छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar)



पुस्तक - छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar)
लेखक - गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Mehandale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ६२
प्रकाशन - ऐतिहासिक साहित्य प्रकाशन, फेब्रुवारी २०२१
छापील किंमत - रु. ५०/-
ISBN - दिलेला नाही.

आज १९फेब २०२६. तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. महाराजांना त्रिवार प्रणाम !! आज ह्या पुस्तकाबद्दल लिहिण्याचा आनंद वेगळाच आहे.

काही दिवसांपूर्वी मी रायगडावर गेलो होतो तेव्हा तिथल्या वस्तू आणि पुस्तकांच्या दुकानात हे छोटेखानी पुस्तक दिसलं. मेहंदळे सर हे अतिशय मुद्देसूदपणे आणि पुराव्यांच्या आधारे खरा इतिहास मांडणारे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा काय अन्वयार्थ लावला आहे, काय वैशिष्ट्य मांडलं आहे हे बघणं औत्सुक्याचं आणि महत्त्वाचं वाटलं. म्हणून हे पुस्तक लगेच विकत घेतलं.

पुस्तकाच्या पाठमजकुरावर त्यांनी त्यांचा आगामी पुस्तकाचा हेतू स्पष्ट केला आहे. इतिहासाची मोडतोड करून, महत्त्वाचे मुद्दे गाळून, हेतुपुरस्सर खोटारडेपणा केल्याची उदाहरणे नामवंत इतिहासकारांपासून पाठ्यपुस्तकांपर्यंत दिसतात. त्यांच्या हेतू विषयी न बोलता पुराव्यांच्या आधारे त्यांचा खोटारडेपणा उघड करत राहतात. शिवाजी महाराजांच्या आधी हजार वर्ष या भारतावर सत्ता गाजवणाऱ्या इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण, त्याचा परिणाम आणि शिवाजी महाराजांनी त्या प्रवाहाला कोणते वळण दिले हे ते सोदाहरण सांगणार आहेत. हे आगामी पुस्तक १४०० पानांचे होईल. पण त्या पुस्तकाची झलक आणि त्याचे सार रूप असावे असे हे प्रस्तुक पुस्तिक आहे. ६० पानांची पुस्तिकाच. पण आशयाच्या रूपात तुमच्या विचारप्रक्रियेवर कायमचा परिणाम करेल अशी. पुस्तकाच्या मजकुराचे दोन भाग आहेत. पहिला भाग इस्लामी राजवटींचे स्वरूप आणि दुसरा भाग महाराजांच्या राज्याचा हेतू.

शिवाजी महाराजांच्या आधी हजार वर्षे भारतातील बऱ्याच भूभागावर इस्लाम धर्म मानणाऱ्या शासकांचे राज्य होते. हे सगळे मुसलमानी सत्ताधीश किती क्रूरपणे कत्तली करत होते, स्त्रियांवर अत्याचार करत होते, पुरुषांची गुलाम म्हणून विक्री करत होते, बायकांना वेश्या बनवत होते. सर्वसाधारण इतिहासकार अशा घटनांचा उल्लेख आला की ती एखाद्या माथेफिरू राजाने केलेले दुष्कृत्य म्हणून त्याची दाहकता कमी करण्याचा नाकारण्याचा प्रयत्न करतात. पण लेखक हे दाखवून देतात की ते एखाद दुसरी घटना नाही. एखाद्या माथेफिरू राजाने केलेले हे कृत्य नाही तर अल्लाउद्दीन खिलजी पासून टिपू सुलतानापर्यंत प्रत्येकाने हे केलं आहे. जाणूनबुजून केलं आहे. इतिहासातलं क्रौर्य नाकारण्यात अर्थ नाही हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

दुसरा मुद्दा असतो की हे असं काही झालं असेल पण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही. ते आकडे फुगवून खोटी भीती निर्माण केली जाते. इथेही ऐतिहासिक पुराव्यातली आकडेवारी दिली आहे. बखरींमधली अतिशयोक्ती असेल असं गृहीत धरून तर्काच्या आधारे आकडेवारीचा अंदाज घेतला तरी तो किती महाभयंकर आहे. हे वाचून अंगावर शहारे येतात. केवळ नव्या इतिहासकारांना सोयीचा नाही म्हणून तो आकडा कमी होत नाही.

तिसरा मुद्दा असतो की, हे जे काय झालं ते त्या त्या राजाने स्वतःचं राज्य वाढवण्यासाठी केलं. शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी, जरब बसवण्यासाठी केलं, शत्रू संपत्ती हडप केली इतकंच. त्यात सामाजिक धार्मिक काही नाही. आता लेखकाने पुन्हा पुराव्या आधारे दाखवून दिलं आहे की असं नाही. ही इस्लामची शिकवण होती म्हणूनच करण्यात आलं. इस्लाम न मानणारे ते काफर, त्यांच्या विरुद्ध सतत जिहाद करायचा, त्यांना जबरदस्तीने मुसलमान करायचे, न मानले तर हालहाल करून मारायचे ही इस्लामचीच शिकावण आहे. मुसलमान सत्ताधीशांनी स्वतः लिहून घेतलेल्या किंवा त्यांच्या दरबारी लोकांनी लिहिलेल्या वृत्तांतात इस्लाम धर्माच्या आज्ञेचं पालन म्हणून आपण हे करतो आहोत ह्याबद्दल स्वतःची, असं करणाऱ्या सरदारांची पाठ थोपटून घेतली आहे. काफरांना त्यांची जागा - नरक - दाखवल्याचं प्रचंड समाधान आहे. काफरांवर जिझिया कर लावून त्यांना दाबून ठेवल्याचं समाधान आहे. त्यांच्या बायकांना जनानखान्यात कोंडलं, दासी म्हणून वाटलं ह्याची प्रौढी आहे.

