पुस्तक - अंतर्नाद - एका मासिकाचा उदयास्त (Antarnad - Eka masikacha udayast)
लेखक - भानू काळे (Bhanu Kale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २७२
प्रकाशन - मौज प्रकाशन. फेब्रुवारी २०२४
ISBN - 978-93-5079-073-1
छापील किंमत - रु. ५००/-
पुस्तकप्रेमी, साहित्यप्रेमी वाचकांनी "अंतर्नाद" नावाचं मासिक कधी ना कधी नक्कीच वाचलं असेल. त्याचा दिवाळी अंक वाचला असेल. बरेच जण त्याचे पूर्वी नियमित वाचकही असतील. १९९५ ते २०१९ इतका काळ हे मासिक सुरु होतं. ह्या मासिकाचे संस्थापक, संपादक आणि सर्वेसर्वा भानू काळे आहेत. त्यांनी ह्या मासिकाची जन्मकहाणी, वाढ, विस्तार, संघर्ष आणि अपरिहार्य शेवट हे सगळे टप्पे ह्या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडले आहेत. त्यावेळचे अनुभव, इतर व्यक्तींचा सहभाग, मान्यवरानाचे सहकार्य व मार्गदर्शन, मासिकाने केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमागच्या प्रेरणा, मिळालेला प्रतिसाद आणि त्याचा साहित्यसृष्टीवर झालेला परिणाम हे सगळं पुस्तकात आहे. एकूणच "अंतर्नाद" मासिकाच्या आयुष्याचं हे डॉक्युमेंटेशन आहे. पण हे डॉक्युमेंटेशन आपोआपच १९९५ ते २०१९ ह्या कालावधीतल्या बदलत्या मराठी समाजाचं, बदलत्या/घसरत्या वाचन संस्कृतीचं आणि एकूणच घसरत्या संस्कृतिकतेचं डॉक्युमेंटेशनसुद्धा आहे. त्यामुळे भले तुम्ही "अंतर्नाद" चे वाचक असा नसा; ह्या अनुभवांशी तुम्ही स्वतःला जोडून घेऊ शकता.
"अंतर्नाद" मासिक सुरू झालं त्या आधीच्या काळात चांगली मराठी नियतकालिकं बंद पडत होती. तरी स्वतः लेखक असणाऱ्या आणि मुद्रण व्यवसायात असणाऱ्या भानू काळे ह्यांनी एक नवं मासिक सुरु करायचा निर्णय घेतला. मुद्रण व्यवसाय बंद करून, मुंबईहुन पुण्याला स्थलांतर करून पूर्ण वेळाचा व्यवसाय मासिकाचा म्हणून स्वीकार केला. त्यापूर्वी त्यांनी ह्या क्षेत्रातल्या अनेकांशी संपर्क साधून आपला मनोदय कळवला. हे काम आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरू शकेल, लोकांचा प्रतिसाद मिळेल की नाही ह्याबद्दल अनेकांनी त्यांना सावध केलं. तरीही स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःच्या कल्पना घेऊन त्यांनी मासिक सुरु केलं. ह्या टप्प्याबद्दल सविस्तर वर्णन पुस्तकात आलं आहे.
मासिक चालवायचं ते दर्जेदार साहित्य लोकांसमोर यावं म्हणून. तसंच नवोदितांना व्यासपीठही मिळावं म्हणून. मासिकात साहित्याची निवड कशी केली, लेखकांशी संपर्क कसा साधला, त्याचे वेगवेगळे अनुभव पुस्तकात आहेत. वैचारिक आणि दीर्घ लेख "अंतर्नाद" मध्ये प्रकाशित होत. पुढे त्यातल्या काही लेखसंग्रहांची पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली. अंतर्नाद ने आपल्या वाचकवर्गाची पसंती मिळवली होती.
लिखाणाचा दर्जा हे जसे मासिकाचे वैशिट्य होते तसेच त्याचे सादरीकरण सुद्धा सुयोग्य दर्जाचे असावे ह्यासाठी त्यांनी केलेल्या महेनतीबद्दल सुद्धा सविस्तर लिहिले आहे.
