अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)



पुस्तक - अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)
लेखिका - लीना सोहोनी (Leena Sohoni)
भाषा - मराठी
पाने - २३९
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४
छापील किंमत - रु. ३७०/-
ISBN - 9789357205337

अनुवादामुळे एका भाषेतल्या चांगल्या साहित्यकृतींची ओळख दुसऱ्या भाषिकांना होते. त्यांचा आनंद घेता येतो. त्यामुळे जगभर चांगल्या पुस्तकांचे अनुवाद होत आहेत. मराठीत सुद्धा अनेक चांगल्या साहित्यकृतींचा, वेगळे अनुभवविश्व मांडणाऱ्या पुस्तकांचा अनुवाद मराठीत केला जातो. ज्यातून मराठी वाचक आणि वाचनसंस्कृती समृद्ध होत आहे. पूर्वीप्रमाणे अनुवादाकडे दुय्यम लेखन कला म्हणून आता कोणी बघत नाही, असं मला वाटतं. उलट अनुवादकामुळे एक चांगलं पुस्तक आपल्या भाषेत आलं; त्याबद्दल सुजाण वाचक अनुवादकाला मनोमन धन्यवादच देतो. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्याही मनात येतं; अरे, किती सहज अनुवाद आहे ! आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं "अनुवादाकडून अनुसर्जनाकडे" हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. तरी पुस्तकात दिलेली त्यांची ही ओळख बघा म्हणजे अजून माहिती कळेल.


पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात "मेहता पब्लिशिंग हाऊस" या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत.

पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं.
जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, "अनुवाद खूप बोजड झाला, आहे ठोकळेबाज झाला आहे". हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) टर्मिनोलॉजी काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे.

शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी "संकल्पनां"ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे.
हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी "शब्दांच्या पलीकडले" अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं.

पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी "शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे" असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल.

पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं.

आता पुस्तकातली काही पाने वाचा म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल

अनुक्रमणिका



अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव.


प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग.


अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल.


नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने.


लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे !

मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा "अभ्यासाचे पुस्तक" या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणं हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो.


——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा )
इतरांसाठी जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

टाटा एक विश्वास (Tata Ek Vishwas)



पुस्तक - टाटा एक विश्वास (Tata Ek Vishwas)
लेखक - माधव जोशी (Madhav Joshi)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २२४
प्रकाशन - मोरया प्रकाशन. जानेवारी २०२४
ISBN - 978-93-92269-49-3
छापील किंमत - रु. ३००/-

२० जानेवारी २०२४ ला डोंबिवलीत माधव जोशी ह्यांच्या "टाटा एक विश्वास" पुस्तकाचं प्रकाशन उदय निरगुडकर आणि श्रीकांत बोजेवार ह्यांच्या हस्ते झालं. ह्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. तिथेच पुस्तक विकत घेऊन लेखकाच्या स्वाक्षरीने प्रत मिळाली.



माधव जोशी हे नाव कॉर्पोरेट क्षेत्रात प्रसिद्ध आहेच. डोंबिवलीकर असल्यामुळे डोंबिवलीत ते विशेष प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या सामाजिक आणि कलाविषयक उपक्रमांचे आयोजक म्हणून.. इतरांनी आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमांचा मुक्त आस्वादक म्हणून. त्यांच्याबद्दल अधिक माहिती पुस्तकात पुढील प्रमाणे दिली आहे.