चौथा मुद्दा येतो की इतकं सगळं चालू होतं तर अख्खा भारत पूर्णपणे मुसलमान कसा झाला नाही. धर्मवेडाला पडलेल्या व्यावहारिक मर्यादा असल्यामुळे लूट-कत्तल-धर्मांतर ह्यांचा वेग कमी अधिक होत होता. आक्रमकांपेक्षा भारताची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे लक्ष्य पूर्ण व्हायला वेळ लागत होता इतकंच.

पाचवा मुद्दा येतो की धर्मांतर हे सुफी लोकांच्या मवाळ भूमिकेमुळे, प्रेमाच्या संदेशामुळे, हिंदू - मुस्लिम ऐक्याच्या भूमिकेमुळे झालं. इतिहासकारांचं हे बोलणं किती लबाडीचं आहे हे पुन्हा पुराव्याच्या आधारे दिलं आहे. काफरांना जबरदस्ती मुसलमान करा, नाहीतर मारा हे सुफी लोकांचं सुद्धा म्हणणं होतं. त्यांनी सुलतानांना साथ दिलीच, प्रसंगी तसं करण्याबद्दल उद्युक्तही केलं.

अशा पद्धतीने भारतभूमीची ह्या इस्लामी वरवंट्याखाली कशी वाट लागली होती हे स्पष्ट केल्यावर लेखक शिवाजी महाराजांच्या धोरणाकडे वळतात. स्वराज्य हे निःसंशय हिंदू राज्य होतं हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलं आहे. शिवाजी महाराजांनी जिथे जिथे आपला जम बसवला तिथल्या तिथल्या हिंदू तीर्थक्षेत्रांची पुनर्स्थापना केली. मंदिरे तोडून मशिदी बांधल्या होत्या तिथे त्या जागी पुन्हा मंदिरे निर्माण केली. महाराष्ट्रातच नव्हे थेट तामिळनाडूमध्ये तिरुवन्नामलै येथील अरुणाचलम शिवालयाची मशिद त्यांच्यामुळे पुन्हा मंदिर झाली. "कार्तिक दीपम" उत्सव पुन्हा सुरु झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा इथे महाराजांनी मुक्त केलेल्या मंदिरांची उदाहरणे पुस्तकात आहेत.

महाराज हे इतर धर्माबद्दल सहिष्णू होते म्हणून ते सगळ्या धर्मांना एकसारखे बघत होते असे नाही. त्यांचा राज्यकारभार हिंदू पद्धतीने चालत होता. हिंदू समाजाच्या रीती, उत्सव, मठ ह्यांना देणग्या आणि प्रतिष्ठा दिली जात होती. तुर्क - म्लेंछ ह्यांचा विद्ध्वंस करून स्वत्त्वाची प्रतिष्ठापना करणे हे त्यांचे धोरण होते. त्याबद्दल त्यांचे शत्रू त्यांना कसे शिव्या घालत होते ह्याचीही उदाहरणे दिली आहेत. इस्लामी राजवटींचा नाश आणि हिंदू समाजाचा उत्कर्ष कसा होत होता ह्याची ही उलटी प्रमाणपत्रेच म्हणायला हवी.

छत्रसालासारख्या इतर हिंदू राजांनाही शिवाजी महाराजांनी ह्या धोरणात प्रोत्साहित केले. त्यांच्या समकालीनांमध्ये ते बिंबलेच. त्यांच्या शिकवणुकीनुसार पुढे मराठा साम्रज्याचा दक्षिणोत्तर विस्तार झाला तेव्हा ह्याच धोरणाचे विस्तृत स्वरूप देशाला बघायला मिळाले.

काही पाने उदाहरणादाखल.

अनुक्रमणिका

जिझिया

युद्धकैदी स्त्रियांची विटंबना

सूफींचा पर्दाफाश

हिंदुधर्माला प्रोत्साहन आणि तुर्कांचा नाश करण्याचे महाराजांचे धोरण.

