क्ष क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी (Ksha kshullakachi black comedy)



पुस्तक - क्ष क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी (Ksha kshullakachi black comedy)
लेखक - श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३७
प्रकाशन - रोहन प्रकाशन ऑगस्ट २०२४
छापील किंमत - रु. १९५/-
ISBN - 978-93-89458-48-0

"क्ष क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी" असं काहीतरी विचित्र नाव असलेलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे असं मला रोहन प्रकाशनाच्या फेसबुक पोस्टमध्ये दिसलं. वाचून उत्सुकता वाटली. पण ह्यापूर्वी अशाच एका विचित्र नावाच्या पुस्तकाचा माझा अनुभव काही चांगला नव्हता. फँटसी च्या नावाखाली काहीही लिहिलं होतं. भरकटलेलं लिखाण होतं. पण ह्या पुस्तकाचे लेखक श्रीकांत बोजेवार आहेत हे वाचून पुन्हा धारिष्ट्य करायचा विचार केला. बोजेवारांचं वृत्तपत्रातल्या सदरातलं लेखन मी वाचलं होतं. खुसखुशीत, तिरकस शैलीतलं लेखन आवडलं ही होतं. पण त्यांचं कथालेखन वाचण्याचा योग अजून आला नव्हता. त्यामुळे उत्सुकतेने पुस्तक विकत घेतलं. आणि माझा निर्णय योग्य ठरला. का ? हे पुढे कळेलच.

श्रीकांत बोजेवार हे नाव मराठी वाचकांना नवीन नाही तरी पुस्तकात दिलेली त्यांची ओळख पुढीलप्रमाणे


हा नऊ कथांचा संग्रह आहे. कथेचं मूळ बीज आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, कौटुंबिक प्रसंग असेच आहे. पण त्याला फँटसीची, अद्भुततेची जोड देऊन लेखक पूर्ण गोष्ट वेगळ्याच पातळीवर घेऊन गेले आहेत. खरंच असं घडलं तर काय धमाल येईल , काय गोंधळ उडेल , काय काय प्रसंग घडतील , लोकांच्या काय काय चर्चा घडतील , कोणाची गुपितं कशी फुटतील ह्या नाना शक्यता लेखकाने ह्या कथांमध्ये आजमावून बघितल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कथा वेगळी आणि तितकीच उत्कंठा वर्धक आहे.

हसून हसून पुरेवाट अशा पद्धतीच्या नाहीत. तरी वाचताना एक सहज हास्य आपल्या चेहऱ्यावर कायम राहील. कथाबीज गंभीर असलं तरी कथा रडक्या नाहीत म्हणून वाचायला जास्त आवडल्या. त्यातला सामाजिक किंवा कौटुंबिक आशय आपल्याला नेमका पोचतो.

आता प्रत्येक कथेबद्दल अगदी थोडक्यात सांगतो

क्ष क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी - एक अतिशय साधा माणूस - "कॉमन मॅन" - जातो एका प्रसिद्ध चित्रकाराकडे आणि त्याला म्हणतो मृत्यूचं चित्र काढा. प्रसिद्ध लेखकाला सांगतो "आत्महत्येची चिठठी" लिहून द्या. गायकाकडे जातो आणि अशीच विचित्र मागणी करतो. तो हे का करतो ह्याचं कारण त्यांना सांगत नाही. पण गळच घालतो. हे प्रतिभावंत आपल्या कलेतून "मृत्यू" कसा मांडतील. काय होईल त्यांचं ? आणि अशी चमत्कारिक मागणी तरी का ? वाचा मगच कळेल.

डास रामाची वाट पाहे सदना - कथेचा नायक आहे ऑफिसमधल्या कामाखाली दबलेला, पिचलेला माणूस. बॉस आपल्यावर खार खातोय, मुद्दामून दाबतोय अशी त्याची पक्की खात्रीच. ह्या बॉसचा काटाच काढला पाहिजे; सुपारी दिली पाहिजे असी त्याची भावना बळावली आहे. पण एक पापभिरू मध्यमवर्गीय माणूस "सुपारी" कोणाला देऊ शकणार ? पण लेखकाची "अद्भुतरम्यता" आली ना त्याच्या मदतीला. मग काय, दिली सुपारी डासाला.

