Droupadi Murmu (द्रौपदी मुर्मू)




पुस्तक - Droupadi Murmu (द्रौपदी मुर्मू)
लेखिका - Kasturi Ray (कस्तुरी राय)
भाषा - English इंग्रजी
पाने - २४२
प्रकाशन - रूपा पब्लिकेशन. २०२३
ISBN - 978-93-5702-200-2

भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू ह्यांचा वैयक्तिक आणि राजकीय आयुष्याचा मागोवा घेणारे हे पुस्तक आहे. ओडिसातल्या मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा गावात द्रौपदी मुर्मू ह्यांचा जन्म झाला. जन्मनाव "पुत्ति तुडू". आदिवासीबहुल आणि प्राथमिक सुविधांपासून वंचित असं हे दूर वसलेलं खेडं आणि त्यातलं संथाळ जमातीचे स्थानिक "प्रधान" असणारे "तुडू" कुटुंब. "प्रधान" असले तरी सततच्या दुष्काळामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती काही विशेष नव्हती. मात्र वडिलांना आपल्या मुलीने शिकावं असं वाटत होतं. त्यामुळे गावात प्राथमिक शिक्षण मग दुसऱ्या गावात जाऊनयेऊन माध्यमिक शिक्षण त्यांनी घेतलं. शाळेतल्या शिक्षिकेने त्यांना "द्रौपदी" हे नाव दिलं. पुढे भुवनेश्वरला सरकारी कॉलेज मध्ये आदिवासींसाठी मोफत शिक्षण आणि निवासाची सोय असलेल्या ठिकाणी राहून त्यांनी आर्टस् चं शिक्षण घेतलं. मुर्मू ह्यांचा ह्या प्रवासाचा वेध लेखिकेने घेतला आहे. त्यासाठी मुर्मू ह्यांच्या जुन्या मुलाखती, त्यांच्या शाळाकॉलेज मधले वर्गमित्र, जुने परिचित ह्यांच्याशी संवाद साधून "लहान द्रौपदी" कशी होती हे लेखिकेने शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासू, गंभीरवृत्ती, स्वतःच्या गरिबीची लहानपणापासून जाणीव असल्याने आहे त्यात समाधान मानायचा विचार, शाळेतून बाणवली गेलेली शिस्त, कला-क्रीडा ह्यांची आवड अशी स्वभाव वैशिष्टये आपल्याला दिसतात.

घरच्या गरिबीमुळे कॉलेज पूर्ण करण्यापूर्वीच समोर आलेली नोकरीची संधी त्यांनी घेतली. त्यांचा विवाह झाला. "द्रौपदी तुडू" च्या "द्रौपदी मुर्मू" झाल्या. आदिवासी समाजाच्या रीतीनुसार नवरा मुलगा मुलीच्या आईवडिलांना हुंडा देतो आणि मुलीचे आईवडील भाव खातात. त्यामुळे श्याम चरण मुर्मू ह्यांनी द्रौपदीच्या आईवडिलांना मागे लागून लागून कसं राजी केलं हे पुस्तकात आहे. भुवननेश्वरला नोकरी, पतीची बदली होणारी नोकरी, माहेरचं गाव एकीकडे, तर सासरचं गाव दुसरीकडे अशी संसारिक कसरत सुरु झाली. नोकरी, मुलं, घर ह्याच्या जबाबदाऱ्या पेलत असतानाच त्यांच्या एका मुलाचं वयाच्या तिसऱ्या वर्षीच निधन झालं. नोकरी सोडून त्यांना सासरगावी रायरंगपूर ला यावं लागलं. पुस्तकाच्या ह्या टप्प्यावरसुद्धा लेखिकेने मुर्मू ह्यांचे सहकारी आणि नातेवाईकांच्या मुलाखतींतून हे प्रसंग व मुर्मूंचे तेव्हाचे वर्तन मांडले आहे.

रायरंगपूरला शिक्षिका म्हणून काम करू लागल्यावर त्या मुलांच्या आवडत्या शिक्षिका कशा झाल्या. सुशिक्षित आणि नोकरी केलेली असल्यामुळे तेव्हा सामाजिक कामांत त्या भाग घेऊ लागल्या. ह्याचं सविस्तर वर्णन आहे. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर राजकारणाने प्रवेश केला. स्थानिक पालिकेच्या निवडणुकीत त्या राहत असलेला भाग अनुसूचित जमातींसाठी राखीव झाला होता. त्यामुळे सुशिक्षित आणि योग्य उमेदवारांची कमतरता जाणवणाऱ्या ह्या समाजातील मुर्मूंकडे राजकीय पक्षांचं लक्ष गेलं. मुर्मूंनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी ह्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले. पूर्णपणे अपरिचित क्षेत्र, पारंपरिक विचारांचं घर ह्यामुळे सुरुवातीला त्यांनी नकार दिला. पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न आणि पतीची साथ ह्यातून त्यांनी होकार दिला. निवडणूक लढवली आणि निवडूनही आल्या. नगरसेविका पदावर त्यांनी स्थानिक स्वच्छता, शाळा, प्रथामिक सुविधांवर लक्ष केंद्रित केलं. गरिबीचं आणि समस्यांचं आयुष्य स्वतः जगलेलं असल्यामुळे लोकांचे खरे प्रश्न सोडवण्याची तळमळ ह्यातून दिसते.

पुढे आमदारकीची निवडणूक त्या जिंकल्या. ओडिशा मध्ये मंत्री झाल्या. त्याचा आढावा पुस्तकात आहे. त्यात थोड्याच प्रसंगांचा उल्लेख आहे. पण आहेत तेच प्रसंग फार वर्णन करून, तपशीलवार सांगितले आहेत. संथाळी समाजाची "संथाळी" भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषांमध्ये यावी ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्याला यश आले. पुस्तकात मंत्री म्हणून त्यांनी केलेली आणि फार छाप सोडणारी कामं दिसली नाहीत. पण सभ्य आणि स्वच्छ वर्तणुकीने खात्याचं नियमित काम त्यांनी केलं असंच जाणवतं. पुढे खासदारकीच्या निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावं लागलं.

वैयक्तिक आयुष्यात एक भयानक दुःखद पर्व आलं. त्यांच्या एका मुलाचा ऐन तारुण्यात अचानक मृत्यू झाला. थोड्याच वर्षांत दुसऱ्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. आणि त्यापाठोपाठ पतीचाही. आई आणि भाऊही त्याच काळात जग सोडून गेले. त्या खचल्या, कोलमडून पडल्या. पुन्हा उभ्या राहिल्या पुन्हा कोलमडल्या. पुन्हा सावरल्या. दुर्दैव जणू परीक्षाच बघत होते. तावून सुलाखून व्यक्तिमत्त्व घडवत होतं. ह्या काळातली त्यांची मनःस्थिती, स्वतःला पुन्हा उभं करणं, "प्रजापिता ब्रह्मकुमारी" ह्या अध्यात्मिक पंथाच्या विचाराची झालेली मदत, भाजप पक्षाने दिलेली साथ ह्याचं सविस्तर वर्णन पुस्तकात आहे.

पुढे त्या सहा वर्षे झारखंडच्या राज्यपाल होत्या. तेव्हा आदिवासींसाठी सरकार काम करेल ह्याची त्यांनी काळजी घेतली. आदिवासींच्या जमिनीविषयीची दोन विधेयके विधानसभेने पारित केली तरी; पूर्ण तपासाअंती ती अन्यायकारक आहेत हे जाणवल्यामुळे त्यांनी मान्यता न देता सरकारला परत पाठवण्याचा बाणेदारपणा दाखवला. राज्यपाल म्हणून विद्यापीठांच्या त्या पदसिद्ध कुलगुरू होत्या. हे पद फक्त शोभेचं न ठेवता "लोक दरबार"पद्धतीचे प्रकल्प राबवून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हजारो प्रलंबित खटले त्यांनी निकाली लावले. त्यासाठी न्यायमूर्तींची मदत घेतली. प्रशासन कामाला लावले. त्यांच्या घटनात्मक हक्क आणि मर्यादा ह्यांचे भान राखून "कृतिशील" राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले. ह्यांना प्रोत्साहन दिले. स्वतःसुद्धा एक शाळा चालवली. ह्या सगळ्या टप्प्याचे सविस्तर वर्णन पुस्तकात आहे.

राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावरही वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी भाषणांमधून शिक्षण, महिलासबलीकरण, आदिवासींचे हक्क इ. वर कसा भर दिला आहे. इतक्या व्यग्र दिनक्रमातही वेळोवेळी त्यांचे जुने मित्र, नातेवाईक सहकारी ह्यांच्याशी त्या संपर्क साधतात; प्रोटोकॉल सांभाळून लोकांशी मिसळण्याचा त्यांचा प्रयत्न करतात. अजूनही साधी राहणी आहे वगैरे वर्णन पुढील काही पानांत आहे.

पुस्तकातली काही पाने वाचूया

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

अनुक्रमणिका


बालद्रौपदी बद्दल




मंत्री द्रौपदी मुर्मू




राज्यपाल द्रौपदी मुर्मू



पुस्तकात काही नवीजुनी छायाचित्रे देखील आहेत



अश्या पद्धतीने राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मूंचा सामाजिक आणि वैयक्तिक संघर्ष; त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मिळालेल्या जबाबदाऱ्या आणि मिळालेले अधिकार ह्याचा वापर त्यांनी कसा केला हे जाणवते.

पुस्तक हे एका गौरव ग्रंथसारखे आहे. मुर्मूंच्या नकारात्मक बाजू किंवा कमकुवत बाजू ह्यात येत नाहीत. त्यांचे विरोधक, टीकाकार ह्यांची मते ह्यात नाहीत. आमदार, मंत्री, राज्यपाल म्हणून त्यांना अजून काय करता येऊ शकलं असतं, काय करायला जमलं नाही ह्याचं विश्लेषण हवं होतं. त्या निवडणुकीत पराभूत का झाल्या ह्याची कारणमीमांसा हवी होती. त्यातून पुस्तक अजून दखलपात्र झालं असतं. "राज्यपाल" आणि "राष्ट्रपती" ह्या पदावरील व्यक्ती सरकारच्या सल्ल्याने काम करतात;सामाजिक समारंभांमध्ये प्रमुख पाहुणे असतात. त्यांच्या हातून उद्घाटन झालेली कामे किंवा भाषणे हे एका अर्थी सरकारचं काम असतं. काही वेळा ही कामे सुद्धा मुर्मूंनी केल्यासारखे वर्णन आहे. ते जरा अतिशयोक्त वाटतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहितानाही साधेपणा; कर्तव्यनिष्ठा वगैरे मुद्दे पुन्हा पुन्हा मांडून, लोकांची अवतरणे उद्धृत करून कापूस पिंजल्यासारखा मजकूर वाढवला आहे. आणि फार गोड-गोड वर्णन केलं आहे. एक माणूस म्हणून द्रौपदी मुर्मू ह्यांचा चांगला परिचय पुस्तकातून झाला तरी, राजकारणी मुर्मू समजून घेण्यासाठी अजून एखादं पुस्तक वाचावं लागेल अशी भावना पुस्तक पूर्ण करताना मनात आली. 
आपल्या राष्ट्रपतींचा प्रगतीचा प्रवास सामाजिक, आर्थिक आणि भावनिक संघर्षांतून कसा झाला ही प्रेरणादायी कहाणी समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचा.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

It ends with us (इट एन्ड्स विथ अस)





पुस्तक - It ends with us (इट एन्ड्स विथ अस)
लेखिका - Colleen Hoover (कॉलिन हूवर)
भाषा - इंग्रजी (English )
पाने - ३७६
प्रकाशन - Atria Paperback , २०१६
ISBN - 978-1-5011-10368

ही कॉलिन हूवर लिखित एक प्रेमकहाणी आहे. प्रेमाचे वेगवेगळे पैलू, प्रेमाचे वेगवेगळे टप्पे गुंफणारी ही कादंबरी आहे. वयात येतानाच्या काळातलं प्रेम, कॉलेजमधलं प्रेम, थोडं मोठं झाल्यावर देखणेपणावर, व्यक्तिमत्त्वावर भाळून केलेलं प्रेम, लग्नानंतरचं प्रेम, जोडीदाराच्या नकारात्मक बाजू दिसल्यावरचं प्रेम, प्रेमाचा त्रिकोण हे सगळं ह्यात आहे. त्याचबरोबरीने कादंबरीचा एक समांतर अंतःस्थ प्रवाह आहे. तो म्हणजे - आईवडिलांच्या नात्यातल्या प्रेमाचा आणि घरगुती हिंसेचा मुलांवर होणारा परिणाम; आणि मोठेपणी त्यांच्या प्रेमसंबंधांवर होणारा परिणाम.

कथेची नायिका लिली हीच निवेदिका आहे. ती आपल्याला आज काय झालं हे सांगायला सुरुवात करते. तिच्या वडिलांच्या निधनाच्या शोकसभेत ती वडिलांबद्दल काहीच चांगलं बोलू शकली नाही ह्याबद्दल ती अस्वस्थ आहे. अशाच अवस्थेत तिला रायल किंकेड (Ryle Kincaid) भेटतो. तोही थोडा विमनस्कच आहे. पण ते एकमेकांकडे आकर्षित होतात. हे सगळं भारतातल्या नायिकेबाबतीतही घडू शकतं. पण ही गोष्ट खास अमेरिकन आहे हे आपल्याला सुरुवातीपासून जाणवतं. कारण, भारतात कसं असतं... पहिली भेट, मग ओळख, मग जुजबी बोलणं, प्रेमाच्या आणाभाका, मग शारीरिक जवळीक; तीही बहुतेकदा लग्नानंतरच. पण ह्या अमेरिकन गोष्टीत रायल थेट तिला विचारतो "माझ्याशी एकदा शरीरसंबंध करशील का? एकदाच ! मला पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला भेटायला आवडत नाही" :) त्यांचं तसं काही होत नाही. पण बोलचाल सुरु होते.

लिलीला पूर्वी डायरी लिहायची सवय असते. लिली ती डायरी काढून वाचायला लागते. त्यातून तिच्या लहानपणीच्या प्रेमप्रकरणाबद्दल - ॲटलास बद्दल - आपल्याला कळतं. पुढे वर्तमानातले प्रसंग आणि डायरी वाचनातून जुने प्रसंग ह्यांची छान गुंफण घातली आहे. ह्यापुढची गोष्ट सांगणं म्हणजे रसभंग होईल.

पण इतकंच सांगतो की, लिलीच्या आईच्या वाट्याला जो त्रास आला तोच लिलीला सुद्धा भोगावा लागतोय कि काय अशी परिस्थिती निर्माण होते. आईने जे भोगलं त्याचा लिलीवर मानसिक परिणाम झाला. आता तिने जर भोगलं तर तिच्या मुलीवर परिणाम होईल का? ते टाळायचं का स्वीकारायचं ह्याची द्विधा मनःस्थिती लिलीची होते. म्हणून It ends with us - हा निर्णय आपल्यापाशीच येऊन थांबतो; असं समर्पक शीर्षक पुस्तकाचं आहे. आणि हा निर्णय घेणं कठीण असतं कारण पुस्तकाच्या पाठपानावर म्हटलं आहे तसं Sometimes the one who loves you is the one who hurts you the most. लेखिकेने हा सगळा प्रवास ताकदीने मांडला आहे.