मासिकातल्या लिखाणात अचूकता यावी ह्यासाठी खास काळजी घेतली जायची. यास्मिन शेख ह्या मराठी भाषा विदुषीचे सहकार्य त्यांना लाभले. स्वतः श्री. काळे ह्यांचे मजकूर तपासणीकडे लक्ष होते. मुखपृष्ठासाठी प्रसिद्ध कलावंतांची चित्र मिळवली. "रवींद्रनाथ विशेषांक", कालिदास विशेषांक", "शेक्सपियर विशेषांक" कसे तयार झाले ते अनुभव पुस्तकात आहेत. नवीन लेखक कवी तयार व्हावेत ह्यासाठी कथालेखन स्पर्धा राबवल्या होत्या. वाचन वाढावे ह्यासाठी मासिकातल्या लेखनावर आधारित खुल्या लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. त्याची माहिती पुस्तकात आहे.
वरचे सगळे मुद्दे वाचताना फार छान छान, यशस्वी, सकारात्मक असं वाटत असेल. पण तसं नव्हतं. पूर्ण पुस्तकभर ह्या अनुभव कथनाला एक विषण्णतेचे, हतबलतेचे, संघर्षाचे पार्श्वसंगीत आहे. कारण प्रत्येक महिन्याचा अंक, प्रत्यके दिवाळी अंक, प्रत्येक उपक्रम हा एक संघर्ष होता. वर्गणीदार वाढवायचा संघर्ष. अंकासाठी जाहिराती मिळवण्यासाठी संघर्ष. "दिवाळी अंकांपेक्षा दिवाळीच्या फटाक्यांचा खप जास्त होतो. तुम्हाला जाहिराती देऊन काय फायदा" असा बाजाराचा सूर. राजकीय वाद टाळले तरी मासिकातल्या मजकुरावर होणारी नाहक टीका. डावे-उजवे-भांडवलशाहीवादी-समाजवादी अशी कुठलीही एक भूमिका घेतली नाही त्यामुळे कुठलाच "हक्काचा मतदारसंघ" तयार झाला नाही अशी स्थिती. वाढता निर्मिती खर्च. छपाईसाठी कागद मिळवणे, टपालाने अंक पाठवणे ह्या नियमित गोष्टीसुद्धा त्रासदायकच होत्या. अंक पोचला नाही तर पुन्हा पाठवा. येणी वसूल करा. देणी वेळेत द्या. एक ना दोन बारा भानगडी. पुस्तकात हे सगळं वाचताना मासिक चालवायचं म्हणजे, पुलंच्या रावसाहेबांच्या भाषेत "सोपं काम काय हो ते? पीडाच की ती !" असाच भाव माझ्या मनात आला.
श्री. काळे ही सगळी पीडा सहन करत होते ते समाजाची संस्कृतिक समृद्धी वाढावी ह्यासाठी. पण तिथेही एकूण निराशाच पदरी येत होती. खालावत जाणाऱ्या लेखनदर्जामुळे अंकाचा दर्जा कसा शाबूत ठेवायचा ह्याची काळजी वाढत होती. तरुण मुलांनी वाचावं, लिहितं व्हावं ह्यासाठी कॉलेजमध्ये चालवलेल्या उपक्रमांना मिळाला थंड प्रतिसाद. नवी पिढी इंग्रजी माध्यमाकडे वळल्यामुळे मराठी वाचनच मुळात कमी झाले. त्यात टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉट्सअप चे जबरदस्त आव्हान उभे राहिले होते. "संपादक संवाद" असा संपादकांचं संगठन बांधायचा प्रयत्न सुद्धा पुढे गेला नाही. प्रत्येक नियतकालिक स्वतंत्रपणे झुंजत राहिलं. ही सगळी आव्हाने पुस्तकात सविस्तरपणे मांडली आहेत. त्या विवेचनातून ही आव्हानं फक्त "अंतर्नाद"ची नाहीत तर भारतीय आणि मराठी समाजाचीच आहेत हे वास्तव अधोरेखित होतं.
लोक वाचत का नाहीत ? न वाचणाऱ्यांचं असं काय नुकसान झालं ? वाचनाने सुसंस्कृतपणा येतो असं म्हटलं तरी जे वाचतात ते तरी खरंच सुसंस्कृतपणे वागतात का ? लेखक, कलावंत ह्यांच्या भ्रष्ट वागण्याचे किस्से ऐकू येतातच ना ? उपयुक्ततावादाच्या जगात, पैशाच्या जगात कथा-कादंबऱ्या-ललित साहित्य ह्यांच्या वाचनाचं त्यातून मिळणाऱ्या आनंदाचं मोल पैशात कसं करायचं? मनोरंजनाच्या थिल्लरपणाला "थोडं डोकं लावायला लावणाऱ्या" सकसतेकडे कसं वळवणार? मराठी ज्ञानभाषा होण्याची लढाई आपण हरलो आहोत हे आपण मान्य करणार का ? मराठी टिकेल का? आणि टिकवायची तरी कशासाठी? असे कितीतरी प्रश्न हे पुस्तक आपल्या मनात उभे करते.