असे हे पुस्तक किमान शब्दांत कमाल आशय सांगून जाते. क्रौर्याने भरलेल्या घटना सांगताना घटना "रंगवून" न सांगता हे हे असं असं झालं, पत्रांत असा उल्लेख आहे, त्याचे संदर्भ असे आहेत; असं सरळ सोपं वर्णन आहे. त्या घटना रक्तरंजितच आहेत. चीड आणणाऱ्या आहेत. हे सत्य प्रभावीपणे अधोरेखित होतं. प्रचलित इतिहासकारांचा खोटारडेपणा त्यांनी पानोपानी उघड केला आहे. तरीही आता तुम्हाला खोटं पडतो असा अभिनिवेश नाही. पुन्हा एकदा, मी खरं ते सप्रमाण सांगतो, मग इतिहासकारांची वासलात वाचकच लावतील अशी अभ्यासू वृत्ती आहे. "सर्वधर्मसमभावा"च्या ढोंगाचा जराही ताण न घेता उलट ते जोखड झुगारून लिहिलेलं हे पुस्तक आहे. "अगर न होते शिवाजी तो सुन्नत होती सबकी" ह्या प्रसिद्ध ओळी किती गंभीर आणि दूरदृष्टीच्या आहेत ते ताकदीने सांगणारे हे पुस्तक आहे. ते आवर्जून वाचून, मनन चिंतन करून त्याचे सार आपल्या कृतीत उतरले पाहिजे.

जय भवानी ! जय शिवाजी !!
छत्रपती शिवाजी महारांजाचा विजय असो !!

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वा ( आवर्जून आवर्जून वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

पुढचं सोंग (Pudhach Song)




पुस्तक - पुढचं सोंग (Pudhach Song)
लेखक - नितीन थोरात (Nitin Thorat)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २३२
प्रकाशन - रायटर पब्लिकेशन फेब्रुवारी २०२५ छापील किंमत ३००/- रु.
ISBN - 978-93-342-07439


डिसेंबर २०२४ मध्ये पुण्यात झालेल्या विश्व मराठी संमेलनात लेखक नितीन थोरात याच्याशी भेट झाली तेव्हा त्याचं "सोंग" हे पुस्तक विकत घेतलं होतं. मला ते पुस्तक खूप आवडलं. डिसेंबर 
२०२५ मध्ये "पुणे पुस्तक महोत्सवा"मध्ये पुन्हा नितीन ची भेट झाली तेव्हा या कादंबरीचा पुढचा भाग आलेला दिसला. लगेच "पुढचं सोंग" आणि त्याच्या प्रकाशनाचं अजून एक पुस्तक विकत घेतलं.



पहिल्या भागाचे मी लिहिलेले परीक्षण आणि त्या कथेचा थोडक्यात गोषवारा तुम्हाला पुढील लिंकवर वाचता येईल. ते वाचा म्हणजेच मी या पुस्तकाबद्दल जे लिहिलं आहे त्याचा संदर्भ तुम्हाला लागेल.

पहिल्या भागात कथानायक संजयने स्वतःला तृतीयपंथी/हिजडा करून घेतलं आहे. त्याचं नाव आता "तम्मा" आहे. हिजड्यांच्या पंथातच तो राहतोय. हिजड्यांसारखं साडी नेसणं, मेकअप करणं आणि लोकांकडून भीक मागून पैसे गोळा करणं ही त्याची दिनचर्या झाली आहे. गावकऱ्यांनी केलेला अन्याय, जातीभेदाचा त्रास, प्रेयसी वरचे व्यक्त न करता येणारे प्रेम ह्या सगळ्याचा उबग येऊन त्याने तृतीयपंथी होण्याचा निर्णय घेतला होता. जात-धर्म-लिंगविरहित असा हिजडा आपण बनू; आपल्याला त्रास देणाऱ्यांना चांगला हिसका दाखवू असं त्याच्या मनात होतं. पण काही वर्षे लोटली तरी त्याची ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. इतकंच नव्हे तर स्वतःच्या या नव्या अस्तित्वाशीही तो अजून पूर्णपणे एकरूप झालेला नाही. नव्या वास्तवाशी जुळवून घेत जगणं नियतीला
ही मान्य नाही. 
ज्या गावाततून तो पळून आला त्या गावातल्या लोकांची त्याची पुन्हा भेट होते आणि आपल्या गावाची ओढ त्याला वाटू लागते. आपले आईवडील, अडचणीत साथ देणारे आपले मित्र ह्यांना पुन्हा भेटावेसे वाटू लागते. मित्रांना शोधण्याच्या प्रयत्नात त्याला त्याच्या हिजडेपणाचं मोल द्यावं लागतं. तरी तो त्यांना भेटतो तम्माने गावात जाण्याचा आग्रह सोडून आपल्याबरोबर राहावं ही मित्रांची इच्छा असते. पण गावाला भेट द्यायची त्याची इच्छा अनावर होते. गावात कोणी ओळखू नये, आई-वडिलांनी ओळखावं अशी योजना करून सर्वजण ते धाडस करतात. गावात पोहोचल्यावरही त्याला अनेक धक्कादायक गोष्टी करतात काही नवीन संदर्भ लागतात.

या धक्क्यांनी त्याची द्विधा मनस्थिती अजूनच गहिरी होते. हिजडा बनवण्याचा निर्णय चुकीचा का बरोबर? आपण शरीराने, मनाने खरोखरच हिजडा झालो का? आपण आपल्या जुन्या लोकांना विसरलो का? आपल्याला वाटत होतं तसं एक कणखर हिजडा बनवून अन्याय करणाऱ्या लोकांना लोकांशी दोन हात करू शकलो? हे सगळं कशासाठी गेलं त्यापेक्षा पुरुषच राहिलो असतो तर चाललं असतं का? प्रेम विसरून गेलो असतो तर चाललं असतं का? आपली प्रेयसी काय करत असेल? आता या अवस्थेतही त्या आपल्याला स्वीकारेल का? आई वडील काय म्हणतील? आपण असे तृतीयपंथी आहोत हे कळल्यावर गावातले आपले शत्रू आपली कशी फजिती करतील? आई-वडिलांना काय त्रास देतील ? असे असंख्य प्रश्न, त्यात नियतीने घातलेल्या 
प्रश्नांची भर. असा हा प्रश्नांचा आणि हळूहळू त्याची उत्तरं सापडत जाण्याचा प्रवास आहे.