टार्गेट - ह्या कथेत आहे कामाखाली दबलेल्या दुसऱ्या एका नायकाची बायको. नायकाला घराकडे बघायला, बायकोकडे बघायला वेळ नाही. "अस्सा नवरा नको गं बाई". नको तर नको. मग घरात ठेवून तरी करायचा काय. लेखकाची फँटसी म्हणते "टाक विकून". मग नायिका तरी कशाला मागे राहत्येय. टाकते विकून. पण हा नवरा कोण विकत घेईल आणि मग काय होईल ?

भोलानाथ बसले कैलासावरी - ह्या कथेत बायको नवऱ्याला विकून टाकत नाही, तर स्वतः अचानक घर सोडून जाते. नवरा बसलाय शोधत. पोलीस दाद देत नाहीत. काही पत्ता लागत नाही म्हटल्यावर त्याला सुचली एक युक्ती. हरवलेली व्यक्ती ही एक प्रसिद्ध पण आता लोकांच्या विस्मरणात गेलेली आहे, असं तो सांगतो आणि धमाल उडवून देतो. नक्की काय थाप मारली असेल त्याने ? लोक त्यावर कसा विश्वास ठेवतील ? आणि एवढं करून बायको सापडेल का ?

चौदावं रत्न पुरस्कार - करियर, पैसा, घर, गाडी, कुटुंब सगळं मिळालंय त्या चार मित्रांना पण त्यांना आता व्हायचंय प्रसिद्ध. कुठलातरी पुरस्कार मिळेल असं काहीतरी करायला पाहिजे. पण त्यांना त्यांचा एक मित्र कल्पना सुचवतो की लोकांना पुरस्काराचं नाव माहिती असतं, पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचं नाव थोड्याच दिवसात विसरलं जात. तस्मात् "पुरस्कार देणारे" व्हा. मग त्यांच्या समोर उभा होतो "पुरस्काराचा बाजार". कोण कोण भेटेल ह्या बाजारात. होतील का ते प्रसिद्ध ?

सर्व्हेचा सर्व्हे - अमुक अमुक देशातल्या शास्त्रज्ञांनी लोकांचा सर्व्हे करून सांगितलं आहे की , रोज बटाटयाच्या सालीचा रस प्यायला की बुद्धी तल्लख होते. अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही पण वृत्तपत्रात वाचल्या असतील. वाचून काणाडोळा केला असेल. पण कुणाच्या घरचे लोक हे गंभीरपणे घेऊन नाना प्रयोग करायला लागले तर?ह्या प्रयोगांमुळे नायकाची उडालेली त्रेधा, आणि हे असले सर्व्हे कोण - कसं करतं ह्याचा अनपेक्षित लागलेला शोध.

स्मृतिचिन्हांच्या स्मृती - "चौदावं रत्न" कथेत होते प्रसिद्ध होण्यासाठी धडपडणारे नायक. तर ह्या कथेत नायक आहेत असंख्य पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ लेखक नायक. पण म्हणतात ना, "बीन पुती रडते, एकपुती रडते आणि सातपुती पण रडते". तसंच इथे आहे. इतके पुरस्कार, की आता पुरस्कार नको आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याची स्मृतीचिन्ह नको. पण लोकांनी प्रेमाने दिलेली, जाहीरपणे दिलेली स्मृतीचिन्हं करायची काय ? नवीन पुरस्कार नाकारायचा कसा ? असा भलताच पेच लेखक कसा सोडवणार ?

नदी किनारी गं नदी किनारी - प्रियकर-प्रेयसीतला संवाद. एक वाक्य त्याचं, एक वाक्य तिचं. वाचकाला गोंधळात पडणारे. प्रेम-प्रेमळ वाद-प्रेमावरून वाद-मग वादावरून-मध्येच रुसवा. सुरुवातीला जरा असंबद्ध बडबड वाटते. पण पुढे हळूहळू त्या वाक्यांतून लक्षात येतंय की त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडलंय. इतके ते अस्वस्थ झालेत त्याचं कारण पण विचित्रच. ते ही खरंच का ह्यांच्याच मनाचे खेळ.

