पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)
लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah Harari)
अनुवादक - प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
भाषा - मराठी (Marati)
मूळ पुस्तक - Unstoppable Us Vol1. How Humans Took Over the World
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
पाने - २०३
प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन २०२३
छापील किंमत - रु. ४९९/-
ISBN -978-81-962591-7-4
माकडाचा आदिमानव झाला, आदिमानव उत्क्रांत होत होत मानव झाला आणि पुढे विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती होत होत आजचे आपण झालो. हे सामान्य ज्ञान आपण शाळेतच शिकलो. गुहांमध्ये राहणारा माणूस, दगडी हत्यारं, "निअँडरथल मानव", "होमो सेपियन" वगैरे पण आपण तेव्हा पाठ केलं होतं. पण उत्क्रांती तर सगळ्या जीवांमध्ये होते आहे. पण माणसातच इतका मोठा फरक पडायचं कारण काय ? बाकीच्या प्राण्यांपेक्षा माणसाला दिसतं कमी, ऐकू येतं कमी, धावण्याचा वेग कमी, नखं लांब नाहीत, पोटात पाणी साठवून ठेवायची पिशवी नाही पण तरीही माणूस इतर प्राण्यांवर राज्य करतो. कारण त्याला असलेली बुद्धी. लाखोवर्षांच्या आपल्या वाढत्या प्रभावाने माणसाने "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ" ही उक्ती सार्थ ठरवली आहे. पण ही बुद्धी वापरली म्हणजे फक्त शिकारीची नवीन तंत्र काढली किंवा सुखसोयींसाठी तयार केल्या हे नाही. तर माणूस म्हणून आपण समाज म्हणून एकत्र राहू लागलो, एकमेकांना सहकार्य करू लागलो, श्रमविभागणी करू लागलो आणि बरंच काही. असं करत करत आपण जगातले सगळ्यात प्रभावी प्राणी झालो. म्हणजे नक्की काय आणि कसं झालं हे समजून सांगतायत युवाल नोआ हरारी.
पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती
पुस्तकात ४ प्रकरणं आहेत. एकेकाची माहिती थोडक्यात करून घेऊया
१) माणसं आहेत प्राणी - आपणही जंगली प्राणीच होतो. कमकुवत प्राणी होतो. टोळ्यांनी राहत होतो. तरीही आपण सगळी माणसं पण एकसारखी नव्हतो. थंड प्रदेशात वाढणारी वेगळी होती , जंगलांत वाढणारी वेगळी. आणि "निअँडरथल" माणूस हा तर वेगळा वंशच होता. आपण आहोत "होमो सेपियन". आणि आपल्या "होमो सेपियन" पूर्वजांनी बहुतेक "निअँडरथल"ना संपवलंच. आगीचा शोध ही मोठी क्रांती झाली. ह्याचा आढावा घेतला आहे. त्यातून पुढच्या प्रवासाची पार्श्वभूमी सिद्ध होते.
२) सेपियन्स ची सुपर पॉवर - हा पुस्तकाचा मूळ गाभा. लेखक म्हणतो की जी गोष्ट खरी नाही, सत्यात नाही अशा गोष्टींची कल्पना करणे, स्वप्न पाहणे, त्या इतरांना सांगणे आणि त्यावर विश्वास ठेवणे ही सेपियन्स ची सुपर पॉवर. त्यामुळेच आपण जग पादाक्रांत करू शकलो. क्काय ? काहीही !! असंच वाटलं ना तुम्हाला. पण तुम्ही स्वर्ग पाहिलाय? नरक पाहिलाय? पण त्याबद्दलच्या काही कल्पनांवर विश्वास ठेवताच ना? इथे लेखक धर्माच्या विरुद्ध आहे, धर्माला काल्पनिक अंधश्रद्धा म्हणून बोळवण करतोय असं समजू नका. लेखक खूप मोठ्या परिप्रेक्ष्यात विचार करतोय. धर्मच नाही तर कितीतरी गोष्टी माणसाने कल्पिलेल्या आहेत. प्रत्यक्ष नाहीत. सरकार म्हणजे काय? कंपनी म्हणजे काय ? देश म्हणजे काय? निवडणूका येतात जातात, माणसं बदलतात पण सरकार अस्तित्वात राहतं. शेअर होल्डर्स बदलले तरी कंपनी राहते. युद्ध होतात आणि सीमा बदलतात आणि आता तो "देश" होतो. सगळ्या आपल्या कल्पनाच.