मागच्या वर्षीच त्यांचं "माझी कॉर्पोरेट दिंडी" पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्याचं मी लिहिलेलं परीक्षण पुढील लिंकवर वाचू शकाल.
https://learnmarathiwithkaushik.com/courses/majhi-corporate-dindi/

"टाटा" हे नाव भारतातल्या अनेक पिढ्यांना परिचित नाव. "नमक हो "टाटा"का, टाटा नमक" असं म्हणत आपल्या जेवणातलं मीठ टाटांचं असतं. "टाटा स्टील" द्वारे बांधकाम आणि उद्योगांत पोलाद त्यांचं असतं. इंडिका, सुमो, नेक्सॉन सारख्या गाड्या त्यांच्या असतात. छोटीशी "नॅनो" त्यांची असते तर मोठमोठाले ट्रक त्यांचे असतात. लाखो उच्चशिक्षितांना वाव देणारी आयटी क्षेत्रातली "टीसीएस" आहे. तर आलिशान वास्तव्याचा आनंद देणारी "ताज" हॉटेल्स त्यांची आहेत. ... किती नावं सांगायची
ही जशी कंपन्यांची व उत्पादनांची नावं मोठी तशीच टाटांनी सुरु केलेल्या सामाजिक संस्थांची यादी पण मोठी
टाटा सामाजिक विज्ञान संस्था ( टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस TISS ), टाटा मूलभूत संशोधन संस्था(Tata Institute of Fundamental Research); एखाद्याला केमो थेरपीसाठी "टाटा" ला जावं लागतं असं म्हटलं की आपल्याला काळजीत पडणारी "टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालय" असो किंवा नावात टाटा नसलेल्या "राष्ट्रीय" संस्था NCPA, राष्ट्रीय विज्ञान संस्था (IISc) असो. कितीतरी.

जमशेदजी टाटा, जे. आर.डी टाटा आणि रतन टाटा हे प्रमुख सर्वसामान्यांना सुद्धा आदरणीय, अनुकरणीय आणि लोभस वाटणारी व्यक्तिमत्त्व. म्हणूनच पुस्तकाचं समर्पक नाव आहे "टाटा" - एक विश्वास. टाटा समूहाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या वाटचालीचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. समूहाच्या प्रमुखांच्या व्यक्तिमत्त्वांची ह्यात ओळख करून दिली आहे. त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय, सुरु केलेल्या नव्या कंपन्या, आपल्या संपत्तीचे उदार हस्ते केलेले दान, सुरु केलेले सामाजिक काम ह्याची माहिती आहे. दीडशे वर्षांचा हा कालखंड आहे. अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक उलथापालथी ह्यात झाल्या. १८६८ मध्ये पारतंत्र्याच्या काळ होता. इंग्रज काही स्थानिक उद्योगांच्या बाजूचे नव्हतेच. महायुद्धे झाली. फाळणी झाली. स्वातंत्र्य मिळाले तरी समाजवादी-नियंत्रणवादी अर्थनीती उद्योगस्नेही नव्हती. १९९१ साली आर्थिक उदारीकरण झाले. विदेशी कंपन्यांची तीव्र स्पर्धा तयार झाली. पुढे आयटी युग आले. आता कृत्रिम बुद्धिमत्ता AI चे युग आले. ह्या सगळ्या चढउतारांतसुद्धा टाटा समूह टिकलाच नाही तर वाढला. नवनवीन क्षेत्रांत कंपन्या उभ्या करत राहिला. ह्या प्रवासाबद्दल आपल्याला पुस्तकातून छान समजून येईल.

टाटा समूहात अनेक कंपन्या आहेत. वेळोवेळी त्याचं नेतृत्व "टाटा" आडनाव नसलेल्या व्यक्तींनीसुद्धा केलेलं आहे. त्यातले अनेक टाटांइतकेच कर्तबगार, आपला ठसा उमटवणारे होते. त्यापैकी जे. आर. डी. टाटांच्या वेळच्या रुसी मोदी, दरबारी सेठ, सुमंत मुळगावकर, अजित केरकर, नानी पालखीवाला ह्यांच्या कारकीर्दीचा मागोवा सुद्धा पुस्तकात घेतला आहे.