कवितेचा खटला - एका माणसाने दोघांना न्यायालयात खेचलं आहे. एका बाजूला आहे पैसे घेऊन प्रस्तावना लिहिणारा, भलामण करणारा बनचुका लेखक. तर दुसरी कडे आहे पुस्तकाची/कलाकृतीची चिरफाड करणारा समीक्षक. एक म्हणतोय पुस्तक छान. दुसरा म्हणतो तद्दन भिकार. कोण खरं कोण खोटं? आणि त्यांचं म्हणणं तरी वाचक गांभीर्याने घेतात का ? त्याची ही गोष्ट. "मराठी साहित्य संमेलनातल्या" अभिरूप न्यायालयासारखी.

तीन गोष्टींची ही काही पानं नमुन्यादाखल. म्हणजे त्यातल्या लेखनशैलीची चव कळेल.

अनुक्रमणिका

"टार्गेट" मधला नवऱ्याला एका बाईने विकत घेतलं तेव्हा



"डास रामाची.." मधला केशव बॉसची सुपारी देण्याएवढा अधीर का झाला तो प्रसंग



"नदी किनारी गं..." मधली सुरुवातीची असंबद्ध वाटणारी बडबड



अशा ह्या ९ गोष्टी. गोष्टींचे विषय कळले असतील पण त्या पूर्णपणे समजून भावी वाचकांचा रसभंग झाला नसेल अशी अपेक्षा करतो. मृत्यू, कामाच्या ओझ्यामुळे कुटुंबाकडे बघायला वेळ न मिळणे, सनसनाटी बातम्या, साहित्य व्यवहारातला हिणकसपणा, पुरस्कारांच्या दुनियेतला व्यवहारवाद, पुरुषी वर्चस्व, विक्षिप्त कुटुंबीयांचा त्रास असे सामाजिक विषय लेखकाने लीलया हाताळले आहेत. वेगळ्या धाटणीचं तरीही बुद्धीला पटेल असं मराठीत फार कमी वेळा वाचायला मिळतं. त्यामुळे मला हे पुस्तक आवडलं. त्यासाठी लेखक श्रीकांत बोजेवार, संपादक प्रणव सखदेव आणि रोहन प्रकाशन ह्या सर्वांचे आभार.


——————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

किस्त्रीम दिवाळी अंक २०२४ (Kistrim Diwali Edition 2024)



पुस्तक - किस्त्रीम दिवाळी अंक २०२४ (Kistrim Diwali Edition 2024)
संपादक - विजय लेले (Vijay Lele)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २६४
छापील किंमत - रु. २७०/-
ISBN - दिलेला नाही

किस्त्रीम हे दिवाळी अंकांतलं नावाजलेलं नाव. ह्यावर्षी सुद्धा अतिशय माहितीपूर्ण आणि विविधांगी अंक आहे. बरेचसे दीर्घ वैचारिक लेख आणि दीर्घ कथा असं अंकाचं स्वरूप आहे. कथांचे विषय पण वेगवेगळे - सामाजिक, कौटुंबिक असे आहेत. त्यामुळे कथांबद्दल विशेष लिहीत नाही. पण काही वैचारिक सामाजिक लेखांची थोडक्यात माहिती देतो.

फुकट्यांचा देश - "लाडकी बहीण" योजना असो आणि इतर पक्षांच्या कुठल्या फुकट वाटपाच्या योजना ह्या आर्थिक पातळीवर आतबट्ट्याचा आहेतच पण समाजालाही चुकीच्या मार्गाने नेणाऱ्या आहेत. ह्यावरचा लेख

श्रेय ज्याचे त्यास द्यावे - "संविधानाचे निर्माते", "संविधानाचे शिल्पकार" असा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांसाठी नेहमी केला जातो. मात्र त्यातून इतर अनेकांचा मोठा सहभाग आणि अभ्यास मात्र दुर्लक्षला जातो. बाबासाहेबांचा त्यात हातभार नक्की आहे. पण मसुदा समितीचे अध्यक्ष अशी त्यांची भूमिका होती. अशाच कितीतरी इतर समित्या संविधान सभेत होत्या. दोनेकशे लोक, मोठमोठे नेते कायदेपंडित त्यात होते. नेहरू-गांधी ह्यांच्या कल्पना आणि तत्कालीन काँग्रेसच्या संकल्पनेतून हे संविधान साकारलं गेलं. हे सगळं सोदाहरण, मुद्देदेसूदपणे समजावून सांगितलं आहे.

शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक - शिवरायांच्या गागाभट्टांनी केलेल्या राज्याभिषेकाबद्दल आपल्याला माहिती असतेच. पण हा राज्याभिषेक झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी तांत्रिक उपासनापद्धतीच्या मंत्र-तंत्र पद्धतीने अजून एकदा राज्याभिषेक झाला असे लेखकाने सप्रमाण सिद्ध केले आहे. गागाभट्टांवरचा राग आणि पहिला राज्याभिषेक झाल्यानंतर घडलेल्या काही अपशकुनी घटना ह्यातून पुन्हा एकदा वेगळा विधी केला जावा असा तांत्रिक उपासकांचं म्हणणं पडलं. त्यातून "निश्चलपुरी" तांत्रिकाने हवीशी केला. ह्याबद्दलच्या बखरीतले उल्लेख वगैरे पुरावे लेखकाने दिले आहेत.

काफिर अमेरिकेचा इस्लामी अनुभव - अमेरीकेत सुद्धा मुसलमानांची संख्या वाढते आहे. तिथेही ती व्होटबँक बनते आहे. आणि आपलं वेगळं अस्तित्व जाणवून द्यायला लागली आहे. कमला हॅरिस - बायडन आता लांगुलचालन करायला लागले आहेत. त्याबद्दल अमेरिका निवासी अनंत लाभसेटवार ह्यांनी लिहिलेला छोटा पण परिणामकारक लेख.

वोकिझम : उषःकाल नावाची काळरात्र - व्यक्तिस्वातंत्र्य, लैगिक स्वातंत्र्य ह्याचा अतिरेक करून आता ते विकृतीकडे आणि राजकीय-सामाजिक दुभंग घडवून आणण्याचे साधन बनले आहे. सध्याच्या ह्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणारा दीर्घ लेख.

नियतीचा बळी राजा हरिसिंह - काश्मीर संस्थान विलीनीकरणाच्या वेळी राजाने केलेली चालढकल, नेहरूंचे शेख अब्दुल्ला प्रेम ह्यातून निर्माण काश्मीर समस्या कशी निर्माण झाली, त्यावेळचा घटनाक्रम काय होता ह्याबद्दलचा लेख.

स्वातंत्र्याकांक्षेचे रूप शिवराय - शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ते तसे का झाले, इतर राजांपेक्षा वेगळे का ठरले, शिवाजी महाराजांनंतरही २५ वर्षे मराठे औरंगजेबाशी का लढले. "स्वराज्य - आपलं राज्य" ही भावना इथे का रुजली ह्याची अतिशय मुद्देसूद मांडणी करणारा नरहर कुरुंदकरांचा लेख.

अखेर भाषा धोरण ठरले - महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण कसे ठरले, त्यात काय करता येईल ह्याविषयी लेख. ह्यात थोडी माहिती आणि थोडी लेखकांची मते असा आहे. हा लेख मला थोडा गोंधळात टाकणारा वाटला.

काही लेखांचे विषय नावावरून लक्षात येतील "डिजिटल डिटॉक्स", "अत्रे : नाबाद सव्वाशे", "जेएनयू - वादग्रस्त पण महत्त्वाचे". अजूनही चांगले लेख आहेत.

तीन लेखांची झलक पुढील छायाचित्रांत बघायला मिळेल. झूम करून वाचा

अनुक्रमणिका 
काफिर अमेरिकेचा इस्लामी अनुभव 


आर्टिफिशिअल इंटेलिजन्स 
मोठ्या कंपन्यांचे प्रमुख भारतीय होतायत. काही भारतीय कंपन्या नावारूपाला येतायत तरी जगाच्या व्यापारात भारतीय उद्योजकांचा वाटानगण्य का ? 

असा हा वाचनीय, चिंतनीय दिवाळी अंक आहे.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

क्ष क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी (Ksha kshullakachi black comedy)

पुस्तक - क्ष क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी (Ksha kshullakachi black comedy) लेखक - श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar) भाषा - मराठी (Marathi) पान...