"सेपियन्स"ने खूप मोठा बदल घडवला कारण ते एकेमेकांना सहकार्य करू शकले ते अशाच एक किंवा अनेक "काल्पनिक कथेच्या" आधारावर. लेखकाने सोपी सोपी उदाहरणं देऊन मुद्दा स्पष्ट केला आहे.
लेखकाची ही भन्नाट मांडणी वाचून आपण चक्रावतो. ती पटतेही. तरी "बुद्धीचे महामेरू" असणारे आपण मानव खरंच काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवून जगतो हे सत्य स्वीकारायला मात्र आपण लगेच तयार होत नाही. पण लेखक आपल्या नर्म विनोदी शैलीत हे तथ्य आपल्या गळी उतरवतो. त्यात वाईट काही नाही उलट ही आपली सुपर पॉवर आहे हे पटवून देतो.
"युरेका !" क्षण असतो तो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, कौटुंबिक घडामोडींकडे आता आपण आता वेगळ्या नजरेने बघू शकतो.
लेखक इथे जिंकला आहे असं मला वाटलं
३) आपले पूर्वज कसे राहायचे - आपले पूर्वज जंगलांत राहायचे, माळरानावर राहायचे, समुद्रकिनारी राहायचे, डोंगरांत राहायचे. वस्तू गोळा करायचे, शिकार करायचे. नवनवीन पदार्थ खाऊन बघायचे. आपल्याला गोड पदार्थ खाण्याचा वारसा आपल्या अश्मयुगीन पूर्वजांकडूनच माळलेला आहे. विचार करा लाखो वर्षांपूर्वी जंगलांत भटकणाऱ्या आदिमानवाचा. जंगलांत उपाशी पोटी भटकताना असं फळ मिळालं तर.. गोड फळ म्हणजे भरपूर ऊर्जा(उष्मांक) देणारं पदार्थ. पुन्हा कधी फळं मिळतील किंवा शिकार मिळेल काय सांगावं ? मग ते कोण सोडणार ? दिसल्यावर खाऊन घ्या जमेल तेवढी, असंच ते करायचे. तीच प्रवृत्ती अजूनही आपल्यात फिट्ट बसलेली आहे. म्हणून गोड पदार्थ दिसला की तुटून पडतो. आपल्याला विसरायलाच होतं की आता आपल्याला जेवायची भ्रांत नाही. तिन्हीत्रिकाळ गोड मिळू शकेल अशी परिस्थिती आहे. पण आपल्यातला आदिमानव असा डोकावतो.
म्हणूनच आपल्या पूर्वजांच्या खाण्याच्या, राहण्याच्या, विचार करण्याच्या पद्धती जाणून घेणं किती मजेशीर असेल. त्याबद्दल काय महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत ? कुठल्या गोष्टींचा तर्क आपण करू शकतो; हे मुद्दे तिसऱ्या प्रकरणात आहेत.
४) गेले तरी कुठे सगळे प्राणी ? - जमिनीखाली दडलेल्या सांगाड्यांवरून असं लक्षात येतं की पूर्वी प्रचंड महाकाय प्राणी अस्तित्वात होते. हत्ती, गेंडे, पाणघोडे ह्यांचे आकार आत्तापेक्षा खूप मोठे होते. पण हे सगळे प्राणी नामशेष कसे झाले. नैसर्गिक आपत्ती म्हणावी तर लहानखुरा माणूस वाचला पण हे प्राणी गेले ? लेखक म्हणतो की जसजसा माणूस पृथवीवर पसरू लागला तसतसे हे मोठे प्राणी नामशेष होऊ लागले. मोठ्या प्राण्यांना खरं तर आपले पूर्वज घाबरले असतील ना ? मग त्यांनी मोठे प्राणी कसे नष्ट केले ? आपण दिसत लहान असलो तरी "एकत्र यायच्या क्षमतेमुळे" मोठ्या मोठ्या प्राण्यांची आपण शिकार करू शकलो. एक मोठा प्राणी मारला की कितीतरी लोकांना कितीतरी दिवस पुरेल असं मांस मिळणार ना ! अशा काय क्लृप्त्या लढवल्या असतील माणसाने ? हे मोठे प्राणी मग माणसाला घाबरून पळून का बरं गेले नसतील ? हे सगळे मुद्दे लेखकाने चौथ्या प्रकरणात सांगितले आहेत. कितीतरी वेगवेगळी माहिती आहे.
