जरा जाउन येतो (jara jaun yeto)




पुस्तक - जरा जाउन येतो (jara jaun yeto)
लेखक - दि. बा. मोकाशी (D. B. Mokashi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १९३
प्रकाशन - प्रतिमा प्रकाशन जून १९८७
ISBN - दिलेला नाही

दि. बा. मोकाशी हे मराठी साहित्य क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव. परंतु याआधी मी त्यांची पुस्तकं वाचली नव्हती. "देव चालले" ही त्यांची कादंबरी आणि "आमोद सुनासी आले" ही कथा; यांच्या बद्दल वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वाचनात आलं त्यामुळे यावेळी उत्सुकतेने मी मोकाशींचं पुस्तक घेतलं. हा त्यांचा कथासंग्रह आहे. सरोजिनी वैद्य आणि माधुरी पणशीकर यांनी कथांची निवड केली आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी कथांचं रसग्रहणही केले आहे.

अनुक्रमणिका 


सगळ्याच कथा अतिशय छान गुंगवून ठेवणाऱ्या आहेत. एकेका विशिष्ट प्रसंगावर त्या कथा आधारलेल्या आहेत. प्रसंगात दृश्य स्वरूपात जे घडतं त्याचबरोबर त्यातल्या मुख्य पात्राच्या मनात काय करतो याचं चित्र मोकाशींनी रेखाटलं आहे. प्रसंग खूप नाट्यमय किंवा क्वचितच घडणारे असे नाहीत. अगदी साधे साधे आहेत. सर्वसामान्य मध्यमर्गीय लोकांचे आपले स्वतःचे अनुभव असतील तर काही आजूबाजूला पाहिलेले. प्रत्येक घटनेत त्यावेळी सामील असणाऱ्या माणसांच्या पिंडानुसार त्याचे मनात उठणारे तरंग निराळे. म्हणूनच प्रसंग साधे असले तरी अशा-अशा वेळी अशा-अशा स्वभावाची व्यक्ती असेल तर काय घडेल हे वाचणं रंजक ठरतं. 

काही गोष्टी मधल्या मुख्य प्रसंगांबद्दल सांगतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल.

"गोष्टीची मोहिनी" - दोन सख्ख्या भावांची भांडण आणि त्यातून होणारा रुसवा,

"रोमच्या सुताराची गोष्ट", "काय रानटी लोक आहेत!" - नवीनच प्रेम जोडून आलेल्या जोडप्यांचा लाडिकपणा. एका गोष्टीत शारीरिक जवळीकीची उत्सुकता तर दुसऱ्या गोष्टीत अशा जवळची पेक्षा मनं जुळण्याची उत्सुकता.

"आपला तुपला चहा"- संसाराच्या रगाड्यात गुंतला गृहस्थ जेव्हा तासभर घरात कोणी नाही तेव्हा ती शांतता एन्जॉय करायची ठरवतो. पण शांततेची सवय नसल्यामुळे अधिकच अस्वस्थ होतो

"मजोर"- एका प्राणीसंग्रहालयातल्या पिंजऱ्यात हरणांच्या रूपात नवीन जन्मलेले पिल्लू मोठं होत आहे आणि प्रमुख नराशी स्पर्धा देऊ लागतं.

"लेणी"- एक जोडपं लेणी बघायला गेलं आहे. त्या लेण्यांचं सौंदर्य आणि त्याचा इतिहास तरुणाला इतकं मंत्रमुग्ध करतो आहे की त्याला आपली प्रेयसीचा सुद्धा क्षणभर विसर पडतो. आजूबाजूच्या गावातले लोक अपल्यासुरखे इतके भारावून कसे गेले नाहीत म्हणजे किती आरसिक आहेत असं वाटतं.

"आमोद सुनासी आले" - ह्या कथेवर "दिठी" नावाचा मराठी चित्रपट आला होता त्या कथेत मुलाचं अकाली निधन सोसणारा बाप गावातल्या गाईचं बाळंतपण करायला दुःख विसरून पुढे जातो हा जन्म मृत्यूचा खेळ रंगवला आहे.

"वास्तू"-एका व्यक्तीला स्वतःचं घर बांधायचं असतं वाटेत फिरताना त्याला रिकामा प्लॉट दिसतो आणि त्या प्लॉटवर घराचं बांधकाम चालू असतं. कोण घर बांधेल कसं घर बांधलेले याची उत्सुकता आणि दुसऱ्याचं घर पूर्ण होतंय याचा कुठेतरी हेवा. घर बांधताना खोदकामामध्ये मातीतली मुंग्यांची वारुळे, उंदरांची बिळे, सापांची बिळे, झाडावरची घरटी नष्ट होत आहेत म्हणजे प्राण्यांची घरे पाडून माणसाचं घर बनतय असा एक तात्विक भाग ही मनात आहे. अशा या भावभावनांचं सुंदर मिश्रण यात आहे.

"डोंगर चढण्याचा दिवस"- मुलं मुलं मिळून गावाजवळच्या डोंगरावर डोंगर चढाई करायला जातात जंगलाची वाट अवघड चढण हे सगळं अनुभवतात आणि परत येतात म्हटलं तर वेळोवेळी धडपडायची अगदी जीव जाण्याची शक्यता होती पण बालपणात ते कळत नाही मोठेपणी मात्र छोट्या छोट्या गोष्टीतही भीती वाटते याची गंमत दाखवणारी कथा.

"जरा जा
न येतो"- सगळं सुखवस्तू संसार असूनही अचानक विरक्ती येऊ नाहीसा झालेल्या माणसाची गोष्ट

"तिसरी हकीकत" - एक सिद्धहस्त, प्रसिद्ध असा लेखक पण स्वतःच्या बायकोच्या मनात डोकावायचं कधी त्याच्या लक्षात नाही आलं. पण "क्रिएटिव्ह ब्लॉक" आल्यावर जेव्हा तो बायकोकडे वळतो तेव्हा.

काही पाने वाचून बघा.
गावाजवळच्या डोंगरात वणवा लागला. गावकऱ्यांची धावपळ सुरु झाली. ती डोळ्यासमोर उभे करणारे वर्णन 





"लेणी" गोष्टीतला प्रसंग 




लहान मुलांचा डोंगर चढण्याचा अनुभव. आणि ह्याच अनुभवाकडे पोक्त झाल्यावर बघितलं की किती वेगळाच विचार डोक्यात येतो.




मोकाशींची भाषा साधी सरळ अर्थवाही आहे. पण तरीही प्रसंग चपखल डोळ्यासमोर उभा करणारी आहे. गुंतवून ठेवणारी आहे. सुखदुःख, आशा-निराशा, जन्म-मृत्यू,भूतकाळातल्या गोष्टींची आठवण तर येणाऱ्या काळाबद्दल हुरहुर, चुकांबद्दल पश्चाताप तर नवं काही करायची भीती.... अशा एक ना अनेक मानवी भावभावनांचं सुंदर चित्रण या सर्व कथांमधून घडतं. मराठी साहित्यप्रेमींना एकाच वेळी हलकंफुलकं पण त्याचवेळी अतिशय गहन जीवनदर्शन घडवणाऱ्या या गोष्टी आहेत. नक्की आवडतील.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- कथा आवडणाऱ्यांनी आवा ( आवर्जून वाचा )
                                         इतरांनी जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...