जे. आर.डी टाटा आणि रतन टाटा ह्यांची कारकीर्द कित्येक दशकांची. त्यामुळे त्यांच्याबद्दल मजकूर साहजिकच जास्त आहे. उद्योगाचा इतका मोठा डोलारा सांभाळायचा म्हटल्यावर मतमतांतरे, कुरबुरी आणि वाद होणारच. निवेदनाच्या ओघात लेखकाने त्याबद्दल सुद्धा थोडं लिहिलं आहे. वर नावं लिहिलेले कंपनी प्रमुख आणि काही इतर "जे आर डीं"च्या काळात जणू स्वतंत्र संस्थानिक झाले अशी लोकांची तक्रार असायची. रतन टाटा आल्यावर त्यांना अशा प्रस्थापितांचा विरोध सहन करावा लागला. रतन टाटा ह्यांनी त्यात बदल घडवून समूहाला वेगळ्या शिस्तीत आणलं. ह्याबद्दल थोडी माहिती मिळते. रतन टाटा पायउतार झाल्यावर सायरस मिस्त्री प्रमुख झाले. पण टाटा-मिस्त्री वाद गाजला. तो घटनाक्रम नक्की काय होता ह्यावर सुद्धा एक प्रकरण आहे.

"नीरा राडिया टेप्स" , "टू जी घोटाळा" ह्यात टाटांचं नाव गोवण्याचा प्रयत्न झाला. टाटांना संसदीय चौकशी समितीसमोर जावं लागलं. न्यायालयीन खटला लढावा लागला. आणि त्यातून टाटा समूह सहीसलामत बाहेर पडला. ह्यावेळी टाटा समूहातले कायदेविषयक अधिकारी म्हणून खुद्द लेखक माधव जोशी ह्यांचा सहभाग होता. त्याचा अनुभव लेखकाने आपल्याशी शेअर केला आहे.

पुस्तकाच्या मलपृष्ठावर उल्लेख आहे "टाटा-डोकोमो"चा. जपानच्या "डोकोमो"शी करार करून टेलिकॉम कंपनी स्थापन झाली. पण तो उद्योग फायदेशीर ठरला नाही. त्यामुळे करारानुसार टाटा समूह डोकोमोला ७६०० कोटी रुपये देणं लागत होता! टाटा समूह द्यायलाही तयार होता. पण सरकार आणि रिझर्व्ह बँक इतकं परकीय चलन देशाबाहेर पाठवायला तयार नव्हते. तेव्हा "आमचं सरकार परवानगी देत नाही" असं म्हणून गप्प न बसता उलट न्यायालयीन खटल्यात टाटांनी डोकोमोची बाजू घेतली. आणि पैसे "देण्यासाठी" भांडले. आणि पैसे "दिले". ७६०० कोटी ! "टाटा" म्हणजे विश्वास हे शब्द सार्थ ठरवणारे असे दोन तीन खास किस्से पुस्तकात आहेत. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आणि नंतर रतन टाटांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि नेतृत्व ह्यावर एक लेख आहे.

ह्या पूर्ण पुस्तकात उद्योगाची वाढ ह्याच बरोबरीने सामाजिक काम कसं सुरू झालं हे प्रसंगोपात येतंच. तरी "टाटा ट्रस्ट" करत असलेल्या कामांवर एक स्वतंत्र लेख आहे.

रतन टाटांनी म्हटलं आहे कि जे. आर. डीं व्यतिरिक्त त्यांच्यावर वर प्रभाव पडणाऱ्या दोन व्यक्ती आहेत - "बोस" कंपनीचे अमर बोस आणि "कमिन्स" कंपनीचे हेन्री शॅच. त्यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे.

पुस्तकातली काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका



पोलाद कंपनी काढावी हे जमशेदजी टाटांचं स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकलं नाही. ते त्यांच्या मुलाने दोराबजी टाटा ह्यांनी पूर्ण केलं. वडिलांसारखेच कर्मचारीस्नेही राहून. आणि दानशूरपणा करून. त्याची एक झलक


लॅक्मे हा सौंदर्य प्रसाधनांचा ब्रँड सुद्धा टाटांनीच सुरु केला. लॅक्मे म्हणजे फ्रेंच भाषेत लक्ष्मी. हे मला ह्या पुस्तकात कळले. नाजूक सौंदर्यवतींसाठी "लॅक्मे" आणि रांगड्या ट्रक चालकांसाठी "टेल्को" !


