जंक्शन (Junction)




पुस्तक - जंक्शन (Junction)
लेखक - विनायक रत्नपारखी (Vinayak Ratnaparakhi)
शब्दांकन - सावनी केळकर (Savni Kelkar)
भाषा - मराठी
पाने - २००
प्रकाशन - मार्च २०११. कृष्णा प्रकाशन ठाणे
छापील किंमत - २८०/- रु.
ISBN - दिलेला नाही

रेल्वे इंजिन ड्रायव्हरचे अनुभव कथन असणाऱ्या एका पुस्तकाचं परीक्षण मी काही दिवसांपूर्वी लिहिलं होतं. हे परीक्षण वाचून याच प्रकारचं अजून एक पुस्तक मराठीत आहे आणि तेही डोंबिवलीतल्या लेखकाचं हे मला कळलं. योगायोगाने एकाने माझी थेट लेखकाला माझ्याबद्दल सांगितलं. आणि ते लेखक अर्थात विनायक रत्नपारखी ह्यांनी मला त्यांच्या घरी अगत्याने बोलावलं. आमच्या छान गप्पा झाल्या. त्यांचं पुस्तक - जंक्शन - सुद्धा मला वाचायला उपलब्ध करून दिलं. याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार.


रत्नपारखींनी रेल्वेत तिकीट तपासनीस (टीसी) म्हणून कामाला सुरुवात केली. मग त्यातून बदली घेऊन इंजिन ड्रायव्हर क्षेत्रात आले. कोळशाचे इंजिन, डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक इंजिन, मालगाडी, मेल एक्सप्रेस, घाट ड्रायव्हर, लोकलचा मोटरमन अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. वीस वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. पण आज वयाच्या 80 व्या वर्षी तरुणाला लाजवेल असा उत्साह मला जाणवला. त्यांनी सांगितलं की त्यांना तरुण वयापासून असलेली व्यायामाची आवड. साधा व्यायाम नाही तर पहिला पैलवानकी वेटलिफ्टिंग करायचे. आमच्या गप्पांच्या ओघात लक्षात आलं की, जसं शरीर कणखर की त्यांचं मनही कणखर. कुठल्याही प्रसंगाला धाडसाने तोंड देणार आणि अन्याय झाला की लाथ मारायला पेटून उठणार. म्हणूनच हे पुस्तक मागच्या पुस्तकापेक्षा खूप वेगळं आहे. विषय एकच पण दोन व्यक्तींचे दोन वेगळे पिंड. दोन वेगळी अनुभव विश्वे. आणि मांडायची शैली सुद्धा पूर्ण वेगळी. त्यामुळे एकाच विषयावरची दोन पुस्तकं लागोपाठ वाचूनही माझी उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहिली.
या पुस्तकात रत्नपारखी जींनी त्यांचे 75 अनुभव आणि किस्से सांगितले आहेत.
पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती.


अनुक्रमणिका

सुरुवातीला त्यांच्या बालपणाबद्दल थोडंसं आणि लहानपणापासून असलेला रेल्वेचा संबंध याबद्दल लिहिले आहे. रेल्वेच्या नोकरीत टीसी म्हणून दाखल झाले. तिथे विना तिकीट प्रवाशांना पकडताना एका थेट गुंडाशी सामना करावा लागला हा किस्सा सुरुवातीलाच वाचायला मिळतो. तिथूनच पुढे येणाऱ्या चित्तथरारक अनुभवांची काय मेजवानी कशी असेल याची कल्पना येते. हॉटेलमधल्या जेवणातलं स्टार्टरच इतकं भारी तर मेन कोर्स कसा असेल !! त्यांप्रसंगाचा पहिला भाग वाचा


रत्नपारखींचा स्वभाव बघता त्यांनी टीसी असण्यापेक्षा दुसऱ्या कामांमध्ये जावं असा विचार त्यांनी आणि त्यांच्या हितचिंतकांनी केला. मग ते इंजिन ड्रायव्हर या क्षेत्रात जॉब बदली करून आले. इंजिन ड्रायव्हर म्हटलं की सतत लक्ष सिग्नलकडे, रुळाकडे आणि आजूबाजूला कोण येतंजातंय याकडे असणं आवश्यक आहे. मनाची एकाग्रता, लांब लांब चा प्रवास, वेळीअवेळी कामाचे तास हे शरीराला व मनाला थकवणारं आहे. अशा बऱ्याच प्रवासांचे अनुभव त्यांनी लिहिले आहेत.
रेल्वेचा प्रवास म्हटला की अपघात ही दुर्दैवाने नित्याची बाब. त्यामुळे रत्नपारखीच्या गाडीखाली आल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला. तर काहीजणांनी त्यांच्या गाडीखाली हे आत्महत्याही केली. त्याच्या अनेक भीषण आणि हृदयद्रावक घटना लेखकाने सांगितल्या आहेत. काही वेळा हॉर्न वाजवूनही लोकांचं लक्ष नसतं तर आत्महत्या करणारा माणूस स्वतःला रेल्वे रुळावर झोकून देतो. धावतो इंजिन बघूनही हलत नाही. तर काही वेळा केवळ थरार म्हणून लोकांच्या खाली गाडी समोर उभे राहतात आणि गाडी आली की झोपतात. पण प्रत्येक वेळी इंजिन ड्रायव्हरच्या जीवाची मात्र घालमेल होत असते. वाचवायचा प्रयत्न केला तरी वाचवणं शक्य होत नाही. असे प्रसंग आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतील.
इंजिन इंजिन किंवा सिग्नल यंत्रणा संपर्क यंत्रणा ही शेवटी यंत्र आहेत कधी ना कधी काहीतरी बिघाड होतोच हे असा बिघाड झाला की गाडीचा खोळंबा होतो मग स्वतःहून इंजिनाची दुरुस्ती करणे नसेल तर मदत मागवणे इंजिन बदलणं गाडी साईडला घेणे असे अनेक प्रकार त्यात करावे लागतात. काही वेळा त्यातून गाडी रुळावरून घसरणे, दोन गाड्यांची टक्कर होणे असे भीषण दुर्घटनाही घडतात. त्यांच्या किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या अशा दुर्दैवी घटना कशा घडल्या हे लेखकाने लिहिलं आहे. एक प्रवासी म्हणून, त्यावेळी गाडीत बसलेल्या माणसाला फक्त गाडी लेट झाली किंवा अपघात झाला एवढेच लक्षात असेल. पण त्याच घटनेकडे इंजिन ड्रायव्हर किंवा रेल्वे कर्मचारी म्हणून बघताना काय अडचणी आलेल्या होत्या ही दुसरी बाजू नक्कीच समजून घेण्यासारखी आहे.

मुंबईत लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी. घड्याळाच्या काट्यावर आणि लोकलच्या तालावर मुंबईकर नाचत असतात. लोकल लेट येणे याची सवय आहेच पण जेव्हा एका पाठोपाठ एकाच दिशेच्या गाड्या येतात. दुसऱ्या देशाच्या गाड्या येतच नाहीत तेव्हा स्टेशनवर गर्दी फुलून जाते. चेंगराचेंगरी होईल का अशी परिस्थिती होते. प्रत्येकाला आपल्या कामाला होणारा विलंब दिसतो आणि त्यातून एक संतापाची लाट उसळते. मग त्यातून कधी स्टेशन मास्तरला घेराव, रेल रोको, दगडफेक असे प्रकार होतात. गाडीला उशीर म्हणजे ड्रायव्हरची चूक असाही बऱ्याच जणांचा समज होतो. रेल्वे चा प्रतिनिधी म्हणूनही गर्दीला समोर ड्रायव्हरच दिसतो. त्यामुळे ड्रायव्हर/मोटरमनच्या नोकरीत अशा प्रकारे रेल रोको, दगडफेक किंवा जमाव अंगावर धावून येणं हे जीवघेणे अनुभव कधी ना कधी येतातच. अशा अनुभवाबद्दल सुद्धा पुस्तकात लिहिले आहे. अशा प्रसंगांना तोंड कसं दिलं, लोकांना काही वेळा जाळपोळीपासून कसं परावृत्त केले हे सांगितलं आहे. दगडफेकीमुळे मरता मरता वाचले हे वाचताना अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. हा एक प्रसंग त्याची चुणूक दाखवतो.


रत्नपारखींची वृत्ती "आपण बरं आपलं काम बरं", "कुणाच्या अध्यात ना मध्यात" अशी नेभळट नाही. होता होईल तितके आपल्या सहकाऱ्यांशी व वरिष्ठांची चांगले संबंध ठेवायचे पण कोणी अन्याय केला तर मात्र पेटून उठायचं हा त्यांचा खाक्या. वरिष्ठ असला आणि नियमाच्या बाहेर वागत असला तर त्यालाही भिडायला मागेपुढे पाहायचं नाही. आपल्या सहकाऱ्यावर जरी अन्याय होत असला तरी सुद्धा निमुटपणे बघत बसायचं नाही. त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा. त्यामुळे काही वेळा वरिष्ठांशी उडालेले खटके सुद्धा या पुस्तकात आहेत. इंजिन ड्रायव्हरची बाजू समजून न घेता रेल्वे प्रशासन काही वेळा निर्णय घेते तेव्हा युनियनच्या मार्फत त्यांनी आवाज कसा उठवला आणि निर्णय कसा बदलला हे पुस्तकात आहे. स्वतःवर किंवा कोणा सहकाऱ्यावर चुकीचे आरोप झाले किंवा घाणेरडे राजकारण झाले तर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तो डाव कसा उलटवला याचेही धमाल किस्से आहेत. रेल्वे प्रशासनातला हा वरिष्ठ-कनिष्ठ वाद, काही वरिष्ठांची अरेरावी वृत्ती, तर काहींची समंजस वृत्ती, काही कनिष्ठांचा कामचुकारपणा तर काही ड्रायव्हरची कर्तव्यनिष्ठा असे बरेच प्रसंग पुस्तकात आहेत. त्यातून आपल्याला फक्त ड्रायव्हरच नाही तर रेल्वेच्या इतर बाबी, युनियन गटबाजी यांच्या बद्दलची ही एक झलक दिसते. 

इंजिन चालवताना आणीबाणीच्या क्षणी नेहमीपेक्षा वेगळा पण त्या क्षणी योग्य ठरलेला निर्णय घेण्याची बुद्धी झाली आणि मोठ्या अपघातातून लेखक वाचले. ही शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची कृपा असं लेखकाचं सश्रद्ध मन सांगते. भूत पिशाच्च दिसल्याचे किसे सुद्धा आहेत.

समृद्ध कार्यकाल घालवलेल्या आणि आजही असोशीने जीवन जगणाऱ्या व्यक्तीचं दिलखुलास अनुभव कथन आहे. प्रत्येक किसा वेगळा आहे रोचक आहे. रंजक आहे आपल्याला शिकवून जाणारा आहे, अचंबित करणार आहे.

रत्नपारखीजींशी थेट गप्पा मारताना, त्यांच्या तोंडून ते किस्से ऐकताना मला खूप मजा येत होती. ती मजा, तो भाव जसाच्या तसा शब्दांकित करण्याचं छान काम सावनी केळकर यांनी केलं आहे त्यांनाही शंभर टक्के गुण.

एकदा रेल्वे प्रवास करताना हे पुस्तक वाचत होतो. प्रवासात पुस्तक वाचताना खिडकी बाहेर बघताना मी स्वतःला त्या गाडीच्या मोटरमनच्या जागी ठेवून बघत होतो. त्यामुळे नेहमीचाच प्रवास नक्कीच वेगळा झाला. गाडीतून उतरल्यावर मोटरमनच्या केबिन कडे उत्सुकतेने आणि आदराने मी बघितलं. गार्डच्या गाडी सुरू करताना दोन बिट्स , त्याने कागदावर केलेली काहीतरी नोंद आणि मग हळूच गाडीने सुरू केलेला ह्या नेहमीच्या गोष्टी पण मला त्यात आपलेपणा वाटला. 
प्रवास पुस्तक वाचताना काही क्षण का होईना आपणही ड्रायव्हर होतो. परकायाप्रवेशाचा हा आनंद प्रत्येक वाचकाला आवडेलच.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...