The bridges of Madison county (द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी)



पुस्तक - The bridges of Madison county (द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी)
लेखक - Robert James Waller (रॉबर्ट जेम्स वॉलर)
भाषा - English (इंग्रजी)
पाने - १७१
प्रकाशन - पेंग्विन रँडम हाऊस, १९९२
छापील किंमत - रु. ५५०/-
ISBN - 978-0-099-42134-4

ही एक गाजलेली इंग्रजी कादंबरी आहे. गोष्ट अशी आहे की रॉबर्ट किंकेड हा एक मध्यमवयीन छायाचित्रकार नॅशनल जियपोग्राफिक सारख्या मासिकांसाठी निसर्ग छायाचित्रणाचे काम करतो आहे. त्यासाठी तो जगभर फिरतो आहे. सतत फिरणं, निसर्ग बघणं , फोटो काढणं हेच त्याचं आयुष्य आहे. जणू वेगळ्या प्रकारच्या "भटक्या जमतीतला"च एक सदस्य. अमेरिकेतल्या "मॅडिसन काऊंटी " भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण पुलांवर स्टोरी करण्यासाठी तो आला आहे. अनोळखी भागात रस्त्याची चौकशी करताना त्याची अनपेक्षित गाठ पडते एका घरातल्या मध्यमवयीन विवाहितेशी -फ्रान्सिस्काशी. नजरानजरेतून, जुजबी बोलण्यातून त्यांना एकमेकांबद्दल काहीतरी वेगळं आकर्षण वाटतं. दोघेही मध्यमवयीन. फ्रान्सिस्का विवाहित, दोन मुलांची आई. तर रॉबर्ट घटस्फोटित. मग पुढे काय होतं ? त्यांची ओळख वाढते का ? एकेमेकांना भेटतात का ? प्रेमात पडतात का ? भेटत राहतात का ? मग घरच्यांचं काय ? लोक काय म्हणाले असतील ? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचावं लागेल.

कादंबरीचे कथानक अगदी लहान आणि सोपे आहे. पण ज्या पद्धतीने प्रसंग रंगवले आहेत, व्यक्तीचित्रणे रंगवली आहेत त्यातून कादंबरी आकर्षक आणि वाचनीय झाली आहे. रॉबर्ट कसा आहे, फ्रान्सिस्का कशी आहे, ते तसं का वागले, त्यांनी तसेच निर्णय का घेतले हे आपल्याला पटतं, आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. भारतीय कुटुंबव्यवस्थेत अशा दोन व्यक्तींचा संबंध म्हणजे व्यभिचारच. ग्रामीण अमेरिकन समाजातही तो तसाच समाजला गेला असेल असंच पुस्तक वाचून जाणवतं. तरीही भारतापेक्षा अमेरिकेत लोकांनी ते लवकर पचवलं असतं किंवा लवकर विस्मृतीत गेलं असतं. त्यामुळे हे कथानक तिथेच घडू शकेल आणि तिकडेच शोभेल.

पुस्तकाची कथन शैली वेगळी आहे. आधी लेखिका थेट आपल्याशी बोलते की तिला हे प्रसंग कसे कळले. मग ती रॉबर्टचं आयुष्य सांगायला लागते. त्याचं व्यक्तिमत्त्व पूर्ण उभं राहतं. प्रसंग घडत घडत रॉबर्ट मॅडिसन काऊंटी पर्यंत येतो. तिथून फ्रान्सिस्का चे आजचे जीवन. तिच्या जीवनातल्या आठवणींतून, पूर्व दृश्यांतून रॉबर्ट-फ्रान्सिस्का ची भेट उलगडते. पुढे काय झालं असेल ह्याची उत्कंठा वाढते. पुढच्या काही पानांत ते वर्णन येत. पण पुस्तक तिथे थांबत नाही. तर, ही खाजगी गोष्ट लेखिकेला कशी कळली ह्याचे उपकथानक जे पुस्तकाच्या सुरुवातीला आलं होतं त्याचा पूर्वार्ध येतो. अशी ही काळात पुढे-मागे जाणारी तरी गोंधळात न टाकणारी शैली आहे. रॉबर्टच्या फोटो काढण्याच्या प्रसंगांचं अतिशय तपशीलवार वर्णन आहे. कुठली लेन्स वापरली, कसा अँगल लावला, हालचाली कशा केल्या ह्यातून अस्सल प्रसंग आपल्याला दिसतो. त्यांच्या भेटीचे, प्रेमाचे, विरहाचे भावपूर्ण चित्रण आहे. कुठेही बटबटीतपणा न आणता. हे बहुतांश वाचकांना आवडलं असणार म्हणून ही कादंबरी "बहुखपाची"/"बेस्ट सेलर" झाली असणार. कदंबरीवर हॉलिवूड चित्रपट सुद्धा आला आहे.

