
पुस्तक - Dawn to dusk - A thrilling tale of emirates (डॉन टू डस्क - अ थ्रिलिंग टेल ऑफ एमिरेट्स)
लेखिका - Sophiya Vednesan (सोफिया वेडनेसन)
भाषा - English इंग्रजी
पाने - १२१
प्रकाशन - स्वयंप्रकाशित
ISBN - 978-93-5780-367-0
लेखिका - Sophiya Vednesan (सोफिया वेडनेसन)
भाषा - English इंग्रजी
पाने - १२१
प्रकाशन - स्वयंप्रकाशित
ISBN - 978-93-5780-367-0
कुठल्याही कंपनीचा admin विभाग कंपनीतले कॉर्पोरेट इव्हेंटचे आयोजन, परदेशांतून किंवा इतर कंपन्यांमधून पाहुणे येणार असतील तर त्यांच्या दौऱ्याचं, भेटीगाठींचं पूर्ण नियोजन करणे, कंपनीद्वारे होणाऱ्या सामाजिक कामांचे नियोजन करणे, वेगेवेगळे समारंभ साजरे करणे इ. नानाविध कामे करत असतो. २००७ ते २०१७ ह्या वर्षांत लेखिका संयुक्त अरब अमिरातीतल्या कंपन्यांमध्ये सेक्रेटरी किंवा ॲडमिनिस्ट्रेशन विभागात काम करत होत्या. तेव्हा त्या मध्यमवयीन होत्या. नवरा, दोन लहान शाळकरी मुलं, सासू-सासरे, आई, भाऊ असं कुटुंब भारतात होतं. मध्यमवर्गीय घरात नवराबायको दोघांनी काम करून पैसे कमावले तर मुलांचं शिक्षण आणि भविष्य जास्त चांगलं, सुरक्षित करता येतं; ह्यानुसार त्या भारतात नोकरी करत होत्या. पण त्यांच्या परिचिताकडून यूएइ मधल्या एका नोकरीचं त्यांना कळलं. जास्त पैसे, जास्त बचत आणि कुटुंबाला जास्त आधार ह्या विचारातून त्या तिथे गेल्या. राहिल्या. वेगवेगळ्या कंपन्यांत नोकऱ्या केल्या. त्यांच्या वास्तव्याचे हे अनुभव कथन आहे.
हे अनुभवांना वेगवेगळे पदर आहेत. पहिला पदर आहे वैयक्तिक भावनांचा. नोकरी-व्यवसायासाठी आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाला जाणवणारी जी घराची ओढ असते, घराची आठवण येत राहते ते ह्यात दिसतं. पण एक आई म्हणून आपली लहान मूल सोडून जाताना त्याची तीव्रता अधिक होते. म्हणून ह्या वास्तव्यात कुटुंबियांशी त्या व्हिडीओ कॉल वर कशा बोलायच्या, मुलांच्या छोट्या छोट्या कामासाठी - समारंभासाठी ड्रेस ठरवणे सारख्या - ह्याबद्दल सुद्धा फोनवर त्या बोलून आपली उणीव कमी भासेल ह्याचा प्रयत्न करायच्या. मात्र मुलांचं आजारपण, मुलीचं वयात येणं अशा महत्त्वाच्या प्रसंगी आपण "तिथे" नाही ह्या जाणीवेने त्या व्याकुळ झाल्या. एकदा त्यांचं पूर्ण कुटुंब UAEत स्थायिक झालं. पण नोकरीमधल्या त्रासामुळे सर्वांनाच चंबूगबाळं आवरून परत भारतात यावं लागलं. असे कितीतरी अनुभव त्यांनी पुस्तकात लिहिले आहेत. बहुतेक वेळा आपण अश्या अनुभवांबद्दल फार बोलत नाही. मोघम बोलतो. पण "बोला, संवाद साधा, मोकळं व्हा" ह्यावर विश्वास असणाऱ्या लेखिकेने भरभरून लिहिलं आहे. परदेशात राहताना आपण नवीन मित्र-मैत्रिणी जोडतो. जिवाभावाचे लोक भेटतात. परदेशात तात्पुरते का होईना तेच आपलं कुटुंब होतं. ते अडचणीत साथ देतात; त्यांच्याबरोबर आपण आनंद साजरा करतो. अशा व्यक्ती कशा भेटल्या. त्यांच्याबरोबरच्या गमतीजमती व काही धमाल किस्से ह्यात आहेत.
अनुभवांचा दुसरा पदर सामाजिक. एक बाई एकटी परदेशात आली आहे; पुरुषांबरोबर मोकळेपणाने बोलते आहे; आत्मविश्वासाने वावरते आहे हे बघितल्यावर तिथल्या भारतीयांचा आणि कंपनीतल्या इतर लोकांचा दृष्टिकोन कसा असावा ? एकटी बाई म्हणून मदत करणारे हात पुढे आलेच तसेच; "घरी काहीतरी बिनसलं असेल म्हणून आली असेल", "चांगल्या चालीची नसेल; माझ्या नवऱ्याला नादी तर नाही ना लावणार?" असा विचार करून अंतर राखणारे लोकही होते. एकट्याने बाहेर फिरताना तिथल्या टपोरी लोकांचा भीतीदायक अनुभव सुद्धा आला. प्रत्येकवेळी ह्या भीतीला आणि दुस्वासाला कसं तोंड दिलं; स्वतःचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कसा राखला हे लेखिकेच्या शब्दांतच वाचलं पाहिजे.
अनुभवांचा तिसरा पदर आहे खास स्थानिक अनुभवांचा. पर्यटक म्हणून युएई ला जाणं वेगळं आणि कामासाठी तिथे राहणं वेगळं. पुण्यात पेठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जशी "कॉटबेसिस" वर राहण्याची सोय उपलब्ध असते तसाच प्रकार तिथे आहे. पण आपल्यापेक्षाही विचित्र अवस्था तिथे आहे. केवळ पुट्ठे किंवा पडदे लावून "वेगळ्या" केलेल्या खोल्या; सामायिक गॅस-फ्रीज-स्वच्छतागृह; त्यावरून राहणाऱ्या लोकांची भांडाभांडी ह्याचे धमाल किस्से त्यात आहेत. त्या वादावादीतून अडचणीतून लेखिकेने इतक्यावेळा "घर"बदललं की विचारू नका. हे सगळं वाचताना हसावं की रडावं हे कळत नाही. आजूबाजूला जे पर्यटन केलं त्याचं सुद्धा ओझरतं वर्णन आहे. पण स्थलवर्णनाचा भाग फार थोडा आहे.
चौथा पदर आहे "लेखिकेने घेतलेला बोध - lessons learnt". प्रत्येक अनुभव सांगताना लेखिकेने घेतलेला बोध तिने "शब्दश:" ठळकपणे सांगितला आहे. म्हणजे अशी खास वाक्ये पानोपानी ठळक(बोल्ड) फॉन्ट मध्ये छापली आहेत. त्यातून स्वानुभवाचे बोल + स्वमदत पुस्तक (सेल्फहेल्प बुक) असं स्वरूप पुस्तकाला येतं.
आता काही पाने वाचून बघूया
पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती

ऑफिस मधल्या वरिष्ठांची दादागिरी.



नोकरीच्या दुसऱ्या कालावधीत भेटलेली प्रेमळ रूममेट... किराणा दुकानदाराचा घसट करण्याचा प्रयत्न



लेखिकेच्या आईची दुबई भेट. आपल्या कुटुंबियांना आपण अभिमानास्पद आहोत याचा आनंद देणारा क्षण



हे सगळं लिहिताना लेखिकेची निवेदन शैली खिळवून ठेवणारी आहे. सोफियांशी मी प्रत्यक्ष बोललो आहे. त्यामुळे त्या बोलताना जसं रंगवून रंगवून सांगतील (चांगल्या अर्थी) तसंच, उद्गारांसकट शब्दांकन केलं आहे. ह्या दहा वर्षांच्या काळात त्यांच्या आयुष्यात काही कौटुंबिक दुर्दैवी प्रसंग घडले. तर कामाच्या ठिकाणच्या प्रगतीचे चांगले प्रसंग सुद्धा. विमानाची भीती, भुताची भीती तर कधीकधी अतिरेकी सावधपणा ह्यामुळे झालेल्या गमतीजमती आहेत. म्हणून पुस्तक वाचताना आपण ही "रोलर कोस्टर" राईड अनुभवतो. वाचत राहतो. ही नाट्यमयता आपल्याला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवते.
मी ज्या कंपनीत काम करतो तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशन च्या प्रमुख सोफिया वेडनेसन ह्यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. नेहमी अतिशय उत्साही, कामात चोख. सुरक्षारक्षकापासून कंपनीच्या अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाशी आत्मीयतेने आणि आत्मविश्वासपूर्व बोलणे; आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन करून समारंभात जोश भरणे ह्यातून समोरच्याशी त्या सहज संवाद साधतात. कंपनीच्या कामाव्यतिरिक्त सामाजिक कार्यात - महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, गरीब-दुर्बल कुटुंबातील मुलींसाठी अशा स्वच्छतेचे महत्त्व तसेच भिन्नलैगिक व्यक्तींच्या हक्कासाठी होणाऱ्या कामातही त्या सक्रिय हातभार लावतात. त्यांचे अनुभव अगदी मोकळेपणे त्या सांगतात तेही त्यांच्या साभिनय सादर करण्याच्या रंजक शैलीत. त्यामुळे त्यांनी असं पुस्तक लिहिलं आहे हे त्यांच्या लिंक्डइन पोस्टवर बघितलं तेव्हा पुस्तकाबद्दल कुतूहल वाटलं. उत्तम वक्तृत्त्व असणाऱ्या सोफियांचं हे पहिलं पुस्तक, तेही त्यांच्या अनुभवांवरचं ! म्हणजे ते रंजक असेलच अशी खात्री वाटली. त्यामुळे लगेच ऑनलाईन विकत घेतलं. ह्या पुस्तकाने निराशा केली नाही. खूप मजा आली. ह्यात सोफियांनी लिहिलेले अनुभव त्या आमच्या कंपनीत येण्यापूर्वीचे आणि त्याबद्दल आमचं कधी बोलणं झालं नव्हतं असे आहेत. त्यामुळे सोफिया परिचित आहेत म्हणून त्यांचं पुस्तक घेतलं हे खरं असलं तरी मी एक त्रयस्थ वाचकच होतो. त्या परिचित नसत्या आणि पुस्तक योगायोगाने हातात पडलं असतं तरी ते आवडलं असतं असं वाटलं. म्हणूनच हे सविस्तर परीक्षण आणि हे थोडं "डिस्क्लेमर" :)
व. पु. काळे ह्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे As you write more and more personal it becomes more and more universal. हे आत्मकथन मला त्यातलं वाटलं. फार मोठे, यशस्वी, प्रसिद्ध लोकच नाही तर तुमच्यामाझ्यात वावरणारे; आपल्याला रोज भेटणारे लोक सुद्धा त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या कुटुंबासाठी कसे "हिरो" असतात; आणि आपणसुद्धा तसे होऊ शकतो हा आत्मविश्वास जागवणारे हे आत्मकथन आहे. नक्की वाचा.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————