कादंबरीच्या पहिल्या भागात तरुण पुरुष संजय हिजडा बनतो. लाक्षणिक अर्थाने हिजड्याचा सोंग घेतो. त्यात हतबलपणा लक्षात आल्यावर हे 
सोंग टाकून मूळचं रूप घ्यावं अशी इच्छा त्याला होते. पण परिस्थिती त्याला अजून काय काय सोंगं घ्यायला लावते हे कादंबरीच्या दुसऱ्या भागात दाखवलं आहे. म्हणूनच "पुढचं सोंग" हे नाव बरोब्बर आहे.

काही पाने वाचून बघा

तम्माच्या डोक्यात माजलेलं विचारांचं काहूर


गावात पोचल्यावर आठवणींनी उध्वस्त झालेला तम्मा आपली ओळख दाखवू शकत नव्हता, काही विचारू शकत नव्हता.



मनःशांती मिळावी म्हणून पंढरपूरच्या वारीतल्या दिंडीतल्या लोकांशी तो संवाद साधतो तेव्हा.



या कादंबरीचे उपशीर्षकच "वाळवंटी प्रेमाचा हिरवा गार अंत" असे आहे. त्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की वाळवंटात भाजणारा दाहक संघर्ष या पुस्तकात मांडलेला आहे पण शेवट मात्र सुखांत झालेला आहे. हा सर्व प्रवास वाचनीय आहे. नितीन थोरात यांनी पहिल्या भागाप्रमाणेच अतिशय गतिमान कथानक, वेगवेगळे योगायोग, नियतीचे खेळ ह्यातून संजय उर्फ तम्माचे आयुष्य, त्याची तगमग प्रभावीपणे सादर केली आहे. दोन भागांची तुलना केली तर मागच्या भागापेक्षा या भागात प्रसंगाचे चढ-उतार अजूनच जास्त आहेत. तरी पहिला भाग काकणभर सरस होता. इथेही भाषा रांगडी, गावरान आणि मनातल्या शिव्यांचा स्पष्ट उल्लेख करणारी आहे. दुसऱ्या भागात बऱ्याच वेळा तम्माच्या पूर्वायुष्यातल्या घटनांची पुनरुक्ती झालेली आहे. तीच ती माणसं पुन्हा पुन्हा भेटण्याचे योगायोग फारच घडत आहेत असंही वाटतं पण, पहिल्या भागाच्या वेळी लिहिलं होतं तेच आताही लिहावसं वाटतं. हे असं कसं होऊ शकतं; किंवा या ऐवजी काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे होतं असे विचार मनात येतील. पण प्रसंगांचा वेग, संवादाची पकड यातून ते वाचताना हे सगळं आपण चटकन बाजूला टाकून पुढे उत्सुकतेने वाचत राहतो हे मला जास्त भावलं.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मुक्ति पथावर (Mukti Pathavar)




पुस्तक - मुक्ति पथावर (Mukti Pathavar)
लेखक - स्वामी आत्मानंद पुरी (Swami Atmanand Puri)
अनुवाद - ब्रह्मचारी एकनाथ (Brahmachari Ekanath)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - On the road to freedom (ऑन द रोड टू फ्रीडम)
मूळ पुस्तकाची भाषा - English (इंग्रजी)
पाने - २४०
प्रकाशन - माता अमृतानंदमयी मिशन ट्रस्ट, जानेवारी २००७
छापील किंमत - दिलेली नाही 
ISBN - दिलेला नाही

भारताचा अध्यात्मिक वारसा खूप मोठा आहे. वेद उपनिषदातील तत्त्वज्ञान, योग, आयुर्वेद, शास्त्रीय संगीत, नृत्य, कुटुंबव्यवस्था अशा अनेक गोष्टींचं प्रदेशातल्या लोकांना आकर्षण असतं. त्यातून बरेच परदेशी लोक भारतात या पारंपारिक विद्यांचा अभ्यास करायला येतात. त्यातले काहीजण इथेच रमतात. स्थायिकही होतात. काहीजण ह्या अध्यात्ममार्गावर, ज्ञानमार्गावर स्वतःला इतके झोकून  देतात की ते एखाद्या भारतीय हिंदू व्यक्ती प्रमाणे संन्यास दीक्षा घेतात. असे परदेशी संन्यासी आपण क्वचित वेगवेगळ्या साधुसंतांच्या संस्थांमध्ये, कुंभमेळ्यासारख्या धार्मिक महोत्सवांमध्ये बघितले असतील. या व्यक्तींना भारताची ओळख कशी झाली असेल, त्यांना आकर्षण का वाटलं असेल आणि इथेच कायमस्वरूपी राहण्याचा धाडसी निर्णय कसा घेतला असेल त्याच्या प्रत्येकाच्या कहाण्या वेगवेगळ्या असतील. ती कहाणी समजून घ्यायला, त्यांना कशात आनंद मिळाला, कुठल्या आव्हानांना सामोरे जावे लागले आणि मागे वळून बघताना त्या निर्णयाबद्दल त्यांना समाधान वाटते आहे का हे सगळं समजून घ्यायला तुम्हाला आवडेल का? तसं असेल तर "मुक्ति पथावर" हे पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेल.

पुस्तकाचे लेखक स्वामी परमात्मनंदजी हे मूळचे अमेरिकन. त्यांचं आधीचं नाव नील. एका मध्यमवर्गीय घरात नील वाढत होता कॉलेजमध्ये जाऊ लागला होता. शिकून चांगली नोकरी मिळवणं, भरपूर पैसे कमावणं, आरामाचं जीवन जगणं, प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी देणं ही भौतिक प्रगती हे सर्वसाधारणपणे लोकांना प्रवृत्त करणारी स्वप्न होती. अशाच वातावरणात तोही वाढत होता. पण यापेक्षाही काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे अशी भावना बळावत होती. कॉलेजच्या वयात असतानाच त्याला योग, भगवद्गीता याबद्दल जुजबी माहिती मिळाली आणि त्याच्या हृदयाची तार छेडली गेली. त्यातलं तत्वज्ञान लगेच पूर्णपणे समजलं नाही तरी आयुष्याकडे बघायची दृष्टी बदलू लागली. चाकोरीबद्ध शिक्षणाचा उद्देश केवळ पैसा कमावणे एवढाच असून त्या माध्यमातून जीवनातील सुखोपभोग घेण्यासाठीच हे सर्व आहे असे त्याला वाटू लागले. अत्यंत साधी जीवनशैली पुरेशी आहे त्यासाठी अधिक पैशाची गरज नसून एखाद्या लहानशा नोकरीने काम भागू शकेल असेही वाटू लागले. भारताबद्दल अनावर ओढ वाटू लागली. सुरुवातीला योग, हठयोग, यांच्याबद्दल वाचन आणि ते शिकवणाऱ्या शिक्षकांच्या भेटीसाठी त्याने थेट नेपाळ गाठलं. वास्तव्य केलं. पण नेपाळ ही आपली कर्मभूमी नाही तर भारतच आहे हे त्याचं हृदय सांगत राहिलं. तो भारतात आला .भारतीय तत्त्वज्ञानावरची पुस्तके वाचत होता. तमिळनाडूमधील तिरुवन्नामलै येथे पूर्वी राहत असणाऱ्या रमण महर्षींचा संदर्भ त्याला मिळाला. रमण महर्षी पूर्वीच समाधीस्थ झाले असले तरी आणि त्याने रमण महर्षींना मनोमन गुरु मानले. थेट तिरुवन्नामलै गाठली.

आतला आवाज, नियती किंवा जणू हे सर्व पूर्वनियोजित असावं अशा पद्धतीने रमण महर्षी आश्रमातल्या रत्नमजी यांनी त्याच्या मार्गदर्शनाची जबाबदारी स्वीकारली. अमेरिकन नीलची दिनचर्या पूर्णपणे बदलली. नील आता साधक झाला. रत्नमजी आपले गुरु.  ते सांगतील तसं वागायचं त्यांनी ठरवलं. शरीरावरची आसक्ती उडून जावी म्हणून रत्नमजींनी त्यांना अतिशय खडतर दिनचर्या पाळायला लावली. फक्त शारीरिक कष्ट नव्हे तर राग, लोभ, भूक, तहान, या नित्य भावनांवर सुद्धा विजय मिळवण्यासाठी त्यांना सतत उद्युक्त केले. ध्यानधारणा कशी करावी, कसा नेम पाळावा हे शिकवले. पुन्हा पुन्हा त्यांची परीक्षा घेऊन मडकं अजून किती कच्चं आहे हे सुद्धा दाखवत राहिले. रत्नमजींबरोबर त्यांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. रत्नमजींच्या दैवी शक्तीचा अनुभव घेतला, त्यांच्या कृपेने उच्च मानसिक अवस्थेच्या अनुभवाची झलक काही वेळा पाहायला मिळाली.

पुढे रत्नमजींच्या देहावसनानंतर पुन्हा एकदा पूर्वनियोजित असल्याप्रमाणे केरळ मधल्या माता अमृतानंदमयी (अम्मा) यांचा शिष्य त्यांच्याकडे आला. आतापर्यंत आम्हांबद्दल काहीही माहिती नसणाऱ्या नीलला आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी गुरु अम्मा आहेत हे पटलं आणि ते तिकडे राहायला गेले. ते १९७९ साल होतं. माता अमृतानंदमयी आत्ताएवढ्या प्रसिद्ध झालेल्या नव्हत्या. केरळमधील त्यांच्या खेडेगावाच्या आसपासचे लोक त्यांना ओळखू लागले होते. जिच्या अंगात येतं अंगात देवी संचार होतो आणि जी आपल्या समस्यांवर उपाय सांगते अशी एक तरुणी इतपतच लोकांना समजत होतं. ज्या पद्धतीने नीलना अम्मांनी बोलवून घेतलं, जेवढा नीलचा अभ्यास आणि साधना झाली होती त्यावरून त्यांनी ओळखलं की ही इतर लोक समजतात तशी एक केवळ अंगात येणारी येणारी मुलगी नाही. तर ही आत्मसाक्षात्कार झालेली विभूती आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये ती मिळून मिसळून राहते, मी एक वेडी मुलगी आहे असा अविर्भाव आणून राहत असली तरी ते केवळ त्यांचं वरवरचं रूप आहे. ज्यांना खरंच साधना करून आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे अशांसाठी त्या परमेश्वराने धाडलेल्या गुरूच आहेत. नील त्यांच्या गावातच राहू लागला. अजूनही तीन-चार शिष्य त्यांना येऊन मिळाले. रत्नमजींप्रमाणेच अम्मासुद्धा त्यांना खडतर परिश्रम करायला लावू लागल्या. परीक्षा घेऊ लागल्या. नीलच्या मनातले भाव थेट ओळखून त्याला अचंबित करत होत्या. मनात येणारे विकल्प, कधीकधी गुरुंच्या निर्णयावर येणारे शंका हे सगळे भाव ओळखून त्यांना मार्गदर्शन करत गेल्या.

अनुभव कथनाच्या या पहिल्या भागात अमेरिकन नीलचा इथपर्यंतचा प्रवास आहे.
काही पाने उदाहरणादाखल

रमण महर्षींच्या आश्रमात पहिल्या दिवशी आलेला दैवी अनुभव



मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आणि गुरुंनी घेतलेली परीक्षा



अम्मांच्या आश्रमात येणारे लोक सर्वसामान्य लोक त्यांच्या घरगुती समस्या घेऊन येतात, अम्मांच्या सहवासात शांतता वाटते म्हणून येतात. ते तपस्वी साधक नसतात. ह्या परिस्तितीमुळे आश्रम सोडावा असं वाटत असताना अम्मांनी केलेलं मार्गदर्शन.



ज्ञानमार्गाने अध्यात्मिक मार्गावर प्रगती करणे किती कठीण आहे, किती त्रासदायक आहे याचीच प्रचिती या पुस्तकाच्या वाचनातून येते. असंख्य शारीरिक कष्ट लेखक स्वतः भोगत होते आणि आपल्या गुरूंनाही भोगताना बघत होते. पण तरीही मन विचलित होऊ द्यायचं नाही. दिलेलं काम करायचं. सांगितलेली ध्यानधारणा करायची. हे करताना स्वतःच्या शारीरिक-मानसिक क्षमतेवर पुन्हा पुन्हा शंका उपस्थित होत्या. कधी खूप आत्मिक समाधान लाभले आहे, मन एकाग्र झाले आहे अशी अनुभूती आली की आपण  आत्मसाक्षात्काराच्या जवळ पोहोचलो अशी भावना यायची. तर काही वेळा इतकी वर्ष तपश्चर्या करूनही आपली काहीच प्रगती झाली नाही; अजूनही मनावर नियंत्रण नाही; मन शुद्ध झालेले नाही असं वाटून ते खचलेही. जणू सापशिडीचा खेळच. त्यामुळे हे पुस्तक अध्यात्मिक विषयावरचे असले तरी एखाद्या रहस्यचित्रपटाप्रमाणे वाटते. आता पुढे काय होतंय?  त्यांना देव दिसला का? आता त्यांची समाधी लागली का? याची उत्कंठा आपल्यालाही लागू राहते. पैशाची किंवा कुठल्या वस्तूची गरज असताना ती गरज आपोआप भागली जाणे, गुरूंना मनातले कळणे, गुरु आणि इतर संतांच्या तपाचं तेज डोळ्याने दिसणे, गुरु मार्गदर्शन करताना वेगळी अनुभूती येण्याची वर्णने असे काही अद्भुत अनुभव या पुस्तकात आहेत. त्यामुळे पुस्तक वाचन रंजकही होतं. अनुवाद सरस झाला आहे. 

आपल्या भारतीय जीवनपद्धतीमध्ये तत्वज्ञान किती सहजपणे वर्षानुवर्षे सामावले गेले आहे ह्याची जाणीवही हे पुस्तक वाचताना होते. लेखक म्हणतात की .... "भारतीय लोक आई-वडिलांना गुरुजनांचा आदर करतात. त्यामुळे आदराची, भक्तीची सवय त्यांना असते. त्याचंच विशाल स्वरूप म्हणजे ईश्वराची भक्ती होते. पण अमेरिकन जीवनशैलीमध्ये आई-वडिलांकडे सुद्धा इतक्या भक्तीभावाने, आदराने बघितले जात नाही. पण परमेश्वर परमपिता आहे म्हणून त्याच्यावरच्या भक्तीची अपेक्षा केली जाते. भक्तीची, आदराची सवय घरातच नसल्याने अचानक परमेश्वराबद्दलचा भक्तीभाव सहजपणे उत्पन्न होत नाही.".  लेखकाचा हा दृष्टिकोन मला वैशिष्ट्यपूर्ण वाटला. लेखक भारताकडे नितांत कौतुकाने बघतो.