पुस्तकाची काही पाने वाचून बघा म्हणजे अजून नीट कल्पना येईल

रॉबर्ट पुलाचे फोटो काढतो तेव्हाचे वर्णन



फ्रान्सिस्का रॉबर्टचे स्वागत घरी करते. आकर्षण वाढू लागते आहे. ते एकमेकांबरोबर घरात नृत्य करतात.



त्यांचं छायाचित्रणाचं काम संपल्यावर त्याला निघावं लागतं. निरोपाचा, पुन्हा भेटण्याचं ठरवण्याचा प्रसंग.



तुम्हाला सुद्धा प्रेमकहाण्या वाचायला आवडत असतील तर ही कादंबरी आवडेल.



——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अंतर्नाद - एका मासिकाचा उदयास्त (Antarnad - Eka masikacha udayast)



पुस्तक - अंतर्नाद - एका मासिकाचा उदयास्त (Antarnad - Eka masikacha udayast)
लेखक - भानू काळे (Bhanu Kale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २७२
प्रकाशन - मौज प्रकाशन. फेब्रुवारी २०२४
ISBN - 978-93-5079-073-1
छापील किंमत - रु. ५००/-

पुस्तकप्रेमी, साहित्यप्रेमी वाचकांनी "अंतर्नाद" नावाचं मासिक कधी ना कधी नक्कीच वाचलं असेल. त्याचा दिवाळी अंक वाचला असेल. बरेच जण त्याचे पूर्वी नियमित वाचकही असतील. १९९५ ते २०१९ इतका काळ हे मासिक सुरु होतं. ह्या मासिकाचे संस्थापक, संपादक आणि सर्वेसर्वा भानू काळे आहेत. त्यांनी ह्या मासिकाची जन्मकहाणी, वाढ, विस्तार, संघर्ष आणि अपरिहार्य शेवट हे सगळे टप्पे ह्या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडले आहेत. त्यावेळचे अनुभव, इतर व्यक्तींचा सहभाग, मान्यवरानाचे सहकार्य व मार्गदर्शन, मासिकाने केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमागच्या प्रेरणा, मिळालेला प्रतिसाद आणि त्याचा साहित्यसृष्टीवर झालेला परिणाम हे सगळं पुस्तकात आहे. एकूणच "अंतर्नाद" मासिकाच्या आयुष्याचं हे डॉक्युमेंटेशन आहे. पण हे डॉक्युमेंटेशन आपोआपच १९९५ ते २०१९ ह्या कालावधीतल्या बदलत्या मराठी समाजाचं, बदलत्या/घसरत्या वाचन संस्कृतीचं आणि एकूणच घसरत्या संस्कृतिकतेचं डॉक्युमेंटेशनसुद्धा आहे. त्यामुळे भले तुम्ही "अंतर्नाद" चे वाचक असा नसा; ह्या अनुभवांशी तुम्ही स्वतःला जोडून घेऊ शकता.

"अंतर्नाद" मासिक सुरू झालं त्या आधीच्या काळात चांगली मराठी नियतकालिकं बंद पडत होती. तरी स्वतः लेखक असणाऱ्या आणि मुद्रण व्यवसायात असणाऱ्या भानू काळे ह्यांनी एक नवं मासिक सुरु करायचा निर्णय घेतला. मुद्रण व्यवसाय बंद करून, मुंबईहुन पुण्याला स्थलांतर करून पूर्ण वेळाचा व्यवसाय मासिकाचा म्हणून स्वीकार केला. त्यापूर्वी त्यांनी ह्या क्षेत्रातल्या अनेकांशी संपर्क साधून आपला मनोदय कळवला. हे काम आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरू शकेल, लोकांचा प्रतिसाद मिळेल की नाही ह्याबद्दल अनेकांनी त्यांना सावध केलं. तरीही स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःच्या कल्पना घेऊन त्यांनी मासिक सुरु केलं. ह्या टप्प्याबद्दल सविस्तर वर्णन पुस्तकात आलं आहे.

मासिक चालवायचं ते दर्जेदार साहित्य लोकांसमोर यावं म्हणून. तसंच नवोदितांना व्यासपीठही मिळावं म्हणून. मासिकात साहित्याची निवड कशी केली, लेखकांशी संपर्क कसा साधला, त्याचे वेगवेगळे अनुभव पुस्तकात आहेत. वैचारिक आणि दीर्घ लेख "अंतर्नाद" मध्ये प्रकाशित होत. पुढे त्यातल्या काही लेखसंग्रहांची पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली. अंतर्नाद ने आपल्या वाचकवर्गाची पसंती मिळवली होती.

लिखाणाचा दर्जा हे जसे मासिकाचे वैशिट्य होते तसेच त्याचे सादरीकरण सुद्धा सुयोग्य दर्जाचे असावे ह्यासाठी त्यांनी केलेल्या महेनतीबद्दल सुद्धा सविस्तर लिहिले आहे.

मासिकातल्या लिखाणात अचूकता यावी ह्यासाठी खास काळजी घेतली जायची. यास्मिन शेख ह्या मराठी भाषा विदुषीचे सहकार्य त्यांना लाभले. स्वतः श्री. काळे ह्यांचे मजकूर तपासणीकडे लक्ष होते. मुखपृष्ठासाठी प्रसिद्ध कलावंतांची चित्र मिळवली. "रवींद्रनाथ विशेषांक", कालिदास विशेषांक", "शेक्सपियर विशेषांक" कसे तयार झाले ते अनुभव पुस्तकात आहेत. नवीन लेखक कवी तयार व्हावेत ह्यासाठी कथालेखन स्पर्धा राबवल्या होत्या. वाचन वाढावे ह्यासाठी मासिकातल्या लेखनावर आधारित खुल्या लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. त्याची माहिती पुस्तकात आहे.

वरचे सगळे मुद्दे वाचताना फार छान छान, यशस्वी, सकारात्मक असं वाटत असेल. पण तसं नव्हतं. पूर्ण पुस्तकभर ह्या अनुभव कथनाला एक विषण्णतेचे, हतबलतेचे, संघर्षाचे पार्श्वसंगीत आहे. कारण प्रत्येक महिन्याचा अंक, प्रत्यके दिवाळी अंक, प्रत्येक उपक्रम हा एक संघर्ष होता. वर्गणीदार वाढवायचा संघर्ष. अंकासाठी जाहिराती मिळवण्यासाठी संघर्ष. "दिवाळी अंकांपेक्षा दिवाळीच्या फटाक्यांचा खप जास्त होतो. तुम्हाला जाहिराती देऊन काय फायदा" असा बाजाराचा सूर. राजकीय वाद टाळले तरी मासिकातल्या मजकुरावर होणारी नाहक टीका. डावे-उजवे-भांडवलशाहीवादी-समाजवादी अशी कुठलीही एक भूमिका घेतली नाही त्यामुळे कुठलाच "हक्काचा मतदारसंघ" तयार झाला नाही अशी स्थिती. वाढता निर्मिती खर्च. छपाईसाठी कागद मिळवणे, टपालाने अंक पाठवणे ह्या नियमित गोष्टीसुद्धा त्रासदायकच होत्या. अंक पोचला नाही तर पुन्हा पाठवा. येणी वसूल करा. देणी वेळेत द्या. एक ना दोन बारा भानगडी. पुस्तकात हे सगळं वाचताना मासिक चालवायचं म्हणजे, पुलंच्या रावसाहेबांच्या भाषेत "सोपं काम काय हो ते? पीडाच की ती !" असाच भाव माझ्या मनात आला.

श्री. काळे ही सगळी पीडा सहन करत होते ते समाजाची संस्कृतिक समृद्धी वाढावी ह्यासाठी. पण तिथेही एकूण निराशाच पदरी येत होती. खालावत जाणाऱ्या लेखनदर्जामुळे अंकाचा दर्जा कसा शाबूत ठेवायचा ह्याची काळजी वाढत होती. तरुण मुलांनी वाचावं, लिहितं व्हावं ह्यासाठी कॉलेजमध्ये चालवलेल्या उपक्रमांना मिळाला थंड प्रतिसाद. नवी पिढी इंग्रजी माध्यमाकडे वळल्यामुळे मराठी वाचनच मुळात कमी झाले. त्यात टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉट्सअप चे जबरदस्त आव्हान उभे राहिले होते. "संपादक संवाद" असा संपादकांचं संगठन बांधायचा प्रयत्न सुद्धा पुढे गेला नाही. प्रत्येक नियतकालिक स्वतंत्रपणे झुंजत राहिलं. ही सगळी आव्हाने पुस्तकात सविस्तरपणे मांडली आहेत. त्या विवेचनातून ही आव्हानं फक्त "अंतर्नाद"ची नाहीत तर भारतीय आणि मराठी समाजाचीच आहेत हे वास्तव अधोरेखित होतं.

लोक वाचत का नाहीत ? न वाचणाऱ्यांचं असं काय नुकसान झालं ? वाचनाने सुसंस्कृतपणा येतो असं म्हटलं तरी जे वाचतात ते तरी खरंच सुसंस्कृतपणे वागतात का ? लेखक, कलावंत ह्यांच्या भ्रष्ट वागण्याचे किस्से ऐकू येतातच ना ? उपयुक्ततावादाच्या जगात, पैशाच्या जगात कथा-कादंबऱ्या-ललित साहित्य ह्यांच्या वाचनाचं त्यातून मिळणाऱ्या आनंदाचं मोल पैशात कसं करायचं? मनोरंजनाच्या थिल्लरपणाला "थोडं डोकं लावायला लावणाऱ्या" सकसतेकडे कसं वळवणार? मराठी ज्ञानभाषा होण्याची लढाई आपण हरलो आहोत हे आपण मान्य करणार का ? मराठी टिकेल का? आणि टिकवायची तरी कशासाठी? असे कितीतरी प्रश्न हे पुस्तक आपल्या मनात उभे करते.
"अंतर्नाद" जात्यात तर आपण सुपात आहोत, नाही का !

"अंतर्नाद"च्या यशापयशात सामाजिक स्थितीचा भाग मोठा असला तरी काळे ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या स्वतःच्या गुणदोषांचा, आवडीनिवडीचा सुद्धा परिणाम निश्चितच होता. त्यादृष्टीने काळे ह्यांनी आत्मपरीक्षण सुद्धा केलं आहे. स्वतःच्या उणीवा स्पष्टपणे मांडल्या आहेत. "अंतर्नाद"ला संस्थात्मक रूप , एका टीमचं रूप देण्यात आलेलं अपयश त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं आहे. "म्हाताऱ्यांचं मासिक" अशी मासिकाची प्रतिमा तयार झाली त्याला काही अंशी स्वतःचा गंभीर स्वभाव कारणीभूत असावा हेही स्वीकारलं आहे. पुस्तकाने त्यातून समतोल साधला आहे. ह्याच काळात इतर कुठली मासिकं सुरु झाली, वाढली, बंद पडली हे पण थोडक्यात सांगितलं असतं तर नियतकालिकसृष्टीचं चित्र अजून स्पष्ट झालं असतं.