पुस्तकात काय वाचायला मिळेल हे तुम्हाला कळलं असेलच. ते महत्त्वाचं आणि रंजक आहेच. पण त्याहून रंजक आहे लेखकाची निवेदनशैली. तुम्हाला एक धमाल किस्सा सांगतो, मजेशीर गोष्ट सांगतो असं म्हणत विनोद करत करत, आपल्याशी गप्पा मारत सगळं सांगितलं आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचन हा एक स्वतंत्र अनुभव आहे.
पुस्तकात पानोपानी चित्र, अर्कचित्र, व्यंगचित्र आहेत. तीही रंगीतरंगीत. लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांसारखं. मजकुराला अनुसरून. मजकुराचा आकार (फॉन्ट) पण मोठा, मध्येच रंगीत , मुख्य वाक्य ठळक केलेली. हे पुस्तक बघणं हा देखील एक सुखदायक अनुभव आहे. त्यामुळे चित्रकार "रिकार्ड जाप्लाना रुईज" ह्यांचं नाव पण मुखपृष्ठावर दिलं आहे हे योग्यच.
आता इतकं वर्णन केलं आहे तर उदाहरणादाखल ही थोडी पानं पहाच
मोठी माणसं अश्या कलिप्त गोष्टींवर विश्वास का ठेवतात ? कायद्याने स्थापित "कंपनी" ही सुद्धा एक कल्पित गोष्टच आहे
आदिमानवाचा आणि आजचा दिनक्रम ह्यांची तुलना केली आहे त्यातल्या चांगल्या बाजूंबद्दलची ही पाने
पूर्ण पानभर चित्र
प्रणव सखदेव ह्यांनी केलेले भाषांतर अप्रतिम. विशेषतः पुस्तकाची नर्मविनोदी शैली मराठीत वाचताना कुठेही आपण इंग्रजीचं भाषांतर वाचतो आहोत असं वाटत नाही. मराठमोळे आणि भारतीय शब्दरचना वापरून केलेलं भाषांतर झक्कास ! मधुश्री पब्लिकेशन ने हे पुस्तक मराठीत तितक्याच देखण्या स्वरूपात आणलं आहे ह्याबद्दल शरद अष्टेकर व त्यांच्या त्या सर्व चमूचे आभार. खंड २ ची पण उत्सुकता आहे. मधुश्रीने तो पण मराठीत आणला आहे का बघायला पाहिजे. नसेल तर त्यांनी नक्की आणावा. ज्ञानभाषा मराठीतल्या योगदानाचे मराठी वाचक स्वागत करतील.
प्रणव सखदेव ह्यांनी केलेले भाषांतर अप्रतिम. विशेषतः पुस्तकाची नर्मविनोदी शैली मराठीत वाचताना कुठेही आपण इंग्रजीचं भाषांतर वाचतो आहोत असं वाटत नाही. मराठमोळे आणि भारतीय शब्दरचना वापरून केलेलं भाषांतर झक्कास ! मधुश्री पब्लिकेशन ने हे पुस्तक मराठीत तितक्याच देखण्या स्वरूपात आणलं आहे ह्याबद्दल शरद अष्टेकर व त्यांच्या त्या सर्व चमूचे आभार. खंड २ ची पण उत्सुकता आहे. मधुश्रीने तो पण मराठीत आणला आहे का बघायला पाहिजे. नसेल तर त्यांनी नक्की आणावा. ज्ञानभाषा मराठीतल्या योगदानाचे मराठी वाचक स्वागत करतील.
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment