बायकांत पुरुष लांबोडा (Baykant Purush Lamboda)



पुस्तक - बायकांत पुरुष लांबोडा (Baykant Purush Lamboda)
लेखक - डॉ. शंतनू अभ्यंकर (Dr. Santanu Abhyankar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २०७
प्रकाशन - विश्वकर्मा पब्लिकेशन्स, ऑक्टोबर २०२२
ISBN - 978-93-93757-37-1
छापील किंमत - रु. ३००/-


मागच्या वर्षी प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता आयुष्मान खुराणा याचा "डॉक्टर जी" नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. स्त्रीरोगतज्ञ/प्रसूतीशास्त्र म्हणजे गायनाकोलॉजी शिकणारा मुलगा असतो तो. स्त्रियांच्या खाजगी अवयवांची चर्चा मुलांनी करणे नेहमीच्या आयुष्यात आपण असभ्य समजतो. पण इथे तर त्या मुलाला त्याचा अभ्यास करायचा होता. त्यातून आलेले ओशाळलेपण, गोंधळलेपण, इतकंच काय महिला सिनियर्सनी केलेले रॅगिंग, प्रसूतीची पहिली केस हाताळायचा अनुभव वगैरे अनेक प्रसंग त्यात विनोदी पण संवेदनशील पद्धतीने गुंफले होते. मस्त होता चित्रपट. या चित्रपट प्रदर्शनाच्या आसपासच याच विषयाशी संबंधित शीर्षक असलेलं डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचं "बायकांत पुरुष लांबोडा" हे पुस्तक प्रकाशित झाल्याचं कळलं होतं. त्यामुळे तेव्हापासून या पुस्तकाची उत्सुकता होती. आता वर्षभराने ते पुस्तक विकत घेऊन वाचण्याचा योग आला.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती


डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे नाव वेगवेगळ्या वृत्तपत्रातल्या त्यांच्या लेखांमुळे अनेकांना माहिती असेलच. ते स्वतः प्रसूती आणि स्त्रीआरोग्यतज्ञ तज्ञ डॉक्टर आहेत. पण पुस्तकाच्या शीर्षकांशी संबंधित एकच लेख या पुस्तकात आहे. पण बाकीचे बहुतांश लेख एकूणच वैद्यकशास्त्रावर आधारित आहेत. तर एक दोन समाजशास्त्रावरचे लेख आहेत.

पुस्तकाच्या पहिल्या भागात त्यांनी आपला डॉक्टर होण्याचा प्रवास कसा झाला हे सांगितला आहे. एमबीबीएस होण्याआधी ते चक्क होमिओपॅथी डॉक्टर होते. होमिओपॅथीचा अभ्यास करताना होमिओपॅथी हे आधुनिक विज्ञानाला पटणारी नाही, तर्कशुद्ध नाही याची त्यांना खात्री पटली. म्हणून त्यांनी होमिओपॅथी कोर्स पूर्ण करूनही त्याची प्रॅक्टिस केली नाही. तर पुन्हा मेडिकल प्रवेश परीक्षा देऊन एमबीबीएसला ॲडमिशन घेतली. पुढे ग्रॅज्युएशन वगैरे केलं. पुस्तकाचा पहिला भाग त्यांच्या ह्या वर्षांवर आहे. होमिओपॅथी हे छद्मविज्ञान कसं आहे, तर्काच्या कसोटीवर कसं उतरत नाही याबद्दल त्यांनी त्यांची मतं ठामपणे मांडली आहेत. "व्हायटल एनर्जी" असं काहीतरी सिद्ध न करता येणाऱ्या तत्वांवर ती आधारित आहे, होमिओपॅथी डॉक्टर पण कसे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात; शिक्षक सुद्धा प्रामाणिक उत्तरं न देता "आहे हे असं आहे" अशी उत्तरं देतात, ॲलोपॅथीला नावं ठेवणं शिकवलं जातं वगैरे अनुभव त्यांनी सांगितले आहेत. हा लेख पूर्वी एका मासिकात प्रकाशित झाला होता. साहजिकच त्यावर होमिओपॅथिक डॉक्टरांच्या आणि होमिओपॅथी मानणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. लेखकाने त्यातील प्रातिनिधीक प्रतिक्रिया पुस्तकात दिल्या आहेत. लेखकाच्या मताचा टोकाला जाऊन विरोध करणारे, प्रसंगी त्यांची खिल्ली उडवणारे असे लेख सुद्धा छापण्याचं धाडस लेखकाने दाखवलं आहे. सर्व प्रतिक्रियांना प्रत्युत्तर म्हणून स्वतः लिहिलेला एक दीर्घ लेख यात आहे. अश्याप्रकारे पुस्तकाची पहिली ८० पाने होमिओपथी विरुद्ध ॲलोपथी अश्या वादावर आहेत. त्यानंतरच्या लेखात सुद्धा ॲलोपॅथी( किंबहुना आधुनिक वैद्यकशास्त्र) हे कसं तर्क-प्रयोग-संशोधन ह्यावर आधारित आहे आणि इतर उपचार पद्धती अशा अशास्त्रीय आहेत याबद्दल छान समजावून सांगितलं आहे. एखाद्या औषधाने बरं वाटलं म्हणजे ते औषध योग्य असा अर्थ होत नाही. बरं "वाटलं" का रोगी बारा "झाला"? औषधामुळे बारा झाला आणि कशामुळे ? वगैरे संशोधन आधुनिक वैद्यकात होतं. निष्कर्ष समोर ठेवले जातात. इतर उपचार पद्धतीमध्ये तसं होत नाही हा त्यांचा मुख्य आक्षेप आहे आणि तो त्यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट करून सांगितले आहे. स्वतःच्या चुका मान्य करणं; आजच्या संशोधनानुसार योग्य वाटते आहे उद्या संशोधनांती चुकीचं ठरू शकतं हे मान्य करायला आधुनिक वैद्यक तयार आहे; इतर उपचारपद्धती नाहीत हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगून अधोरेखित केलं आहे. ह्या चर्चेतून वाचकांचे प्रबोधन नक्कीच होईल. दोन्हीकडचे साधक-बाधक मुद्दे कळतील. आणि ही चर्चा कधी सर्वमान्य निष्कर्षांपर्यंत पोचणार नाही याची जाणीव होते. शेवटी प्रत्येकाने आपल्या पुरता त्याचा निर्णय घेतला पाहिजे.