बराच वेळा घर-संसाराला, आयुष्याच्या कटकटीला वैतागलेले लोक म्हणतात की हे सगळं सोडून संन्यास घ्यावा असं वाटतं. पण संन्यासी होणं म्हणजे काही खायचं काम नाही हे या पुस्तकाच्या वाचनातून कळेल. सर्वसामान्य संसारी आयुष्यात असणाऱ्या कष्टांच्या कितीतरी जास्त कष्ट त्या मार्गावर आहेत. संसारी जीवनात तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला लगेच मिळतो. त्याचा उपभोग तुम्ही घेऊ शकता. पण इथे मात्र किती वर्ष तपश्चर्या करून आत्मज्ञान प्राप्त होईल? सांगता येत नाही. खरंच आत्मज्ञान असतं; का ते एक आभासी मृगजळ आहे ज्याच्या मागे आपण धावण्याचा वेडेपणा करतो आहे असंही वाटण्याची दाट शक्यता आहे. हे उमगेल.

अशाप्रकारे हे पुस्तक आपल्याला ज्ञानसाधना करणाऱ्या तपस्वी लोकांच्या वेगळ्या दुनियेत डोकावून बघायची, ते थोडं समजून घेण्याची संधी देते. ती संधी सुजाणवाचक नक्की घेतील.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

महानगर (Mahanagar)



पुस्तक - महानगर (Mahanagar)
लेखक - मिलिंद बोकील (Milind Bokil)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १४७
प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,एप्रिल २०२५
छापील किंमत - २५०/-
ISBN - 978-93-93528-84-1

मिलिंद बोकील यांच्या सात दीर्घ कथांचा हा संग्रह आहे. पूर्वी वेगवेगळ्या नियतकालिकांत १९८१ पासून २०२३ पर्यंत प्रकाशित झालेल्या या कथा आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगतो

पुन्हा सूर्य पुन्हा प्रकाश - एका कारखान्यातल्या रसायन साठवणूक करणाऱ्या प्रचंड मोठ्या टाकीमध्ये तिथला एक कर्मचारी उतरला आहे. टाकीची तांत्रिक पाहणी करणे हे त्याचे काम. या कामात त्याच्याबरोबर नेहमी कोणीतरी मदतनीस असतो. पण आज घाईघाईने तो एकटाच त्या टाकीत उतरलाय. मात्र घात झाला!! अचानक कोणीतरी टाकीचं झाकण बंद केलं. पूर्ण ग्रुप अंधारात तो आता त्या टाकीत अडकला आहे. बाहेर कोणालाच माहिती नाही. किती ओरडलं तरी त्या खोल जाड टाकीच्या बाहेर आवाज जात नाही. तो असाच अडकून राहणार का टाकीत? रसायन भरायला सुरुवात झाली तर काय होईल? झाकण बंद झाल्या झाल्या एका क्षणात बाहेरच्या प्रकाशमय जगातून तो पूर्ण अंधाऱ्या जगात कोंडला गेला आहे. एका क्षणात बाहेरच्या प्रत्येक गोष्टीची जणू अपूर्वाई वाटावी अशी भयंकर अवस्था झाली आहे. आता तो काय करेल? तो कसा सुटेल? त्याला पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश दिसेल का? याची ही अतिशय उत्कंठावर्धक अंगावर शहारे आणणारी कथा.

एक रिकामे शून्य - या कथेतला नायक वेगळ्या परिस्थितीत अडकला आहे. नायक हॉस्पिटल मधल्या वैद्यकीय उपकरणांची देखभाल दुरुस्ती करणारा तंत्रज्ञ आहे. त्याला एका हॉस्पिटलमध्ये तातडीने मशीन रिपेअर करायला बोलावलं आहे. कारण ते मशीन वापरून एक ऑपरेशन करायचं आहे. रुग्णाच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. ते उपकरण दुरुस्त झालं नाही तर त्याशिवाय शस्त्रक्रिया करणे खूप धोक्याचे आहे. आता काय होणार? यंत्र दुरुस्त होणार का? का त्या आधीच शस्त्रक्रिया करावी लागेल? इतकी धडपड करून शस्त्रक्रिया झाल्याचा फायदा होईल होईल का?
मशीन दुरुस्त करण्याचे नायकाचे प्रयत्न, हे काम आपण का अंगावर घेतलं हा सतत स्वतःलाच पडणारा प्रश्न, वेळ निघून चालली आहे म्हणून डॉक्टरांची होणारी धावपळ, रुग्णाच्या जीवनाची करुणा भाकणारे नातेवाईक हे सगळे चित्र लेखकाने अतिशय प्रत्ययकारी चित्र उभं केलं आहे. वाचता वाचता आपणही त्या चित्राचा एक भाग होऊन जातो.

लोखंड आणि घोडा - एक सुखवस्तू मध्यमवर्गीय जोडपं. एकमेकांचे गुण दोष सांभाळून, समजून घेत ते संसार करत आहेत. पण पती-पत्नीमध्ये अनपेक्षित पणे तिसरा येतो. नवऱ्याला कळणार नाही अशा बेताने सुरू झालेले संबंध हळूहळू वेगळे रूप घेतात. नायिकेला हे कळत असतं की आपण नवऱ्याला फसवतोय. पण तरीही या संबंधांची गोडी तिला वाटत असते. ते संबंध अजून गंभीर रूप घेऊ लागतात. या संबंधातून आपल्याला काय हवं आहे हे समजून घेता घेता तिला स्वतःची, तिच्या नवऱ्याची प्रियकराची आणि एकूणच आपल्या संसाराची काही वेगळीच कल्पना येते.
आधीच्या कथांप्रमाणे नायिका एखाद्या विशिष्ट ठिकाणी अडकलेली नाही. पण एका अदृश्य भावनिक वर्तुळात अडकली आहे. तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या भावभावनांचे हिंदोळे आपल्यालाही वाचनात झुलवतात.

रणभूमी - यातही एक सुखवस्तू जोडपं आहे. यातल्या बाईचं वागणं फार लहरी आहे. कधी उच्च शिक्षण घेण्याचा नाद तर कधी नाटकात काम करण्याचा नाद असं काहीतरी. इतका नाद की घरदार, मुलंबाळं विसरून त्याच गोष्टीच्या मागे. नवऱ्याला असं जाणवतं की त्या नादाबरोबरच तिथे संपर्कात येणाऱ्या पुरुषांच्या मागे ती विनाकारण वाहवत जाते आहे. तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यासारखा नसला तरी इतर पुरुषांच्या वृत्ती बद्दल मात्र त्याला संशय येत असतो. अशा प्रत्येक घसरणीच्या वेळी नवरा तिला कसा सावरतो आणि बायको त्याच्यासमोर नवनवीन आव्हान कशी ठेवते त्याची ही गोष्ट.

स्मरण - एका स्मशानात घडणारी ही गोष्ट आहे. एका अंत्यविधीला आलेल्या लोकांचा हा पूर्ण संवाद आहे. त्या क्षणी तिथे प्रत्यक्ष काहीच घडत नाही. ते लोक एकमेकांशी फक्त गप्पा मारत आहेत. पण त्या संवादातून ते चार जण कोण आहेत, अंत्यविधी कोणाचा आहे, त्या चार जणांचा आणि मृत व्यक्तीचा काय संबंध, त्या मृतव्यक्तीने त्यांच्या पूर्वायुष्यावर कसा परिणाम केला हे हळूहळू उलगडत जातं. ही कथा थोडी आर्ट फिल्म सारखी आहे. संवादातून तुकडे जोडत जोडत काही एक धूसर चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. इतर गोष्टींएवढी ही मला भावली नाही.

कॅमेरा - कोरोना काळात घरी बेकार बसलेला एक छायाचित्रकार काहीतरी काम करायचं म्हणून एक काम स्वीकारतो. ते काम असतं अश्लील चित्रफितीच्या चित्रीकरणाचं. पॉर्न फिल्मचं शूटिंग. अशा शूटिंगचा हा त्याचा पहिलाच अनुभव (कदाचित पुस्तकाच्या वाचकांचाही हा पहिलाच अनुभव असेल !) त्यामुळे अशा पद्धतीच्या फिल्मचं शूटिंग कसं होतं याचा आखो देखा हाल आपल्याला या कथेत वाचायला मिळतो. चित्रफितीत काम करणारे लोक शृंगाराचा अभिनय कसा करतात, दिग्दर्शक त्यांना किती सहजपणे त्यांना सूचना देतो, हसत खेळत कसं काम होतं, त्यातून तिथे काम करणाऱ्या माणसांचे वेगवेगळे रंग हे सगळं दिसतं. इथे सुद्धा "पब्लिक डिमांड" काय असते हे दिग्दर्शकाला लक्षात घ्यावं लागतं हे वाचन मजेशीर आहे. परिस्थितीच्या नाईलाजापोटी अशा चित्रफितीत लोकांना काम करावं लागतं ती निकड अधोरेखित होते.
लेखक तुम्हाला थेट त्या चित्रीकरणाच्या सेटवर दिग्दर्शकाच्या बाजूला खुर्चीवरच बसवतो !!

काही पाने उदाहरणे दाखल
रसायनाच्या टाकीत अडकलेल्या नायकाची अवस्था.

लहर आली की वाहत जाणाऱ्या रंजनाची अवस्था.

अश्लील चित्रपटाच्या चित्रीकरणातील एक प्रसंग.


अशा ह्या विविध विषयांवरच्या पण माणसाच्या मनात चालू असणाऱ्या संघर्षाच्या आहेत. परिस्थितीशी संघर्ष, स्वतःच्या वासनांशी संघर्ष, स्वतःच्या भावनांशी किंवा आपल्या जवळच्या माणसाच्या मानसिकतेशी. त्यामुळे सर्व कथा गंभीर आहेत पण रटाळ अजिबात नाहीत. जितक्या उत्कंठावर्धक आहेत तितक्याच त्या विचार प्रवृत्त करणाऱ्या देखील आहेत. माणसांच्या नाना रंगछटा दाखवणाऱ्या आहेत.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-












छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar)

पुस्तक - छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar) लेखक - गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Meha...