हे पुस्तक वाचतांना मला स्वतःला प्रश्न पडला की मी स्वतः अंतर्नाद किंवा नियतकालिकं किती वाचतो? तर फार क्वचित. मी पुस्तकं भरपूर वाचतो. पण वेगळे वेगळे लेख वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचणं भावतं. तसंच आठवड्याला एक लेख असं वर्षभर लेखमाला वाचण्यापेक्षा ती लेखमाला पुस्तक स्वरूपात सलग वाचायला आवडते. वाचकांमधला पण हा पोटभेद ! पुस्तक वाचनालयातून घेऊन वाचन जास्त होतं प्रत्यक्ष विकत घेऊन पुस्तक वाचन कमी होतं. म्हणजे जरी मी एक चांगला, नियमित वाचक असलो तरी नियतकालिकांच्या दृष्टीने उपयुक्त नाही !

आता काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका


मासिकासाठी साहित्य निवडीबाबत



वर्गणीदार वाढवण्याची धडपड



"पुस्तक" आणि "वाचन" ह्यांना नवीन तंत्रज्ञानाचे आव्हान ह्याबद्दल चिंतन.




मी ज्या वाचनालयाचा सभासद आहे आणि जिथून मी हे पुस्तक घेतलं आहे त्या "फ्रेंड्स लायब्ररी"च्या पै काकांच्या योगदानाचे योग्य कौतुक पुस्तकात आहे



"डॉक्युमेंटेशन"ची फार सवय नि आवड नसणाऱ्या आपल्या समाजात हे पुस्तक दस्तऐवजीकरण म्हणून वेगळं आहे.

हे पुस्तक वाचल्यावर जाणवलं की प्रतिकूलतेसमोर शरणागतीचं "पांढरं निशाण" न दाखवणारे "काळे" हे एक योद्धाच आहेत. हे युद्ध कठीण आहे. कोणाला ह्या लढाईत उतरायचं असेल तर केवळ भावनेच्या भरात न उतरता सर्व बाजूने कसा विचार करावा लागेल ह्याचं प्रामाणिक दर्शन पुस्तकातून घडेल. लेखक, प्रकाशक, सुजाण वाचक, भाषा-संस्कृती ह्यात रस असणाऱ्या प्रत्येकाला हे चिंतन आवडेल. लेखकाचे विचार सगळेच सगळ्यांना पटतीलच असे नाही किंवा मागे वळून बघताना, "अरे, तुम्ही हे का केलं नाही, ते 
का केलं" असं सुद्धा वाटू शकतं. पण तसं वाटण्याला काही अर्थ नाही. ज्याच्याकडे खरंच काही प्लॅन आहे त्याने ह्या लढाईत उतरावं आणि करून दाखवावं. 

भानू काळे ह्यांच्या कष्टाला प्रणाम !




——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

डॅडी लॉंगलेग्ज (Daddy LongLegs )





पुस्तक - डॅडी लॉंगलेग्ज (Daddy LongLegs )
लेखिका - जीन वेब्स्टर (Jean Webster)
भाषा - मराठी (Marati)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
अनुवादिका - सरोज देशपांडे (Saroj Deshpande)
पाने - १४३
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, २००८
मूळ पुस्तक प्रकाशन - १९१२
छापील किंमत - रु. १२०/-
ISBN - 978-81-7434-407-6

"डॅडी लॉंगलेग्ज" ही एक पत्ररूपात लिहिलेली कादंबरी आहे. एक अठरावर्षीय मुलगी जेरुशा तिची नायिका आहे. ती लहानपणापासून अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली आहे. आता शाळेचं वय संपलं तरी आयुष्यात पुढे काय करायचं हा प्रश्न तिच्यापुढे, अनाथाश्रमापुढे आहेच. तात्पुरते तरी आश्रमातच राहण्या-जेवण्याबदल्यात आश्रमाचीच सगळी कामं तिने करायची अशी सोय लागली आहे. ती हुशार आहे, थोडी अवखळ आहे. एके दिवशी आश्रमाची संचालिका तिला सांगते की आश्रमाच्या एका विश्वस्तांना तिने लिहिलेला निबंध-विनोदी शैलीतली कथा आवडली. तिच्यात कल्पकता आहे, बुद्धिमत्ता आहे हे त्यांना जाणवलं. कदाचित पुढे ती लेखिका होऊ शकेल असं वाटून पुढे प्रगती करण्यासाठी कॉलेजात पाठवायची तयारी त्यांनी दाखवली आहे. तिच्या कॉलेजचा खर्च तेच करतील. अट एकच तिने तिची प्रगती आणि रोजच्या साध्यासुध्या गोष्टीसुद्धा नियमित पत्रांतून कळवायच्या. जणू आईवडिलांना पत्र लिहितेय अशा. पण त्यांची खरी ओळख तिला सांगितली जाणार नाही. जेरुशा ला हा सुखद धक्काच असतो. पण आपल्याला मदत करणारा हा माणूस कोण ? त्याने आपलं खरं नाव गुप्त का ठेवलं आहे हे तिला काहीच कळत नाही. त्या विश्वस्तांना ती एकदाच दुरून पाठमोरं आणि ओझरतं पाहते. ते मध्यमवयीन आणि लंबूटांग आहेत. एवढंच तिच्या लक्षात येतं.

ती ही संधी मनापासून स्वीकारते. ती पहिल्यांदाच आश्रमाबाहेर खुल्या जगात एकटीने वावरु लागते. पत्र लिहू लागते. "जॉन स्मिथ" हे त्यांचं खोटं नाव तिला आवडत नाही. त्याऐवजी ती त्यांना स्वतःच नाव देते - लंबूटांग म्हणून "डॅडी लॉंगलेग्ज". ह्याच पत्रांतून उलगडतं तिचं मन, तिचा स्वभाव. अनाथाश्रमात वाढलेली, बाहेरच्या जागत वावरायला बुजणारी ती ह्या खुल्या जगाशी कशी जुळवून घेते. कशी मोठी होते हा प्रवास आपल्याला त्या पत्रांतून उलगडतो. आपला हा भूतकाळ लोकांना, मैत्रिणींना कळला तर त्या काय म्हणतील ? हसतील, नाक मुरडतील का सहानुभूतीने वागतील. असं काहीच वाट्याला येऊ नये म्हणून ती काहीतरी कामचलाऊ उत्तरं देऊन वेळ मारून नेते. मुली ज्या विषयांवर गप्पा मारतात त्यातलं काहीच आपल्याला ठाऊक नाही म्हणून अधाश्यासारखी पुस्तकं वाचून काढते. असं ती पत्रांतून कळवते.

पत्रांत दिसते तिचा निखळ स्वभाव. "डॅडी' ने आपली ओळख सांगावी किमान तिला उलट टपाली उत्तर तरी पाठवावं म्हणून ती मधून मधून विनवते, हट्ट करते. तिच्यासाठी "डॅडी' हेच आपलं एकमेव माणूस या ती त्यांना चिडून पण पत्र लिहिते. पण पुढच्या पत्रात तिची चूक दुरुस्त करते "डॅडी'ने दिलेल्या मदतीमुळे तिला नवीन अनुभव घ्यायला मिळतायत ह्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते. तर कधी मी तुमचे उपकार - पैसे तरी - परत करीन अशी प्रौढ भूमिका पण घेते. परीक्षेत नापास झाले हे मजेत सांगते; पण पुढच्यावेळी असं होणार नाही असा प्रेमळ वायदा पण करते. तिच्या कादंबरी लेखनाच्या कथा लेखनाच्या प्रयत्नाबद्दल लिहिते. आणि त्यात आलेलं अपयश, निराशा आणि झालेली रडारड हे पण सांगते. छोट्या छोट्या रेखाचित्रांतून ही पत्र अजून खुलतात. आश्रमातलं एकसुरी आयुष्य, लोकांच्या दयाळू नजरा ह्यांची आठवण जेव्हा जेव्हा होते तेव्हा ती अस्वस्थ होते. पण त्याच अभावग्रस्त आयुष्याच्या अनुभवामुळे आज तिला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं तिला महत्त्व आहे. त्यामुळे इतर मुलींपेक्षा ती जास्त समाधानी आहे, आनंदी आहे असं पण ती लिहिते.

चार वर्षांचा हा पत्रव्यवहार एका लहान मुलीचा तरुणीत होणारा बदल टिपतो. तिचं ज्ञान, अनुभव, जगण्याबद्दल जाणिवा कशा विकसित होत गेल्या ह्याचा हा प्रवास आहे. हाडामासाच्या माणसासारख्या राग, लोभ, क्रोध, आनंद, उत्सुकता, यश, अपयश, गंमत , धमाल, कंटाळा असे सगळे रंग पत्रांतून दिसतात. त्यामुळे वाचन रंजक होते. पण पुढे पुढे वाचताना असं वाटू लागतं की अशी पत्रे कधी संपणारच नाहीत. आयुष्यभर ती लिहू शकेल. ह्या पुस्तकाला काही तार्किक शेवट असेल का ? आणि असा विचार येऊ लागत असतानाच लेखिका एका अनपेक्षित पण सुंदर वळणार पुस्तकाचा शेवट करते. काय असेल हा शेवट ? "डॅडी" कोण हे तिला कळेल का ? ती लेखिका होईल का ? वयात आलेली पोर कॉलेजात कोणाच्या प्रेमात पडेल का ? अनाथ मुलीच्या आयुष्याचं पुढे काय होईल ? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचा.

असं हे पुस्तक वाचायला छान आहे. त्यातली काही पानं उदाहरणादाखल वाचा

अगदी सुरुवातीच्या काळातलं पत्र .. डॅडी शी ओळख वाढवताना ... जगाची ओळख वाढवताना



न्यू यॉर्क भेट... इतकी मोठी उडी पहिल्यांदाच



अशानिराशेचा क्षण आणि नवनव्या विचारसरणींशी ओळख




पुस्तकाबद्दल थोडं नेटवर शोधल्यावर माहिती मिळाली की Jean Webster हे लेखिकेचं टोपण नाव आहे. तिचं नाव Alice Jane Chandler Webster. है पुस्तकावर आधारित चित्रपट आणि नाटकं सुद्धा येऊन गेली आहेत. युट्युबवर एक चित्रपट मिळाला https://www.youtube.com/watch?v=xl4qYg7ONak

जेरुशा च्या रूपाने अनाथ मुलीच्या मनात डोकावताना जाणवतं की अशा एखाद्या गरजू व्यक्तीला आपण मदत करतो ही चांगलीच गोष्ट आहे. पण ती हळुवारपणे, त्याचा स्वाभिमान न दुखावता देता आली तर ते सोन्याहून पिवळं. आणि दुसरी गोष्ट अधोरेखित होतेच, ती म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचा पूर्ण आनंद घेणं किती महत्त्वाचं आहे. दोन व्यक्तींची पत्ररूपाने वाढत जाणारी ओळख आणि शेवटचे अनपेक्षित वळण ही लेखनशैली आवडली. सरोज देशपांडे ह्यांनी अगदी ओघवता अनुवाद केला आहे. परीक्षेत "गचकले", "वाग्गंगेला पूर", "नावावर फुली मारून टाकली आहे" अशा सारख्या चपखल वाक्प्रचारांतून भाषेची खुमारी वाढली आहे. त्यामुळे जेरुशा आणि डॅडी दोघंही अमेरिकेतले मराठीच असतील असं वाटतं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...