मग लेखांचा दुसरा टप्पा येतो. डॉक्टर म्हणून काम करताना येणारे अनुभव, काही आठवणी सांगितल्या आहेत. "जनरल प्रॅक्टिशनर" अर्थात जीपी म्हणजे असे डॉक्टर जे दुसऱ्या डिग्री घेऊन कोणाच्या हाताखाली काम करत शिकतात, दवाखाना थाटून लोकांना वैद्यकीय सेवा देतात, हळूहळू छोटी छोटी ऑपरेशन करायला लागतात आणि "स्पेशालिस्ट" डॉक्टरांना रुग्णपुरवठा करतात. अश्या जीपी लोकांची कामाची तऱ्हा कशी असते, जीपी लोकांचं आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांचे नातं कसं असतं ते खूप मजेशीर पद्धतीने सांगितलं आहे.

गायनॅकोलॉजिस्ट म्हणून येणारे मजेशीर अनुभव "बायकांत पुरुष लांबोडा" लेखात आहेत.  "ती बाई आणि ती सभा" या लेखात एका "केस"चा अनुभव आहे. त्यांच्या दवाखान्यात आलेल्या एका अत्यवस्थ बाळंतिणीचा मृत्यू झाल्यामुळे सरकारी चौकशीला सामोरे जावे लागले त्याचा अनुभव आहे. ती बाई वेगवेगळ्या दवाखान्यात जाऊन शेवटी लेखकाच्या दवाखान्यात पोचली. मरणासन्न अवस्थेतच. तिच्या अवस्थेवरून मृत्यू नैसर्गिकच दिसत होता. चौकशी मध्ये आधीच्या दवाखान्यांनीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या योग्य काम केले होतं हे दिसत होतं. पण अजून चौकशी झाल्यावर कळलं की त्या अत्यवस्थ अवस्थेत पोचण्याचं मूळ कारण काहीतरी वेगळंच आहे. खरोखरी घडलेली ही रहस्य कथाच आहे.

"भाषा डॉक्टरांची" आणि "मराठीचे प्रयोग" हे वैद्यकीय क्षेत्रातल्या गमतीजमती सांगणारे आहेत. प्रत्येक क्षेत्राचे काही पारिभाषिक शब्द असतात. तसेच नेहमीच्या शब्दांना ह्या क्षेत्रात काही वैशिष्टयपूर्ण अर्थ असतो. हे शब्द आपल्या सहकाऱ्याला योग्य आशय पोचवण्यासाठी कसे वापरले जातात त्यांची मजेशीर उदाहरणं दिली आहेत. तर शुद्ध सोपे मराठी प्रतिशब्द वापरून वैद्यकीय ज्ञान मांडता येतं हा त्यांचा निश्चय त्यांनी वेगवेगळ्या लेखांतून व भाषणातून कसा अमलात आणला त्याची उदाहरणे दिली आहेत. श्रोत्यांना त्याची गंमत वाटली, आश्चर्य वाटलं तर काही वेळा त्यातून समाजप्रबोधन सोपं झालं. खुद्द हे पुस्तक मराठी वापराचं जिवंत उदाहरण आहे. मराठी तांत्रिक शब्द वापरले आहेत. इंग्रजी शब्द वापरताना मराठी प्रतिशब्द सुद्धा दिला आहे. त्यामुळे त्यांचा मराठीचा प्रयोग 100% यशस्वी आहे. एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मराठीच्या अभिमानाचे पोकळ ढोल वाजवणारे लोक; "अमृताते पैजा जिंके" आणि "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" वगैरे म्हणत नुसते नाचगाणी करणारे लोक जर मराठीचा सक्रिय वापर करू लागली आणि तज्ञ मंडळी जर मराठीचा असा ज्ञानपूर्ण व सहज वापर करू लागली तर मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड कमी होईल हे नक्की.

पुढचे दोन लेख स्त्रीपुरुष लैंगिक संबंध आणि त्याबद्दल असलेले समज गैरसमज ह्यांवर आहेत. अश्लील(पोर्नोग्राफीक) चित्रफितींतून शरीरसंबंधाबद्दल नको नको त्या अपेक्षा मुलामुलींच्या मनात तरुण वयापासून डोक्यात बसतात. वयात आल्यावर कुतूहल असणं नैसर्गिक आहे. पण पॉर्न बघणं आवडू लागतं ते बऱ्याचवेळा व्यसनाचं स्वरूप घेतं. ज्याप्रमाणे दारू, अमली पदार्थ सुरुवातीला आनंद देतात पण नंतर त्यांच्याशिवाय राहणंच कठीण होतं, ती शरीराची गरज होते; तसंच ह्या अश्लील व्यसनाचंही होतं. हे असं का होतं; माणसाला व्यसन कसं लागतं; पुढे पुढे प्रत्यक्ष शरीर संबंधापेक्षाही विकृतदृश्यांची चित्र किती बघण्याचा शौक वाढत जातो; त्यासाठी शरीरातली हार्मोन कशी कारणीभूत ठरतात; त्यावर उपाय काय अगदी छान सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. "दारुडे"प्रमाणे "पॉर्नाडे" असा नवीन शब्द त्यांनी वापरला आहे.

पुस्तकाच्या पुढच्या भागातले पुढचे लेख कोरोनाविषयी आहेत. विषाणू(व्हायरस) म्हणजे काय, साथ का येत, का पसरते किंवा का पसरत नाही, लस म्हणजे काय वगैरे वैज्ञानिक सामान्य ज्ञान दिलं आहे

"विज्ञान विचार" भागातले लेख म्हणजे पहिल्या भागातल्या मुद्द्यांची पुनरावृत्ती आहे. पण फक्त औषध/उपचार हा परीघ न ठेवता एकूणच समाजशास्त्र आणि समाजव्यवस्था अशी व्याप्ती वाढली आहे. डार्विन चा सिद्धांत काय आहे; माकडापासून माणूस झाला असं नाही तर दोन्हीचे पूर्वज होत होते; असे बदल का झाले असतील; त्यामागे एखाद्या विधात्याचा हात कसा नाही; आणि हे सगळं घडण्यामागे सुद्धा निश्चित हेतू नाही हा सिद्धांत त्यांनी समजावून सांगितला आहे. त्याचबरोबर डार्विनवर घेतलेले काही आक्षेप कसे चुकीचे होते. त्याचा थोडक्यात मागोवा घेतला आहे. हा विषय काही एका लेखात मावणारा नाही. तरी है लेखातून विषयाची चांगली ओळख होते.

माणसाचं आयुष्य आता पूर्वीपेक्षा सुखकर झालं आहे हा सामाजिक शास्त्रीय निष्कर्ष मांडणाऱ्या पुस्तकाबद्दल पुढचा लेख आहे, पूर्वी पेक्षा आता युद्ध कमी होत आहेत उपासमारीने मरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. जीवनमान वाढलं आहे. आपल्या आजूबाजूला आणि रोजच्या जगण्यात संघर्ष नक्की आहे पण हजारो वर्षांचा माणसाचा इतिहास बघितला तर त्यापेक्षा आपण खूप बरे हे मानायला नक्की जागा आहे ते त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि असं होण्यामागे मानवतावाद, विवेकवाद कसे आहे आणि ते पुढे कसे चालू राहिले पाहिजे याचं प्रतिपादन केलं आहे.

महाराष्ट्रात "अंधश्रद्धा निर्मूलन समिती" प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीचं काम करणारी संस्था आणि व्यक्ती अमेरिकेत आहेत. त्या संस्थेच्या एका परिषदेला लेखक अमेरिकेत उपस्थित होता. तेव्हा लोकांनी काय काय अनुभव सांगितले, तिकडे संस्था कशा काम करतायत ह्याचा आढावा घेतला आहे.

काही पाने उदाहरणासाठी

अनुक्रमणिका


































होमिओपॅथी म्हणजे भोंदूगिरी ..



अभ्यंकरांना नाचता आलं नाही म्हणून होमिओपॅथीचं अंगणच वाकडं ?? अशा लिहिणाऱ्या प्रतिक्रिया



भाषा डॉक्टरांची




बायकांत पुरुष लांबोडा... हसा खदखदा



डार्विन बाबाचं म्हणणं काय



गायनॅकोलॉजिस्ट म्हणून येणारे मजेशीर अनुभव "बायकांत पुरुष लांबोडा" लेखात आहेत. हे पुस्तकाचं शीर्षक आहे. त्यामुळे मला वाटलं होतं की अनुभव, त्यात येणाऱ्या अडचणी, त्याचे फायदेतोटे किंवा केलेली कामे हा सगळा भाग पुस्तकात. मुख्य असेल. तसं होत नाही. पुस्तकाचं शीर्षक आणि पाठमजकूर (ब्लर्ब) आणि समर्पक नाही. ते वेगळं पाहिजे होतं.
आधुनिकविज्ञान, बुद्धीप्रामाण्य, तर्काच्या आधारे विचार करण्याची पद्धत, आपल्याला सगळं माहिती नाही हे मान्य करण्याचा मोठेपणा, चुकांतून शिकण्याचा समंजसपणा, धार्मिक ग्रंथांच्या मागे न लागता इहवादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे हे एकूण या पुस्तकाचे सार आहे. साहजिकच यात काही धार्मिक बाबींना छेद दिला जातो. पण फक्त हिंदू किंवा फक्त भारतीय यांना टार्गेट न करता त्यांनी एक तर विवेचन जनरल ठेवलं आहे किंवा इतर धर्मांचेसुद्धा उल्लेख दिले आहेत. त्यामुळे निवेदन एकांगी होत नाही. वाचकाला विचारप्रवृत्त करतं.

पुस्तकाची सर्वात मोठी जमेची की बाब म्हणजे लेखकाची भन्नाट लेखन शैली. आपण विनोदी पुस्तक वाचतो आहोत असेच आपल्याला वाटेल. बऱ्याच शब्दिक कोट्या आहेत. वाक्यरचनांची गंमत आहे. घटनेकडे बघण्याची तिरकस पद्धत आहे. सहज जाता जाता काढलेला चिमटा आहे. त्यामुळे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपण सलग वाचत जातो. मजा घेत जातो. महत्त्वाचे मुद्दे, तांत्रिक मुद्दे आणि गंभीर मुद्दे आपल्यासमोर येतात; पण अगदी हलक्याफुलक्या स्वरूपात. त्यामुळे ते कळतात पण रटाळ होत नाहीत.

अभ्यंकर सरांचा होमिओपॅथीला विरोध आहे तरी( किंबहुना म्हणूनच थट्टेने ) असं म्हणावसं वाटतं की हे पुस्तक म्हणजे होमिओपॅथीच्या गोड गोळ्या आहेत. त्यातून तुमच्या मेंदूला औषध मिळेलच आणि खुसखुशीत वाचनाने तोंड गोडही होईल.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )

———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

मिस्टेक इन बँकॉक (Mistake in Bangkok)





पुस्तक - मिस्टेक इन बँकॉक (Mistake in Bangkok)
लेखक - स्वप्नील सोनवडेकर (Swapnil Sonawdekar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२१
प्रकाशन - स्वयंप्रकाशित
ISBN - 978-1-63920054-2
छापील किंमत - २४९/- रु.

मागच्या आठवड्यात एका वाचन विषयक फेसबुक ग्रुप वर "केदारनाथ" नावाच्या पुस्तकाचे परीक्षण वाचले. परिचयाची शैली आवडली. म्हणून लिहिणाऱ्याबद्दल उत्सुकता वाटली. नाव स्वप्नील सोनवडेकर होतं. फेसबुक प्रोफाइल बघितलं. त्याच्या फोटोवरून, पोस्टवरून तो एक तरुण वाचनप्रेमी आहे हे लक्षात आलं. मग अजून बघताना कळलं की तो स्वतःही एक लेखक आहे. दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याच्या प्रोफाईलवर एका मॉडेल सारखं त्याचं देखणं रूप दाखवणारी बरीच रील्स पण दिसली. फक्त टाईमपास पोस्ट न दिसता लेखन, वाचन, पुस्तकं, सामाजिक विषय ह्यांवरच्या पोस्ट पण दिसल्या. मग त्याच्याशी चॅटिंग होऊन जुजबी ओळख झाली. एकूण इंटरेस्टिंग व्यक्तिमत्त्व वाटलं. म्हणून माझ्या पिढीतल्या ह्या लेखकाने काय लिहिलंय हे वाचून बघावं अशी इच्छा निर्माण झाली. त्याच्या दोन पुस्तकापैकी एका पुस्तकाचा विषय जरा वेगळा ताजा वाटला. म्हणून ते पुस्तक विकत घेतलं..."मिस्टेक इन बँकॉक".

ही एक छोटेखानी कादंबरी आहे. कादंबरीचा नायक एक तरुण मुलगा - अक्षय - आपल्या पत्नीला आपल्या गतायुष्यातल्या घटना सांगतोय. कॉलेजवयीन असतानाचा त्याचा भूतकाळ त्याने बायकोपासून लपवून ठेवला आहे त्याबद्दल तो सांगतो. हा काळ आहे थरारक गोष्टींचा. शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगली नोकरी, चांगलं उत्पन्न ह्यासाठी त्याची उमेदवारी चालू असताना त्याच्या मित्राने - संजयने - त्याची ओळख करणशी करून दिली. करणने दोघांना त्याला बँकॉक मध्ये वेब डेव्हलपमेंट च्या जॉब ची संधी दिली. दोघे बँकॉकला आले. हातात पैसे खुळखुळू लागले. मजा करू लागले. त्यांच्यापेक्षाही करणची जीवनशैली फारच छानचौकीची. कारण हा करण पैसे कमवत होता अमली पदार्थांच्या तस्करीतून. त्याने अक्षय, संजयलाही जाळ्यात ओढले. आणि " बँकॉक मध्ये मिस्टेक" घडली.

मध्यमवर्गीय पापभिरू अक्षय ह्या जाळ्यात कसा फसला, कळून सावरूनही त्यात कसा अडकला, पुढे टाकलेलं पाऊल मागे घ्यायला जमलं, का नाही? हे लेखकाने थोडक्यात पण पटेल असं मांडलं आहे. तस्करी केली की पोलीस यंत्रणा पाठीमागे लागणारच आणि पुढेमागे चोरी उघडकीला येणारच. ते कसं होईल, कसे सुटतील; गुन्हेगारी विश्वातल्या लोकांचे डावपेच त्याला आणखीन काय काय करायाला लावतील हे सगळं उत्कठावर्धक पद्धतीने लेखकाने लिहिलं आहे.

मनात नसूनही गरीबी किंवा काही कौटुंबिक परिस्थितीमुळे झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग कसा चोखाळला जातो आणि एकदा ह्या जगात शिरलं की बाहेर येणं किती कठीण आहे; हे सामाजिक वास्तव लेखकाने मांडलं आहे. पण रडकी, आक्रस्ताळी किंवा अक्कल शिकवणारी वर्णनं टाळली आहेत. हे चांगलं केलं आहे.

निवेदनाची शैली सोपी, सरळ आहे. विनाकारण स्थलवर्णन, वेशभूषा वर्णन करणारी नाही. काही वेळा प्रसंग पूर्ण पटतीलच असं नाही; म्हणजे "हे इतकं सोपं कसं काय" असं काही वेळा वाटू शकेल. लेखकाने प्रसंग अजून सविस्तरपणे सांगायला पाहिजे होता असं वाटू शकतं. निवेदनाचा वेग इतका आहे की आपण "हे घडलं असेल" असं धरून पुढे उत्सुकतेने वाचत राहतो. आणि शेवटपर्यंत मजा घेत वाचतो.

ही रहस्य/थरार स्वरूपातली आणि त्यातही अगदी कमी पानांची कादंबरी असल्यामुळे मजकूराबद्दल अजून सविस्तर लिहिणं म्हणजे भावी वाचकांचा रसभंग ठरेल. म्हणून दोन तीन पानं देतो जेणेकरून लेखनशैलीची कल्पना येईल.

तस्करीच्या कामाशी ओळख



तुरुंगवारीचा अनुभव




पुस्तकात प्रमाणलेखनाच्या चुका खूप आहेत. काही काही वाक्यरचना किंवा शब्द खटकतात. लेखकाने पुढच्या आवृत्तीत किंवा किमान पुढचे पुस्तक तयार करताना त्याकडे फार बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे वाचनानुभव अजून चांगला होईल.

पुस्तकाचा विषय अनेक रहस्यपटांतून, पुस्तकांतून येऊन गेलेला आहे. अजून कितीही पुस्तकं लिहिली गेली तरी तो नेहमीच ताजा राहणारा विषय आहे. त्यामुळे ह्या पुस्तक प्रकारात लेखकाच्या निरीक्षणशैलीचा, लेखनशैलीचा कस आहे. नवोदित लेखक असूनही इतपत रंजक पुस्तक लिहिलं आहे; ह्याबद्दल स्वप्नील चे खूप खूप अभिनंदन. त्याने पुढे लिहीत राहावं, नवनवे प्रयोग करत राहावेत अशा शुभेच्छा. माझ्या पिढीचे असे ताज्या दमाचे लेखक लिहितायत, मराठीत लिहीतायत. ते अजून काही वर्षांनी ते प्रथितयश लेखक होतील तेव्हा; त्यांची आपली तोंड ओळख आहे, त्यांची पुस्तकं सुरुवातीपासून वाचली आहेत हे सांगायला मलाच अभिमान वाटेल.
 
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
चांगलं लिहू शकणाऱ्या नवोदिताला प्रोत्साहन देण्यासाठी जवा ( जमल्यास वाचा )
अन्यथा वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) 
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

गौतम बुद्धांचे चरित्र (Gautam Buddhanche Charitra)



पुस्तक - गौतम बुद्धांचे चरित्र (Gautam Buddhanche Charitra)
लेखक - कृष्णराव अर्जुन केळूसकर (Krushnarao Arjun Keluskar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २०८
प्रकाशन - विश्वकर्मा पब्लिकेशन, जाने २०२३. मूळ पुस्तक प्रकाशन - १८९८
ISBN - 978-93-93757-57-9
छापील किंमत - रु. २१०/-

ज्या भारतीयांनी आपल्या बुद्धिमत्तेने कर्तृत्वाने संपूर्ण जगाला प्रभावित केलं आहे अशांमध्ये महामानव गौतम बुद्धांचे नाव मुख्य आहे. बुद्धांनी सांगितलेले तत्त्वज्ञान - बौद्धधर्म अथवा बौद्धमत हे भारतात एकेकाळी खूप प्रचलित होते. पण नंतर त्यात वेगवेगळ्या कारणांनी घट होऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना झाली हे साधारणपणे ऐकून माहिती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा अभ्यास करून बौद्ध धर्म निवडला हेही वाचून माहिती होतेच. त्यामुळे वाचनालयात गौतम बुद्धांचे चरित्र पुस्तक दिसल्यावर ते वाचावेसे वाटले. त्यातही बाबासाहेबांनी ज्या पुस्तकाचा आपल्यावर लहानपणीच परिणाम झाला असे स्वतः सांगितले आहे ते हे जुने पुस्तक (पुनमुद्रित आवृत्ती). त्यामुळे लगेच वाचायला घेतले.

गौतम बुद्ध हे जन्माने राजपुत्र लाडाकोडात वाढलेले पण त्यांचा पिंड प्रथमपासून दया-करुणा असलेला. इतरांची दुःखे बघून कष्टी होणारा. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी अशी व्यवस्था केली की आपल्या मुलाला जगातली दुःखे बघायला लागू नयेत. पण कितीही झालं तरी मोठं होता होता त्यांच्या दृष्टीस ती पडलीच. त्यांना हे उमगलं की म्हातारपण-आजारपण-मृत्यू हे कोणालाच चुकलेले नाहीत. माणूस सतत सुखाच्या मागे धावतो पण कोणीही कायमस्वरूपी सुखी दिसत नाही. थोडा वेळ सुख प्राप्त होतं पुन्हा माणूस दुःखीच होतो. दुःखच जास्त दिसत आहे. या निरीक्षणातून त्यांनी संसाराचा त्याग करायचा निर्णय घेतला. त्या वेळच्या परिस्थितीनुरूप संन्यस्त वृत्तीने तपश्चर्या करू लागले. पण तपश्चर्या करून खाणेपिणे सोडून, शरीराला त्रास देऊन ज्ञान प्राप्त होणार नाही; उलट वासना बळावतील. शरीर खंगून काही चांगलं करण्याचा मार्गही खुंटेल अशी त्यांची धारणा झाली. त्यामुळे तत्कालीन अध्यात्मिक मतांप्रमाणे तपश्चर्या न करता ते स्वतःचा मार्ग शोधू लागले. त्यातून त्यांना बोध झाला. ते "बुद्ध" झाले. आपल्याला पटलेल्या या मार्गाचा उपदेश करु लागले. सदाचार, नीतिमत्ता, स्वतःच्या मनावर नियंत्रण, गरजांवर नियंत्रण यातूनच माणूस सुख प्राप्त करू शकतो किंवा सुखदुःखांच्या पलीकडे जाऊ शकतो. कर्मकांड, यज्ञयाग, स्वर्गनरक, भ्रमिष्ट कल्पना, उच्चनीचता यातून काही साध्य होणार नाही. हे सांगू लागले. त्यांच्या या विचारांचा परिणाम आजूबाजूच्या सर्वसामान्य लोकांवर होऊ लागला. ब्राह्मण विद्वान, राज्यकर्ते आणि धनिक सावकार अशा सर्व वर्गांमध्ये लोकांवर होऊ लागला. ते बुद्धांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागू लागले. त्यातून बरेच जण त्यांचा मार्ग स्वीकारून संन्यासी/भिक्षू म्हणून सामील झाले. तिथून बौद्ध धर्माची एका संघटित धर्माची स्थापना झाली.आपला हा विचार सर्वत्र पसरावा यासाठी त्यांनी स्वतः चाळीस वर्षे आजूबाजूच्या प्रदेशात भ्रमण केलेच तसेच आपल्या अनुयायांना देखील वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन आपल्या मताचा प्रसार करायला सांगितला. मात्र हा प्रसार शांततेने, प्रेमाने आणि करुणेने करायचा होता. तलवारीच्या जोरावर जबरदस्तीने नाही, पैशाचं वा मदतीचं आमिष दाखवून नाही किंवा चमत्कारांची आशा दाखवूनही नाही. बुद्धांनी घालून दिलेल्या या व्यवस्थेनुसार पुढेही धर्मप्रसार होत राहिला. त्याला राज्यकर्त्यांची साथ मिळाली. त्यामुळे भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, अफगाणिस्तान रशियाचा काही भाग, चीन जपान इतक्या मोठ्या भूभागावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला. त्याचे अनुयायी मोठ्या संख्येने होते. राज्यकर्ते अनुयायी होते. अनेक ठिकाणचा हा प्रमुख धर्म झाला.

गौतम बुद्धांच्या जन्मापासून त्यांचा "बुद्ध" होण्याचा प्रवास व तिथून बौद्ध मत जगभर पसरण्याचा प्रवास हा सगळा लेखकाने पुस्तकात मांडला आहे.पुस्तकात हे सुद्धा स्पष्ट केलं आहे की बुद्धांचा विचार हा भारतीयांसाठी पूर्णपणे वेगळा नव्हता . गौतम बुद्धांच्या आधीही भारतात नाना पंथ, नाना विचारपद्धती आणि विविध तत्त्वज्ञाने नांदत होती. कर्मकांड प्रमाण मानणारा पंथ होता तसाच कर्मकांड न मानणारा वेदांतवादी पंथही होता. आचार शुद्धता मानणारा पंथ होता. पण आचरायला सोपा, सुनीतीला महत्त्व देणारा, कर्मकांड टाळणारा असा या तत्त्वज्ञानाचे एकजिनसी मार्ग बुद्धांनी लोकांसमोर मांडला. भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतलाच हा पुढचा टप्पा होता.

देव आहे का नाही? आत्मा आहे का नाही? याबद्दल बुद्धांची मतं आणि तत्कालीन पंडितांची मतं ही कशी वेगळी होती; त्यात वाद (तात्विक चर्चा) कशी झाली याची काही उदाहरणे लेखकाने दिली आहेत. गौतम बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना किंवा नवनवीन लोकांना कसा उपदेश केला याची असंख्य उदाहरणे पुस्तकात आहेत. जेव्हा अनुयायांची संख्या वाढली, भिक्षूंची संख्या वाढली तेव्हा त्यांच्यामध्ये योग्य व्यवस्था राहावी यासाठी आचार विचारांचे नियम ठरवायला लागले. काही गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या. काही गोष्टी करायला सांगितल्या गेल्या. या धर्माचं स्वरूप कसं विकसित होत गेलं हा भाग सुद्धा लेखकाने व्यवस्थित समजावून सांगितला आहे.

बुद्ध 2000 हून जास्त वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना जशाच्या तशा माहिती असणं शक्य नाही. म्हणूनच पुस्तक भले इतके पानी असलं तरी त्यात गौतम बुद्धांच्या आयुष्यात घडलेल्या घटना कमी आहेत. एखादी घटना आणि त्यावेळी झालेली दीर्घ तात्विक चर्चा असं अशी पुस्तकाची निवेदन शैली आहे. त्यामुळे या पुस्तकात चरित्र आणि घटना असा भाग वेगळा काढला तर तो जेमतेम काही पानांचाच आहे. जास्तीत जास्त भाग हा विचार आणि त्यावर केलेली साधक-बाधक चर्चा याचा जास्त आहे. या विवेचनात बऱ्याच तत्त्वज्ञानाच्या संज्ञा येतात त्यातला काही भाग कळतो तर त्यातला बराचसा भाग डोक्यावरून जातो. तो समजून घ्यायला त्या विषयाला वाहिलेलं, प्रत्येक संकल्पना सविस्तर उलगडून सांगणारं पुस्तक वाचावे लागेल हे निश्चित .पण ज्याला गौतम बुद्धांबद्दल व त्यांच्या विचाराबद्दल अगदीच जुजबी माहिती आहे त्याला हे पुस्तक नक्की आवडेल. ज्ञानात भर घालणारा ठरेल.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात बौद्धा नंतरच्या या गेल्या दोन हजार वर्षात बौद्ध धर्माचा प्रसार वेगवेगळ्या देशांमध्ये कसा झाला सम्राट अशोक, राजा कनिष्क, राजा मीनांडर उर्फ मिलिंद, परदेशी प्रवासी यांचं योगदान त्यात कसं झालं याची थोडक्यात माहिती दिली आहे. ख्रिश्चन धर्म व बुद्ध धर्म, तसेच येशू ख्रिस्त आणि बुद्ध त्यांच्या आयुष्यातल्या घटना यांच्यातली साम्य स्थळ साम्य स्थळ सांगितली आहेत. कदाचित बौद्ध धर्माच्या रूढी परंपराच ख्रिश्चन धर्मियांनी पुढे चालवल्या असा तर्क मांडला आहे.

भारतात कुमारील भट्ट आणि शंकराचार्य यांनी वैदिक धर्म प्रतिपादला. बौद्धमताचे खंडन केले. बौद्धमत आणि वेदांतातील तत्त्वज्ञान यांच्या सामंजस्यातून आर्य वैदिक धर्माला पुन्हा स्थापित केले. एका अर्थाने बुद्धांप्रमाणेच स्वधर्ममत शांततामय आणि संवादमार्गातून प्रस्थापित केले. नियतीचं वर्तुळ पूर्ण झालं. थोडक्यात त्याचा वेध घेऊन लेखकाने विषयाला आणि पुस्तकाला पूर्णत्व आणलं आहे

लेखक परिचय

अनुक्रमणिका




बुद्धांचा भारतावर व जगावर परिणाम आहे त्यामुळे हे चरित्र अभ्यासणे का महत्त्वाचे आहे ह्या बद्दल उपोद्घात




संसार सोडून जाणाऱ्या राजपुत्राचे मन वळवण्याचा प्रयत्न




ज्ञानप्राप्ती होताना




लोकांना मार्गदर्शन




तात्त्विक वाद संवादाचं एक उदाहरण




हजारो वर्षांपासून माणूस अनेक प्रश्नांचा शोध घेत आहे. मी कोण? कुठून आलो? कुठे जाणार? कशासाठी जन्म घेतला? मेल्यानंतर काय होणार? मला दुःख का मिळते? मला सुख कसं प्राप्त होईल? माझ्या कर्मांचा खरंच परिणाम होतो का? का सगळं दैवाधीन आहे? अजून कोणीच सिद्ध करता येईल असं उत्तर देऊ शकलेले नाही. प्रत्येक धर्म प्रत्येक विचार पद्धती आपापल्या पद्धतीने त्यांची उत्तरं काय असावीत हे गृहीतक मांडते. प्रत्येक मांडणीत काही गुण असतात काही दोष असतात. आपल्याला जी पटते जी झेपते ती मांडणी मानावी. इतरांनाही सांगावी. ज्याला पटेल तो स्वीकार करेल. हेच आपल्या हाती आहे. माझी मांडणी सर्वश्रेष्ठ असं म्हणून हिंसा करणाऱ्या इस्लामी किंवा ख्रिश्चन धर्मश्रेष्ठतावाद्यांनी आजपर्यंत ना स्वतःचं कायमस्वरूपी भलं केलं ना जगाचं भलं केलं. आजही या घडीला सुरू असलेल्या इजरायल-हमास युद्धाद्वारे व रशिया-युक्रेन युद्धाद्वारे हेच अधोरेखित होतं आहे. त्या तुलनेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला वैदिक धर्म बौद्धांनी शांतता-संवादाच्या जोरावर मागे टाकून स्वतःचा धर्म पुढे आणला आणि त्यानंतर वैदिक विद्वानांनी पुन्हा हा शांततेच्या मार्गातून स्वधर्म स्वमत पूर्ण स्थापना केली हे जगाला दिपवून टाकणारे उदाहरण आहे. बुद्धचरित्रातून जगाने शिकायचा हा सुद्धा मोठा धडा आहे.



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-
बुद्ध जीवन आणि विचार ह्याबद्दल फार माहिती नसेल तर  आवा ( आवर्जून वाचा )
आधीपासून माहिती असेल तर वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

झळाळती शंभरी - "डोंबिवलीकर" मासिकाचा विशेषांक (Zalalati Shambhari Dombivlikar Magazine special edition)



पुस्तक - झळाळती शंभरी - "डोंबिवलीकर" मासिकाचा विशेषांक
विशेषांक संपादक - सुधीर जोगळेकर.
प्रकाशन - "डोंबिवलीकर" मासिकाचे संपादक - ना. रवींद्र चव्हाण. कार्यकारी संपादक - प्रभू कापसे. एप्रिल २०२३
भाषा - मराठी
पाने - २४०
ISSN - 2348-2699
छापील किंमत - ४०० रु.


हे माझं २७५वं पुस्तक परीक्षण आणि त्याचा विषय माझे जन्मगाव आणि वास्तव्याचे शहर "डोंबिवली" आहे हा छान योगायोग जुळून आला आहे. डोंबिवलीचे आमदार श्री. रवींद्र चव्हाण "डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवार" ही संस्था चालवतात. ह्या संस्थेच्याच्या अनेक कामांपैकी एक म्हणजे "डोंबिवलीकर" मासिक. डोंबिवलीतल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचं काम लोकांपुढे आणणे, नवनवीन विषय मांडणे, प्रसंगानुरूप विशेषांक, देखणी मांडणी ही ह्या मासिकाची वैशिष्ट्ये आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या "ऑनलाईन मराठी भाषा" शिकवण्याच्या कामाची सुद्धा "डोंबिवलीकर" ने नोंद घेतली आहे. आणि दोनदा त्याबद्दल लेख प्रसिद्ध झाले आहेत. तर ह्या डोंबिवलीकर मासिकाचा हा विशेषांक. एक पुस्तकच.

अजून एक चांगला योग ह्या पुस्तकाशी जोडला गेला आहे . ह्या विशेषांकाचं प्रकाशन झालं ते ३० एप्रिल रोजी "डोंबिवलीकर परिवार" आयोजित "आदर्श डोंबिवलीकर" पुरस्कार सोहळ्यात. "मसालाकिंग" धनंजय दातार आणि लोकप्रिय अभिनेते शिवाजी साटम ह्या अतिथींच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्याच सोहळ्यात मला सुद्धा "आदर्श डोंबिवलीकर" पुरस्कार मिळाला.




पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकाचा विषय स्पष्ट केला आहे. तो असा - "१८८७ ते १९४७ या काळात ज्यांनी डोंबिवली शहराच्या विकासासाठी आपले सर्वस्व अर्पून काम केलं... खऱ्या अर्थाने डोंबिवली घडवली... त्या सर्व शिल्पकारांचा परिचय करून देणारा नवीन पिढीला दीपस्तंभ ठरेल असा हा गौरव ग्रंथ"

आज डोंबिवली शहर हे संस्कृतिक शहर म्हणून उभ्या महाराष्ट्रात परिचित आहे. नवनवे उपक्रम आणि कर्तृत्त्वान व्यक्तिमत्वांमुळे ह्या शहराचे नाव ऐकले नाही अशी मराठी व्यक्ती विरळच. पण डोंबिवली हे काही पौराणिक-ऐतिहासिक वारसा असणारे शहर नाही. १८८७ मध्ये डोंबिवली रेल्वे स्थानक आलं. पण मुख्य वस्ती होती परिसरांतल्या गावांत - पाथर्ली, ठाकुर्ली, चोळे, आयरे, कोपर, भोपर इ. मध्ये. स्टेशन आल्यावर ब्रिटिश सरकारने स्टेशन परिसरात वस्ती करायला प्रोत्साहन दिले. मध्यमवर्गीय, सुशिक्षित लोकांची पावले ह्या भूभागाकडे वळू लागली. वस्ती वाढू लागली. पण ती काही हजारांतच होती. म्हटलं तर एखादं मोठं खेडंच. गावात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांच्या परिचयाच्या. लोक सुशिक्षित, सरकारी कचेऱ्यांत काम करणारे, समाजसेवेचं भान असणारे, कलासक्त, संस्कृतीप्रेमी, पांढरपेशे, वाचनप्रेमी. त्यामुळे खेड्याची आपुलकी आणि शहरी दृष्टिकोन ह्याचा सुरेख मिलाफ इथे झाला. सरकार/प्रशासन ह्यावर पूर्ण अवलंबित्त्व न ठेवता समविचारी लोकांनी एकत्र येऊनच रस्ते, वीज, पाणी, वैद्यकीय सेवा, शिक्षणसंस्था, क्रीडा संस्था काढल्या. नवे नवे लोक इथे राहायला येत गेले. ह्या गंगेला मिळाले आणि स्व-कर्तृत्वाची ओंजळ त्यांनीही अर्पण केली. आणि आज "संस्कृतिक शहर", "वैशिष्ट्यपूर्ण कल्पना मांडणारं शहर" आणि दुर्दैवाने "नागरी सुविधांचा बोजवारा उडालेले शहर" अश्या परस्परविरोधी ओळख असणाऱ्या शहराचा पिंड घडला. हा पिंड घडवणाऱ्या व्यक्तींपैकी १०० व्यक्तींचा अल्पपरिचय करून देणारं हे पुस्तक आहे. अजून अनेक कर्ते हात ह्या काळात राबले हे नक्की. त्यांची ओळख करून देण्यासाठी ह्या अंकाचा भाग-२, ३ काढावे लागतील.

अनुक्रमणिकेवर नजर टाकूया म्हणजे ह्यात समाविष्ट व्यक्तींची नावे तुम्हाला कळतील.





पु.भा. भावे,शं.ना. नवरे, उद्योजक म्हैसकर, मंत्री नकुल पाटील, गणितज्ञ कापरेकर, व्हायोलिन वादक गजाननबुवा जोशी, दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर, वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणारे रामभाऊ ताम्हाणे इ. काही नावं आहेत ज्यांचं कार्यक्षेत्र डोंबिवलीच्या बाहेरही होतं. त्यामुळे डोंबिवलीकर नसणाऱ्या लोकांनाही ती व्यक्तीमत्त्वं माहिती असतील. इतर ९०% व्यक्ती ह्या डोंबिवलीकरांसाठी विशेष काम करणाऱ्या असल्यामुळे बाहेरच्यांना त्या माहीत असण्याची शक्यता कमी आहे. पण आजी-माजी डोंबिवलीकरांना ह्यातल्या बऱ्याच व्यक्ती ऐकून माहिती असतील. काहींशी त्यांचा थेट परिचय असेल. जिव्हाळा असेल. या "झळाळत्या"व्यक्तींनी उभ्या केलेल्या संस्थेत शिक्षण घेतलं असेल, उपचार घेतले असतील, कार्यक्रम बघितले असतील. त्यामुळे डोंबिवलीकरांसाठी हे पुस्तक म्हणजे एक माहितीचा खजिना, आठवणींची मेजवानी, एका विस्तारित-कुटुंबातल्या आपल्या आज्या-पणज्यांची माहिती, त्यांचे किस्से, "आज इथे हे आहे पण तेव्हा तिथे ते होतं" अशी मजेदार माहिती..

स.वा. जोशी, टिळकनगर, पाटकर, स्वामी विवेकानंद, नेरुरकर अशा आजही चालू असणाऱ्या शाळांच्या जन्मकथा आहेत. 
टोलवसुली आणि रस्ते बांधणी करणारे "आयडियल बिल्डर्स", श्री लॉंड्री, कानिटकर पोळीभाजी केंद्र, कुलकर्णी ब्रदर्स मिठाईवाले हे आजही सुरु असलेले उद्योग कसे सुरु झाले ते कळेल. 
रामनगर, दत्तनगर, पेंडसेनगर आणि काही रस्त्यांची नावं कशी आली ते कळेल.
आजच्या पिढीला सुद्धा माहित असलेल्या अनेक गोष्टींचं मूळ समजेल. 

प्रत्येक व्यक्तीवर दोन पानी लेख आहेत. त्यात अर्धा पान फोटो आणि दीड पान मजकूर आहे. व्यक्तीचे जन्मगाव, मूळ घराणं, सांपत्तिक स्थिती, डोंबिवलीत येण्यापूर्वी काय नोकरी-व्यवसाय होता, डोंबिवलीत कशामुळे येणं झालं, कुठल्या क्षेत्रात काम केलं काय विशेष योगदान दिलं, विवाहित असल्यास जोडीदार कोण-कुठला, काही विशेष सवयी किंवा एखाददुसरा किस्सा, निधन कधी कसे झाले, पुढची पिढी काय करते आहे अशी एकूण माहिती आहे. पण ही माहिती "बायोडेटा" स्वरूपातली नाही. हे सगळे व्यक्तिचित्रणात्मक ललित लेख आहेत. 

काही उदाहरणे बघूया.

पहिला डोंबिवलीकर 


पहिले नगराध्यक्ष

साहित्यप्रेमी डोंबिवलीकर 
पत्रकार डोंबिवलीकर 
उद्योजक/दुकानदार डोंबिवलीकर 

ह्या लेखांतून तेव्हाची पिटुकली, हिरवी छोटी घरं छोटे रस्ते असणारी डोंबिवली दिसते. प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थभाव, सहनशुचिता, मोठी कुटुंबे, एकमेकांना साहाय्य करण्याची वृत्ती ही तेव्हाच्या पांढरपेशा पिढीची वैशिष्टय दिसतात. काँग्रेस, शेकाप, जनसंघ, शिवसेना ह्यां राजकीय पक्षांचा चढउतार दिसतो. रा. स्व. संघ आणि हिंदुत्ववादी विचारांचा बालेकिल्ला ही शहराची पक्के बैठक कशी झाली हे समजतं. प्रथितयश शिक्षणसंस्थांच्या प्रसूतिवेदना दिसतात. वाचन, नाटक, धार्मिक उत्सव, गायन-वादन, समाजकार्य ह्यांची आवड डोंबिवलीकरात सहज जोपासली जाते ह्याचा मूळ धागा सापडतो. त्याचबरोबर; डोंबिवलीच्या आजच्या वाईट परिस्थितीच्या अनेक कारणांपैकी एक कारण डोंबिवलीचे "स्वतः त्रास घेऊ, पण समाजाला काहीतरी देऊ" हे धोरण असाही विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

बहुतेक लेखांमधून अपरिचित व्यक्तींच्या कामाचा अंदाज येतो. जर तुम्हाला आधीच माहिती असेल तर जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. काही लेख अपवादात्मक असे वाटले की त्यात मुख्य कामापेक्षा इतर माहितीच जास्त आहे. लिखाणात बऱ्याच वेळा मजकूर कालक्रमानुसार ना येता पुढेमागे झाला आहे. त्यामुळे सलगता जाते. पण एकूण पुस्तकाचा आवाका, त्यातली माहिती आणि ते गोळा करायचे कष्ट लक्षात घेतल्यास हे तांत्रिक मुद्दे दुर्लक्षण्यासारखे आहेत. असा दस्तऐवज तयार झाला हे मोठे काम आहे. त्याबद्दल श्री. सुधीर जोगळेकर, श्री. वासुदेव गोडसे, श्री. सुधीर फणसे, श्री. श्रीकांत पावगी, श्री. सुरेश देशपांडे आणि त्यांच्या पूर्ण चमूला एक डोंबिवलीकर म्हणून मनःपूर्वक धन्यवाद !! त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आमदार श्री. रवींद्र चव्हाण आणि कार्यकारी संपादक श्री. प्रभू कापसे यांना मनःपूर्वक धन्यवाद.

प्रत्येक आजी-माजी डोंबिवलीकराने, डोंबिवलीवर प्रेम करणाऱ्या, 
डोंबिवलीचे आकर्षण वाटणाऱ्या प्रत्येकाने नक्की वाचावे आणि संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. आपल्या आधीच्या पिढीने शहराच्या नागरी समस्या एकत्र येऊन, पुढाकार घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. "माझं गाव" अशा आपुलकीतून संस्था उभ्या केल्या. आज पुन्हा ती भावना रुजली पाहिजे. डोंबिवली नगरी गुणाने हिरा आहे तिला तसंच सुव्यवस्थेचं कोंदण मिळालं पाहिजे.



पुस्तक मिळण्याचे ठिकाण -
१) डोंबिवलीकर प्रकाशन, जी-२, आत्मानंद पद्मश्री हॉस्पिटलच्या बाजूला, श्रीखंडेवाडी, डोंबिवली(पूर्व). दूरध्वनी क्र. ०२५१-२४२०३७३

२) पै फ्रेंड्स लायब्ररी, भगतसिंग रोड, नॅचरल्स आईस्क्रीमच्या समोर. दूरध्वनी क्र. +91 9769846807/8





———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आजी/माजी डोंबिवलीकर असाल किंवा डोंबिवलीच्या इतिहासात रस असेल किंवा शहर कसं उभं राहतं ह्याचा समाजशात्रीय अभ्यास करत असाल तर आवा ( आवर्जून वाचा )
अन्यथा - वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...