरनेट वरून मिळवलेली माहिती
(https://www.mahamtb.com/Encyc/2018/8/17/Article-on-Dr-G-B-Deglurkar.html).

मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्य या विषयातील तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा जन्म वारकरी परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या ‘देगलूरकर’ या घराण्यात झाला. त्यांच्यातल्या चिकित्सक आणि संशोधक वृत्तीला जोड मिळाली, ती संतसाहित्याचं सिंचन झालेल्या संस्कारित मनाची आणि आध्यात्मिक वृत्तीची. लहानपणी झालेल्या संस्कारांची जोड त्यांच्या पुढील आयुष्यात केलेल्या संशोधनाला, अभ्यासाला उपयोगी ठरली. डॉ. देगलूरकर यांनी मूर्तिशास्त्र, मंदिरस्थापत्त्य यांचा अभ्यास करून इथल्या पुरातत्त्वशास्त्रात मोलाची भर घातली. मूर्तींकडे, मंदिरांकडे पाहाण्याची नवी दृष्टी दिली. जी सर्वसामान्य माणसं ईश्वरभक्तीसाठी मूर्तिपूजेचा मार्ग चोखाळतात ते यासाठी मंदिरांमध्ये जातात. त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचविण्यासाठी त्यांना समजतील अशा भाषेत त्यांनी लेख लिहिले.

पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासासाठी केवळ भारतातच नव्हे, तर जगातही ज्या डेक्कन कॉलेजचं नाव आदराने घेतलं जातं, त्या कॉलेजमधून डॉ. देगलूरकर यांनी पीएच.डी. पूर्ण केली. १९९३ पर्यंत तिथे अध्यापनही केलं आणि या कॉलेजला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यावर पहिले कुलपती होण्याचा मान त्यांना मिळाला. दोन वेळा डी.लिट. ही सन्मान्य पदवी मिळवणारे ते डेक्कन कॉलेजमधले पहिले प्राध्यापक. बालपणापासून झालेल्या संतसाहित्याच्या संस्कारांमुळे, संतांनी त्यांच्या साहित्यातून मांडलेल्या विचारांचा आणि मूर्तिशास्त्र व मंदिरस्थापत्य यांचा परस्परसंबंध आहे का? हे तपासण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. उत्सुकतेपोटी, जिज्ञासेपोटी ते पुरातत्त्वशास्त्राकडे वळले आणि मग या विषयात आपल्याला काही नवं संशोधन करता येईल का, या विचाराने त्यांनी अभ्यास सुरू केला. पुरातत्त्वशास्त्र विषय घेऊन एम.ए. झाले. डॉ. शांताराम भालचंद्र तथा शां. भा. देव हे त्यांचे या विषयातले गुरू होते.




देऊळ, देवालय या संकल्पनेबद्दल आपल्या पुरातन वेदवाङ्मयात काय उल्लेख आहेत इथपासून त्यांनी विषयाला सुरुवात केली आहे. असं दिसतंय की वेदकाळात देवळे नव्हती. देवळे ही गेल्या काही शतकांमधलीच ही नवनिर्मिती आहे.
 


देगलूरकर यांनी या पुस्तकात मंदिराचे वेगवेगळे भाग कुठले असतात, त्याला शास्त्रीय नावं कुठली आहेत, त्या त्या भागाचं महत्त्व किंवा वेगळेपण काय हे समजावून सांगितलं आहे. देवळाच्या पायापासून कळसापर्यंत आणि देवळाच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत असा पूर्णविस्तार त्यांनी घेतलेला आहे. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली की तुमच्या हा भाग लक्षात येईल.
 

हे तपशील त्यांनी थोडक्यात मांडले आहेत ते कसे याची काही उदाहरणे बघूया. देवळाच्या पायाचा भाग अधिष्ठान आणि त्यावरची रचना कशी असते त्यांची नावं काय हे सांगणारी ही काही पाने.




कळस आणि इतर काही भागांवर भागांची माहिती देणारी काही पाने.




अशा पद्धतीने पुस्तकात वेगवेगळ्या भागांची माहिती चित्रांसकट आणि आकृत्यांसकट दिलेली आहे. 

देवळाच्या भिंतीवर देवांचे अवतार, पुराण कथांमधल्या गोष्टी असतातच. तशीच काही स्त्री, पुरुष, अप्सरा, प्राणी ह्यांची शिल्पे असतात. ही शिल्पे प्रतीकात्मक असतात. म्हणजे आपल्या षड्रिपूंवर मात करावी, मन एकाग्र करावे इ. संदेश ह्यातून शिल्पकाराला द्यायचा असतो. गंगा-यमुना ह्यांच्या शिल्पातून भक्त शुचिर्भूत झाला आहे हे ध्वनित केलं जातं इ. ह्या मुद्द्याला थोडक्यात स्पर्श केला आहे.

आवर्जून पहावीत अश्या मंदिरांची माहिती दिली आहे. उदा.




पुस्तकाच्या शेवटी पारिभाषिक संज्ञांची सूची आहे. तसंच मंदिर स्थापत्य विषयावर महत्त्वाचे संशोधन करणाऱ्या अलीकडच्या काळातल्या आठ अभ्यासकांची माहिती आणि संदर्भ ग्रंथांची सूची आहे.

पुस्तकाचा विषय नेहमीपेक्षा खूप वेगळा आणि तांत्रिक आहे. त्यामुळे खूप अपरिचित तांत्रिक संज्ञा येतात. एका संज्ञेचे विश्लेषण करताना त्यात अजून चार संज्ञा येतात. त्यामुळे पुस्तक थोडं किचकट होतं. एका वाचनात सगळं लक्षात आलंय; सगळ्या संज्ञा लक्षात राहिल्या आहेत असं होणार नाही. एखाद्या संज्ञेचा संदर्भ पुढच्या पानात आला की तो वाचल्यानंतर मागचा भाग जास्त स्पष्ट होतो. त्यामुळे एकदा-दोनदा-तीनदा हे पुस्तक वाचलं की हे पुस्तक नीट समजेल असं मला वाटतं. मजकूर असणारी पृष्ठे कमी असल्यामुळे हे सहज शक्यही आहे.

पुस्तक अजून सोपं करता आलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटलं. एखादी संज्ञा स्पष्ट करून सांगताना त्यात अजून आकृती घ्यायला हव्या होत्या. पुनरावृत्ती असली तरी काही भाग नव्या मजकुराच्या अनुषंगाने पुन्हा द्यायला हवा होता असं मला वाटलं.

मंदिरात काय काय पाहता येईल हे या पुस्तकातून लक्षात येतं. पण पुस्तकातल्या शीर्षकातला "मंदिर कसे पहावे" ह्याचे थेट उत्तर दिलेले नाही. मंदिर पाहण्याचा निश्चित क्रम लेखकाने दिलेला नाही. त्याबद्दल काही विशेष मार्गदर्शन नक्कीच हवं होतं. पण लेखकाने सुरुवातीला म्हटलं आहे की आपल्या धर्मशास्त्रानुसार आधी देवळाला प्रदक्षिणा घालावी. देवळाचं बाहेरून दर्शन घ्यावं. देवळाच्या बाहेर चितारलेल्या पुराणकथा, देवाचे अवतार समजून घ्याव्या. प्रतिमांमधून दिलेला संदेश आत्मसात करावा.

हे पुस्तक वाचून जेव्हा आपण एखाद्या देवळात दर्शनाला जाऊ तेव्हा त्याच्या रचनेकडे आपण जास्त डोळसपणे बघू. ते कुठल्या शैलीतलं आहे; त्याच्या "मंडोवर" म्हणजे बाह्य भिंत किती "जंघांचा" आहे; "मंडप" आहे का? "अंतराल", "शुकनासिका", "तोरण" आहे का नाही; द्वारपाल आहेत; गंगायमुना कशा चितारल्या आहेत; इ शोधायचा आपण प्रयत्न करू. काय आढळते काय आढळत नाहीये; आधी बघितलेल्या मंदिरांपेक्षा काय वेगळं आहे याचं आपण रसग्रहण करू असं मला वाटतं. त्यादृष्टीने हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी एक नवे ज्ञानदालन उघडणारे आहे. त्यात पुढे जाऊ इच्छूक संदर्भग्रंथ वचातीलच.

पण सुरुवात तरी नक्की करा. त्यासाठी पुस्तक आवर्जून वाचा. हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे मी ऑनलाईनच मागवलं होतं.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...