प्रसंगांच्या ओघात ह्या तिघांचे कुटुंबीय कथेत येतात. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला अमेरिकन कुटुंबसंस्थेतले अनेक प्रकार/समस्या दिसतात. लिव्ह-इन मध्ये राहणं, आईवडिलांचा घटस्फोट आणि आईचं दुसरं लग्न झाल्यामुळे सावत्र वडिलांबरोबर वाढणं; तसंच सावत्र घरी न घेतल्यामुळे बेघर होणं, १६ वर्ष झाली की लैंगिक संबंधांना मुक्त परवाना - आईवडील पण काही बोलू शकणार नाहीत. एकटं वाटलं कि डेट वर जाणं आणि तेवढ्यापुरतं बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड बनवणं. मोठं झाल्यावर स्वतंत्र राहणं. आपलं आपलं लग्न ठरवणं. म्हातारे झाले तरी सतत जोडीदाराचा शोध चालूच राहणं. म्हताऱ्या आईचा बॉयफ्रेंड आपल्या दिवंगत वडिलांसारखा नाही हे समजून सुखावणं इ.

सगळी पात्र छान रंगवली आहेत. हाडामासाची माणसं. आपलेआपले गुणदोष असलेले. पुस्तकाची पहिली शंभरेक पानं वाचताना असं वाटतं की ही एक नेहमीची प्रेमकथा आहे. देखणा, उमदा, यशस्वी, आदर्श नायक आणि त्याच्या प्रेमात पडलेली हळवी नायिका. तिच्या डायरील्या प्रसंगांचा चालू घडामोडीशी काय संबध हे कळत नाही. पण नंतर कथानक वेग घेत. आधी मांडलेले सगळे बिंदू एकत्र येऊन आकार घेऊ लागतात. उत्कंठा वाढवतात. पुढे काय होईल? लिली, रायल, ॲटलास कसे भेटतील; कसे वागतील ह्यात आपण रंगून जातो. पुन्हा पुन्हा डाव मांडतात, भांडतात, मोडतात आणि वाचकाला "रोलर कोस्टर राईड" घडवतात. तसंच विचारप्रवणही करतात.

ही प्रेमकथा आहे आणि वर म्हटलं तसं मुक्त शरीरसंबंधांचे संदर्भ असले तरी पुस्तकात शृंगाराची उत्तान वर्णने नाहीत. सूचक वाक्ये लिहून फक्त प्रसंगनिर्मिती करायची मर्यादा लेखिकेने पाळली आहे.

काही पाने वाचा
पहिला प्रसंग जेव्हा अनोळखी दोघं एकमेकांना आपापल्या समस्या सांगतात. आणि वर म्हटलं तसं, थेट शारीरिक जवळिकीचं आमंत्रण.
 


लिली च्या डायरीतलं एक पान. ज्यात ती अमेरिकन विनोदी कलाकार एलन ला उद्देशून सगळं लिहीत असते. आपल्या भावना मोकळ्या करते.
 


अमेरिकन लग्न...म्हणजे ते होण्याआधीपासूनच सुरु झालेले रोमँटिक दिवस.
 


एकूणच ज्यांना प्रेमकादंबऱ्या, भावनिक कादंबऱ्या वाचायला आवडतात त्यांना हे पुस्तक रुचेल. इंग्रजी खूप सोपं ओघवतं आहे. मूळ इंग्रजी लेखकांच्या कादंबऱ्या वाचताना मला नेहमी हे जाणवतं की भारतीय इंग्रजी लेखक विनाकारण क्लिष्ट इंग्रजी लिहितात. नेटवर शोधताना असं कळलं की लवकरच ह्या कादंबरीवर इंग्रजी चित्रपट सुद्धा येणार आहे.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-
प्रेमकहाण्या आवडत असतील तर जवा ( जमल्यास वाचा )
नाहीतर वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...