टूजी विवाद


ट्रस्ट चे थेट काम


असं माहितीने भरलेलं पुस्तक आहे. ह्यातलं एकेक व्यक्तिमत्त्व, एकेक कंपनी, एकेक संस्था हा स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. हे सगळं एका पुस्तकात मांडताना मर्यादा येणं स्वाभाविक आहे. तरी देशाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या, राष्ट्रनिर्मितीसाठी संपत्तीनिर्मिती करणाऱ्या, भरभरून दान देणाऱ्या तरीही प्रसिद्धीपराङ्मुख राहणाऱ्या समूहाचे हे शब्दचित्र वाचकांना नक्की आवडेल. अजून कुतूहल जागृत करेल. वाचनातून एखाद्या सुप्त उद्योजकाला त्यातून प्रेरणा मिळेल. एखाद्या धनाढ्याच्या मनात दानत जागवेल. ज्यांनी शिक्षण, उपचार किंवा व्यवसाय इ साठी प्रत्यक्षपणे टाटा संस्थांची मदत घेतली असेल त्यांना त्यामागचे अनामिक हात दिसतील. ह्या समूहात आणि संस्थांत काम करणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या कामाचा गौरव झालेला दिसेल.

मराठीत कॉर्पोरेट क्षेत्राबद्दलचं साहित्य तसं कमीच आहे. त्यातही अनुवादित पुस्तकं जास्त दिसतात. त्यामुळे माधव जोशी ह्यांनी ही दोन पुस्तके लिहिली आहेत थेट मराठीत लिहिली आहेत; इंग्रजी भाषांतराच्या आधी ती मराठीत प्रकाशित केली आहेत हे विशेष. एक मराठीप्रेमी व्यक्ती म्हणून लेखक-प्रकाशक द्वयीचे खास आभार !

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मस्रा/आडुजीवितम्/गोट डेज (Masra - Aadujeevitham - Goat days)




पुस्तक - मस्रा (Masra)
लेखक - बेन्यामिन (Benyamin)
अनुवादक - ए. आर. नायर / जे.ए. थेरगांवकर (A. R. Nair, J.A.Therganonkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १२८
मूळ पुस्तक - आडुजीवितम् (Aadujeevitham)
मूळ पुस्तकाची भाषा - मल्याळम (Malayalam)
इंग्रजी भाषांतर - Goat days (गोट डेज)
इंग्रजी भाषांतरकार - Joseph (जोसेफ)
प्रकाशन - अनघा प्रकाशन २०१९
ISBN - दिलेला नाही
छापील किंमत - १८०/-

वाचनालयात पुस्तकं चाळताना योगायोगाने एक पुस्तक दिसलं. नाव "मस्रा". लेखक "बेन्यामिन". दोन्ही अपरिचित. मुखपृष्ठपण विचित्र. माणसाला बोकडाचं तोंड आणि तो काठी घेऊन उभा. पण पाठमजकूर एकदम वेधक होता. त्यावरून कळलं की हे "आडुजीवितम्" नावाच्या एका मल्याळम पुस्तकाचे भाषांतर आहे. "बेन्यामिन" हे मल्याळम मधले प्रसिद्ध लेखक आहेत. "आडुजीवितम्" च्या १०० हून अधिक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ही कादंबरी केरळातल्या महाविद्यालयात अभ्यासक्रमात आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली आणि विचार आला की इतकी प्रसिद्ध आणि विलक्षण कादंबरी असेल तर तिचं भाषांतर मराठीत आहे हे कधी ऐकलं कसं नाही ? आता, मराठीत येणारं प्रत्येक पुस्तक मला माहीत असतं असं मी म्हणणार नाही. पण मूळ भाषेत मिळालेली प्रसिद्धी बघता मराठी अनुवाद आला आहे हे कुठे साहित्य विषयक बातम्यांत ऐकलं नाही. किंवा पुस्तक लोकांनी वाचलं आहे ह्यावर "वाचन विषयक" फेसबुक ग्रुपवर पोस्ट, फोटो सुद्धा वाचायला मिळाले नाहीत. अनुवादक आणि प्रकाशक पण मी आधी न ऐकलेले. त्यामुळे कुतूहल आणि आश्चर्य अशा मिश्र भावानेतून पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक वाचून झाल्यावर कुतूहल शमलं. पण आश्चर्य मात्र कायम राहीलं. कारण ही कादंबरी खरंच वेधक, रंजक आणि खिळवून ठेवणारी आहे.

गेली अनेक वर्षे केरळ मधून युवक सौदी अरेबिया, दुबई, कुवेत आणि इतर आखाती देशांमध्ये जातायत. सुशिक्षित तर जातायतच पण अकुशल कामगार म्हणून पण जातायत. तिथे कारखान्यात पडेल ते काम करायचं, पैसे साठवायचे आणि भारतात आपलं जीवनमान सुधारवायचं. तिकडून मिळालेल्या पैशाचं "रुपयात" रूपांतर केलं की भरपूर पैसे. त्यातून हळूहळू सोनं, बंगला, गाडी !! एकाच पिढीत पिढीजात गरिबीपासून सुटका! यामुळे तिकडे जायला तरुण उतावीळ असतात. पण .. पण .. तिथे जायचं, कारखान्यात काम करायचं ह्या स्वप्नाने तिकडे गेलेल्या तरुणांची फसवणूक करून, जाण्यायेण्याचा खर्च व व्हिसा शुल्क च्या नावाखाली पैसे घेऊन उलट त्यांना फुकट कामावर, गुलामीच्या आयुष्यात ढकलण्याचे उद्योगही व्हायचे. अशाच एका हतभागी तरुणाची ही कहाणी आहे.

कादंबरीची सुरुवात होते सौदी अरब मधल्या एका पोलिस स्टेशन समोर उभ्या असलेल्या दोन तरुणांपासून. आपल्याला पोलिसांनी अटक करावी अशी त्यांची इच्छा आहे. सौदीतला तुरुंगातली शिक्षा म्हणजे नरकवास. पण तरी त्यांना तो परवडणार आहे कारण ते त्याहून भयानक परिस्थितून पळून आले आहेत. हे तरुण भारतातून सौदीत आले ते कारखान्यात नोकरीला म्हणून गेला. इंग्लिश येत नाही तिथे अरबीचा तर प्रश्नच नाही. पण विमानतळावरून त्यांना एक माणूस घेऊन गेला ते थेट वाळवंटात. तिथे होता "मस्रा" म्हणजे शेळ्या-मेंढ्यांचा कोंडवाडा. आणि "कारखान्यात नोकरी" नाही तर "मेंढ्यांचा राखणदार" म्हणून गुलाम. शेळ्या-मेंढ्यांमध्येच राहायचं. त्यांची घाण काढायची. त्यांना पाणी पाजायचं. चरायला नेऊन आणायचं. दूध काढायचं. दिवस रात्र हेच काम. फक्त अस्वच्छ वातावरण नाही तर तितकंच अस्वच्छ राहणं. कारण एकच पायघोळ झगा कायम घालायचा. ढुंगण धुवायला पाणी नाही तर अंघोळ दूर आणि कपडे धुणं म्हणजे अशक्यच. एका सभ्य, कुटुंबवत्सल भारतीय तरुणाचं जणू हे स्वतःच अरबी बोकडात रूपांतर झालं ! म्हणून मुखपृष्ठावर तो बोकड..बोकड पाळणारा. ह्यातून सुटणं अशक्यप्राय कारण मालक - अरबाब - कायम बंदूक घेऊनच तयार. चूक झाली की पट्ट्याने हाणणार. त्याची सुटका होणार का ? का तो तसाच कुढत मारणार ?

वाळवंटातलं हे खडतर जीवन लेखकाने परिणामकारकपणे उभं केलं आहे. नायकाच्या मनातले भाव नेमके टिपले आहेत. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून सुटकेची आस ठेवणं तर कधी "हीच परमेश्वराची इच्छा" असं समजून अगतिकतेने स्वतःचं असं पाशवी अस्तित्व स्वीकारणं. सुटकेसाठी प्रयत्न करणं आणि त्यात येणारी असफलता अनुभवणं. हे परिस्थितीचे आणि भावनांचे हेलकावे कादंबरीभर येतात. आपण नायकाशी समरस होतो. डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतो. कुठल्याही प्रसंगात वर्णन रेंगाळलं नाहीये. थोडक्यात लिहिलं आहे. आता मूळ कादंबरीत तसं आहे का अनुवादकाने थोडक्यात आटोपलं आहे महिनीत नाही. असं असलं तरी त्याची दाहकता भिडते. आता पुढे काय घडतंय हे आपण वाचत राहतो.

एक दोन प्रसंग उदाहरणादाखल
वाळवंटातला पहिला दिवस



परिस्थतीचा स्वीकार-अस्वीकार


पलायनाचा एक प्रयत्न



"भयंकर परिस्थतीतून सुटका" ह्या कथासूत्रावर अनेक पुस्तके आणि चित्रपट आले आहेत. त्याच पद्धतीतले हे एक पुस्तक आहे. तरी प्रत्येक कथानकातली परिस्थिती वेगळी. आव्हाने वेगळी. प्रसंग वेगळे. त्यामुळे अशी पुस्तके वाचनप्रिय होतात ह्यात नवल नाही. तसेच हे सुद्धा होईल. त्यात हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे. त्याला एक विशिष्ट सामाजिक संदर्भही आहे.

amazon वर बघितलं तर मूळ मल्याळम पुस्तक २३२ पानांचं आहे. तर इंग्रजी अनुवाद "Goat days" २६४ पानाचं आहे. हे मराठी पुस्तक मात्र १२८ पानांचं आहे. आणि पुस्तकात असं म्हटलं आहे की हा "स्वैर अनुवाद" आहे. त्यामुळे ह्या अनुवादात प्रसंग गाळले आहेत का वर्णन गाळलं आहे कळायला मार्ग नाही. त्यामुळे मूळ मजकूरात अजून काय असेल ह्याची उत्सुकता आहे. जर तुम्ही वाचले असेल तर मला सांगा.

अजून एक गंमत. ह्या पुस्तकाबद्दल नेट वर शोधताना कळलं की ह्या कादंबरीवर आधारित एक "आडुजीवितम्""Aadujeevitham - The Goat Life" ह्या नावाने एक चित्रपट येतोय. तोही ह्याच महिन्यात. २४ मार्च २०२४ ला ! 

तर मग वाट कसली बघताय "मस्रा" मध्ये शिरायचं धाडस करा.


YouTube video link     https://youtu.be/qvsiJKdDxPs?si=r_IZEf-5K6pyPfvo
——————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ललित गजानन (Lalit Gajanan)




पुस्तक - ललित गजानन (Lalit Gajanan)
लेखक - चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ९३
प्रकाशन - मोरया प्रकाशन. एप्रिल २०२३
ISBN - 978-93-92269-11-0
किंमत - रु. १२५ /-

"शेगांवचे संत श्री गजानन महाराज" हे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आजच्या दिवसाची तिथी "माघ वद्य सप्तमी" ही गजानन महाराजांचा प्रकटदिन. ह्या दिवशी ते सर्वप्रथम शेगावच्या गावकऱ्यांना दिसले. दिगंबर अवस्थेतल्या रूपात. लोकांनी त्यांच्याकडे कुतूहलाने, संशयाने पाहिलं. पण नंतर झालेल्या चमत्कारांमुळे हे वरवर वेड्याचे रूप पांघरलेले योगी/सिध्दपुरुष आहेत अशी लोकांना खात्री पटली. तिथून त्यांचे भक्त वाढले. त्यांच्या पुढील आयुष्यात बरेच चमत्कार घडले. लोकांना दृष्टांत घडले. हे सगळी कथा "श्री गजानन विजय" ह्या ओवीबद्ध काव्यात आहे. ह.भ.प. दासगणू महाराज ह्यांनी ती लिहिली. "गजानन महाराजांची पोथी" असाच उल्लेख ह्या ग्रंथाचा उल्लेख होतो. महाराजांचे भक्त गावोगावी आहेत. त्यामुळे ह्या पोथीचे नित्यपारायण करणारे, नैमित्तिक पारायण करणारे भाविक शेकड्यानी आहेत. ह्याच पोथीवर आधारित पुस्तक आहे "ललित गजानन".

पण हे पुस्तक धार्मिक नाही. गजानन महाराजांचे अजून काही चमत्कार किंवा दृष्टांत ह्यात नाहीत. किंवा गजानन महाराजांची उपासना का करावी, कशी करावी असं सांगणारं हे प्रचारकी पुस्तक नाही. तर हे पुस्तक आहे "पोथी"कडे "एक पुस्तक" किंबहुना "एक साहित्यकृती" ह्या अर्थाने बघणारं. आपल्या इष्टदेवतेचे/सद्गुरूंचे चरित्र ह्या भावभक्तीने पोथीकडे बघणं स्वाभाविकच आहे. लेखकानेही पोथीचं तसं वाचन/पारायण केलं आहेच. पण केवळ भाषासौंदर्य म्हणून "गजानन विजय" मधल्या ओळी बघितल्यावर त्यात काय सौंदर्यस्थळं दिसली हे लेखकाला "ललित गजानन" मधून सांगायचं आहे. लेखक चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ, व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबरीने ते उत्तम वाचक, रसिक आणि ललित लेखकही आहेत. त्यांची पुस्तकात करून दिलेली ओळख.



गजानन महाराजांचे चरित्र सांगणे हा पोथीचे लेखक "दासगणू" ह्यांचा उद्देश आहेच. पण ते सांगताना लोकांना सद्वर्तनाचा उपदेश सुद्धा ते करतात. आणि हे सगळं काव्यात गुंफताना ते आकर्षक, काव्यात्मक होईल ह्याची पूर्ण जाणीव ठेवून. त्यामुळे दासगणूंची काय काय लेखन वैशिष्ट्ये ह्यात दिसली ह्याबद्दल चंद्रशेखर टिळकांनी आपली निरीक्षणं सादर केली आहेत. पोथीच्या अध्यायसंख्येप्रमाणे ह्या पुस्तकात पण २१ प्रकरणे आहेत. पण एका अध्यायावर एक असं प्रकरण नाही. तर एकेका मुद्द्यावर एक अशी प्रकरणे आहेत. त्यात लेखकाने थोडक्यात आपला मुद्दा/निरीक्षण सांगितलं आहे. उदाहरण म्हणून मूळ पोथीतल्या ओव्या दिल्या आहेत.

अनुक्रमणिका


सुरुवातीच्या प्रकरणात टिळकांचं म्हणणं/निरीक्षण असं आहे की दासगणूंना "तीन" हा आकडा आवडता असावा. कारण एखाद्या व्यक्तीचं/घटनेचं वर्णन करताना ते बऱ्याच वेळा तीन विशेषणे वापरतात, मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी तीन उदाहरणे देतात, विशिष्ट उल्लेख पोथीत तीन वेळा येतो इ.
पुढे एकेक मुद्द्यावर एक लेख आहे. उदा. "संबोधन ललित" म्हणजे पोथीत वेगेवेगळ्या पात्रांसाठी कुठकुठली संबोधने वापरली आहेत, त्यात कसा वेगळेपणा आहे ह्याबद्दल लिहिलं आहे.
"खाद्य ललित", "वस्त्र ललित" - पोथीत कुठल्या खाद्यपदार्थांचा, कुठल्या वस्त्र प्रावरणांचा कसा कसा उल्लेख आला आहे.
"विशेषण ललित", "उपमा ललित" - गजानन महाराज, साधूसंत परमेश्वर किंवा इतर पात्रं ह्यांना कशी चपखल बसणारी विशेषे लावली आहेत; उपमा दिल्या आहेत ह्याबद्दल.
"बोलीभाषा ललित","रीत ललित" - शेगांव हे विदर्भातलं- वऱ्हाडातलं गाव. शंभर वर्षांपूर्वीचा काळ. त्यामुळे तेव्हाच्या बोलीभाषेतले खास वेगळे जाणवलेले शब्द लेखकाने निवडून सांगितले आहेत. तसेच तेव्हाच्या जीवनपद्धतीबद्दल काय समजतं हे लेखकाने नमूद केलं आहे.
"नाट्यछटा ललित" - पोथीतले नाट्यमय प्रसंग किंवा संवाद जे एखाद्या नाट्यछटेप्रमाणे सादर करता येऊ शकतील

काही पाने वाचा म्हणजे तुम्हाला लेखनशैली नीट समजेल.
"तीन" बद्दल निरीक्षण



"खाद्य ललित"



"स्वभाव ललित" - पोथीत भरपूर पात्रे आहेत. त्या पात्रांची स्वभाववैशिष्टये कशी नेमक्या शब्दांत दासगणूंनी मंडळी आहेत त्याबद्दल



"तौलनिक ललित" - दोन व्यक्तींची तुलना करताना त्या कशा समा
 अध्यात्मिक योग्यतेच्या व्यक्ती आहेत हे दाखवताना वापरलेली भाषा



अशा पद्धतीने एक एक संकल्पना घेऊन पूर्ण पोथीचा धांडोळा घेतला तर आपल्या हाती काय भाषिक माणिकमोती सापडतील हे बघण्याचा हा आगळा वेगळा प्रयोग आहे. लेखकाने त्याला जाणवलेले "पॅटर्न", साम्यस्थळं सांगितली आहेत. ती "तश्शीच" आहेत हे सिद्ध करण्याचा अट्टाहास नाही. लेखक मुद्दा सांगतो आणि न रेंगाळता पुढे जातो. फार जड अशा व्याकरणाच्या किंवा भाषाशास्त्राच्या संज्ञा सुद्धा वापरलेल्या नाहीत. त्यामुळे न कंटाळता एका बैठकीत वाचून होईल असे पुस्तक आहे.
पोथी आपल्या बरोबर ठेवून हे पुस्तक वाचायचं. म्हणजे ती ती ओवी पुढचा मागचा संदर्भ धरून वाचली की मुद्दा लक्षात येतो. प्रसंग विसरलो असू तर तो आठवतो. म्हणून ज्यांनो पोथी वाचली आहे किंवा नियमित पोथी वाचतात त्यांना हे पुस्तक भावेल. जर ती पोथी वाचली नसेल तरी शब्दांच्या गमती वाचायला आवडतील.

आपल्या पुराणकथा, रामायण-महाभारत ही आर्षमहाकाव्ये, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा आणि इतर संत साहित्य हे सगळं आपलं धार्मिक, अध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानाचं संचित आहेच. तितकीच ती "भाषिक लेणी" सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही त्या संप्रदायाचे अनुयायी नसाल, देव-दैव-चमत्कार ह्यावर विश्वास ठेवत नसाल तरी भाषिक अंगाने ह्या साहित्यकृतींकडे बघणं तुम्हाला नक्कीच शक्य होईल. बरेच साहित्य संशोधक त्या पद्धतीने अभ्यास करत असतात. ज्ञानेश्वरांचे लडिवाळ शब्द, रामदासांचे नवनवे शब्द योजण्याचे सामर्थ्य ह्या विषयी बऱ्याच वेळा वाचायला मिळतं. अशा अभ्यासकांच्या "रडार"वर "गजानन विजय" सुद्धा येईल हेच चंद्रशेखर टिळकांच्या लेखातून जाणवलं. प्रत्येक पोथी वाचकाने असा वेगळा विचार केला तर अजून काही वेगळे साचे(पॅटर्न), वैशिष्ट्ये जाणवतील. असा विचार करायला उद्युक्त होण्यासाठी "ललित गजानन" वाचा.


———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...