"अंतर्नाद" जात्यात तर आपण सुपात आहोत, नाही का !
"अंतर्नाद"च्या यशापयशात सामाजिक स्थितीचा भाग मोठा असला तरी काळे ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या स्वतःच्या गुणदोषांचा, आवडीनिवडीचा सुद्धा परिणाम निश्चितच होता. त्यादृष्टीने काळे ह्यांनी आत्मपरीक्षण सुद्धा केलं आहे. स्वतःच्या उणीवा स्पष्टपणे मांडल्या आहेत. "अंतर्नाद"ला संस्थात्मक रूप , एका टीमचं रूप देण्यात आलेलं अपयश त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं आहे. "म्हाताऱ्यांचं मासिक" अशी मासिकाची प्रतिमा तयार झाली त्याला काही अंशी स्वतःचा गंभीर स्वभाव कारणीभूत असावा हेही स्वीकारलं आहे. पुस्तकाने त्यातून समतोल साधला आहे. ह्याच काळात इतर कुठली मासिकं सुरु झाली, वाढली, बंद पडली हे पण थोडक्यात सांगितलं असतं तर नियतकालिकसृष्टीचं चित्र अजून स्पष्ट झालं असतं.
हे पुस्तक वाचतांना मला स्वतःला प्रश्न पडला की मी स्वतः अंतर्नाद किंवा नियतकालिकं किती वाचतो? तर फार क्वचित. मी पुस्तकं भरपूर वाचतो. पण वेगळे वेगळे लेख वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचणं भावतं. तसंच आठवड्याला एक लेख असं वर्षभर लेखमाला वाचण्यापेक्षा ती लेखमाला पुस्तक स्वरूपात सलग वाचायला आवडते. वाचकांमधला पण हा पोटभेद ! पुस्तक वाचनालयातून घेऊन वाचन जास्त होतं प्रत्यक्ष विकत घेऊन पुस्तक वाचन कमी होतं. म्हणजे जरी मी एक चांगला, नियमित वाचक असलो तरी नियतकालिकांच्या दृष्टीने उपयुक्त नाही !
आता काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका
मासिकासाठी साहित्य निवडीबाबत
वर्गणीदार वाढवण्याची धडपड
"पुस्तक" आणि "वाचन" ह्यांना नवीन तंत्रज्ञानाचे आव्हान ह्याबद्दल चिंतन.
मी ज्या वाचनालयाचा सभासद आहे आणि जिथून मी हे पुस्तक घेतलं आहे त्या "फ्रेंड्स लायब्ररी"च्या पै काकांच्या योगदानाचे योग्य कौतुक पुस्तकात आहे
"डॉक्युमेंटेशन"ची फार सवय नि आवड नसणाऱ्या आपल्या समाजात हे पुस्तक दस्तऐवजीकरण म्हणून वेगळं आहे.
हे पुस्तक वाचल्यावर जाणवलं की प्रतिकूलतेसमोर शरणागतीचं "पांढरं निशाण" न दाखवणारे "काळे" हे एक योद्धाच आहेत. हे युद्ध कठीण आहे. कोणाला ह्या लढाईत उतरायचं असेल तर केवळ भावनेच्या भरात न उतरता सर्व बाजूने कसा विचार करावा लागेल ह्याचं प्रामाणिक दर्शन पुस्तकातून घडेल. लेखक, प्रकाशक, सुजाण वाचक, भाषा-संस्कृती ह्यात रस असणाऱ्या प्रत्येकाला हे चिंतन आवडेल. लेखकाचे विचार सगळेच सगळ्यांना पटतीलच असे नाही किंवा मागे वळून बघताना, "अरे, तुम्ही हे का केलं नाही, ते का केलं" असं सुद्धा वाटू शकतं. पण तसं वाटण्याला काही अर्थ नाही. ज्याच्याकडे खरंच काही प्लॅन आहे त्याने ह्या लढाईत उतरावं आणि करून दाखवावं.
भानू काळे ह्यांच्या कष्टाला प्रणाम !
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment