

पुस्तक - तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)
लेखक - चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२८
प्रकाशन - भाग्यश्री प्रकाशन सप्टेंबर २०२५
ISBN - 978-81-987168-1-1
छापील किंमत रुपये २००/-
छापील किंमत रुपये २००/-

लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अग्रगण्य नाव. त्यांचे वृत्तपत्रातले लेख, भाषणे, भारतभर केलेले दौरे, आणि स्वतः भोगलेला तुरुंगवास यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमानस जागृत झाले. ब्रिटिश विरोधी जनतेच्या भावना मांडणाऱ्या त्यांच्या आधीच्या भारतीय नेत्यांपेक्षा त्यांची भूमिका जास्त जहाल, कृतीशील होती. थेट "स्वराज्य मिळविणारच" हे ठासून सांगणारी होती. स्वातंत्र्याची चळवळ टिळकांच्या आधी सुरू झाली होती. टिळकांनी तिला मोठा लोकाश्रय मिळवून दिला. त्यांच्या निधनानंतरही ती चळवळ पुढे चालत राहून शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
टिळक जसा स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते तसाच प्रयत्न इतर अनेक महान व्यक्तिमत्व सुद्धा करत होती. प्रत्येकाची आपापली विचारसरणी होती, आपापली आंदोलनाबद्दलची धारणा होती. परस्पर विरोधी मते होती. जहाल- मवाळ, सशस्त्र- नि:शस्त्र, सैन्यात जावं की न जावं, सामाजिक सुधारणा आधी का राजकीय स्वातंत्र्य आधी, सुधारणांसाठी ब्रिटिशांचे सहकार्य घ्यावे की न घ्यावे, पारंपारिक स्वदेशी विचार घ्यावा का आधुनिक पाश्चिमात्य विचार आचरावा ... असे असंख्य मतभेदाचे मुद्दे होते. प्रत्येकाची कार्यशैली वेगळी होती आणि समाजावर प्रभाव टाकण्याची क्षमता देखील वेगळी.
त्यामुळे कुठेही एका चरित्र नायकाचा अभ्यास करताना त्याचे तत्कालीन नेत्यांची आलेले संबंध नक्कीच अभ्यासनीय ठरतात. या नेत्याने आपल्या पूर्वसुरींकडून काय बोध घेतला होता हे समजणं महत्त्वाचं असतं. तर हा नेता दिवंगत झाल्यावर काय झालं त्यांचे विचार टिकले का काळाच्या कसोटी उतरले का हे जाणणं देखील महत्त्वाचं आहे. एकूणच हा प्रचंड मोठ्या अभ्यासाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. ज्याला इतिहासात खरंच मनापासून रस आहे तोच हे करू जाणो. पण इतरांनी मात्र नाराज व्हायचं कारण नाही. कारण लोकमान्य टिळकांच्या संदर्भात असा अभ्यास करून ते सार रूपात आपल्यासमोर मांडण्याचं मोठं काम लेखक चंद्रशेखर टिळक यांनी सदर पुस्तकाच्या रूपात केलं आहे.
लेखकाची पुस्तकात दिलेली ओळख

हे पुस्तक २५ लेखांचा संग्रह आहे यात पहिल्या बारा लेखांमध्ये लोकमान्य टिळक आणि एक एक भारतीय नेतृत्व याची तुलना केलेली आहे. दोघांचा स्वभाव, विचार, कामाची पद्धत केलेले लिखाण, लोकांचा प्रतिसाद, परदेश प्रवास, भोगलेल्या शिक्षा अशा वेगवेगळ्या पैलूंद्वारे सारखेपणा आणि फरक दाखवून दिलेला आहे. यात शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास असे टिळकांच्या आधीच्या दोन विभूती आहेत. गांधीजी, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे आणि सावरकर, विनोबा भावे ही त्यांच्या कार्यकाळच्या आसपास झालेली व्यक्तिमत्व आहेत. गंमत म्हणजे पुस्तकाची सुरुवात होते ती अटलजी, मोदीजी आणि इंदिरा गांधी ह्यांच्याशी तुलनेतून.
अनुक्रमणिका


समकालीन लोकांवरच्या लेखात टिळक आणि दुसरी व्यक्ती ह्यांची भेट कधी, कुठे झाली होती, त्यांच्यात कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली होती, त्यांनी एकत्र काम केले किंवा नाही, एकमेकांवर टीका कशी केली, एकमेकांची स्तुती कधी केली, त्यांच्याबद्दल इतर पत्रकार किंवा नेते काय म्हणत अशी उदाहरणे दिली आहेत. लेखकाने तुलनेसाठी घेतलेले काही मुद्दे आपल्याला आश्चर्यचकितही करतील. उदा. टिळक आणि सावरकर ह्यांच्या जीवनावर आधारित कलाकृती किती आणि त्या व्यावसायिक दृष्ट्या किती चालल्या (किंबहुना नाही चालल्या) असाही मुद्दा घेतलाय. टिळक आणि आगरकर ह्यांच्या लेखनशैलीची देखील तुलना आहे. "गीतारहस्य" व "गीताई" ह्यांच्यातले साम्यभेद एका लेखात आहेत. असे विचार डोक्यात येणं आणि त्याबरहुकूम माहिती गोळा करून ती मांडणं ह्याबद्दल लेखकाला प्रणाम.
शेवटचे दहा बारा लेख हे टिळक आणि एखादे ठिकाण, समुदाय, वस्तू ह्यांचा पुन्हा पुन्हा संपर्क कसा आला किंवा आलेला संपर्क कसा महत्त्वाचा ठरला ह्याची माहिती आहे. टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात मुसलमानांचा सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून काँग्रेस व मुस्लिम लीग ह्यांच्यातला "लखनौ करार" झाला होता. तो वादग्रस्त ठरला पण. टिळकांबद्दल मुस्लिम समाजात किती विश्वासाची भावना होती हे त्या प्रकरणातून दिसतं. टिळक समाजाचा सर्वांगीण विकास करणारे राजकीय नेते होते. त्यांनी कामगार चळवळीला कसा पाठिंबा दिला हे एका लेखात आहे. टिळकांचा अर्थकारणाचा अभ्यासही दांडगा होता. "बॉम्बे स्वदेशी" कंपनीत ते संचालक सदस्य होते. समभाग (शेअरची) किंमत किती ठेवावी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून कंपनीचे शेअर द्यावेत इ. निर्णय त्याकाळात त्यांनी घेतले. "टिळक आणि शेअर बाजार " लेख वाचताना ही अपरिचित बाजू पुढे येते.
काही पाने उदाहरणार्थ
टिळक आणि रामदास

टिळक आणि योगी अरविंद

टिळक आणि मुसलमान

परकीयांच्या शब्दांत टिळक

कितीही लिहिलं आणि कितीही व्यक्तिमत्त्वांशी तुलना करत लिहिलं तरी अजून लिहायला वाव राहणारच. तरी कामगार कायदे, आर्थिक बाबी ह्याबद्दल वाचताना आंबेडकरांची आठवण झाली. आर्थिक, कायदेशीर बाबी, ब्राह्मण-ब्राह्मणेतरांकडे बघायचा दृष्टिकोन हे मुद्दे घेऊन आंबेडकर- टिळक एखादं प्रकरण जोडता आलं तर छान. "अर्थकारणी लोकमान्य" ह्या आगामी पुस्तकात तो मुद्दा सविस्तर येणार आहे.
ह्या पुस्तकात उल्लेख झालेल्या टिळकांच्या आयुष्यातल्या घटना वाचकाला नीट माहिती असतील तर विवेचन व्यवस्थित कळेल. तो गृहपाठ वाचकानेच केला पाहिजे. तरी.. सूरत काँग्रेस, लखनौ करार, चिरोल खटला ह्यांच्याबद्दल सुरुवातीलाच तपशील दिले तर मदत होईल. "मुसलमान" प्रकरण वाचताना मी आत्ता नेट वर शोधून वाचलं की नक्की सहकार्य म्हणजे काय करार केला होता. ते वाचल्यावर चित्र अजून स्पष्ट झालं.
सुरुवातीला म्हटलं तसं लेखकाच्या अभ्यासाचं, व्यासंगाचं सार आपल्या समोर असल्यामुळे हे लेख वाचताना शाळेतलं "नवनीत गाईड" वाचतो आहे असं वाटलं. "टिळक आणि अमुक अमुक ह्यांच्यातील पाच फरक आणि पाच साम्यस्थळे सांगा; "टिळक आणि अमुक अमुक आव्हान ह्यावर शंभर ओळींचा निबंध लिहा".. अशा प्रश्नाची तयार उत्तर म्हणजे एकेक लेख. त्यामुळे ह्या लेखांमध्ये मुद्द्याला ओझरता स्पर्श करून लेखक पुढच्या मुद्द्याकडे वळतो. ते वाचताना तयार उत्तर मिळाल्याचा आनंद आपल्याला मिळेल. तर अभ्यासू वाचकाला प्रत्येक तुलनेचा मुद्दा अभ्यासाची नवीन वाट दाखवेल.
पुस्तकातले विवेचनाचे स्वरूप वस्तुनिष्ठ तुलना आहे. कुठल्याही महापुरुषाला कमी लेखण्याचा किंवा चढे दाखवण्याचा हेतू ह्यात दिसत नाही. छुपा अजेंडा दिसत नाही. अजेंडा असलाच तर; तो हा असावा की लोकमान्यांचे विचार, कर्तृत्व आजही किती अभ्यासनीय, अनुकरणीय आहे; समाज आणि शासन पातळीवर त्याबद्दलची अनास्था दूर केली तर आपलंच भलं आहे हे जाणवून देणे !
No comments:
Post a Comment